श्रीगणेश लेखमाला - दर वर्षी असं होतं...

शाली's picture
शाली in लेखमाला
14 Sep 2018 - 10:00 am

.

दर वर्षी असं होतं...

‘नेमिच येतो पावसाळा’ असं म्हणण्यात काही अर्थ राहिला नाही आजकाल. तो कधीही येतो. कधी कधी येतही नाही. लहरी झालाय तो माणसांसारखाच. मात्र पंचांगाप्रमाणे श्रावण येतो आणि मागोमाग भाद्रपदही येतो. पण श्रावण आला की बायको वैतागते आणि भाद्रपद आला की मुलगी चिडते. निमित्त श्रावणाचं आणि भाद्रपदाचं असलं, तरी या वैताग आणि चिडचिडीला कारण असतो मी. म्हणजे श्रावण आला की मी अचानक फार काटेकोर, रूढीप्रिय वगैरे होतो. अर्थात मला फायद्याच्या असणाऱ्या रूढी आणि परंपराच मी पाळतो हा भाग वेगळा. श्रावणात मी एकही उपवास करत नाही. मला झेपतच नाही उपवास. पण बाकीच्या गोष्टी मात्र मी अगदी कसोशीने पाळतो. श्रावणाचे तीसही दिवस मी ताटात जेवत नाही. कुणाला जेवूही देत नाही. मला रोज केळीची स्वच्छ आणि कोवळी पानं लागतात. उपवास नाही केले, तरी फराळाचे वेगवेगळे पदार्थ मला हवे असतात. दर सोमवारी संध्याकाळी मला डावं-उजवं व्यवस्थित सजवलेलं पान हवं असतं. फक्त अळूवडीवर माझं भागत नाही. “पाच-सहा अळूच्या पानांचं फदफदंही कर गं जरा.” ही फर्माइश असतेच. श्रावणात मला अचानक चौरस आहाराचं महत्त्व कळतं. आहारात दही, फोडणीचं ताक, सलाड, रायतं यांचं किती महत्त्व आहे हे मला नव्याने जाणवतं.
“पंचामृत हे काही पूजेसाठी फुलपात्रभर करायची गोष्ट आहे का? चांगलं वाडगाभर कर आज. किती फायदे आहेत पंचामृताचे, माहीत आहे का?” असं म्हणून मी दोन-तीन वाट्या पंचामृत संपवतो. (त्यासाठीचा मध मित्राने गावावरून पाठवलेला असते. अगदी शेतातल्या झाडावरून काढलेला.)

सगळे रस आहारात हवेच. मग कुरकुरीत कारल्याच्या खमंग काचऱ्या हव्यातच. मेथीची भाजी हवीच. शनिवारी कोरडं पिठलं पानात हवंच. खिरीशिवाय का कुठे श्रावण होतो? मग खीर हवीच. “परवाची तांदळाची खीर सुरेख झाली होती ना! मला आवडलीच. जरा शेवयांचीही करून बघ ना! चिऊला आवडते खूप.” असं थोडं कौतुक, थोडं इमोशनल ब्लॅकमेल करून मी खिरीचे चार तरी प्रकार श्रावण सरेपर्यंत करायला लावतो. दुधीची भाजी आवडत नाही, म्हणून मग हलवा करणं क्रमप्राप्तच होतं बायकोला. दुधी पोटात जायला हवा की नको? मग? याशिवाय जन्माष्टमीचा सुंठवडा, नारळीपौर्णिमेचा नारळीभात किंवा साखरभात यासारखे प्रकार सुरूच असतात. आणि या सर्व श्रावणभर चालणाऱ्या व्यापात बायकोला मी काडीचीही मदत करत नाही. काडीची म्हणजे शब्दशः. मेथीची जाऊ द्या, पण साधी कोथिंबिरीचीही काडी मी निवडून देत नाही. मी कधी वजन केलं नाही, पण खातरीने श्रावणात बायकोचं दोन किलो वजन कमी होत असणार आणि माझं खचितच वाढत असणार. श्रावण सरला की बायको चक्क “हुश्श” करते.

