✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मामाडे लेनेस वलुरकेस

प
प्रचेतस यांनी
Sun, 06/05/2016 - 19:18  ·  लेख
लेख

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

गोष्ट तशी खूप पूर्वीची, पूर्वीची म्हणजे सुमारे २२०० वर्षापूर्वीची. तेव्हा तो लाखो वर्षांपासून असाच पडून होता. उन्हाळ्यात काळसर पिवळसर दिसणारं त्याचं रापलेलं शरीर पावसकाळ सुरु झाला की हिरवं हिरवं दिसू लागायचं. पाणावलेल्या खडकातनं अलगद धिटुकले कोंब बाहेर पडत. रानवेलींना धुमारे फुट लागत, विविधरंगी फुलं अलगद उमलू लागत. त्याच्या अंगाखांद्यांवरुन निर्झर खळाळत वाहात. सारी सृष्टी तजेलदार होवून अवघं अवघं चैतन्यानं भरुन जात असे. अशी सहस्त्र, लाखो वर्ष जात. अशातच एकेकाळी त्याच्या पायथ्यातून आडवाटेने एक श्रमणांचा तांडा पृथक पृथक वाट चालू लागला. त्यांच्या हाती होते फक्त छिन्नी आणि हातोडे आणि अंगी प्रचंड उर्मी काही नवं भव्य दिव्य असं निर्माण करण्याची. श्रमणांचा तो प्रचंड तांडा बघून वानरं कल्लोळू लागली, कुणी येक ते सरसर झाडावर गेले, कुणी डोंगराच्या खबदाडीत जाऊन बसले, कुणी हळूच खडकाआडून हळूच डोके वर काढून दात विचकू लागले. श्रमण त्याच्याशी भिडू लागले. कुणी दोरांची शिडी करुन त्याच्याशी झट्या घेऊ लागले, कुणी खोबण्यांतून वाट काढू लागले, कुणी माथ्यावर जाऊन वेलींच्या साहाय्याने कातळास येंगू लागले, कुणी आपल्या हत्यारांनी खडकास चाचपून पाहू लागले, कुणी पुढ्यातल्या दरीचा अदमास घेऊ लागले, कुणी असे अवघें अवघें त्या भक्कम पहाडाचा वेध घेऊ लागलें. त्यांच्यातच होता वैजयंती नगरीचा भूतपाल नामक श्रेष्ठी. वैजयंती म्हणजे आजचं कर्नाटकातलं वनवासी. आपल्या पाथरवटांसह त्याने त्या भव्य कातळी छातीचा अदमास घेतला. त्या पाथरवटांसह काही यवनी शिल्पकारही होते. त्या भव्य पहाडाच्या समोरच एक देखणं लेणं शंभर एक वर्षांपूर्वी कुणीतरी निर्मिलं होतं त्यातल्या त्रुटींवर मात्र करण्याचं आव्हान त्या भूतपालासमोर होत. त्या लेण्याची भव्य कमान खडकाचा आडोसा नसल्याने पर्जन्यधारांमध्ये कणाकणानं झिजली जात होती, तिथले खांब कलते होते. पण इथे मात्र भूतपालाला तसं नको होतं. त्याने काही आराखडे तयार केले. बुद्धाला मनोमन वंदन केलं आणि छिन्नीचा एक अलवार घाव हळूच त्या भव्य पहाडावर घातला. भूतपाल निर्मित करत असलेल्या लेण्याला हळूहळू आकार येऊ लागला. सर्वात आधी वरची अश्वनालाकृती कमान खोदली गेली. त्यानंतर हळूहळू अंगच्याच खडकाचा आधार घेऊन गजपृष्ठाकार छत खोदण्यात येऊ लागलं, पाणी पडू नये म्हणून बाहेरची जवनिकाही खोदण्यात आली. आयोनियाहून काही यावनी शिल्पकारही आले होते. पर्सिपोलिस शहरातल्या स्तंभांच्या धर्तीवर चैत्यगृहातले स्तंभ कोरण्यात येऊ लागले. इतकं प्रचंड खर्चिक काम पाहून सामान्य लोकसुद्धा दानधर्म करु लागले. कुणी हालिक, कुणी श्रेष्ठी, कुणी व्यापारी तर कुणी राजा. पश्चिम किनार्‍याअवर धेनुकाकट इथे यवनांची मोठी वस्ती आहे. तिकडील यवनही खूप मोठा दानधर्म सुरु करु लागले. कुणी महारठी अग्निमित्रणक सिंहस्तंभ उभारत होता. महारठीस गोतिपुतसग्निमित्रणकस सिहथबो दानम्. तर कुणी धेनुकाकट येथील अत्तरांचा व्यापारी दरवाजांसाठी दान देत होता. धेनुकाकट गंधिकस सिहदतस दानम् घरमुघ. कुणी शूर्पारकाचा सातिमित शारीर अवशेषांसह स्तंभांची देणगी देत होता. सोपारका भयंतानं धमुतरियानं भाणकस सातिमितकस ससरीरो थबो दानम्. तर कुण्या गृहस्थाची माता भायिला स्तंभासाठी दान देत होती. गहतस महादेवणकस मातु भायिलाया दानम्. ह्या सर्व लहानमोठ्या दात्यांच्या श्रमाने, कुणाच्या पैशाने एक भव्य लेणं वेगानं तयार होवू लागलं. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ल्याचं लेणं खरं तर कार्ले गावाजवळ नाही. ते आहे कार्ल्यापासून ६/७ किमी अंतरावर. पायथ्याचं मूळ गाव आहे ते वेहेरगांव. हे नाव पडलंय ते वरच्या लेणीत असलेल्या विहारांमुळे. गडावर एकवीरा देवीचं मंदिर आहे. ते कधीपासून आहे ते कुणास ठाऊक. अर्थात हल्ली जे मंदिर आहे ते तसं अलीकडचं. दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं असावं. मात्र इथे खूप आधीपासून देवीचं लहानसं ठाणं असावं असं काही संशोधक मानतात. कार्ले लेणीचं मूळ नाव वलुरक. तसा शिलालेखच इथल्या लेण्यांत आहे. भव्य तिमजली विहार, काही अर्धवट खोदलेले विहार, महायान कालखंडात झालेलं काही मूर्तीकाम आणि अत्यंत देखणा असा हिनयानकालीन शैलीचं उदाहरण असलेला उत्कृष्ट चैत्य अशी ह्याची रचना. इथल्या निर्मिकांनी आपला जीव ओतूनच हे अद्भूत घडवलं असावं. कार्ले लेणं माझ्या प्रचंड आवडीचं. इकडे अगदी जवळजवळ तीन लेणीसमूह आहेत. एक आहे विसापूरच्या मागच्या डोंगरातलं बेडश्याचं तर एक आहे समोरच असलेलं भाजे डोंगरातलं. हे तर विसापूराच्याच पोटात. ह्या तिन्ही लेण्यांची काही वैशिष्ट्यं त्यांचं वेगळंपण दाखवतात. बेडसे लेणीच्या पुढ्यातले स्तंभ अतिशय देखणे. उच्च. पर्सिपोलिटन धर्तीचे, भाजे लेणीतलं वैशिष्ट्य म्हणजे तिथली अद्भूत सूर्यगुंफा. आजही तिथल्या त्या गूढ मूर्ती कित्येकांना कोड्यात टाकतात. त्यांचं कोडं पूर्णांशानं अजूनही सुटलेलं नाही. आणि कार्ल्याचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे तिथलं चैत्यगृह. इथल्यासारखा चैत्य मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही आणि ह्याच्यापेक्षा सुंदर असलेला चैत्य इतरत्र कुठेही अस्तित्वात असणार नाही ह्याचीही मला खात्री आहे. मी अजिंठ्यातला भरजरी महायान चैत्यदेखील पाहिला आहे. पण कार्ल्यासारखा साधेपणातही विलक्षण सौंदर्य असलेला चैत्याची सर त्यालाही येत नाही. कान्हेरीतल्या चैत्यानेही ह्याची नक्कल करायचा प्रयत्न केला. पण अशी विलक्षण सुंदर वास्तू परत कधीही निर्माण करता येत नाही हेच खरे. कार्ले चैत्याची रचना तशी सह्याद्रीत असणार्‍या सर्वसाधारण चैत्यगृहांसारखीच. पुढ्यात जवनिका, जवनिकेतल्या भिंतींवर उंचच उंच गवाक्षांसारखी रचना. मधेमध्ये युगुलं कोरलेली. ही युगुलं ह्या लेणीसाठी दानधर्म केलेल्या दात्यांची असावीत. त्यानंतर मुख्य चैत्यगृहात प्रवेश, दोन्ही बाजूंना पर्सिपोलीटन धर्तीच्या स्तंभांच्या रांगा, त्यांजवर हत्ती घोडे आणि त्यांवर बसलेली युगुलं खोदलेली. गजपृष्ठाकार छत आणि त्या छताच्या शेवटाकडे आणि दोन्ही बाजूंच्या मधोमध एक भव्य स्तूप. अगदी हर्मिकेवरील २२०० वर्ष जुन्या लाकडी छतासह अस्तित्वात असलेला. ह्याच चैत्याच्या मधल्या दरवाजाच्या उजव्या बाजूच्या पट्टीकेवर कोरलेला दिसतोय तो ऋषभदत्ताचा शिलालेख. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - शकसंवत ४२

