राजांचे मावळे - १

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
21 Sep 2017 - 9:31 am

घोडखिंड : खाशाबा

खाशाबाला वाटायला लागलं की छातीचा भाता आता फुटतो की काय, त्याला आठवतच नव्हतं की पळायला सुरुवात करून किती तास झाले होते ते. चन्द्र काही कामाचा नव्हता कारण पावसाने धिंगाणा चालवला होता. हातातले पलिते विझत होते ते परत पेटवायला लागत होते. भाला पकडून पकडून हाताची बोट सरळ व्हायची विसरली होती, ढालेने पाठ धरली होती नि तलवार कमरेला खुपत होती. हा सगळा विचार मनात चालू असतानाच बाजींनी थांबण्याचा संकेत दिला. राजांच्या पालखीचे भोई दमले होते. खाशाबाला त्यांचा फार अभिमान वाटला की त्या भोयांच्या खांद्यावर राजांचा भार होता. पालखी खाली ठेवली गेली आणि राजे त्यातून उतरले.

राजांचा पाय जेव्हा भोईच्या बाहेर आला तेव्हाच खाशाबा सरळ झाला, त्याच्या हातचे, पाठीचे नि कमरेचे दुखणे तो विसरला. राजे बाहेर येऊन उभे राहिले आणि खाशाबाने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. "हाच तो जिता जागता देव माझा" खाशाबाच्या मनात आलं आणि त्याला आठवलं त्यांनी राजेंना पहिल्यांदा कधी बघितलं होत नि कधी ऐकलं होतं. खाशाबाला शब्द लक्षात नाही राहिले कधीच पण त्यांनी जी ऊर्जा आणि बळ दिल ते अजून त्याच्या रक्तातून वाहत होत. कौसल्येच्या बापाबरोबर तो गडावर गेला होता सैन्यात भरती व्हायला. त्याची आई भडकली होती कौसल्येच्या बापावर की स्वताच्या एकुलत्या ऐक जावयाला का तो बळी द्यायला निघाला होता म्हणून. पण नंतर ती शांत झाली कौसल्येने समजवल्यावर. खाशाबाचा बाप राजेंच्या वडीलासाठी मेला होता ना त्यामुळे आईच घाबरण साहजिकच होत. लागोपाठच त्याला नेहमीसारखी आठवली ती राजेंनी त्याच्या पाठीवर दिलेली थाप आणि हाती दिलेली भाकरी. साक्षात देवाच्या हातून प्रसाद मिळाल्यावर त्याबरोबर दुसरं कोणी काही खात का? खाशाबाने ती भाकरी नुसती कोरडी खाल्ली होती. ती चव कुठल्याच भाकरीला लागली नाही नंतर, आईच्या पण नाही.

