गूढ भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
19 Jun 2017 - 7:47 am

गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024

भाग २

रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्र्भानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझ?" उगाच काहीतरी विचारायचं म्हा णून चंद्रभानने विचारल आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "बर ते सांग सावकाश. अगोदर काय घेणार ते बोल. एक मस्त नवीन स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?"

"नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी. मला तुझ्याशी बोलायचं आहे." चंद्रभानला अडवत आणि त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत राजन म्हा णाला. "त्यात मला देखील अजून एका पार्टीला जायचं आहे."

"अरे तुला यापुढे पार्टी आहे? बापरे! बर मग तू निघ हव तर. आपण काय उद्या बोलू." चंद्रभान म्हा णाला.

"नाही. मला तुझ्याशी बोलायचंच आहे." राजन आग्रहाने म्हा णाला.

त्यावर हसत चंद्रभान म्हा णाला,"बर बोल. माझी काही हरकत नाही."

"भानू अरे आज सकाळी जे काही घडल ते तुला विचित्र नाही वाटत का?" राजनने अस्वस्थ होत चंद्रभानला विचारले.

"विचित्र? नाही थोड वेगळ वाटल मला सुरवातीला. पण अस काळजी करण्यासारखं काही वाटल. नाही. त्यावेळी मी थोडा गोंधळलो होतो. पण आता नाही."चंद्रभानच्या चेहेऱ्यावर हसू होते.

"याचा अर्थ तू खोट बोलत होतास ना सकाळी? तू त्या सेटवर मला भेटलास तेव्हाच आला होतास ना तू तिथे?" राजनने चंद्रभानचा हात धरून त्याला विचारले.

त्यावर चंद्रभान क्षणभर राजनकडे टक लावून बघत राहिला आणि मग अचानक खो-खो हसत सुटला. आता मात्र राजांचा धीर सुटायला लागला.

"अरे असा हसतो का आहेस? काय ते निट सांग बघू मला. तू सकाळी खोट बोलत होतास ना?" राजनने चिडून चंद्रभानला विचारले.

त्यावर अजून गडगडाटी हसून चंद्रभानने होकारार्थी मान हलवली. आणि आपल हसू आवरत म्हा णाला,"अरे राजू थोडी गम्मत केली तुझी तर तू इतका अस्वस्थ झालास? जर अस खरच घडल असत तर बहुतेक तुझी चड्डीच फाटली असती. चल विसर ते आणि निघ बघू आता. नाहीतर अजून उशीर होईल तुला तुझ्या पार्टीला."

त्यावर सुटकेचा निश्वास टाकत राजन उठला आणि "साल्या ही कसली चेष्टा रे?" अस म्हा णत निघाला. दारापर्यंत जाऊन मात्र तो गरकन मागे वळला मोठे डोळे करत चंद्रभानला त्याने विचारले,"जर तू खोट बोलत होतास भानू तर मग तुला निशाबद्दल कस कळल?"

"राजू अरे मी सकाळी तुझ्याकडे यायला निघालो त्यावेळी तुझ्या सेटच्या अगोदरच्या सेटवर निशा मला भेटली. जाम सुंदर आहे रे ती. मला बघून स्वतः बोलायला आली. तिनेच मला सांगितल की ती अगोदर तुझ्याकडे काम करत होती. पण आता नाही. मग मला हे सुचल आणि तुझी गम्मत करावी म्हा णून मी हे नाटक केल. तिचा नंबर मी घेतला आहे. काही निरोप आहे का तिला? असेल तर मला सांग. त्या निमित्ताने तिला फोन करीन म्हा णतो." डोळा मारत चंद्रभान म्हा णाला.

"भानू... तू खर बोलतो आहेस ना एकूणच? निशा तुला भेटली? खरच?" राजनने डोळे बारीक करत चान्द्रभानला विचारले.

"कमाल करतोस राजू. नाहीतर निशा नावाची तरुण सुंदर मुलगी तुझ्याकडे काम करते याच काय मला स्वप्न पडल होत? अस का विचारतो आहेस तू?" चंद्रभान शांतपणे म्हा णाला.

