ग्राहकहिताय सद्रक्षणाय

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

ग्राहकहिताय सद्रक्षणाय

आमचे पहिले, स्वतःचे घर बुक केले ते ७ जुलै १९८६ला. माझ्या नावावर. तोपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विरारला, पार्ल्याच्या परांजपे बिल्डर्सच्या, सेंट्रल पार्क या प्रोजेक्टमध्ये. अर्थात वन रूम किचन. किंमत कागदोपत्री रुपये ८७,०००/- + आणि ब्लॅकचे रुपये १८०००/- फक्त.
जेव्हा हे घर घेण्याचे नक्की झाले, तेव्हा प्रोजेक्ट नुकतेच सुरू झाले होते, पण परांजपे बिल्डर्सच्या बाबूराव परांजपेंच्या पुण्याईमुळे वन रूम किचनचे एकूण चारशेंपैकी फक्त पाचच फ्लॅट शिल्लक होते.
कागदोपत्री जरी ताबा डिसेंबर १९८९ला मिळणार असला, तरी करार करताना, "ताबा डिसेंबर १९८८पर्यंत देण्याचा प्रयन करतो आहोत'' असे परांजपे बिल्डर्सचे आताचे मालक श्री. हेमंत परांजपे यांनी तोंडी सांगितले होते. हेमंत परांजपे हा बाबूरावांचा नातू.
२०% रक्कम भरून आम्ही ७ जुलै १९८६ला नोंदणी तर केली. आता अठरा हजार ब्लॅकचे भरल्याशिवाय करारपत्र होणार नव्हते. करारपत्र मिळल्याशिवाय घरासाठी कर्ज मिळवता येणे शक्य नव्हते. म्हणून आमचे कल्याणचे, भाड्याने राहत असलेले घर रिकामे करून, घराचे डिपॉझिट रुपये १७०००/- मिळवून त्यात भर घालून, १४ ऑगस्ट १९८६ला ब्लॅकचे पैसे भरले.
करारपत्राप्रमाणे आता आम्हाला उरलेले एकोणसाठ हजार सहाशे रुपये भरायचे होते, ते चार हप्त्यात, प्रत्येक स्लॅब पडतेवेळी हप्ता भरायचा होता. तेव्हा विरारमध्ये वन + टू इतक्याच बांधकामाला परवानगी असल्याने तीन स्लॅब पडणार होत्या. दोन हप्ते एकवीस हजाराचे, एक पंधरा हजाराचा आणि चावी घेताना उरलेली रक्कम द्यायची होती.
आतासारखे, बँकेचे प्रतिनिधी साइटवर असतात तसे त्या वेळी नसायचे आणि बँकाही इतके कर्ज द्यायला तयार नसायच्या. वैयक्तिक कर्ज फार मिळायचे नाही. तेव्हा एचडीएफसी हाच एक पर्याय होता.
त्याप्रमाणे करारपत्र हातात आल्यावर आम्ही एचडीएफसीमध्ये गेलो. तेव्हा एचडीएफसी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी करारपत्राच्या आणि आम्हा दोघांच्या वेतनदाखल्यांच्या आधारावर आम्हाला रुपये ५०,०००/- फक्त, इतके कर्ज १८% व्याजाने २० वर्षांसाठी मिळेल असे सांगितले. तसेच एक ४०-५० पानी अर्ज हातात ठेवून "या कर्जासाठी पाच हजार पगार असलेले दोन जामीनदार हवेत" असेही सांगितले.
आता आली का पंचाईत? कारण तेव्हा आमचा पगार २२०० व २५०० या आकड्यातला, सभोवताली सहकारीही त्याच रेंजमधले. त्यात माझ्या आईच्या वडिलांची शिकवण अशी की, "कोणालाही जामीन राहायचे नाही, हवे तर पैशाची मदत करा आणि विसरून जा." त्यामुळे नातेवाइकांच्या मदतीची अपेक्षा करणे कठीणच होते.
त्याप्रमाणे कल्याणचे घर सोडल्यावर एकदा तशी पैशांची मदत घेतली होती. घाटकोपरला इन्कम टॅक्स कॉलनीत पोटभाडेकरू म्हणून राहायला आलो होतो, त्या डिपॉझिटसाठी पैसे घेतले होते ते पैसेही परत करून झाले होते. पण जामीन राहायला कोणी मामेभावंडे तयार होतील का? ही शंकाच होती.
शेवटी ठरवले, विचारून तरी बघू. फार काय नाही म्हणतील. का नाही म्हणतील, ते कारण तर आपल्याला माहीतच आहे. पण नंतर कोणी म्हणायला नको, "अरे, मला सांगायचं ना!" माझे लहानपण बरेचसे मामांकडे गेले आणि तिथे मी दोन्ही मामांच्या दहा मुलातील आठ जणांपेक्षा लहान होते. त्यमुळे आजही जिव्हाळा भरपूर आहे.
म्हणून मोठ्या मामांच्या मोठ्या मुलाला - बंधू म्हणायचो त्याला - विचारले, तर तो लगेच तयार झाला. आणि त्यानेच सुचवले की, "चारूला विचार." चारूताई त्याची चुलतबहीण आणि माझी मामेबहीण. धाकट्या मामांची मोठी मुलगी. ताई स्टेट बँकेत अधिकारी आणि बंधू प्रिमियरमध्ये ऑटोमोबाइलमध्ये सुपरवायझर होता.
दोघांनीही त्यांचे वेतनदाखले आणून दिले. ते लावून तो अर्ज एचडीएफसी कार्यालयात घेऊन गेलो. ते वेतनदाखले पाहून तिथला अधिकारी म्हणाला, "सॉरी, तुम्हाला उगीच टेन्शनमध्ये ठेवलं. यातला कोणी एकच जामीनदार पुरे झाला असता." कारण ताईचा पगार होता रुपये बारा हजार आणि बंधूचा होता रुपये सतरा हजार. "तुमचे कर्ज येत्या आठवड्यात मंजूर होईल. एवढे तगडे जामीनदार आहेत तर काही प्रॉब्लेम येणार नाही."
आमचे कर्ज सॅन्क्शन झाल्याचे एचडीएफसी कार्यालयाकडून पंधरा दिवसांतच पत्र आले. आम्ही ते घेऊन त्या कार्यालयात गेल्यावर तिथले ओळखीचे झालेले अधिकारी म्हणाले, "तुम्ही आताही हे कर्ज घेऊ शकता, पण तुम्हाला आजपासून त्याचे व्याज द्यावे लागेल. त्यापेक्षा जेव्हा बिल्डरकडून हप्त्याचे पत्र येईल, तेव्हा तेवढाच हप्ता उचला, म्हणजे तुमच्या व्यजाची रक्कम कमी होईल."
पुढच्या घटना पाहता त्यांच्या रूपाने देवच बोलला असे आता वाटते. आता आम्हाला रुपये साठ हजार तीनशे भरायचे होते, त्यातले पन्नास हजार तयारच होते, उरलेले दहा हजार तीनशे दोन वर्षांच्या बचतीतून आरामात साठवता येणार होते. हुश्श्य झाले, कारण घर पाहावे बांधून म्हणतात. इथे तर आख्खे ४०० फ्लॅट्सचे हे प्रोजेक्ट.
आता आम्ही बिल्डरला पैसे द्यायला तयार होतो, पण त्यांचे पत्र काही वर्षभर येणार नव्हते. तेव्हा आमी एकाच्याच पगारात घर चालवायचे ठरवून दुसऱ्याचा पगार बँकेत साठवायला सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा पहिल्या हप्त्याचे पत्र आले, तेव्हा आमच्याकडे ती रक्कम तयार होती, तरीही ते पत्र घेऊन एचडीएफसी कार्यालयात जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि "आता आमच्यकडे हा हप्ता भरायला पैसे आहेत तर आम्ही पुढच्या हप्त्याच्या वेळी पैसे उचलले तर चालतील का? की पन्नास हजार मंजूर झाले आहेत तर तेवढे घ्यावेच लागतील का?" याची चौकशी केली. तर त्यांनीही चालेल असे सांगून आमचा भार हलका केला.
समजा, बिल्डरने सांगितल्याप्रमाणे लवकर प्रोजेक्ट पुरे केले, तर लागतील ते पैसे अजूनही आपल्या हातात आहेत हा दिलासा घेऊन आम्ही हा हप्ता भरला.
तसाच वर्षभराच्या अंतरानेे दुसऱ्या स्लॅबचे पत्र आल्यावर हा हप्ताही आम्ही आमच्याच बचतीतून भरला.
तिसऱ्या हप्त्याचीही हीच गत झाली. त्याचे पत्र पुन्हा वर्षाने आले. आम्ही तिन्ही हप्त्यांचे सगळे पैसे देऊन मोकळे झालो होतो. आता ताबा घेण्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे तयार होते. कर्ज घेताना सबुरीचा सल्ला मिळाल्यामुळे कर्ज घ्यावेच लागले नाहीआणि व्याजाचा भुर्दंडही टळला.
परांजपे बिल्डर्सचा आतापर्यंतचा लौकिक लक्षात घेता थोड्या दिवसांत आपण घाटकोपर सोडून विरारकर होणारच, अशी खातरी होतीच. तसेही करारपत्राप्रमाणे ताब्याचा दिवस उजाडायला अजून तीन-चार महिने होतेच. तरीही मध्ये मध्ये पार्ल्याला आणि मध्ये मध्ये विरारला जाऊन चौकशी आणि पाहणी सुरूच होती.
तीन स्लॅबपर्यंत दिसणारे काम नंतर दिसेनासे झाले. पुढच्या काही महिन्यांत कामावरची माणसे दिसेनाशी झाली. नुसते खांब आणि छत इतकेच साऱ्या बिल्डिंगचे काम झालेले होते. एखाद-दुसरा वॉचमन दिसे. त्याच्याकडून काही माहिती मिळत नसे. घरे विकत घेतलेले आमच्याचसारखे लोक भेटत. पार्ल्याच्या कार्यालयात, "साहेब नाहीत" हेच ऐकायला मिळे. तिथल्या लोकांशी बोलून काहीच कळत नव्हते.
काय करावे अन कुठे जावे तेही सुचेना. एव्हाना ताबा घेण्याची तारीखही उलटून गेली होती.
शेवटी मंत्रालयातल्या नेहमीच्या कामाने युक्ती सुचवली. ज्याप्रमाणे लोक मंत्रालयात पत्रे घेऊन येतात आणि पोच घेऊन जातात, त्याप्रमाणे मी पत्र लिहायला सुरुवात केली. तिथे भेटायला गेले की पत्र देऊन पोच घ्यायची. अशी सहा महिन्यांत सहा पत्रे झाली. उत्तर तर एकाचेही नाही.
सातव्या महिन्यात, "साहेब इथे नसतात, त्यांची आई काम पहाते आणि त्या अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत" असे तिथल्या लिपिकाकडून कळले. तशीच मी पुढच्या आठवड्यातली सकाळी नऊ वाजताची अपॉइंटमेंट मिळवली.
ठरलेल्या दिवशी ऑफिसमध्ये थोडे उशिरा येण्याची परवानगी घेऊन सकाळी पावणेनऊ वाजता हजर झाले, तर त्या लिपिकाने सांगितले की "मॅडमना इमर्जन्सी मीटिंगला जावे लागले असल्याने त्या आज भेटू शकणार नाहीत." माझ्या उत्साहाचे रागात रूपांतर झाले. पण आता काय करायला हवे, याचा विचार शांत डोक्यानेच करायला हवा होता.
ऑफिसला जायचे असल्याने माझ्याकडे डबा होता. ट्रेनमध्ये वाचण्यासाठी पुस्तकही होतेच. म्हटले, "ठीक आहे, मलाही इमर्जन्सी आहे. तेव्हा मी काही त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही. कितीही वेळ लागू देत."
आता तो लिपिक - त्याचे नाव करमरकर असे होते - जरा हादरला आणि म्हणाला, "पण त्या संध्याकाळी येणार आहेत."
"हरकत नाही. तुझं काम कितीला संपतं? म्हणजे ऑफिस कितीला बंद होतं? "मी.
"सहा वाजता", करमरकर.
"ठीक आहे. माझ्याकडे माझा डबा आहे. चहा-कॉफी तर तुम्ही द्यालच. संध्याकाळी तुमची वेळ झाली की तुम्ही ऑफिस बंद करून, बाहेरून कुलूप लावून निघून जा." मी.
"आणि तुम्ही?" करमरकर आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
"मी इथेच बसणार. मी कुठे गेलेय ते माझ्या नवऱ्याला माहीत आहे. तो पोलिसांना घेऊन येईल इथे आणि मग
तुमचं काय होईल ते मी सांगू शकत नाही." मी.
"माझं काय होणार?" करमरकर, पण आवाज थरथरलेला.
"तुम्ही मला किडनॅप केलंत असा आरोप तुमच्यावर येईल. तुमच्यावर म्हणजे परांजपे बिल्डर्सवर. पण तुमचे साहेब इथे नाहीत आणि दार बंद करून कुलूप तुम्ही लावणार. म्हणून मी म्हटलं की काय होणार ते माहीत नाही." मी आता शांतपणे त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसून पुस्तक वाचायला सुरुवात केली.
एव्हाना कामगार, कंत्राटदार यांची वर्दळ चालू झाली. करमरकर तासभर, त्यांना पैसे देणे, पावत्या घेणे, दिलेल्या/घेतलेल्या पैशांच्या नोंदी ठेवणे अशा कामात गढला. मध्ये चहा आला. त्याने मलाही ऑफर केला, पण मी चहा पीत नाही, त्यामुळे मी तो नाकारला.
थोड्या वेळाने तो थोडा मोकळा झाला. पुन्हा आम्ही दोघेच. तो बोलायला लागला. "पण तुम्ही माझ्यावर कसा असा आरोप करू शकता?" वयानेही तसा लहानच होता ,विशीचा असेल. मला एक बाजूला त्याची कणव वाटत होती, पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.
मला फक्त माझा निरोप त्याने मालकिणीला पोहोचवायला हवा होता.
"मी कुठे करतेय? मी इथून हलले तरी आहे का? आणि हलणारही नाही. तू ऑफिस तर उघडं टाकून जाऊ शकत नाहीस मला इथे ठेवून. तर जे काही करायचं ते माझा नवरा करेल, कारण मला आतापर्यंत ऑफिसला पोहोचायला हवं होतं आणि आता जर मी पोहोचले नाही किंवा त्याला मी कुठे आहे हे कळलं नाही तर तो इथे येण्यासाठी पोलिसांची मदत घेईल. तो कशी तक्रार करेल हे मला इथे बसून कळेल का? चल, साडेबारा वाजले. मी डबा खाते." मी सविस्तर उत्तर दिले. पुस्तक मिटून ठेवले.
एक दरवाजाचे कुलूप उघडून तो आत गेला. फोनची डायल फिरवण्याचा आवाज येऊ लागला. मी त्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिले. आतून त्याचा काकुळतीने भरलेला आवाज येत होता, "नाही, नाही,.......तुम्ही माझं ऐका....... इथं या आधी,..... ती बाई अजिबात ऐकत नाहीये..... नाही, नाही... मी जेवायला जाईन तो परत येणारच नाही." आणि त्याने फोन ठेवण्याचा आवाज आला, तशी मी परत खुर्ची गाठली.
परत येतानाच खिडकीतून समोरच्या बिल्डिंगचा जिना दिसला. त्या जिन्यातून या महान बिल्डरची महान आई उतरताना दिसली. आधी एकदा पैसे भरायला गेले असताना तिला पाहिले होते. करमरकरला मी म्हटले, "काय रे, खोटं सांगितलंस ना?''
"मी काय करणार? मालकांचा आदेश. माफ करा मला." तो कानाची पाळी पकडत म्हणाला.
मनात विचार केला, बिचारा भाकरीशी इमान राखतोय. आपले काम तर झालेय, आता याला त्रास कशाला द्या?
इतक्यात बाई आत आली. ही बाई त्या परांजपे बिल्डर्सच्या श्री. बाबूराव परांजप्यांची सून. त्यांनी मराठी माणसांसाठी विजयनगरसारख्या, परांजपे स्कीम १ व २ यासारख्या वसाहती परवडतील अशा भावात उभारलेल्या, आणि ही बाई मुलाचे कान न धरता त्या मुलाला खोटे बोलून साथ देतेय. अशी चीड आली होती ना! काय सांगू? पण मी शंभर आकडे मोजायला सुरुवात केली.
बाई आतल्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसली. करमरकरला आत बोलावून तासला आणि मग मला आत पाठवून द्यायला सांगितले. करमरकर बिचारा मान घाली घालून आला.
मी एव्हाना पन्नासपर्यंत आकडे मोजले होतेच. "या ना, बसा." बाई.
"चहा घेणार की कॉफी?'"पुढचा प्रश्न.
मी म्हटलं ,''चहा किंवा कॉफीची ही वेळ नाही, तेव्हा काही नको. मी सरळ मुद्द्यावरच येते."
बाईचा चेहरा थोडा उतरला, पण तिनेच गोड आवाजात सुरुवात केली. "काय झालंय, ते मला करमरकरने सांगितलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते, पण तुम्हाला तर माहीत आहे, त्या प्रोजेक्टला वेळ लागतोय ना, तो सरकारी लोकांमुळे."
"का बरं? काय झालंय? कशामुळे काय अडलंय?''मीही गोड आवाजात बोलायला सुरुवात केली.
"मंत्रालयात हो! सगळ्या परवानग्या अजून मिळालेल्या नाहीत.
नगरविकास विभागात फाईल अडकल्या आहेत.'' बाई. तिला हे माहीतच नव्हते की, मी मंत्रालयातच काम करते.
"का बरं? काय झालंय?'मी.
"दुसरं काय होणार हो? अव्वाच्या सव्वा पैसे मागितले आहेत. तुम्हाला तर माहीत आहेच, आम्ही किती कमी पैशात घरं विकतो. कुठून देणार पैसे?" बाई.
"पण तुम्ही काळ्या बाजाराचे पैसे घेता, मीच अठरा हजार दिलेत, मग तर तुमच्याकडे चारशे घरांचे किती पैसे जमा झाले असतील, त्यातले देऊ शकता, कारण ते पैसे आमचे आहेत आणि आम्हाला घराची गरज आहे, म्हणून ते तुम्हाला मिळाले आहेत." मी.
यावर काय बोलायचे तिला सुचेना. ती काही बोलायच्या आतच मी पुन्हा आक्रमण करायला सुरुवात केली.
"तुम्ही असं करा,'' मी माझ्या पर्समधून शासन दैनंदिनी काढली. काढताना तिचे कव्हर बाईला दिसेल अशी काढली आणि म्हटले, "मला केसेसचे नंबर्स द्या, मी तुमच्या सर्व केसेस एकही पैसा खर्च न करता काढून देईन. तुम्ही फक्त इतकंच करा, मी पैसे भरलेला फ्लॅट मला लवकर पूर्ण करून द्या. कारण मलासुद्धा घरमालक त्रास देत आहे, प्रत्येक वर्षी भाडे वाढवीत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते गुजराती असल्याने मला, 'त्या खोलीत नॉन व्हेज करायचे नाही' ही अट त्यांनी घातली आहे. आणि मी तर पक्की मासेखाऊ आहे. सांगा मला नंबर्स." तिच्या टेबलावरचे पेन उचलत मी सविस्तर उत्तर दिले. दैनंदिनी काढताना, कव्हर दिसल्यावरच बाई चपापाली होतीच. एव्हाना तिचा चेहरा पूर्ण पडायच्या बेताला आला होता.
पण तरीही तिने विचारले, "तुम्ही मोठ्या पोस्टवर काम करता का गव्हर्नमेंटमध्ये?"
"नाही हो, मी बिल अकाउंटंट आहे, पण मंत्री आस्थापना शाखेत काम करते. या शाखेत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातला कर्मचारिवर्ग यांच्या वेतनसंबंधीची सर्व प्रकारची देयकं केली जातात, त्यामुळे सगळ्यांशी ओळखी आहेत," मी असे सविस्तर सांगितल्यावर बाईचा चेहरा पडलाच.
तरीही, 'पडली तरीही नाक वरच' ठेवून तिने स्वतःला सावरले आणि ती म्हणाली, "अरे वा! तुम्ही तर आम्हाला खूपच मदत करू शकाल."
"मग द्या तर नंबर्स, देता ना?" मीही बेअरिंग सोडले नाही.
"अहो, असे कसे देता येतील नंबर्स? मला बाकीच्यांशी बोलावं लागेल ना?
तुम्ही असं करा, मला थोडा वेळ द्या. सोमवारी सकाळी नऊ वाजता या. त्या दिवशी मी तुम्हाला काय ते नक्की सांगते." बाई.
त्या दिवशी गुरुवार होता. म्हणजे चार दिवसांनी ही बाई मला बोलावत होती. "अहो, आजच तुम्ही माझे साडेतीन तास वाया घालवले आहेत. पण तरीही ठीक आहे. पण त्या दिवशी तुम्ही मला माझं फायनल उत्तर लेखी द्यायला हवं, हे लक्षात घ्यायला विसरू नका." मी बेअरिंग सोडत आवाज वाढवला.
"लेssखी?ssss"बाईचा आवाज चिरकलाच.
"हो, लेखीच. कारण गेले सहा महिने मी तुम्हाला लेखी पत्रे दिली आहेत, या पाहा त्याच्या पोचपावत्या. त्यातला एका पत्रालाही तुमच्याकडून उत्तर आलेलं नाही.''
"मला यातलं काहीच माहीत नाही, म्हणजे लेखी पत्रव्यवहाराबद्दल, मी पाहते आता तेही" बाई गडबडून म्हणाली.
"ठीक आहे, सोमवारी येताना मी पोलिसांना फसवणुकीबद्दल कल्पना देऊनच येईन, हे सांगून ठेवते. दुसरं म्हणजे आता ही वेळ तुम्ही स्वतः मला देताय, त्या दिवशी तुम्ही इथे वेळेवर हजर नसाल तर मी थांबणार नाही हेही लक्षात ठेवा." मी ठासून सांगत पुन्हा एक समरणपत्र तिच्यासमोर ठेवले, प्रतीवर तिचीच सही घेतली.
बाहेरच्या खोलीत करमरकर होताच. त्याला म्हटले, "शहाणा असशील तर सोमवारी येऊ नकोस. आलास तरी दहा वाजता ये."
कारण तो येऊन त्याने ऑफिस उघडले नसते आणि बाई स्वतः येऊन ऑफिसात थांबली, तर काहीतरी पॉझिटिव्ह घडेल,अशी आशा होती.
तिथून निघून मी ऑफिसमध्ये आले. नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती काढली, तर बाई खोटे बोलत होती हे स्पष्ट झाले. मग त्यांच्या पीएना सर्व केस सांगितली. ते वैतागले आणि त्यांनी स्वतःहूनच, पीएसच्या कानावर ही घटना घातली. तेसुद्धा वैतागले. ''बाई, तुम्ही सोमवारी गेलात की तिथे काय घडतंय ते मला फोन करून सांगा आणि विलेपार्ले पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर मी तिथे फोन करतो" असे सांगितले. 'ठीक आहे, बाई जातेय कुठे? सोमवारी पाहू या.' हा विचार करून मीही रिलॅक्स झाले.
सोमवारी, मी सकाळी नऊला पाच मिनिटे असताना पार्ल्याच्या परांजपे बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये आले, तर ऑफिस उघडून बाई तिथे बसलेली. करमरकरचा पत्ता नव्हता, हे पाहून मी खूश झाले. आतल्या खोलीत जाताच बाईने तोंडभर हसून माझे स्वागत केले. "या, या, बसा."
मी बसत म्हटले, "बोला, काय म्हणता? माझी सीएल गेली त्या दिवशी, आज मला लवकर मोकळं करा."
बाईने माझ्यासमोर चाव्या टाकत म्हटले, "अहो, मी तुम्हाला घराच्या चाव्या देतेय, कॉफी तरी घ्या, तोंड गोड करा."
मला इतके आश्चर्य वाटले, कारण रविवारी आम्ही विरारच्या साइटवर जाऊन आलो होतो, काम तर अर्धवटच होते. तरी ही बाई चाव्या कशाच्या देतेय? जिथे भिंती नाहीत, दरवाजाही नाही, तिथे कसले कुलूप न कशाच्या चाव्या? मी फक्त चाव्यांकडे पाहतच बसले.
तसा बाईचा आवाज आला, "नाही, नाही, या तुमच्या घराच्या चाव्या नाहीत. आमची विरारला आणखी एक साइट आहे. सप्तर्षी सोसायटी, स्टेशनपासून जवळ आहे अगदी. प्रॉब्लेम इतकाच आहे की, तिथे सगळे फ्लॅट टू रूम किचनचे आहेत. तर तुम्ही असं करा, तुमचा फ्लॅट तयार होईपर्यंत इथे राहा. आता मला पाच हजार रुपये जास्त जागेपोटी आणि पाच हजार रुपये मेंटेनन्सपोटी द्या आणि ह्या चाव्या घेऊन पझेशन घ्या. बघा, सोडवला की नाही तुमचा प्रॉब्लेम? ह्याss ह्या ss ह्या."
एव्हाना मला इतकेच समजले होते की ही बाई खोटरडी आणि लबाड आहे आणि आपल्याकडून जास्त पैसे काढतेय. मला संतापच आला. मी म्हटले, ''तुम्ही माझा प्रॉब्लेम सोडवताय की तुमचा प्रॉब्लेम सोडवताय? माझा सोडवत असाल तर मी तुम्हाला पैसे दिले आहेत त्या बदल्यात तुम्ही मला घर देताय, आता तुमच्याकडे वन रूम किचन असता तर तुम्ही तोच मला दिला असता, पण आता तुमच्याकडे वन रुम किचनच्याऐवजी टू रूम किचन असल्यामुळे तुम्ही मला देताय आणि माझ्याकडेच पैसेही मागताय?" माझा आवाज चढलेलाच होता.
बाई प्रॉब्लेम सोडवण्याच्या इतकी घाईत होती की, तिने म्हटले, "तुमचा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही मेंटेनन्सचे पाच हजार द्या आणि पझेशन घ्या. तुम्ही जर त्या फ्लॅटचे काही नुकसान केलेत तर आम्हाला दुरुस्ती करावी लागेल, त्यासाठी."
