खाण्यासाठी जन्म आपुला २ : बाजार आमटी खिलवणारं महावीर व्हेज

महासंग्राम's picture
महासंग्राम in पाककृती
15 Jun 2019 - 12:52 pm

आपल्या पाककृती विभागाचा परिचय करून देतांना मालकांनी लिहिलंय "शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! " अगदी खरंय म्हणा हे खाल्लेले दोन घास काअसेना, ते परिपूर्ण असले तर जेवणाला अजून लज्जत येते. खाण्यासाठी जन्म आपुला या हि उक्ती कृतीत उतरवण्याची माझी कायम धडपड असते, त्यामुळे पुण्यनगरीत आल्यापासून इथले वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखणं मस्ट असते आणि वेगळं काय खायला मिळेल याच्या शोधात असतो. अश्याच एका फेसबुकवरच्या शोध मोहिमेत 'बाजार आमटी' या पदार्थाचं नाव ऐकलं आणि पुण्यतनगरीत हे मिळतंय म्हंटल्यावर जाऊन खाणं आलंच.

एक आटपाटनगर होतं त्या नगरातल्या थोरले माधवराव पेशवे पथावर महावीर वेज हे खास सोलापुरी चवीचे खाऊ घालणारं हॉटेल आहे. याच्या जवळची खूण सांगायची म्हणजे हे सुप्रसिद्ध अश्या 'विश्व' हॉटेल जवळ आहे आणि 'झकास निखारा मिसळ' नावाच्या अत्यंत ओव्हररेटेड मिसळ दुकानाला लागून आहे. (आता तुम्हाला विश्व हॉटेल माहिती नसेल तर तुम्ही पुण्यातल्या पारपत्राचा पुनर्विचार करणे हे योग्य). असो तर परवा बदाबदा पाऊस पडत असतांना सुद्धा इथे गेलो, अगदी साधी पण सुंदर रचना असलेल्या या जागेत आत गेल्यावर मेन्यूकार्ड कडे न पाहता 'बाजार आमटी' आणि ज्वारीच्या भाकरीची ऑर्डर दिली, त्यांनी विचारलं "कडक कि नरम ?" जास्त काही माहिती नसल्याने रिस्क न घेता नरम भाकरी सांगितली आणि DRS चा रिव्यू बरोबर ठरल्यावर धोनीला जेव्हढा आनंद होत नसेल त्या पेक्षा जास्त आनंद मला झाला. पुढे ऑर्डर दिल्यावर आमच्या त्या बाबूमोशाय ने शुन्य मिनिटांत, हल्ली पुण्यनगरीतल्या हाटेलात दुर्मिळ होत चाललेला अगदी नजाकतीने कापलेल्या पातळ गोल कांद्याच्या चकत्या कांदा, रसरशीत लिंबू आणि थंडगार काकडीचा साज आणून दिला. तुम्हांला सांगतो राजेहो ते पाहून दिल अगदी खुश झालं .

थोड्याच वेळात मुख्य डिश बाजार आमटी आणि भाकरी झाली. झाडाचं मूळ आणि ऋषीचं कुल विचारू नये असं म्हणतात (चूभूदेघे) पण खाद्यपदार्थांच्या बाबतीत असं कोणी काहीही म्हंटलं नसल्यामुळे आपली डिश येईस्तोर मालकांशी गप्पा मारल्या त्यातून या आमटीचा इतिहास भूगोल आणि वर्तमाना सहित सगळा कुलवृत्तांत काढून घेतला पंढरपूर तालुक्यातल्या करकंब गावचं हे अपत्य. पूर्वीच्या काळी व्यापारी दूरवर व्यापाराला जात करकंब ला त्यांचा मध्यवर्ती मुक्काम असे. आता ते पडले व्यापारी त्यांना व्यापार करणं माहिती रांधण्याच्या नावाने बोंब, त्यामुळे दूरच्या देशात गेल्यावर त्यांची खाण्याची आबाळ होऊ लागली त्यांना प्रश्न पडला आता करावं तरी काय ? कारण त्यांना फक्त भाकऱ्या बडवता यायच्या मग त्यांच्यातल्या एका हुशार गड्याने रात्रीच्या जेवणाला मिक्स डाळींची बाजार आमटी बनवली. आजही थंडी, पडसं या साठी हि आमटी जालीम उपाय म्हणून वापरली जाते असंही सांगितलं, तेव्हा कुठे मला ठाऊक होतं कि पुढच्या काही मिनिटांतच याचा मला याची देही याची डोळा प्रत्यय येणार आहे म्हणून!