"भानू देव करो आणि तू म्हा णतो आहेस तेच खर असो. कारण निशा जेव्हा तिचा राजीनामा द्यायला आली होती तेव्हा मी तिला विचारले होते की दुसरीकडे कुठे अजून चांगला पगार मिळतो आहे म्हा णून सोडते आहेस का? तर म्हा णाली नाही.. तिला तिच्या गावाला जायचे होते. काहीतरी घडल होत म्हा णे; आणि त्याचा शेवट तिला स्वतःलाच करायला लागणार होता, अस तिच म्हा णण होत. मी तिला खूप समजावले होते अस अचानक चांगली नोकरी सोडून जाऊ नकोस. तुला खूप प्रोस्पेक्ट्स आहेत इथे. सुंदर आणि हुशार मुलींची आमच्या इंडस्ट्रीमध्ये वानवाच आहे. त्यामुळे हव तर सुट्टी घे काही दिवसांची. तुझ काम खूप चांगल आहे त्यामुळे तुला सुट्टी मिळेल. गावाकडेच काम झाल की ये परत. पण तिने एकले नाही. म्हा णाली परत आलेच तर नक्की येईन तुमच्याचकडे. पण परत येईन की नाही ते मलाच माहित नाही. मला कळलंच नाही ती नक्की काय म्हा णत होती. पण मग मी अजून काही नाही विचारल तिला. कदाचित तिला अवडल नसत. आणि उगाच कशाला कोणाच्या वयक्तिक गोष्टीत लक्ष घालायचं? म्हा णून मग मी अजून काही न बोलता तिचा राजीनामा स्वीकारला. पण परत आलीस तर जरूर ये अस म्हंटल होत. तरीही ती माझ्याकडे आली नाही आणि दुसरीकडे जॉईन झाली... आणि ते ही तू सांगतो आहेस तेव्हा कळल. ठिक! तिची इच्छा." राजनने चंद्र्भानला सांगितले.

"तिने तिच्या गावाला जाण्यासाठी नोकरी सोडली? कमाल आहे!"चंद्रभान म्हा णाला.

"अरे मला देखील आश्चर्य वाटल होत. मुख्य म्हा णजे एकीकडे ती म्हा णत होती की फक्त काहीतरी काम आहे आणि तरीही ती परत येईल की नाही ते तिलाच माहित नव्हत. हे थोड विचित्र वाटल मला." राजनने माहिती दिली.

एकूण राजन जे सांगत होता ते एकून चंद्रभान थोडा विचारात पडला. पण ते राजनच्या लक्षात आल नाही. तो आपल्याच नादात निघाला. राजनने दार उघडले आणि चंद्रभान भानावर आला. "अरे राजू तिच्या गावाच नाव काय महालास रे?" त्याने बाहेर पडणाऱ्या राजनला विचारले.

"गावाचे नाव? सांगितल होत खर तिने...... एक मिनिट.... हा ...... उमरगाव का नगर अस काहीस होत."असे म्हा णून राजन घराबाहेर पडला.

राजन गेला. त्याच्या शेवटच्या वाक्याने चंद्रभानला धक्का बसला होता. चंद्रभान विचारात पडला. कारण तो राजनशी आत्ता खोट बोलला होता. त्याचा सकाळचा अनुभाव त्याच्या इतकाच सच्चा आणि खरा होता. याचा काय अर्थ असू शकतो? चंद्रभानने आजवर अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याचा कल भय कथा आणि गूढकथांकडेच जास्त होता. पण सकाळी आलेल्या अनुभवाने त्याला पुरत गोंधळवून टाकलं होत. त्यात जाता जाता राजनने ज्या गावाचा उल्लेख केला होता... सकाळी त्या निशाने त्याच गावाचा उल्लेख केला होता. हा योगायोग नव्हता. हे नक्की काय चालल आहे ते चंद्र्भानला कळत नव्हत. मात्र सकाळी आलेला अनुभव खरा होता याची खात्री होती. त्यामुळे तो अनुभव येण्यामागे काहीतरी कारण असणार अस त्याला प्रकर्षाने वाटत होत. त्यामुळे वेळ न घालवता त्याने स्वतः लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ठेवलेले कपाट उघडले आणि उमरनगर किंवा उमरगाव असा उल्लेख असलेली कथा शोधायला सुरवात केली.