"अजिबात नाही. मी तुम्हाला पैसे दिले आहेत, त्या फ्लॅटचाच मला ताबा द्या. तुम्ही जर हा फ्लॅट मला देत असाल, तर मी एकही पैसा देणार नाही. आणि मी पोलिसांकडे जातेय. येईलच तुम्हाला बोलावणं. तुम्ही माझ्याशी परवासुद्धा खोटं बोलला आहात आणि नगरविकास मंत्री कार्यालयात ते समजलं आहे, तिथूनही फोन येईलच पोलिसांना."असे म्हणत मी उठलेच.
बाई गडबडीने चाव्या हातात घेऊन खुर्चीवरून उठून माझ्यापर्यंत आली आणि माझा हात पकडत जबरदस्तीने माझ्या हातात चाव्या ठेवत म्हणाली, "बरं, बरं, पैसे नका देऊ, पण चाव्या तर घ्याल की नाही? तुम्ही माझ्या मुलींसारख्या आहात, रागावू नका अशा."
"गप्प बसा. माझी आई तुमच्या जागी असती, तर तिने आपल्या फसवणूक करणाऱ्या मुलाला पट्ट्याने फोडून काढलं असतं. खोटं बोलला म्हणून तिने माझ्या भावाच्या जिभेला उदबत्तीचा चटका दिला होता, तेही लहान असताना."मी आणखीनच संतापून बोलले.
तशा त्या गप्प उभ्या राहिल्या. अजूनही माझा हात त्यांच्या हातात होताच. त्या हलकेच म्हणाल्या, "मला माफ करा, पण या चाव्या घ्या आणि पझेशनपण घ्या."
त्या चाव्या घेऊन मी बाहे पडले. समोर करमरकर येत होता, तो माझ्याकडे पाहून हसला.
तशीच ऑफिसमध्ये येऊन नवऱ्याला चाव्या दाखवल्या. तोही चकित झाला. त्याला सगळे सांगून म्हटले, "तू हाफ डे टाक. आपण जाऊन काय प्रकार आहे ते पाहू या."
तसेच विरारला आलो. स्टेशनपासून सप्तर्षीं सोसायटीत खरेच पाच मिनिटांत पोहोचता येत होते. वाटेत एका दुकानात कुलूप घेतले. सातपैकी एका बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट होता. वॉचमनला सूचना होत्या. त्याने आम्हाला तो दाखवला. दार उघडून आत आलो. दाराला उंबरठा नव्हता. पण आतली सर्व कामे झालेली दिसत होती. कशालाही हात न लावता आम्ही तो फ्लॅट फिरून पाहिला. नळ वगैरे वॉचमनने उघडून दाखवले. पाणी होते. येत्या शनिवारी थोडे सामान घेऊन येऊ या, असे ठरवून निघालो. आता आम्ही आमचे कुलूप लावून निघालो. तात्पुरता तह झाला होता, असे वाटून हायसे झाले.
शनिवारी एक बादली, झाडू, साबण अशा जरुरीच्या वस्तू घेऊन आलो. मी खाली बसून पिशवीतल्या वस्तू काढत असतानाच, 'धाड.....खळाळ.... खळधडाम' असा आवाज आला. वर पाहते तर काय? समोरच्या स्लायडिंग विंडोचा एक आयताकृती चौकोन आकाश दाखवत होता. वाकून खाली पाहणारा नवरा मला दिसलाच नाही एक क्षण. मी किंकाळीच फोडली. वाकलेला नवरा घाईघाईने सरळ होत म्हणाला, "अगं घाबरू नकोस, मी आहे. पण ही काच गेली खाली फ्रेमसकट." हुश्श झाले.
आणलेले सामान वॉचमनला सांगून, आतल्या खोलीत ठेवून, आम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये फोन केला. करमरकरने फोन घेतला. सगळे ऐकल्यावर तो म्हणाला, "मी उद्या माणूस पाठवतो, तुम्ही काम करून घ्या."
दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो, तो माणूस येऊन काम करत होता. आतल्या खोलीत पाहिले, तर चटईच्या चिंध्या झालेल्या, झाडूच्या काड्या उरलेल्या, बादलीला क्रिकेटच्या बॉलइतके दंतुर भोक पडलेले, आतमध्ये साबणाचा थोडासा कीस पडलेला, असे दृश्य दिसले. वॉचमनला विचारले, तर म्हणाला,' 'उंदीर. इथे पूर्वी शेतजमिनी होत्या, त्यामुळे इथे खूप मोठे उंदीर आहेत. उंबरठा नसत्याने ते आत येतात. भुकेले उंदीर काहीही खातात."
तात्पुरता तह मोडलाच होता. मुकाट्याने कुलूप बदलून परत आलो. पुन्हा एक खलिता लिहिला आणि त्यात सगळा आधीचाच मजकूर लिहून पुढच्या घडामोडी लिहून चाव्या परत घेऊन पैसे परत देण्याची मागणी केली. पण करमरकर चाव्या घ्यायला तयार होईना. मग तशी नोंद करून पत्र दिले.
आता आणखी काय करता येईल याची चाचपणी करताना कुणीतरी भाई ठाकुरांना भेटा असे सुचवले. त्यांचा भाचा संजय हा माझ्या दिराचा मित्र होता. तो बरेचदा आमच्या घरी येऊन, माझ्या हातचे जेवून गेलेला. त्याला भेटून चौकशी केली असता तो मला त्यांच्याकडे घेऊन जायला तयार झाला.
पण असे वैयक्तिक पातळीवर समाधान नको होते. जे काही होईल, त्यामुळे हेमंत परांजपेला मोठा आर्थिक चिमटा बसायला हवा होता, त्यामुळे हा मार्ग इतक्यात नको असे ठरवले.
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ला अंमलात आला होता. न्यायालये सुरूही झाली होती. पण अजून घरबांधणीचा समावेश त्यात झाला नव्हता. त्या वेळी ग्राहक संरक्षण विभाग हा शिधावाटप विभाग, मंत्रालयाच्या अखत्यारीत होता, तिथे चौकशी केली असता, या कायद्यात घरबांधणीचा समावेश लवकरच करण्यात येणार आहे, पण मुंबईच्या बिल्डर लॉबीचा तगडा विरोध असल्याने उशीर होतो आहे, हे समजले.
पार्ल्यालाच कूपर हॉस्पिटलच्या मागे ग्राहक पंचायतीचे कार्यालय आहे. या कार्यालयात जाऊन ग्राहक चळवळीत काम करणारे खंदे कार्यकर्ते श्री विवेक पंडितांना भेटलो आणि सर्व हकीकत सांगितली असता ते म्हणाले, "घरबांधणीचा समावेश या कायद्यात होणारच, आम्हीसुद्ध प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला कळेलच. तुम्ही सगळं लेखी करताय हे छान झालं. पण तुम्हला चालणार असेल तर मी हेमंतशी बोलून तुमची एक मीटिंग ठरवतो. इथेच बोलावतो, पाहू काय होतं ते."
'मरता क्या नही करता।'या उक्तीनुसार आम्ही दोघानी एकमेकांकडे बघत मान डोलावली. जवळजवळ दोन महिने यात गेले आणि एक दिवस श्री पंडितांचा फोन आला, "आज सात वाजता मीटिंग आहे."
आम्ही वेळेवर पोहोचलो. ऑफिसमध्ये स्टाफ नव्हता. हे दोघे बोलत बसले होते. आम्ही गेल्यावर मी पत्र हेमंतपुढे केले, त्याने पंडितांकडे पाहिले, त्यांनी मन डोलावली तशी त्याने माझ्या प्रतीवर केली. मी साक्षीदार म्हणून पंडितांचीही सही घेतली.
हेमांतने बोलायला सुरुवात केली, "हे बघ विवेक, तू यात पडलास म्हणून मी इथे आलोय. मी यांना दोन टक्क्याने पैसे द्यायला तयार आहे."
आमच्याकडे दुर्लक्ष करून तो इतक्या आढ्यतेने बोलत होता की डोक्यातच गेला, पण तरीही मी पंडितांना म्हटले, "मला हे बिलकुल मान्य नाही. जेव्हा हे हप्ता मागण्यासाठी पत्र लिहायचे, तेव्हा दिलेल्या तारखेच्या आधी पैसे दिले नाहीत तर १५ टक्के दंड आकारण्यात येईल अशी ताकीद असे. मग आता दोन टक्के कोणत्या गणिताच्या आधारे देणार आहे?"
"मी गणित बिणित जाणत नाही." हेमंत.
"मला वाटलंच, नाहीतर तुम्ही असले आतबट्ट्याचे व्यवहार केलेच नसते." मीसुद्धा ठेवून दिला.
तसा तो उठलाच.
"पंडितसाहेब, हा माणूस पळपुटा आहे. अजून आईच्या पदराखाली लपतो. त्याच्या ऑफिसात भेटत नाही, तर इथे काय थांबणार? पण मला चाव्या द्यायच्या होत्या." मी पाठीवर वार केला.
त्यावर ते म्हणाले, ''खूप स्पष्ट बोलता तुम्ही. ग्राहकाने असंच खंबीर असायला हवं आणि चाव्या तुमच्याकडेच राहू देत, देऊ नका. संपर्कात राहा. तुम्हाला समजेल कधी घरबांधणीचा समावेश होतोय ते."
मग मध्ये मध्ये विरारला जाऊन येत होतो. पण तिथे काहीच प्रगती नव्हती. कामगार दिसेनासे झाले. आमच्यासारखे घरे बुक केलेले लोक भेटत. त्यांचा संपर्क झाल्यावर त्यांच्याशी बोलणे होई. सगळे ऑफिसात आणि साइटवर फेऱ्या मारत, पण त्यांना कोणी भेटत नसत. कोणी लेखी पत्रव्यवहार मात्र करत नसे. मला दुसऱ्या फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या हे समजल्यावरही कोणाला लेखी पत्रव्यवहार करावासा वाटत नव्हता. आणि पत्रव्यवहार कोणाशी करणार? ऑफिसही बंदच असे. पण मी रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठवून द्यायची. मालक सापडत नाही असा पोस्टाचा शेरा घेऊन ते पत्र परत येई.
मग आमचे एक शेजारी लेलेकाका म्हणाले, "मी हेमंतचा मोठ्या भावाला - जयंतला ओळखतो. त्याच्याशी बोलतो आणि तुमची भेट ठरवतो. तुम्ही त्याला भेटा आणि बोला. बघा काही मार्ग निघतो का तर?" लेलेकाका तत्कालीन राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभाग यांचे पी.एस. होते.
त्यांनी भेट ठरवली. त्याप्रमाणे जयंत परंजपेंना भेटलो. त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि आधीच स्पष्ट केले. "माझे आणि हेमंतचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला तुमचे पैसे देणार नाही, पण मिळवून द्यायचा प्रयत्न करेन. तो परांजपे बिल्डर्सचं काम पाहतो आणि माझ्या कंपनीचं नाव परांजपे कन्स्ट्रक्शन्स आहे. मी त्याला तुम्हला भेटायला सांगतो. तो तुम्हाला भेटायला बोलावेल तेव्हा तुम्ही जा. बोलून प्रश्न सोडवा." संपली मीटिंग, कारण या आज्ञार्थी बोलण्यावर बोलायचे काय?
एव्हाना १९९१ संपायला आले होते आणि घरबांधणीचा समावेश ग्राहक संरक्षण कायद्यात होणार हे नक्की झाले होते, पण कधी ते कळत नव्हते.
आणखी चार दिवसांनी हेमंतकडून फोन आला. आम्ही दोघे भेटायला गेलो. तिथे आणखी एक जण होता, त्याने हेमंतचा पार्टनर रमेश देसाई अशी स्वतःच स्वतःची ओळख करून दिली.
हेमंतने सुरुवात केली, "मी चार टक्क्याने पैसे देईन. जास्तीत जास्त सहा. त्यावर मी एक पैसाही देणार नाही. तुम्हाला काय वाटतं? जरी तुम्ही केस केलीत तरी आमचं कोणीही, काहीही वाकडं करू शकत नाही. आम्ही सगळ्यांना मॅनेज करू शकतो. आणि केसमध्ये आमचा वकील बोलणार, तुमचा वकील बोलणार, उगीच वेळ आणि पैसे जाणार. त्यापेक्षा पैसे घेऊन मोकळे व्हा."हे दोन्ही भाऊ फक्त आज्ञार्थीच बोलत.
"याआधी आमचा खूप वेळ आणि पैसा गेलाय.आणखी थोडा जाईल. पण कोर्टातून जे होईल ते मला मान्य असेल, कारण ते तुला धडा शिकवायला पुरेसं असेल."मी.
हेमंत रागाने म्हणाला, "उगाच हुशारी करू नका. माझी माणसं इतके तुकडे करतील की, घरचे लोक तुमचे तुकडे मुंबईभर शोधत फिरतील."
"ह***रा, तुला माणसं लागतील आमचे तुकडे करायला, पण मी इथेच तुझे तुकडे करू शकते. मला हलक्यात घेऊ नकोस, टायकलवाडीचं बाळकडू प्यायलेय मी." झटक्यात त्याच्या टेबलावरचा पेपरनाईफ उचलून, टेबलावरून वाकत त्याच्या पोटाला टेकवला होता मी.
नवऱ्याने माझा डावा हात धरून मागे ओढलं, म्हणाला, "याला मारून तुला तुरुंगात जायचंय का? याची शिक्षा ही नाही."
हेमंत तर सुन्नच झाला होता. मी माझी तर्जनी त्याच्यावर रोखत इशारा दिला, "तू मरेपर्यंत रात्री झोपताना सावंतबाईला एकतरी शिवी दिल्याशिवाय झोपणार नाहीस, याची मी पुरेपूर काळजी घेईन.''
आणि माझ्या नवऱ्याने त्याला दुजोरा दिला, "आणि हे असंच घडेल याची मी तुला खातरी देतो." आणि आम्ही तिथून निघालो. पत्रांचा सिलसिला चालूच होता.
आणि तो सुदिन उगवला. जानेवारी ९२ला घरबांधणी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आली. मी हेमंत परांजपेला धडा शिकवायला सिद्ध झाले.
नव्या उत्साहाने मी ग्राहक पंचायतीच्या कार्यालयात गेले. श्री. पंडितांनी आमचे स्वागत करून अभिनंदन केले. म्हणाले, "तुमच्याकडे त्या प्रोजेक्टमधल्या काही लोकांचे संपर्क क्रमांक असतील, तर त्यांच्याशी बोलून घ्या. दहा जण एकत्र झाले तर ग्राहक पंचायत केस लढवील."
माझ्याकडे ५०-६० लोकांचे नंबर्स होते. पण एकत्र होऊन लढले तर ते मराठी कसले! एकूण चारशे लोकांची सोसायटी होती. एकूण चारशेंपैकी सगळे मराठी. पण त्यातले हे जे ५०-६० माझ्या संपर्कात होते, त्यांनी निरनिराळी कारणे द्यायला सुरुवात केली. "आपले पैसे त्याच्याकडे अडकले आहेत, घराचं बांधकाम निकृष्ट केलं तर काय करायचं?" एकाने विचारलं,काहीजण धमक्यांना घाबरले,काही वेळ बरबाद होतो, सांगायला लागले. शेवटी मी पुन्हा पंडितांना भेटले. त्यांना म्हटले, "कोणी येवो न येवो, मला केस करायचीय."
पंडित म्हणाले, "मराठी माणसं एकीचं बळ कधी समजणार?"
"पुढे काय करायचं?"मी विचारले.
''आता तुमची केस तुम्हालाच लढवावी लागेल." त्यांनी सांगितलं.
" ठीक आहे," मला वकिलांचे नंबर्स मिळतील का?''
"अहो, वकील कशाला? तुम्हीच लढवा की तुमची केस." ते.
"मी? मी कायद्याची पदवीधर नाही आणि माझ्याकडे सनदही नाही."
"त्याची काही गरज नाही. ग्राहक कोर्टात केस चालवायला सनद किंवा कायद्याची पदवी आवश्यक नाही. हा फ्लॅट तुमच्या नावावर आहे, तेव्हा बाजू मांडण्याचा पहिला हक्क तुमचाच आहे. तुम्हाला जमणार नसेल तर कोणालाही मुखत्यारपत्र देऊ शकता. त्याच्याकडेही कायद्याची पदवी किंवा सनद असणं गरजेचं नाही." सविस्तर मार्गदर्शन केल्यावर त्यांनी मला श्री दामले यांच्याकडे पाठवलं.
दामलेंनी मला तक्रार कशी करायची त्याचे नमुनापत्र दिले. त्यात वस्तूची किंमत किती? ती घेताना कोणती माहिती दिली? वस्तूची डिलीव्हरी कधी घेतली? वस्तूचा वापर केल्यावर काय अडचणी आल्या? वस्तूमध्ये काय कमतरता आहे? आता मागणी काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न होते. त्याचप्रमाणे आपल्या तक्रारीसंदर्भात कोणते कागदपत्र केसला लावले आहेत? त्यांचे क्रमांक नमूद करायचे होते. शिवाय हे सारे चार संचात द्यायचे होते.
कागदपत्र तर तयारच होते. करारपत्र, पैसे भरल्याच्या पावत्या, मी दिलेल्या पत्रांच्या प्रती, सगळे घेऊन नवऱ्याच्या मदतीने मी सगळे कागदपत्र तयार करून दामलेंना दाखवले. त्यांनी सगळे नीट काळजीपूर्वक पाहून म्हटले, "छान व्यवस्थित झालंय, आता याच्या चार प्रती काढून, व्ही.टी.च्या समोर हजारीमल सोमाणी कॉलेजमध्ये ग्राहक न्यायालय आहे. तिथे असिस्टंट रजिस्ट्रार लाड आहेत, त्यांच्याकडे नेऊन द्या, पोचपावती घेणं तुम्हाला माहीत आहेच."
एक संच १०४ पानांचा होता, असे चार संच घेऊन मी तिकडे गेले. हे कॉलेज म्हणजे महाराष्ट्रात नेमणूक झालेल्या आय ए एस अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर आहे आणि ते सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. तिथे काही ओळखीचे लोक होते. त्यांना विचारून मी असिस्टंट रजिस्ट्रारची केबिन शोधून काढली.
त्यांनी पहिले पान वाचून, "अरे वा! मराठी लोकसुद्धा जागरूक व्हायला लागले" म्हणत मला पोच दिली. म्हणाले, "तशी तर दुसऱ्या पार्टीला नोटीस सर्व्ह व्हायला एका महिन्याचा अवधी असतो, पण हे ऑफिस नवं, स्टाफसाठी कामाची पद्धत नवी, तर त्यामुळे त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो."
आता नोटीस सर्व्ह झाल्याशिवाय काहीच होणार नव्हते. एक महिना झाला, दोन महिने झाले, तीन महिने झाले तरी मला नोटीस सर्व्ह झाल्याचे पत्र येईना. मी लाडांच्या ऑफिसात जाऊन त्यांची भेट घेतली. माझ्याकडचे कागदपत्र आणि त्यांच्याकडचे रजिस्टर पाहून नोटीस सर्व्ह झाली नसल्याचे कबूल केले. मग पेपर शोधत म्हणाले, "त्याचं काय झालं मॅडम, अजून आमचं सामान लागतंय. तुमचे पेपर कुठेतरी मिस्प्लेस झाले आहेत. तुम्ही दोन दिवसांनी या. मी बघतो काय ते.''
"बरं" म्हणून मी निघाले, तर बाहेर त्यांचे शिपाई भेटले. ते डिपार्टमेंटचेच असल्याने ओळखीचे होते.
"काय काम काढलं, सावंतमॅडम?'' त्यांनी चौकशी केली.
सगळं ऐकल्यावर म्हणाले, "बिल्डरची केस? कागद हरवले म्हणाला का?"
मी चमकलेेच. मग कळलं हा माणूस बिल्डरशी संधान बांधून, याच पद्धतीने काम करतो.
"मला दोन दिवसांनी या, म्हणालाय, मग बघा गम्मत'' माझा राग बोलला.
दुसऱ्या दिवशी करमरकरला फोन केला, तर त्याच्याकडून बातमी कन्फर्म झाली. तोच पाकीट घेऊन येत होता.
दोन दिवसांनी गेल्यावर लाड म्हणाला, ''बाई, तुमचे पेपर अजून मिळाले नाहीत. तुम्ही दोन दिवसांनी या."
"असे मला तुम्ही दोन दिवसांनी या म्हणत किती वेळा बोलावणार? शंभर वेळा आले तरी हरवलेले पेपर मिळालेच नाहीत, नंतर तुम्ही काय करणार?''मी शांतपणे विचारलं.
''नंतर तुम्हाला परत चार प्रती द्याव्या लागतील. कारण पेपर नाही सापडले तर आम्ही तरी कसं काय काम करणार? ह्याsssह्याsss ह्या sss" निर्लज्जपणे हसत तो बोलला.
"हे बघा, एक संच १०४ पानांचा. त्याच्या चार प्रतींचा खर्च येईल ४१६ रुपये. त्याचा भुर्दंड मला का? पेपर हरवले ही तुमच्या ऑफिसची चूक आहे. मी माझी कॉपी देते, तुमच्या ऑफिसमध्ये झेरॉक्स मधीन आहे, तुम्ही चारच काय आठ प्रती काढून घ्या. म्हणजे दुसऱ्या चार हरवलात तरी उरलेल्या चारवर काम करू शकाल." मी ऐकणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शिपायाला बोलवून मला झेरॉक्स मशीन असलेल्या ठिकाणी न्यायला सांगितले. जाताना म्हणाला,"काय करणार? सरकारी कर्मचारी आहेत, मदत करायलाच हवी."
""छे! छे! तुम्ही मदत नका करू, फक्त तुमचं काम इमानीपणे करा, म्हणजे झालं.'' फटकारलं सरळ त्याला.
झेरॉक्स मशीनवरचा माणूस कॉपी काढायला लागला, तर त्याने संचाच्या पहिल्या कागदावर लाडने दिलेेल्या आधीच्या पोचवर कागद ठेवून कॉपी काढायला सुरुवात केली. मी हरकत घेतल्यावर मात्र त्यांनी तसे न करता नीट कॉपी काढल्या.
लाडने त्या पहिल्या आणि तो उडालाच. त्याने शिपायाला विचारले, ''अरे अशा काय काढल्या कॉपीज, जुनी पोच तशीच ठेवून,"
"ते, बाईंनी ऑब्जेक्शन घेतलं ना." शिपाईबुवा साळसूदपणे उत्तरले.
माझ्या मनात 'बरा सापडल्यास आता, बरा सापडलास' वाजायला लागल्याने मला हसू आवरणे कठीण झालेले.
"तुम्ही काय हसताय?"तो माझ्यावरच खेकसला.
"तुमची लबाडी उघड झाली आहे. जर तुम्ही उद्याच्या उद्या नोटीस सर्व्ह केली नाहीत, तर मी तुमची लेखी तक्रार तर करेनच, पण बिल्डचा माणूस साक्षीसाठी उभा करेन. बिल्डरला धडा शिकवण्याआधी तुम्हाला धडा शिकवणं खूपच सोपं आहे त्या मानाने माझ्यासाठी." मी .
"नको, नको. मी आजच नोटीस सर्व्ह करतो. हवं तर तुम्हीही जा खातरि करून घ्यायला. पण बालंट आणू नका माझ्यावर." तो शरणागती पत्करत म्हणाला.
'आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो दोन', तसे मला झाले. नोटिसच लवकर मिळू नये यासाठी पैसे पेरणाऱ्या हेमंतची प्रतिक्रिया काय झाली असती, हेही पाहायला मिळाले असते. तेवढाच मनाला गारवा मिळाला असता.
संध्याकाळी हेमंतच्या ऑफिसात, नोटीस घेऊन जाणाऱ्यासोबत गेलो. नोटीस येणार ही त्याला पूर्वकल्पना दिली असल्याने तो आणि त्याच पार्टनर हजर होते. त्याने सही करून नोटीस घेतली. वाचून म्हणाला, "अठरा टक्के? कोण? मी देणार?'" मग म्हणाला, "बघा ,अजून विचार करा. मी तुम्हाला आठ टक्क्यांनी पैसे देतो. मुकट्याने पैसे घेऊन मोकळे व्हा. कारण आम्ही सर्वांना मॅनेज करू शकतो.''
"आता विचार तूच करायला हवास असं नाही का तुला वाटत? मी तुला जे मागच्या भेटीत सागितलं होतं, ते या कोर्टाच्या निकालाने साध्य होणार आहे. आता मला कोर्टाने दोन टक्क्याने ऑर्डर दिली तरी मला चालेल, कारण मग माझी केस ही परांजपे बिल्डर्स विरुद्ध सेंट्रल पार्क या प्रोजेक्टसाठी टेस्ट केस होईल. आणि मग उरलेले तीनशे नव्व्याण्णव लोक कोर्टात गेले की त्यांना पहिल्या हिअरिंगमध्ये पैसे परत मिळण्याची ऑर्डर मिळेल. गणित शिकायची वेळ आलीय तुला, गणित बिणित मी नाही जाणत असं तूच म्हणाला होतास, तेव्हा हिशेब कर." वाक्यगणिक त्याचा चेहरा उतरत होता. "आणि माझ्याकडे वकिलांना द्यायला लोकांचा ढापलेला पैसा नाही, तेव्हा ही केस मीच चालवणार आहे."
"Overconfident हं" तो तरीही तुच्छतेने म्हणाला.
"नाही रे बाबा. Confident, कारण तिथे जे काय घडलंय तेच सांगायचं आहे." मी आत्मविश्वसाने ठासून सांगितलं. "तेव्हा आता तू गणित आणि शिव्याही शिकायला सुरुवात कर." असे बजावून आम्ही निघालोच.
तर तो म्हणे, "आमची पोच कळली नाही तुम्हाला अजून."
"माझी पोचसुद्धा कळलीच असेल तुला लाडकडून" मीही बजावले आणि निघालोच.
नंतर आम्ही दोघांनी चर्चा करून ठरवले की, यांच्याबरोबर झालेल्या दोन्ही भेटीच्या तपशील प्रतिज्ञापत्र करून कोर्टात सादर करू या. त्याप्रमाणे तेही काम केले.
नोटिसप्रमाणे दोन महिन्यांनी मी तारखेला कोर्टात आले. हे कोर्ट त्रिसदस्यीय बेंचचे होते. निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. लोणारे, निवृत्त पोलीस आयुक्त पी.जी. गवई आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा मिसेस तळकर असे हे तीन सदस्य होते. कोर्ट तसे बाल्यावस्थेतच होते. डायस होता, पण बाजू मांडणारे लोक वकील नसल्याने लोक घरात बोलतात तसेच बसल्या जागी उभे राहून बोलत असत. संध्याकाळी उशिराही काम चालत असे. तिथेच खालच्या बाजूला लाड बसायचा. न्यायमूर्तीनी दिलेल्या आदेशांची नोंद करून पुढची तारीख देत असे. हेमंतच्या बाजूने त्याचा पार्टनर रमेश देसाई आला होता.