तेवढयात गरमागरम बाजार आमटी आणि भाकरी आली. ती चुरून त्यावर मनसोक्त आमटी टाकून रामकृष्णहरी केलं म्हणता म्हणता एक भाकरी संपली पण दुसरी भाकरी थंड झाल्याने ते बदलून देतो म्हणाले. तेवढ्या वेळात आमटीची नुसती चव चाखावी म्हणून एक भुरका मारला आणि PUBG मधल्या KAR ९८ स्नायपर बंदुकीचा बार उडावा तशी किक बसली. भर पावसात कानाच्या पाळया गरम झाल्या, नाकाच्या शेंड्यावर घाम दाटला.
अहाहाहाहा ! काय जबरदस्त चव होती म्हणून सांगू म्हाराजा. अगदी परफ़ेक्ट प्रमाणात मसालेदार तिखट यांचं मिश्रण. हे झाल्यावर अश्याच अजून ०२ भाकऱ्या हाणून पोटाचा विठोबा शांत केला.

मालकांना इतकं सुंदर जेवण बनवल्याबद्दल "अन्नदाता सुखी भव' म्हणून बिल आणि दुवा दिल्या. आता इतकं भारी जेवण झाल्यावर तितकंच भारी पान हवंच, त्यामुळे गाडी बुद्धिबळाच्या पटावर तिरक्या चालणाऱ्या उंटासारखी खरंच तिरक्या दिशेने घालून थेट अक्षरधारा च्या शेजारी असणाऱ्या जवाहर ला घातली. तिथलं अगदी प्रमाणात सगळं मटेरियल घातलेलं बिना तंबाखू साधा फुलचंद पान खाल्ल्यावर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागली ती म्हणजे अवर्णनीय. पुणे सध्या जागतिक शहर म्हणून उदयाला येतंय जगभरचे क्युझिन चुटकीसरशी उपलब्ध होत चालले आहेत. पंजाबी, दाक्षिणात्य पदार्थांच्या भाडीमारात आपली अस्सल महाराष्ट्रीयन चव कुठे तरी हरवत चालली आहे नेहमी वाटायचं. पण इथे जळून आल्यावर हा भ्रम दूर झाला. तेव्हा मंडळी करकंबचे तरुण तडफदार उद्योजक संतोष पिंपळे आणि राहुल पुरवत यांनी सुरु केलेलं हे हॉटेल पुन्हा पुन्हा भेट द्यावी असंच आहे.

ता.क : ज्यांना मसालेदार पदार्थ सोसत नाही त्यांना सोबत घेऊन जाऊ नका जेवणाचा सगळा मुड घालवून बसाल.

ता.क. : ऐनवेळेस फोन ने दगा दिल्याने फोटो काढले नाहीत.

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

15 Jun 2019 - 1:13 pm | mrcoolguynice

यम्म १+

मंदार कात्रे's picture

15 Jun 2019 - 1:17 pm | मंदार कात्रे

लय भारी प्रकरण दिसतय . रेसीपीज उपलब्ध आहेत नेटवर

गवि's picture

15 Jun 2019 - 1:48 pm | गवि

रोचक.

उत्तम माहिती. पदार्थाचं नाव बाजार आमटी हे लै आवडल्या गेले आहे. कित्येक वर्षे अनेक ठिकाणी, विशेषतः हायवेलगत सर्वत्र "गावरान आणि घरगुती" हे शब्द वाचून वाचून इतका कंटाळा आलाय की शहररान किंवा बाजारगुती जेवण मिळेल असं कोणी लिहिल्यास वेळात वेळ काढून तिथे जेवेन. ;-)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jun 2019 - 7:55 pm | हणमंतअण्णा शंकर...

हेच म्हणतो मी.
चुलीवरचे नाचोज, गावरान टाकोज, घरगुती कॉंटिनेंटल किंवा अमृततुल्य बोबा वगैरे मिळण्याआधी देह ठेवावा एवढीच इच्छा आहे गविजी.

जॉनविक्क's picture

15 Jun 2019 - 1:53 pm | जॉनविक्क

एकदम जबरदस्त.

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 1:57 pm | महासंग्राम

जल्ला लिंक ऍडलेली पोष्टीत दिसत तरीही नाय

वरुण मोहिते's picture

15 Jun 2019 - 2:51 pm | वरुण मोहिते

बघायला हवे हे प्रकरण

कांदा जाळून केलेली तिखट आमटी असावी.
बाकी चालू द्या.