खूप शोधल्यानंतर चन्द्रभानला ती कथा मिळाली. त्याच्या खूप सुरवातीच्या कथांमधली ती एक अत्यंत लहान अशी कथा होती. आता त्याला ती फारशी आठवत देखील नव्हती कारण त्यावेळी तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि एक आवड म्हा णून अधून मधून कथा लिहित होता. ती कथा देखील त्याला सुचली होती कारण मित्रांबरोबर रत्नागिरीला जाताना मध्ये एक उमरगाव थांबा लागला होता. त्यावेळी एका मित्राने तिथेल्या वाड्याचा उल्लेक करून त्याबद्दलच्या काही वंदता सांगितल्या होत्या. आणि मग एक गम्मत म्हा णून त्याने ती कथा लिहिली होती.कथा मित्राने वाचली होती आणि चांगली आहे म्हा णून चंद्रभानच्या मागे लागून त्याला ती एका मासिकाकडे पाठवायला लावली होती. कशी कोणजाणे पण ती छापून आली होती. खर तर चंद्रभानच्या अगदी सुरवातीच्या काळात.... म्हा णजे लेखकच व्हायचं असा केवळ मनात विचार होता........ त्यावेळी छापून आलेली ती कथा होती. ती कथा मिळाली आणि त्यानुषंगाने चंद्र्भानला मागील सगळ आठवलं. या कथेचा आणि आजच्या सकाळच्या अनुभवाचा काहीतरी संबंध असावा अस त्याला वाटल. पण त्याला अजूनही ती कथा पूर्ण आठवत नव्हती. म्हा णून मग त्याने आपलीच कथा वाचायला घेतली.

.............................................उमरगाव कोकणातल एक लहानस गाव. इतक लहान की जेम-तेम पाच-सहाशेच कुटुंब असतील. ताडा-माडांनी नटलेल, सुंदरसा समुद्रकिनारा लाभलेलं एका कोपऱ्यातल स्वतःमधेच सुखी असलेल गाव होत ते. गावात एक मंदिर होत. खूप जुन बांधकाम होत त्याच. मंदिरात अनेक देव होते पण शंकराची पिंडी घाभाऱ्याच्या मध्यावर असल्याने ते मंदिर शंकराचे मंदिर म्हा णून ओळखले जायचे. प्रचंड मोठा मंडप होता मंदिराचा. आजूबाजूला आवार देखील होत. गावातले मोठे समारंभ या मंडपातच व्ह्यायचे. गावात तशी मोजून पाच-पन्नास ख्रुश्चन कुटुंब देखील होती. पण म्हा णण्यापुर्ती ख्रिश्चन... बाकी त्यांचे सगळे व्यवहार इतर गावकऱ्यांसारखेच होते. देवळात वेगवेगळ्या वारी कीर्तन-भजन चालायची पण कोणाचा कोणाला त्रास होत नव्हता. सगळ गाव आनंदाने मिळून-मिसळून रहात होत.

गावाच्या उत्तरेला मंदिरा इतकाच जुना एक वाडा होता. त्याच जुन्या धाटणीच्या बांधणीचा. मोठ आवार असलेला वाडा एकलकोंडा वाटायचा कारण आवारात आंबा फणसाबरोबरच वड पिंपळाची झाडे देखील खूप होती. चिंचा, नारळ, पोफळी... म्हा णाल ती झाडं. आणि गिनती एक किंवा दोन नाही तर दहा-वीस च्या संख्येत सहज. दोन विहिरी देखील होत्या. एक वाड्याच्या मागल्या अंगाला आणि एक पुढे. वाडा कौलारू होता. दुमजली! पक्क बांधकाम. भिंतींची जाडीच मुळी तीन-चार फुट असेल. खोल्या प्रशस्त. वेगळ्या कपाटांची गरजच नव्हती. भिंतीतली अंगची कपाटच खूप होती. त्यामुळे ती प्रशास्तता अंगावर यायची. मोठ्या खिडक्या. पुरुष-पुरुष उंचीच्या. चौपदरी वाडा. मागील अंगणात चार फुटी सुंदर तुळशी वृंदावन.

