व्हॉटसॅपवरची माणसं!!!
१. *देवघेवकर* - हे समुहाच्या विषयाला धरुन असणारी माहिती देतातही आणि विचारतातही.हे समुहासाठी खरेखुरे उपयुक्त सदस्य असतात.
२. *घेणेकर* - हे फक्त आयते प्रश्न विचारायला,स्वत:ची समस्या सोडवायला येतात. *यांच्याकडे समुहाला देण्यासारखं उपयुक्त असं काहीही नसतं.* समुहाचं कस्टमर केअर करण्यात यांचा हात कोणी धरत नाही.समुहात कोणी उत्तर नाही दिलं तर हे समुहातल्याच एखाद्या जाणकाराला 'यांना हवं तेव्हा' फोन कॉल करुन पिडत बसतात.असे हे 'वेताळ' समुहातल्या सदस्यांना विक्रमराजा समजतात.
३. *भानहरपी* - हे आनंदाचं,उत्साहाचं भरतं आलेले असतात.समुहाचं नाव काय,विषय काय?आपण पाठवतो काय? याच्याशी यांना काडीचंही देणंघेणं नसतं.फटाक्यांची माळ आणि यांच्या फोनमधले व्हॉटसअॅप ग्रुप याच्यातला फरक यांना समजत नाही.ग्रुपशी दुरुनही संबंध नसलेल्या यांच्या सासर्यांचा,बायकोचा,मेव्हण्याचा फोटो पाठवून कसल्या ना कसल्या शुभेच्छा देणं किंवा यांच्या बोळात राहणार्या कोणातरी छपरी भाईचा गॉगल आणि बेंटेक्सची चेन घातलेला फोटो शेअर करुन अज्ञानी जनतेला त्या 'नरपुंगवाची' माहिती करुन देणं या सोबतंच जमेल तितकी अवांतर माहिती फॉरवर्ड करत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्यासारखं यांचं चालू असतं.अॅडमिन हाकलेपर्यंत हा 'फॉरवर्डयज्ञ' धगधगत राहतो.हाकलंल तरी सुधारणा होईल ही अपेक्षा फोल ठरते.कारण एकच! यांचं भानच हरपलेलं असतं.साध्यासुध्या हाकलण्याने ती समंधबाधा उतरत नाही.दुसर्या ग्रुपात शिरुन मागील पानावरुन पुढे जाण्याचं 'झपाटलेपण' सुरुच राहतं.
४. *वाचाल तर वाचाल* - हे ग्रुपमधे कायम वाचक मोडमधे असतात.हे ग्रुपात काहीही पाठवत नाहीत,लिहीत नाहीत,काहीही विचारत नाहीत.फक्त आलेली माहिती वाचत असतात.मग अॅडमिन कधीतरी अशा गपचुप सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करतो.त्या ढिगार्यातून हे बाहेर टाकले जातात.
मग हे अॅडमिनला पर्सनलवर गाठून यांचा USP बाहेर काढतात."नुसती माहिती वाचली तर चालणार नाही का? आमचा काही कुणाला त्रास नाही.इथे काही शेअर करत नसलो तरी या ग्रुपवरची माहिती नेहमी वाचत असतो मी.खूप चांगली माहिती मिळते.कधीकधी इथली माहिती दुसर्या ग्रुपवर शेअरही करत असतो मी."
एखाद्या गरीब बकरीनं दयनीय चेहरा करुन "माझा बळी देऊ नका" असं सांगितल्याचा फिल येतो अशावेळी.एखादा अॅडमिन भाबडा असेल तर पाघळून परत अॅड करतोही.पण एखादा 'स्ट्रॅटेजिक वाघ' असेल तर बधत नाही.
४. *बेपत्ता* - हे ग्रुपात असतात पण बरेच महिने यांचं ग्रुपकडे लक्ष नसतं.ग्रुपात काय चाललंय याचा यांना पत्ता तर नसतोच.पण सक्रिय राहण्याबद्दल सांगूनही न ऐकल्याने यांना रिमुव्ह केलं तरी पुढचे अनेक आठवडे किंवा महिने आपल्याला रिमुव्ह केलंय हे यांना कळतंच नाही.
५. *ज्ञानदूत काका* - हे ग्रुपातले जेष्ठ किंवा अतिजेष्ठ नागरिक असतात.(सगळेच जेष्ठ असे नसतात बरं का!)रिटायर झाल्यानंतर असणाऱ्या मोकळ्या वेळात करायचं काय या चिंतेवरचा उपाय म्हणून ते ग्रुपात शिरलेले असतात.यांना सतत असा भ्रम होत असतो की "आजचा सगळा तरुणवर्ग हा बिघडलेला आहे,त्यांना जेष्ठांचा आदर नाहीये,समाजात सगळीकडे फसवणूक होते आहे.आपण सतत सावध राहिले पाहिजे,तरुणांना भारतीय संस्कृतीचे विस्मरण झाले असून ते होऊ न देणे हे आपले परमकर्तव्य आहे." ग्रुपात जबरदस्तीने 'संस्कारवर्ग' चालवण्यात हे खंड पडू देत नाहीत.
६. *गल्लीचुके* - हे बहुतेकवेळा मध्यमवयीन किंवा जेष्ठ नागरीक असतात.एखादा विशिष्ट विषयाला वाहिलेला ग्रुप असेल तर तिथे न चालणारी पोस्ट यांच्याकडून 'चुकून' पाठवली जात असते.ती पाठवल्यानंतर पटकन डिलीट करायची सोय व्हॉटसअॅप मधे आहे हे यांना माहित नसतं.अॅडमिनने तक्रार केल्यावर हे त्यालाच 'Admin please delete it' असे सांगून मोकळे होतात.
चुकून सगळे ग्रुप सिलेक्ट झाले,डिपी बदलल्याने लक्षात आले नाही; वगैरे बरीच तांत्रिक कारणे यांनी तयार ठेवलेली असतात.'व्हॉटसअॅप वापरताना आपला गोंधळ होतो हे यांना मान्यच नसते.' ठिकै आत्ता या 'बच्चमजी' व्हॉटसअॅपनं आपल्यावर विजय मिळवलाय.पुढल्यावेळी सावध राहून आपण व्हॉटसअॅपवर विजय मिळवू या निश्चयाने ते कामाला लागतात.पण गंमत म्हणजे परत व्हॉटसअॅपच जिंकतं.
७. *सूड घे रे* - हे पूर्वी ग्रुपात बर्यापैकी बोलके असतात.मग अचानक यांचं ग्रुपातल्या कोणाशीतरी पटत नाहीसं होतं किंवा अॅडमिननं यांना पूर्वी कधीतरी अवांतराबद्दल ऐकवलेलं असतं.मग हे सूडानं पेटतात.त्या प्रसंगानंतर हे ग्रुपात बोलणं बंद करतात.यांचं ग्रुपात बारीक लक्ष असतं.ज्याच्याशी वाद झालाय तो सदस्य किंवा अॅडमिन चूक,अवांतर करताना दिसला रे दिसला की पुढच्याच सेकंदाला हे गर्दीतून वाट काढत "हे चालतं का? मागच्यावेळी मला ऐकवलं होतंत.आता यांना सूट का दिली?" किंवा "तुम्ही अॅडमिन असून तुम्हीच असे वागता?" हे ऐकवतात.रिप्लाय प्रायव्हेटली वगैरे न वापरता हे ग्रुपातच बंदुकधारी इंग्रजाच्या पुढ्यात 'चले जाव'ची घोषणा द्यावी तसे अोरडत राहतात.मग हे 'मेषपात्र' ऐकत नाहीसे पाहून अॅडमिनच यांना चले जाव म्हणून निरोप देतो.
८ *गेलात उडत* - हा प्रकार नव्हे तर हा बाणा अाहे.यांना न पटणारं काही ग्रुपात घडलं किंवा यांच्या विचारांशी इतरांनी सहमती दाखवली नाही तर 'गेलात उडत' असा बाणा दाखवून हे पुढच्या सेकंदाला ग्रुप सोडून जातात.राग फारच आला असेल तर "मला परत या ग्रुपात अॅड करु नका." असं स्वत:चं 'अनन्यसाधारण' महत्त्व इतरांना सांगून जातात.
९. *लॅटीनप्रेमी* - यांचं लॅटीन लिपीवर फार प्रेम असतं त्यामुळे यांना देवनागरीचा तिटकारा असतो.पण तो इतरांपुढे जाहिर केला तर 'मराठीचा शत्रू' असा शिक्का बसेल या भितीने 'माझ्या फोनमधे देवनागरी चालत नाही,देवनागरी टाईप करायला अवघड जातं' अशी बरीचशी फुसकी कारणं देतात.काहीजण तर लॅटीन लिपी वापरुन मराठी मजकूर लिहितात.त्या मजकूरात काय लिहिलंय ते समजून घेणं,त्याचा अर्थ लावणं ही वाचकांची जबाबदारी आहे.ते कसब वाचकांकडे 'असलंच' पाहिजे.नसेल तर शिकावं.ही यांची अपेक्षा असते.लिखाणाचं फारसं टेन्शन घेत नाहीत हे लोक.
याद्या
6803
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
ढकलपत्र ए का ?
ढकलपत्र नाहीये
In reply to ढकलपत्र ए का ? by महासंग्राम
हा हा !
स्नेहांकिता
In reply to हा हा ! by सस्नेह
खिखिखी....यात "मिपाकर" असाही
+1
_/\_
मस्त १+
हाहा...
वा! मस्तच
छान लिहिले आहे.
एकूणच
अजून एक प्रकार, काही सदस्य
ग्रुप ही डोकेदुखी असते.
मी उलट म्हणतो... ग्रुप म्हणजे
In reply to ग्रुप ही डोकेदुखी असते. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachiछान लिहिलंय!
धन्स!
In reply to छान लिहिलंय! by टर्मीनेटर
हेहेहे
शेमशेम, आपलं तुजंमाजं शेमशेम.