पण भाद्रपद आला की मग मात्र घरातले काही नियम बदलतात. गणेशचतुर्थीपर्यंत मला ड्रायव्हिंगला परवानगी नसते. गाडी चालवणं राहू द्या, संध्याकाळी फिरायलाही परवानगी नसते. फिरायचंच असेल तर चतुर्थीपर्यंत मार्ग बदललेला असतो. आमच्या सोसायटीच्या मागे एक छोटीशी टेकडी आहे. ती एव्हाना छान हिरवाईने नटलेली असते. त्या टेकडीवर फिरायला जाणं सुरू होतं. हे सगळं का चाललेलं असतं ते मला कळतं, पण मायलेकींपुढे माझं काही चालत नाही. अर्थात मीही काही कमी प्रयत्न करत नाही, पण दोघीही अत्यंत सावध असतात.

“अगं, येताना भाजी तरी आणता येते मंडईतून. टेकडीवरून काय गवत आणायचं का?” माझा लहानसा प्रयत्न.
“मी आणलीये सकाळीच भाजी आणि दही. टेकडीवरच जाऊ या.” बायको शिताफीने माझा प्रयत्न हाणून पाडते.
कधीकधी मी चप्पल घालून दारातूनच सांगतो, “ऐक रमा, मी जरा केस कापून येतो. तुला आणायचंय का काही?”
बायको तत्परतेने बाहेर येऊन विचारते, “आता कुणाचे केस कापायला चाललास? न्हाव्याचे?”
मी आपला "तू फारच बुवा विनोदी!" असा चेहरा करून उभा असतो, तोवर बायको आठवण करून देते - “तू मागच्याच आठवड्यात कापलेत केस. आता काय झिरो मशीन मारणार आहेस?”
मग मात्र मी बहाणे वगैरे बाजूला ठेवून सरळ मुद्द्यावर येतो. “गणपतीचे स्टॉल्स लागलेत का ते पाहून येतो. चौकात काही स्टॉल्स लागलेत म्हणजे आपलेही स्टॉल्स लागलेच असणार.”
“स्टॉल्स लागलेत, पण त्यांची अजून मांडामांडच चालली आहे. इतक्यात जाऊन काय करणारेस? आता ‘त्यांना जरा मदत करतो मांडायला’ असं काही म्हणून नकोस हां. तुझा काही भरवसा नाही.” बायको टोचून बोलून टाळते.
मग लॅपटॉप उघडून मागील काही वर्षांचे गणपतीचे फोटो पाहत कसंबसं समाधान करून घेतो. घरभर नजर फिरवतो. या वर्षी कुठे स्थापना करायची बाप्पाची, यावर विचार करतो. ‘शास्त्र’ यावर माझा फारसा विश्वास नसल्याने मला दिशा वगैरे गोष्टी आड येत नाही. पण बायको आणि मुलगी माझी ही ‘नजर’देखील ओळखून असतात. मी असा चौकस नजरेने घरभर पाहायला सुरुवात केली की पहिली वॉर्निंग असते मुलीची. “बाबा, माझ्या खोलीत नाही बसवायचा हां गणपती. अगोदरच सांगते.” म्हणत ती तिचा निर्णय जाहीर करते. बायकोला तर जणू सुड घ्यायला संधीच मिळालेली असते. तिच्या डोळ्यापुढून सगळ्या श्रावण महिन्यातली धावपळ सरकून जाते. त्यामुळे तिची भूमिका ठाम असते.
“तुला हवी तिथे स्थापना कर गणपतीची. मी मदत नाही करणार अजिबात. मला माझी कामं आहेत. आणि सोफा अजिबात हलवायचा नाही जागेवरून. टीव्हीसुद्धा अनमाउंट नाही करायचा. मागच्या वर्षी दहा दिवस बंद होता टीव्ही.”

