माझ्या पुणे गोंदवले प्रवासात टिपलेले काही क्षण

Primary tabs

गीतांजली टिळक's picture
गीतांजली टिळक in भटकंती
24 Jun 2019 - 12:59 pm

काल वर्षभराहून अधिक काळाने गोंदवल्याला जाऊन आले. समाधी दर्शनाबरोबरच मला काल काही खूप वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळाल्या. नेहमीचा माझा आवडता दुधेबावी घाट तर जाता येता मन भरुन पाहून घेतला.
माझं सगळं लहानपण घाटातून प्रवास करण्यातच गेलं कारण कोकणात वास्तव्य. पण तो कुंभार्ली घाट महाप्रचंड अवाढव्य आहे. त्याची कायम भिती वाटली. पण तो तितकाच देखणाही आहे. पावसाळ्यात तर या घाटातून जाताना स्वर्गात आहोत असंच कायम वाटत आलं. पावसाने ओथंबलेल्या ढगातून जाणारी गाडी, त्यांच्या ओलाव्याचा शरिराला होणारा स्पर्श. चहुकडे बारिक मोठे भरपूर धबधबे, घाटमाथ्यावरचा अचानक वळणावर भेटणारा मोठ्ठाच्या मोठा धबधबा.
अरे विषयांतर झालंच. अलोरे हा विषय डोक्यात आला की ते होतंच.
तर हा दुधेबावी घाट इतका गोजिरवाणा आहे. एक तर या घाटात दोन्ही बाजूने डोंगर दिसतात. एका बाजूला उंचच उंच पर्वत दुसर्‍या बाजूला खोलच खोल भितीदायक दरी असं प्रत्येक वळणावर नाही एक दोन ठिकाणीच आहे. घाटाला गरजेचे वळणावर भीतीदायक चढउतार आहेत. घाट चढून गेलो हे समाधान देणारी त्याची लांबी आणि उंची आहे. घाटमाथ्यावरुन पठारावर उतरताना पोटात गोळा येईल अशा उंच सखल वळणवाटा आहेत. पण ओसाड, उजाड सौंदर्य सगळं. इथल्या एकमेकांच्या मागे पुढे असणार्‍या त्या टेकड्या जणू आपण रस्त्यावरुन चाललोय म्हणून कुतूहलाने आपल्या कडे डोकी उंचावून पाहतायत असं वाटतं. सगळे डोंगरही उजाडच आहेत. थोडा ग्रँड कॅनियनचा भासही होतो तिथून जाताना. लालसर काळपट राखाडी रंगांमुळे असेल कदाचित. उन्हात रखरखीत असतात हे सगळे डोंगर तरी पण पाहत रहावेत असे सुंदर आहेत. त्या एकमेकांना छेदून जाणार्‍या रांगांचं एक मोहक चित्र बनतं. मला प्रत्येक वेळी वाटतं गाडी थांबवावी आणि तिथे बसून हे पुर्ण चित्र नीट पाहून घ्यावं पण अजून तरी नाही जमलं. एकदा कधीतरी जाताना डोंगरपायथा आणि मधे मधे बर्‍याच ठिकाणी गर्द हिरवी झाडं आणि त्यावर लाल चुट्टूक फुलं अशी नक्षी दिसली. डाळिंबाच्या बागा होत्या त्या. तेव्हा ते डोंगर खूप खुशीत असल्यासारखे वाटले. नटून थटून बसलेले. बहरलेल्या झाडांना पाहून तृप्त आनंदी.
पण यावेळी गालबोट लावणारी एक गोष्ट पाहिली म्हणजे एके ठिकाणी ट्रकने ओतून दिलेला कचर्‍याचा ढिगारा- बाटल्या, कॅन, प्लास्टिक पिशव्या. सगळा शहरी पद्धतीचा कचरा. भीती वाटली की या बिचार्‍यालाही झाला स्पर्श या नष्टचर्याचा. मानवी वस्तीपासून इतका दूर असूनही त्याते क्रुर हात याच्यावर पडले. वाईट वाटले.
