अष्टाक्षरी छंद - सहजसुंदर लेखनाचा आनंद

लोकहो,

देवद्वार छंदावर छान चर्चा झाली . त्याला प्रतिसादही अभूतपूर्व मिळाला. आमचे तात्यासाहेबही उत्तम काव्यलेखन करू शकतात हे देवद्वार ने सिद्ध केले. नानामहाराज चेंगट , सहजराव, मनीषाताई, घाटावरचे भट, मदनबाण, ऋषिकेश, कपिलराव, अरूणपंत मनोहर, दिपोटी, लिखाळपंत, चेतनराव या सर्वांनी या छंदात सुरेख लेखन केले. आमचे लेखन सार्थकी लागल्याचा आनंद मिळाला. त्यानिमित्ताने मिपावर छंदशास्त्र हे स्वतंत्र सदर निर्माण झाले. (इतरत्र कुठेही छंदशास्त्राला वाहिलेले स्वतंत्र सदर आमच्यातरी पाहण्यात नाही.) लोकहो, तुम्हां सर्वांना या धोंडोपंताचा दंडवत.

आज अजून एक अत्यंत सोपा आणि गोड छंद घेऊन आलो आहोत. या छंदाचे विविध प्रकार छंदशास्त्रात आहेत. पण त्यातील सर्वात सुटसुटीत प्रकार इथे मांडतो.

पादाकुलक छंद

या छंदाला साध्या सोप्या भाषेत अष्टाक्षरी असे म्हणतात. जरी त्याचे मूळ नाव पादाकुलक असे असले तरी अष्टाक्षरी हेच नाव आता प्रचलित आहे. नावावरूनच छंदाचा बोध होतो.

या छंदात एका चरणात आठ अक्षरे असतात. आणि ४|४ अक्षरांचे दोन गण यात कल्पिलेले आहेत. छंद अत्यंत सोपा, सुलभ आणि गोड आहे.

प्रत्येक ओळीत आठ अक्षरे आणि चार ओळींच्या चरणात दुसर्‍या आणि चौथ्या ओळींचा यमक एवढेच या छंदाचे मागणे आहे. अत्यंत गोड, हळवी, प्रेमळ गीते या छंदात लिहिली गेली आहेत.
उदाहरणार्थ, आपल्या बहिणाबाईंच्या रचना याच छंदात आहेत.

मन वढायं वढायं
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
पुन्हा येतं पिकावर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावरल्या रं लाटा

काय लिहिलाय बहिणाबाईंनी. बहिणाबाईंना आमचा दंडवत.

स्वामी मालिका आठवतेय ना???????

माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
तुझे प्राण माझे प्राण
उरले ना वेगळाले

काय आहे हे? अष्टाक्षरी आहे रावं अष्टाक्षरी

या छंदातली आमची एक रचना येथे देतो

दृष्टी लागे पैलतीरी
नाही उरली वासना
पुरे झाले जिणे देवा
सोडवा ना दयाघना

किती सोसावे सोसावे
जिवावरचे आघात
मानले मी ज्यांना माझे
त्यांनी केला माझा घात

सभोवती किती दिवे
नाही तयांना गणती
अंधारात विझुनिया
गेली माझीच पणती

दान मागतो मी देवा
तुझ्या कृपेचा जोगवा
दिगंतरा चाललासे
माझ्या पाखरांचा थवा

आपणही हा छंद आत्मसात करून प्रतिभेला न्याय द्यावा या अपेक्षेसह....

आपला,
(अष्टाक्षरी) धोंडोपंत

वा!

धोंडोपंत, सदर आवडले.
तुमची रचनाही छान आहे, विशेषतः "पणती"
साती

धोंडोपंत

धोंडोपंत शिकविति
गंमतगोष्टी छंदांच्या
छंदशास्त्र बहरले
अंगणातुनि मिपाच्या..!

तैसे जालावरी फार
काव्य-कवि-कुलगुरू!
परि पंते उभारिला
कवितेचा कल्पतरू

संतोषले जन आज
काव्यमाधुरी अवीट
कवितेच्या गालावरी
छंदबद्धतेची तीट!

आपला,
(पंतांचा ष्टुडंट) अष्टाक्षरीकार तात्या! Smile

कवितेच्या

कवितेच्या गालावरी
छंदशास्त्रीय तीट!