भूतपालाने निर्मिलेलं लेणं पूर्ण झालं होतं. इथली राजकीय स्थितीही बदललेही होती. आयोनिया, अरबस्तान, रोम आदी शहरांमधून येणार्‍या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल, कलियान शूर्पारक बंदरात येऊन पडू लागल्या होत्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून घाटमार्ग पार करू लागले व प्रतिष्ठान, तगर, नासिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. ह्या वापारामुळेच सातवाहन साम्राज्य बलाढ्य होऊ लागले व त्याच सुमारास ह्या व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी येथे पश्चिमी क्षत्रपांचा प्रवेश होणे हा नियतीचाच खेळ होता. हे क्षत्रप म्हणजे कुशाणवंशीय कनिष्काने नेमलेले प्रांताधिकारी. कनिष्काने आधी कच्छ जिंकून तेथे कार्दमक वंशीय चष्टनाची नेमणूक केली तर शूर्पारकाच्या उजवीकडच्या प्रांतात अश्मकाच्या वरील भागात भूमकाची नेमणूक केली. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण साम्राज्य कमजोर होवून हळूहळू लयास जाऊ लागले व ह्याच सुमारास क्षत्रपांची महत्वाकांक्षेने उचल खाऊ लागली. भूमकाने गुर्जर, काठेवाड, माळवा, कुकूर प्रांताचा ताबा मिळवला. भूमकाचा पुत्र नहपान हा पित्याहूनही अधिक महत्वांकांक्षी, स्वपराक्रमाने त्याने इकडील आद्य सत्ताधीशांना हळूहळू प्रतिष्ठानपावेतो ढकलत नेले. शिवस्वातीची राज्यलक्ष्मी हरण केली. हा नहपान मोठा चतुर होता. संस्कृतीविहीन, धर्मविहीन रानटी टोळ्यांतला हा शकवंशीय. पण दुसर्‍याचे राज्य हरण करतानाच इकडील सामान्य जनतेला आपलेसे करण्याचे धोरण मात्र त्याने स्वीकारले. भूमकाने केलेला राज्यविस्तार त्याने गोवर्धन जिंकून अधिक वाढवला व त्याची नजर नंतर तेथून ४० कोसांवर असलेल्या माझ्यावर पडली. मामलहार प्रांत त्याने लवकरच आक्रमिला. नहपानाने त्याची मुलगी दख्खमित्ता (दक्षमित्रा) हिचे लग्न त्याने दिनिकाचा पुत्र उशवदात (ऋषभदत्त) ह्याचेशी लावून दिले. हा उशवदात मोठा दानशूर. ह्याने जो दानधर्म केला तो मनापासून केला का केवळ इथल्या अज्ञ जनांना आपलंसं करण्यासाठी केला हे त्या पहाडाला समजणं अवघड जातंय. उशवदाताने इथे येऊन त्या डोंगरापासून पाच मैलावर असलेले करजिक (करजगाव) गाव धर्मादाय केले त्याबद्दलचा एक लेखच त्याने त्याच्या अंतर्भागात खोदलेल्या त्या भव्य लेण्याच्या एका भिंतीवर कोरून ठेवला. सिधं | रञो खखरातस खतपस नहपानस जामातरा दीनीकपुतेन उसभदातेन...........भोजापयिता वलूरकेसु लेणवासिनं पवजितानं चातुदिसस सघसयानपथ गामो करजिको दतो सवान वासवासितानं | राजा क्षहरात वंशीय क्षत्रप नहपान ह्याचा जावई दिनिकाचा पुत्र ऋषभदत्त ह्याने तीन हजार गाई दान दिल्या, बनासा नदीवर सुवर्णदान करुन घाट बांधला, देवांना व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली. पुण्यक्षेत्र प्रभास येथे ब्राह्मणांना ८ भार्या दान केल्या, दरवर्षी एक लाख जनांना भोजन घातले त्याने ह्या वलूरक लेण्यात वर्षाऋतूत राहणार्‍या सर्व भि़क्षूंच्या निर्वारार्थ करजिक गाव दान दिले. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ले चैत्यगृहामुळे मी प्रचंड आश्चर्यचकित झालेलो आहे. हे बघा बाहेरच दिसतोय तो अग्मिमित्रणकाने उभारलेला सिंहस्तंभ. अर्थात अशोकन लायन पिलर. अतिशय भव्य. घेरा इतका प्रचंड कि चार माणसांच्याही कवेत मावू शकणार नाही. महाराष्ट्रात असे अशोकस्तंभ केवळ दोनच ठिकाणी आहेत. एक इथे आणि दुसरा कान्हेरी येथे. कान्हेरी ही कार्ले चैत्याची भ्रष्ट नक्कल आहे. तिथे चैत्यगृहाच्या बाहेरील दोन्ही बाजूस असे एकेक स्तंभ आहेत. त्याजवरुन कार्ले येथेही पूर्वी अजून एक सिंहस्तंभ असावा असे वाटते. अर्थात आज केवळ एकच स्तंभ येथे शिल्लक दिसतोय. पहा ह्याची रचना तरी कशी. उंचच उंच जवळपास सोळा कोनी स्तंभ, त्यावर आमलक, त्यावर हर्मिकेची चौकट आणि त्यावर सिंहप्रतिमा. निर्विवादपणे देखणं. a a---a ह्या स्तंभाच्या पुढेच आपला प्रवेश जवनिकेत होतो. ती पहा ती जवनिका., आज हिचे दोन आधाराचे दोन स्तंभ पूर्णपणे तुटलेले दिसत आहेत. त्या स्तंभांच्या समोरच आहे ती चैत्याची भव्य पिंपळपानाकृती कमान. ह्या कमानीच्या बरोबर खाली एक भव्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या द्प्न्ही बाजूंना लहान लहान उपद्वारे. पहा त्या जवनिकेच्या दोन्ही बाजूंना तीन तीन भले प्रचंड गजराज दिसत आहेत. त्यांनी जणू वरचा भव्य प्रासाद आपल्या भक्कम पाठीवर तोललेला आहे. बघा ह्या हत्तींसाठी दान कोणी दिलंय ते. थेरानाम भयंत इंददेवस हथि च पुवा दो हथिनम् च उपरिमा हेथिमा च वेयिका दानम् अर्थात दोन हत्ती व हत्तींच्या वर व खाली असलेल्या वेदिकांची भदंत इंद्रदेव ह्याने दिलेली देणगी. a पहा ही पुष्ट युगुलं. किती देखणी आहेत ही. हीनयान शिल्पकलेचा अतिशय उत्कट अविष्कार. कुणी एकमेकांच्या कवेत हात घालून उभं आहे तर कुणी किंचितसं फटकून उभं आहे. a---a कुणी उभ्याउभ्याच नमस्कार करीत आहे तर कुणी अगदी आरामात मस्तकी हात घेऊन उभं आहे. a---a काय देखणे विभ्रम आहेत एकेकाचे. a ह्यांचे वेष तरी पाहा ना. साधा, जणू ही शेतकरी कुटुंबे आहेत. पुरुषांनी मुंडासं बांधलंय. कासोटा पक्का खेचून बांधलाय. स्त्रीयांच्या कपाळी मोठा दागिना, कानांत डूल, गळ्यात माळ आणि कमरेला मेखला. साधासाच पण सुंदर वेष. a ह्या शिल्पांच्या वर आहे ती गवाक्षांसारखी उंचच उंच रचना. इथे अगदी त्रिमितिय आभास दिसत आहे. प्रत्येक मजल्याला वेदिकापट्टी व त्यांवर पिंपळपानाकृती गवाक्ष. असे एकावर एक मजले. a a a मधूनच युगुलांमध्ये बोधीसत्व, अवलोकितेश्वर आदी प्रतिमा कोरलेल्या दिसत आहेत. ही महायान शिल्पकला. बोधीसत्वाच्या ह्या मूर्ती ३र्‍या/४ थ्या शतकात येथे कोरलेल्या असाव्यात. a हे भव्य सौंदर्य बघून मी अगदी विस्मित होतो आहे. कितीही वेळा इकडं आलं तर मला दर वेळी नवीनच काही दिसत आहे. मागच्या वेळी निसटलेलं ह्यावेळी दिसतं तर मागच्या वेळी दिसलेलं ह्यावेळी निसटतं. हे असं नेहमीच इथं होतं. मी जणू येथे संमोहित झालो आहे. हा पहा त्या उजवीकडील दरवाजांच्या चौकटीवर शिलालेख दिसतोय तो आहे खुद्द गौतमीपुत्र सातकर्णीचा. तो महान राजासुद्धा येथे पूर्वी येऊन गेलाय. नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद केल्यावर येथीलच विजयी शिबिरातून त्याने त्या करजक गावातील भूमी धर्मासाठी दान केल्याची आज्ञा काढली असेल. तो येथेच उभा असेल जेथे मी आज उभा आहे. ह्या राजाचं महाराष्ट्रावर मोठं ऋण आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - शकसंवत ४७ च्या आसपास

