तात्या!
तात्या अभ्यंकर ‘मिसळपाव’ चालवायला लागला आणि कधीतरी मी त्याच्या ‘हाटेला’त जाऊन ‘तात्याची स्पेशल मिसळ’ चाखली. मग मला त्याची एवढी चटक लागली, की मी ‘मिसळपाव’वर अक्षरश: ‘पडीक’ होऊन गेलो. मनात आलं की काही ना काही ‘मसाला’ तिथे ओतू लागलो. चवदार असला तर तात्या स्वत: तारीफ करायचा. जमला नाही तर स्पष्ट तसंही सांगायचा. पण तात्याच्या हातची टेस्ट काही वेगळीच असल्याने, त्याचा तो अधिकार माझ्यासारख्या अनेकांनी मान्य केला होता.
तात्याने पालथा घातला नाही असा प्रांत नाही, हे त्याच्या अनुभवी लिखाणातून केव्हाच स्पष्ट झालं होतं. ‘मिसळपाव’ नामांकित करण्यात तात्याच्या या हरहुन्नरी लिखाणाचा मोठा वाटा होता. त्याने लेखक घडविलेच, पण वाचक घडविण्याचे महत्वाचे कामही केले. घडविले म्हणजे, त्याआधीही वाचक होते, पण काही वाचल्यावर व्यक्त होण्याची संधी मर्यादित होती. तात्याच्या हाटेलात कट्ट्यावर जमलेला प्रत्येक वाचक, व्यक्त व्हायचा. मिसळपावची ही पुण्याई तात्याच्या समावेशक वृत्तीमुळेच जमा झाली होती.
जबरदस्त धार असलेलं, जगण्याचे असंख्य पदर उलगडणारं, कधी हसवणारं, कधी रडवणारं, कधी अंतर्मुख व्हायला लावणारं तरी कधी सहज सापडलेल्या एखाद्या धाग्याला वस्राची विशालता देणारं तात्याचं लेखन हा दिवसाअखेरचा आणि शिणवट्याच्या कोणत्याही क्षणावरचा हक्काचा विरंगुळा होता.
अचानक तात्याचं लिखाण बंद झाल्याचं जाणवत होतं, पण संपर्क नसल्याने कारण कळलंच नव्हतं. एवढ्या वर्षांपासून मिसळपावचा मेंबर असतानाही, खूप पूर्वी एकदाच तात्याशी बोलायची संधी मिळाली होती. कशावर बोललो ते आता आठवतही नाही, पण तेव्हा बोलणं झाल्यावर तात्या फोनवर खळखळून हसला होता, ते मात्र अजूनही आठवतं.
आज ती बातमी कळल्यावर तात्याचा ब्लाॅग उघडला.
त्यावरचा एक लेख काॅपी केला. तोच इथे पेस्ट करतोय.
तात्याची आठवण आली, की सहज वाचता यायला हवा. कारण या लेखात त्याच्या अंत:करणाचा एक पदर उलगडलाय!
***
विठ्ठल उभा पहावा विटेवरी..
आज संध्याकाळी ठाण्याच्या गोखले रस्त्यावरून चाललो असताना अचानक पाठीवर थाप पडली..
"तात्या..भोसडीच्या..."
मागे वळून बघतो तर खूप जुनी ओळख निघाली. 30 वर्षांपूर्वेचा कोलेजमधला जुना दोस्त भेटला होता.
"अरे.. तू...? इथे कुठे..? किती वर्षांनी भेटतो आहेस" वगैरे जुजबी बोलणं झालं..
"तात्या, आता घरीच चल ५ मिनिटं. मी तुझं काही ऐकणार नाही. तुला आठवतंय, पूर्वीही आमच्या घरी तू आला आहेस. आईलाही भेटशील माझ्या.."
मी काहीही आढेवेढे न घेता त्याच्या घरी गेलो.
"आई..तात्या आलाय. ओळखलंस का? अजून साला जिवंत आहे.."
पक्षाघताने डावी बाजू गेलेली त्याची आई खुर्चीवर बसली होती. त्याच्या बायकोने पुढ्यात पाणी आणून ठेवलं. मी म्हातारीच्या पाया पडलो..
"अरे तू गायचास ना रे..? इथेही एकदा गाणं म्हटलं होतंस.."
पक्षाघातामुळे म्हातारीचं बोलणं तसं पटकन कळत नव्हतं..पण मेमरी sharp होती.
"तात्या..चहा टाकलाय. बघ, आईनेही तुला ओळखलं. चहा होईपर्यंत म्हण एखादं गाणं.."
सगळ्या घटना पटापट घडत होत्या. मीही लगेच त्या म्हातारीच्या पुढ्यात बसून 'फिरत्या चाकावरती देसी..' हे गाणं लगेच हातवारे करून हौशीहैशीने गायलं. म्हातारी खुश झाली. तिच्या चेहे-यावर छान समाधान पसरलं. पक्षाघाताने तिचा वाकडा झालेला चेहेरा आता एकदम छान दिसू लागला.
चहा आला. बाकरवडी आली. आमच्या जनरल गप्पा सुरू होत्या. त्याची बायकोही अगदी सात्विक, समाधानी दिसत होती.
तेवढ्यात १०-१२ वर्षाची एक मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिला पाहून मला जरा भलतीच शंका आली. ती मुलगी स्पेशल चाईल्ड होती. Autistic..
"हा कोण आहे माहित्ये का? हा तात्याकाका.. नमस्कार कर बघू तात्याकाकाला..त्याला hello म्हण.."
"तात्या..ही माझी लाडकी लेक. तुझ्याकडे कशी छान बघते आहे बघ.."
मला हे सगळं जरा धक्कादायकच होतं. तरी मी पटकन स्वत:ला सावरत त्या मुलीच्या गालावर आणि चेहे-यावर प्रेमाने हात फिरवला.
"खूप सुंदर आहे रे तुझी मुलगी.."
माझं फक्त एवढं एक वाक्य. परंतु त्या वाक्यामुळे मला लाख मोलाचं समाधान आणि आनंद दिसला त्या नवरा-बायकोच्या चेहे-यावर..
आणि खरंच ती मुलगी सुंदर होती. अगदी निष्पाप...
जरा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि एकदम माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं..
एका वेगळ्याच दुनियेतली मुलं आहेत ही. त्यांना तुमच्या दयेची भीक मुळीच नकोय. त्यांना फक्त आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे. आणि तुम्ही कोण लागून गेलात त्याच्यावर दया दाखवणारे..? तुमची so called बुद्धी शाबूत आहे हा तुमचा भ्रम आहे.. अरे..तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील मुलं आहेत ती..!
"चल निघतो रे..उशीर होतोय..पुन्हा येईन."
म्हातारीच्या पाया पडलो आणि निघालो. ते दोघे आणि ती मुलगी जिन्यापर्यंत मला सोडायला आले..
"तात्याकाकाला टाटा कर.."
पुन्हा एकदा त्या मुलीचा तो सुंदर चेहेरा..
मी इमारतीखाली उतरलो. दुकानातून एक छान डेअरीमिल्क घेतलं आणि पुन्हा त्याच्या घरचं दार वाजवलं.
'अरे..तुझ्या लेकीकारता खाऊ आणलाय..' असं म्हणून त्या मुलीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर डेअरीमिल्क ठेवलं..
पुन्हा एकदा तेच निष्पाप, निरागस हास्य..
उद्या आषाढी. पण मला मात्र तिच्या त्या निर्व्याज, निष्पाप हास्यामधून विठोबाने आजच दर्शन दिलं होतं..
-- तात्या अभ्यंकर..
याद्या
8482
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
:(
ओहहह. . .
भावपूर्ण आदरांजली
स्साला तात्या. असाच बोलता
भावपूर्ण आदरांजली...
५०
In reply to भावपूर्ण आदरांजली... by हेमंतकुमार
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली
:-(
भावपूर्ण श्रद्धांजली.
Allah Does not Burden a Soul with more than it can bear
खरे आहे वहिदा.
बिल्कुल !
In reply to खरे आहे वहिदा. by विजुभाऊ
कथा वाचताना डोळे कधी पाणावले
भावपूर्ण श्रद्धांजली
तात्यांना भावपूर्ण
तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली!
तात्यांबद्दल वाचल्यानंतर
तात्यांबद्दल वाचल्यानंतर
भावपूर्ण श्रद्धांजली ____/\__