प्रत्येक प्रदेशाचा आपला असा एक स्वभाव असतो. तसा कोकणाचा आहे. एकूण जगात होणाऱ्या उलाढाली-राजकारण यावर चावडीवर बसून खूप काथ्याकुट होत असतो. पण शेजारच्या घरात कधी आवाज चढला तर त्याकडे मात्र सगळे दुर्लक्ष करतात. म्हा णून असेल.......... किंवा गावातल्या प्रत्येकालाच माहित असेल की तो वाडा आणि त्यात रहाणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे नसते, त्यामुळे मनात अनेक प्रश्न असूनही गावकरी कधी त्याचा उल्लेखही करत नव्हते. जणूकाही तो वाडा गावात असूनही नव्हता.

थंडीचे दिवस होते. अंधारून लवकर येत असे. त्यात उंच-उंच माड असल्याने काळोख अजून गडद भासायचा. गावाकडे येणारी एसटी तीन कोसावारच थांबायची. तिथून मग बांधांवरून चालत गावाकडे याव लागायच. गाव कोकणातल असल्याने 'वेशी तितक्या गोष्टी' म्हा णी प्रमाणे त्या गावातसुद्धा अनेक वंदता होत्याच. त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर उमरगावाकडे कोणी येत नसे. अगदी गावातलं माणूस असलं तरी निघायला उशीर झालाच तर आहे तिथेच वस्तीला राहून दुसऱ्या दिवशीची गाडी पकडून येत.

पण हे झाल गावातल्याच लोकांसाठी. नवीन येणाऱ्या प्रवाशाला हे कस माहित असणार? संध्याकाळचे सात वाजून गेले होते. बांधावरून तोल सांभाळत येणारा शहरी बाबुसुद्धा नवीनच होता. शेताला दुपारीच पाणी पाजलेल होत. पण थंडीचे दिवस असल्याने बांधाकडे चिखल तसाच होता. बाबूचे बूट चिखलाने पार माखून घेले होते. चिखलातून चालताना फच-फच असा मोठा आवाज होत होता. त्यामुळे बरोबर अजूनही कोणीतरी चालत आहे असा भास होत होता. बाबू थांबून सारख मागे वळून बघत होता. पण तस कोणीच दिसत नव्हत त्याला. स्वतःवर वैतागत अंधारातून धडपडत बाबू गावात पोहोचला तेव्हा चावडीच्या गप्पा आटपत आल्या होत्या. घरा-घरातून सुरमई-कोलमिच्या रश्याचा आणि रटरटणाऱ्या भाताचा सुगंध दरवळायला लागला होता. त्यामुळे पुरुष मंडळी मुलांना हाकून घराकडे चालती झाली होती. एकटा म्हादू चीलीमिचा झुरका घेत पारावर बसला होता. दोन-चार झुरके मारून तो देखील खोपटीकडे वळणार होता. तितक्यात बाबू तिथे पोहोचला.

"नमस्कार" बाबूने म्हादुकडे बघत म्हंटले.

"राम राम." म्हादूने प्रतिउत्तर दिले आणि बाबूचे निरीक्षण करायला लागला. गुढग्या पर्यंत असलेले आणि आता चिखलाने भरलेले बूट. हातात मोठी पेटी. खाकी विजार आणि बुशर्ट. डोक्यावर इंग्रजासारखी टोपी. ते रूप बघून म्हादुला आश्चर्य वाटल आणि हसायला देखील आल. "कोनिकडच पाहुन तुम्ही?" त्याने बाबुला विचारल.

'मी शहरातून आलो आहे. उमरगाव ते हेच ना?" बाबूने हातातली पेटी खाली ठेवत विचारले.

म्हादू हसला आणि म्हा णाला,"हो हो! हेच उमरगाव. कोणाकडे आलात जणू?"

"खरातांकडे." बाबूने म्हंटले आणि सैलावून बसलेला म्हादू दचकला. त्याने चीलीमिचे झुरके मारणे बंद केले आणि एकूणच आपल बस्तान आवरायला सुरवात केली.

"कुठे आहे हो वाडा? तुमच्या गावात अजिबात उजेड नाही. मी नवीन आहे. जरा सोबत कराल का? मला वाड्यावर वेळेत पोहोचायचे आहे. फारच उशीर झाला आहे मला." बाबू आपल्याच नादात होता. त्याला अजून म्हादूची लगबग लक्षात आली नव्हती.

"वाडा ना? त्या तिकडे पार गावाच्या पल्याडच्या अंगाला. बर मी येतो पावन. वाईच घाई होती." अस म्हा णून म्हादू बसली घोंगडी खांद्यावर मारून चालुदेखील पडला.

बाबू एकदम गोंधळून गेला म्हा दुच्या गडबडीने. म्हादू जात असलेल्या दिशेने तोंड करून तो मोठ्याने म्हा णाला,"अहो.. अहो.... मागल्या अंगाला म्हणजे नक्की कुठे?"

पण उत्तर द्यायला म्हादू थांबलाच नव्हता. बाबू अजूनच वैतागला आणि अचानक त्याला मागून आवाज आला....

"खरातांच्या वाड्याकडे जायचं आहे का तुम्हाला? चला मी तिथेच जात आहे."

अचानक मागून आलेल्या आवाजामुळे दचकून बाबूने मागे वळून बघितले. किनऱ्या आवाजातले ते वाक्य म्हादुने देखील एकले होते. पण मागे वळून बघायची त्याची हिम्मत झाली नाही. तो तसाच पुढे पुढे चालत अंधारात त्याच्या घराकडे निघून गेला. बाबूच्या मागे एक अप्रतिम सुंदर तरुणी उभी होती. तिने ख्रिस्चन लोकांसारखा काळा झगा अंगात घातला होता. हातात एक कंदील होता. अस अचानक एका सुंदर तरुणीला स्वतःहून मदतीला आलेलं पाहून बाबू बावचळला आणि दोन पावल मागे सरकला.

"चिंता करू नका. या माझ्या मागून." ती तरुणी शांतपणे म्हा णाली आणि बाबू येतो आहे की नाही हे न बघता वळून चालूही पडली.

बाबू तिच्यामागून चालताना विचार करत होता. खरातांचा वाडा दाखवायला या बाईला आपल्या बरोबर येण्याचे कारण काय असेल? रस्ता सांगितला असता तरी आपल्याला जाता आलच असत की. जणूकाही बाबूचे विचार ऐकायला यावेत अशा प्रकारे ती मागे वळली आणि म्हा णाली, "माझ म्हणत असाल तर मी तिथेच असते. त्यामुळे मुद्दाम नाही येत तुम्हाला रस्ता दाखवायला." बाबू तिच्या बोलण्याने तसा दचकला. पण काहीच झाल नाही अश्या प्रकारे म्हा णाला,"अहो पण मी काहीच म्हा णत नाही आहे. उलट तुम्ही मला इतकी मदत करता आहात त्याबद्दल धन्यवाद."

परत पुढे बघून चालायला सुरवात करत ती म्हा णाली,"तुम्ही आभार मानून घ्या आताच. नंतर वेळ मिळेल-नाही मिळेल."

तिच ते गूढ वागण आणि बोलण बाबुला अस्वस्थ करत होत. पण आता बरच अंधारून आल होत. काहीच दिसत नव्हत. गावातही पुरत सामसूम झाल होत. त्यामुळे तिच्याशिवाय कोणी मदत कारण शक्य नव्हत. ती मात्र सवयीचा रस्ता असल्याने असेल बहुतेक पण भराभर चालत होती. त्यामुळे तो मुकाट तिच्यामागे चालत राहिला.

बराच वेळ चालाल्यानंतर ती अचानक थांबली. बाबुला कळेना ती अशी अचानक का थांबली. पण क्षणभराने अंधाराला डोळे सरावले आणि त्याला तिच्या पुढे असलेले लाकडी गेट दिसले.

"हाच खरातांचा वाडा. जा तुम्ही आत. अंधार असला तरी फर्लांगभर चाललात की वाड्याचा दरवाजा लागेल." ती त्याच्या वाटेतून बाजूला होत म्हा णाली.

"अरे तुम्ही नाही येत आत?" बाबूने गोंधळून विचारले. एव्हाना त्याच अस मत झाल होत की ती तरुणी खरातांच्याकडे कामाला असावी आणि त्याच वाड्यात राहत असावी. त्याने आजूबाजूला बघितले पण कोणतेही घर दिसत नव्हते. 'मग ही अशी इथून कुठे जाणार?' त्याच्या मनात आले.

"मी वाड्याच्या मागच्या अंगाला असते. तुम्हाला माझी गरज न लागलेलीच बरी." अस ती म्हा णाली आणि त्याला गेट उघडून दिले.

काही न बोलता बाबू आत शिरला आणि वाड्याच्या दिशेने चालू पडला. वाडा तसा आतच होता. त्यात आता गुडुप्प अंधार झाला होता. कुठेही नावालाही उजेड नव्हता. त्यात आजूबाजूला मोठ-मोठी झाड होती. त्यामुळे बाबूला अस्वस्थ वाटायला लागले. परत मागे वळून गावात कोणाकडेतरी रात्र काढावी आणि सकाळी वाड्यावर जावे असे त्याच्या मनात आले. पण असा विचार करेपर्यंत तो वाड्याच्या दरवाज्यासमोर उभा होता. दारावर एक कंदील लटकत होता. त्याच्या उजेडात त्याने एकदा त्या भल्यामोठ्या दरवाज्याचे निरीक्षण केले आणि कोयंडा हलवून दार वाजवले. केवढातरी मोठा आवाज झाला. आतून खोल कुठूनतरी "कोssssण?" असा आवाज आला आणि त्याबरोबरच दरवाज्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा आवाज आला.

"मी बाबू. शहरातून आलो आहे." नक्की काय उत्तर द्यावे हे न कळून बाबूने त्या आवाजाला जे सुचले ते उत्तर दिले.

दरवाजा उघडला गेला आणि आत कंदील घेऊन एक मध्यम वयातली स्त्री उभी होती. तिच्या चेहेऱ्यावर भलताच गोंधळलेला आणि घाबरलेला भाव होता. तिने कंदील वर केला खरा पण बाबुला बघण्यापेक्षा त्याच्या मागे कोणी आहे का याचा ती अंदाज घेत होती असं बाबुला वाटलं. जेमतेम क्षणभर त्याच्याकडे बघितल-न बघितल्यासारख करून तिने खरखरीत आवाजात बाबुला विचारलं, "कोण हवाय तुम्हाला?"

"मी बाबू." काय उत्तर द्यावे हे न सुचून बाबू म्हा णाला.

"बर! मग?" तोच खरखरीत आवाज.

"मग? मग काही नाही. उमरगाव मधल्या खरातांच्या वाड्यासाठी व्यवस्थापक हवा आहे अशी जाहिरात वाचली. म्हा णून मी आलो आहे." बाबूने माहिती दिली.

"हो. हवा आहे हे खर. मग?" त्याच आवाजातला प्रश्न. नजर मात्र बाबुच्या पल्याड लागलेली. "नोकरी मला मिळेल का ते बघायला आलो आहे. फार गरज आहे हो मला नोकरीची. मी जाहीरात आणली आहे." बाबू म्हाणाला. अजून काही प्रश्न येऊ नयेत महणून त्याने पटकन ते पत्रक काढून पुढे केल. बाबूने पुढे केलेले पत्रक ते तिने हातात घेतले पण ते बघितले देखील नाही. आता तिचा आवाज थोडा बदलला होता. तिने बाबुला म्हंटले,"हे बघा.. मला व्यवस्थापक हवा आहे पण त्याने बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायला हवी. तुम्ही कधीही या वाड्याच्या आत यायचे नाही. तसा विचर देखील करायचा नाही. तुमच्या पगाराची काळजी करू नका. तो तुम्हाला महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळत जाईल." इतक सगळ ती बोलली तरीही अजूनही तिने बाबुकडे निट बघितले देखील नव्हते. तिची नजर बाबूच्या मागेच लागली होती. त्यामुळे बाबू पुरता गोंधळून गेला होता. हे अस दाराच्या बाहेर उभ राहून बोलत रहाण्याचा त्याला आता वैताग आला होता. त्यात ती बाई त्याला आत घ्यायला तयार नसावी हे त्याच्या लक्षात आले होते. तो तर गावात कोणालाही ओळखत नव्हता. आता उशीर देखील इतका झाला होता की परत मागे वळून गावात जागा शोधण त्याच्या जीवावर आल होत. दिवसभर प्रवास आणि त्यानंतरच्या पायपिटीने तो खूप दमला होता.

त्याने आर्जवी आवाजात म्हंटले,"वाहिनी, मला आत येऊ द्या हो. आता इतक्या उशिरा मी गावात कुठे जागा शोधायला जाऊ?"

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या बाई दरवाजा बंद करायला लागल्या. त्याबरोबर न कळत भांभावलेल्या अवस्थेतल्या बाबूने बंद होणाऱ्या दरवाजात पाय घातला. त्याबरोबर मागून कोणीतरी मोठ्याने हसल्याचा आवाज एकू आला. वाड्याच्या आतल्या त्या बाईंच्या डोळ्यात मूर्तिमंत भिती उभी राहिली आणि मग काही न बोलता त्यांनी बाबुला आत घेतले आणि दरवाजा लावून घेतला.

आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि आता असलेल्याखऱ्या-खोट्या इतर वन्दातांच्या मध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खर सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण त्या घटने नंतर मात्र खारातांच्या वाड्याच्या दिशेने जाणच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही................

कथा वाचून संपली आणि चंद्रभान भानावर आला. रात्रीचा एक वाजून गेला होता. कथा वाचताना नकळत त्याने दोन पेग्स घेतले होते आणि पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. त्यामुळे चंद्रभानचे डोके फारच जड झाले होते. तो तसाच सोफ्यावर आडवा झाला आणि त्याला झोप लागली.

"तुम्हाला या कथेची आठवण व्हावी म्हा णूनच मी काल सकाळी तुम्हाला येऊन भेटले होते. कराल ना मद्त मला? चंद्रभान! उठा ना! मी तुम्हाला चहा करून देकू का?" निशा चन्द्रभानच्या शेजारी बसून त्याला हलवत विचारात होती.
.
.
क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Jun 2017 - 8:54 am | योगेश लक्ष्मण बोरोले

ऊत्सुकता ताणुन धरण्यात पुर्णपणे यशस्वी. पुभाप्र (चोरलाय मी हा शब्द.)

नितिन५८८'s picture

19 Jun 2017 - 3:37 pm | नितिन५८८

छान लीहीलही आहे

स्रुजा's picture

19 Jun 2017 - 5:04 pm | स्रुजा

अरे वा ! वाट पाहते आहे पुढच्या भागाची ज्योति ताई.

पद्मावति's picture

19 Jun 2017 - 5:25 pm | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

कथा पूर्ण आहे. पण एक दिवसा आड प्रत्येक भाग टाकीन म्हणते. थोडी उत्सुकता ताणलेली बरी. आणि प्रत्येक भाग कुठे थांबवायचा त्याचा विचार करून मग टाकते आहे.

कपिलमुनी's picture

19 Jun 2017 - 7:05 pm | कपिलमुनी

+१

सुमीत's picture

19 Jun 2017 - 8:49 pm | सुमीत

मजा येत आहे, वाचताना. उत्सुकता थोडि ताणाच पण एक दिवसा आड भाग हे उत्तम.
नम्र विनंती, कोकणस्थ गावकर्यांच्या तोंडी सातारी रांगडी बोलि नको.

रुपी's picture

20 Jun 2017 - 12:32 am | रुपी

वा! मस्त!
वातावरणनिर्मिती एकदम भारी जमली आहे.

प्लीज एक विनंती, प्रकाशित करण्याआधी एकदा प्रूफरीड करा.

मनिमौ's picture

20 Jun 2017 - 11:14 am | मनिमौ

पुढचे भाग पण लौकर येऊ देत