नहपान हा महाक्षत्रप झाल्यानंतरच सातवाहन साम्राज्य खूपच क्षीण झाले होते. पश्चिमेकडून होणार्‍या व्यापारावर शकांचे नियंत्रण प्रस्थापित झाले होते. सातवाहनांशी होणारा व्यापारच बंद पडल्यावर धनाचा ओघ वेगाने आटू लागला. सातवाहनांचे बलशाली साम्राज्य केवळ प्रतिष्ठान आणि त्याच्या आसपासचा प्रदेश इतक्या मर्यादित परिसरापुरतेच सिमीत झाले होते. शिवस्वाती सातकर्णी अतिशय नाकर्ता ठरला होता. अशातच शकसंवताच्या जवळजवळ प्रारंभीच शिवस्वाती आणि गौतमी बलश्रीच्या पोटी एक पराक्रमी पुत्र जन्माला आला, तो म्हणजे गोतमीपुतस सातकनिस अर्थात गौतमीपुत्र सातकर्णी. जनांना संघटीत करुन ह्याने आधी बेणा (वैनगंगा) नदीकाठचा प्रदेश जिंकून घेतला आणि पौनी (पवनार) प्रदेशावर ताबा मिळविला व स्वत:स बेणाकटकस्वामी असे घोषित करुन घेतले. त्यानंतर त्याने नाशिकजवळील गोवर्धनावर स्वारी करुन नहपान क्षत्रपाचा संपूर्ण पराभव केला. गोवर्धनातील विजयी शिबिरातून त्याने जवळील त्रिरश्मी पर्वतावरील भिख्खूसंघासाठी अजकालकीय नावाच्या शेताचे दान दिले. युद्धाच्या ह्या धामधूमीत नहपान मात्र पसार झाला आणि सह्याद्रीच्या निबिड पर्वतराजीचा आश्रय घेऊन लपला. पण गौतमीपुत्राने त्याचा पाठलाग सोडला नाही. गोवर्धन ते ह्या वलुरकादरम्यानच्या सह्याद्री पर्वतात त्याचे नहपानाबरोबर तुमूळ युद्ध झाले शेवटी त्याने नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद केला व स्वतःस क्षहरातवंसनिर्वंसकरस असे म्हणवून घेतले. परकीय शकांपासून त्याने ह्या भूमीला मुक्त केले व महाराष्ट्राच्या आद्य राजवंशाची पुनर्स्थापना केली. नहपानाचा नासिक्यातील पराभव ते त्याचा सह्याद्रीत झालेला वंशसंहार ह्या घटना केवळ १५ दिवसांतच वेगाने घडून आल्या.त्यानंतर गौतमीपुत्राने वलुरक लेणीसमूहाला भेट देऊन करजक ग्राम पुन्हा धर्मादाय केले. मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवान पवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालारे उतरे मगे गामे करजके..........भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत छतो विजयठसातारे दतो ठे पटिका सव १० [+] [८] मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की येथील वलुरक लेण्यांत वास्तव्य करणार्‍या महासंघिक नामक भिक्षू संघाला निर्वाहाकरिता मामाड आहारातील उत्तरेच्या मार्गावरील करजक ग्रामात आम्ही भिक्षुहल दिले आहे म्हणून तुम्ही त्यांना त्या करजक गावातील भिक्षुहलाचा ताबा द्यावा. या करजक ग्रामातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत- या जमिनीत कोणी (अधिकार्‍यांनी) प्रवेश करु नये, त्यात हस्तक्षेप करु नये तशाच अन्य सवलती दिल्या आहेत. या सर्व सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गाव आणि त्याच्या भि़क्षुहलविषयक सवलती यांची नोंद तुम्ही करवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती या विजयी शिबिरात राजाने दिलेली आहे. ती पट्टीका संवत्सर १८, वर्षापक्ष ४, दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ले येथील हे चैत्यगृह भारतातील सर्व चैत्यात सर्वात मोठे आहे. सर्वाधिक उंचीचाही हाच चैत्य असून सर्वाधिक सालंकृतही आहे. कार्ल्याच्या चैत्यगृहातील स्तंभ नक्षीदार असून साधे स्तंभ स्तूपाच्या पिछाडीस आहेत. कार्ले चैत्यातील अंतर्भागातले हे स्तंभही पर्सिपोलीटन धर्तीचे. जणू काही ते हंड्यात उभे केलेले आहेत. त्या स्तंभावंर आमलक. आमलकावर हर्मिकेसारखं चौकटीचं स्तंभशीर्ष आणि स्तंभशीर्षावर हत्तींवर आरूढ झालेली देखणी युगुलं. बरोबर समोरासमोर ह्या देखण्या स्तंभांच्या रांगा. प्रमाणात अजिबात फरक नाही. त्या स्तंभावलीच्या शेवटी भव्य असा स्तूप. त्याच्या शिरी असलेलं छत्र आजही तसंच आहे. भूतपालाने हे छत्र प्रथम चैत्यावर धरले असेल, नहपान क्षत्रप, त्याचा जावई ऋषभदत्त पत्नी दक्षमित्रासह ह्याच चैत्याला नमन करत असेल, गौतमीपुत्रानेही ह्याच चैत्याला वंदन केले असेल आणि वाशिष्ठीपुत्र पुळुवामी सुद्धा ह्याच चैत्यगृहात प्रार्थना करण्यासाठी येत असेल. आज मीही त्याच चैत्यासमोर उभा आहे, जिथे हे दिग्गज आणि कित्येक अनामिकही पूर्वी येऊन गेले असतील. कार्ले चैत्यातील स्तंभांच्या कामासाठी धेनुकाकटच्या बर्‍याच यवनांनी देणगी दिलेली आहे. आधी मला हे धेनुकाकट म्हणजे डहाणू वाटायचं.