Skip to main content

जय जवान !

लेखक वन यांनी गुरुवार, 20/12/2018 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका पेपरात खालील बातमी वाचली: ‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’. वाचून मनोमन वाईट वाटले आणि त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मी प्रवासात अनुभवलेली घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. तेव्हा आम्ही काही मित्र एका अभ्यासदौऱ्यासाठी झेलम एक्सप्रेसने दिल्लीस निघालो होतोने. आम्ही द्वितीय श्रेणीच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण केले होते. तेव्हा दिवाळीच्या सुटीचे दिवस असल्याने गाडीस प्रचंड गर्दी होती. आम्ही व्यवस्थित आरक्षण केले होते आणि सर्वांची तिकीटे निश्चित झालेली होती. गाडी येण्यापूर्वी जेव्हा आम्ही फलाटावर पोचलो तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा नाही अशी तोबा गर्दी. त्यात सामान्य प्रवाशांबरोबरच जवानांच्या अनेक पलटणी होत्या. याच्या जोडीला त्यांच्या मोठाल्या अवजड ट्रंका. तेव्हाच जाणीव झाली की बिगर आरक्षितांच्या गदारोळातच आपल्याला गाडीत चढायची कसरत करावी लागणार आहे. अखेर गाडी आली आणि प्रचंड चेंगराचेंगरीतून आम्ही कसेबसे डब्यात शिरलो. pict त्यानंतरचे दृश्य तर चीड आणणारे होते. आमच्या आरक्षित आसनांवर आमच्या आधीच अनेक जवान स्थानापन्न झाले होते. त्यांना उठवताना जे काही तीव्र संवाद हिंदीतून झाले ते आता आठवायलाही नको वाटतात. त्याचा निष्कर्ष एवढाच होता की आम्ही आरक्षित प्रवाशांनी ‘चुप्प’ बसायचे आहे ! आम्ही आमच्या आसनावर कसेबसे अंग चोरून बसलो आणि आमच्या शेजारी चक्क अंगावर रेलून जवान मंडळी बसली. डब्यात सर्व आसनांवर हीच स्थिती. एकंदरीत सर्व डब्यात हवे तसे वावरण्याचा प्रथम हक्क जवानांचा आणि आम्हीच विस्थापित अशी अवस्था होती. आमच्यातील ज्या एकदोघांनी जवानांशी नियमानुसार वाद घातला. पण त्यांना तर झटापट करून त्यांनी गप्प बसवले. गाडी सुटली. चालत्या गाडीबरोबर आम्ही थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो. पण तो आनंद काही फार टिकला नाही. पुढच्या २ स्थानकांत जवानांच्या अजून पलटणी त्यांच्या ट्रंकासह डब्यात शिरल्या. आता तर आमच्या पाय ठेवायच्या जागी अजून ट्रंका आणि त्यावरही ते बसलेले अशी स्थिती झाली. म्हणजे त्या ‘३ टीअर’च्या डब्यात आता हा चौथा टीअर निर्माण झाला होता ! कहर तर यापुढे झाला. जेव्हा त्यांच्या ट्रंका डब्यात मावेनात तेव्हा त्यांनी त्या डब्याच्या एका बाजूच्या संडासात एकावर एक अशा ठेऊन दिल्या आणि तो संडास बाहेरून देखील ट्रंका लावून बंद करून टाकला. नंतर जेव्हा काही सामान्य प्रवासी लघवीसाठी तिकडे पोचले तेव्हा जवानांनी त्यांना अत्यंत उद्धटपणे, “ये बंद है, उस साइडमें जाव” असे फर्मावले. आता सर्व गर्दी तुडवत विरुद्ध बाजूस जाताना काय यातना झाल्या ते आम्हीच जाणो. सर्वांचीच खूप चिडचिड झाली. “काय तरी तक्रार करायला पाहिजे” असे हताश पुटपुटणे फक्त चालू होते. आता एवढ्या ओसंडून वाहणाऱ्या गाडीत रेल्वे-पोलीस तरी कशाला यायची तसदी घेईल? त्या काळी ‘१३८’ वगैरे तक्रारीचे फोननंबरही नव्हते आणि तिकीट तपासनीसाचे काम फक्त तिकीट पाहणे एवढेच असते. तेव्हा गुमान बसायला पर्याय नव्हता. त्याकाळी झेलामचा प्रवास म्हणजे अगदी दिव्य असायचे. गाडी ५ तास उशीरा पोचणे हे “नॉर्मल” धरले जायचे. त्यापुढे जो काय उशीर होइल तोच फक्त मोजायचा असे ! त्यात आमचे दुर्दैव बघा. आम्हाला दिल्लीस जायचे तर सर्व जवान थेट जम्मूपर्यंत जाणार होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला हायसे वाटायचा प्रश्नच नव्हता. गर्दीची ही परिस्थिती दिवसा होती तर रात्री काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. डब्यातील एकमेव चालू संडासात जायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.त्यात जमिनीवर झोपायचा ५वा टीअर निर्माण झालेला ! अखेर एकदाची दिल्ली आली आणि आम्ही उतरलो. आमच्या अभ्यास दौऱ्याची सुरवात अशा “भारतीय समाज-अभ्यासाने”च झाली होती खरी. एकूण परिस्थिती शाब्दिक हमरीतुमरीपर्यंतच राहिली हे नशीब. नंतर काही विचार मात्र मनात येऊन गेले. जवानांच्या सुखदुख्खाची जाणीव आपल्याला असते. पराक्रमी आणि धारातीर्थी पडलेल्या जवानांचा यथोचित गौरव समाज नेहमी करतोच. परंतु, जवान जेव्हा आपल्या बेशिस्त व बेताल वर्तनाने सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात तेव्हा काय म्हणायचे? एक आरक्षित प्रवासी म्हणून आम्हाला काहीच किमान हक्क नसतात का? असो....

वाचने 28274
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by वन

त्या वाक्याचा Dictionary.com मधील अर्थ पहा: The sentence is a comment on the hypocrisy of governments that proclaim the absolute equality of their citizens but give power and privileges to a small elite. वन यांनी त्याचा भावार्थ बरोबर लिहिला आहे.

आवडला. अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते. >>>> याचे बरेच अनुभव आलेले आहेत. तेव्हा सैन्याप्रती आदर व्यक्त करूनही तुमच्याशी सहमत आहे.

त्यांचे शिक्षण, हत्यारे, त्यांच्या पार्ट्या, त्यांना स्वस्तात मिळणार्या वस्तू, त्यांचे दिमाखदार पोशाख गोष्टी ह्या आकाशातून पडत नाहीत. बहुसंख्य लष्करी अधीकारी आणि सैनिक याना ( डॉकटर आणि इंजिनियर सोडून) लष्करात मिळणारे शिक्षण निवृत्त झाल्यावर निकामी असते. तोफखान्यात तोफ चालवण्याचे किंवा सामान्य सैनिकाला मिळालेले बंदूक मशीन गन चालवण्याचे उत्तम शिक्षण बाहेर संपूर्ण कुचकामी असते तेंव्हा ३२ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सैनिकाला ( १८ व्या वर्षी भरती आणि १५ वर्षे नोकरी) बाहेर केवळ रखवालदार म्हणून नोकरी मिळते ज्यात त्याला केवळ हडत हुडुत केले जाते. यामुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असंख्य सैनिक आणि अधिकारी मी लष्कराच्या व्यसन निवृत्ती केंद्रात पाहिलेले आहेत. त्यांच्या पार्ट्या स्वतःच्या खर्चानेच होतात. मिळणारी दारू फक्त स्वस्त असते. दिमाखदार पोशाख हा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून स्वच्छ आणि कडक ठेवावा लागतो. २००६ साली मी निवृत्त झालो तेंव्हा सात वर्षात एकदा ७ हजार रुपये OUTFIT ALLOWANCE मिळत असे आणि महिना १०० रुपये KIT MAINTAINCE ALLOWANCE मिळत असे. वर्षाला मिळणाऱ्या एक हजार रुपयात गणवेशाचा दोन जोड्या विकत घेता येतात आणि स्वच्छ पांढरा गणवेश आपल्याला किमान ४ जोड्या दर सहा महिन्याला म्हणजे ८ जोड्या (शर्ट आणि पॅन्ट) आणि १५ ऑगस्ट २६ जानेवारी साठी एक कोरा करकरीत असे ९ जोड गणवेश दर वर्षी मला लागत असत. १०० रुपये महिन्यात बूट त्याचे पॉलिश खांद्यावरच्या चमकणाऱ्या फिती इ ची देशभाल अशक्य आहे. बाकी मला मिळणाऱ्या पगाराच्या ३० % अगोदरच आयकर कापून जात असे त्यामुळे केवळ इतरच नव्हे तर मी पण एक प्रामाणिक करदाता होतो. आपल्या सारख्याच एका माझ्या डॉक्टर मित्राचे असे उद्गार ऐकून मी त्याला मी भरत असलेल्या कराची रक्कम सांगितली तेंव्हा तो माझ्यापेक्षा तिप्पट पैसे मिळवत असून कर मात्र अर्धाच भरत होता असे लक्षात आले अर्थात यानंतर तुमची "ऐश" आमच्या कराच्या पैशातून होते आहे असे बोलणे त्याने बंद केले. मिग विमानांच्या अक्षम्य ढिसाळ देखभालीमुळे अनेक पायलट मेले आहेत. या विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला एक तरी पुरावा देता येईल का? विमाने ४० वर्षे जुनी आहेत. सर्वात जास्त वापरली गेली आहेत. त्यांचे सुटे भाग उपलब्ध करून देण्यात सरकार संपूर्णपणे कुचकामी ठरले आहे. अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान( ऍडव्हान्सड जेट ट्रेनर) विमान त्यातील तीन दशके आपल्याकडे नव्हते. पहिले अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान वीस वर्षाच्या कंत्राटाच्या गुर्हाळानंतर २००८ मध्ये उपलब्ध झाले. तोवर दीपक (HPT ३२) हे वैमानिक प्रशिक्षण विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात असे. दीपक चा हवेतील जास्तीत जास्त वेग २८० किमी आहे तर मिग २१ चा उतरतानाचा कमीत कमी वेग ३९६ किमी आहे. म्हणजे म्हशीवर बसणाऱ्या माणसाला एकदम चित्त्यावर बसवले तर काय स्थिती होईल राहिली गोष्ट देखभालीची-- सोव्हिएत युनियन कोसळल्यावर मिग विमानांचे सुटे भाग मिळत नसत. मिळत त्यासाठी पैसे देण्यात बाबू लोकांची अक्षम्य दिरंगाई होती. असंख्य सुटे भाग केवळ वर्षानुवर्षे पडून राहिल्याने (WEATHERING) मुळे कालबाह्य झाले होते ते प्रथम भंगारात काढून त्याच्या निविदा काढून ते रशिया युक्रेन अशा विविध देशांकडून मिळवावे लागत तेवढ्या कालावधी मध्ये इतर नादुरुस्त झालेल्या विमानांचे सुटे भाग (CANNIBALISATION) वापरून विमाने जिवंत ठेवली जात होती. देखभाल ढिसाळ कधीही नव्हती. वायुसेनेचे एक विमान जेंव्हा अगदी अर्ध्या तासासाठी सुद्धा उड्डाण करते तेंव्हा त्याच्या एकंदर १०,०००( दहा हजार) गोष्टींची कसून तपासणी(CHECKLIST) होते. सरकारच्या नालायकीमुळे असंख्य तरुण वैमानिक मृत्युमुखी पडलेले आहेत केवळ बॅटऱ्या विकत घेण्यात (त्या सुद्धा भारतीय कंपनीच्या) झालेल्या दिरंगाई मुळे एक १५०० कोटी रुपयांची पाणबुडी स्फोटाने निकामी झाली त्याबद्दल जबादारी घेऊन नौसेनाध्यक्षानी राजीनामा दिला पण पण नोकरशाहीला ना खंत ना खेद. ना संरसक्षण सचिव उपसचिव किंवा संरक्षण मंत्री यांनी जबादारी घेतली किंवा राजीनामा दिला. हि स्थिती असूनही आपण अशी ढिसाळ विधाने पुरावा न देता करत आहेत याचे दुःख आणि आश्चर्य वाटते.

In reply to by सुबोध खरे

फ्लाईट लेफ्ट्नंट अभिजित गाडगीळ ह्याचा मिग २१ नामक जुनाट विमान उडवताना मृत्यु झाला. विमानदळाने सगळा दोष अभिजित गाडगीळचा होता असे जाहीर केले. त्याच्या आईने प्रकरणाचा पाठपुरावा करुन अनेक वर्षे लढा दिला. विमानदळाने सर्वपरीने त्याला विरोध केला. सत्य बाहेर येणार नाही ह्या करता खूप प्रयत्न केले. कविता गाडगीळ (आई) वर वाईट आरोप केले. पण त्या आईने थेट राष्ट्रपतींची गाठ घेतली आणि नंतर कधीतरी पुन्हा तपास झाला आणि त्यात असे निष्पन्न झाले की अभिजित गाडगीळ पूर्ण निर्दोष होता. आणि त्या विमानांची देखभाल नीट होत नव्हती. ह्या विमानांना उडत्या शवपेट्या असे नाव दिले गेले होते. अनेक वर्षांनी एअर चीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी मागितली होती. तुम्हाला गणवेष नीटनेटका ठेवायला मिळणारा भत्ता पुरत नाही. ठीक. पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो? लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. जरी लष्करातील लोक कर भरत असले तरी ते मोठ्या प्रमाणात करदात्यांचे पैसे खर्च करतात हेही तितकेच खरे. सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य. लष्कर हे देशाच्या म्हणजे देशाच्या नागरिकांकरता आहे हे सैनिक अनेकदा विसरुन ब्लडी सिव्हिलियन्स वगैरे शिव्या देण्यात धन्यता मानतात. कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये.

In reply to by हुप्प्या

१) ब्लडी सिव्हिलियन्स म्हणणारे दीड शहाणे लष्करात नक्कीच आहेत आणि ते अगदी चूक आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही २) देशभक्ती काही लष्कराची मक्तेदारी नाही कोणीही माणूस जर आपले काम मन लावून इमानेइतबारे आणि संपूर्ण जबाबदारीने करत असेल तर तो तितकाच देशभक्त आहे यातही कोणताही वाद नसावा. कारगिल युद्धाचे वेळेस मी जेंव्हा असे म्हणालो कि मी माझी नोकरी लष्करात करतो म्हणून मी जास्त देशभक्त असे नाही तर माझा भाऊ कारखाना चालवतो त्याच्याकडे ६ अभियंते आणि ३४ कामगार काम करतात म्हणजेच तो ४० लोकांना रोजगार पुरवतो तर तो माझ्यापेक्षा जास्त देशभक्त आहे, तेंव्हा हे म्हणणे लष्करातील लोकांना रुचले नव्हते( हे मी मिपावरच कोठे तरी अगोदर पण लिहिले आहे) ३) विमानांची 'देखभाल नीट होत नव्हती' हे आपले विधान पटत नाही कारण याचा सरळ अर्थ असा निघतो कि देखभाल करणारे वायुदलात कर्मचारी ढिसाळ होते. वस्तुस्थिती अशी आहे कि विमाने फार जुनी झाली होती आणि त्याचे सुटे भाग वेळेवर मिळत नसत त्यामुळे दुसऱ्या नादुरुस्त विमानांचे सुटे भाग लावून विमाने उड्डाणयोग्य स्थिती मध्ये आणली जात असत. विमाने जुनी होणे( वेळेत त्यांच्या जागी दुसरी विमाने न विकत घेणे), सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही. ४० वर्षे जुनी कार आपल्यापैकी कोण मेंटेन करीत आहे का? मग जे विमान उतरण्याचा वेग ३९६ किमी आहे (weathering, stress failure किती असेल याचा एकदा विचार करून पहा) त्या जुन्या विमानाची मनोभावे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण अपमान का करीत आहात? ३) सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का? मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण आपल्याला लष्कराबद्दल आकस आहे असेच मी म्हणेन ४) पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो? एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे. ५) लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.हा तुमच्या विश्वासाचा प्रश्न आहे त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. शाळेच्या, कॉलेजच्या, कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त का मिळतात? याचे कारण त्यांच्या जागेचे भाडे वीज पाणी याचा खर्च नगण्य असतो तीच स्थिती लष्कराच्या पार्टीची आहे. सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे. आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील? २००६ साली पार्टीचा खर्च माणशी २५० येत असे अर्थात लष्करात दारू स्वस्त मिळते हेही एक कारण आहे (मी स्वतः दारू पित नाही) असो आपले मतपरिवर्तन होइल यावर माझा विश्वास नाही परंतु इतर लोकांना वस्तुस्थिती समजावी म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.

In reply to by सुबोध खरे

== सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही == एखाद्या संस्थेवर आंधळा विश्वास ठेवणार्‍या लोकांचे मतपरिवर्तन करणे अशक्य आहे. परंतु विमाने उडवणे हे विमानदळाचे काम आणि त्यांची देखभाल करणे हे मात्र "सरकारचे" काम हे अगदीच मूर्खपणाचे आहे. जर जी विमाने आपण उडवत आहोत त्यांची देखभाल कुणी दुसराच करत असेल आणि त्याच्या दर्जाची शाश्वती नसेल तर अशी विमाने आपल्या प्रशिक्षित पायलटांना उडवायला देणे हा बेजबाबदारपणा आहे. माझ्या माहितीप्रमाणे लष्करी विमानतळावरील सर्व व्यवस्था लष्करच चालवते. आणि जर हवाईदळाची चूक नव्हतीच तर एअरचीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी का बरे मागितली? कर्तृत्व आमचे आणि चुका मात्र दुसर्‍याच्या हे धोरण ढोंगीपणाचे आहे. == सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे. आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील? ===== सगळ्या पार्ट्यांना एकच नियम लागू असण्याचे काहीच कारण नाही. काही लष्करी आलिशान पार्ट्या ह्या नक्कीच सरकारी खर्चाने होतात हे मी ठासून सांगू शकतो. बहुतेक मिलिटरी संस्था ह्या आपापल्या कँपसवर असतात. कित्येकदा हे कँपस मुख्य शहरापासून लांब असतात. उदा. पुण्याचे एन डी ए. पूर्वी हे पार गावाबाहेर होते. असे असल्यामुळे आणि लष्करी मेस पुरेशी उत्तम स्थितीत असल्यामुळे पार्ट्या तिकडेच झाल्या तर आश्चर्य नको. == एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे. == बँकेच क्लार्क, कॅशियर आणि अन्य कर्मचारी, विम्याच्या ऑफिसमधील कर्मचारी, रेल्वेच्या तिकिट ऑफिसात काम करणारे, बाकी कर्मचारी, शेतावर काम करणारे, अन्य खाजगी क्षेत्रात काम करणारे ह्यांची संख्या विमान कंपन्यात काम करणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि ह्यांना कुठलाही पोषाख दिला जात नाही. अशा लोकांच्या तुलनेत लष्करातील लोकांना निदान युनिफॉर्म आणि त्याकरता भत्ता तरी मिळतो हा माझा मुद्दा आहे. == कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का? == अतीविशिष्ट क्षेत्रात काम करणारे लोक सरकारी खर्चाने प्रशिक्षित होत असतीलही. पण बहुतांश कर्मचारी कुठलेही सरकारी खर्चाने प्रशिक्षण घेत नाहीत. उदा. कारकून, कॅशियर, हिशेबनीस, तिकिट तपासनीस, तिकिट विक्रेते हे सगळे शाळा कॉलेजच्या शिक्षणावर कामावर लागतात आणि काम करता करता ते शिकतात. लष्करात प्रशिक्षण, त्याकरता लागणारी साधने ह्याचा खर्च अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा कितीतरी जास्त आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. लष्कराकडील विमाने, बोटी, शस्त्रास्त्रे , दळणवळण उपकरणे ह्यातले काहीही स्वस्त नसते. बाकी क्षेत्रात केले जाणारे काम आणि खर्च ह्यातून काहीतरी उत्पन्न मिळते. सेवा वा उत्पादन गिर्‍हाईकाला मिळते. नागरी विमान सेवा, हॉटेल, रेल्वे, बँक, विमा उत्पादने बनवणारे कारखाने सर्व. लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. उलट लष्कराचे काम आहे म्हणजे पडेल ती किंमत घेऊन ते खरेदी करणे असा साधारण दृष्टीकोन असतो. आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. मग ते चीन युद्धातील जीप, बोफोर्स, वेस्टलँड, राफेल, शवपेट्या . हा योगायोग नाही. आणि प्रत्येक वेळी लष्करी अधिकारी धुतल्या तांदळासारखे. मात्र बाकी सगळे लोक सरकारी कर्मचारी, नेते मात्र भ्रष्ट अशी मांडणी करणे भोळसटपणाचे आहे.

In reply to by हुप्प्या

लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. >>>+ १ कित्येकदा मला असे वाटते की जगात सर्वत्र शांतता नांदली असती तर अवाढव्य लष्करी खर्च वाचला असता आणि तो विकासासाठी उपयोगी पडला असता. पण असो…. दुसरा विचार असा की सध्या लष्कर सीमांचे संरक्षण करते आणि म्हणून नागरी लोकांनी त्यांच्यासाठी खर्च करायचा. एक प्रकारे ही पूरकता आहे का? नक्की समजत नाही. कोणी समजून सांगितल्यास आवडेल.

In reply to by हुप्प्या

आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी समजून आली. आपल्याला समजावणे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. फक्त दोनच मुद्दे १) आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. फक्त दोनच घोटाळे पहा -- २G घोटाळा २ लाख कोटी आणि कोळसा घोटाळा २ लाख कोटी संरक्षण क्षेत्रातील आजवरचे सर्व घोटाळे मिळून यातील एका घोटाळ्याइतकीही रक्कम होत नाही २) लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. हे अगदी बरोबर आहे. निव्वळ अनुत्पादक खर्च असलेले लष्कर बडतर्फच करून टाकावे. शरीरात सर्वात जास्त वाढीचा वेग असणाऱ्या पेशी म्हणजे पांढऱ्या पेशी यांचे काम काय तर शरीराचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे शरीराचा हा खर्चही अनुत्पादकच असतो कि मग निसर्ग एवढा खर्च का करतो? पांढऱ्या पेशींचे काम बंद होते असा एक आजार आहे त्याला एड्स म्हणतात. इतर आपला युक्तिवाद अगदीच हास्यस्पद आणि पूर्वग्रहदूषित आहे. तेंव्हा मी आपल्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही. बाकी आपले मत आपल्यापाशी. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

खरे तर पूर्वग्रह आपाल्याकडेही आहेतच. दुसरी बाजू ऐकून न घेता त्याची हेटाळणी करणे हे कसले लक्षण आहे? लष्कर बडतर्फ करता आले तर खर्च कमी होईल. पण ते एक टोक आहे. लष्कराचा अफाट खर्च थोडा कमी करता आला तर चांगले असे म्हटले तर त्यात आकांडतांडव करण्यासारखे काय आहे? लष्कराच्या लोकांना आपला खर्च कमी केला जातो आहे ही कल्पनाच सहन होत नाही. कारण त्यांच्या हक्काची कुरणे जातात. पण करदात्यांनी तसा विचार केलाच पाहिजे. शून्य खर्च आणि अफाट खर्च ह्याच्या मध्ये काही असू शकते की नाही? डोक्यात राख घालून "करा बडतर्फ फौज मग!" असे म्हणणे प्रगल्भतेचे लक्षण नाही. अनेक संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे यावर निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. उदा. बोफोर्स. राजीव गांधी हरण्याचे कारण तेच होते. बाकीही प्रकरणे अशीच खळबळजनक होती. पैशाचा आकडा कदाचित कमी असेल पण धुरळा जास्त उडला होता.

In reply to by हुप्प्या

"संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे" लष्करी अधिकाऱ्यांनी केली का संरक्षण मंत्रालयात असलेल्या बाबू आणि राजकारण्यांनी केली आहेत याचा एकदा शोध घ्या बरं. बाकी मी म्हटलंच आहे आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी आणि एकांगी मते बदलणे माझ्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. त्यासाठी मी डोक्यात राख घालायची गरज नाहीच.

In reply to by हुप्प्या

कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये. >>>>> + ११ नागरी असो वा लष्करी, दोन्ही गटांनी एकमेकाबद्दल आदर ठेवावा. दोघे एकमेकास पूरक सेवा देत असतात.

तु्म्ही रोज तर प्रवास करत नाही ना? आणि असं तुमच्या बाबतीत रोज तर होत नाही ना? तुमच्या आरक्षित स्थानांवर लष्करी जवान बसले आणि एखाद वेळेस तुम्हाला झाला थोडा त्रास तर असं काय मोठं बिघडलं?! बरं, सगळे तरूण मित्रच तर होतात. असंही नाही की कुणी वृद्ध आणि आजारी होतं! पण आमचं असं आहे ना, की आमचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही जवानांकरता जराही तोशिश पत्करणार नाही..आणि मग त्यानंतरच आम्ही 'येईन तर तिरंगा रोवून किंवा तिरंग्यात गुंडाळून!' असं म्हणणाया कारगील शहीद विक्रम बात्राचं कौतुक करणार! मगच आम्ही दुर्दम्य देशभक्तीच्या जोरावर ६ दिवस बर्फाखाली जिवंत राहणाया हनुमंताप्पाचे कौतुक करणार! पण आम्ही आमच्या एक वेळच्या प्रवासाच्या आरक्षित जागाही खुल्या दिलाने त्यांना देणार नाही! अरेरे..कीव येते आम्हाला आमच्या कोतेपणाची! Vikram Batra

आणि मुळात एक दिवसाच्या प्रवासातली गैरसोय ती काय आणि त्यावर चर्चा ती केवढी भली मोठी! अरे घरदार, आईवडील, बायको, मुलं कशाचीही पर्वा न करता ते जवान आपल्याकरता मरणाला सामोरे जातात! असो. माझी मलाच लाज वाटली आज!

जवानांकरिता तुमची गैरसोय झाली तर त्यात तक्रार कशाला असे म्हणण्यात तथ्य नाही. जवानांची चांगली सोय व्हावी (अधिक रेल्वेगाड्या, डबे ई) हे मान्यच त्याकरिता अनेक सरकारने अधिक बजेट दिले तरी चालेल, रेल्वे तिकिटावर वा इतर कोणत्या सरकारी खर्चावर अतिरिक्त अधिभार लावावा त्याबद्दल बहूसंख्य नागरिक तक्रार करणार नाहीत. सैन्याने आवाहन केले तर मदतनिधीसाठीही अनेकजण पुढे येतील हे नक्कीच.. पण जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे. सर्वसामान्य नागरी सुविधांचा लाभ घेताना वा नागरिकांशी संबंध येत असताना देशातले कायदे , नियम जवानांकरिताही लागू आहेत हे सैन्यातील जवानांनी विसरू नये. किंबहूना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान 'नागरी कायद्याचा आदर करणे त्यांना अनिवार्य आहे' हे त्यांच्या मनावर बिंबविण्यात यावे.

आतापर्यंत सदस्यांनी मांडलेले ठळक मुद्दे: १. नागरी लोकांनी जेव्हा केव्हा गैरसोयीची वेळ येते तेव्हा कायम पडती बाजू घ्यावी व लष्करी लोकांना प्राधन्य द्यावे २. लष्करी लोकांना त्यांच्या गणवेशाची गुर्मी असते. ती अयोग्यच ३. लष्करावरील अवाढव्य खर्च हा योग्य आहे का याचे मूल्यमापन व्हावे ४. जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे ५. भारतातील अशा समस्यांचे मूळ अफाट लोकसंख्या, मुरलेली बेशिस्त, ढिसाळ नियोजन आणि बेपर्वाई यात दडलेले आहे. .