अजून एक गोष्ट पहायला मिळाली म्हणजे चाराछावण्या. फलटण सोडून दहिवडी कडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काठ्या रोवून त्यावर हिरवी कापडं अशा गोठ्याच्या रुंदीच्या लांबच लांब पट्ट्या. बरीच ढोरं बांधलेली. पाण्याच्या टाक्या आणि उसाचं बरंच वाडं पडलेलं छावणीच्या एका टोकाला. बरीच बाया माणसं त्या माळावरच्या छावणीच्या दिशेनं चालत जाताना दिसत होती. मग प्रमिलानं सांगितलेलं आठवलं की छावणीत बांधली तरी आपल्या गुरांकडं आपणच जाऊन बघावं लागतं सकाळ संध्याकाळी. जरा जरी हलगर्जीपणा झाला तरी ढोर आजारी पडतं.
गोंदवल्याला पोचल्यावर गाडीतून उतरल्या उतरल्या कसला तरी वेगळाच पण मोठा पक्ष्यांचा आवाज आला. आधी कधी न ऐकलेला. अगदी गोंगाट. इकडे तिकडे वळून पाहिल्यावर डावीकडे नारळाच्या झाडांवर वरती बरीच गिधाडं. एका जोडीने वाटेगावला नारळाच्या झाडावर घरटं केलेलं पाहिलं होतं पण एवढी एकदम आणि इतक्या जवळून , इतका आवाज पहिल्यांदाच. चांगले पोसावलेले गरगरीत दिसत होते पक्षी.
मनात आलं हे natural scanvengers इथे इतक्या प्रमाणावर. दुष्काळ, त्याने मरणारे प्राणी. यांची मेजवानी असेल.
गोंदवल्याच्या मंदिर परिसरात बरेच दिवसांनी गेलं तर नवीन काहीतरी पहायला मिळतं. नवीन इमारत, एखादी नवीन सोय वगैरे. यावेळी नवीन काय पहायला मिळेल म्हणून मला कुतूहल होतंच. प्रसादाच्या रांगेत उभे असताना छताच्या पाघोळ्यातून पाणी गळताना दिसलं. पाऊस आला असं वाटलं म्हणून डावीकडे वळून पाहिलं तर तिकडे काहीच नाही. मग योगेशने दाखवलं, पलीकडच्या पत्र्यावर जो दोन शेडमधल्या फटीतून दिसत होता त्याच्या सर्वात उंच जागेवर एक पाईप होती आणि स्प्रिंकलर. तो सगळ्या पत्र्यावर पाणी फवारत होता. ते पाणी गळत होतं. त्याने त्या हॉलमधे छान गारवा होता. थोडक्यात पण सोपा उपाय. उन्हाची दाहकता कमी करण्याचा.
फक्त गळलेलं पाणी recycle केलं नव्हतं. ते होईलच थोड्या दिवसात. मला खात्री आहे.
परतीच्या वाटेवर बरेच ट्रक, टेंपो त्यात बरीच माणसं. एके ठिकाणी एका थांबलेल्या मिनी ट्रकमधे खुर्च्या ठेवत होते सामान चढवत होते. आधी लक्षात आलं नाही मग एका टेंपोवरच्या पाटीवर वाचलं आणि कळलं ह्या आसपासच्या बारिक मोठ्या गावातल्या दिंड्या देहू आळंदीला निघाल्या होत्या, वारीला. थोडंसं आश्चर्य पण वाटलं कारण याच मार्गे वारी पंढरीला जाते मग इथूनच का नाही सामील होत वारीत. पण शेवटी श्रद्धेचा भाग असतोच.