राजे प्रत्येक गटात जाऊन बोलत होते , विचारत होते. जसे जसे ते जवळ येऊ लागले खाशाबाला ते स्पष्ट दिसू लागले. त्यांचा अंगरखा ठीक ठिकाणी फाटला होता, त्यातून रक्त आलेलं दिसत होतं. पायांच्या वहाणा वर कोणाचा तरी फेटा बांधला होता. मध्ये खूप वेळ राजे भोई शेजारून पळत होते सगळ्यांबरोबर. त्यामुळे त्यांचा वेग पण वाढला होता आणि पाठच्या फौजे बरोबरचे अंतर वाढले होते. त्यांनी भोई शेजारून पळणार सांगितल्यावर मावळ्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या वस्तू मागितल्या पण राजेंनी नकार दिला आणि ते स्वताच्या शस्त्रांसकट पळायला लागले. तो काही क्षणाचा विश्रम पण खूप वाटला सगळ्यांना तेव्हा. सगळे मावळे नव्या दमाने राजेंच्या पुढे मागे पळू लागले होते. जसे जसे राजे त्याच्या जवळ यायला लागले तसा तसा खाशाबाला त्याच्या वेदनांचा विसर पडायला लागला. तो तेजपुंज चेहरा, ते गरुड नाक आणि तो जिरेटोप. इतके अंतर पळून पण मलूल न पडलेले राजे आणि ती धारदार नजर. राजे खाशाबा जवळ आले, त्यांनी विचारपूस केली, पाठीवर हात फिरवला. खाशाबाला आता बाकी कसली गरज नव्हती.
थोडा दम खाऊन झाल्यावर बाजींनी सगळ्यांना दोन गटात विभागलं. एक गट राजेंबरोबर विशाळगडाकडे जाणार होता आणि दुसरा मागे राहून पाठलाग करणारे सैन्य अंगावर घेणार होता. खाशाबाला वाईट वाटलं की तो दुसऱ्या गटात होता. त्याला राजेंबरोबर जायचं होतं. पण इलाज नव्हता. राजेंनी सगळ्यांना नमस्कार केला, पाठी राहणाऱ्या गटाने त्यांना वाकून अभिवादन केले आणि राजे विशाळगडाकडे निघाले.
बाजींनी क्षणभर राजे जात होते त्या दिशेने पाहिलं आणि दीर्घ श्वास सोडला. ते उरलेल्या मावळ्यांकडे वळले. " आज आपल्याला राजेंना वेळ द्यायचा आहे विशाळगडावर पोचेपर्यंत. मागून येणार सैन्य आपल्या पुढे जाता कामा नये. जोपर्यंत शेवटचा मावळा जीवन्त आहे तोपर्यंत आपल्याला घोडखिंड लढवायची आहे. बोला हर हर महादेव".

यवन फसला आणि घोडखिंडीत शिरला. त्यांचे ते यवनी शिव्याशाप खाशाबाला ऐकू यायला लागले. बाजींच्या खांद्यावरून त्याला यवनाला अंगावर घेत घेत येणारी तुकडी दिसली, त्याचे हात भाल्यावर घट्ट झाले. शत्रू थोड्यावेळासाठी का होईना पण फसला होता. पळणारी तुकडी पहिल्या फळीच्या मागे शिरली आणि कपाकापीला सुरुवात झाली. यवनाच्या पहिल्या लाटेला कळलच नाही की नक्की घडतय काय ते. रक्ताच्या चिळकांड्या, यवनाचा आक्रोश नि पहिल्या फळीची चालणारी तलवार. खाशाबाने भाल्यावरची पकड थोडी सैल केली, दीर्घ श्वास घेतला आणि दगडावरून चपळ पणे उडया घेत स्वताला झोकून दिलं. किती मारले नि किती मेले, खाशाबाला काही पत्ता नव्हता. हातातला भाला तुटला त्याबरोबर तलवार बाहेर आली. तिसऱ्या फळीतून दुसऱ्या आणि मग तोंडावर कधी पोचला तो ते त्याला कळलच नव्हतं. हातातली ढाल पडली, खनजीर बाहेर आलं. तेव्हढ्यात त्याला पाठून कोणीतरी मागे खेचलं. त्याची तलवार बाजींच्या तलवारीवर आदळली.
खाशाबा मागे झाला आणि बाजी पुढे झाले. दोन हातात दोन तलवारी घेऊन ते लढत होते. बघता बघता बाजी रक्ताने पूर्ण भिजून गेले. दोन तलवारी शत्रूला जणू जाणत होत्या की तो कुठून येणार आणि कसा वार करणार. त्या फक्त बाजींभवती एक अदृश्य जागा बनवत होत्या ज्यात शिरलेला यवन कापला जात होता. एव्हढ्यात कुठून तरी एक भाला सणसणत आला आणि बाजी डगमगले.
मल्हारी नि ग्यानबाने बाजींना मागे खेचलं. त्यांच्या मोकळ्या जागेत खाशाबा शिरला. परत तेच चालू झालं. यावेळेला खाशाबाच्या हातात ढाल आणि तलवार होती. समोरचा यवन शिव्याशाप घालत आता त्वेषाने लढत होता. त्याला स्वताची चूक लक्षात आली होती. पण तो ही जिरेस पडला होता आता. तेव्हढ्यात पाठून बाजींची गर्जना ऐकू आली. हर हर महादेव. खाशाबाच्या डाव्याबाजूला मोकळीक झाली, त्याला लक्षात पण नाही आली की कधी. पण समोरच्याचा वार जेव्हा तो ढालीवर घ्यायला गेला तेव्हा पुढे काहीच आलं नाही. खांद्यापासून पोटापर्यंत तलवारीने कापलं गेलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि खाशाबा डगमगला. कोणीतरी त्याला मागे ओढल आणि त्याची जागा घेतली.
खाशाबा भेलकाटत मागे आला नि एका दगडाला टेकून खाली घसरला. त्याला आता लक्षात आलं की त्याचा डावा हात खांद्यापासून गायब झालाय आणि जखमेतून रक्त कारंज्यासारखं उडतंय. डाव्याबाजूचा अंगरखा फाटून रक्ताने लाल झाला होता. अचानक जमीन फिरली, चेहर्यावर पावसाचे मोठे मोठे थेंब पडू लागले. खाशाबाने डोळे मिटले.
खाशाबाला जाग आली तेव्हा सगळीकडे शांतता होती. डोळे उघडून त्याने मान वळवायचा प्रयत्न केला. पण त्याला ते ही जमेना. महत्प्रयासाने त्याने मान वळवली पण तिचंही वजन सहन होईना आणि मान खाली झुकली. खाशाबा स्वताच्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पाऊस कधी थांबला कोण जाणे पण त्याच्यामुळे रक्त वाहून नव्हतं जात. "कौसल्ये माफ कर, माये माफ कर" खाशाबाच्या मनात विचार येऊन गेला. आता डोळ्यासमोर अंधारी येत होती, वेदना नाहीश्या होत होत्या. खाशाबाने हुंकारायचा प्रयत्न केला " हर हर .....

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

21 Sep 2017 - 12:19 pm | आनन्दा

पुभाप्र.
छान लिहिताय.

एस's picture

21 Sep 2017 - 12:30 pm | एस

थरारक! पुभाप्र.

एकनाथ जाधव's picture

21 Sep 2017 - 12:41 pm | एकनाथ जाधव

पुभाप्र

दुर्गविहारी's picture

21 Sep 2017 - 12:48 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलय. पु.लेशु.

किसन शिंदे's picture

21 Sep 2017 - 1:42 pm | किसन शिंदे

भोई खाली ठेवली गेली आणि राजे त्यातून उतरले.

इथे पालखी असायला हवंय, पालखी वाहून नेणार्‍या लोकांना भोई म्हणतात.

लेख आवडला.

लाल गेंडा's picture

21 Sep 2017 - 3:50 pm | लाल गेंडा

धन्यवाद. मी बदल करीन नंतर.

आईशप्पथ, खतरनाक लिहिताय ओ.
एकतर राजांचा विषय, त्यात तुम्ही लिहिताय थरारक.
अंगावर काटाच येतो.
च्यायला ही मराठी मनाची टेस्टच हाय राव. लिहा अजुन. घटस्थापना झालीय आईच्या दरबारात.

सुमीत's picture

21 Sep 2017 - 2:16 pm | सुमीत

उत्तम, नजरे समोर सगळे चित्र उभे रहिले . वाट पहत आहे पुढे काय लिहिणार त्याची.

अप्रतिम लिहिलंय.. ट्रेन चा आवाज सोडून तलवारी चा खणखणाट ऐकू येत होता..

पैसा's picture

21 Sep 2017 - 3:05 pm | पैसा

छान लिहिलंय.

संजय पाटिल's picture

21 Sep 2017 - 5:17 pm | संजय पाटिल

अतिशय थरारक...
पुभाप्र...

पद्मावति's picture

21 Sep 2017 - 5:37 pm | पद्मावति

अतिशय सुरेख लिहिताय. पु.भा.प्र.

प्रसाद_१९८२'s picture

21 Sep 2017 - 6:12 pm | प्रसाद_१९८२

अत्यंत थरारक !

खाशाबाला वाईट वाटलं की तो दुसऱ्या गटात होता. त्याला राजेंबरोबर जायचं होतं.

खाशाबाने भाल्यावरची पकड थोडी सैल केली, दीर्घ श्वास घेतला आणि दगडावरून चपळ पणे उडया घेत स्वताला झोकून दिलं. किती मारले नि किती मेले, खाशाबाला काही पत्ता नव्हता.

लेखन आवडलं. पण खाशाबा नक्की कोणत्या गटांत होता ?

किसन शिंदे's picture

21 Sep 2017 - 9:13 pm | किसन शिंदे

घोडखिंडीतून राजे पुढे विशालगडाकडे कूच करतात आणि बाजीप्रभु गनिमास रोखण्यासाठी खिंडीत थांबतात, पैकी खाशाबास महाराजांसोबत जायचे असावे पण नाईलाजाने त्याला खिंडीतचा थांबावे लागतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2017 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रत्यक्षदर्शी लिखाण !

पुढच्या भागांची प्रतिक्षा आहे.

सोमनाथ खांदवे's picture

21 Sep 2017 - 9:48 pm | सोमनाथ खांदवे

गौरवशाली इतिहास वर लिखाण केल्या बद्दल धन्यवाद

लाल गेंडा's picture

22 Sep 2017 - 9:17 am | लाल गेंडा

धन्यवाद!!!
मावळे परत येतील लौकरच ...

Ranapratap's picture

22 Sep 2017 - 7:22 pm | Ranapratap

वचताना अंगावर काटा आला.
जीते रहो, लिखते रहो.

वरुण मोहिते's picture

22 Sep 2017 - 7:50 pm | वरुण मोहिते

बाहेर निघू शकतो ही प्रेरणा करोडो लोकांना महाराष्ट्रात देणारे राज्यांचा इतिहास कधी पण वाचला तरी काहीतरी स्फुरण येते. लिहा पुढे

स्मिता.'s picture

23 Sep 2017 - 1:17 am | स्मिता.

खूप सुरेख लिहीलंय! शेवट वाचून अंगावर काटा आला.

सिरुसेरि's picture

23 Sep 2017 - 1:30 pm | सिरुसेरि

सुरेख वर्णन . भालजी पेंढारकर यांचा एखादा चित्रपट बघतो आहोत असा भास झाला . "मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा ."

बबन ताम्बे's picture

23 Sep 2017 - 1:35 pm | बबन ताम्बे

छान लिहिलेय.

अमितदादा's picture

23 Sep 2017 - 7:34 pm | अमितदादा

जबरदस्त ... घेऊन या मावळ्यांना लवकर पुढच्या भागात

स्वाती दिनेश's picture

23 Sep 2017 - 8:42 pm | स्वाती दिनेश

अजून अशाच अनेक मावळ्यांबरोबर गड किल्ले आणि इतिहासात डोकावायचे आहे.
पुभाप्र
स्वाती

रुपी's picture

25 Sep 2017 - 11:22 pm | रुपी

छान.. थरारक वर्णन!

जिन्गल बेल's picture

26 Sep 2017 - 5:25 pm | जिन्गल बेल

भारी वर्णन .....

राघव's picture

26 Sep 2017 - 5:55 pm | राघव

आवडेश! पु.भा.प्र.

निओ's picture

2 Oct 2017 - 3:55 pm | निओ

उत्तम लिखाण...मस्त लिहीत आहात.
मागे मी ही या विषयावर कथा लिहिली होती.
पावन
पु ले शु

विषयच असा आहे कि आपण दोघांनी जरी भरभरून लिहिलं तरी पण कमी पडतील.

शेखरमोघे's picture

4 Oct 2017 - 9:23 pm | शेखरमोघे

सुन्दर आणि प्रत्यक्षदर्शी !!