याच्या स्पष्टीकरणाकरता कृपया माझ्या व बिपिन कार्यकर्त्याच्या खरडवह्या पाहाव्यात! Smile

तात्या.

वाहवा तात्या!

मला आठवतयं. आत्ता आत्ता पर्यंत तुम्ही "मला कवितेतले काही कळत नाही" असे म्हणत होता. अन आता षटकार वगैरे सोडाच, एकदम अष्टकार?
ही जादू कशी झाली?
बाकी ही जादू झाली म्हणून छान वाटले. अनुष्कावहिनी नक्कीच खूष होतील!

अप्रतिम

तात्या,
अष्टाक्षरी सुंदर झालेय. अभिनंदन.

एक सूचना. कवितेची दुसरी ओळ

गंमत गोष्टी छंदाच्या

हे तंत्रशुद्ध असले तरी गेयतेत खटकते. आठ अक्षरे आणि यमक बरोबर साधला असला तरी गंमत या शब्दात दोन लघु अक्षरे आल्यामुळे गुणगुणतांना खटकते.

त्या ऐवजी

गोष्टी आगळ्या छंदाच्या

असे लिहिल्यास ओळ गेयता उत्तम देईल.

पुढील लेखनास शुभेच्छा.

आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

गोष्टी

गोष्टी आगळ्या छंदाच्या
असे लिहिल्यास ओळ गेयता उत्तम देईल.

येस्स. आपण म्हणता ते पटण्याजोगे आहे पत..!

तात्या.

जीवनाचा

जीवनाचा चित्रपट
मंध्यंतर नसे ज्याला
चार दिस सुख आले
बाकी सारी अवकळा

नायक आणि नायिका
मीच नेहमी असते
दिग्दर्शन कोण करी??
दरवेळी बदलते

समाप्तीचा फलकही
सरणावरी दिसतो
अंतरीचा श्वास जेव्हा
मला जगूद्या म्हणतो..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अ प्र ति म

समाप्तीचा फलकही
सरणावरी दिसतो
अंतरीचा श्वास जेव्हा
मला जगूद्या म्हणतो..

केवळ अप्रतिम...

बिपिन कार्यकर्ते

:)

केवळ अप्रतिम...

बिपिन कार्यकर्ते

के व ळ अ प्र ति म !!!

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

जीवनाचा

जीवनाचा चित्रपट
मंध्यंतर नसे ज्याला
चार दिस सुख आले
बाकी सारी अवकळा

हे काय? लाईन नंबर दोन आणि चारचं यमक कुठे जुळलंय?

असो..

कुवी कुणीही असावा
असो तरूण वा वृद्ध,
नित लिहावी तयाने
अष्टाक्षरी तंत्रशुद्ध!

आपला,
(तंत्रशुद्ध) तात्या.

सूर्य कुठून उगवला ?

माफ करा, आज जरा उशीराच उठलो. पण

(तंत्रशुद्ध) तात्या.

हे वाचून, आज सूर्य कुणीकडून उगवला, हे पहाटे उठणारे कळवतील का ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

खिखिखि

हे पहाटे उठणारे कळवतील का ?

प्रभुदेवा , कुठे आहात ? उत्तर द्या

छंद लागे जीवा

धोंडोपंत छंद देती
अष्टाक्षरी देवद्वार
वाचव रे देवा आता
तंत्रशुद्ध तात्या फार! Wink

चतुरंग

कुवी

कुवी कुणीही असावा
असो तरूण वा वृद्ध,
नित लिहावी तयाने
अष्टाक्षरी तंत्रशुद्ध!

अरे लढ तात्या...... लढ.

क्या बात है. बहोत बढिया.

(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

मस्तच. जीवन

मस्तच.

जीवनाचा चित्रपट
मंध्यंतर नसे ज्याला

हे खरे नाही!
(नुकताच मध्यंतरात मिसळपावचा यथेच्छ आस्वाद घेतलेला) अरुण मनोहर

दंडवत

छंदगुरूंना दंडवत.
आपण लुप्त होत चाललेले छंदशास्त्र जोपासून, आणि त्याची रोपटी ठिकठिकाणी रूजवून खूप थोर कार्य करत आहात.

एक शंका.
>>>आणि ४|४ अक्षरांचे दोन गण यात कल्पिलेले आहेत.

हे गण कसे ओळखायचे, आणि रचायचे?

धन्यवाद

श्री . अरूण मनोहर यांस,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

४ अक्षराच्या अंती या छंदात यती आहे.

