मेकॉलेचे 'मिनट'.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे आणि ते संदर्भ क्र.१, क्र.२ अशा प्रकारे दिलेले आहेत.)
'Macaulay's Minute' ही गोष्ट आपल्या सर्वांच्या साधारण माहितीची आहे. २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी मेकॉलेने एक टिपण लिहिले ज्याचे ह्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आणि पर्यायाने देशावर देशावर फार खोलवर आणि चिरस्थायी परिणाम झाले. त्या 'मिनट'ची पूर्वपीठिका आणि पार्श्वभूमि काय होती ह्याबद्दल फारशी महिती नसते, ती देणे हा ह्या लेखनामागील मर्यादित हेतु आहे. (मेकॉले ह्या नावाचा खरा इंग्रजी उच्चार 'मकॉलि' असा काहीसा आहे पण मराठी वाचकांना मेकॉले हा उच्चार अधिक परिचित असल्याने तोच येथे वापरला आहे.)
१८३४ सालचा हिंदुस्तान. दुसऱ्या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्तानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब! ह्यामुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषकरून ब्रिटिश) संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश हे हिन्दुस्तानी संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणतः श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती.
मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८०० - ५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गवर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जी विस्तृत टिप्पणी लिहिली तिला 'Macaulay's Minute' असे नाव मिळाले. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ४ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ पहा. (टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत, ती वंशश्रेष्ठत्व, टोकाचा दुरभिमान, patronizing विचार दाखविणारी आहेत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यांवरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही. त्या विधानांवर प्रस्तुत लिखाणामध्ये मी कोणतेहि मत व्यक्त करीत नाही हे मी विशेषेकरून उल्लेखीत आहे.) हे संपूर्ण ’मिनट’ कोलंबिया विद्यापीठाच्या ह्या संस्थळावरहि उपलब्ध आहे.
त्या टिप्पणीचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणाला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. हिन्दुस्तानी प्रजेला कशा प्रकारचे शिक्षण ह्यापुढे अधिक योग्य आहे ह्या मुद्द्यावरून कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. ५ सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले सरकारी शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे ज्या योगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित ५ सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणाऱ्या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली.
ह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२ - १८७८) आणि ब्राह्मी लिपीचा संशोधक जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गवर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला.
शिक्षणधोरणविषयक हा वाद सरकारी पातळीवर केला जाण्याचे कारण म्हणजे १८१३ सालचा ’चार्टर कायदा’ आणि काही सरकारी पैसा एतद्देशीय प्रजेच्या शिक्षणासाठी वापरण्याची त्या कायद्यात करण्यात आलेली तरतूद. ही रक्कम 'learned natives of India' ह्यांच्या उत्तेजनासाठी वापरायची होती. हे 'learned natives of India' म्हणजे नक्की कोण ह्यावरचा वाद कलकत्त्यामध्ये कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनपुढे विचारार्थ आला. हा मुद्दा कायद्याच्या शब्दांचा काय अर्थ लावावा असा होता. सदस्यांमध्ये पौर्वात्य आणि पाश्चात्य अशी ५-५ दुभागणी झाल्यामुळे मामला अध्यक्ष ह्या नात्याने मेकॉलेपुढे विचारासाठी आला. त्यावर तो म्हणतो: (क्र.४)
'... सार्वजनिक शिक्षण कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धति हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धति आहे...
मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाहि मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीहि कायद्यात उल्लेखिलेले नाही. 'वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने, आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने' काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहीत धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणाऱ्या एतद्देशीयाला जणू 'सुशिक्षित एतद्देशीय' ही उपाधि संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथातून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधि लागावी. हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही.' (टिपणाच्या ज्या भागाचा हा अनुवाद आहे तो भाग क्र. ५ मध्ये बघावा. असे लिहिण्यामागचा आपला हेतूहि तो स्पष्ट करतो. तो भाग क्र. ६ येथे बघावा.)
अशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि learned natives of India ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीच्या शिक्षणावर खर्च केला जाणार सरकारी पैसा थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला.
ह्या पूर्वीच १८२३ साली राजा राममोहन रॉय ह्यांनी गवर्नर जनरल लॉर्ड ऍमहर्स्ट ह्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कलकत्त्यामध्ये प्रस्तावित संस्कृत कॉलेज न काढता तीच रक्कम एतद्देशीयांना पाश्चात्य विज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी वापरली जावी असे सुचविले होते. ह्या सूचनेमधून तेव्हातरी काही निष्पन्न झाले नाही.
हा संपूर्ण वाद क्र.१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र. २ मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोषकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे.