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 3:01 pm | महासंग्राम

बाजार आमटी

साहित्य:-मटकी 1 वाटी,तुरदाळ चार चमचे,,दोन बारिक चिरलेले कांदे,एका मोठ्या टाँमेटोची पेस्ट,आल,लसुण पेस्ट,गरम मसाला1 चमचा,काळतिखट, एक चमचा,लाल बँडगीचे तिखट दोनचमचे,हळद अर्धा चमचा व शेंगादाणे कुट २चमचे,बटर,कोथिंबिर ,गरमपाणी एक तांब्या. फोडणी साहित्य इ.

कृती:-प्रथम दाळी शिजवुन मिक्सरमधुन वाटून घ्या.नंतर कढईत ३डाव तेल गरम करा त्यात मोहरी ,जिरे किंचित टाका. चिरलेला कांदा टाका,लालसर झाल्यावर आललसुण पेस्ट टाका नंतर टाँमेटो पेस्ट टाका,तेल सुटु लागल्यावर,हळद,लालतिखट ,काळतिखट,शेंगादाणे कुट व कच्चा गरम मसाला टाकाचांगला खमंग वास यायलाकी गरम पाणी व वरण टाकुन एकजीव करुन ऊकळी येऊ द्या व कोथिंबीर , ओलखोबरे कीस टाकुन सजवुन भाकरी,चपाती,रोटी बरोबर मनमुराद खावी.

कोल्हापूरकडुन एक कांदालसूण मसाल्याचे पाकिट येते . तो घालून मटकीची आमटी केल्यास हीच बाजार आमटी होते. मटकीची मिसळ करताना एकदम सोपे होते. ही आमटी चविष्ट लागतेच.

हिरवे/पांढरे वाटाणेची मिसळ करताना शेंगादाणे कुट व कच्चा गरम मसाला घातलेले चालत नाही.

जेम्स वांड's picture

16 Jun 2019 - 6:47 am | जेम्स वांड

आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेल्या आमट्यांची/उसळीची चव ह्यात जमीन अस्मानाचे अंतर असते. कांदालसूण मसाला हा जेनेरीक तिखट मसाला आहे, कोकणात मालवणी/आगरी मसाला जसा सामान्यतः सुद्धा वापरत असावेत तसे घाटावर किमान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरतात. हल्ली त्याच्या रेट्यापुढे इतर मसाले लुप्त होत चाललेत तरी सातारकडे आमच्या एकंदरीत कांदा लसूण प्रस्थ कमीच, जहाल काळा मसाला असला म्हणजे अट्टल सातारी पिंड खुश होणार, तसल्या त्या काळ्या मसाल्यात उडदाचं घुटं वरपत वसरीत बसून पाऊस पाहत भाकरी मोडण्यासारखा आनंद नाही दुसरा.

Spaghetti

पुणेरी मालिका फारच मजेदार होती त्याची आठवण झाली ( बंद पाडली इन्ही लोगों ने। जाऊ द्या.)
सांगायचा मुद्दा - सुधीर जोशी ( गेले बिचारे) यांची खानावळ व त्यामध्ये आलेले सातारा, मुंबईकडचे गिऱ्हाइक एपिसोड आठवला.

पुण्यात कुठे म्हणायचं हे .. जाऊन दोन चार भाकऱ्या ठोकेन म्हणतोय .. हायवेच्या जवळ आहे कि थोडं आत .. नाही म्हणजे पुणे मला काळेवाडी फाटा किंवा वाकड हे जास्त चांगले ठाऊक आहे पण त्यापुढे भूगोलाचे ज्ञान नाही .. तर जरा प्रकाश टाकावं हि नम्र विनंती .. बाजारामती हे विशेष नाव आणि नुकताच सुरु झालेला पाऊस , योग जमून आला तर बहार येईल .

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 4:45 pm | महासंग्राम

पुण्यात आत सारसबागेजवळ आहे.