पण नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांतील ऋषभदत्ताच्या शिलालेखात दाहानुका ह्या नदीचा उल्लेख आलाय. ही दाहनुका म्हणजे आजच्या डहाणूतील खाडी. तेव्हा डहाणू म्हणजे धेनुकाकट हे तसे संभवत नाही. डॉ. दामोदर कोसंबींच्या मते धेनुकाकट म्हणजे आजच्या कार्ल्याजवळचेच देवघर. पण मला तर्क योग्य वाटत नाही कारण धेनुकाकटच्या यवनांनी इतर दूरच्या लेण्यांनाही देणग्या दिलेल्या आहेत. काही संशोधकांच्या मते धेनुकाकट म्हणाजे आजच्या आंध्र प्रदेशातील पूर्व किनार्‍यावरील एखादे शहर असावे. पण कार्ले लेण्यातील शिलालेखांचा काल बघता यवनांची वस्ती पूर्व किनार्‍यावर असणॅ तसे असंभाव्य वाटते तेव्हा धेनुकाकट हे पश्चिम किनार्‍यावर भडोच ते आजच्या उत्तर मुंबई दरम्यान कुठेतरी असावे असे मला ठामपणे वाटते. हे यवन नेहमीच किनार्‍याचा आश्रय धरुन राहात कारण ते हाडाचे व्यापारी होते. पहा तरी ह्या स्तंभांना कुणी कुणी देणगी दिलीय ते. धेनुकाकटा उसभदत पुतस मितदेवणकस थबो दानम धेनुकाकटच्या उसभदत्ताच्या पुत्राने मित्रदेवणकाने दिलेले स्तंभाचे दान धेनुकाकटा धंमयवनस धेनुकाकटच्या धर्म नामक यवनाचा धेनुकाकटशिवाय उमेहनाकटच्या यवनाने देखील येथील येथील स्तंभासाठी देणगी दिलीय उमेहनाकटा यवनस विटसमगतानं दानं थबो उमेहनाकट येथील यवन विटसमगत याने दान दिलेला स्तंभ तर कुण्या गोणेकाक नामक गावातील धमुल उपासकाने देखील एक स्तंभ दान दिलेला असतो. गोणेकाकस धमुल उपासकसं देयधंमं थंवो कार्ले लेण्यातील जवळपास सर्वच स्तंभ शिलालेखांनी भरलेले आहेत. इतके विपुल शिलालेख कार्ले व्यतिरिक्त कान्हेरी लेणीसमूहांतही आहेत. a a a---a a---a a a---a a---a चैत्यातील एका स्तंभांवर बौद्धांची पवित्र चिन्हे कोरली आहेत. अशोकचक्र, स्तूप आणि अशोकस्तंभ. ही चिन्हे प्रचंड देखणी आहेत. a ह्याच चैत्यगृहात एका स्तंभांवर एक आश्चर्य कोरलेले आहे. ते म्हणजे स्फिंक्स. स्फिंक्स हा ग्रीक दंतकथांमधील मानवी शिर आणि शरीर सिंहाचे असलेला काल्पनिक प्राणी. इजिप्तच्या पिरॅमिड्ससमोरील स्फिंक्स तर प्रसिद्धच आहे. पण भारतातही काही लेण्यांत ह्या स्फिंक्स प्रतिमा कोरलेल्या आहेत. स्फिंक्सबरोबरच अजूनही काही काल्पनिक प्राणी इकडील लेण्यांत दिसत राहतात. पैकी स्फिंक्स, ग्रिफिन, अथेनियन घुबड मी नाशिक लेण्यांत पाहिले आहेत तर भाजे लेण्यांत मी पॅगेसस, सेंटॉर इत्यादी प्राणी कोरलेले पाहिलेले आहेत. कार्ले लेण्यात मात्र केवळ स्फिंक्स आहे आणि तोही एकमेव. हा स्फिंक्स येथे शोधणॅ तसे जिकिरीचे आहे. हा आहे स्तूपाच्या डावीकडील खांबावरच्या मागच्या बाजूस. ही जागा प्रचंड अंधारी आहे. कृत्रिम प्रकाशझोताशिवाय हा स्फिंक्स दिसणे केवळ अशक्य आणि दिसला तरी हा स्फिंक्स उंचीवर असल्याने ह्याला नीटसे टिपता येणे तसे दुर्लभ आहे. ह्या स्फिंक्सवरही एक युगुल आरुढ झालेले दिसते. a कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आणि स्तूपावरील हर्मिकेवरील छत्र आजही तितकेच जुने आहे. अर्थात काही काही फासळ्या मात्र जीर्णोद्धार करताना नव्याने बसवलेल्या दिसतात. ह्या फासळ्या बसवताना दोन्ही बाजूंना आधी खाचा कोरल्या जायच्या व त्यात ह्या फासळ्या बसवल्या जायच्या. अर्धवर्तुळाकार अशा ह्या फासळ्या स्तूपानजीक गेल्यावर मात्र एकत्रित येतात व त्यामुळे स्तूप कमालीचा देखणा दिसत राहतो. कार्ल्याचा स्तूपही भव्य. खाली जोतं जे पाताळ दर्शवतं. जोत्यावर वेदिकापट्टी. बांधीव स्तूपांवर वेदिकापट्टी ही रुंद आणि विस्तीर्ण असे ज्यावरुन चालत स्तूपाला फेरी मारणे शक्य व्हावे पण सह्याद्रीतील गिरिकुहरांत असणार्‍या कोरीव स्तूपांवर हे शक्य नाही. वेदिकापट्टीच्या वर गोलाकार अण्ड जे पृथ्वीचं प्रतिक आहे. आणि त्या अण्डावर हर्मिकेची चौकट व त्यावर सात पायर्‍या जे बौद्ध धर्मातील सप्तस्वर्गांचं प्रतिक आहे. ह्या हर्मिकेत एक छिद्र. स्तूप कोरल्यावर ह्या छिद्रात बुद्धाचे किंवा काही श्रेष्ठ बौद्ध धर्मगुरुंचे शारीर अवशेष ठेवले जात. हर्मिकेवरील ह्या छिद्रात लाकडी छत्र बसवले जाई. भाजेतील छत्र आज नाहिसे झाले आहे तर बेडसे चैत्यातील कमळाच्या फुलासारखे देखणे छत्र आजही विद्यमान आहे तर ह्या कार्ले स्तूपातील छत्र चौकोनी असून आजही तितकेच देखणे आणि त्याने जणू संपूर्ण स्तूपाला कवेत घेतल्यासारखे दिसू लागते. a a---a a कार्ल्याच्या ह्या चैत्यगृहाशिवाय वलुरक लेणीसमूहात इतर फारसे काही पाहण्यासारखे नाही. अर्धवट बंद केलेले तीमजली विहार, काही महायान शिल्पे आणि काही अंतरावर खोदीव विहार आणि पाण्याची काही टाकी. बस्स. पण इथल्या चैत्यगृहानेच इतके काही मानसिक समाधान दिलेले असते की इतर काही पाहायची येथे जरूरच वाटत नाही. खरोखरच ग्रॅण्ड असं. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