माझी केस पुकारल्यावर मी आणि तो उभे राहिलो.आमची ओळख पटवून झाल्यावर, मी केसचे निवेदन केले. न्यायमूर्तीनी देसाईला विचारले, "या बाई जे काय म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे का?"
त्याने 'नाही' म्हटले. इतक्या हळू आवाजात की तीन फुटांवर मलाही ऐकू आले नाही.
पो.आ. गवई आपल्या पोलिसी आवाजात म्हणाले, "मोठ्याने बोलता येत नाही का तुला?''
तसा तो पुन्हा 'नाही' असे म्हणाला.
मिसेस तळकर म्हणाल्या, "कोणी आपली चूक मान्य केली असती, तर आज आपण इथे नसतो."
मग तिघांनी आपसात चर्चा केली, आपापल्या हातातल्या पेपर्सवर काही लिहिले आणि न्यायमूर्तींनी घोषणा केली, "ही केस अ‍ॅडमिट करून घेण्यात आली आहे. यांना पुढची तारीख द्या." लाडने दोन महिन्यांनंतरची तारीख दिली.एक टप्पा पूर्ण झाला होता.
आता नवा खेळ चालू झाला. तारीख देण्याचा. ज्या दिवशीची तारीख असेल, त्या दिवशी सकाळी कोर्टात आले की कोर्ट बसण्याआधीच लाड पुढची तारीख देत असे. म्हणे, "लोणारे साहेबांनी तीन केस ठेवल्यात, आज तुमची केस चालणार नाही." कधी तीन, कधी चार असा फक्त आकडा बदले, पण पुढे सर्व तेच. देसाई तारीख घेऊन हसतमुखाने निघून जाई. मला वाटायचे, हे माकड मला वाकुल्या दाखवत जाते. पण काय करू? नि कसे करू? असे दीड वर्ष निघून गेले. फक्त सात तारखा झाल्या आणि त्याही फक्त कोर्टत हजेरी लावण्यापुरत्याच.
पुढच्या तारखेला कोर्टात आले तर कोर्टात गोंधळाचे वातातवरण. चौकशी केल्यावर समजले की या कोर्टाकडे खूप काम वाढले आहे, तर मुंबईत परळ येथे झंडू बाम कंपनीजवळ आणखी एक कोर्ट चालू झाले होते आणि ते या कोर्टाच्या खालच्या दर्जाचे असून तिथे एक लाखापर्यंतच्या केस चालणार आणि या कोर्टात एक लाखावरच्या केस चालणार आहेत. आता आली का पंचाईत? आज ज्या केसेस तिथे जातील त्या आज दाखल झाल्या असे मानले जाणार आणि ते कोर्ट सुरू झाल्यापासून गेल्या काही कालावधीतील तिथे दाखल झालेल्या केसनंतर इथल्या केसेसचा नंबर पडणार, म्हणजे इथे कालापव्ययाशिवाय काहीच झाले नाही, अशी वेळ येणार होती.
माझ्या केसमध्ये तर ८७ + १८ मिळून एक लाख पाच हजार होत असले, तरी अठरा हजाराची पावती त्यात नव्हती. शिवाय ताबा घेताना द्यायचे पैसेही भरलेले नव्हते. आता काय होणार? कसे वर्गीकरण करणार? काही समजेना. त्यात फायली इथून तिथे पाठवताना फायली हरवण्याचा धोकाही नजरेआड करता येण्यासारखा नव्हता. इथल्या इथे पेपर हरवले असे सांगणारा माणूस पुढे असे काही करूच शकणार नाही, याची खातरि कोण देणार? मग इथे पेपर तिथे पाठवल्याची नोंद आणि तिथे पेपर मिळालेच नाहीत ही नोंद. बसा शोधत. पेपर हरवले तर पुनश्च हरिओम करावे लागणार, हे नक्की. आणि केस कधी पूर्ण होणार? न्यायमूर्तींच्या समोरचे टेबल तर फायलींच्या गठ्ठ्यांनी भरलेले दिसत असल्याने आज हेच काम चालेल असे दिसत होते .श्रद्धा आणि सबुरीचाच मंत्र जपावा लागणार होता.
न्यायमूर्ती आणि इतर सदस्य आले. बेंच बसले. न्यायमूर्ती एक एक केस उचलून त्यावरच क्रमांक आणि नाव वाचत. ज्याची केस असे तो उभा राहत असे. न्यायमूर्ती ''तुमची केस या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात पाठविली जाणार आहे, तुम्हाला काही सांगायचे आहे का?" विचारत. तो, 'नाही' म्हणे. न्यायमूर्ती केसवर तशी नोंद करून लाडकडे देऊन टाकत. तोही काही नोंद करत असे.
काय करू? नि कसे करू? हे दोनच प्रश्न डोक्यात धुमशान घालत होते. डोळे आणि कान त्यांचे काम करत होते. माझे नाव पुकारल्यावर मी उभी राहिले. आज देसाई लगेच परत गेला होता. मला न्यायमूर्तीनी तेच सांगितले आणि विचारले, "तुम्हाला काही सांगायचं आहे का?"
"होय" असं म्हटल्यावर तिघांनीही चकित होऊन माझ्याकडे पाहिले. लाडची मानही वर झाली. पो.आ. गवई म्हणाले, "बोल बाई, काय म्हणतेस?"
"सर, माझं जर काही चुकत असेल तर मला माफ करा. पण मला वाटतं की माझी केस याच कोर्टात राहिली पाहिजे."मी.
"आणि असं तुम्हाला का वाटतं?" हा प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला होता.
"ग्राहक संरक्षण कायद्यात असलेल्या नोंदीप्रमाणे ग्राहकाला ९० दिवसात न्याय मिळायला हवा. पण माननीय कोर्टासमोरच्या वाढलेल्या कामामुळे तसे होऊ शकले नाही, याची मला कल्पना आहे. जर मला ९० दिवसात न्याय मिळाला असता, तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. त्यात या रजिस्ट्रार साहेबांनी माझे पेपरच हरवून टाकले होते, त्यामुळे तीन महिन्यांनी मी दुसऱ्या प्रती दिल्यावर, प्रतिपक्षाला नोटिसच ९० दिवसांनंतर गेली आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझी केस याच कोर्टात चालावी."
पो.आ. गवाईंनी लाडकडे पाहत नुसत्या भुवया उडवल्या. त्यानेही होकारार्थी मान हलवली.
पुन्हा तिघांनी काही चर्चा केली, न्यायमूर्तीनी पेपरवर नोंद केली आणि म्हणाले, "ही केस याच कोर्टात चालेल." आणि त्यानी केस लाडकडे देऊन टाकली. त्याने मला पडलेल्या चेहऱ्याने पुढची तारीख दिली. मला हायसे झाले.
पुढच्या तारखेला कोर्टात आल्यावर त्याने पुढची तारीख दिली, नेहमीचेच कारण देऊन. देसाई नेहमीप्रमाणे हसत कोर्टाबाहेर गेला. पण आज मी वेगळाच विचार करून आले होते. मी थांबायचे ठरवले. हळूहळू सगळ्या केसेस संपल्या. कोर्टात ग्राहक पंचायतीचे ४-६ लोक आणि मी उरलो.
माझ्याकडे बघत न्यायमूर्तीनी विचारले, "तुम्ही का थांबला आहेत? यांना तारीख दिली नाही का?" दुसरा प्रश्न लादला होता, त्यानेही 'दिलीय'असे सांगून टाकले.
"हो, सर. तारीख मिळालीय. पण बिल्डरने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, तसेच सर्वांना मॅनज करू शकतो, आमचे कोणीही, काहीही वाकडे करू शकत नाही, आमची पोच वरपर्यंत आहे अशा वल्गनाही केल्या आहेत, तसे प्रतिज्ञापत्र मी केले आहे. हा त्याच दावा गरज नसताना खरा ठरतोय याचेच वाईट वाटते आणि मनात शंका येते की या दुनियेत आपल्याला न्याय मिळेल का नाही?"
न्यायमूर्तीनी माझे पेपर मागवून ते प्रतिज्ञापत्र पाहिले. तिघांनी चर्चा केली. पेपरवर नोंद करत ते म्हणाले, "पुढच्या तारखेला ही केस एक नंबरला ठेवा."
मी हात जोडले, त्यात शिष्टाचाराचा भाग तर होताच, तसाच श्रद्धेचाही भाग होता. आज जे मागेन ते देणाऱ्या सर्वशक्तिमान शक्तीच्या जागी ते होते.
२ डिसेंबर १९९३ला मी उत्साहाने कोर्टात गेले. लाडकडे जाऊन आल्याची नोंद केली. तिथेच एक उंचीपुरी, रुबाबदार व्यक्ती उभी होती. तिच्या गळ्याला पांढरी कॉलर असल्याने ती व्यक्ती म्हणजे अ‍ॅडव्होकेट आहे हे समजत होते. लाडने त्यांना माझ्याकडे बोट दाखवत इशारा केला. मी माझ्या जागेवर बसत असतानाच ते माझ्याकडे येऊन म्हणाला, "मी अ‍ॅडव्होकेट विजय शहा, हायकोर्ट प्लीडर."
मला वाटले, हेमंतने त्याची केस चालवायला वकील पाठवला बहुतेक!
"बरं, मग?"
"आज माझी केस आहे, ती पहिल्या नंबरला घेण्याविषयी विनंती करायला आलो होतो तर कळलं की आज पहिल्या नंबरवर तुमची केस आहे. तर तुम्ही तुमचा नंबर मला द्याल का? कारण माझी केस अर्ध्या दिवसात संपणार नाही. या केसमध्ये मेडिकल ग्राउंडवर दोन डॉक्टर साक्ष देणार आहेत. तेही आले आहेत."ते भराभर बोलले.
मी काही बोलणार, तेवढयात एक नर्स एक व्हीलचेअर ढकलत घेऊन आली. त्यात एक मध्यम वयाची बाई बसली होती. तिचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होताच, तसेच रडून लालही झाला होता. ती सारखे भरून येणारे डोळे पुसत होती. तिच्याकडे बोट दाखवून शहा म्हणाले, "यांचीच केस आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटात त्यांचे पती, मुलगा व सून गेले, त्या स्वत:ही भाजल्या होत्या. आजची तारीख होती, पण इथे आल्यावर तुमची केस पहिली आहे असं कळलं, म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे. तुमची केस उद्या चालेल याची मी तुम्हाला खातरी देतो."
मी हतबुद्धच झाले. आधी वाटले, हेमंत आणि लाड या दोघांचा काही नवा खेळ आहे. पण इतका मोठा खेळ? ज्यात एक वकील, दोन डॉक्टर, एक पेशंट नर्ससाह भाग घेताहेत. जर हा यांचा खेळ नसेल तर हा खेळ कोणाचा आहे? गेल्या तारखेला मला साथ देणाऱ्या त्या सर्वशक्तिमान शक्तीचाच आज माझ्याठायी राहायचा विचार होता का? मी त्याच्या कृपेला पात्र आहे का? माझ्या हृदयात तो आहे ना? याची तर तो परीक्षा घेत नव्हता ना? मला काही सुचेना. वारंवार डोळे पुसत असलेल्या त्या बाईकडे बघताना माझ्या मनात आले, 'आज ही बाई इथे येताना कोणत्या भावनाकल्लोळातून गेली असेल. अजूनही तिला तिच्या भावना आवरता येणे कठीण झाले आहे. मी जर आज नाही म्हणाले तर तिला उद्या पुन्हा याच स्थितीतून जावे लागेल. हो म्हणाले, तर आज तिचा थोडासा मनस्ताप कमी होऊ शकेल.' पण माझे काय होईल? कोर्टाला हे आवडले नाही, तर...... मला कोण मदत करणार?'
मेंदू म्हणत होता 'नाही म्हण' आणि मन सांगत होते, 'हो म्हण, हो म्हण.' दिमाग की दिल? शेवटी
नेहमी माझ्या बाबतीत होते तेच झाले, 'दिल दिमागपर हावी होही गया।'
मी शहाना म्हटले, "मी कोर्टाला विशेष विनंती करून आजची ऑर्डर घेतली होती, पण फक्त आज कोर्टात येताना झालेला त्रास या बाईंना उद्या माझ्यामुळे होऊ नये म्हणूनच फक्त हो म्हणते. पण कोर्ट माझी केस उद्या चालवेलच याची खातरी कोण देणार?"
खूश झालेले शहा म्हणाले, "त्याची काळजीच करू नका, मी स्वतः येऊन हे पाहीन की तुमची केस उद्या चालेल. पाहिजे तर तुमची केस चालवायला मदतही करेन." आणि ते लाडकडे गेले.
कोर्ट भरल्यावर लाडने माझ्याकडे आणि शहांंकडे बोट दाखवत काहीतरी सांगितले. न्यायमूर्तीनी मला विचारले, "तुम्ही स्वतः विनंती करून आजची ऑर्डर घेतली असताना तुमचा नंबर तुम्ही यांना कसा दिलात?"
"सर, मला माफ करा, पण आज ज्या मनस्तापातून या बाईंना जावं लागलं आहे ,त्यातून आज माझ्या फक्त 'नाही' म्हणण्यामुळे, त्यांना उद्या पुन्हा जावं लागू नये, इतकाच माणुसकीचा विचार मी केला.आजची केस जरी त्या जिंकल्या तरी त्यांचं जे नुकसान झालं आहे, ते भरून निघणार नाही. त्यांना उद्या पुन्हा दुःख देण्याचा मलातर काहीच अधिकार नाही. त्यात बेंचच्या माणुसकीवर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला आहे." रमेश देसाईसुद्धा आश्चयचकित झाला होता.
"ठीक आहे, बसा." असे म्हणताना न्यायमूर्ती चक्क मिशीतल्या मिशीत हसल्याचा भास झाला.
त्या दिवशी शहा ती केस जिंकले. जाताना म्हणाले, ''Thanks, उद्या मी नक्की येतो. तुम्ही काही काळजी करू नका." पण काळजी तर रहाणारच होती ना, ती काय अशी संपणार होती थोडीच? ते उद्या आले नाहीत, तर मी त्यांना कुठे शोधणार होते? संध्याकाळी भेटल्यावर नवराही म्हणाला, "तू काही चुकीचं केलं नाहीस. उद्याचं उद्या, शांत झोप काढ आज."
३ डिसेंबर १९९३चा ऐतिहासिक दिवस उजाडला. म्हणजे सकाळी उठल्यावर नेहमीसारखाच होता, पण संध्याकाळपर्यंत ऐतिहासिक ठरणार होता. मी धडधडत्या काळजाने कोर्टात पाय ठेवला. काल मूर्खपणा केला असे चुकूनही वाटत नव्हते, पण शहाणपणा तरी केला होता का? की, अतिशहाणपणाच केला होता? हे थोड्याच वेळात कळणार होते. पण आज लाडने तारीख दिली नाही म्हणून आशाही वाटत होती. पण, 'आले कोर्टाच्या मना' असे झाले, तर.......
अ‍ॅड. विजय शहा आले आणि थोडा धीर आला. श्री विवेक पंडित आणि त्यांचे सहकारीही त्यांच्या केससाठी आले होते. आज बेंच बसायला उशीर होतोय असे वाटत होते. पण बेंच वेळेवरच बसले. केसचा पुकारा झाला. मी उभी राहून कोर्टाला धन्यवाद दिले. त्यांनी मला माझी तक्रार काय आहे ते विचारले. मी माझ्या हातातल्या संचाकडे पाहत तारीखवार, पान क्रमांकासह निवेदन केले.
कोर्टाने रमेश देसाईला त्याचे म्हणणे विचारल्यावर त्याने पहिल्यांदा सांगितले की "मी रमेश देसाई. हेमंतचा पार्टनर असून मिसेस सावंत खोटं बोलत आहेत. आम्ही त्यांच्याकडून एक रुपयाही कॅशमध्ये घेतलेला नाही. आम्ही सर्व रक्कम चेकने घेतली असून त्याच्या पावत्याही त्यांना दिलेल्या आहेत. तसंच आम्ही या बाईंनी जो फ्लॅट बुक केला होता, त्यापेक्षा मोठा फ्लॅट यांना दिला असून तसं त्यांनी कबूलही केलं आहे. त्यांनी अजून त्याचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे ही केस खोटी असून काढून टाकण्यात यावी. आम्ही यांचं काहीही देणं लागत नाही."
न्यायमूर्तींनी माझ्याकडे पाहिले, "सर, पहिली गोष्ट म्हणजे यांनी पैसे माझा घेऊन माझा फ्लॅट मला दिला नाही, ही माझी पहिली फसवणूक. मला दुसरा फ्लॅट दिला तो काही मेहरबानीखातर दिला नाही. एका फ्लॅटचे पैसे मी भरले होते, तो दिलेल्या वेळेत पूर्ण झ्ला नाही, त्याबदल्यात मोठा फ्लॅट दिला, कारण यांच्याकडे लहान फ्लॅट तयार नव्हता. मी नोंदणी केलेला माझा फ्लॅट पूर्ण होईपर्यंत, दुसरा पूर्ण झालेला बदली फ्लॅट देतो असे भासवून माझी दुसरी फसवणूकच केली आहे. कारण या फ्लॅटचेही काम पूर्ण झालेले नव्हते आणि मी ताबा घेल्याच्या तिसऱ्याच दिवशी माझे म्हणणे यांना लेखी कळवून, चाव्या परत करायला गेले असता तिथल्या क्लार्कने चाव्या घ्यायला नकार दिला, तसे त्या पत्रांवर नमूद केले आहे. तसेच ग्राहक चळवळीचे श्री. विवेक पंडित यांच्याही कानावर ही बाब घातली असता त्यांनीही चाव्या तुमच्याकडेच राहू द्या, असा सल्ला दिला होता.''
न्यायमूर्तीनी पंडितांकडे पाहत म्हटले, "वा! ग्राहक जागृती जोरात चालू आहे तर.''
पंडितांनी अर्धवट उठत नमस्कार केला आणि कोर्टात हसण्याची लकेल उमटली.
माझे निवेदन पुढे सुरू झाले, "मी यांच्या चाव्या आजही आणल्या आहेत, मी कोर्टाकडे जमा करू का?"असे म्हणत मी पर्समधून चाव्या काढल्या, ज्या त्या फ्लॅटच्या नव्हत्याच. पण कोर्टाने तसे करू नका सांगिततल्याने मी पुन्हा चाव्या पर्समध्ये ठेवल्या आणि पुढे बोलायला सुरुवात केली. "याच माणसासमोर आम्हाला हेमंत परांजपेने जीवे मारण्याची धमकी दिली आणि आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, आम्ही सगळ्यांना मॅनेज करू शकतो, अशा वल्गना केल्या. तेव्हा हे गृहस्थसुद्धा हजर होते.''
पो.आ. गवईंनी त्यांच्या खास कमावलेल्या पोलिसी आवाजात विचारले, "काय? बाई काय सांगतेय?" रमेश देसाईला घाम फुटला. तो त त प प करू लागला.
त्यावर मिसेस तळकर म्हणाल्या, "हे काय पहिले प्रकरण आहे का बिल्डरांनी धमक्या दिल्याचे? दिल्या असतीलच धमक्या."
न्यायमूर्तीनी त्याला पुढचा प्रश्न विचारला, "बाई म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही त्यांना दिलेला फ्लॅट पूर्ण झालेला नव्हता हे खरे आहे का?"
"हो" तो म्हणाला.
पुन्हा पो.आ. गवईनी विचारले, "तुम्ही बाईंना जीवे मारण्याची धमकी दिलात की नाही?"
त्यावर त्याने, "मी नाही, हेमंत परांजपे तसं बोलला." असे सांगितले.
"मग आता तुम्हाला काय सांगायचं आहे?"असं न्यायमूर्तीनी विचारलं.
तो सांगू लागला, "सर, त्या जमिनीसाठी १९८५पासून कोर्टात दावे दाखल झाले होतेे, त्या केसमुळे काम थांबवावे लागले."
"सर, यांनी ही तिसरी फसवणूक केली आहे. करारपत्राच्या तिसऱ्या पानावरच्या पहिल्या परिच्छेदात टायटल क्लिअर असल्याचे म्हटले आहे. १९८५ला जर दावे दाखल झाले होते, तर १९८६मध्ये यांनी हे करारपत्र केले आहे, म्हणजे मुळातच यांचा उद्देश फसवणुकीचा होता, हे सिद्ध होत आहे." मी निदर्शनाला आणताच तिघांनीही करारपत्र पाहून खातरि करून घेतली.
पुन्हा तिघांनी काही चर्चा केली. मग मला विचारले, "तुम्ही म्हणता, तुम्ही रोखीत अठरा हजार दिले, हे म्हणतात की तुम्ही रोखीत एक रुपयासुद्धा दिला नाही. तर आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडे काय पुरावा आहे असे पैसे दिल्याचा?"
"मी पहिले पैसे ७ जुलैला ८६ला भरले, पण माझं करारपत्र मात्र १४ ऑगस्ट ८६ ला, यांना अठरा हजार रुपये दिल्यावर झालं, हाच एकमात्र पुरावा माझ्याकडे आहे. कारण ब्लॅकचे पैसे दिल्याशिवाय करारपत्र केलं जात नाही, हे उघडे गुपित आहे. जर ब्लॅकचे पैसे नको असते तर करारपत्र करायला यांना पावणेदोन महिने लागले नसते." मी.
"तूम्ही सरकारी कर्मचारी असून काळ्या बाजारात पैसे दिलेत? तुम्हाला माहीत आहे ना, की हा गुन्हा आहे?"हा प्रश्न पो.आ. गवईंकडून माझ्यावर ठोsss करून आदळला.
मी आवंढा गिळला." हो, सर. पण गरजवंताला अक्कल नसते ना! म्हणून यांना ब्लॅकचे पैसे दिले, ही चूकच झाली."
"पण ते तर नाकारताहेत असे पैसे घेतल्याचे?" या वेळी मिसेस तळकर बोलल्या.
"मॅडम, मी यांना गेल्या काही काळात जवळजवळ सोळा ते सतरा पत्रं लिहिली, प्रत्येक पत्रात किती पैसे चेकने आणि किती पैसे रोखीने दिले याचा उल्लेख आहे. यांनी माझ्या एकाही पत्राचं उत्तर तर दिलं नाहीच, पण कधी हे तोंडीसुद्धा, नाकारलंही नाही. त्यातलं एक पत्र तर हेमांतने स्वतःच घेतलं होतं, तेही विवेक पंडितांसमोरच. त्या पत्रावर त्याची आणि विवेक पंडितांची ही सही आहे."
मी असे म्हणतात शहा हळूच म्हणाले. "That's the point."
न्यायमूर्ती रमेशला म्हणाले, "आता तुम्हाला काय सांगायचंय ते बोला."
"आमचा एका फ्लॅटचा ताबा यांच्याकडे आहे. तोच आम्ही यांना काम पूर्ण करून देतो." त्याने सांगितले.
"मला आता यांच्याकडून फ्लॅट नको. माझे पैसे परत हवेत, कारण यांना वेळ घालवण्याचा खेळ चांगला खेळता येतो. ती खेळायची माझी इच्छा नाही."
पुन्हा तिघांनी चर्चा केली आणि न्यायमूर्तीनी मला विचारले, की " हे अठरा टक्के व्याज तुम्ही कशाच्या आधारे मागताय?"
"सर, यांना मी दोन कलमांद्वारे ३६% व्याज लावू शकते, असा सल्ला मला मिळाला आहे - एक भारतीय दंडविधानातील १९६४चा भाडे कायदा आणि १९८६चा ग्राहक संरक्षण कायदा. या दोन्ही कायद्यांद्वारे जास्तीत जास्त अठरा टक्के व्याज देण्याची तरतूद आहे. पण या लोकांच्या मागे खूप लोकांची हाय आहे, त्यामुळे मी एकाच कायद्याचे संरक्षण घेतले आहे. शिवाय यांच्यकडून हप्त्याचे पैसे मागणारी जी पत्रे येत, त्यात जर पंधरा दिवसात पैसे भरले नाहीत तर १५% दंड आकारला जाईल, अशी ताकीद असे. मी नेहमी ठरलेल्या तारखेला यांना पैसे देत आले आहे, हे पावत्यांवरून दिसून येईल. माझे आर्थिक, तसेच मानसिक नुकसान जास्तीत जास्त भरून निघावे, यासाठी अठरा टक्के व्याजाची मागणी केली आहे."
पुन्ह तिघांची चर्चा झाली आणि न्यायमूर्ती रमेशला म्हणाले, "आता तुम्ही केलेली बाईंची फसवणूक सिद्ध झाली आहे. तुम्ही यांना पैसे कसे आणि कधी देणार?"
तर त्यावर तो म्हणाला, "आम्ही जेव्हढे चेकने घेतले तेव्हढे देऊ.''
त्याबरोबर मी त्याच्यावर बोट रोखत म्हटले, "याचा अर्थ यांनी माझ्याकडून रोखीने पैसे घेतले, नाहीतर यांना हे स्पष्ट करण्याची गरजच नव्हती." न्यायमूर्तीही हसले. पो.आ. गवई यांनी आवाज न करता टाळ्या वाजवल्याची हालचाल केली. हजर असलेल्या लोकांनी सरळ सरळ टाळ्या वाजवल्या.
न्यायमूर्तीनी अठरा टक्के व्याज मंजूर केले. रमेशने, 'एक महिन्याच्या अवधीनंतर चेक देतो.' सांगितल्यावर पो.आ. गवई गरजलेच, "चेक नाही, डी डी द्यावा लागेल." त्यालाही डीडीसाठी मान्यता द्यावी लागली. आतापर्यंत १३ टक्के व्याज घरबांधणीसाठी मंजूर झाले होते, तेही चेन्नईला. महाराष्ट्रात घरबंधीसाठी अठरा टक्के मिळणारी मी पहिली ठरले.
यथावकाश महिना सरला. ३ जानेवारी १९९४ ला मला रुपये एक लाख बावन्न हजारांचा डिमांड ड्राफ्ट मिळाला आणि त्याच दिवशी सेंट्रल पार्क, विरार प्रोजेक्टमधल्या वीसपेक्षा जास्त लोकांनी परांजपे बिल्डसविरुद्ध केस दाखल केल्याची बातमीही मिळाली. हेमंत परांजपेने झोपण्यापूर्वी मला शिव्या घालायला सुरुवात केली असणारच, याची मला पूर्ण खातरी झाली.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 12:25 pm | मुक्त विहारि

