पावसाळी भटकंती : पेठ / कोथळीगड (Peth /Kothaligad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
12 Oct 2018 - 12:35 pm

कोकणातील प्राचीन बंदरातून म्हणजे डहाणु, नालासोपारा, चौल, महाड, दाभोळ इथून माल देशावरच्या पैठण, जुन्नर, तेर, करहाटक ( कर्‍हाड) , कोल्हापुर या शहरात व्यापारासाठी नेला जाई. हा माल बैल आणि गाढवावर लादून नेला जात असे. सहाजिकच हि जनावरे जिथे दमतील त्या चालीवर विश्रांतीस्थळे म्हणजेच, लयनस्थळे अर्थात लेणी कोरली गेली. या लेण्यांना आणि व्यापारी तांड्यना सरंक्षणाची गरज निर्माण झाली.
Kothaligad 1
तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली. असाच एक देश आणि कोकण यांच्या सीमेवरचा गड म्हणजे "कोथळीगड". पेठ गावाच्या सानिध्याने याला "पेठचा किल्ला" असेही नाव आहे. अतिशय प्राचीन कालखंडापासून साक्षिदार असणार्‍या या गडाची आपल्याला आज सहल करायची आहे.
Kothaligad 2
मुंबई-पुण्यापासून अतिशय जवळ असल्याने या गडावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अलिकडे ट्रेकिंगचे फॅड बोकाळल्याने तर इथे बर्‍याच सुविधा निर्माण झाल्यात. इथे जाणेही तुलनेने सोपे आहे.
१)कर्जतहून एस.टी. ने कशेळेमार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० किमी आहे. किंवा थेट जामरुख गावी गेले तरी तेथून थेट गडावर जाता येते. कर्जतवरुन जामरुखला जाणार्‍या बसचे वेळा आहेत, सकाळी ८.३०, १०.४५,११.३०, १.००,४.१५, ७.३० आणि परतीच्या वेळा जामरुखवरुन पहाटे ५.३०, ९.००, १०.३०, १२.००, १.२० आणि ४.३०. अर्थातच वेळांची खात्री केलेली चांगली. याशिवाय कर्जत- आंबिवली या मार्गावर खाजगी सहा आसनी रिक्षा धावतात. यांचे भाडे आधी ठरवून घेतलेले चांगले. माझ्या माहितीतील दोन रिक्षांच्या चालकांचे संपर्क क्रमांक देतो जे ट्रेकचे नियोजन करताना उपयोगी पडतील. श्री. गणेश - ७७७३९४९०६८ आणि रोशन - ७०६६९६१४३१
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
बहुतेक ट्रेकर्स आंबिवली गावातून गडावर जातात. मात्र माझ्या अनुभवाप्रमाणे जांबरुखकडून कमी वेळात गडावर पोहचता येते. जांबरुखवरून आपण २ तासात गडावर पोहचू शकतो तर आंबिवलीतून जवळपास २.५ ते ३ तास लागतात. मात्र आंबिवली गावाच्या हद्दीत एक लेणे आहे ते पहायचे असेल तर आंबिवलीकडून जाणे योग्य होईल. शिवाय आंबिवलीमधे आता दोन-तीन हॉटेल झाली आहेत, इथे आधी सांगितले तर नाष्टा, जेवायची व्यवस्था होउ शकते. यासाठी हॉटेल कोथळीगड ( संपर्क- श्री. गोपाळ सावंत -9028269575, 8446880454 ) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबिवली गाव जसजसे जवळ येईल तसे एखाद्या उपड्या ठेवलेल्या नरसाळ्याच्या आकाराचा कोथळीगड आपल्या नजरेत भरतो.
Kothaligad 3
आधी आंबिवली गावाच्या हद्दीतील लेणे पहाणे सोयीचे कारण किल्ला पहाताना थोडा उशीर झाला तर लेणे पहाणे राहून जाते. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून निघून कुसूर घाटावरच्या पठारावरच्या गावी जोडलेल्या प्राचीन मार्गावर उल्हास नदीच्या उपनदीच्या किनार्‍यावर हे लेणे आहे. ईथे जवळपास पुर्वी लहान वस्ती असावी कारण जवळपास मृदाभांड्याची खापरे सापडतात. हा बहुधा नुसताच विहार आहे. आतमधे षोडशकोनी स्तंभ आहेत आणि त्यावर पाच ठिकाणी प्राकृत भाषेतील शिलालेख आहेत, मात्र ते झिजलेले आहेत. ह्या शिलालेखावरुन हे लेणे बहुधा ३ ते ४ शतकातील असावे. मुळ बौध्द लेण्याचे कालांतराने हिंदु लेण्यात रुपांतर झालेले दिसते. सध्या ईथे राधा-कृष्णाची, पद्मधारी विष्णु-लक्ष्मी, मारुतीची मुर्ती दिसते. सर्व खोल्यांच्या प्रवेशद्वराला लाकडी चौकटीसाठी खोबणी आहेत. सभागृहाच्या मध्यभागी होमकुंडासाठी खड्डा दिसतो. याशिवाय लेण्याच्या बाहेरच्या बाजुला पाण्याची कोरीव टाकी आहेत.
Kothaligad 4
लेणी पाहून आंबिवली गावातून जांभुळवाडीकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याने निघाले कि एक डांबरी सडक डाव्या हाताला वर चढते. कोथळीगड ज्या पठारावर उठावला आहे, त्या पठाराला जोडून एक टेकडी आहे, हिच टेकडी आपण चढत असतो. इथे सध्या कच्चा गाडी रस्ता झाल्याने बाईकसारखे वहान असेल तर थेट वरपर्यंत नेउ शकतो. अर्थात पावसाळ्यात हे टाळलेले बरे. शिवाय रस्ता तसा अरुंद असल्याने कारसारखे वहान बरोबर असल्यास पायथ्याशी आंबिवलीत लाउन पायी वर जाणेच बरे.
Kothaligad 5
थोडे अंतर गेल्यानंतर इथे चक्क एक टोल नाका केला आहे. सुट्टीच्या दिवशी इथे पैसे वसूल केले जातात. हा अधिकार यांना कोणी दिला, याची अधिकृतता काय, याची कल्पना नाही, कारण अगदी अलिकडे म्हणजे १५ ऑगस्ट २०१८ ला मी गेलो होतो तेव्हा ईथे कोणी नव्हते.
Kothaligad 6
वळणावळणाच्या वाटेने आपण एका प्रशस्त पठारावर येउन पोहचतो. इथे पठाराच्या मधोमध सुळक्याचे बोट उभारुन खुणावणारा कोथळीगड नजरेला पडतो.