भूतपालाच्या डोळ्यांदेखतच हे भव्य लेणं पूर्ण झालं. ज्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं ते आज सत्यात उतरलं होतं. दूरच्या द्राविड देशांतून तो केवळ असा कातळ शोधत शोधत आला होता. त्याचा तो शोध आज पूर्ण झाला होता. आपलं सर्व कसब पणास लावून त्याने एक अजोड चैत्य आज पूर्ण केला होता. अशी निर्मिती पूर्वीही कधी झाली नव्हती ह्या पुढेही कधी होणार नव्हती. त्याने त्या चैत्यगृहातील जवनिकेच्या डाव्या बाजूच्या भिंतीत ह्या निर्मितीची नोद करुन ठेवली जी ह्यापुढेही अजून कोण्या नवशिल्पकारांना प्रेरणा देत राहावी. वैजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्हि उतमम् ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

२१०० वर्षे उलटून गेलीत आज ह्या चैत्याला. काळाचे असंख्य घाव झेललेत ह्याने. सातवाहन, क्षत्रप, पुन्हा सातवाहन असा काळ पाहिलाय ह्याने. नहपान, ऋषभदत्त, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र पुळुवामि अशा महान राजांची राजवट ह्याने अगदी जवळून पाहिली आहे. ह्या चैत्यापूर्वीही कोंडाणे, ठाणाळे, भाजे आदि हिनयान चैत्यांची उभारणी झाली, ह्या चैत्यानंतरही अजिंठा, वेरुळ इथले भरजरी, प्रचंड कलाकुसर असलेले महायान चैत्य उभारले गेले. पण ह्या कुणाचीही सर इथल्या अजोड चैत्याला येत नाही. हा एकमेवाद्वितिय. ह्यासम हाच. २१०० वर्षापूर्वी भूतपालाने खोदलेले शब्द आजही यथार्थ आहेत. वैजयंती नगरीचा श्रेष्ठी भूतपाल ह्याने निर्माण केलेले हे शैलगृह भरतखंडात सर्वोत्कृष्ट आहे. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
39358 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

हम्म! सविस्तर प्रतिसाद नंतर,

किसन शिंदे
Sun, 06/05/2016 - 19:22 नवीन
हम्म! सविस्तर प्रतिसाद नंतर, तुर्तास लेख पाह्यल्याची ही पोच. ;)
  • Log in or register to post comments

असेच. ही केवळ पोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/05/2016 - 20:02 नवीन
सध्या फक्त पुष्ट युगल आणि चित्र पाहीलीत. सविस्तर प्रतिसाद सवडीने देतो. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+1

सुनील
Sun, 06/05/2016 - 21:03 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

प्रचंड विस्तृत आणि अभ्यासू

अभ्या..
Sun, 06/05/2016 - 19:43 नवीन
प्रचंड विस्तृत आणि अभ्यासू लेख. वाचायला बैठक मारूनच बसावे लागेल, तूर्तास दोन्ही हात कोपरापासून जोडून अभिवादन
  • Log in or register to post comments

__/\__

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 06/05/2016 - 19:51 नवीन
प्रचेतस सर, लेण्यांवर एक पुस्तक झालच पाहिजे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो. सरांचा अभ्यास

रमेश भिडे
Sun, 06/05/2016 - 20:32 नवीन
असेच म्हणतो. सरांचा अभ्यास अफाट आहे. लेखनशैली सुरेख आणि उत्तम अभ्यासु सौन्दर्यदृष्टीची साक्ष देणारी प्रकाशचित्रे देखील आहेत. पुस्तकरूपात हे सगळं जतन व्हावं हीच (दर्पणसुंदरीचरणी) प्रार्थना! खरंच ओ पुस्तक लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

लेख आणी लेखनशैली दोन्ही आवडले

जेपी
Sun, 06/05/2016 - 20:11 नवीन
लेख आणी लेखनशैली दोन्ही आवडले..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर खरतर यावर अख्खी

स्पा
Sun, 06/05/2016 - 20:23 नवीन
अतिशय सुंदर खरतर यावर अख्खी गोष्टीरुप लेखमाला होईल,ज्याने सातवाहनांचा इतिहास पण उलगडेल हा लेख तर अफाट. . . . . . आहे __/\__
  • Log in or register to post comments

पुस्तक काढणे

नाखु
Mon, 06/06/2016 - 08:41 नवीन
हीच खरी योग्य आणि समर्पक दाद आहे. व्यासंग म्हणजे काय ते सम्जायला बॅट्या,वल्ली,आणि मालोजी अशी नगावळ बघावी. नतमस्तक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अप्रतिम लेख!!