मस्त....

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 12:34 pm | यशोधरा

सणसणीत गो एकदम!

विनोदबाण़खेले's picture

6 Nov 2018 - 12:35 pm | विनोदबाण़खेले

अप्रतिम , स्वतः वर आणि परमेश्वरावर विश्वास ठेऊन खेळलेले एक युद्ध तुम्ही जिंकलातच पण अनेक अर्जुनांचे श्री कृष्ण देखील झालात ...अभिनंदन... आणि तुमच्या पतीराजांचे खास अभिनंदन कि ज्यांनी तुम्हाला खंबीर साथ दिली .

नूतन सावंत's picture

6 Nov 2018 - 11:29 pm | नूतन सावंत

अगदी खरे आहे.माझे पती माझा कणा आहेत.त्यावेळी जर तेही घाबरले असते तर...मला पुढे जाताच आले नसते हेही तितकेच खरे आहे

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 12:42 pm | तुषार काळभोर

तब्बल आठ वर्षे धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींशी, धनदांडग्या बिल्डरशी, निबर कातडीच्या भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांशी संघर्ष करत तुम्ही जिंकलेली लढाई खूप प्रेरणादायी आहे हे शेवटच्या परिच्छेदात आहेच.

मंत्रालयात नोकरी असली तरी एका स्त्रीने दिलेली लढाई म्हणून विशेष कौतुक. बरेच मध्यमवर्गीय पुरुष सुद्धा कदाचीत इतकं सगळं करणार नाहीत.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 12:49 pm | तुषार काळभोर

तब्बल आठ वर्षे धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींशी, धनदांडग्या बिल्डरशी, निबर कातडीच्या भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांशी संघर्ष करत तुम्ही जिंकलेली लढाई खूप प्रेरणादायी आहे हे शेवटच्या परिच्छेदात आहेच.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 1:49 pm | टर्मीनेटर

तुमच्या लढ्याला सलाम.

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2018 - 2:30 pm | प्रसाद_१९८२

खूपच प्रेरणादायी लेख.
आठ वर्षे इतक्या खंबीरपणे जो लढा तुम्ही दिलात, त्या लढ्याला सलाम.
----
यथावकाश महिना सरला. ३ जानेवारी १९८४ला मला रुपये एक लाख बावन्न हजारांचा डिमांड ड्राफ्ट मिळाला
--
वरिल ओळीत,
'३ जानेवारी १९९४' असे असायला हवे होते.

