आई

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
21 Oct 2018 - 3:45 pm

एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा.
... बाजूच्याच एका झाडाखाली एक कोवळं कोकरू बसलेलं त्याला दिसायचं. त्या वाद्याचा ताल कानात साठवत एकाग्र बसलेलं... तो निघाला की जाताना प्रेमानं त्या गोंडस कोकराच्या पाठीवरून हात फिरवायचा, आणि ते कोकरू त्याच्याकडे पाहायचं. डबडबलेल्या डोळ्यांनी!!
हे कोकरू त्याच्यासाठी कोडं होऊ लागलं. रोज न चुकतां झाडाखाली बसून त्या वाद्यातून निघणारा ताल एकाग्रतेने ऐकताना त्याचे डोळे पाण्यानी भरतात, ते आतून गदगदत असतं, हे त्या वादकाला जाणवू लागलं.
आपल्या वादनानं अवघं आसपास आनंदून मोहरत असताना हे कोकरू मात्र कळवळून आतल्या आत आक्रोश करते, या जाणीवेनं वादक अस्वस्थ होऊ लागला...
त्या संध्याकाळीही तो निघाला, नेहमीप्रमाणे कोकराला गोंजारलं, आणि बेचैन सुरात त्यानं त्या कोकराला विचारले, 'माझ्या वाद्याच्या तालाने सारी सृष्टी मोहरत असताना, तू मात्र दु:खानं झुरत असतोस... असं का?'
कोकरानं केविलवाण्या ओल्या नजरेनं वादकाकडे पाहिलं. एक हुंदका घशातूनच मागे परतवला, आणि लांबवर कुठेतरी नजर लावून ते बोलू लागलं...
'तुमची बोटं ज्या वाद्यातून स्वर्गीय सूर उमटवतात, त्या वाद्याचं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही वाजवू लागता तेव्हा उमटणाऱ्या सुरातून मला माझ्या आईचा आवाज एेकू येतो, ती माझ्याशी बोलू लागते, आणि मी आईच्या आठवणीत बुडून तिच्या सहवासाचं सुख शोधू लागतो...'
वादक त्या कोकराच्या प्रत्येक शब्दागणिक अधिकच बेचैन होत होता.
त्यानं पुन्हा ते वाद्य उघडलं, थाप मारली, आणि ताल धरला.
आता फक्त त्या पिल्लासाठी आईचे बोल उमटत होते!!
दोघंही भान विसरले होते.
अचानक वारा वाहू लागला, ढग दाटले आणि अवघं आकाश बरसू लागलं!!

...आई या शब्दातच जादू असते!!

ही कथा दूरदर्शनच्या एका जुन्या मैफिलीत संवादकाने ऐकवली, अन् मला ग्रेस आठवला!
तेही एक कोडंच!
कधी सहज सुटणारं, कधी कधीच न आकळणारं!!

मग ग्रेसच्या लेखणीतून उमटलेले ते शब्दही आठवले, अन् आश्चर्य म्हणजे, त्या छोट्या पडद्यावर त्याच शब्दांना सुरांना साज चढत गेला...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता !

....गाणं संपलं, आणि मला पुढचं, एक अव्यक्त कडवंही आठवलं..

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

... बाहेर पाऊस रिमझिम निनादतच होता!
_________________________________

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

गतीशील's picture

21 Oct 2018 - 9:27 pm | गतीशील

माझी आई जेव्हा गेली तेव्हापासुन मला हे गाणे खूप भिडते काळजाला.
आत्तासुद्धा काय लिहावे हे कळत नाहीये..

गोष्ट आधी ऐकली होती, पण गोष्ट आणि या गाण्याची सांगड छान जमली आहे..

लिहीत रहा..

मुक्त विहारि's picture

22 Oct 2018 - 12:16 am | मुक्त विहारि

लेख आवडला....

ज्योति अळवणी's picture

22 Oct 2018 - 1:11 am | ज्योति अळवणी

आवडलं

मला फक्त आवडलंच नाही तर बरंच काही आठवलं .. हृदयस्पर्शी लेखन

pradnya deshpande's picture

23 Oct 2018 - 12:26 pm | pradnya deshpande

. हृदयस्पर्शी

सिरुसेरि's picture

23 Oct 2018 - 2:23 pm | सिरुसेरि

सुन्न ... निशब्द ...

सिद्धार्थ ४'s picture

23 Oct 2018 - 3:02 pm | सिद्धार्थ ४

मनाला भिडलं एकदम.
फक्त एकच सांगू इच्छितो कि हे गाणं ग्रेसनी आईवर लिहिलेले नाही.

माझ्या माहिती प्रमाणे ग्रेसने हे गाणे आईवरच लिहिलेले आहे.
फक्त त्यांनी ज्या पार्श्वभुमीवर ही कविता लिहीली आहे त्याला या लेखात दिलेली कथा पुरक होत नाहीये.
पैजारबुवा,

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Oct 2018 - 4:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

+१. नक्की आठवत नाही पण बहुतेक सावत्र आईवर, मृत्यू सोडून थोड्या वेगळ्या संदर्भात.

यशोधरा's picture

23 Oct 2018 - 4:59 pm | यशोधरा

आईवरच लिहिलेले आहे.