दुर्गविहारी
Sun, 06/05/2016 - 20:34 नवीन
अप्रतिम लेख!! दन्डवत स्विकारा _____________________________/\__________________________
  • Log in or register to post comments

हे आवडेल कदाचित आपल्याला.....

जयंत कुलकर्णी
Sun, 06/05/2016 - 20:40 नवीन
हे आवडेल कदाचित आपल्याला..... Image removed.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर आहे हे छायाचित्र.

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 21:01 नवीन
अतिशय सुंदर आहे हे छायाचित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सर वल्ली यांचा अजुन एक सुंदर

कानडाऊ योगेशु
Sun, 06/05/2016 - 20:45 नवीन
सर वल्ली यांचा अजुन एक सुंदर लेख. पहील्या काही परिच्छेदात यवन असा काही वेळेला उल्लेख आला आहे. हे यवन म्हणजे मुसलमान ह्या अर्थाने नसतील तर त्याकाळच्या अफगाणिस्तान वगैरे प्रदेशातुन आलेले लोक ह्या अर्थाने असावे. असे जरी असले तरी ह्या अश्या लेण्यांची नासधूस मुगल वगैरेंच्या काळातच झाली. मधल्या काळात हे असे काही कम्युनिकेशन नव्हते का म्हणजे स्थलांतरीत झालेला पुन्हा मूळ प्रदेशात गेला व इथली लेण्या वगैरेंची माहिती तिथपर्यंत पोहोचली असे काही. म्हणजे कमीत कमी ह्या भव्यदिव्य लेण्यांत आपल्या पूर्वंजांचा ही सहभाग होता अशी भावना नंतर आलेल्या मुस्लिम राज्यकर्त्यांची का झाली नसावी?
  • Log in or register to post comments

नाही नाही.

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 21:06 नवीन
नाही नाही. यवन म्हणजे ग्रीक. ग्रीसच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे आयोनिया. ह्या आयोनियातून आलेल्या लोकांना आयोनियन म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे यवन. प्राचीन काळचे म्हणजे इसवी सन सहाशे च्या आधीचे जे यवनांसंबंधित उल्लेख आहेत ते सगळे ग्रीकांचे समजावेत. महाभारतातही यवन, शक, पुलिंद, म्लेच्छ अशा परकीय आक्रमकांचे उल्लेख आहेत. म्लेच्छ म्हणजे संस्कृत भाषा न जाणणारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

यवन म्हणजे ग्रीक.

कानडाऊ योगेशु
Sun, 06/05/2016 - 22:25 नवीन
यवन म्हणजे ग्रीक.
ओ.के. म्हणुन तो स्फिंन्क्स तिथे आला असावा. पण तरीही एक शंका येते. जसे इथे सिद्दीचे वंशज आहेत अजुन आणि तसे ओळखुही येतात (तोच प्रकार पारशी जमाती बाबत.) तसा प्रकार ह्या ग्रीकांबाबत झाला नाही का? म्हणजे आजकाल तसे वेगळे ओळखु येणारे कोणी ग्रीक असे दिसत नाहीत. का ही जमात फक्त कामानिमित्त येणारी व परत जाणारी असु शकेल.? पण त्याकाळात तसे होणे म्हणजे फार अवघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

झाला असेल ना. कित्येक यवनांनी

प्रचेतस
Mon, 06/06/2016 - 15:52 नवीन
झाला असेल ना. कित्येक यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. २००० वर्षे झाली हो. इतक्या काळात सहज बदल झाला असेल दिसण्या बोलण्या वागण्यात. तसेही यवन हे व्यापारी असल्याने परत जातही असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अप्रतीम लेख. इतका सुंदर

विजुभाऊ
Sun, 06/05/2016 - 21:16 नवीन
अप्रतीम लेख. इतका सुंदर माहितीपूर्ण लेख दिल्याबद्दल मानावे तितके आभार कमीच आहेत. नुसती माहितीच नव्हे तर तुम्ही पार भूतकाळात फिरवून आणलेत.
  • Log in or register to post comments

!

जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 21:20 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

मस्त लेख

कपिलमुनी
Sun, 06/05/2016 - 22:34 नवीन
लेख आवडला ! इथे कार्लाची एकविरा देवीची स्थापना कशी झाली ?
  • Log in or register to post comments

त्याबाबत नक्की सांगता येणार

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 23:39 नवीन
त्याबाबत नक्की सांगता येणार नाही. इस्लामी अमदानित किंवा शिवकाळात मंदिराची स्थापना झाली असावी. काही जण ह्या लेणींपूर्वीही येथे एखाद्या स्थानिक लोकादेवतेचे ठाणे असावे असे मानतात जे मला व्यक्तिश: पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

फारच छान वर्णन.खांबांवरची

कंजूस
Sun, 06/05/2016 - 22:48 नवीन
फारच छान वर्णन.खांबांवरची लिपी कोणती आणि ती वाचणारे अजून आहेत का?नाणेघाटातल्या गुहेत हीच अक्षरं वाटताहेत.
  • Log in or register to post comments

ब्राह्मी लिपी आहे. ह्यातली

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 23:42 नवीन
ब्राह्मी लिपी आहे. ह्यातली भाषा मात्र प्राकृत आहे. ऋषभदत्त शिलालेखांतील भाषा संस्कृत प्राकृत अशी मिश्र आहे. गुप्त वाकाटक कालखंडापर्यंत ही ब्राह्मी लिपी अस्तित्वात होती. ब्राह्मी वाचता येणारे बरेच जण आहेत. मलाही थोडीशी वाचता येते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

महितीपूर्ण

सुनील
Mon, 06/06/2016 - 08:33 नवीन
लेख आणि लेखाची शैली आवडली. या पांतात (महाराष्ट्रात) कधीही बौद्ध हे सत्तेत नव्हते तरीही कार्ले, कान्हेरी, अजिंठा यासारखी बौद्ध लेणी केवळ उभारलीच गेली नव्हे तर जोपासलीदेखिल गेली, हे खूपच मोलाचे वाटते. अश्याच माहितीपूर्ण लेखांच्या प्रतीक्षेत! देवघर हेच धेनुकाकट असावे अशा आशयाचाची लेखमाला ऐसि अक्षरेवर दोनेक वर्षांपूर्वी आली होती - दुवा
  • Log in or register to post comments

उत्तम अभ्यासपूर्ण लेखाचा

हकु
Mon, 06/06/2016 - 09:54 नवीन
उत्तम अभ्यासपूर्ण लेखाचा नमुना _/\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख!

बोका-ए-आझम
Mon, 06/06/2016 - 10:03 नवीन
प्रचंड अभ्यास पण तो कुठेही विद्वज्जड होत नाही.
  • Log in or register to post comments

लेख वरवर चाळला....