मग माझी तणतण सुरू होते. लहानमोठ्या गोष्टींवरून मी चिडायला लागतो. कशावरूनही वाद सुरू करून तो शेवटी गणपतीवर आणून ठेवतो. “गणपती आल्यावर फक्त मलाच आशीर्वाद देणार आहेत जसे काय!” किंवा “गेल्या जन्मी ख्रिस्तांव होत्या की काय दोघी?” यासारखी वाक्यं मी कुठल्याही वादात वापरायला सुरुवात करतो. पण दोघीही एखाद्या योग्यालाच शोभेल अशा ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीच्या होतात. मग मी ठेवणीतलं हत्यार वापरतो. पानात वाढलेली आवडती भाजी न खाता दूध-पोळी खाणं, शेवटचा भात न घेणं, न बोलता जेवणं वगैरे. या ब्रह्मास्त्रापुढे काही बायकोचा टिकाव लागत नाही. “बसव तुला कुठे बसवायचाय तिथे तुझा गणपती” अशी वैतागून का होईना, परवानगी मिळते. मुलगी तिचं स्टडी टेबल द्यायची तयारी दाखवते. लढाईतली पहिली चकमक मी जिंकलेली असते. गणपती म्हटलं की मला इतका उत्साह असतो असतो की अशा चकमकींनी काही तो तसूभरही कमी होत नाही. मग यादी सुरू होते दहा दिवसांच्या दहा प्रसादांची. विचार करून, चारदा नावं खोडून एकदाची मी प्रसादांची आणि नैवेद्यांची यादी बनवून बायकोच्या मोबाइलमध्ये ‘टु डू लिस्ट’मध्ये तसंच कॅलेंडमध्येही टाकून देतो. जरा घाबरत पण वरवर अगदी सहज आवाजात बायकोला सूचना देतो, “रमा, जरा प्रसादाची यादी बघ टू डू लिस्टमधली आणि काय काय हवंय ते सांग, म्हणजे मी आणून देईन तुला.” माझं हे ‘आणून देईन तुला’ हे फक्त मधाचं बोट असतं, हे बायकोला माहितेए. येथवर दोघीही मला कशाबशा सहन करतात. पण जेव्हा गणपतीची मूर्ती बुक करायला जायचं असतं, तेव्हा मात्र दोघींच्या अंगावर अगदी काटा येतो. या एका प्रसंगाला टाळण्यासाठी आठ दिवस मला बाहेर कुठे सोडलेलं नसतं दोघींनी. “तुम्ही माझ्याबरोबर साड्या घ्यायला येऊ नका आणि मी तुमच्याबरोबर गणपती पसंत करायला येत नाही” असा एक मार्ग बायकोने गेल्या वर्षी काढून पाहिला होता. पण असलं काही मी ऐकून घेत नाही कधी. “घरचा गणपती कसा सगळ्यांनी मिळून पसंत करायला हवा” हे माझं मत अगदी ठाम असतं. म्हणजे फक्त बोलण्यापुरतं. शेवटी मला हवा तोच बाप्पा घरी येतो, हा भाग वेगळा.

एका सकाळी मी कुर्ता वगैरे घालून तयार होतो. मुलीला आवाज देतो. “चिऊ चल, गणपती पसंत करून येऊ. आईला नंतर नेऊ गणपती दाखवायला.”
तेवढ्यात बायको टोकून जातेच. “अरे, गणपती पसंत करायला चाललाय की आणायला? झब्बा कशाला घातला लगेच?” खरं तर ती सहज बोलून जाते, पण मला या दिवसात दोघी जे बोलतात ते मुद्दाम मलाच बोलतात असं वाटत राहतं. तेवढ्यात कन्यारत्न “बाबा, तू एकटाच जाशील का? मला काम आहे.” म्हणून अंग झटकते.
“असं काय करते चिऊ! चल की. येताना माँजिनीजमध्ये लाव्हा केक खाऊ या.”
“नकोय मला केक.”
रमा येऊन हसत हसत काडी टाकतेच, “जाऊन ये चिऊ. एवढ्यात कंटाळून कसं चालेल? ही तर पहिली चक्कर आहे बाळ.”
“नको गं आई. बाबा फार विचित्र वागतो कधीकधी. मागच्या वेळी स्टॉलमध्येच मूर्तीच्या पायावर डोकं टेकवलं. काय, तर म्हणे बाप्पाच्या पायाचे दोन्ही अंगठे कपाळाला लागतायेत की नाही व्यवस्थित ते पाहत होतो. सगळे हसत होते.” चिऊ वैतागून म्हणते.
“बघ, बघ आपली कारटी. आत्ता कालपर्यंत ‘माझा बाबा सुपरमॅन आहे’ म्हणत होती. आता बापाची लाज वाटते म्हणे.” मी नेहमीचं ‘चिडण्याचं’ हत्यार काढतो.
“बाबा, तू कुठली गोष्ट कुठेही नेऊ नको हां. मी असं काही म्हणाले नाहीए. येते मी हवं तर.” बाण बरोबर लागलेला असतो. खरं तर तिचं काही चुकीचं नसतं. पण मला लागतात बाप्पाचे पाय तसे. लहान मुलांच्या तळव्यांचे अंगठे कसे किंचित वर उचललेले असतात, अगदी तसे. त्याला काय करणार! रोज सकाळी बाप्पाच्या पाया पडताना त्या दोन अंगठ्यांचा थंड स्पर्श दोन भुवयांच्या मध्ये झाल्यावर दिवस कसा छान जातो. असो. शेवटी वैतागून का होईना, पण चिऊ कपडे बदलते. आम्ही निघतो.
नवऱ्याची चक्कर फुकट जाऊ देईल ती बायको कसली! आम्ही पार्किंगमध्ये असताना रमा मोठ्याने आवाज देऊन सामानाची यादी टेरेसमधून खाली फेकतेच. पण गणपती पाहायच्या आनंदात मला काही ती यादी आणि त्यातले सामान जड नसते.