Kothaligad 41पावसाळा असेल तर इथून कोसळणारे असंख्य धबधबे नजरेला मेजवानी देतात.
Kothaligad 7
इथे क्षणभर विश्रांती घेउन प्रशस्त पण कच्च्या पायवाटेने आपण पुढे निघालो कि नव्याने उभारलेले "भैरवनाथ भोजनालय" दिसते. ( संपर्क - श्री. किरण सावंत -7448286525, 8149440999 आणि श्रीराम सावंत- 9273433840 ) यांच्याकडेही नाष्टा आणि जेवणाची सोय होउ शकते. इथून पुढे निघाल्यावर पेठ गावाच्या आधी एका हॉटेलची छोटी टपरी दिसते, याच्या समोर म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजुला थोड्या झाडीत एक वीरगळीचा दगड दिसतो. दुर्दैवाने हा दगड मला परत येताना दिसला आणि तुफान पावसाने मला कॅमेरा किंवा मोबाईल बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे हा फोटो काढायचा राहून गेला. पण कोथळीगड भेटीत हि वीरगळ अवश्य पहा.
या हॉटेलपासून साधारण अर्ध्या तासात आपण पेठ गावात पोहचतो. चंद्रमौळी घरांची डोंगरवस्ती असलेले हे पेठ गाव निसर्गरम्य आहे.
Kothaligad 8
गावातील मारूती मंदिराच्या आवारात तोफ पहाण्यास मिळते. हि तोफ पंचधातुची असावी.
Kothaligad 9
गावाच्या पार्श्वभुमीवर एखाद्या लोडाला टेकून बसलेला सरदार असावा तसा पेठचा किल्ला दिसतो.
वास्तविक सुळका दिसल्यावर आपल्याला कर्नाळा, रतनगड, माहुली आठवतात. इथल्या सुळक्यावर जायचे म्हणजे रॉक क्लायबिंगची तयारी करावी लागते. इथे मात्र आपल्याला अशी कोणतीही तांत्रिक चढाई न करता सुळक्याच्या माथ्यावर जाता येते. हल्ली मोठ्या प्रमाणात येणार्‍या ट्रेकर्समुळे गावकर्‍यांना बराच रोजगार मिळाला आहे.
Kothaligad 10
गावातील काही घरात आपल्या रहाण्या-जेवणाची सोय होते
Kothaligad 11
तर काही जणांनी बैलगाडी राईडची व्यवस्था केली आहे.
या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते.
Kothaligad 12
( कोथळीगड परिसराचा नकाशा )
Kothaligad 13
काहीसा खडा चढ चढून आपण माथ्याच्या जवळ येतो.एन पावसाळ्यात इथे आल्यास खाली ढग आणि आपण गडावर अशी "आज मै उपर, आसमा नीचे" अशी अनुभुती घ्यायला मिळते.
Kothaligad 14
पायवाटेने वर पोहोचल्यावर कातळकोरीव पायर्‍यांचे नजरेला पडतात.
Kothaligad 15
याच्यापुढे चढून गेल्यावर बांधीव प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. याचा अर्थ सुळक्याभोवती पुर्ण तटबंदी बांधून दुर्गनिर्मिती केली असावी.
Kothaligad 16
हा गड पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहे. अर्थात धमकी देणारा सरकारी खाक्याचा मजकूर सोडला तर पुरातत्व खात्याने इथे नेमके कोणते काम केले आहे याची काही कल्पना नाही. त्या फलकाची अवस्था बघता पुरातत्व खात्याची देखरेख दिसून येतेच.
Kothaligad 17
इथून आपण शेवटचा चढ चढून कातळकोरीव गुहेपाशी येतो. सर्वप्रथम दिसते ती देवीची गुहा, पाण्याचं टाके गुहेत ४५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत. हि गुहा मुक्कामासाठी उत्तम आहे.