मुक्त विहारि
Mon, 06/06/2016 - 11:12 नवीन
आता तुमच्याबरोबर ह्या ठिकाणी जायलाच लागणार. हे ठिकाण पुण्याहून एका दिवसात करता येते का?
  • Log in or register to post comments

जबरी... दंडवत घ्यावा

स्वच्छंदी_मनोज
Mon, 06/06/2016 - 12:22 नवीन
मित्रा.. जबरदस्त. लेखाचा पाठपुरावा करण्याचे सार्थक झाले. कसले जबरदस्त लिहीले आहेस. आणि लिहीण्याची नवीन स्टाईलही मस्त. अगदी इतीहासाच्या पुस्तकात फिरवून आणलेस. लेखा बद्दल काय सांगू. नुसते एकवीरेच्या दर्शनाला जाणार्‍या आणि हुं.. ह्या मोडक्या, पडल्या आणी तुटक्या गुहांमध्ये काय पहायचे अश्या भावनेने जाण्यार्‍या सगळ्यांना तुझ्या लेखाचे एक प्रत द्यायला हवी. लेणी पहाणे आणि लेणी वाचणे ह्यातला फरक तुझे लेख वाचले की कळतो. ही कार्ला लेणीच नव्हे तर सह्यमाथ्यावर, पायथ्याशी आणी ऐन सह्याद्रीत कोरलेली ही आणि अशी असंख्य लेणी, किल्ले, घाटवाटा म्हणजे एक, जीर्ण काही पाने फाटलेली, काही गहाळ झालेली, काही कसरीने खाल्लेली, असे इतीहासाचे पुस्तक आहे. स्पष्ट पाने वाचता येतात पण धुसर, गहाळ आणि अस्पष्ट पाने वाचायला तुझ्या सारखे तज्ञ लागतात. आणी लेणी आणी घाटवाटा यांचे असे अतूट नाते आहे की घाटवाटा अभ्यासकाला लेणी आणी लेणी अभ्यासकाला घाटवाटा यांचा पुर्वापार असलेला संबंध चकीत करतो. एक लेणे आणी त्याला पुरक किमान ३-४ घाटवाटा असे असलेच पाहीजे. कोकणातल्या दमट हवामानातून घाटमाथ्यावरची लेण्यातली थंड हवा आणी पाणी हे सार्थवाह तांड्यांचे हक्काचे ठीकाण. ह्याच कार्ला लेण्याजवळचा बोरघाट, असेल किंवा ठाणाळ्याचा वाघजाई घाट किंवा शिवनेरी जवळचा नाणेघाट हे असे घाटवाटा आणि लेणी यांचा परस्पर संबंध दाखवतात. आता तू कार्लालेण्यावर एवढा जबरदस्त लेख लीहीला आहेस तर पुढचा लेख ठाणाळे लेण्यांवर लिहावास अशी विनंती करतो :) :)
  • Log in or register to post comments

धन्स रे. एकदाचं लिहिता झालो

प्रचेतस
Mon, 06/06/2016 - 15:56 नवीन
धन्स रे. एकदाचं लिहिता झालो कार्ले लेणीवर. :) बऱ्याच घाटवाटा कार्ले लेणीच्या टप्प्यात येतात. बोरघाट, राजमाची कोकणदरवाजा, आंबेनळी घाट अजून काही तर तूच सांगू शकशील. ठाणाळे लेणी अजून पाहिली नाही त्यामुळे सध्या त्यावर लिहू शकत नाही. बाकी आता लिखाणातून ब्रेक घेईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

नक्कीच आहेत

स्वच्छंदी_मनोज
Mon, 06/06/2016 - 16:55 नवीन
बऱ्याच घाटवाटा कार्ले लेणीच्या टप्प्यात येतात. बोरघाट, राजमाची कोकणदरवाजा, आंबेनळी घाट अजून काही तर तूच सांगू शकशील.
नक्कीच आहेत रे घाटवाटा. बर्‍याच आहेत. बोरघाट, राजमाची कोकणदरवाजा, आंबेनळी घाट, कुसुर, फेण्यादेवी, कुरवंडा, फल्याण, सव, पायमोडी हे प्रमुख आणी अजून काही घाटवाटावरून जाणारे कार्ला लेण्यांत टेकून गेलेच असणार. ऐन कोकणात वाकून बघणारा राजमाची, त्याच्या अल्याड-पल्याड ढाक आणी मृगगड आणी अगदी परसातलाच भक्कम लोहगड-विसापूर, अश्या किल्ल्यांचा अभय असल्यावर लेणीकारांचे हात मुक्तपणे चालले असतील. असे चहूबाजूला अभय असल्याखेरीज आपल्या कडील लेणी खोदली गेली नाहीयेत.
ठाणाळे लेणी अजून पाहिली नाही त्यामुळे सध्या त्यावर लिहू शकत नाही.
मी तर म्हणेन ठाणाळे लेण्याला नक्कीच जा. एकतर अतीप्राचीन लेणी, त्यात वासुदेव बळवंत फडक्यांनी त्यात लपण्यासाठी आश्रय घेतलेला आणी अप्रतीम जागा. नक्कीच बघ.
बाकी आता लिखाणातून ब्रेक घेईन म्हणतो.
>>> ये ना चॉलबे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
Mon, 06/06/2016 - 17:48 नवीन
अगदी अगदी. हे दुर्ग तर खरे संरक्षक घाटवाटांचे. समुद्रातून वरघाटी होणाऱ्या व्यापारासाठी ह्या घाटवाटा खोदण्यात आल्या व त्यांच्या रक्षणासाठी दुर्ग निर्मिती केली गेली. ह्या व्यापाऱ्यांच्या तांड्याबरोबरच धर्मप्रसारही होत असे. त्यांच्या वर्षावासासाठी लेण्यांची निर्मिती करण्यात आली. साहजिकच ह्या लेण्यांपेक्षाही इथले दुर्ग प्राचीन होत. कधी विसापूरला गेलास तर त्याच्या ओढ्याच्या वाटेच्या सुरुवातीला (लोहगड- गायमुख खिंडीत उतरणाऱ्या वाटेच्या बाजूने) एक गुहा आणि पाण्याची काही टाकी आहेत ती अवश्य निरखून बघ. ह्यातील एका टाक्यावर ब्राह्मी लेख आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्याच्या ऐन माथ्यावर असलेला ब्राह्मीतला हां माझ्या माहितीतला एकमेव लेख. ठाणाळे आणि खडसंबळे करायचे आहे एकदा. बघू कधी योग येतो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

मला बर्याचदा असं वाट्तं............

माम्लेदारचा पन्खा
Mon, 06/06/2016 - 12:22 नवीन
हे जे प्रचेतस उर्फ वल्ली सर आहेत ना त्यांचा हा पुनर्जन्म आहे.... ते अगम्य शिलालेख त्यांनीच गतजन्मी लिहिलेले असावेत आणि या जन्मात त्यांचा अर्थ समजावून सांगायला ते परत आलेत... अमिताभच्या बाबतीत पण असं ऐकलं आहे की तो पूर्वीचा हॉलीवूड अभिनेता आहे...
  • Log in or register to post comments

लेख आणि हा प्रतिसाद...जबरदस्त

टवाळ कार्टा
Mon, 06/06/2016 - 16:14 नवीन
लेख आणि हा प्रतिसाद...जबरदस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

लेणी पहाणे आणि लेणी वाचणे

पद्मावति
Mon, 06/06/2016 - 13:23 नवीन
लेणी पहाणे आणि लेणी वाचणे ह्यातला फरक तुझे लेख वाचले की कळतो.
..अगदी खरंय. बाकी तुमचा आभ्यास, व्यासंग आणि अतिशय सुंदर लेखनशैली बदद्ल अजुन काय बोलणार..केवळ _/\_
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 06/06/2016 - 14:08 नवीन
खुपच सुरेख माहिती दिलित आपण.
  • Log in or register to post comments

__/\__

नीलमोहर
Mon, 06/06/2016 - 14:29 नवीन
किती तो अभ्यास आणि व्यासंग, शिवाय हे सगळे शब्दांत मांडणे म्हणजे अवघड काम, तेही सहजतेने करता. धन्य आहात.
  • Log in or register to post comments

निवांत वाचेन!!