आम्ही प्रथम चौकात जाऊन प्रत्येक स्टॉलवर थांबतो. प्रत्येक मूर्ती बारकाईने पाहतो. मग आमच्या नेहमीच्या स्टॉल्सकडे मोर्चा वळवतो. बाईक पार्क करत असतानाच पाटीलभाऊ आमच्याकडे पाहून हसतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. बायको आणि मुलगी कितीही हसल्या माझ्या या सवयीला, तरी पाटीलभाऊ मात्र माझ्यावर जाम खूश आहेत. इतक्या वर्षांच्या सवयीने त्यांना माझा चिकित्सक स्वभाव माहीत झालेला आहे. त्यांचं नाव पाटील. पदवीधर आहे, स्वतः मूर्तिकार आहे. त्यांचा हडपसरजवळ कारखाना आहे. जवळजवळ दहा महिने मूर्ती बनवण्याचं काम चालतं त्यांचं. त्यांनी एका रविवारी अगदी हट्टाने मला त्यांच्या कारखान्यावर नेऊन मूर्ती कशा बनतात, नवीन मॉडेलचं क्ले वर्क कसं होतं, त्यांचा साचा कसा तयार होतो इत्यादी गोष्टी अगदी प्रात्यक्षिकासहित दाखवून माझा रविवार सार्थकी लावला होता. ‘मला मूर्तिकलेतली जाण आहे’ असा त्यांचा एक गैरसमज आहे. त्यामुळे मी पन्नास स्टॉल्स पालथे घालून जेव्हा त्याच्याच दुकानातून मूर्ती घेतो, तेव्हा त्यांचा चेहरा अगदी पारितोषिक वगैरे मिळाल्यासारखा होतो.

आम्हाला पाहून “काय दीदी, मम्मीला नाही आणलं?” असं एखादं वाक्य म्हणून अगदी ‘सहर्ष’ स्वागत करतात.
“साहेब, तुम्ही पहिल्यांदा सगळ्या मूर्ती पाहून घ्या व्यवस्थित, मग बोलू” म्हणत कामावरच्या एखाद्या मुलाला ज्यूसची ऑर्डर द्यायला पिटाळतात. चिऊ मला जेवढी वैतागते, त्यापेक्षा जास्त या स्टॉलवाल्या काकांवर वैतागते. कारण मी ज्या उत्साहात मूर्ती पाहतो, त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने ते मूर्ती दाखवत असतात. “बाबाला नाही उद्योग, पण यांना बाकीच्या गिऱ्हाइकांची काळजी नाही का?” असा तिला प्रश्न पडतो.

ज्यूस पिता पिता आमच्या सगळ्या मूर्ती पाहून होतात. मग पाटीलभाऊ आम्हाला पाठीमागचा पडदा बाजूला सारून दुकानाच्या मागील बाजूला नेतात. तिथे भाताच्या तुसांच्या पसाऱ्यात अनेक खोकी रचलेली असतात. तिथेच एका कोपऱ्यात काही मूर्ती ठेवलेल्या असतात. या मूर्ती ‘खास’ ग्राहकांसाठी भाऊंनी निवडून ठेवलेल्या असतात. आहाहा, काय सुरेख आणि मोहक रूप असतं एकेका मूर्तीचं! मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मग या मूर्तींची व्यवस्थित पाहणी करून आम्ही निघतो.
“संध्याकाळी येतो मूर्ती बुक करायला.” म्हणत मी गाडीला किक मारतो.