एके ठिकाणी रस्ता छोटा होता म्हणून एका ट्रकच्या मागून बराच वेळ जावं लागलं. त्यात मागं दोर बांधून बंदिस्त केलेली मागची बाजू आणि त्या दोरांमधून पाय सोडून बसलेले वारकरी. त्यामुळे त्यांचे चेहरे आम्हाला दिसत होते. तो भोळा भाबडा भक्तीमय भाव, वारीला निघाल्याचा आनंद, काही दिवसात वारीतून विठोबाला भेटायला मिळणार त्याची आतुरता सर्व काही त्या शांत चेहर्‍यावर दिसत होतं. शेती हा सगळ्यात उत्तम दर्जाचा व्यवसाय करणारे हे लोक. त्यात निसर्गाची किती आव्हानं पेलायची. श्रद्धाळू असतात म्हणूनच हे शिवधनुष्य पेलू शकतात. विठोबावर काळजीचा भार वाहून येतात आणि निर्धास्तपणे पुढचा पिकाचा हंगाम सांभाळतात.
अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे सायकल वारी करून परत येणारे वारकरी.
खूप मोठ्या संख्येने. बराच वेळ ते परतीच्या पुणे रस्त्याला भेटले. भगवे पुर्ण हाताचे टीशर्ट, हाफ पँट, सायकलीला पुढे लावलेले छोटे भगवे झेंडे. पाठीवर सामानाचं ओझं, डोक्याला हेल्मेट, डोळ्याला गॉगल आणि सायकलच्या तिरक्या बारवर पाण्याच्या बाटल्या. यांना पाहिल्यावर मी आधी वाचलेलं एक वाक्य आठवलं. You can take an Indian out of India but you can't take out an Indian out him. आणि ही ओळ एका व्हिडीओ सोबत आली होती ज्यात भारतीय मुलगा पदवीदान सोहळ्यात पदवी मिळाल्यावर, ती देणार्‍या परदेशी माणसाला वाकून नमस्कार करतो. हे सगळे वारकरी पुण्यातले उच्चशिक्षित पदवीधर , विद्यार्थी असेच असणार. पण कौतूक।या गोष्टीचं वाटतं की त्यानी आपली मॅरॅथॉन या वारीला जोडली. उत्तम आरोग्यप्राप्तीच्या त्यांच्या प्रवासात विठोबाचा आशिर्वाद घ्यायला ते विसरले नाहीत. या सावळ्या विठूची भूल त्यांनाही पडलीच. अर्थार्जनाचं साधन बदललं,गावकरी असोत किंवा नागरी तरी माणसाचा मूळ गाभा तोच राहतो.
आणि शेवटी मी माझ्या नेहमीच्या सिद्धांतावर येऊन पोचले. श्रद्धा माणसाला सकारात्मकता देते, अडचणीतून बाहेर पडायचं बळ देते.
खंडाळ्याजवळ हायवेपाशी पोहोचत असताना अजून एक गोष्ट पहायला लागली जी मला पहायला अजिबात आवडत नाही ती म्हणजे शेताबाहेर रस्त्यालगतच्या गटारात ओतून दिलेले बरेच टोमॅटो. किती त्रासदायक असणार ते पिकवणार्‍याला. दर मिळत नाही म्हणून कष्टाने पिकवलेलं पीक मातीमोल होऊन जाताना पाहून. वैर्‍यावरही येऊ नये अशी वेळ म्हणजे काय ते हे असं ओतून दिलेलं पीक पाहिलं की कळतं.
घरी पोहोचल्यावर महाराजांचा नवीन मोठा फोटो लावला. त्याला हार घालताना मनात प्रार्थना केली की या शेतकर्‍यांची दु:ख दूर होवोत आणि त्यांना आमच्याकडून काही मदत होऊ शकणार असेल तर ती करण्याचा मार्ग आम्हाला लवकर दिसो.