Kothaligad 18
गुहेच्या अलिकडे एक पाण्याचे टाके आहे. मात्र इथले पाणी आता गढुळ वाटले.
Kothaligad 19
गुहेमधे हि बहुधा भैरोबाची मुर्ती दिसते.
Kothaligad 20
त्यानंतर जानाई देवीची आणि भैरवाची मुर्ती दिसते.
Kothaligad 21
आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा.
Kothaligad 22
या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
Kothaligad 23
हि मुर्ती नेमकी कोणाची आहे ते समजत नाही, पण दर्पणसुंदरी असावी का?
Kothaligad 24
गुहेतील खांबावर बरेच शिल्पपट कोरलेले दिसतात.
Kothaligad 25
हि मुख्य गुहा पाहून आधी सुळक्याच्या आसपास फेरफटका मारुया.
Kothaligad 26
सुळक्याच्या दक्षीण पायथ्याशी एक पाण्याचे टाके कोरले आहे, आता मात्र ते कोरडे असते.
Kothaligad 27
इथून थोडे पुढे आले कि तटबंदीतील अवशिष्ट बुरुज दिसतो.
Kothaligad 28
याच्यापुढे थोडी सपाटी आहे. इथेच गडावर शिल्लक असणारी तोफ ठेवलेली आहे.
Kothaligad 29
याशिवाय इच्छा आणि वेळ असल्यास गडाच्या सुळक्याभोवती प्रदक्षिणा घालता येते. प्रदक्षिणा घातलताना वाटेत उत्तर टोकाशी पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते.
Kothaligad 30
पायथ्याचे सर्व अवशेष पाहून झाल्यानंतर आपण गडाच्या सुळक्याच्या माथ्यावर जाउया. यासाठी पुन्हा गुहेजवळ येउन एका ऊर्ध्वमुखी भुयारात प्रवेश करावा लागतो.या कोरलेल्या सुळक्यामुळेच गडाला कोथळीगड नाव पडले असावे, कोथळा म्हणजे कोरुन काढणे, म्हणून सुळका कोथळला तो "कोथळीगड".
याच कोथळीगड नावाची आणखी एक कथा सांगितली जाते. फार पुर्वी या डोंगराळ मुलुखात अभीर जातीचे कातकरी लोक रहात, त्यांना "कोथडी" नावाने संबोधले जाई. सोपी टाक, म्हणजे सोपवून टाक, उडवी टाक म्हणजे उडवून टाक अशी भाषा बोलणार्‍या कोथडी ( याचाच अपभ्रंश पुढे कातोडी झाला असावा का? ) लोकांची पेठ गावात मोठी वस्ती होती. शत्रुंपासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या आणि घनदाट जंगलाने वेढलेल्या डोंगरावर एक किल्ला बांधला होता आणि त्याला नाव दिले , "कोथडीगड". पुढे कोथडी नावाचा अपभ्रंश होउन कोथळा किंवा कोथळी असे नाव रुढ झाले. त्यावरुन या डोंगराला 'कोथळा' किंवा कोथळीगड असे नाव पडले जे आजही रुढ आहे. अर्थात हि फक्त दंतकथा आहे आणि त्यात तथ्य नसावे.
Kothaligad 31
वर जाताना उजव्या हाताला हि नक्षीदार चौकट दिसते. इथे एक खोली असावी, मात्र इथे जाणे थोडे अवघड आहे. तर इथेच डाव्या हाताला दगडात कोरलेले दालन दिसते.
Kothaligad 32
सुळक्यावर जाण्यासाठी सुरवातीला व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.
Kothaligad 33
मात्र एक टप्पा थोडा अवघड आहे.
Kothaligad 34
हा टप्पा पार केला कि आपण कातळकोरीव पायर्‍यांच्या मार्गातून गडमाथ्याकडे पोहचतो.
