सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं.
गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान. त्या चौथर्याच्याही मध्यभागी एक प्रचंड मंदिर. इतकं उंच भूमिज मंदिर महाराष्ट्रात दुसरं नसावं. भूमी म्हणजे मजला. मंदिराचा शिखरभाग मुख्य शिखराच्या लहान लहान प्रतीकृतींनी जोडत जोडत जाऊन थेट कळसास पोहोचलेला. त्या शिखरप्रतीकृतींच्या मधूनच जाणारी सरळसोट जीवा. हीच ती भूमिज शैली. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना चार लहान आयतनं. मुख्य मंदिर भूमिज पण त्याच्या बाजूची उप आयतनं मात्र नागर शैलीतली, मधूनच एखादं वेस्सर शिखर. ह्या विभिन्न शैलींमुळे मुख्य आयतनाला येथे कमालीचा उठाव मिळालाय. मुख्य मंदिर शिवाचे त्यामुळे हे शिवपंचायतन.
मंदिराच्या पटांगणातच उभा राहून मी हे सर्व पाहात होतो. अप्रतिम, सुपर्ब, मार्व्हलस अशी विशेषणं फिकी पडावीत असंच ह्याचं प्रथमदर्शन. मंदिराचे हे प्रवेशद्वार मात्र आडबाजूचे. मंदिरात येणारा मुख्य रस्ता ह्याच मार्गाने आल्यामुळे, मूळचे मुख्य प्रवेशद्वार मात्र पूर्वाभिमुख, नदीच्या बाजूने. पाण्याच्या स्त्रोताच्या बाजूनेच मुख्य द्वार हवे किंवा त्याबाजूने एकतरी द्वार हवे हा नियम येथेही पाळला गेल्याचे दिसतो.
मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्व बाजूनं. येथेही एक आश्चर्य दडलेले आहे. खिद्रापूरच्याच स्वर्गमंडपाची लहानशी पुनरावृत्ती ह्या प्रवेशद्वाराच्या छतावर केलेली आढळते. खिद्रापूरचा स्वर्गमंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर, त्याला अगदी लागूनच. त्यामानाने गोंदेश्वरचा स्वर्गमंडप हा प्रवेशद्वारावर, मंदिरापासून थोडासा लांबच. पण ह्याचेही सौदर्य अजिबात उणावत नाही. आकाशाची निळाई काय खुलून दिसते येथून. भन्नाट
स्वर्गमंडपाच्या पुढ्यात खोलवर गेलेली नदी व तिचे आटलेलं, शेवाळलेलं पात्र. मागे फिरलो. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप आहे. शिल्पकामाने कोरुन काढलाय. हा नंदीमंडप खुलामंडप ह्या प्रकारात मोडतो. नंदीमंडपाच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी , वादक, मैथुनशिल्पं आदी कोरलेले आहेत. मूर्तींची अगदी सहजच संगती लागत असते. पहिल्यांदाच इथे येऊनही, मूर्ती अगदी झिजलेल्या असूनही अगदी सहज ओळखल्या जातात, जणू ह्यांचे आपले जन्माजन्मांतरीचे नाते आहे.
मला आठवतंय, लोणी भापकरला असाच एक नंदीमंडप आहे. तिथल्या मंडपात सध्या नंदी नाही मात्र बाह्य भिंतीवरील शिल्पेही अगदी अशीच.
नंदीमंडपाच्या भिंतीवरील मैथुनशिल्पे
हे रामायणातील काही प्रसंग
ह्या सुरसुंदरी, त्यात कुणी पुत्रवल्लभा, कुणी दर्पणा, कुणी मर्कटलीलांनी त्रस्त झालेली अभिसारिका
तर मध्येच विष्णूचे अवतार, वराह, नरसिंह
इतकी सारी शिल्पं बघत बघतच नंदीमंडपाला फेरी मारत निघावी आणि मुख्य आयतनात यावं. द्वाराच्या शेजारीच एक भयप्रद व्याल आपलं स्वागत करतो. इतके मोठे व्याल इकडील मंदिरांत तसे दुर्मिळच. दक्षिणेत मात्र अगदी विपुल.
प्रवेशद्वाराची चौकट येथेही व्यालांनी, वादकांनी, प्रतिहारींनी, द्वारपालांनी सजलेली आहे. प्रवेशद्वार हे मुखमंडपात आहे. मुखमंडपाचं छतही कमळासारख्या फुलांच्या आकृतीने नक्षीदार कोरलेले आहे.
गोंदेश्वराचा सभामंडप अंधारी, इथे छायाचित्रं काढणं तसं जिकिरीचं काम. इथला सभामंडपही भरजरी स्तंभांवर तोललेल्या आहे. स्तंभांवर असंख्य शिल्पं आहेत.
ही पुत्रवल्लभा, आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करीत आहे.
ही दर्पणा, सतत आरशातच बघत असते :)
ही आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करीत आहे
हे बहुधा शिवाचे तांडवनृत्य. नंदी आणि भृंगी शेजारी असावेत.
हे मैथुनशिल्प. असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत. :)
मध्येच काही ठिकाणी द्वंद्व कोरलेले आहे
तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे.
एका स्तंभावर उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूला अंकावर घेऊन आपल्या नख्यांनी त्याचे पोट फाडतोय तर प्रल्हाद भक्तीभावाने प्रार्थना करतोय, गरुडही वरच्या बाजूस हात जोडून नम्रतेने उभा आहे.
नंतर बळीराजा (हा प्रल्हादाचा नातूच. वैरोचनी) हा वामनाला तीन पावले जमिनीचे दान हातांवर पाणी सोडून देतोय. दान देताच वामन त्रिविक्रमरुप प्रकट करुन पृथ्वी आणि आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी सज्ज झालाय.
ही अजून एक पुत्रवल्लभा
मग विषकन्या दिसतेय. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.
अशी एक ना एक असंख्य शिल्पे आहे सभामंडपात. गर्भगृहाच्या दारावर देखील नेहमीप्रमाणेच दासी, प्रतिहारी, शैव द्वारपाल आहेत. आतले शिवलिंग मात्र साधेसे.
आता मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर, त्यावरील जंघेवर नरथर आणि त्यावर देवकोष्ठ आहेत. सुरसुंदरी इथे मोठ्या संख्येने दिसत नाहीत तरीही त्या मंदिरांच्या भिंतींवर काही प्रमाणात आहेत. अर्धमंडपांच्या बाहेर रामायणातील बरेच प्रसंग कोरलेले आहेत. देवकोष्ठात आज मूर्ती अभावानेच दिसतात, किंबहुना त्या नाहीतच. मी अशी देवकोष्ठं रिकामी असलेली बरीच मंदिरे पाहिलेली आहेत. मूर्तीभंजकांमुळे भग्न झालेली असावीत किंवा कसे, पण आज ती बर्याच ठिकाणी नाहीत. कित्येकदा ती मंदिरांच्या आवारातच इतस्ततः भग्नावस्थेत विखुरलेली दिसतात.
इथली भिंतीवरील रामायणपटांत विविध प्रसंग कोरलेले आहेत.
ही रावणानुग्रहशिवमूर्ती. वेरूळच्या कैलास लेण्यांत ह्याचं अतिभव्य असं स्वरुप आहे. अक्षरशः डोळे दिपवणारं. येथे मात्र हाच प्रसंग मिनिएचर रुपात मांडला गेलाय.
मारुती इथे अशोकवनाचा विध्वंस करताना दिसतो तर त्याच्याच पुढच्या पटात तो रावणकुमार अक्षाचा वध करताना दिसतो.
-
कधी रावणाचा दरबार दिसतो तर कधी राक्षसींनी वेढलेली सीता दिसते.
मधूनच सेतूबंधनाचा देखावा दिसतो तर रावणाच्या दरबारात चाललेली वानरशिष्टाई
अजूनही कित्येक शिल्पं येथे आहेत पण विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नाही.
असेच काही रामायणातील प्रसंग मी वेरूळ, लोणी भापकर, किकली येथील मंदिरांतही पाहिलेले आहेत. प्रसंग तसे भिन्न भिन्न, शैलीही भिन्न मात्र शिल्पांची रंजकता तीच. खरंच सांगतो. हे शिल्पपट, त्यातल्या मूर्ती, त्यातले प्रसंग ओळखायला खूप मजा येतं. काही वेळा काही प्रसंग अनाकलनीयच राहतात. किकलीच्या मंदिरातला गरूड आणि हनुमानात झालेली एका फळावरुन झालेली जुगलबंदी हा प्रसंग असाच अनाकलनीय. कोडं काही वेळा सुटतं, काही वेळा नाही, पण न सुटल्याची काही खंत अशी नसते.
भिंतींच्या उपांगांवर मधूनच काही सुरसुंदर्या दिसत जातात, कुणी आरश्यात पाहून नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेय तर कुणी वृक्षांचा आधार घेऊन उभी आहे, कुणी नुसतीच मुग्ध आहे तर कोणी हाती कमंडलू घेऊन उभी आहे. कुणी पोराला हाती घेऊन उभी आहे तर कुणाची नुसतीच लगबग चालू आहे.
मधूनच देवकोष्ठात चामुंडा प्रकटलेली दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या कराल दाढा, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे. अशाच व्हिसलींग चामुंडा मी पिंपरी दुमाला, खिद्रापूर येथेही पाहिलेल्या आहेत. चामुंडेवरनं आठवलं, भुलेश्वरला चामुंडेचं एक अप्रतिम शिल्प आहे. मी पाहिलेल्या चामुंडांमधलं सर्वोत्तम.
चामुंडा म्हटल्यावर भैरव आलाच. येथे एक भैरवाची अष्टभुज मूर्ती आहे आणि ती देखील बैठी. अष्टभुज शिव बैठ्या अवस्थेत मी फक्त येथेच पाहिला.
गाभार्यातील शिवपिंडीच्या शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची योजना केलेली आहे. त्या मकरावर शंख, चक्र, गदाधारी विष्णूची योजना केलेली आहे. त्या मकराचे बंद होत असलेले मुख कोणी एक आकृती आपल्या हातांच्या आधारे उघडून ठेवत आहे.
मंदिराच्या बाह्यांगांवर मूर्तींची संख्या तशी कमीच. गोंदेश्वर हे भूमिज शैलीतले तुलनेने उशिरा निर्माण झालेले (१२/१३ वे शतक) मंदिर असल्याने येथे मूर्तीकामाचा थोडा अभाव जाणवतो, त्याची जागा येथे नक्षीकामाने घेतलेली आढळते.
आधीच सांगितल्याप्रमाणे हे पंचायतन आहे. मुख्य मंदिर हे शिवाचे असल्याने हे शिवपंचायतन. गोंदेश्वराचे शिवपंचायतन महाराष्ट्रात सर्वात प्रचंड. ह्या इतर चार उप आयतनांत अनुक्रमे विष्णू, गणेश, दुर्गा आणि सूर्य अशा मूर्ती आहेत. ह्यातल्या काही मूर्ती मला जास्त प्राचीन वाटल्या नाहीत. कदाचित मूळच्या मूर्ती भंग पावल्या असाव्यात.
ही चार उपायतने देखील विलक्षण सुंदर आहेत. गोंदेश्वर मंदिराभोवती फेरी मारताना विविध कोनांतून हे पंचायतन विलक्षण सुंदर दिसते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाशामुळे ह्यांच्यावरील रंग सतत बदलत असतात. मावळतीला तर हे झळाळून निघत असते.
उत्तुंग पोहोचलेली शिखरं स्थापत्यशैलीचा अद्भूत आविष्कार दाखवतात.
आतापर्यंत इतकं मंदिरं पाहिली. डावं उजवं खरंच करता नाही आलं, आवडलं नाही असं कुठलंही मंदिर नाहीच. जे ८०० वर्षांच्या पलीकडचं आहे ते ते सगळंच आवडीच. मग त्यात वेरूळचं अतिभव्य लेणं येवो, कार्ल्याचा प्रचंड चैत्य येवो वा कुठेतरी झाडाझुडपात पडलेली एखादी शिळा. वेरुळच्या कैलासचं अढळ स्थान मात्र कधीच खाली उतरणार नाही. त्यासम तेच. कोपेश्वरही खूपदा पाहिलं, आवड्लं देखील. इतकं सुंदर, कोरीव पण का कोण जाणं समरस होता आलं नाही, भुलेश्वराशी मात्र मनापासून समरस झालो. काहीतरी ऋणानुबंध असणार.
गोंदेश्वराचं स्थान मात्र त्याच्या उत्तुंग शिखरांमुळे मनात एक वेगळंच स्थान पटकावून आहे.
वाचने
52135
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख माहिती वल्लीसाहेब.
धन्स रे हेम.
In reply to सुरेख माहिती वल्लीसाहेब. by हेम
नितांत सुंदर
चुना नाहिये..दगडातला दोष आहे
In reply to नितांत सुंदर by चित्रगुप्त
सिन्नरचे गोंदेश्वर शिवपंचायतन
गोन्देश्वर मन्दिर
तुमच्यातील शिल्प माहितीचा
वा.
ha lekh vachun jayla have
तुम्हाला हेच अपेक्षित आहे का?
In reply to ha lekh vachun jayla have by MipaPremiYogesh
Ho Hach Bhag
In reply to तुम्हाला हेच अपेक्षित आहे का? by प्रचेतस
मस्तच
भारतीय मूर्तीशास्त्र आख्ख्या
In reply to मस्तच by सविता००१
हं
In reply to भारतीय मूर्तीशास्त्र आख्ख्या by प्रचेतस
वाखू साठवली आहे.
या माझं नाशिक ( http://www
खुप खुप छान मंदिर आहे आणि
झकास लेख!!