Skip to main content

बॅचलर लोकांचा आख्खा मसूर

लेखक मीता यांनी गुरुवार, 09/08/2018 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाळ वातावरण आणि वातावरणात भरून राहिलेला आळस.. रविवार आरामात चालला होता..पोटातले कावळे हळू हळू आवाज देत होते ..त्यांना तेवढ्यापुरतं चाऊ माऊ देऊन गप्प केलं .. इतक्यात आईचा कॉल आला.. इकडचं तिकडंच बोलून अंदाज घेत विचारलं ..आज काय केलं होतं जेवायला .. आम्ही काही चहा बिस्किटांवर नाही दिवस काढत .. मसूर केला होता आज .. इति मातोश्री मसूर ऐकल्यावर पोटातल्या कावळ्यांनी लिटरभर लाळ गाळली .. डोक्यात चक्र फिरली.. आणि परिस्थिती , उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करता आज मसूरची भाजी करणे शक्य आहे असं conclusion निघालं . रूमीला विचारलं तर तिला १००० प्रश्न पडले .. मसूर काय इथपासून त्याचा इंग्लिश नाव शोधणे ... मी एकटी काय काय करू.. ती खाण्याची मदत करणार असं म्हणाली. मातोश्री मला आळश्यांची राणी म्हणत असतील तर हिची आई हिला नक्की महाराणी म्हणत असणार.. मसूर सापडले , डेसिकेटेड कोकोनट सापडलं (वास येत नव्हता म्हणजे चांगलं होतं) .. बाकीचं सामान पण खाली दिलंय ते सगळं देवाच्या कृपेने नाही तर general store च्या मालकाने होम डिलिव्हरी सुरु केल्यामुळे होतं . साहित्य वगैरे काही मोजून घेतलं नव्हतं त्यामुळे अंदाज पंचे दाहोदरसे .. अर्धी वाटी मसूर कुकरला १ ते सव्वा वाटी पाणी आणि चिमूटभर मीठ टाकून उकडून घेतले ( मीठ घातलं कि चव चांगली येते इति आई ) सात आठ पोह्याचे चमचे डेसिकेटेड कोकोनट ,चार पाच पाकळ्या लसूण , थोडंसं आलं (घ्या अंदाजानी ) मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलं कढईत जरा नेहेमीपेक्षा जास्त तेल घेऊन एक बारीक चिरलेला मोठा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. त्यात वाटण ( डेसिकेटेड कोकोनट,लसूण,आलं ) परतायला सुरुवात केली .. तोपर्यंत आळश्यांची महाराणी किचनमध्ये डोकावून गेली . कांदा आणी वाटणाला तेल सुटायला लागल्यावर त्यात मसाल्याचा अर्धा चमचा हळद, २ चमचे लाल तिखट आणि ४ , ५ चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला (हा फार तिखट नव्हता म्हणून जास्त घातला ) घालून एखादा मिनिट परतलं . तोपर्यंत कुकर थंड झाला होताच . उकडलेले मसूर त्यात असलेल्या पाण्यासकट कढईत ओतले .(पाण्याचा अंदाज घ्या ..उगाच सगळं ओतू नका .. नाहीतर घाल पाणी आणि कर कालच्यावानी .. असं काहीतरी आजी म्हणते तसं होईल ) महाराणी स्वीग्गीला सुट्टी देऊन हातात ताट घेऊन फेऱ्या मारत होत्याच . त्यांना त्याच कुकरमध्ये भात लावायला सांगितलं .(pg मध्ये राहिलं कि minimalism का काय ..आपोआपच follow होतं ) मीठ बेताने घाला .आणि ५, ६ मिनिट रस्सा उकळू द्या . भाजी शिजत असताना कोथिंबीर (असेल तर ) घातली तर छान चव येते . थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर फोटोसाठी ठेवा तर्री दिसायला लागली कि गॅस बंद करा . आळशी batchlor लोकांची मसूरची भाजी किंवा आख्खा मसूर तयार.. (उगाच उत्साहाच्या भरात घरच्यांना फोटो दाखवू नका .. "जरा आळस सोडला आणि हात पाय हलवले तर ढमे जेवशील कि रोज घरी बनवून" .. आमच्या मातोश्रींकडे टोमण्यांचा स्टॉक कायम तयार असतो ) ) झणझणीत मसूर आणि भाकरी (बनावट येत असेल तर ) , झणझणीत मसूर आणि वाफाळता भात {[ तांदूळ कुकरला लावताना थोडंसं मीठ आणि २ चमचे तूप ] हे नक्कीच जमू शकतंय } .. ओरपा आणि रविवार सार्थकी घालवा .. फोटो मीच काढलाय . स्टेप बाय स्टेप फोटो काढायला पोटातल्या कावळ्यांनी allow केलं नाही ) t

वाचने 18903
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

अक्ख्खा मसूर म्हटलं कि पेठ नाका आणि "एमके" आठवतो! कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं कि अख्खा मसूर हि लोक घरा बाहेर जाऊन चवीने खातात! फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं ना!! कधी खातोय काय माहित आता पुन्हा...

In reply to by शब्दबम्बाळ

अक्ख्खा मसूर म्हटलं कि पेठ नाका आणि "एमके" आठवतो! --- पेठ नाक्यावर नक्की कुठे आहे, हॉटेल ? मी उद्या सांगलीहून पेठ नाक्याला जाणार आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

हि लिंक बघा.. गूगल मॅप वर एक दाखवतोय एमके! निदान रिव्यू चांगले आहेत, चाललाच आहात तर बघू शकता.

In reply to by शब्दबम्बाळ

एम.के. ढाबा बंद पडला हो. मी गेलो होतो, तेव्हा दर्जा फार खालावला होता. सध्या अख्खा मसुर खायचा अकेल तर उत्तम पर्याय म्हणजे पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ "म मसुरा" हे हॉटेल किंवा कराड-विपळूण रोडवर "शिवराज ढाबा".

In reply to by दुर्गविहारी

काय सांगताय! त्यावेळी जागा मिळायची नाही राव! बसायला इतकी गर्दी असायची... अशीही त्यावेळच्या पदार्थापेक्षा आठवणींची चव आता जास्त रेंगाळत असावी कदाचित... :)

वारी करायला लावणार. मसूर दिसतोय मात्र एकदम लाळगाळू. या रश्यात भाकरी कुस्करून खायला अजून मजा येते. बाकी लेखन झक्कास जमलं हेवेसांन

पण ही बेचलर मसुर कशी? स्पींस्टर मसुर म्हणावी लागेल... काय नाय लेकीचा अभ्यास घेतोना वींग्रजीचा