“केली मूर्ती बुक? आणि सामान कुठेय?” बायको विचारते.
“नाही गं. चार-पाच आवडल्यात. तुला घेऊन जाईन संध्याकाळी, तेव्हा तूच निवड त्यातली एक.” सामानाचा विषय मी शिताफीने टाळतो.
“बाबा, आज रविवार होता म्हणून मी आले. संध्याकाळी तू आणि आई दोघेच जा. माझा अभ्यास राहिलाय बराच.” म्हणत चिऊ अंग काढून घेते.

संध्याकाळी पुनश्च माझी स्वारी सपत्नीक गणपतीच्या स्टॉलवर हजर होते. मग सकाळी निवडलेल्या चार-पाच मूर्तींवर पुन्हा एकदा सखोल चर्चा होऊन एक मूर्ती निवडली जाते. १०१ रुपये देऊन ती बुक केली जाते. अर्थात दर वर्षीच्या अनुभवामुळे बायकोचा या बुकिंगवर फारसा विश्वास नसतो. मग दोन दिवस काय डेकोरेशन करायचं, कुणाकुणाला फोन करायचेत, आजी-आजोबांना कधी बोलवायचं यासारख्या असंख्य प्रश्नांवर खल होतो. म्हणजे मीच बोलत असतो, ठरवत असतो आणि दोघी फक्त माना हलवत असतात. या दोन दिवसात जेव्हा जेव्हा गणपतीच्या स्टॉलसमोरून जायची वेळ येते, तेव्हा तेव्हा मागच्या सीटवरून चिऊ “मी काय म्हणते बाबा, जर समजा आपण…” असं म्हणून लक्ष वेधते.
“अगं बोल ना, काय समजा..?” मी मागे वळून म्हणेतोवर स्टॉल मागे गेलेला असतो. चिऊचं काम झालेलं असतं. “सॉरी, विसरले” म्हणत ती हसते फक्त. मायलेकी अशा वेगवेगळ्या शकला वापरून मला जरी गणपती स्टॉलपासून दूर ठेवत असल्या, तरी त्यांच्या नकळत मी चिऊची सायकल घेऊन स्टॉलवर चार-पाच चकरा मारलेल्या असतात.

“ऐक ना रमा, मी काय म्हणत होतो…”
“काय? बाप्पा सोडून काहीही बोल.”
“बरं, गणपती राहू दे बाजूला. पण तू पाहिलंस का, आपण जी मूर्ती निवडलीये ना, तिच्या डोळ्यातले भाव पाहिले कसे आहेत?”
“हूं…”
“अगं, गणपतीच्या चेहऱ्यावर प्रसन्नपणाच नाहीए. डोळ्यात पाहिल की असं वाटतं ‘याला आपल्या घरी यायचंच नाहीए.”
“तासभर होतो ना आपण तिथे? त्या वेळेस तर ‘किती गोड, किती छान’ करत होतास. तू गेलाच कशाला परत तिकडे?”
“असं काय करतेस रमा. पहिल्यांदा पाहिल्यावर होतं असं. पण दुपारी मी चक्कर मारली परत. पण डोळ्यातले भाव असे आहेत की बळेच आपल्या घरी येतोय बाप्पा.”
“कमाल आहे. कॉलेजमध्ये असताना तुला माझ्या डोळ्यातले भाव नाही वाचता आले कधी. आणि आता बाप्पाच्या डोळ्यात तुला एवढं दिसतं?”
चिऊ हसू दाबते. तिच्या चेहऱ्यावर ‘झालं बाबाचं सुरू’ असे स्पष्ट भाव असतात.
हे खरंय की कॉलेजमध्ये असताना स्वभावामुळे असेल, पण मी आमच्या प्रकरणात कधी पुढाकार घेतला नव्हता. जेव्हा निकराची वेळ आली, तेव्हा रमानेच पुढाकार घेऊन, माझ्या मित्रांच्या मदतीने सगळं जुळवून आणलं होतं. पण ते असं चिऊपुढे बोलून दाखवायची काही गरज होती का?
पण चिऊच माझी बाजू सावरत म्हणते, “काय गं आई, एका साडीसाठी सगळा लक्ष्मी रोड पालथा घालतेस तरी बाबा काही बोलतो का? बाबाने एकदा गणपती बदलला तर तुला कशाला त्रास व्हायला पाहिजे एवढा?”
चिऊमुळे मला जरा आधार मिळतो. रमा म्हणते, “बरं बाबा, जाऊ संध्याकाळी परत आणि दुसरा बुक करू या. तू कॉफी घेणारेस का थोडी?”

संध्याकाळी बायकोसोबत भाजी घेताना माझं सारखं चाललेलं असतं, “आवर गं लवकर. घे समोर दिसतीय ती भाजी. भोपळा तर भोपळा. घे तू.”
पण बायकोला जणू काही मी दिसतच नसतो. तिचं नेहमीप्रमाणे “काका, नीट द्या हो पाहून. मागच्या वेळी निम्मी खराब निघाली.” किंवा “काय मावशी, कशीये तब्बेत आता? मुलाला पाठवत जा आता” असं निवांत चाललेलं असतं. मागच्या वेळी नक्की काय खराब निघालं ते त्या काकाला बरोबर कळतं. नथ सावरत म्हातारी मावशी “खरंय तुझं बाई. दारच्याला काळजी पन घरच्याला काय हाय का?” अशी व्यथा बोलून दाखवत भाजी देते. आता ही म्हातारी पोराच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचते की काय, अशी भीती वाटल्यामुळे मी अगोदरच पुढे गेलेला असतो. कशीबशी मंडई उरकून बॅग मागच्या सीटवर फेकून आम्ही गणपती स्टॉलवर हजर. आम्हाला पाहून पाटीलभाऊंना अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्यांना आता सवय झालीय इतक्या वर्षांत. ते पुन्हा तसंच सहर्ष स्वागत करतात. आम्ही दोघे परत मूर्ती पाहायला सुरुवात करतो. आम्ही दोघे म्हणजे बायको मस्त खुर्चीवर टेकलेली असते, मीच वर-खाली करत असतो. मागे मागे पाटीलभाऊ. मग पुन्हा परवाचा क्रम पार पडतो. चार-पाच मूर्ती निवडून पाटीलभाऊ समोर शेजारी शेजारी मांडतात. एखादा चित्रकार जसा आपल्या पेंटिंगकडे जरा दूर जाऊन कधी इकडे मान करून पाहतो, कधी तिकडे मान करून पाहतो, तसं माझं चाललेलं असतं. रमा उठते. सगळ्या मूर्ती नजरेखालून घालते. माझा अंदाज घेऊन चाणाक्षपणे मला आवडलेल्या मूर्तीवर बोट ठेवून म्हणते, “मला तर हीच सगळ्यात जास्त आवडली. तुला?”
“तुझी न् माझी आवड अगदी सेम आहे. मलाही तोच आवडलाय. हाच फायनल करू. आता दुसरं काही बघायला नको.”
“नक्की ना? नीट बघ परत. वरदहस्ताची बोटं तुला हवी तशी बाकदार आहेत. मोदकाचा हातसुद्धा एकदम सुबक आहे.” रमा खातरी करून घेते.
“हो गं. पाहिलीत मी. म्हणूनच आवडलाय. पायाचे अंगठे बघ कसे सुरेख आहेत. चिऊ झाली त्या वेळी तिचे असेच होते अगदी.” मी फारच खूश असतो त्या मूर्तीवर.
तरीही रमा खातरी करुन घ्यायची म्हणून विचारते, “डोळे बघ तुला हवेत तसे आहेत का? मला तर छानच दिसताहेत.”
“डोळे तर सुरेखच. अगदी मधाचा थेंब टाकल्यासारखे दिसताहेत. हसतोय असं वाटतं की नाही डोळ्यात पाहून?”
रमा फक्त हसते.
"हसू नको. खरंच! नीट बघ. तुला काय दिसणार म्हणा. मनात भाव पाहिजे ना!”
माझं आता समाधान झालेलं असतं. मी मोबाइल काढून सगळ्या बाजूंनी बाप्पाचे फोटो घेतो. आपला निर्णय कसा योग्य होता मूर्ती बदलण्याचा, हे बायकोला कळावं म्हणून मी पाटीलभाऊंना परवा बुक केलेली मूर्ती दाखवायला सांगतो. भाऊ ती मूर्ती या नवीन मूर्तीच्या शेजारी ठेवतात. आम्ही आज निवडलेली मूर्ती खचितच सुंदर असते. बायकोही हे मान्य करते. पण परवाच्या मूर्तीच्या सोंडेत बुकिंगची पावती पाहून ती विचारते, “भाऊ, चिठ्ठी लावू नका सांगूनही का लावलीत?"
भाऊ कसंनुसं हसत म्हणतात, “तुमच्या गणपतीच्या सोंडेत कधी चिठ्ठी लावली आहे का वहिनी? हा दुसऱ्याने बुक केलाय म्हणून लावली. साहेब हा घेणार नाही, बदलणार मूर्ती हे माहीतच होतं. मग कशाला दुसरं गिऱ्हाईक सोडायचं?”
बायको माझ्याकडे पाहून हसते. त्या हसण्यातली टिंगल पाटीलभाऊंना जरी नाही दिसली, तरी मला स्पष्ट दिसते.

************

गणपतीला आठ दिवस राहिले होते. माझी बहुतेक तयारी झाली होती. दोन कुर्ते, एक धोतरजोडी, कद घेऊन झाले होते. डेकोरेशन झालेलं होतं. फक्त चतुर्थीच्या आदल्या दिवशी असेंबल करायचं बाकी होतं. आई-बाबांना दोन वेळा फोन झालेला होता. मित्रांच्या गणपतींचे फोटो मेसेंजरवर आलेले होते. त्यांच्याबरोबर माझ्या बाप्पाची तुलना करून झालेली होती. बाप्पाचे फोटो आयपॅडवर झूम करून करून पाहण्याव्यतिरिक्त काही काम नव्हतं. फोटो बघताना मला अचानक जाणवलं.
“चिऊ, जरा इकडे ये ना.” मला राहवलं नाही.
“काय्ये बाबा? डेकोरेशन करू ऐन वेळी. नाहीतरी फक्त भिंतीवर लावायचं तर आहे या वेळी.”
“डेकोरेशन नाही गं. हे बघ.” मी तिला आमच्या बाप्पाचा फोटो झूम करून दाखवला.
तिला समजलं नाही मी काय दाखवतोय ते. “तुला काय म्हणायचंय बाबा? बॉडीटोन नाही आवडला का?”
“नाही गं. बॉडीटोन सुरेखच आहे. फ्लोरोसंट नाही वापरला भाऊंनी या वर्षी. हे बघ नीट.”
“छान तर आहे.” चिऊच्या आवाजात भीती.... आता बाबा काय नवीन खुसपट काढतोय याची.
“बघ नीट. बेंबी किती उथळ आहे बाप्पाची. कसं दिसतय ते! अगोदर कसं लक्ष गेलं नाही आपलं?”
हे ऐकलं मात्र, चिऊ इतक्या जोरजोरात हसायला लागली की रमा बेडरूममधून बाहेर आली.
“काय झालं? मलाही सांग की. एकटीच काय हसते?”
चिऊला हसण्यामुळे बोलताच येत नव्हतं. ती माझ्याकडे बोट दाखवून आणखीनच हसायला लागली.
रमाने माझ्याकडे पाहून विचारलं, “काय झालं?”
आता तिला काय सांगू? चिऊ हसणं कसंबसं आवरत म्हणाली, “बाबा म्हणतोय गणपतीची बेंबी उथळ आहे” आणि ती परत हसायला लागली. हे ऐकून रमाला हसावं की रडावं तेच समजलं नाही.
मी जरा समजावण्याच्या सुरात म्हणालो, “यात हसण्यासारखं काय आहे? मी माणसांच्या बेंबीविषयी नाही बोलत. बाप्पाच्या बेंबीविषयी बोलतोय. चांगली गरगरीत, खोल बेंबी किती मोहक दिसते.”
आता चिऊच्या हसण्यात रमाही सामील झाली. दोघींच्याही डोळ्याला पाणी आलं अक्षरशः.
“अगं, हसतेस काय अशी तूही? मी बाप्पाच्या बेंबीविषयी बोलतोय. खरच गोड दिसते बाप्पाची बेंबी.”
रमा हसू आवरत म्हणाली “ठीके. मग काय करायचं? बदलायचा हाही बाप्पा?”
मी माझी बाजू लावून धरत म्हणालो, “तसंच काही नाही, पण एखादी चक्कर मारू या की भाऊंकडे. बेंबी सोडली तर हा सुंदरच आहे.”
चिऊ मध्येच म्हणाली “आणि बदलायचाच असेल तर भाऊंना काय सांगणार बाबा तू? एक गणपती चांगला खोल बेंबी पाहून द्या?”
आता तर रमाला ठसकाच लागला हसताना. मी रागाने उठून गेलो. चिऊ आईसाठी पाणी आणायला कीचनमध्ये पळाली.

मी रात्री झोपायला बेडरूमकडे चाललो होतो. चिऊच्या रूममधून मायलेकींच्या गप्पांचा आवाज येत होता.
चिऊ तिच्या आईला म्हणत होती, “बाबा अतीच करतो कधीकधी, पण त्याने आणलेला बाप्पा आपल्या सोसायटीमध्ये दर वर्षी सगळ्यात जास्त गोड आणि सुरेख असतो.”

तीन वेळा बुकिंग बदलूनही चतुर्थीला चौथाच बाप्पा घरी येतो. गणपती आले की दर वर्षी माझं आणि बाप्पाचं असंच होतं.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 Sep 2018 - 11:53 am | पद्मावति

खूप मस्तं लिहिलंय हो. नर्मविनोदी आणि एकदम खुसखुशीत :)

श्वेता२४'s picture

14 Sep 2018 - 2:05 pm | श्वेता२४

तुमचं विनोदी लेखन अत्यंत निखळ आहे. मनात खुदुखुदु हसू येत होतं. खूपखूपखूप आवडलं

वरुण मोहिते's picture

14 Sep 2018 - 4:28 pm | वरुण मोहिते

लिहिले आहे. आवडले.

सुमो's picture

14 Sep 2018 - 5:42 pm | सुमो

एरवी वाचनमात्र असलेला मी
प्रतिसादकर्ता व्हायला भाग पाडलंत !

खूपच छान !

मजेशीर आहे पण तुमच्या पत्नीचं आणि लेकीचं अधिक कौतुक आहे! :)

फ्रेनी's picture

15 Sep 2018 - 10:42 am | फ्रेनी

तुमच्या तर्हेवाईक वागण्याला सांभाळून घेण्याऱ्या तुमच्या पत्नी आणि लेकीचे अधिक कौतुक .हॅट्स ऑफ टू देम

हुश्श , सुटले गणपती बाप्पा!

चित्रगुप्त's picture

15 Sep 2018 - 12:35 am | चित्रगुप्त

भाऊ तुम्ही खरे रसिकराज आहात. कमाल कित्ता तुसी.

तुषार काळभोर's picture

15 Sep 2018 - 7:00 am | तुषार काळभोर

एकदम नर्मविनोदी, हलकाफुलका लेख

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2018 - 9:03 am | ज्योति अळवणी

लेख म्हणून मस्त! पण तुमच्या हौसेपायी बायकोला आणि।लेकीला पळवता हे नाही पटलं बुवा.

जव्हेरगंज's picture

15 Sep 2018 - 10:14 am | जव्हेरगंज

क्लास!!

सिरुसेरि's picture

15 Sep 2018 - 12:04 pm | सिरुसेरि

मस्त निवांत हलके फुलके लेखन .

कंजूस's picture

15 Sep 2018 - 3:54 pm | कंजूस

असं पण असतं?
मला वाटलं दहा मिनिटांत मूर्ती घेऊन घरी येतात लोक.

हसुन हसुन मेले, डोळ्यात पाणी आले.

निशाचर's picture

15 Sep 2018 - 9:31 pm | निशाचर

मस्त लिहिलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2018 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर खुसखुशित लेख ! शिवाय, स्वतःवर असे विनोद करणे सोपे काम नाही !

मुक्त विहारि's picture

15 Sep 2018 - 10:06 pm | मुक्त विहारि

+ १

सविता००१'s picture

16 Sep 2018 - 3:03 pm | सविता००१

मस्त खुसखुशीत लेख आहे, सगळं डोळ्यासमोर येत होतं वाचताना

समाधान राऊत's picture

20 Sep 2018 - 1:43 pm | समाधान राऊत

आवडला लेख