असाच देवीवर नावाचा छंद आहे . त्यातही आठ अक्षरेच एका ओळीत आहेत. पण त्यात २ आणि ६ वर यती आहे. उदाहरणार्थ

तो हा । विठ्ठल ब । रवा
तो हा । माधव ब । रवा
सर्व । सुखाचे आ। गर
बाप । रख्मादेवी । वर
२ । ४ । २

यात गण भिन्न आहेत. तो फरक कळावा म्हणून गणातील अक्षरसंख्या दिली आहे.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

देवीवर

कविवर्य, तुम्ही देवीवर छंदाची आणखी काही उदाहरणे घेऊन त्यावरही स्वतंत्र लेखन करावे. या छंदातही अनेक कविता/ गीते असतील. (कित्येकदा नकळत ती सुद्धा अष्टाक्षरी म्हणून वाचली जातात..).

सोनाली

काय होइल होइल

छंदगुरु श्री . धोंडोपंतांना नमस्कार. आम्हाला कळते केल्याबद्दल तसेच देवद्वारापाठोपाठ अजून एका सुंदर छंदाची ओळख करुन दिल्याबद्दल. ह्याला अनुष्टुभ छंद असेही म्हणतात का? श्री.रामदासस्वामी रचित भीमरुपी ह्याच छंदातले आहे ना( भीमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती. पण रामदासांच्या अनवटपणासारखे त्यात यमक नाही. हा फरक कृपया सनजावून द्यावा). तसेच श्री रामरक्षा सुद्धा अनुष्टुभ छंदातच आहे. माझ्या मुलाचे नाव अनुष्टुभ. ते ठेवताना बराच काथ्याकूट झाला होता. त्याची आत्ता आठवण येत आहे. अश्याच मनस्थितीत आपल्या विवेचनाने प्रेरित होउन मला स्फुरलेले हे कवन. बघा कसे उतरले आहे?

पोचले रे माझे मन
घरीदारी भारतात
भेटतील सानथोर
हात घेउनी हातात

आता उरला एकच
नुरले हे माह दोन
माझ्या आधी पोहोचली
माझी वेडी आठवण

धाव घेइल अनन्या
वेगे कुशीत शिरेल
घरी पाउल पडता
बार्बी द्यावया लागेल

हुंकारेल माझा दंफी
रांगे रांगे घेइ धाव
अष्ट शब्दी छंद आहे
अनुष्टुभ त्याचे नाव

बोजे ठेवूनी बाजूला
थोडा टाकीन मी श्वास
पाण्यासोबत येतील
काकणांचे अनुप्रास

असेलच आई तिथे
आणि बाबा उत्सुकसे
काय होइल होइल
सर्व तुम्हां सांगू कसे?

माझा ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/

सुंदर रचना,....

सुंदर रचना, कपिल!

कसे सामान भरावे
कसा ऐवज तो न्यावा
मार्गी एक माझा धावा
झणी प्रवास सरावा

कसे घडेल स्वागत
कोण येइल दारात
फाटकातून घरात
जणू निघेल वरात

किती किती या भावना
आज स्पर्ष हवा हवा
मन अचपळ माझे
आता संपला दुरावा

अनुष्टुभ छंद

या विषयावरील वेगळा लेख नुकताच लिहू घातला आहे. त्यात पादाकुलक व अनुष्टुभातील फरक स्पष्ट होतीलशी आशा आहे.
(स्पष्टीकारक)बेसनलाडू

वा वा

वा वा कपिलराव,

उत्तम रचना. तंत्रशुद्ध. छान.

अनुष्टभाबद्दल श्री. बेसनलाडू यांनी उत्तम लिहिले आहेच. पुनरावृत्ती नको म्हणून आम्ही लिहीत नाही.

काही शंका असल्यास गुगलवर बोलूच.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

वा!

धोंडोपंत आणि बेला
शिकवू लागले छंद
देवद्वार अष्टाक्षरी
मनी आनंदी आनंद !

-(आनंदित) ऋषिकेश

ऑफीसात आल्याआल्या
मिळे छंदाचा हा मेवा
अरेरे समोर बॉस
छंद आता बंद ठेवा Sad

Wink

हा हा

हा हा हा,

अरेरे समोर बॉस

ऐवजी

बॉस ठाकला समोर

कसे वाटले?