सूड
Mon, 06/06/2016 - 14:46 नवीन
निवांत वाचेन!!
  • Log in or register to post comments

चला! वल्ल्याचा लेख सत्कारणी

किसन शिंदे
Mon, 06/06/2016 - 17:52 नवीन
चला! वल्ल्याचा लेख सत्कारणी लागला. ;)
  • Log in or register to post comments

cryptic!

चांदणे संदीप
Mon, 06/06/2016 - 19:51 नवीन
cryptic!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

नक्की काय म्हणत आहात लोकहो?

रमेश भिडे
Tue, 06/07/2016 - 11:06 नवीन
नक्की काय म्हणत आहात लोकहो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

__/\__ ग्रेट , वेळे अभावी

माहितगार
Mon, 06/06/2016 - 21:00 नवीन
__/\__ ग्रेट , वेळे अभावी ओझरता वाचला सवड काढून अजून एकदा वाचतो. अवांतर : बेणाकटकस्वामी हे वेणाकटस्वामी > व्यंकटस्वामी गंमत म्हणून अशी संगती सूचली. (बरोबर असल्याचा दावा नाही)
  • Log in or register to post comments

भूतकाळ व वर्तमानकाळ यांची

उल्का
Mon, 06/06/2016 - 21:53 नवीन
भूतकाळ व वर्तमानकाळ यांची सुन्दर गुंफण करत लिहिलेला अप्रतिम लेख! लेण्यांमध्ये नक्की काय बघावे ही दृष्टी ह्या लेखाने दिली. ऊर्वरित लेख लौकरच वाचते आता. :) आणि हो छानच लिहिता तेव्हा नक्की लिहित रहा.
  • Log in or register to post comments

जबरदस्त लेख

गामा पैलवान
Mon, 06/06/2016 - 22:09 नवीन
प्रचेतस, लेख जबरदस्त आहे. वाचल्यावर प्रतिक्रिया काय द्यावी कळंत नव्हतं. तुमचा व्यासंग आणि सहज शैली दोन्हेंचा मिलाफ अपूर्व आहे. 'तिळा उघड' सारखा मंत्र तुमच्या विद्याधनगुफेस लागू करता आला तर काय बहार येईल. तूर्तास इतकेच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

___/\___

चांदणे संदीप
Mon, 06/06/2016 - 22:11 नवीन
अप्रतिम लेख! हा लेख म्हणजे, तुमचे सर्वोत्तम तीन लेख काढायचे झाल्यास सर्वात वर असेल! बाकी, पाचशेदा कार्ल्याला गेलो पण आता तिथे काय ढेकळं पाहिली का? असा प्रश्न पडायला लागलाय! :( आता अजून हजारदा गेल्यावर यातला काही अंश आमच्या बुद्धीत उतरेल असे वाटते! एखादा लहानसा ब्रेक घ्या पण लिहिणे थांबवू नका, तुमच्या लेखनातही वेगळाच खुमार यायला लागलाय आजकाल! :) Sandy
  • Log in or register to post comments

बा प्रचेतसा आणि मनोजराव...

अर्धवटराव
Tue, 06/07/2016 - 03:03 नवीन
तुम्ही एकत्रीत एखादा प्रकल्प हाती घ्या कि. काय तो अफाट व्यासंग.
  • Log in or register to post comments

लेख वाचायला सुरुवात केली आणि

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/07/2016 - 04:55 नवीन
लेख वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण लेख निगुतिने वाचल्याशिवाय प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले होते. लेख माहितीपूर्ण असणार आणि त्यात उत्तम प्रकाशचित्रे असणार हे वल्लींच्या लेखाबद्दल म्हणायचे तर डब्बल द्विरुक्ती होईल ना ! :) या लेखात जी आलटून पालटून भूत-वर्तमान कालाचे लेखनतंत्र वापरले आहे ते अफलातून आहे. त्यातून सर्वसाधारणपणे रुक्ष वाटणारा इतिहास एका आकर्षक पद्धतिने जिवंत होऊन पुढे आला आहे ! आजकाल तुमच्या लेखनात वेगवेगळ्या लेखनतंत्रांचे केले जाणारे यशस्वी प्रयोग पाहता, बर्‍याच जणांनी केलेली पुस्तक लिहिण्याची सूचना मनावर घेण्यासाठी, भक्कम पाया तयार झाला आहे, असे नोंदवून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लेख. वाखू साठवली

यशोधरा
Tue, 06/07/2016 - 06:03 नवीन
अतिशय सुरेख लेख. वाखू साठवली आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पैसा
Tue, 06/07/2016 - 10:08 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments

अप्रतिम विलक्षण लेख

मारवा
Tue, 06/07/2016 - 13:14 नवीन
प्रचेतस जी असामान्य लेख लिहीलाय तुम्ही प्रचंड आवडला तुम्हाला अनेक धन्यवाद या परीश्रमपुर्वक सिद्ध केलेल्या लेखासाठी. Image removed. तुमच्या लेखात आलेले या सुंदर दाम्पत्याचे शिल्प या दाम्पत्याच्या शिल्पा चा उपयोग श्री शरत पाटील यांनी " अब्राह्मणी साहीत्याचे सौंदर्यशास्त्र" या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर केलेला आहे. त्यांनी हे प्रतीक म्हणुन वापरलेल आहे. ते जे जे स्कुलचे विद्यार्थी होते व त्यांना प्रतीके फार महत्वाची वाटत अब्राह्मणी बाजुने हे प्रतिक त्यांनी प्रमोट केलेले होते. या दाम्पत्याची इतरही शिल्पे तुम्ही दिलेली माहीत नव्हती. पुन्हा एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुंदर आणि माहितीपुर्ण लेख आणि

नरेश माने
Tue, 06/07/2016 - 14:01 नवीन
सुंदर आणि माहितीपुर्ण लेख आणि प्रकाशचित्रे ही खुपच सुंदर. कार्ले लेण्यांना पाच सहा वेळा तरी भेट दिली असेल पण त्याविषयी आजच एव्हढे माहितीपुर्ण लेखन वाचायला मिळाले. धन्यवाद प्रचितेस.
  • Log in or register to post comments

तुमची प्रतिभा फार म्हणजे फार

एस
Tue, 06/07/2016 - 17:16 नवीन
तुमची प्रतिभा फार म्हणजे फार म्हणजे फारच उच्च पातळीवर पोहोचली आहे आणि त्यात लालित्याची दृष्टीही दिसू लागली आहे. ;-) वाखुसाआ. कार्ल्याला गेलो की ह्या लेखाचे पॅम्प्लेट बनवून तिथे येणार्‍या लोकांना वाटेन म्हणतो. बघा, असे पहायचे असते लेणे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा