✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किरमीजी शिडे

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 04/18/2019 - 17:57  ·  लेख
लेख
उपकार त्या युट्युबाचे. काय नाही दिले त्याने? जगाच्या कोपर्‍यात कुणा हौशाकडे असलेल्या क्लिपा, व्हिडिओ अपलोड केल्या जातात, दुसर्‍या कोपर्‍यात कुणाच्या तरी आठवणीत त्या पुसट झालेल्या पुन्हा ताज्या होतात. काय, कुठे, कसे मिळून जाईल सांगणे मुश्कील. कलर कोड चेक करताना अचानक एका रंगाचे नाव दिसले क्रिम्सन. कोण जाणे पण क्रिम्सन नावाची आठवण ताजी झाली. नुसत्या क्रिम्सन शब्दाने किती मोठी सफर घडवली. क्रिम्सन सेल्स. शाळेतला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास मोठ्या आत्याकडे राहायचे वेध लागलेले. मोठ्या आत्याचे यजमान एअरफोर्स रिटायर्ड. कुटुंबाचा बराचसा काल पठाणकोट, अंबाला अशा ठिकाणी गेलेला. आत्येभावंडाचे फ्लुयेन्ट हिन्दीइंग्लिश आणि पुस्तकी मराठी हा जरी आम्हा इतर भावंडासाठी हसायचा विषय असला तरी त्यांचे वाचन आणि हजरजबाबीपणा आमच्यात नावालाही नव्हता. आत्याचे घर म्हणले की आठवायचा तो प्रशस्त बंगला, तितकेच प्रशस्त मागे पुढे असणारे अंगण. पेरु, जांभळे आणि आंब्याची डेरेदार झाडे. वाळ्याचे पडदे लावलेला मोठा व्हरांडा आणि काट्यांच्या मध्यभागी मोठे होत जाणारे गायरोस्कोपिक डिझाईन असलेले घड्याळ, कॅसेटचा ढीग आणि मोठा टूइनवन, फोर्सवाल्यांची खूण म्हणजे हाताने फिरवायचे शिलाई मशीन आणि पत्र्याच्या काळ्या ट्रंका. खूप सार्‍या सामानात एक खोली भरली होती पुस्तकानी. त्या खजिन्यातच गवसले मला क्रिम्सन सेल्स. भारत सोविएट मैत्रीच्या काळात रादुगा मॉस्कोच्या प्रकाशनाची कित्येक रशिअन पुस्तके मराठीत अनुवाद होऊन यायची. अनिल हवालदारांचे अनुवाद असत बहुधा. त्यात मिळालेली कादंबरी 'किरमीजी शिडे' अर्थात अलेक्सांद्र ग्रीन ची क्रिम्सन सेल्स. कधी १९२३ ला लिहिलेली. अनुवाद बराच नंतर झालेला. ........................ लाँग्रेन हा खलाशी सुट्टीला आपल्या घरी येतो तेंव्हा त्याला कळते की आपली बायको मेरी मुलीला जन्म देऊन स्वर्गवासी झालेली आहे. शेजारणींने त्या मुलीला सांभाळले आहे. मेरीला आजारपणात पैसे हवे असतात पण गावातील गुत्तामालक मेन्नर्स पैशासाठी तिच्याकडे अनैतिक संबधांची मागणी करतो. ती झिडकारते पण पावसात भिजून न्युमोनियाने मरते. लाँग्रेन मुलीसाठी खलाशाची नोकरी सोडतो आणि खेळण्यातील छोट्या बोटी बनवून त्या विकून उदरनिर्वाह चालू करतो. आईवेगळ्या आस्सोलचे पालनपोषण तो अत्यंत प्रेमाने करत असतो पण त्याच्या मूळच्या एकलकोंडेपणामुळे गावांशी जास्त संपर्क टाळतो. एक दिवस मेन्नर्स समुद्रात बुडत असताना शक्य असूनही तो त्याला मदत करत नाही. मेन्नर्स ही कथा सार्‍या गावकर्‍यांना सांगून मरतो. सारे गाव लाँग्रेनवर अघोषित बहिष्कार टाकते. ह्याचे पडसाद त्या चिमुरड्या आस्सोलवरही पडतात. गावातल्या मुलांच्या चेष्टेचा विषय असलेली आस्सोल मात्र तिच्या निरागस भावनात आणि वडीलांच्या बाहुपाशात सुरक्षित असते. एक दिवस त्या खेळण्यातील एक छोटे जहाज (ज्याची शिडे लालभडक सॅटिनच्या कापडाची असतात) ती ओढ्याच्या पाण्यात सोडते. ती वाहत वाहत एका भटक्याला सापडते. भटका तिला ते खेळणे परत देतो पण एक भविष्य सांगतो. एक दिवस अशाच एक लाल शिडाच्या जहाजातून एक राजपुत्र येईल आणि आस्सोलला घेऊन जाईल. आस्सोल हे सारे बापाला सांगताना एक भिकारी ऐकतो आणि हि बातमी गावभर होते. किरमीजी शिडाची आस्सोल हे नवीन नाव तिला मिळते. बापाचा व्यवसाय फारसा चालत नसला तरी तारुण्यात पदार्पण केलेली आस्सोल ते किरमीजी शिडांचे स्वप्न उराशी जपून असते. उमराव घराण्यातल्या लिओनेल ग्रेचा एकुलता एक वारस ऑर्थर ग्रे हा स्वभावतःच बंडखोर असतो. अभ्यासापेक्षा दर्यावर्दी जीवनाची आवड त्याला एक दिवस पळून जायला भाग पाडते. जहाजावर पोर्‍याचे काम करत करत तो खलाशी होतो, खलाशाची बढती कप्तानपदाकडे व्हायला वेळ लागत नाही. एक दिवस स्वतःचे जहाज घेऊन तो धाडसाने व्यापार चालू करतो. एक दिवस आस्सोल रात्रभर घरातील कामे करुन भल्या पहाटे घराजवळील समुद्राशेजारी असलेल्या झाडीत फिरतानाच थोडीशी झाडाखाली लवंडते. त्याच वेळी मासे पकडण्यासाठी आलेला ग्रे तिला पाहतो. तिचे निरागस लावण्य पाहून तिच्या प्रेमात पडतो. आस्सोल झोपेत असताना खूण म्हनून एक अंगठी अलगद तिच्या बोटात सरकावून निघून जातो. गावात तिची चौकशी करताना तिच्या किरमीजी शिडांचा इतिहास त्याला समजतो. पुढे काय? एक सुंदर परिकथा पूर्ण होते. ऑर्थर ग्रे आपल्या जहाजाला किरमीजी शिडांनी सजवूनच त्या गावात प्रवेश करतो. आस्सोलला घेऊन जातो. ......................... कथा साधीशीच, सोपी. निरागस अन देखणी. त्या आस्सोलसारखीच. जेंव्हा हे पुस्तक वाचले तेंव्हाच त्याच्या प्रेमात पडलो. कित्येक पारायणे केली. भाषा फारशी सुरेख नव्हती, कित्येक रशिअन संदर्भ कळायचे नाहीत पण मन मोहून टाकणारं असं काहीतरी त्यात होते. हे पुस्तक कितीजणांनी वाचलंय, ते प्रसिध्द आहे का नाही, जगात त्याबद्दल काय काय बोललं जातं हे कळायचं ते वय नव्हतं आणि गरजही नव्हती. ......................... पुस्तके जमा करायचा अन वाचायचा काळ संपलाही पण मनात दडलेली किरमीजी शिडे एक दिवस गवसली इंटरनेटवर. तिथे मात्र पुस्तकाने क्रिम्सन सेल्स नाहीतर स्कार्लेट सेल्स नाव धारण केलेले. क्रिम्सन की स्कार्लेट. दोन्ही शेडस ब्राईट रेडच्याच. कुठल्याही दुसर्‍या रंगाचा प्रभाव नसणार्‍या. पूर्ण आरक्त. इंटरनेटने चक्क ह्या कादंबरीवर झालेली रशिअन फिल्मही सजेस्ट केली. Алые паруса नावाची. १९६१ ला सोविएट फिल्मसने निर्मीती केलेली. आस्सोल होती अ‍ॅनास्ताशिया वर्तिनस्काया आणि ग्रे होता वासिली लेनोव्हाय. सबटायटल असलेल्या ह्या चित्रपटाने ती आस्सोल अगदी जशी मनात होती तशीच दाखवली. रुबाबदार ऑर्थर ग्रेही अगदी तस्साच. लालभडक शिडांचे जहाज कापेर्नाकडे येताना जमा झालेले सारे गाव, आश्चर्यचकीत अन भांबावलेली आस्सोल, तिला तसेच उचलून प्रेमाची कबुली देणारा अन घेणारा ऑर्थर. सजवलेल्या सिक्रेट(जहाजाचे नाव) कडे नेणारा कप्तान ऑर्थर. शेवटी निरागसपणे "माझ्या लाँग्रेनला घेशील ना बरोबर?" हा प्रश्न विचारणारी अन ग्रे च्या होकारानंतर समाधानाने त्याच्या कुशीत विसावणारी आस्सोल. आह्ह्ह. व्हरांड्यातल्या कोपर्‍यात बसून ते पुस्तक वाचतानाचा एकेक क्षण पुन्हा अनुभवला गेला. अगदी यथार्थपणे उभा झाला. इतक्या बॉलीवूडी, हॉलीवूडी अन साउथी फिल्मस्च्या मारधाडी पाहून ह्या साध्यासुध्या अन इतक्या जुन्या चित्रपटात मी का गुंतलो गेलो? की आधी गुंतलेला मी फक्त हे क्षण शोधित होतो? तो निरागसपणा नसेल आजच्या जगात पण आस्सोल अन ग्रे भेटल्यावर उगीच डोळे ओले झाल्यासारखे का वाटले कुणास ठाऊक.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24709 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

बऱ्याच दिवसांनी काहीतरी भारी.

यशोधरा
गुरुवार, 04/18/2019 - 18:05 नवीन
बऱ्याच दिवसांनी काहीतरी भारी. थ्यांक यू!
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे.लहानपणी

तेजस आठवले
गुरुवार, 04/18/2019 - 18:36 नवीन
छान लिहिलं आहे.लहानपणी वाचलेल्या ज्या पुस्तकांनी आपण बालपणी भारावून गेलेलो असतो, ते पुस्तक नंतर परत हातात पडल्यानंतर होणार आनंद हा अविस्मरणीय असतो.
  • Log in or register to post comments

छान लेख. आवडला !

उगा काहितरीच
गुरुवार, 04/18/2019 - 19:04 नवीन
छान लेख. आवडला !
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

शेखरमोघे
गुरुवार, 04/18/2019 - 19:14 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 13:38 नवीन
धन्यवाद मोघेसाहेब, यशोमैय्या, तेजस आणि उकासाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

झकास!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/18/2019 - 19:15 नवीन
बऱ्याच वर्षांनी जुनं आठवणीतलं काहीतरी सापडावं यासारखा आनंद नाही. चित्रपट सवडीने पाहिला जाईल त्याआधी पुस्तक वाचून काढले पाहिजे. यूट्यूबवर थोडी सुरूवात पाहिली आत्ताच, लॉंग्रेन तर डिट्टो अब्राहम लिंकनच दिसू राहिला. लोल! Sandy
  • Log in or register to post comments

धन्यवाद कविवर्य

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 13:39 नवीन
पुस्तकच वाच सॅन्डीबाबा, माझ्याकडे वर्ड किंवा पीडीएफ आहे इंग्लिश मध्ये. व्हाटसपावर पाठवीन म्हन्लास तर. नंतर पिक्चर बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

सुरेख लिहिलंय.

पद्मावति
गुरुवार, 04/18/2019 - 20:19 नवीन
सुरेख लिहिलंय.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 04/18/2019 - 20:28 नवीन
छान लिहिलं आहे
  • Log in or register to post comments

मनोगत सुंदर शब्दबद्ध केले आहे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/18/2019 - 21:25 नवीन
मनोगत सुंदर शब्दबद्ध केले आहे !
  • Log in or register to post comments

थ्यांक्स पद्माक्का,

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 13:40 नवीन
थ्यांक्स पद्माक्का, डॉक्टरसाहेब आणि एक्काकाका. खूप धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बालपणीचा काळ सुखाचा ...

चित्रगुप्त
Fri, 04/19/2019 - 00:33 नवीन
Image removed.Image removed. बालपणीचा काळ सुखाचा ... त्यातल्या त्या रम्य आठवणी, त्यात रुतून बसलेले किरमिजी शिडांचे जहाज...... आणि आता मोठेपणी पुन्हा तो खजिना एका सुंदर चित्रपटातून गवसणे.... सारेच अद्भुत, सुरस आणि चमत्कारिक.... आणि हे सर्व इथे ओघवत्या भाषेत इथे मांडले याबद्दल शतशः धन्यवाद. बालपणी चांदोबा आणि टारझन मधे गुंग झालो, पुढे मुलांच्या बालपणी जितके मिळाले तेवढे सुंदर चित्रांनी नटलेले रशियन आणि चिनी बालसाहित्य आणले. अजून तो सगळा खजिना जपून ठेवलेला आहे. खरोखर जगभरातल्या असंख्य कलावंतांनी चित्रित करून ठेवलेले बालसाहित्य हा एक अनमोल खजिनाच आहे. आणि आता यूट्यूबवर तर विचारायलाच नको.
  • Log in or register to post comments

मस्त

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 13:41 नवीन
मस्त चित्रे चित्रगुप्तजी. तुमच्या खजिन्याचा हेवा वाटतो हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हे बरे सांगितले

चित्रगुप्त
Fri, 04/19/2019 - 14:39 नवीन
@ अभ्या; ..... तुमच्या खजिन्याचा हेवा वाटतो हो..... हे बरे सांगितले. कारण मुले आता 'बाप' बनलीत, आणि परदेशात वाढणार्‍या त्यांच्या लेकरांना त्या जुन्या पुस्तकात रुची असण्याची शक्यता कमीच आहे. पुढे (लवकरच) व्याप आवरता घेताना हा खजिना कुणाला सोपवायचा, हा प्रश्न आता सुटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शतशः धन्यवाद ह्या स्नेहाबद्दल.

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 16:23 नवीन
चित्रगुप्तजी, ज्यांची चित्रे बघून बघून आम्ही मोठे झालो त्या प्रत्यक्ष चित्रकाराचा स्नेह लाभणे हाच मोट्ठा खजिना आहे आमच्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मस्त बे अभ्या !!!

राघवेंद्र
Fri, 04/19/2019 - 02:06 नवीन
मस्त बे अभ्या !!! सिनेमा बघण्यात येईल
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय!

रुपी
Fri, 04/19/2019 - 04:21 नवीन
सुरेख लिहिलंय! वाचायच्या पुस्तकांच्या यादीत टाकलं. सिनेमा उपलब्ध असला तरी शक्यतो जमलं तर आधी पुस्तक वाचायला जास्त आवडेल. पुस्तक आणि चित्रपटाचा परिचय आवडलाच. पण ते आत्याच्या घराचंही वर्णन छान केलंय. मनाने त्या व्हरांड्यात बागडून आले :)
  • Log in or register to post comments

थ्यांन्कू राघवेन्द्रा आणि

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 13:45 नवीन
थ्यांन्कू राघवेन्द्रा आणि रुपी. @रुपी: अ‍ॅक्चुअली आत्याचे घर हा स्वतंत्र लेखनाचाच विषय आहे पण किरमीजी शिडे गवसली तिथेच तेंव्हा उल्लेख आला. खरोखर भारी होते ते सोलापूरातले घर. पुस्तकाची पीडीएफ लिंक देईन मी हुडकून. आहे आंतरजालावर. एक दिवस मलाच त्याचा अनुवाद करायची हुक्की आलेली. सुरुवात केली अन लैच मोठ्या शिवधनुष्याला हात घातल्यागत झाले. जमल्यास करीनही ते कधीतरी. हा बघ मासला. .............. दहा वर्षाच्या नोकरी नंतर लाँग्रेनने 'ओरायन' या तीनशे टनी मालवाहू जहाजाचा निरोप घेतला. आईच्या कडेवर चिकटून बसायची सवय असलेल्या मुलासारखी समुद्राची सवय झालेल्या या खलाशाला समुद्राचा विरह सोसवत नव्हता. पण परिस्थितीच तशी होती. प्रत्येक वेळी घरी येताना लांबूनच हात ऊंचावून धपापत्या उराने त्याच्याकडे पळत येणारी मेरी आज नव्हती. त्याएवजी त्याची वाट पाहात होते घरातल्या मोडक्या वस्तूत भर झालेला एक पाळ्णा आणि त्याशेजारी खिन्न उभी असलेली शेजारीण ! "मी हिला तीन महिन्यापासून सांभाळतेय" शेजारीण म्हणाली "ही तुझी मुलगी..." त्याच्या दाढीकडे लुकलुकत्या नजरेने पाहणार्या त्या मांसाच्या गोळ्याकडे लॉग्रेन वाकून विदिर्ण अंतःकरणाने बघत राहीला. थोड्या वेळाने तो खाली बसला अन जणू काही पावसात भिजल्याप्रमाणे मिशीला पीळ देत राहिला. "मेरी कधी गेली..?" त्याने विचारले. शेजारणीने ती शोकांतिका परत सांगायला सुरुवात केली. बाळाला खेळवता खेळवता तिने लाँग्रेनला ग्वाही दिली की मेरी स्वर्गातच असणार. अज्ञातापलिकडे निघून गेलेल्या मेरीला, एका साध्या कंदिलाच्या प्रकाशातली ती लाकडी खोली आणि एकत्र असलेले तिघे हेच स्वर्गापेक्षा जास्त प्रकाशमान वाटले असते.... तीन महिन्यापूर्वीच त्या दुर्दैवी मातेची पैशाची पुंजी संपत आली होती. खर्चासाठी म्हणून लाँग्रेनने ठेवलेल्या पैशातले निम्मे अधिक तर तिच्या बाळाच्या औषधोपचारासाठीच खर्च होऊन गेले होते. शेवटची पेनी संपल्यावर मात्र तिला मेन्नर पुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. एक दारुचा गुत्ता आणि लहानसे दुकान चालवणारा मेन्नर त्या लहानशा गावातला सावकार होता. ..........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

अभ्या भाऊ

शिव कन्या
Sat, 05/04/2019 - 10:46 नवीन
काळजाला हात घालणारे लेखन. फार फार आवडले. वाचल्या क्षणापासून विचार करत आहे. अनुवादाचे मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अनुवादाचे मनावर घ्याच आता!

टर्मीनेटर
Mon, 05/06/2019 - 10:54 नवीन
एक दिवस मलाच त्याचा अनुवाद करायची हुक्की आलेली. सुरुवात केली अन लैच मोठ्या शिवधनुष्याला हात घातल्यागत झाले. जमल्यास करीनही ते कधीतरी. हा बघ मासला.
झलक वाचूनच हे शिवधनुष्य तुम्ही लीलया पेलाल ह्याची खात्रीच पटली. अनुवादाचे मनावर घ्याच आता! छान लिहिलंय, आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारी अभ्या शेठ, चित्रपट

महासंग्राम
Fri, 04/19/2019 - 09:36 नवीन
भारी अभ्या शेठ, चित्रपट पहाणार आता.
  • Log in or register to post comments

मस्तच आवडले

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/19/2019 - 10:32 नवीन
आता नियमित लिहायचे मनावर घ्या अभ्याशेठ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

खूप छान. मराठी अनुवाद मिळाला

गोरगावलेकर
Fri, 04/19/2019 - 12:39 नवीन
खूप छान. मराठी अनुवाद मिळाला तर निश्चित वाचणार.
  • Log in or register to post comments

जबराव जबराव जबराव

खिलजि
Fri, 04/19/2019 - 12:55 नवीन
अपना भी एक सपना हय तेरेजैसा लिखणा हय सुंदर सुशील शालीन सोज्वळ ओघवते आणि बरेच काही माझ्याकडे शीड आहे पण ती नौका नाही किरमिजी शिडे वाचले , खूप आवडले म्हणून लगेच रामदास आठवले
  • Log in or register to post comments

अरारा,

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 12:58 नवीन
अरारा, लैच तुपातले लिखाण झाले काय? पुढच्या धाग्यात विणू कायतरी निब्बार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

==)) ==)) ==))

खिलजि
Fri, 04/19/2019 - 12:59 नवीन
येक नंबर लिखाण झालेय मित्रा .. बोलायचेच काम न्हाय
  • Log in or register to post comments

@ अभ्या..,

अनिंद्य
Fri, 04/19/2019 - 14:20 नवीन
@ अभ्या.., ओघवते लेखन आणि 'पेनफुल यट स्वीट' कथा - आवडली. ...... being simple is the most difficult thing ! चित्रगुप्त यांची सुस्वरूप चित्रे पण अगदी अनुरूप.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिखाण अभ्या भौ.

उपेक्षित
Fri, 04/19/2019 - 19:56 नवीन
अतिशय सुंदर लिखाण अभ्या भौ. लहानपणीचा काळ वेगळाच असतो राव.
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख. चित्रपट नक्की बघेन

वीणा३
Fri, 04/19/2019 - 23:14 नवीन
सुंदर ओळख. चित्रपट नक्की बघेन.
  • Log in or register to post comments

थ्यान्क्स

अभ्या..
Sat, 04/20/2019 - 13:38 नवीन
धन्यवाद मंदारा, आमचे माऊली, गोरगावलेकर, दोस्त खिलजी, अनिंद्यराव, उपेक्षितराव आणि वीणाताई. खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खास

अनन्त्_यात्री
Sat, 04/20/2019 - 18:04 नवीन
अभ्या.. टच ! मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त लिहलंय!

एमी
Sat, 04/20/2019 - 18:36 नवीन
मस्त लिहलंय!
  • Log in or register to post comments

मस्तच हो...

संजय पाटिल
Sun, 04/21/2019 - 13:04 नवीन
मस्तच हो... पुस्तकाच्या पिडीयेफ ची लिंक असेल तर व्यनी करा म्हणजे आधी पुस्तक वाचून मग तूनळी वर बघतो..
  • Log in or register to post comments

वाह, अतिशय सुंदर निरागस ओळख !

चौथा कोनाडा
Sun, 04/21/2019 - 22:40 नवीन
वाह, अतिशय सुंदर निरागस ओळख ! बालपणी वाचलेल्या काही कहाण्यांची आठवण झाली. बालपणी पाहिलेलं ते जग, त्या अनुभव मनात पिंपळपानागत जपून ठेवलेल्या अश्या आठवणीचा पुनः प्रत्यय या लेखाने दिला ! अभ्या __/\__
  • Log in or register to post comments

मस्त मित्रा! एकदम २५ वर्षे मागे गेलो

मास्टरमाईन्ड
Mon, 04/22/2019 - 14:10 नवीन
माझ्याकडे होतं "किरमिजी शिडे" मराठी अनुवाद.
बालपणी पाहिलेलं ते जग, त्या अनुभव मनात पिंपळपानागत जपून ठेवलेल्या अश्या आठवणीचा पुनः प्रत्यय या लेखाने दिला !
एकदम पटलं
  • Log in or register to post comments

Video unavailable असे सांगतेय

पाषाणभेद
Mon, 04/22/2019 - 15:47 नवीन
Video unavailable असे सांगतेय. निट लिंक द्या. अन हो. जग गोल आहे. कधीना कधी मनी वंचीताची भेट होतेचे.
  • Log in or register to post comments

कायतरि घोळ आहे

अभ्या..
Mon, 04/22/2019 - 16:08 नवीन
कायतरी घोळ आहे दफोराव, तुम्ही युट्युबावर स्कार्लेट सेल्स सर्च मारा. सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नाही सापडले. कृपया लिंक द्या.

पाषाणभेद
Mon, 05/06/2019 - 16:01 नवीन
नाही सापडले. कृपया लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लिंक

तुषार काळभोर
Mon, 05/06/2019 - 20:32 नवीन
https://youtu.be/5YzwW4hxrx4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

स्पसिबा

अभ्या..
Mon, 05/06/2019 - 21:38 नवीन
स्पसिबा हिंदकेसरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अस्ताला विस्ता!!

तुषार काळभोर
Mon, 05/06/2019 - 22:05 नवीन
वाटलंच होतं!! स्पसीबा वाचल्यावर मला जे अभिप्रेत होतं, ते गुगळेबाबाने बरोबर ठरवलं. ;) -पै. झिबिस्को ताक- वेलकम लिहायचा प्रयत्न केला पण त्याचा उच्चार चौदा वेळा ऐकूनपण जमाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नको ना तो अभद्र शब्द ;)

अभ्या..
Mon, 05/06/2019 - 22:12 नवीन
वेलकम - दोब्रो पोझाल्वेत . बादवे रुस्तुमेहिंद हरबानसिंग आणि झिबिस्कोच्या फाईटची बालभारतीतली चित्रे आठवली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सेम सिल्याबस बॅच असतंय की रे.

mrcoolguynice
Mon, 05/20/2019 - 15:47 नवीन
सेम सिल्याबस बॅच असतंय की रे.. आपलं ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबरीच.

प्रचेतस
Mon, 04/22/2019 - 22:28 नवीन
जबरीच. लेखनशैली तर भन्नाटच. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

खूपच छान ....

प्रभू-प्रसाद
Mon, 04/22/2019 - 23:05 नवीन
  • Log in or register to post comments

खूपच छान ....

प्रभू-प्रसाद
Mon, 04/22/2019 - 23:06 नवीन
  • Log in or register to post comments

छान लेखन!

mayu4u
Tue, 04/23/2019 - 11:59 नवीन
परिचय आवडला. अनुवादाचा प्रयत्न पण मस्त जमलाय. पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
  • Log in or register to post comments

खूप छान लिहीलंय

श्वेता२४
Tue, 04/23/2019 - 13:12 नवीन
कसं काय वाचायचं राहून गेलं कुणास ठाऊक. अतीशय आवडलं तुमचं लिखाण
  • Log in or register to post comments

अभ्या..मालक

तुषार काळभोर
Tue, 04/23/2019 - 16:54 नवीन
अभ्या एक्दाच येतो अन धुराळा करून जातो! लेख आवडला. लेखातली गोष्ट आवडली. वाचायला पाहिजे. परीकथा अशी पाहिजे (आयुष्य नाही!). डोळ्यातून पाणी काढणारं बालपण अन मग हेवा वाटावा असं तारुण्य! बंगल्याचं वर्णन आवडलं. अशा एका बंगल्यात ४-५ वेळा जाणं झालंय. जन वैद्य मार्ग ( क्वीन्स गार्डन परिसर ) सरकारी अधिकार्‍यांची घरं आहेत. तिथं एका घरी. सहा-आठ गुंठ्याचा प्लॉट अन त्यात अडिच तीन हजार स्क्वे फुटाचा एकमजली बंगला. बाहेर एक २००-२५० स्क्वे फुटाचं औटहौस. आणि बाकी लॉन. बरीच झाडं (वृक्ष!). Image removed.
  • Log in or register to post comments

भारी!

लई भारी
Tue, 04/30/2019 - 16:11 नवीन
सुटून गेलं होत वाचायचं. खूप आवडलं!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा