समुद्रसौन्दर्य - लघुलेख

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
15 Dec 2018 - 11:56 am

अलीकडे समुद्रातील दोन अनोख्या गोष्टी अनुभवल्या त्याची ओळख देणारा हा लहानसा लेख.

काजवे आपण सर्वांनीच पहिले आहेत. सूक्ष्म प्रकाशपुंज काळोख्या रात्री चमचमताना फार सुंदर दिसतात. या प्रकाशाचे गुपित दडले आहे त्यांच्या शरीरातील जैवप्रभा निर्माण करणाऱ्या ल्युसीफरीन व तत्सम फोटोप्रोटीन रसायनात. काजव्यांव्यतिरिक्त अन्य काही जीवांमध्येही हि क्षमता असते. यातील बहुसंख्य जीव खोल समुद्रात, जिथे सूर्य प्रकाश पोहोचू शकत नाही अशा खोल पाण्यात राहतात व त्यामुळे निसर्गाने त्यातील काही जीवांना त्या परिस्थितीत जगण्यासाठी हि विशेष क्षमता प्रदान केली आहे. काही जीव खोल गुंफांमध्ये आढळतात. पण सहजी सापडणारे कदाचित काजवेच. अहुपे-भीमाशंकर परिसरात दोन तीन प्रकारची चमकणारी बुरशी पावसाळ्यात पाहावयास मिळते पण एकंदर दुर्मिळच. अशाच एका अनोख्या प्रकाशाची ओळख...
हे एक प्रकारचे शैवाल उष्ण प्रदेशात आढळते. मालदीवच्या चमचमणाऱ्या किनाऱ्याचे फोटो तुम्ही पहिले असतील, हेच ते शैवाल. हे अतिसूक्ष्म जीव दिवसा सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवतात व रात्री त्या ऊर्जेचा वापर करून निळसर प्रभा उत्पन्न करतात. हि खरेतर त्यांची संरक्षण व्यवस्था आहे, लाजाळूच्या पानांप्रमाणे धक्का लागल्यावरची हि त्यांची प्रतिक्रिया. त्यामुळे विशेषतः लाटा येणाऱ्या पाण्यात त्यांचे अस्तित्व असेल तर त्या निळसर लाटा अतिशय सुंदर दिसतात. पाणी शांत असेल तर त्यातून जाणारी होडी किंवा नुसती हाताने केलेली खळबळ यामुळे सुद्धा तेथील पाणी निळसर प्रकाशात उजळून जाते.

अलीकडे दक्षिण अमेरिकेत कोलोम्बिया मध्ये कार्ताहेना जवळ आयला बार्रु जवळ हा अनोखा अनुभव आला. कार्ताहेना मधून कोलोम्बिया सहलीची सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी हे सरप्राईज. ज्या हॉस्टेल वर राहत होतो त्याने या जागेविषयी माहिती दिली. कार्ताहेना बरेच प्रसिद्ध ठिकाण असले तरी बीच शहरापासून बरेच लांब असल्याने इथे व त्यातही हि जागा पाहण्यासाठी क्वचितच लोक येतात. त्यामुळे बऱ्याच अंशी केवळ स्थानिक पर्यटकच दिसले, पण तेही केवळ प्लाया ब्लांका बीच वर. सूर्यास्तानंतर हॉस्टेल मालक मित्र एका लहानशा होडक्यातून हॉस्टेलवरच्या आम्हा चौघांना एक समुद्राचा खाडीसारखा आत आलेला भाग आहे तिथे घेऊन गेला. संथ पाण्यात या निळ्या प्रकाशात पोहोण्याचा मनसोक्त आनंद घेतला...

चित्रांची गुणवत्ता अगदीच सुमार आहे परंतु एकंदर कल्पना येऊ शकते


-------------------------------------------------------------------------------------------------------

दुसरी गोष्ट त्यामानाने सामान्य पण मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवली. खोल पाण्यातली फोटोग्राफी... समुद्रातील रंगीबेरंगी जीव तसे डिस्कव्हरी वर पहिले आहेत, मत्स्यालयातही पहिले आहेत, पण प्रत्यक्ष खुल्या समुद्रात पाहणे हे वेगळंच. मेक्सिको-क्युबाच्या दरम्यान खुल्या कॅरिबियन समुद्रातील हि काही चित्रे व व्हिडीओ. एका बुडालेल्या जुन्या जहाजाच्या आश्रयाने जीवसृष्टीने इथे आकार घेतला आहे. निसर्गाची किमया! गंजत चाललेल्या जहाजातून विलग होत असलेली खनिजे नवीन जीवांना आधारभूत झाली आहेत. प्रथम सूक्ष्मजीव, मग समुद्री वेली, मग प्रवाळ अशी स्थिर जीवसृष्टी तर त्यांच्या आश्रयाला आलेली व काही अन्नाच्या शोधात आलेली रंगीबेरंगी मासे, कासव इत्यादी चल जीवसृष्टी...

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

15 Dec 2018 - 1:08 pm | चौथा कोनाडा

वाह, भटकंती वृतांत आवडला.
निळसर प्रकाशाची निर्मिती करण्यार्‍या शैवालीची माहिती छान आहे.
खुपच दिव्य अनुभव असणार समुद्राच्या तळाशी जाऊन फोटोग्राफी करण्याचा !

आणखी लेख वाचायला आवडतील !
पुलेशु

खुप छान नविन माहिती मिळाली. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2018 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं माहिती !

गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीप्रमाणे, भारतीय नौदल, INS Cuddalore नावाची निवृत्त केलेली सामरिक नौका पुडुच्चेरीपासून ७ किमी दूर समुद्रात बुडवून तिचे पाण्याखालील संग्रहालय बनवण्याचा प्रकल्प हाती घेत आहे...

Why the Navy wants to sink a ship off Puducherry

पद्मावति's picture

15 Dec 2018 - 3:13 pm | पद्मावति

खूप सुंदर लेख. असे चमचमणारे बायो बे जगात दुर्दैवाने खूप कमी उरले आहेत. puerto rico ला एक बायो बे बघितला होता. तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला पोहायची परमिशन मिळाली आम्ही जिथे गेलो होतो तिथे पाण्यात उतरायला मनाई होती फक्त हात पाण्यात टाकता आला. पण खूप सुंदर अनुभव.

कंजूस's picture

15 Dec 2018 - 4:05 pm | कंजूस

छान !!

सुबोध खरे's picture

15 Dec 2018 - 6:29 pm | सुबोध खरे

या प्रकाराला बायो ल्युमिनिसन्स म्हणतात.
पहा https://en.wikipedia.org/wiki/Bioluminescence
अधिक माहितीसाठी पहा
https://www.leisurepro.com/blog/explore-the-blue/bioluminescent-plankton...
एक सुंदर प्रतिमा
https://en.wikipedia.org/wiki/Bioluminescence#/media/File:Bioluminescent...

यशोधरा's picture

15 Dec 2018 - 6:47 pm | यशोधरा

मस्त!

दुर्गविहारी's picture

15 Dec 2018 - 7:22 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्तम माहिती. छान!

अनिंद्य's picture

18 Dec 2018 - 1:00 pm | अनिंद्य

ऑसम !

टर्मीनेटर's picture

19 Dec 2018 - 4:41 pm | टर्मीनेटर

लघुलेख आवडला.

रागो's picture

19 Dec 2018 - 6:57 pm | रागो

खूप सुंदर