Kothaligad 35
पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे.
Kothaligad 36
पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. शेजारीच शरभ शिल्प आहे.
Kothaligad 37
गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. पाणी अर्थातच पिण्यास अयोग्य आहे. याशिवाय जवळच पहारेकर्‍यांच्या निवासस्थानाच्या घराचे अवशेष दिसतात.
Kothaligad 38
आम्ही एन १५ ऑगस्टला गेल्याने एका सुळक्यावर ध्वजवंदनाचा क्षण अनुभवला.
Kothaligad 39
गडमाथा समुद्रसपाटीपासून १५५० फुट उंचावर आहे. किल्ल्याच्या कुशीत वसलेली पेठवाडीची ईटुकली घरे लोभस दिसतात.
Kothaligad 40
इथे उभारले कि विस्तृत प्रदेश नजरेत भरतो. पुर्वेला पुर्ण सह्याद्रीचा काळा बॅकड्रॉप दिसतो. गडमाथ्यावरुन उत्तरेला भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, तर पश्चिम दिशेला चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. या परिसरात वहाणार्‍या भर्राट वार्‍याचा विचार करुन इथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे.
परिसरातील लेणी, गडाच्या पोटातील लेणे, कातळकोरीव पायर्‍या आणि दरवाजा आणि शरभ शिल्प या सगळ्याचा विचार केला तर हा गड प्राचीन आहे हे नक्की , पण आज तरी याचा ईतिहास अज्ञात आहे.
लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.
शिवाजी महाराजांनी १६५७ मधे हा गड ताब्यात घेतला. विशेष म्हणजे कृष्णाजी अनंत लिखीत सभासद बखरीतील 'नवे गड राजियांनी वसवले, त्यांची नावानिशीवार सुमारी सुमार १११, या दुर्गनामांच्या यादीत 'कोथळागड' हे एक नाव असून यावरून शिवकाळात तरी हा गड 'कोथळागड' म्हणूनच प्रसिध्द होता हे समजते. अर्थात हा गड शिवाजी महाराजांनी नक्कीच वसवला नसावा, फक्त त्याची डागडूजी केली असावी.
पुढे औरंगजेबाच्या स्वारीपर्यंत तो स्वराज्यात होता. औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.
दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.
गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. सन १७१३ मधे शाहु- कान्होजी आंग्रे यांच्यामधील तहानुसार कोथळीगडाची मालकी कान्होजी आंग्रे यांना मिळाली. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. पण ३० डिसेंबर १८१७ ला कॅप्टन ब्रुकने फारसा प्रतिकार न झाल्याने हा गड पुन्हा ईंग्रजांच्या अधिपत्याखाली आणला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.
कोथळीगडाच्या परिसरातून सह्याद्रीची मुख्यरांग धावत असल्याने बर्‍याच घाटवाट देश आणि कोकण यांना जोडतात. कोथळीगडाच्या भटकंतीला जोडून ज्यांना या घाटवाटांच्या चढाई-उतराईचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्या सोयीसाठी घाटवाटांची माहिती देणार्‍या लिंक देतो.
बैलदरा/पायरीची घाटवाट - कोथळीगड (पेठचा किल्ला) - कौल्याची धार

पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: खेतोबा/ वाजंत्री घाट अन् नाखिंदा घाट

पाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री

नाळेची वाट, बैल घाट आणि कौल्याची धार

( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) रायगड जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साथ सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
७ ) दुर्गकथा - महेश तेंडूलकर
८ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

लेखन आवडले !

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Oct 2018 - 8:51 am | प्रचेतस

ह्यावेळी बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख आला.

नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. तुम्ही उल्लेख केलेली पंचधातूची तोफ ही उखळी तोफ असावी. लेण्यातील मूर्ती ही दर्पणसुंदरीची नसून पत्रलेखिकेची असावी असे तिच्या मुद्रेवरुन दिसते. अर्थात इथे नायिका जवळपास नाहीतच त्यामुळे ही मूर्ती बहुधा शालभंजिचेची किंवा देवतेचीही असू शकेल.

पेठ किल्ल्याच्या आसपास आणि थेट किल्ल्यावर असलेले लेणे पाहता हा गड प्राचीन असावा हे निश्चन्चय. गडावर आता आता लोकांचा राबता वाढला. १०/१५ वर्षांपूर्वी इकडे जाणं बर्‍यापैकी दुर्गम होतं, आंबिवलीच्या गाड्या कमी असत. मोठी पायपीट ठरलेली असे.

यशोधरा's picture

13 Oct 2018 - 9:59 am | यशोधरा

छान, माहितीपूर्ण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2018 - 11:14 am | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि सुंदर फोटो असलेला भटकंती लेख !

तुम्ही उल्लेख केलेली पंचधातूची तोफ ही उखळी तोफ असावी.
+१

खालच्या लेण्यापाशी मिपा महाकट्टा झाला होता. आदल्या दिवशी मी गडावर , आणि मुक्तविहारि वनविहारात राहिले होते.
बाकी तो गड आहेच मजेदार.

गड, तोफा, शिल्पे, फोटो आणि माहिती सगळंच छान.

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार. सध्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामुळे नियमित लिहीणे शक्य होत नाही. तरीही वेळ मिळेल तसे लिहीण्याचा प्रयत्न करेन.