नूतन सावंत's picture

6 Nov 2018 - 11:06 pm | नूतन सावंत

होय बरोबर आहे.,सां सं कृपया चूक सुदहारायला मदर करा.

नूतन सावंत's picture

9 Nov 2018 - 8:19 am | नूतन सावंत

प्रसाद१९८२,दुरुस्ती केली आहे,धन्यवाद.

सिरुसेरि's picture

6 Nov 2018 - 5:43 pm | सिरुसेरि

सुन्न करणारा लेख . तुमच्या जिद्दीसाठी अभिनंदन . मराठी माणुसच कसा मराठी माणसाला त्रास देतो हे वाचुन त्रास झाला . आणी आपण उगाच त्या गोसालियाला नावे ठेवतो .

नूतन सावंत's picture

17 Nov 2018 - 7:56 pm | नूतन सावंत

मराठी म्हणून विश्वास ठेवून त्याच्याकडे पिसे गुंतवले होते,पण मराठी माणूसच,' नडला त्याला फोडला' या जातकुळीचा असू शकतो,हेच तो विसरला.

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 6:02 pm | सुधीर कांदळकर

मॅरेथॉन लेखन. आपली केस शक्यतो आपणच लढवावी. वकील आपला असला तरी त्य्च्याकडून बारकावे समजून घेऊन आपणच कोर्टत बोलावे. बहुतेक वकील नेहमी केस लांबवून पक्षकरांना लुटण्याची शक्यता असते.

आपली जिद्द आणि चिकाटी तसेच खटला स्वत। चालवण्याची क्षमता असाधारण आहे. मेरी कोमशीच तुलना होईल. अभिनंदन आणि सुरेख लेखासाठी धन्यवाद.

नूतन सावंत's picture

9 Nov 2018 - 8:24 am | नूतन सावंत

आपली केस आपणच लढवावी हे पटले,म्हणून तर ही केस जिकल्यावर कायफायच अभ्यास केला.यानंतर महिंद्रा हॉलिडेज बरोबर एक केस केली.

नूतन सावंत's picture

9 Nov 2018 - 8:26 am | नूतन सावंत

आपली केस आपणच लढवावी हे पटले,म्हणून तर ही केस जिकल्यावर कायद्याचा अभ्यास केला.यानंतर महिंद्रा हॉलिडेज बरोबर एक केस केली.

तुषार काळभोर's picture

9 Nov 2018 - 12:16 pm | तुषार काळभोर

अनुभव वाचायला आवडेल

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 9:41 pm | नूतन सावंत

लिहीन नक्की..

अभिजित - १'s picture

6 Nov 2018 - 7:30 pm | अभिजित - १

Solid !! Great !!

मित्रहो's picture

6 Nov 2018 - 7:45 pm | मित्रहो

आठ वर्षे केस लढणे आणि भांडणे खरच गंमत नाही. मी माझ्या बाबतीत सांगू शकतो मला जमले नसते. पुढे सेन्ट्रल पार्क या प्रोजक्टचे काय झाले

तुमच्या लढ्याला सलाम

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 9:47 pm | नूतन सावंत

सेंट्रल पार्क अजूनही तिथे आहे,कोणी पूर्ण केलं वगैरे माहीत माही,पण मूळ सद्दस्पैकी ब्रायव्ह लोकांनी पैसे परत घेतले त्यामुळे हेमंत परांजपे लिक्विडेशनमध्ये गेला असे कळले होते.त्यानंतर तो गेलाच.

प्रमोद देर्देकर's picture

6 Nov 2018 - 8:26 pm | प्रमोद देर्देकर

सुरंगी ताई आयुष्यात तुला सगळी माणसं अशीच का गं भेटत गेली .
तुझं काही करावे म्हणून लिहले ल्या सदरात पण असेच अनुभव आहेत .
बाकी तुझ्या खंबीर स्वभावस दाद देण्यात येत आहे.
माझाही असाच प्रकारे एका एन. ए. प्लॉट मध्ये पैसे अडकलाय मुदत उलटून 1.3 वर्षाहून अधिक दिवस झालेत. ठाण्यात ग्राहक तक्रार मंच कुठे आहे माहिती आहे काय ?

नूतन सावंत's picture

6 Nov 2018 - 11:20 pm | नूतन सावंत

मलाच का भेटली? सगळ्यांनाच भेटत असतील रे पम्याभाऊ?पण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी असतो ही,शिकवण शाळेतच मिळाली होती.घरचे बाळकडूही हेच होते.कोणी मारले तर घरी तक्रार आणायची नाही.चार घेतले तर दोन देता आले पाहिजेत. त्यामुळे असेल पण आम्ही अन्यायाचा पतिकर करणारे झालो असू.

ठाणे ग्राहक पंचायतीचे कार्यालय माहीत नाही.पण लँडलाईन असेल तिथे तर 198 ला चौकशी करता येईल.नं मिळाला की पुन्हा 198 ल चौकशी करून पत्ता मिळेल.

मीअपर्णा's picture

6 Nov 2018 - 10:31 pm | मीअपर्णा

केवढे सातत्य दाखवलेत तुम्ही. सलाम.

नाखु's picture

6 Nov 2018 - 11:38 pm | नाखु

निव्वळ अप्रतिम लढा दिला
स्वत:चे घर करताना केलेला सगळा लढा (सरकारी यंत्रणा आणि आडमुठ्या राजकीय सर्वपक्षीय नेत्यांच्या घोषणा आठवल्या.
जरा उसंत मिळाली तर नक्कीच लिहिणार आहे

नूतन सावंत's picture

7 Nov 2018 - 9:56 am | नूतन सावंत

नाखू, नक्की लिहा.

गुल्लू दादा's picture

7 Nov 2018 - 8:54 am | गुल्लू दादा

सलाम तुम्हाला....सलाम तुमच्या लढाऊ वृत्तीला...!

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2018 - 1:37 pm | स्वाती दिनेश

सुरंगी, अग काय ग हे.. पण तू आहेसच जिद्दीची.. चिकाटीने लढा देऊन जिंकल्याबद्दल खूप छान वाटलं..
लेख आवडला हेवेसांनल.
स्वाती

जिद्दीला आणि चिवटपणा ला सलाम __/\__

साबु's picture

7 Nov 2018 - 2:12 pm | साबु

केवढे सातत्य दाखवलेत तुम्ही. सलाम.

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 4:43 pm | सविता००१

नूतनताई, खूपच मार्गदर्शक आहे सगळं आम्हाला.
पण तू जाम सोसलं आहेस ग..
एकदम झाशीची राणी मोड आहे लिहिताना
खूप मस्त लिखाण

नूतन सावंत's picture

17 Nov 2018 - 8:00 pm | नूतन सावंत

सविता,जसं घडलं तसंच लिहिलं.एकदा लढायचं म्हटलं की जिवाच्या कराराने लढायला हवं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2018 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या वंशज शोभत आहात ! हा अनुभव अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

फारच प्रेरणादायी लेख. बिल्डर अगदी गेंड्याच्या कातडीचे असतात. बिल्डर जावूदे पण कोणतीही वस्तू घेवून पुन्हासर्विस च्या नावाकाहाली जी बोंब असते त्याविषयी तर बोलायलाच नको. मला खूपच प्रेरणा मिळाली हा लेख वाचून. आता बरेच जणांना वटणीवर आणायला हा लेख मला प्रेरणा देत राहील

नूतन सावंत's picture

8 Nov 2018 - 10:18 pm | नूतन सावंत

तुमच्यासातखे एक दोन निघाले तरी या लेखाचं दार्थक झालं असं म्हणता येईल.

नूतन सावंत's picture

8 Nov 2018 - 10:20 pm | नूतन सावंत

सार्थकअसे वाचावे

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 11:46 am | अनिंद्य

@ नूतन सावंत,

प्रेरणादायक लढा !

आता रेरा वगैरेमुळे बिल्डर मंडळींवर वचक बसलाय असे ऐकतो.

अभ्या..'s picture

9 Nov 2018 - 12:20 pm | अभ्या..

ए जिगर...
एकच लंबर.
लगे रहो, जीतते रहो.

शैलेन्द्र's picture

9 Nov 2018 - 6:53 pm | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

9 Nov 2018 - 6:53 pm | शैलेन्द्र

निव्वळ भन्नाट, खिळवून ठेवणारा अनुभव,

त्या काळात जे जगलेत, ज्यांना अनुभव आठवतायेत त्यांना तुम्ही किती धाडस आणि संयम ठेवून योग्य निर्णय घेतलात ते लक्षात येईल.

नूतन सावंत's picture

17 Nov 2018 - 8:04 pm | नूतन सावंत

संयम ठेवायला पतीराजांची खूप मदत झाली,हेही तितकंच खरं.

सुबोध खरे's picture

10 Nov 2018 - 9:50 am | सुबोध खरे

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत असंख्य लोक बिल्डर कडून फसवले गेले /जात आहेत.

दुर्दैवाने कोर्टकचेरीचा मार्ग इतका जिकिरीचं आणि कटकटीचा आहे त्यातून आतापर्यंत असलेले बहुसंख्य कायदे हे बिल्डरांना संशयाचा फायदा देणारेच होते.

त्यामुळे सामान्य माणूस अन्न वस्त्र निवारा यातील निवारा या एका महत्त्वाच्या बाबतीत फार नाडला गेला आहे.

त्यातून बिल्डर हि जमात गेंड्याच्या कातडीची असते. (सरकार दरबारी खेटे घालणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी लाच द्यावी लागणे आणि लाच दिल्याखेरीज काम न होणे अशातर्हेचे सातत्याने येणारे अनुभव यामुळे सज्जन माणूस जर बिल्डर झालाच तर तो हि गेंड्याच्या कातडीचा होतो.)

या पार्श्वभूमीवर आपण अत्यंत धीराने दिलेला प्रदीर्घ धडा हे सामान्य माणसांसाठी एक दैदिप्यमान उदाहरण आहे.

आपल्याला साष्टांग दंडवत.

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 12:16 am | पद्मावति

तुझ्या निर्भीड स्वभावाला आणि जिद्दीला नमन __/\__ खूप खूप सुरेख शब्दबद्ध केला आहेस हा सगळा अनुभव.

तुमच्या धाडसाला आणि चिकाटीला सलाम!

भीमराव's picture

11 Nov 2018 - 5:36 pm | भीमराव

दिर्घ लढा दिलात, त्याबद्दल आधी दंडवत प्रणाम.
अन्याय करणारा पेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.
आपल्या केस मधे प्रामाणिक पना आणि लेखी कागदोपत्री बरीच उपयोगी पडली, लेखन सुद्धा तुम्ही समोर बसून सांगता आहात असे आहे.

जुइ's picture

12 Nov 2018 - 2:58 am | जुइ

तुम्ही अतिशय जिद्दीने आणि खंबीरपणे बिल्डर विरोधी लढा दिलात. तुमचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 10:31 am | प्राची अश्विनी

+111
_/\_

मंजूताई's picture

12 Nov 2018 - 4:30 am | मंजूताई

धाडस, चिकाटीला एक कडक सलाम!

वरुण मोहिते's picture

12 Nov 2018 - 3:00 pm | वरुण मोहिते

लेख, लढा, जिद्द, चिकाटी सर्व गोष्टींना सलाम

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 3:49 pm | दुर्गविहारी

________/\_________ दंडवत स्विकारा ताई. अतिशय प्रेरणादायी लेख..

नि३सोलपुरकर's picture

12 Nov 2018 - 5:44 pm | नि३सोलपुरकर

ताई तुमच्या धाडसाला आणि चिकाटीला सलाम!
तुमचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे कमीच आहे