© सौ. गीतांजली टिळक

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 1:41 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर, सुरेख !
चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले !
बरेच विषय मांडलेत !

या टेकड्या जणू आपण रस्त्यावरुन चाललोय म्हणून कुतूहलाने आपल्या कडे डोकी उंचावून पाहतायत असं वाटतं. सगळे डोंगरही उजाडच आहेत. थोडा ग्रँड कॅनियनचा भासही होतो तिथून जाताना. लालसर काळपट राखाडी रंगांमुळे असेल कदाचित. उन्हात रखरखीत असतात हे सगळे डोंगर तरी पण पाहत रहावेत असे ....
- वाह, मस्तच !

कडे तिकडे वळून पाहिल्यावर डावीकडे नारळाच्या झाडांवर वरती बरीच गिधाडं. एका जोडीने वाटेगावला नारळाच्या झाडावर घरटं केलेलं पाहिलं होतं पण एवढी एकदम आणि इतक्या जवळून , इतका आवाज पहिल्यांदाच. चांगले पोसावलेले गरगरीत दिसत होते पक्षी. मनात आलं हे natural scanvengers इथे इतक्या प्रमाणावर. दुष्काळ, त्याने मरणारे प्राणी. यांची मेजवानी असेल.
- बाप रे !

हे वाचताना मी एका धाग्यात उल्लेख केलेले गिधाड अभयारण्य (भारतातील एकमेव) याची आठवण झाली.

https://www.misalpav.com/comment/1027369#comment-1027369

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 1:44 pm | चौथा कोनाडा

उप-सुचावणी: दोन परिच्छेदात अंतर सोडले आणि काही फोटो लेखासोबत डाकवेल असते तर आणखी मजा आली असती.
पुढील लेख प्रकाशित काटे वेळी हे वेळी हे नक्की करा.

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 1:46 pm | चौथा कोनाडा

* डकवले
* करते वेळी

अजून टाकता येतील का?

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 5:03 pm | चौथा कोनाडा

हो, येतील ना.
साहित्य संपादक मंडळास विनंती करावी लागेल.
टर्मीनेटर यांचा प्रतिसाद संदर्भा.

गीतांजली टिळक's picture

24 Jun 2019 - 3:11 pm | गीतांजली टिळक

धन्यवाद. इतके व्यवस्थित वाचून प्रतिक्रिया दिल्यबद्दल

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 5:05 pm | चौथा कोनाडा

:-)

तुम्ही लिहिलंत छान, असा असा प्रतिसाद आपोआप येणारच की !

आणखी लिहा, तुमची मनोगत व्यक्त करायची शैली सुरेख आहे.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

24 Jun 2019 - 1:44 pm | प्रलयनाथ गेंडास...

छान वाटलं, लेख वाचून !

प्रमोद देर्देकर's picture

24 Jun 2019 - 1:56 pm | प्रमोद देर्देकर

मस्त लिखाण येवू दे अजून

जॉनविक्क's picture

24 Jun 2019 - 2:14 pm | जॉनविक्क

श्वेता२४'s picture

24 Jun 2019 - 2:46 pm | श्वेता२४

छान वर्णन केलंय. लिहीत राहा.

टर्मीनेटर's picture

24 Jun 2019 - 4:13 pm | टर्मीनेटर

श्रद्धा माणसाला सकारात्मकता देते, अडचणीतून बाहेर पडायचं बळ देते.

सहमत.
छान लिहिलंय, पुढील लेखनास शुभेच्छा!
फोटोंशिवाय भटकंतीच्या धाग्याला मजा नाही.

फोटो आहेत. ते इथे टाकता येतात हे माहिती नव्हते

डॉ सुहास म्हात्रे साहेबांचा मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा धागा मला उपयोगी आला होता, तुम्हालाही येईल.

अजून टाकता येतील का?

अजूनही टाकता येतील, त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक मंडळास विनंती करावी लागेल.

यशोधरा's picture

24 Jun 2019 - 5:43 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2019 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्रदर्शी वर्णन. आम्हीही तुमच्याबरोबर फिरून आलो ! फोटो असते तर अजून मजा आली असती.

असेच लिहीत रहा. वाचायला नक्की आवडेल.

इथेच एका प्रतिसादांत, फोटो टाका. किंवा, ते कठीण वाटल्यास त्यांचे दुवे (लिंक्स) प्रतिसादात टाकून ते लेखात हलविण्याची विनंती केल्यास प्रशासन नक्कीच मदत करेल.

आम्हीही बसच्या खिडकीतून गम्मत बघतो पण असं दिसत नाही.
छान लेख. पावसाचा शिडकावा आला अगदी.
-----
फोटो ब्लॉगरवर टाका. इकडे कोणीही आणू शकतं तिथून.

चौकटराजा's picture

24 Jun 2019 - 6:57 pm | चौकटराजा

लेखन शैली दाद दण्याजोगी ! आपल्याला घाटातील प्रवासाची आवड असेल तर एकदा कालका सिमला बाय ट्रेन , काठगोदाम ते नैनीताल बाय कार व जम्मू ते श्रीनगर व्हाया बनिहाल पास हे प्रवास अवश्य करा !

एवढं लांब कशाला, मला तर हडपसर - वाठार रेल्वे प्रवास फार आवडतो. गाडी झुकुझुकु वळणे घेत जात राहाते. स्टेशनांंवर आपलीच वाट पाहणाऱ्या पिवळ्या पाट्या, हिरवा बावटा दाखवणारे रेल कर्मचारी.

चौकटराजा's picture

24 Jun 2019 - 9:30 pm | चौकटराजा

पुणे ते मिरज हा प्रवास खास करून पावसाळ्यात केल्यास एकदम बहारदार अनुभव असतो म्हणतात . मी अजून तो पावसगळ्यात केलेला नाही !

सस्नेह's picture

24 Jun 2019 - 7:47 pm | सस्नेह

छान लिहिलंय !
फोटो अवश्य टाका.

दुर्गविहारी's picture

24 Jun 2019 - 8:25 pm | दुर्गविहारी

उत्तम आणि चित्रदर्शी लिखाण ! धागा भटकंती विभागातील असल्याने स्वसंपादनाची सोय असते, अर्थात तुम्ही फोटो अजून टाकू शकता किंवा संपादक मंडळाला विनंती करु शकता. आणखी लिहा, पु.ले.शू.

गीतांजली टिळक's picture

24 Jun 2019 - 8:56 pm | गीतांजली टिळक

लेखासोबतचे फोटो

यशोधरा's picture

24 Jun 2019 - 9:03 pm | यशोधरा

फोटोना access नसल्याने दिसत नाहीत.

जालिम लोशन's picture

25 Jun 2019 - 8:00 pm | जालिम लोशन

मार्मीक लिहलय.

मी पुर्वी रेग्युलर होतो. पण तिथल्या so called स्वंयसेवकांचे वर्तन बघुन ऊद्गिन झालो आणी जाणे बंद केले.

१) म्हातार बाबा आणी त्यांचे जावई तिथेच पडिक असायचे आणी पुण्याला येतांना गाडीत तेलाचे डबे, गव्हातादंळाची पोती जे हाताला लागेल ते घेवुन यायचे. आणी व्यक्तीमत्व युरोपिअन सारखे कोणी म्हणणार नाही भुरटे म्हणुन.

प्रशांत's picture

26 Jun 2019 - 12:05 pm | प्रशांत

असेच लिहत रहा..

रच्याकन सायकल वारी मधे काहि मिपाकर पण होते

a
- सायकल वारीतील वारकरी

कपिलमुनी's picture

29 Jun 2019 - 12:03 am | कपिलमुनी

सिमेंटचा रस्ताचे काम चालू होते ते पूर्ण झाले आहे का?

प्रशांत's picture

3 Jul 2019 - 2:52 pm | प्रशांत

नाय

त्या घाटाचे नाव मोगराळे आहे दुधेबावी नाही. घाटाच्यावर मोगराळे गाव आहे. मी नेहमी जात असतो गोंदवले येथे.

फोटू काय दिसेना ! छान लिहलय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2019 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूउऊऊऊऊऊऊ https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

खिलजि's picture

3 Jul 2019 - 5:14 pm | खिलजि

कुंभार्ली घाट तर माझा वीकपॉइंट आहे.. खरंच सुंदर आणि नयनरम्य घाट आहे .. तेथील घाटावर जी चहा मिळते ती तर अप्रतिम .. अप्रतिम अप्रतिम निवळ अप्रतिम .. अहाहा काय ते खाली आलेले धुके आणि तो साधाभोळा चहावाला आपण सांगू तशी चहा बनवणारा ... मी तर किमान साताठ कप प्यायल्याशिवाय तिथून हलतच नाही .. त्यालाही साक्षात भोलेनाथ आपल्या टपरीवर पार्वतीसहित कार्तिक आणि गजाननाला चहा प्यायला घेऊन आल्यावानी आनंद होतो .. तोही हळूहळू हळूहळू मी सांगेन त्याप्रमाणे तेव्हढाच मसाला आणि आलं घालून घोटून घोटून चहा देत असतो .. प्रत्येक कपगणिक मिळणारा आनंद पाहून त्याला जे काही आंतरिक समाधान मिळत असेल त्याची तो पोचपावती पुन्हा कधी येणार पाव्हणे ? असे विचारून देतो .. मी देखील स्वतःला कैलासातून खाली धारेवर सर्व कुशलमंगल आहे ना .. असे बघत बघत चहावर चहा ठोकत असतो .. पार्वती किंचाळायच्या तयारीत असली कि नंदीला चावी मारून , कार्तिक आणि गणेशाला शिट्टी मारून नंदीवर विराजमान व्हायला सांगायचे आणि मग पळायचे..