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

मस्त

बॉस ठाकला समोर
जास्त मस्त वाटते Smile.. धन्यु!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धन्यवाद पंत

अष्टाक्षरी देवद्वार
छंद असती मधुर
पंत खोलती भांडार
फुले काव्य मिपावर

वा वा , छान.

वा वा ,

छान. पहिले अक्षर शक्यतो गुरू येऊ दे

काव्य फुले मिपावर

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

पंत अभारी आहे

कळत नव्हते मला
जुळवत होतो ओळी
छंदशास्त्र अभ्यासने
भरुन गेलीय झोळी

पंत बरोबर आहे का हो हे ?

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वा

वा अमोलराव,

कळत नव्हते मला

ऐवजी

मला नव्हते ठाऊक

पहिले तीन लघु टाळून गुरू अक्षरे अधिक योजावी.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

कुठे गेले

कुठे गेले कुठे गेले
धोंडोपंत कुठे गेले
नाद लावून छंदाचा
टाकू नका अर्धे पेले

अनुष्टुभ अष्टा़क्षरी
भावे सगळ्यांच्या मना
धोंडोपंत अवतरा
शंकाच्या ह्या समाधाना

http://kalekapil.blogspot.com/

हा हा हा हा

हा हा हा हा हा

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

चुकलो.

चुकलो. जल्ला कल्लच नाय

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

नाय

नाय कलायचं. सोडुन द्या.

नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांची ही कामं नायत.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

आठ अक्षरे

आठ अक्षरे ओळीत
पुरी टाकली मोजून
दुसरीचे चवथीशी
केले यमक योजून

झाला लेखकू खूष
काव्य मापून आखले
नसो कल्पना भरारी
अनुष्टुभ साकारले

प्रतिसादांचा पूर
सांगे छंदी आहे सिद्ध
भले काव्य जरी शून्य
व्याकरण तंत्रशुद्ध

पंते निरुपला छंद
बद्द वाजे ह्याचे नाणे
सांभाळले मंत्रतंत्र
नव्हते नक्षत्री देणे

सांभाळले

सांभाळले मंत्रतंत्र
नव्हते नक्षत्री देणे
वा.. कविता मस्तच..

ते नक्षत्रांचे देणे असेच प्रकट होते Smile
-- लिखाळ.

वा

वा वा,
उत्तम. छान रचना.

भले काव्य जरी शून्य

हे नाही पटले. नवीन वाट आहे सराव झाला की सवय होईल लोकांना.

छंदबद्ध काव्यानेच आजपर्यंत रसिकांना जिंकले आहे. असो.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

भले काव्य

भले काव्य जरी शून्य
व्याकरण तंत्रशुद्ध

अहो रागाचं जाणंयेणं कसं असतं, काय असतं हे आधी महत्वाचं! त्यानंतर गायकी! Smile

आरोह अवरोहाचे
नियम आधी जाणावे
रागदारी गायकीचे
मग रंग उधळावे!

काय? खरं की नाही? Smile

तात्या.

अष्टाक्षरी अमुचाही !

'छंद' राजा मिपावरी
देतो याची आम्ही ग्वाही
गोड मानूनी घ्यावा हो
अष्टाक्षरी अमुचाही !

- दिपोटी

छंदाचा हा सुगंध

दीप होताच मंद
कविताच्या प्रेमात अंध
कल्पनात मस्त धुंद
छंदाचा हा सुगंध

दीपक ल. वाईकर

dlwaikar@yahoo.com

धन्यवाद

सर्वांना धन्यवाद.

देवद्वारप्रमाणे अष्टाक्षरीलाही उस्फूर्त प्रतिसाद दिलात. या छंदात लेखनही बरेच झाले.

आत्ताच ज्योतिषक्लासमधून शिकवून येतोय. जरा जेवून घेतो. मग पुन्हा आल्यावर सर्व शंकांचे निरसन करू.

पुन्हा एकदा धन्यवाद.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

देवद्बार छंदातल्या कविता

धोंडोपंतजी

आपण दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आंत ( ३० नोव्हे. पर्यंत ), मी पण एक देवद्बार छंदातली कविता लिहणार आहे. पण तुम्ही जर लेखन बरे झाले आहे असे म्हणायला लागलात तर, मी कविता करावी कि नाही ? असा प्रश्न पडला आहे .

