धर्म, विज्ञान आणि दुय्यम सत्ये
आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या.
शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आहे. (इथे कोणताही विशिष्ट धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही संकल्पना असं म्हणायचं आहे.) असं मला का वाटतं याकडे नन्तर येतो. आधी अन्य काही गोष्टींचा विचार करू.
आपलं विचारविश्व पाश्चात्त्याकडून उसनं घेतलेलं असल्याने आणि ऐहिक सोयीसाठी राबवायची गोष्ट मानल्याने कदाचित, परफेक्ट सायन्सेसना (भौतिक, रसायन, जीव) आणि वाणिज्य शाखेला, मानव्यशास्त्रांंपेक्षा (फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, भाषा) जास्त मान (कृतीतून दिसणारा) आहे. त्यामुळे शिक्षित लोकांमध्ये 'विज्ञान हाच आजचा धर्म' मानणारे अधिक. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना ऑब्जेक्टिव्ह उत्तरं देणं हे शास्त्राचं काम आहे आणि सब्जेक्टिव्ह प्रश्नांना दिशादर्शक उत्तरं देणं हे मानव्यशास्त्राचं काम आहे.
आता आपण जो मुद्दा अर्धवट सोडून दिलाय तिकडे परत येऊ. विज्ञान आपल्याला बंदूक कशी चालते? क्ष जाडीची य वस्तू भेदायला किती वेगाने गोळी जायला हवी? नेम कसा धरतात? वगैरे प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, नव्हे देतेच. पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल? या प्रश्नासाठी विज्ञानाकडे उत्तरं नाहीत. ही विज्ञानाची मर्यादा आहे. जगताना माणसाला जितकी पहिल्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात तितकीच, किंबहुना अधिक या दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. जी, चूकीची वा बरोबर, विज्ञान देऊच शकत नाही, जी धर्म देतो, म्हणून माणसाला धर्माची गरज असते.
ती योग्य उत्तरं जिथून मिळतील तिथून मिळवली पाहिजेत. मग ती मानव्यशास्त्र असतील किंवा धर्मग्रन्थ.
तत्कालीन गरज (कालबाह्यता), इतक्यावर्षांचा प्रभाव, काळाच्या ओघात त्यात मिसळलेल्या हीन गोष्टींनी घेतलेलं पवित्र रूप, दांभिकता वगैरे गोष्टी लक्षात घेऊन त्यांची वारंवार मशागत व्हायला हवी. आणि ते होण्यासाठी मानव्यशास्त्रांचं महत्व समाजाला पटून तसा मान समाजाकडून मिळायला हवा. विज्ञान ही amoral बाब आहे. चांगलं वा वाईट दोन्ही नाही. Its just a tool. बिचारं विज्ञान जे करूच शकत नाही ती जबाबदारी त्यावर टाकणे आणि जे ते करू शकतं त्या धर्माला रद्दबातल ठरवणे हे दोन्ही त्यासाठी टाळायला हवं. अर्थात धर्माला देखील अद्ययावत होणं, मिसळलेल्या कुप्रथा सोडून देणं, कालबाह्य गोष्टी फक्त इतिहासाच्या पुस्तकात उरतील हे पाहणं वगैरे जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील.
प्राणिसृष्टीच्या शीर्षस्थानी माणूस आहे. तुलनेने गाठलेला प्रगतीचा पल्ला 'तुलनाच नाही' इतका मोठा आहे. याची कारणं तपासताना असं लक्षात येतं की विकसित मेंदूमुळे आलेली निसर्गाचे नियम समजून घेणं आणि त्याचा वापर आपल्या सुखासाठी फायद्यासाठी करून घ्यायची माणसाची क्षमता (विज्ञान) हे तर निर्विवादच आहे पण जोडीने अजून एक क्षमता आहे जी अन्य प्राण्यात नाही. ती क्षमता म्हणजे निसर्ग नियमासोबतच स्वयंभू असे स्वतःचे नियम घडवणं, आणि एकत्रित विश्वास आणि व्यवहाराच्या माध्यमातून, ज्याला आपण 'दुय्यम सत्य' म्हणू, अशाप्रकारची सत्य जन्माला घालणं आणि जोपासणं.
दुय्यम सत्यांंचा प्रभाव आणि कार्यक्षेत्र पाहता अचंबित व्हायला होतं. विशिष्ट प्रकारच्या उच्चारांची मालिका करून शब्द, वाक्य, भाषा जन्माला घालणं असो, वा विशिष्ट खुणांना अक्षरं म्हणून लिपी तयार करणं असो. कुटुंब, गाव, राज्य, प्रदेश वगैरे संकल्पना व त्या अनुशंगाने निष्ठा तयार करणं असो वा चामड्याच्या/कागदाच्या तुकड्यांना विशिष्ट प्रकारे मूल्य देऊन चलन निर्माण करणं असो. एक सामान्य चिंपांझी आणि एक सामान्य माणूस यांच्या मारामारीचा निकाल काय लागेल याचा विचार देखील करायला नको. निर्विवाद विजय चिंपांझी. पण तसंच 100 चिंपांझी आणि 100 माणसं यांच्या लढाईत निर्णय काय होईल याचाही विचार करायची गरज नाही.. कारण भाषा, संघ सारखी दुय्यम सत्य वापरून माणूस वरचढ ठरेल.
भाषा, लिपी, लोकशाही, चलन, स्वातंत्र्य ही सारी माणसाने जन्माला घातलेल्या दुय्यम सत्याची उदाहरणं आहेत. आज जर एखाद्या माकडाने दुसऱ्या माकडाला झाडाच्या सालीचा तुकडा दिला आणि त्याच्याकडची केळी मागितली तर 'वेडा आहे का मी? या सालीच्या तुकड्याने काय पोट भरणार का? निसर्गाच्या नियमाने याला काडीची किंमत नाही. मी काय माणूस आहे सालीचा तुकडा घेऊन केळी द्यायला?' असं काहीतरी उत्तर मिळेल.
सांगायचा मुद्दा असा की अशी दुय्यम सत्य जन्माला घालणं हे माणसाचं बलस्थान आहे. कुठलीही संकल्पना 'ती विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही' या कारणाने नाकारणे ही मोठी चूक ठरेल. दुय्यम सत्य गरज आणि उपयुक्तता या सारख्या निकषावर स्वीकारली/नाकारली/बदलली जायला हवी. विज्ञानाचे निकष लावूनच संकल्पना स्विकारायच्या ही मानसिकता म्हणजे फक्त माणसालाच मिळालेलं हे वरदान विवेक न वापरता स्वतःहून त्यागण्यासारखं आहे.
--अनुप
प्रतिक्रिया
तुम्ही लिहिताय छान!
समतोल लिखाण
+1
पण मी बंदूक चालवावी का?
कायदा म्हणजे धर्म नव्हे
काही प्रमाणात मान्य... म्हणजे
राज्य घटना फक्त राज्य सत्ता कशी असावी हेच सांगते
दुय्यम सत्य जन्माला घालणे
कॉलिंग अरूण जोशी...
धन्यवाद मंडळी!
हा सो काय प्रकार आहे?
अनुमोदन
नोटेड..
:D
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे absolute
absolute = ?
या प्रश्नांची उत्तरे धर्माकडेही नाही.