आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ७

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
28 Nov 2018 - 12:10 pm

सकाळचा गजर वाजला आणि सगळेजण ताडकन उठून बसले.आज व्हेल बघायला जायचे होते आणि बोटीवरच नाश्ता वगैरे मिळणार होता.त्यामुळे फार वेळ न घालवता झटपट तयार होऊन सर्वजण निघाले. सकाळचा सुंदर सुर्योदय दिसत होता आणि उत्साहात भर घालत होता.
q
मिरीसा बीचजवळ एके ठिकाणी आमच्या बोटी वाट बघत थांबल्याचे होत्या.सुमारे ४०० ते ५०० लोक एव्हढ्या सकाळी व्हेल बघायला जमले होते. एक एक करून बोटी भरत होत्या आणि सगळ्यांची मोकयाची जागा पटकवायला धडपड चालू होती.पण बोटवाल्याने पहिले काही नियम सांगून ठेवले. एकतर ज्या बाजूला व्हेल दिसेल त्या बाजूच्या लोकांनी उभे राहायचे नाही म्हणजे त्यांच्या डोक्यावरून सर्वांना व्हेल बघता येतील. दुसरे म्हणजे शक्यतो कोणीही सीट सोडून इकडे तिकडे जायचे नाही. कारण बोटीचा तोल जाईल.शिवाय बोट लागायची म्हणजे उलटी व्हायची भीती.
q
हे बोटवाले जागतिक व्हेल वाचवा मोहिमेशी संबंधित असतात आणि त्यांना व्हेलपासून १०० मीटर अंतर राखावे (डॉल्फिनापासून ५० मीटर चालते) अशासारख्या सूचना दिलेल्या असतात. त्यांच्या सवयींचा त्यांना बऱ्यापैकी अंदाज असतो .दुसरे म्हणजे व्हेल साधारण कोणत्या भागात दिसतात हे ऋतूनुसार त्यांना माहित असते.आणि ते आपल्याला बरोबर तिथेच फिरवतात. हे ठिकाण किनाऱ्यापासून साधारण ३०-४० किलोमीटर आत असते त्यामुळे पूर्ण ट्रीपला ५-६ तास लागतात. शिवाय काही व्हेल एका भागात स्थिर राहतात तर काही सतत हिंडत राहतात. या भागात साधारण ३०० व्हेल आहेत. आणि या सर्व बोटी दोन लाईट हाऊसची हद्द राखून त्याच्या आतच म्हणजे साधारण वेलींगामा बे आणि दोन्द्रा बे भागात फिरतात .
q
बोट जसजशी आत जाऊ लागली तसे तसे उडणारे मासे दिसू लागले.हे मासे पाण्यावर साधारण ४-५ फूट उंच आणि १५-२० फूट लांबवर उडत किंवा सुरकांडी मारत जाऊ शकतात.देशोदेशीची जहाजेही श्रीलंका बंदरात आलेली दिसत होती.
q

q

एकीकडे बोटवाले लोक माहिती देत होते आणि दुसरीकडे कप्तानाची व्हेल बघायची धडपड चालली होती.अचानक काहीतरी फोनाफोनी झाली (इथे त्यांना नेटवर्क येत होते हे एक विशेषच ) आणि आम्ही ३-४ बोटींनी मोहरा वळवून कुठेतरी जायला सुरुवात केली. तो बघा तो बघा अशी आरडाओरड झाली आणि एका प्रचंड व्हेलचे ओझरते दर्शन झाले.
मात्र त्याने पाण्यावर सोडलेला श्वासाचा फवारा लांबूनही स्पष्ट दिसत होता.
q

व्हेल साधारण १५ मिनिटे पाण्याखाली राहतो आणि पुन्हा एक श्वास घ्यायला वर येतो. तो श्वासाचा फवारा फोटोमध्ये पकडायचे सर्वांचे प्रयत्न चालू होते. पण हा व्हेल पुन्हा वर आलाच नाही, त्या ऐवजी कुठेतरी निघून गेला. मग दुसरा व्हेल दिसला आणि पुन्हा सगळे बोट वाले त्याच्या मागावर निघाले .एका बोटीला ३ वेळा चान्स मिळतो आणि मग किनाऱ्यावर परतावे लागते. त्यामुळे व्हेलभोवती फार गर्दी होत नाही. इथे व्हेल राहणे जास्त महत्वाचे आहे कारण ते असतील तरच आम्ही जगू असे बोटवाल्यानेच सांगितले. आणि ते तो मनापासून बोलत होता असे जाणवत होते. त्याची ही भावना मनाला भिडली. अजून २ वेळा व्हेल दिसला आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
q
मुख्य आकर्षण दिसल्याने हा प्रवास मात्र कंटाळवाणा होत होता.भर उन्हाच्या कडाक्याच्या किनारीला आलो आणि गाडीत बसून हॉटेलवर पावते झालो.आता जेवून पुढच्या प्रवासाला लागायचे होते.
q
पुढे निघालो आणि ४ च्या सुमारास डच लोकांनी बांधलेला गाल फोर्ट बघायला पोचलो. इंग्रज डच पोर्तुगीज वगैरे लोकांचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. जेव्हा आपल्याकडे लोक ढाल तलवारीने लढत होते तेव्हा हे लोक हजारो मैलांवरून जहाजे घेऊन इथे आले. नुसतेच आले नाहीत तर आपल्या साम्राज्य पिपासूं आणि व्यापारी वृत्तीने इथे जम बसविला.
q
किल्ले बांधले ,किनारपट्टीचे प्रदेश बळकावले मग ते वसई असो कि दीव /दमण, गोवा,अंदमान मॉरिशस नाहीतर श्रीलंका असो. येन केन प्रकारेण आपला धर्म प्रसार केला लोकांवर अत्याचार जुलूम केले आणि आपल्या तिजोऱ्या भरल्या .
q
त्यांचे वंशज तोऱ्यात आत्ता आत्ता पर्यंत इथे राहिले नव्हे अजूनही त्यांच्या मालमत्ता इथे आहेत. आणि आपल्या लोकांनी हे सगळे सहन कसे केले? आपल्याकडे ताकद नव्हती कि तंत्रज्ञान नव्हते कि एकी नव्हती?
q
अजूनही ही जुलमाची प्रतीके आपण आपल्या उरावर घेऊन बसलो आहोत. साष्टी वसई अर्नाळामध्ये आजही त्या खाणाखुणा सापडतील. हे किल्ले बघून मलातरी एक प्रकारची खिन्न उदास भावना मनात दाटते.असो.एक किल्ला म्हणून गाल फोर्ट छानच होता.समुद्राला लागून असलेले सरळसोट अभेद्य बुरुज , किल्ल्याच्या आत गाडी फिरू शकेल असे रस्ते, ऑफिसेस बागा चर्चेस आणि जुन्या इमारतींमध्ये थाटलेली रेस्टोरंटस असे पाहत पाहत गाडीतूनच किल्ला बघितला आणि बाहेर पडलो.
q
पुढे एका मुन स्टोन बनविणाऱ्या खाणीला भेट दिली आणि काही मुन स्टोन खरेदी केले. हा मुनस्टोन मोत्याला पर्याय म्हणुनही वापरतात.
q
मुनस्टोनबरोबरच ईथे ईतरही विविध प्रकारचे स्टोन्स होते. पण किम्मतीत जरा बनवाबनवी वाटली. आणि स्टोनबरोबर प्रमाणपत्र सु द्धा दिले नाही त्यामुळे जरा संशयास्पद मामला होता. एकुणच ईथे किमतीत घासाघीस करणारा योग्य माणुस हवा. हॉल्सच्या गोळीएव्हढा मुनस्टोन ५० हजार (पन्नास) रुपयाला सांगितला म्हणजे बघा.
q
त्यांच्या कारखान्याला धावती भेट दिली आणि पुढे निधालो.
q
q
आजचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे कासव संवर्धन केंद्राला भेट देणे हा होता. प्रत्येकी १००० श्रीलंकन रुपये देऊन आत प्रवेश केला.आतमध्ये ठिकठिकाणी हौद बनवून त्यात कासवे सोडली होती.
एका हौदात कासवाची ३ दिवसाची पिल्ले तर दुसरीकडे ९ वर्षे १५ वर्षे १०० वर्षे वयाची प्रचंड कासवे पोहत होती.प्रत्येकाच्या पाठीची नक्षी वेगळी होती.कासवांची सोय तर उत्तम ठेवलेली दिसत होती.
q
q
q
पुढे वाळूत पुरलेली कासवांची अंडी दाखवून आमची फेरी संपली. थोडे फोटो सेशन करून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि आमच्या बेंटोटा च्या हॉटेलवर येऊन पोचलो.
q
q
आता उद्या सकाळी मदु नदीत बोट सफारी आणि सन्ध्याकाळी कंद विहार बुद्ध मंदीराला भेट व स्थानिक बाजारात खरेदीचा कर्यक्रम होता. मग परवा इथुन कोलम्बो आणि ट्रिपची समाप्ती.

प्रतिक्रिया

रु.1000 रु. एन्ट्री फी म्हणजे भारतीय रु.2000 प्रत्येकी . म्हणजे तुमचे चौघांचे 8000 रु. केवळ एन्ट्री फी मधअयेच गेले. भारतात त्यामानाने खूपच स्वस्ताई आहे म्हणायची

अनिरुद्ध प's picture

28 Nov 2018 - 2:50 pm | अनिरुद्ध प

नमस्कार,
आपले म्हणणे काहि प्रमाणात बरोबर आहे जेव्हा तिकिट डोलर मध्ये तेव्हा ते खरोखरच महाग आहे परन्तु जर ते श्रिलन्कन रुपयात असेल त्र ते मात्र स्वस्त होइल कारण
१ भारतिय रुपया = २.५ श्रिलन्कन रुपया असा विनिमय दर आहे.

अनिरुद्ध

श्वेता२४'s picture

28 Nov 2018 - 3:06 pm | श्वेता२४

मी उलटं गणित केलं. धन्यवाद. पण मग डॉलरमध्ये खर्च न करता सर्व खर्च श्रीलंकन रुपयांमधअयेच केला तर पैसे वाचतील का. कारण मेहेंदळे सरांनी काही ठिकाणी तिकीटाचे दर डॉलरमध्येच नमुद केलेत. नेमका काय नियम आहे या संदर्भात कळेल का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2018 - 4:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझे मत असे आहे की ज्या देशात जाल तिथल्या करन्सी मध्येच व्यवहार करावा म्हणाजे जास्त घोळ होत नाहित.

या ट्रिपमध्ये आम्हि जेव्हा भारतीय रुपये वापरले तेव्हा १:२ चा रेट लावला गेला. पण तेच एक्स्चेन्ज करुन १:२.२ (१ भारतीय रुपयाला २ रु. २० पैसे श्रीलंकन) मिळाला. आणि डॉलरचे गणित तर कधी १७२ कधी १७५ रुपये एका डॉलरला असे केले जाते तेव्हा त्या भानगडीत पडायचे नसेल तर सरळ ७०-८० हजार श्रीलंकन रुपये घेउन जा (४ जणांची फॅमिली समजुन). मात्र ते सगळे तिथेच खर्च करुन या. ईथे परत आल्यावर त्याचा काही भाव मिळणार नाहि. कदाचित कोणी घेणार पण नाही.

मला पण हेच माहित करून घ्यायचे होते .. काय पटवून सांगितलेत राव .. मान गाये मेहेंदळे साहेब आपल्याला .. आणि हो मालिका सुंदर सुरु आहे बरं का .. अशीच चालू द्या ..

व्हेलच्या फवार्‍याचा क्षण मस्त पकडला आहे. कासवांचे फोटो अप्रतिम. माणसांची गर्दी इतकी कमी पाहून छान वाटले.

अजूनही ही जुलमाची प्रतीके आपण आपल्या उरावर घेऊन बसलो आहोत. साष्टी वसई अर्नाळामध्ये आजही त्या खाणाखुणा सापडतील. हे किल्ले बघून मलातरी एक प्रकारची खिन्न उदास भावना मनात दाटते.

अगदी खरे. मूठभर परकीयांनी आपल्यावर कित्येक शतके राज्य केले तरी आमच्याकडे अमुक होते आणि तमुक होते या आमच्या बढाया काही कमी होत नाहीत. असो. एका मस्त लेखा धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Nov 2018 - 8:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर तुमची ही लेखमाला सापडली गुगलवर, मस्त लिहिलेय की तुम्हीपण या विषयावर

https://www.misalpav.com/node/20963

वेदांत's picture

30 Nov 2018 - 4:55 pm | वेदांत

उत्तम माहीती मिळतेय. पुभाप्र.

कंजूस's picture

1 Dec 2018 - 8:29 am | कंजूस

खूपच छान होत आहेत लेख.
काटेकोर नियम पाळले गेले नाहीत तर नैसर्गिक संपत्तीची वाट लागते. जुलमाच्या खुणा आहेत पण त्याच आता पर्यटकांना आणतात.

टर्मीनेटर's picture

1 Dec 2018 - 3:48 pm | टर्मीनेटर

मस्त चालू आहे सफर, मजा येत आहे वाचायला...