दादा, तुमचा

दादा,
तुमचा हा लेख अंमळ उशीरा आला वाचनात.
वाचून आनंद झाला!
मला माहित नव्हते की मी काही रचना केलेल्या त्या अष्टाक्षरी छंदातल्या होत्या म्हणून. Smile
उदा:
एक अगोदरच लिहिलेली रचना -

मेघ आषाढाचा गर्जे
गाज गूंजे चराचरी
प्रेमे नादली पंढरी
उभा बघून श्रीहरी

मी बालक अजाण --- ही ओळ फक्त छंदात बसत नाही
मन सोडीना पदर
माझी बालकाची मती
त्यास कोठला आधार

दिंडी चालली माहेरा
वाट ओली अंतरीची
उभी लेकराच्या साठी
माय सावळी कधीची

अश्रू वाहती सहज
भाव कोवळा सांभा़ळा
मायभेट उराउरी
आज आनंद सोहळा

मुमुक्षु

सुरेख

पंत, अत्यंत सुरेख उपक्रम आहे. मुख्य म्हणजे तुम्ही देवद्वार, अष्टाक्षरी अश्या छोट्या, सुंदर वृत्तांनी सुरुवात केलीत. त्यातही जास्त व्याकरणात शिरण्याऐवजी तुम्ही उदाहरणं घेऊन शिकवलंत. तुमची ही पद्धत खूप आवडली.

पुढच्या वेळेस नक्कीच काव्यात्मक प्रतिसाद देईन.

-पुष्कर

पंढरी (अष्टाक्षरी)

पंढरीचा विठूराया,
पंढरीत आहे कुठे?
वाट विठूची पहात,
उभे मंदीर एकटे!

रखुमाईही पुसते,
"कसा दिवस हा आला?
विना सांगता कुणाला,
कुठे नाथ माझा गेला?

नाही कुणी कान्होपात्रा,
आज कुणी जना नाही.
ज्यांच्या मदतीच्या साठी,
देव देवळात नाही."

विठू कधीच नव्हता,
पंढरीच्या मंदिरात,
तोच सांगे "नका पाहू,
मला काळ्या पत्थरात."

देव सांगे आज मला,
"देव तुझ्याच घरात,
घरातल्या विठ्ठलाच्या,
काय जाण अंतरात.

बाप तुझा रे विठोबा,
अन आई रखुमाई,
त्यांच्या पायधुळीचीही,
सर पंढरीस नाही.

माय पित्याहून दुजा,
स्वर्ग नाही हे सांगतो,
तीच तुझी रे पंढरी,
विठू तिथेच नांदतो."

क्या बात

क्या बात है.. वाहवा!!

पंढरीचा विठूराया,
पंढरीत आहे कुठे?
वाट विठूची पहात,
उभे मंदीर एकटे!

रखुमाईही पुसते,
"कसा दिवस हा आला?
विना सांगता कुणाला,
कुठे नाथ माझा गेला?

बाप तुझा रे विठोबा,
अन आई रखुमाई,
त्यांच्या पायधुळीचीही,
सर पंढरीस नाही.

माय पित्याहून दुजा,
स्वर्ग नाही हे सांगतो,
तीच तुझी रे पंढरी,
विठू तिथेच नांदतो."

हे विशेष आवडले. शुभेच्छा! Smile
मुमुक्षु

आहा...

आहा... अष्टाक्षरी माझाही लाडका छंद.
इथल्या कविताही मस्त आहेत.

मागे एक पारंपारिक अंगाई ऐकली होती, तेव्हापासून अष्टाक्षरीचा लळा लागला. ती अंगाई देतोय.

आली बघ गाईगाई
शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध
थबकली ताटव्यात

आली बघ गाईगाई
पायी चांदण्यांचे चाळ
लावले का अवधान
ऐकावया त्यांचा ताल

आली बघ गाईगाई
काढीतसे लांब झोका
दमलीस खेळूनिया
मीट मोतियांच्या शिंपा

आली बघ गाईगाई
लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले
डोळे माझ्या सानुलीचे

-------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

बाय द वे,

बाय द वे, हौशी कलाकारांसाठी: याची चालही अडस आहे...
- प S रे S सा रे S नी सा S
- प S रे S सा रे S नी सा S
- ग म S प प S पध पध म ग रे
- म ग S रे नी S सा सा सा सा

स्वगत : परवा कवितेवर मिळालेल्या प्रतिक्रियेवर गांभीर्याने विचार करायला झालाय... नाव बदला म्हणतात सगळे! Big Grin Big Grin
------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !