लॉलीपॉप - २
लॉलीपॉप - १
दुसऱ्याच दिवशी माझ्या डेस्कवर एक जार स्थानापन्न झाला. रंगीबेरंगी लॉलीपॉपने भरलेला.
त्यानंतरचा पूर्ण आठवडा मी अद्विकाची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. न जाणो एखादा दुवा निसटला असेल तर तो लक्षात येईल या आशेने.
आदू येणार होती त्यादिवशी मी आठवणीने दुकानातून फुलं आणली. ती आधी बसली होती, त्या खुर्चीतून दिसतील अशा जागी एका कपाटावर फुलदाणीमध्ये ठेवली. यावेळेस मुद्दामचं खिडकीचे पडदे उघडले. कृत्रिम प्रकाश शक्य तेवढा कमी केला. रूममध्ये काय केल्याने एका चार वर्षांच्या मुलीला छान वाटेल तसे बदल केले. बऱ्याच फाईल्स डेस्कवर होत्या त्या आठवणीने बाजूला काढून ठेवल्या. माझ्या सईने काढलेली काही चित्रं भिंतीवर लावली. त्यादिवशी कन्सल्टिंग रूममध्ये मलासुद्धा प्रसन्न वाटलं.
ठरलेल्या वेळेच्या काही मिनिटं आधी आदू आली. पण यावेळेस आत येताना अपर्णाला तिला रागवावं लागलं नाही. बहुदा आदून मागच्यावेळेस आई रागावली होती ते लक्षात ठेवलं होतं. किंवा अपर्णाने तिच्याशी बोलून तिच्या मनाची तयारी करून घेतली असावी. आदू स्वतःहून आत आली आणि आधी बसलेली त्याच जागी बसली. पुन्हा एकदा अपर्णा मी बाहेर आहे असं सांगून वेटींग रूममध्ये जाऊन बसली. यावेळेस मी बराच विचार करून काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं. फक्त पहायचं काम करणार होते.
रूम आवरण्याचे निमित्त करून मी टेबलवरील काही गोष्टी हलवल्या. मग थोड्या वेळाने खेळण्यांचा एक बॉक्स खाली होता तिथे जाऊन अक्षरश: फतकल मांडून बसले. एक एक खेळणं काढून पाहिलं. अधूनमधून आदूकडे लक्ष गेलं तर ती आजही माझ्याकडे पहात नव्हती. पण भिंतीवरच्या एका चित्राने तिचं लक्ष वेधण्यात यश मिळवलं होतं. डेस्कवरच्या ड्रॉवरमध्ये काही कोरे कागद आणि रंगीत खडू होते ते काढून मी आदूजवळच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवले. मला वाटलेलं ती चटकन एखादा खडू घेऊन काहीतरी चित्र काढेल. तिने अगदी रेघोट्या ओढल्या असत्या तरी माझी हरकत नव्हती, पण आदूने यातलं काहीही केलं नाही.
तरीही मागच्या आठवड्यापेक्षा, आजचा वेळ बरा गेला. मी स्वतः सतत काहीना काही निमित्त करून काम करत राहिले. आदूशी बोलण्याचं शक्य तेवढं टाळलंच. बरोबर एक तासाने अपर्णाने दरवाजावर नॉक केलं आणि मी खुर्चीतून उठून दार उघडलं.
"बाय आदू!" असं म्हणून तिच्यापुढे लॉलीपॉपचा जार धरला. आदूने त्यातलं एक लॉलीपॉप घेतल आणि काही न बोलता आईबरोबर बाहेर पडली.
पुढच्या आठवड्यासाठी मी विशेष काही तयारी केली नाही. माझी गाडी योग्य मार्गावर आहे याची मला खात्री होती. जाणीवपूर्वक मी रूममधली एकही गोष्ट बदलली नाही. सगळं जिथल्या तिथे ठेवलं. अगदी आदूसाठी काढून ठेवलेले कोरे कागद आणि खडूसुद्धा. आठवणीने नवीन फुलं मात्र आणून ठेवली.
असे अनेक आठवडे आले आणि गेले. बहुतेकवेळा मी बाय याशिवाय इतर काहीच आदूशी बोलत नव्हते. इतक्या दिवसात एकच गोष्ट मला कळली होती ती म्हणजे मला तिच्या भावविश्वात जायचं होतं. तिला माझ्या विश्वात घेऊन येणं सध्या तरी अशक्यप्रायच गोष्ट वाटत होती. पण मला कळत नव्हतं असं काय झालं असेल ज्यानं ही चिमुरडी इतकी शट डाऊन झाली असेल. मला छळणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे, स्पर्श! लहान मुलांचे पापा घेणं, त्यांचे लाड करणं ही तर आपल्या देशात केवढी सामान्य गोष्ट. कित्येकदा तर अनेक लहान मुलांना आजीआजोबा अगदी जबरदस्ती पकडून गालगुच्चा घेतात. पण ती मुलं त्याबद्दल रिऍक्ट होतात. बहुतांश मुलं थोडा वेळ रडतात आणि पुन्हा विसरून जातात. त्यांच्या खेळण्यात गुंग होतात. काही मुलं स्वतःहून परत पापा देतात. माझ्या ओळखीतल्या कित्येक आया कधी कौतुकाने, कधी तक्रार म्हणुन सांगत,
"अगं, मला अजिबात हलतासुद्धा येत नाही राधा झोपली की. पूर्ण लक्ष असतं झोपेत पण. आई दूर गेली की ही उठलीच म्हणून समज."
"माझा आकाश तर झोपतच नाही, माझा हात छातीवर घेऊनच झोपलेला असतो."
"काय सांगू, रात्रभर लाथा मारत असतो, एखादी लाथ हवेत बसली की हा उठलाच पपा पपा म्हणून रडत."
तो आश्वासक स्पर्श हवा असतो मुलांना. मी आहे इथेच असं सांगणारा. मग अद्विका का बरं या सर्वांपेक्षा वेगळं वागत असेल. पण खरंच हे वागणं वेगळं आहे का? तिच्या दृष्टीकोनातून ते नॉर्मलही असेल. पण मग तिच्या आईवडिलांचं म्हणणंही काही चुकीचं नाही. तिला आता हळू हळू इतर मुलांमध्ये मिसळण्याची सवय व्हायला हवी. काही वर्षांत शाळा सुरु होईल. लहान मुलांना जवळ घेणं, त्यांनी आपल्या कुशीत शिरणं ह्यातही एक वेगळाच आनंद असतो. आता अजून एका सेशननंतर कर्णिकसरांशी बोललंच पाहिजे असा विचार करून मी पुन्हा एकदा माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये आदुची वाट पहात बसले.
इतर अनेक सेशनप्रमाणेच त्यादिवशीच सेशनही सुरु झालं. तसं वेगळं काही होत नव्हतंच. विचारांच्या तंद्रीत मी मात्र आज माझा फोन सायलेंट मोडवर ठेवायला विसरले होते. अर्धा एक तास उलटून गेला असेल नसेल तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. घाईघाईने मी माझ्या पर्समधून फोन काढला आणि कट केला. पण त्या काही क्षणात आदूने चक्क माझ्याकडे नजर वर करून पाहिलं होतं. प्रचंड अविश्वास होता तिच्या डोळ्यांत. तिचे डोळे भरून आले. त्यापुढे तिने जे केलं ते पाहून मी स्तब्ध झाले.
*****
क्रमश:
वाचन
6952
प्रतिक्रिया
0