आतापर्यंत मेकॉलेच्या मिनटची पार्श्वभूमि काय होती ह्याचे निवेदन केले. अलीकडे ’राष्ट्रीय’ विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांकडून ह्या ’मिनट’चा वेगळाच अर्थ लावण्यात येतो आणि भारतीयांना कायमच्या दास्यामध्ये ठेवण्याचा हा दुष्ट डाव होता असाहि प्रचार करण्यात येतो. त्यासाठी ईमेल-वॉट्सॅप-फेबु अशा माध्यमातून बरेचदा एक 'लॉर्ड मेकॉलेचे पत्र' येत असते. त्यात त्याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश संसदेला उद्देशून केलेल्या तथाकथित भाषणाचा काही भाग दिलेला असतो. तो असा-
I have travelled across lenght & breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we should ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I prpose that we replace her old and ancient education system, her culture, for if the indians think that all that is foreign and English is good greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation.आणि या पत्रानंतर "बघा, आता तरी सुधारा, इंग्रजीचा नाद सोडा..." वगैरे छापाची तथाकथित देशभक्तीपर आवाहने असतात. हे ’भाषण’ संपूर्णपणे खोटे आणि manufactured आहे हे थोड्याच शोधावरून दिसते. पहिले म्हणजे २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी तो ’लॉर्ड’ झाला नव्हता तर साधा मेकॉलेच होता. तो लॉर्ड झाला १८५७ मध्ये जेव्हा त्याला ’बॅरन’चा दर्जा मिळाला. तसेच २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी तो लंडनमध्ये पार्लमेंटात भाषण करूच शकला नसता कारण १८३४तच आपली हिंदुस्थानातली कारकीर्द सुरू करण्यासाठी तो हिंदुस्थानात पोहोचला होता आणि १८३८ साली ती जागा सोडून इंग्लंडला परतेपर्यंत तो हिंदुस्थानातच होता. (ह्याची अधिक चर्चा येथे पाहता येईल.) शिक्षणपद्धति प्रमाणेच लिपीबदल करून सर्व हिन्दुस्तानी भाषांना रोमन लिपि लागू करावी अशा आग्रहाचेहि काही लोक होते आणि तो वादहि कलकत्तेकरांच्या छोटया वर्तुळात हिरीरीने लढवला गेला होता. त्याबद्दल अन्य केव्हातरी. संदर्भः १. The application of the roman alphabet to all the Oriental languages ... सेरामपूर प्रेस, १८३४. (http://tinyurl.com/yyt2x4q) २. Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India, संपादक मोनियर विल्यम्स, १८५९. (http://tinyurl.com/y2s5a6b) ३. The Life and Letters of Lord Macaulay Vol 1, जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन, १८८०. http://tinyurl.com/y2zbqbq ४. http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html ५. '...the opinion of some of the gentlemen who compose the Committee of Public Instruction, that the course which they have hitherto pursued was strictly prescribed by the British Parliament in 1813,... It does not appear to me that the Act of Parliament can, by any art of construction, be made to bear the meaning which has been assigned to it. It contains nothing about the particular languages or sciences which are to be studied. A sum is set apart 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knolwdge of the sciences among the inhabitants of the British territories.' It is argued, or rather taken for granted, that by literature, the Parliament can have meant only Arabic and Sanscrit literature, that they never would have given the honorable appellation of 'a learned native' to a native who was familiar with the poetry of Milton, the Metaphysics of Locke, and the Physics of Newton; but that they meant to designate by that name only such persons as might have studied in the sacred books of the Hindoos all the uses of cusa-grass, and all the mysteries of absorption into the Deity. This does not appear to be a very satisfactory interpretation.' ६. '... it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.' (http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html)
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेख
रोचक.
अगदी सहमत
हे पण फेक आहे का ?
या न्यायाने मनुस्मृतीतील जन्माधारीत विषमता ते हिटलरचा वंशवाद
धन्यवाद. मी काही दिवस आधी
गोंधळ दूर करणारा लेख
तुम्हीच दिलेल्या लिन्क मधील
मंदिरेही काढावीत
अगदी स्मारकेच नाही तर
....स्मारके मंदिर काढुन पैसा
हे थॉमस मेकॉले तेच का ?
या दुव्यावर १८३१ ते १८५३ या
मुळात या बनावट मिनिट्समधली
वेगळ्या काँस्पीरसी थेअरीज :)
मेकॉलेचे हे वाक्य मात्र बर्यापैकी कौतुकास्पद आहे.
>>पण पंचेंद्रीये बंद केलेल्या
आक्रमकांचे स्मारक आणि मॅकॉलेचे मंदिर झालेच पाहीजे
मॅकोलेवर टीका करणार्यांनी याबद्दल बोलावे..
=)) लोल; जगातल्या अदमासे १९५
मी प्रश्न काय विचारला आणि
निसटत्या बाजू ३
अहो मॅकोलेची शिक्षणपद्धती
..अहो मॅकोलेची शिक्षणपद्धती
१)
तिसर्या प्रश्नाचं उत्तर उघड
त्यात सगळीकडचे सगळे ज्ञान घेण्याची परवानगी आली.
समजा ब्रिटन जिंकला नसता
मेकॉलेछाप शिक्षणविरहित भारत
गा.पै. मला वाटते त्यांचा
असो.
माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर
मकालेच्या परखड विचाराने अमची
परक्या खड्यांवरचे अवलंबित्व उमगत नाही !! :)
परखड टीका ऐकून न भडकता त्यावर
देशाभिमान विरोधी वक्तव्ये खपवण्याचे गुत्ते घेतले नाहीत
शॉर्टकट न मारता/ गूगल न करता
लोकमान्य टिळकांच्या चरित्रात
आगरकर आणि लो. टिळकांचे
मकाले अथवा कुणा इतर विलायती
म.क. यांच्या प्रश्नाविषयी मतप्रदर्शन
यावर वेगळा लेख काढावा.
इंग्रज येण्याअगोदरचे बहुसंख्यांसाठी साक्षरतेचे सार्वत्रिकरण