2140, Thorle Madhavrao Peshwe Rd, Vijayanagar Colony, Municipal Colony, Pune, Maharashtra ४११००९

गुगल मॅप लिंक
https://goo.gl/maps/qYd8TUFanGw8DfLC7

अभ्या..'s picture

15 Jun 2019 - 6:54 pm | अभ्या..

बाजारआमटी मुळे आणि सोलापुरी आयटममुळे झोमॅटोवर पाहिले, मेनु कार्ड पाहिले आणि हादरलोच.
अरे कायच्या काय रेट. चक्क दुप्पटच की सोलापूरपेक्षा. अर्थात पुणे आणि पेठेत आहे म्हणल्यावर काय बोलायलाच नको म्हणा, जागा आणि इतर खर्चही तेवढेच असणार म्हणा पण बाजार आमटीच खायची असेल तर मी चार जणांना घेऊन जाऊन पंढरपूरच्या तिकाट्यावर वरिजिनल खाऊन येईन. जाउन येऊन खाऊन इतकाच खर्च होईल.
.
खरं सांगायचं झालं तर बाजार आमटी, घाटी शेरवा हे दोन्ही आयटम ओव्हरहाईप्ड आहेत आणि चवीत ते बिल्कुल आवडलेले नाहीयेत.

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 8:12 pm | महासंग्राम

हे राम !!! हे काय हो मालक

टर्मीनेटर's picture

16 Jun 2019 - 12:04 am | टर्मीनेटर

खरं सांगायचं झालं तर बाजार आमटी, घाटी शेरवा हे दोन्ही आयटम ओव्हरहाईप्ड आहेत आणि चवीत ते बिल्कुल आवडलेले नाहीयेत.

+१

खरं सांगायचं झालं तर बाजार आमटी, घाटी शेरवा हे दोन्ही आयटम ओव्हरहाईप्ड आहेत

अरेरे, खूप ऐकून खास जाऊन ट्राय करावं आणि अपेक्षाभंग व्हावा अशा यादीत आणखी एक भर.. ?

अख्खा मसुराप्रमाणे..

आता सांग भावा घाटी शेरवा म्हंजी काय प्रकरण असतंय एकंदरीत, नावच ऐकलेलं नाही ?

गणामास्तर's picture

21 Jun 2019 - 1:30 pm | गणामास्तर

खरं सांगायचं झालं तर बाजार आमटी, घाटी शेरवा हे दोन्ही आयटम ओव्हरहाईप्ड आहेत आणि चवीत ते बिल्कुल आवडलेले नाहीयेत.

सहमत. त्यातल्या त्यात घाटी शेरवा जरा बरा म्हणायचा.
अख्खा मसूर प्रकार पण तितकाच हाईप्ड परंतु एकदा मध्यरात्री गोव्या वरून परतताना कराड जवळ एका ट्रक वाल्यांच्या धाब्यावर लै जबरा मिळाला होता.
त्यानंतर बऱ्याचदा तो ढाबा शोधायचा प्रयत्न केला पण काय सापडेना राव.
या उपरोक्त प्रकारांपेक्षा शेंग भाजी चवीला फार उजवी.

हे बाजार आमटी, घाटी शेरवा हे दोन्ही आयटम ओव्हरहाईप्ड आहेत
आख्खा मसूर, रायगडावरच पिटल भाकरी, बागलकोट कोवळं दही?

वरुण मोहिते's picture

15 Jun 2019 - 8:02 pm | वरुण मोहिते

तरी आमच्या मुलुंड चेक नाक्याला जबरदस्त मिळतो. गरम रोटी आणि अख्खा मसूर. ढाबा रात्रभर चालू. घाटावरचा असल्याने घरी बनवतात पण मुंबईत तरी मसूर मुलुंड आणि दहिसर ला सर्वोत्तम मिळतो धाब्यावर आणि हो सांगितल्यावर करायला घेतात

जालिम लोशन's picture

15 Jun 2019 - 9:51 pm | जालिम लोशन

पण द्यावी.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jun 2019 - 10:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

जवाहर काय आहे?
पानमंदीर की मधुशाला?
बाय द वे, वर्णन फक्कड केलं आहे. फूडहैदोस वाचतोय अशी फीलिंग आली! ;)

भर पावसात कानाच्या पाळया गरम झाल्या, नाकाच्या शेंड्यावर घाम दाटला. अहाहाहाहा !

कृती पाहता तुरीच्या आणि मटकीच्या मूळ प्रतीवर चव बरीचशी अवलंबून असणार. आजकाल शेंगदाण्याहून मोठी चवळी आणि चवळीहून मोठी मटकी मिळते. त्यामुळे हे जिन्नस जितके अस्सल तितकी आमटी चविष्ट होणार.
ही बाजारामटी भाता बरोबर खात नाहीत का?
तरीही,
एखाद्या पदार्थाचा मूर्ख ब्रॅंड झाला की माझं मन त्यावरून उडते. तसल्या पदार्थांवर पडणारे लेख तर उबग आणतात. उदा. मिसळीवरचा मागचा आलेला लेख. एनीवे, बाजारामटीवर प्रथम लिहिणारे बहुदा तुम्हीच असाल. पदार्थाचा इतिहासही तुम्ही शोधला आहे हे कौतुकास्पद आहे. नाहीतर काहीजण 'लाजवाब, दिल खुश, जिंदाबाद' असल्या शब्दांनी वाचणाऱ्याची जिव्हा लाळघोटी करण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. पण ते असो. पुढच्या पदार्थासाठी शुभेच्छा!

अगदी नजाकतीने कापलेल्या पातळ गोल कांद्याच्या चकत्या कांदा,

,,दोन बारिक चिरलेले कांदे,

महावीर व्हेज हे नाव असलं तरी कांद्याचा सढळ वापर केलेला दिसतोय.

महासंग्राम's picture

16 Jun 2019 - 2:37 am | महासंग्राम

सर्वप्रथम प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
जवाहर हे पानमंदिर आहे, जगात भारी पान मिळतं तिथे

ते दोन कांदे उल्लेख केलेली रेसिपी नेट वरून घेतली आहे, अर्थात मी जिथे खाल्लंय तिथे पण कांद्याचा सढळहस्ते वापर होतंच असणार म्हणा.

सुबोध खरे's picture

19 Jun 2019 - 10:03 am | सुबोध खरे

@मंदार भालेराव
जगात भारी पान मिळतं तिथे

मालक, आपला पत्ता पुणे ३० किंवा तत्सम आहे काय?

))=((

महासंग्राम's picture

19 Jun 2019 - 10:58 am | महासंग्राम

हमु तरी सध्या पुणे ३० च आहे ;)

चामुंडराय's picture

16 Jun 2019 - 3:00 am | चामुंडराय

बाजार आमटी बद्दल खरड टाकली आणि मेन बोर्डावर आलो.
बघतो तर काय, भालेराव सरांचा बाजार आमटीचा धागा आला देखील.

इतकं सुंदर वर्णन आणि आमटीची पाकृ वाचून आता करायला घेतलीच पायजेले (म्हणजे अर्धबरीला ऑर्डर सोडली पाहिजेले असे वाचावे. :))

I eat what I want, tell myself it's healthy and let the placebo effect do the rest.

एक रेसिपी म्हणते तूर उडीद मूग चणा डाळी कोरड्याच खमंग भाजून त्यांचा भरड रवा/भरडा काढून त्याची आमटी करा. दुसरं म्हणतंय की मटकी वापरा. नेमकं काय प्रकरण आहे? कुठली पाककृती ऑथेंटीक मानावी?

पिंगू's picture

16 Jun 2019 - 2:30 pm | पिंगू

भरड्याची आमटी जी आहे ती बंजारा पाककृती आहे.

पिंगू's picture

16 Jun 2019 - 2:30 pm | पिंगू

मी वाचलेली बाजारआमटी ही बंजारा समाजाच्या लोकांची भरड्याची आमटी असते तशी. ही वेगळीच दिसते.

बंजारा-आमटी यापासून अपभ्रंश होऊन बंजार आमटी, किंवा बाजारा आमटी, बाजार आमटी असं रूपांतर होत गेलं असेल का?

शक्यता आहे. पण अधिक माहिती नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2019 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

पूर्वीच्या काळी व्यापारी दूरवर व्यापाराला जात करकंब ला त्यांचा मध्यवर्ती मुक्काम असे. आता ते पडले व्यापारी त्यांना व्यापार करणं माहिती रांधण्याच्या नावाने बोंब, त्यामुळे दूरच्या देशात गेल्यावर त्यांची खाण्याची आबाळ होऊ लागली त्यांना प्रश्न पडला आता करावं तरी काय ? कारण त्यांना फक्त भाकऱ्या बडवता यायच्या मग त्यांच्यातल्या एका हुशार गड्याने रात्रीच्या जेवणाला मिक्स डाळींची बाजार आमटी बनवली.

यावरून, व्यापार्‍यांच्या (बाजाराच्या) निमित्ताने बनवल्या गेलेल्या आमटीला, बाजार आमटी हे नाव पडण्याची शक्यता जास्त वाटते.