✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेकंड ओपिनीयन

स
सतिश गावडे यांनी
Sun, 02/14/2016 - 22:50  ·  लेख
लेख
वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो. "सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले. "धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं. सरांनी गाडीचा दरवाजा लावताच मी अ‍ॅक्सलरेटरवरचा पाय दाबला आणि संचेतीच्या दिशेने गाडी हाकू लागलो. गाडी चालत असताना दोन अडीच तासांपूर्वी घडलेला प्रसंग नजरेसमोर तरळू लागला. साहित्य संमेलनातील उत्साह ओसंडून वाहत होता. कुठे कवितावाचन चालू होते, कुठे परीसंवाद चालू होता. प्रवेशिकेच्या दोन्ही हातांना असलेल्या पुस्तक प्रदर्शनांमधून गर्दी वाहत होती. प्रा. डॉ. त्यांच्या मित्राचा सहभाग असलेल्या एका परिसंवादाला गेले होते. मी आणि प्रचेतस भल्या मोठया पुस्तक प्रदर्शनात पुस्तकं चाळत फीरत होतो. अचानक वारा घोंघावल्याचा आवाज आला. प्रदर्शनाचा मंडप खुपच उंच होता. आणि त्यावर बहुधा पत्रे नुसतेच टाकून ठेवले असावेत. मंडपाच्या प्रवेशद्वारातून वारा आत शिरला. काही भाग खांबांसकट अचानक वर उचलला गेला. लोकांच्या ते लक्षात येताच एकच पळापळ सुरू झाली. वर उचलला गेलेला मंडप खाली आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रदर्शनाच्या तेव्हढया भागातील लोक सैरावैरा पळू लागले. त्या लोकांमध्ये मी आणि प्रचेतसही होतो. लोक मागे पुढे न पाहता जीव खाऊन पळत होते. ईतक्यात माझ्या उजव्या पायातील फ्लोटर पुढून निघाला. मागच्या पटटा तसाच राहिल्याने मी अडखळून खाली पडलो. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. मी दुर्दैवाने अशाच लोकांच्या पायाखाली आलो. मला लोक तुडवून जात असल्याने उठताच येईना. माझी पँट गुडघ्यावर कपडयाच्या चिंध्या फाडाव्या तशी फाटली. दोन्ही गुडघे आणि तळहात सोलवटून निघाले. शेवटी कसाबसा जीवाच्या आकांताने उठलो. आणि उजव्या पायातून अर्धवट निघालेल्या चपलेसह पळत सुटलो. माझ्या पाच सहा फुट पुढे प्रचेतस पळत होता. त्याच्या आणि माझ्या मध्ये अजून एक जण होता. ईतक्यात वरून एक पत्रा दाणकन खाली आदळला. आणि तो पत्रा नेमका मी आणि प्रचेतस यांच्यामध्ये असणार्‍या व्यक्तीच्या डाव्या हातावर कडेने लागला. त्याच्या हाताचे हाड बहूधा मोडले असावे. ती व्यक्ती "आई माझा हात मोडला, आई माझा हात मोडला" असे गुरासारखे ओरडत पळत सुटली. मी थोडक्यात वाचलो. जरा पुढे असतो तर त्या पत्र्याने मलाही प्रसाद दिला असता. मी सुन्न झालो होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. प्रचेतसने मला एका चहाच्या स्टॉलवर नेले. एक कप चहा प्यायलो तेव्हा मला हायसे वाटले. आणि आता पहिल्यांदा माझे माझ्या फाटलेल्या पँटकडे आणि सोलवटलेल्या गुडघ्यांकडे आणि तळहाताकडे गेले. उजवा गुडघा बराचसा रक्ताळला होता. जोरात ठणकाही लागला होता. प्रचेतस आणि मी संमेलनाची वैद्यकीय सेवा कुठे आहे हे शोधू लागलो. थोडी शोधाशोध केल्यानंतर उभी असलेली अँब्युलन्स दिसली. त्यांच्याकडे गेलो. पत्रे उडण्याचा प्रकार त्यांच्या कानावर गेला होताच. त्यांनी मला अँब्युलन्समध्ये बसवून प्रथमोपचार केले आणि बाजूलाच असलेल्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले. मी डॉक्टरांकडे जाताच त्यांनी त्या हात मोडलेल्या मुलाला नुकताच हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे सांगितले. "तू थोडक्यात वाचलास" असं हसत सांगितलं. मी ही कसंनुसं हसलो. डॉक्टरांनी जखमेवर मलमपट्टी केली आणि काही औषधांच्या गोळ्या दिल्या. मी घाबरून डॉक्टरांना पुन्हा पुन्हा हाड सांध्यावरून सरकले नाही ना, गुडघ्याची वाटी ब्रेक झाली नाही ना असे विचारत होतो. आणि डॉक्टर असं काही झालं नसावं म्हणून सांगत होते. जखम फक्त त्वचेवर झाली असावी असं त्यांचं म्हणणं होतं. प्रा. डॉ. परिसंवाद संपवून येताच प्रचेतसचा निरोप घेऊन मी आणि प्रा. डॉ. शिवाजीनगरला निघालो. इतक्यात प्रचेतसने यशोधरा साहित्य संमेलनाला आली असून तिला प्रा. डॉ. ना भेटायचे आहे असे सांगितले. तिची धावती भेट घेऊन आम्ही निघालो. जरी गुडघे प्रचंड दुखत होते तरी मी गाडी चालवू शकत होतो ही चांगली गोष्ट होती. .. घरी येताच नेटवरून जवळपास कुणी हाडांचे डॉक्टर आहेत का हे शोधले. दोन डॉक्टरांचे क्लिनिक जवळच होते. मात्र तो दिवस रविवार होता हे माझ्या डोक्यातच नव्हते. मी पाच मिनिटांत एक हाडांच्या डॉक्टरांकडे पोहचलो. डॉक्टर एका पेशंटला तपासून बाहेर पडण्याच्या बेतात होते. "अहो, आज रविवार आहे. मी पेशंट घेत नाही रविवारी" डॉक्टरांनी मी क्लिनिकच्या आत पाऊल टाकायच्या आधीच मला दाराबाहेर पाहताच सांगितले. "डॉक्टर प्लिज, मी बाईकवरून पडलोय आणि माझ्या गुडघ्यांना लागलंय" मी डॉक्टरांनी नसत्या चवकशा करू नयेत म्हणून साहित्य संमेलन प्रकरण त्यांना सांगितलेच नाही. "अहो हे आमचे नेहमीचे पेशंट आहेत म्हणून दवाखाना उघडला होता. बरं या आता आलाच आहात तर." माझा केविलवाणा चेहरा पाहून त्यांना माझी दया आली असावी. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. "कुठे राहता?" डॉक्टरांनी विचारले. "इथेच तुमच्या शेजारीच." मी उत्तर दिले. "ठीक आहे. मी रविवारी पेशंट तपासण्याचे पाचशे रुपये घेतो. मात्र तुम्ही शेजारी असल्यामुळे तुमच्याकडून मी तिनशे रुपयेच घेईन. ती माझी रेग्युलर फी आहे." डॉक्टरांनी असे म्हणताच मी मान डोलावली. मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली. "तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली. "मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला. "किती खर्च येईल त्याला?" "साडे पाच सहा हजाराच्या आसपास. किंवा थोडासा जास्त. माझ्या ओळखीचे एक सेंटर आहे स्वारगेटला. त्यांच्याकडे जा. मी त्यांना तुला डिस्काउंट दयायला सांगतो." डॉक्टर एव्हढे बोलून थांबले नाहीत तर चक्क त्यांनी एमाराय सेंटरच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लिज गिव्ह टेन पर्सेंट डिस्काउंट टू माय पेशंट" असं स्पष्टपणे लिहिलं होतं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारण वर्षभरापूर्वी मी डॉ. अरुण गद्रे लिखित कैफियत नावाच्या वैद्यकिय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणार्‍या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. तिथे तज्ञ डॉक्टरांची या विषयावरची भाषणे ऐकली होती. अगदी डॉ. प्रकाश आमटेही भरभरून बोलले होते. हे दहा टक्के सवलत प्रकरण मला चांगलंच खटकलं होतं. मात्र तिथे त्या डॉक्टरांना काहीच म्हटलं नाही. डॉक्टरांनी दिलेलं ते एमाराय आणि इतर औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन मी घरी आलो. घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार अथपासून इतिपर्यंत सांगितला. त्याने "मी घरी येऊन पाहतो. तोपर्यंत तू काहीही औषधं विकत घेऊ नको किंवा एमाराय करायला जाऊही नको." असे सांगितलं. भावाने संध्याकाळी येऊन माझा पाय तपासला. "गाडी तूच चालवत आला का?" "हो." "काही त्रास जाणवला का?" "तसा त्रास नाही. मात्र उजवा गुडघा ठणकत आहे" "ठीक आहे. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असावा. तरीही आजची रात्र जाऊ दे. जर काही गंभीर असेल तर रात्री पाय सुजेल. काही गंभीर नसेल तर सकाळपर्यंत यू विल बी परफेक्टली फाईन. रात्री पाय सुजलाच तर आपण माझ्या ओळखीतल्या दुसर्‍या हाडांच्या डॉक्टरांकडे जाऊ." सकाळ झाली. दोन्ही गुडघ्यावरील जखमांनी खपली धरली होती. ठणका पुर्ण थांबला होता. सूज वगैरे अजिबात आली नव्हती. भावाला फोन करून अपडेट्स दिले. त्याने एमाराय करण्याची मुळीच आवश्यकता नाही असे सांगितले. फक्त अ‍ॅलोपथी डॉक्टरकडे जाऊन प्रिकॉशन म्हणून टीटीचे इन्जेक्शन घे असे सांगितले. या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
19441 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

पॉपकॉर्न घेउन बसायचे का?

टवाळ कार्टा
Sun, 02/14/2016 - 22:56 नवीन
पॉपकॉर्न घेउन बसायचे का?
  • Log in or register to post comments

या विषयात मला काही गती नाही.

राजेश घासकडवी
Sun, 02/14/2016 - 22:57 नवीन
या विषयात मला काही गती नाही. पण चर्चाविषयाची मांडणी अत्यंत आवडली. अत्यंत वैयक्तिक अनुभव, त्यात आलेले धोके यामुळे वाचकांना त्यात गुंतून जायला होतं. घटनाक्रम सांगितल्यामुळे समस्या कळते, आणि प्रश्न काय असणार याचीही कुणकुण लागते. सर्व चर्चाप्रस्ताव इतके सुंदर लिहिले गेले तर काय बहार येईल!
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
Mon, 02/15/2016 - 03:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+२

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 21:04 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

फॅमिली डॉ. असेल तर जनरली सेकंड ओपिनियनची गरज भासत नाही....

मुक्त विहारि
Sun, 02/14/2016 - 23:04 नवीन
फॅमिलीत डॉ. असेल तरी आणि फॅमिली डॉ. असेल तरी. कट प्रॅक्टीसचे स्तोम गावोगावी स्पेशलाइज्ड डॉ. आल्यापासून (साधारण १९७०च्या सुमारास) वाढलेले दिसते. आमच्या डोंबोलीत पण असे बरेच किस्से ऐकले आहेत. जाताजाता, एक मिपा उदाहरण... आमच्या घरी पण असाच एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता.मिपाकर डॉ. सुबोध खरे ह्यांनी अतिशय उत्तम सल्ला दिला आणि त्याचा फायदा पण झाला.
  • Log in or register to post comments

+१

योगी९००
Mon, 02/15/2016 - 08:40 नवीन
आमच्या घरी पण असाच एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता.मिपाकर डॉ. सुबोध खरे ह्यांनी अतिशय उत्तम सल्ला दिला आणि त्याचा फायदा पण झाला. मला ही असाच सल्ला माझ्या सासूबाईंच्या संदर्भी हवा होता. डॉ. खरेंनी योग्य सल्ला दिला. त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माझ्या घरी पण अगदी अचानक एक

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 19:23 नवीन
माझ्या घरी पण अगदी अचानक एक मेडिकल प्रॉब्लेम झाला होता. पूर्णपणे द्विधा मनस्थितीत असताना मिपाकर डॉ.सुबोध खरे यांच्यामुळे सगळे व्यवस्थित निभावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

पायाला काही झाले नाही हे

यशोधरा
Sun, 02/14/2016 - 23:08 नवीन
पायाला काही झाले नाही हे उत्तम झाले.
  • Log in or register to post comments

पत्र्याची तब्बेत बरी आहे का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/14/2016 - 23:17 नवीन
पत्र्याची तब्बेत बरी आहे का रे? नशिब रे बाबा काही वाढीव प्रकार नाही झाला ते. काळजी घे.
  • Log in or register to post comments

बापरे!

चांदणे संदीप
Sun, 02/14/2016 - 23:25 नवीन
गावडे सर.... इतके लागले असूनही इतक्या निवांतपणे तुम्ही भेटलात आणि मस्तपैकी फोटोसाठीही उभे राहिलात... क्या बात! दिलपे खाये हुए जख्मो की, आहेभी न सुनी किसीने ये तो फिरभी 'गुडघा'ही है, जो नसीब जैसा फुटा है! असं काहीस वाटून गेलं लगेच! बाकी ते.... धाग्याच्या विषयाबद्दल..... मलाही डाऊटची शंका येतेय! Sandy
  • Log in or register to post comments

दिलपे खाये हुए जख्मो की,

सतिश गावडे
Mon, 02/15/2016 - 09:45 नवीन
दिलपे खाये हुए जख्मो की, आहेभी न सुनी किसीने ये तो फिरभी 'गुडघा'ही है, जो नसीब जैसा फुटा है!
वाह... मस्त !!! संदिप, त्यावेळी माझ्यासोबत प्रचेतस आणि प्रा. डॉ. होते. शिवाय थोडया वेळाने नाखुकाका त्यांचा मुलगा वरद याला घेऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार होते. मला त्यांचा विरस करायचा नव्हता. बाय द वे, त्यावेळी प्रा. डॉ. नी तुला शोधण्यासाठी चक्क त्या कविसंमेलनाच्या आयोजकांना तुझ्या नावाची घोषणा करायला लावली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

चांगले लीहीलेय. वरवर वाचले.

खटपट्या
Mon, 02/15/2016 - 01:24 नवीन
चांगले लीहीलेय. वरवर वाचले. तुम्ही सुखरुप आहात हे सर्वात महत्वाचे.
  • Log in or register to post comments

ACL / MCL

वाचक
Mon, 02/15/2016 - 03:20 नवीन
गुडघ्याची इजा फ्रॅक्चर नसेल तर लगेच कळून येत नाही. ३ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळताना माझा MCL फाटला. हे अर्थातच तेव्हा कळले नाही. गुडघा दुखणे, प्रथमोपचार झाल्यावर असेच एक दोन दिवसात बरे वाटले. नंतर गेल्या वर्षी परत खेळताना ACL फाटला, तेव्हा प्रकरण गंभिर असल्यामुळे केलेल्या MRI मधे आधी फाटलेल्या MCL चे निदान झाले लिगामेंट दुखापत फक्त MRI नेच कळू शकते (मी डॉ नाही) तेव्हा कट प्रॅक्टिस ची शंका सयुक्तिक आहे की नाही सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments

फाटलेल्या MCL

रुस्तम
Wed, 02/17/2016 - 21:14 नवीन
फाटलेल्या MCL ने एक वर्ष काहीच त्रास दिला नाही का? वर्षभरात काहीच जाणवल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

अशा घटनांच्यावेळी प्रथम सिविल

कंजूस
Mon, 02/15/2016 - 05:40 नवीन
अशा घटनांच्यावेळी प्रथम सिविल हॅास्पिटलयमध्ये जावे. अचानक झालेल्या अपघातासाठीचा विभाग चोविस तास उघडा असतो. तिथे नोंद होते आणि काही उपचार घेऊनच मग खासगीवाल्यांकडे जावे.( संमेलनात काही व्यवस्था नव्हती का?)
  • Log in or register to post comments

परत एकदा सगळा घटनाक्रम आठवला.

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 06:11 नवीन
परत एकदा सगळा घटनाक्रम आठवला. :)
  • Log in or register to post comments

अगदी

नाखु
Mon, 02/15/2016 - 09:14 नवीन
झाल्या प्रकारानंतरही धन्या शेठनी दाखवलेला धीरोदात्तपंणा पुन्हा आठवला. थोडक्यात वाचलात असे म्हणणार्या (प्रथमोपचार) केंद्रांतील डॉ ला मिपाकर सुधारक कुठल्या प्रतवारीत टाकतील याचा विचार करतोय सध्या? बाकी एम आर आय बद्दल काय बोलणे? एक चाकू दाखवून घाबरवतो दुसरा भीती (जीवाची/आरोग्याची) इतकाच काय तो फरक , लुटणे तर दोन्हीकडे आहेच !!! तीव्र जहाल अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काही वेळेला आपल्याकडे

सतिश गावडे
Mon, 02/15/2016 - 09:48 नवीन
काही वेळेला आपल्याकडे मर्यादित पर्याय असतात आणि त्यातला सर्वोत्तम पर्याय आपल्याला निवडायचा असतो हे अनुभवी नाखुकाकांना मी का सांगायला हवे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बापरे! हा मोठाच प्रकार झाला की!

बोका-ए-आझम
Mon, 02/15/2016 - 08:15 नवीन
आता कशी आहे तब्येत?
  • Log in or register to post comments

बरा हो

मन१
Mon, 02/15/2016 - 09:00 नवीन
लवकर ठणठणीत हो रे भावा. काळजी घे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी. मी आता

सतिश गावडे
Mon, 02/15/2016 - 09:41 नवीन
धन्यवाद मंडळी. मी आता व्यवस्थित बरा आहे. या प्रकारानंतर मी पुन्हा एकदा दुसर्‍या ऑर्थो डॉक्टरांना दाखवून काही प्रॉब्लेम नसल्याची खात्री करून घेतली. मात्र हा थोडा सौम्य स्वरूपातील चेंगराचेंगरीचा (Stampede) प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर अशा प्रकारच्या गंभीर घटनांमध्ये काय होत असेल याची थोडीफार जाणिव झाली.
  • Log in or register to post comments

बराच मोठा लफडा झाला हा

स्पा
Mon, 02/15/2016 - 11:11 नवीन
बराच मोठा लफडा झाला हा लवकर बरा हो रे
  • Log in or register to post comments

च्यायला.....धन्याशेठ, काळ्जी

बॅटमॅन
Mon, 02/15/2016 - 12:12 नवीन
च्यायला.....धन्याशेठ, काळ्जी घ्या हो.
  • Log in or register to post comments

धन्या शेठ .

अद्द्या
Mon, 02/15/2016 - 12:15 नवीन
धन्या शेठ . काळजी घ्या ... त्या डॉक्टर नि २-३ हजार खिशात टाकण्याची व्यवस्था केली होती . पण असोच . दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)
  • Log in or register to post comments

दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)

सौंदाळा
Mon, 02/15/2016 - 13:45 नवीन
दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)
चपखल काळजी घ्या धन्यासेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

:)

नीलमोहर
Mon, 02/15/2016 - 12:40 नवीन
थोडक्यावर भागलं ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.. काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

च्यामारी खोतानू. पत्रे बित्रे

अभ्या..
Mon, 02/15/2016 - 13:01 नवीन
च्यामारी खोतानू. पत्रे बित्रे उडवून आलास व्हय. मला वाटले उगी चिल्लर धडपडलास. लैच जंगी किट्टा केलास की. काळजी घेवा जरा. औशधपाणी घ्येत चला टायमावर.
  • Log in or register to post comments

आपला विषय व प्रतिसाद

चौकटराजा
Mon, 02/15/2016 - 15:13 नवीन
आपण आपले कुशल लोकानी विचारावे म्हणून हा धागा काढला नसणार कारण त्याचा मथळाच मुळी सद्या स्थितीतील वैद्यकातील एक गंभीर मुद्द्याकडे बोट दाखवणारा आहे. पण एकेक प्रतिसाद पहा. विषयाला धरून कितीसे आहेत. माझ्या मते संपादकानी असे प्रतिसाद निर्दयपणे उडवायला हवेत ज्याचा विषयाशी काही संबंध नाही. त्यासाठी खरड वही फळा ई. आहेतच ना ! सेकंड ओपीनियन हे किती आवश्यक आहे असे सांगणारे काही अनुभव मिपाकरानी लिहिले तर ते एक विषयावरचे उत्तम माहितीप्रद डोक्युमेन्टेशन होईल असो. आपल्या विषयाला धरून आता लिहितो - माझी थोरली मुलगी लहान असताना तिने नाकात पेन्सील घातली म्हणून जवळच्या लहानशा होस्पीटलमधे नेले. तेथील डो. नी पेन्सील ( पाटीवरची) बाहेर काढली व " तुमचा मुलीचे टॉन्सील वाढले आहेत ते चार पाच दिवसात काढा आपल्या इथे सोय आहे नाहीतर मुलगी गुदमरून मरेल ! " असे समजावले. मी साधारणपणे एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून महत्वाचा निर्णय करीत नाही. सबब मी आमचा फिजिशियन( बालरोग ) ना विचारले तर त्यानी " काही गरज नाही असे सांगितले . ती मुलगी काही गुदमरली वगैरे नाहीच आज २६ वर्षाची मस्त जिवंत आहे. तिच्याच बाबतीत बालदमा सारखी समस्या झाली असता ." ओढ्याच्या पाण्यातून केमिकल्स जातात त्याची अ‍ॅलार्जी असणार तेंव्हा जागा बदला व प्राधिकरणात रहायला जा " असा सल्ला दॉ नी दिला. तो ही मी मानला नाहीच .थोडा वेळ रोज ओढ्याकाठी नेऊन खात्री करून घेतली. तसा काही प्रकार नव्हता. आज तिचा बालदमाही अस्तित्वात नाही. तेंव्हा एम डी झाला की तो अगदी देवासमान त्याचा शब्द अंतिम असेच काही नाही. प्रचंड फी भरून वैद्यकाचे शिक्षण घेतल्यावर डॉ ची मजबुरी असते. त्यामुळे आपल्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. सबब ऐकावे बहुतांचे पण ठरवावे स्वत: चे हे खरे !
  • Log in or register to post comments

पत्र्याचं प्रकरण म्हणजे

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/15/2016 - 15:21 नवीन
पत्र्याचं प्रकरण म्हणजे जीवावरचं होतं ! पत्रा अंगावर कुठे व कसा पडेल यावरून तो किती धोकादायक होईल ते ठरते. असो. त्या प्रसंगातून माफक जखमा होऊन तरून गेल्याबद्दल समाधान ! एम आर आयचा सल्ला संशयास्पद वाटतो आहे... विशेषतः सुरुवातीला एक्सरे संबंधी केलेल्या टिप्पणीमुळे.
  • Log in or register to post comments

हाय.

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 01:27 नवीन
हाय हाय आय मीन. ;) डॉक्टरसाहेब, पुण्यातला एमारायचा करंट कट रेट किती? घरच्या एक्सरे मशीनवर फोटू काढला तर किती पैसे सुटतात? दोन्ही केले तर फायदा जास्त, की कमी? कम ऑन. यू आर अ डॉक्टर ना? प्लीज टेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लेखातील माहितीवरून मी माझा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/17/2016 - 14:29 नवीन
लेखातील माहितीवरून मी माझा अंदाज सांगितला. तोच खरा आहे किंवा सगळ्यांना पटावा असा आग्रह अजिबात नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

वाचलास!

पैसा
Mon, 02/15/2016 - 19:53 नवीन
पत्रा तरी ओके. स्टँपेडमधे काहीही होऊ शकते. नशीबच. डॉक्टरच्या सल्ल्याबाबत शंका येण्यासारखी परिस्थिती आहे खरी. पण डॉक्टर अननुभवी असेल तर तपासण्यांवर अवलंबून रहायचे प्रमाण जास्त असते. कट प्रॅक्टिस वगैरे चालतेच. कुठले क्षेत्र स्वच्छ राहिले आहे? नशीब असेल तो त्यातूनही वाचतो.
  • Log in or register to post comments

ओके.

आनंदी गोपाळ
Tue, 02/16/2016 - 21:06 नवीन
मी लिहितोय ते जरा प्लीज शांतपणे वाचा. मग स्वतःच निर्णय घ्या. खाली लेखातील काही वाक्ये/ प्रतिसाद कॉपीपेस्ट करतो आहे. १.
घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार
२.
"मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला.
३.
ACL / MCL वाचक - Mon, 15/02/2016 - 03:20 नवीन गुडघ्याची इजा फ्रॅक्चर नसेल तर लगेच कळून येत नाही. ३ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळताना माझा MCL फाटला. हे अर्थातच तेव्हा कळले नाही. गुडघा दुखणे, प्रथमोपचार झाल्यावर असेच एक दोन दिवसात बरे वाटले. नंतर गेल्या वर्षी परत खेळताना ACL फाटला, तेव्हा प्रकरण गंभिर असल्यामुळे केलेल्या MRI मधे आधी फाटलेल्या MCL चे निदान झाले लिगामेंट दुखापत फक्त MRI नेच कळू शकते (मी डॉ नाही) तेव्हा कट प्रॅक्टिस ची शंका सयुक्तिक आहे की नाही सांगता येणार नाही.
४.
मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.
* होमिओपथी डॉक्टर घरचा नसता, तरीही, हे असे 'उद्या बघू'वाले सल्ले देण्याची रिस्क, आजच्या जगात जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) घेऊ शकतो, कन्सल्टंट नाही. सल्ला चुकून चुकला, तर त्या जीपी चा गळा कुणी धरत नाही. मात्र, उद्या उठून काही प्रॉब्लेम झाला, तर त्या कन्सल्टंटचा गळा धरला जातो, की "ही लिगामेंट टेयरची शक्यता तुम्हाला समजत असूनही तुम्ही पुढील तपासणी का केली नाही? आम्ही खर्च करायला काय नाही म्हणत होतो का? आता टाका नुकसानभरपाईचे अमुक लाख रुपये." हे अशी केस करणे प्रकरण तुम्ही करालच असे नाही, पण असे करणारे अनेक त्या डॉ.ला पूर्वी भेटलेले असल्याने आजकाल भारतात, अन त्यातल्या त्यात पुण्यात फार जास्त प्रमाणात 'डिफेन्सिव्ह मेडिसिन' प्रॅक्टिस केले जाते. तुम्ही एम.आर.आय केला की नाही याने त्या डॉ. ला फरक पडणार नाही, पण केला नाही, तर मग जर चुकून नुकसान झाले, तर ती संपूर्णपणे तुमची जबाबदारी होते. त्याने कागदावर लेखी अ‍ॅडव्हाईस केला आहे. त्याची कायदेशीर जबाबदारी संपली. काहीच प्रॉब्लेम आला नाही, तर तुम्ही त्याच्या कटबद्दल शंका काढायला मोकळे आहातच, पण प्रॉब्लेम आलाच, तर त्या बिचार्‍याची कातडी बचावली जाणार आहे. अहो, मिळणार असलाच, तरी कट मिळून मिळून ५००-८००- हजार रुपडक्या मिळेल. त्याने एक ऑपरेशन केले, तर अर्ध्या तासाच्या कामाचे तो अर्धा लाख रुपये कमवत असतो. पण या असल्या प्रकारात कोर्टात निग्लिजन्सची केस लागली, तर तिथे खेटे मारण्याचा मनस्ताप, बुडालेली प्रॅक्टिस, वकीलाची फी इ. मिळून लाखोंत खर्च होतो. बीपी वाढते ते वेगळे. अगदी त्याने केस जिंकली त री ही. तेव्हा महोदय, त्या कन्सल्टंटच्या जागी तुम्ही असतात, व तुमच्यासारखा अनोळखी पेशंट गाडीवरून पडून तुमच्या दारी आला असता, तर तुम्ही काय केले असते?
  • Log in or register to post comments

अरे हो, अन हे राहिलंच.

आनंदी गोपाळ
Tue, 02/16/2016 - 21:14 नवीन
अरे हो, अन हे राहिलंच.
मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली. "तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली.
इथे फ्रॅक्चर नाही, हे तो छातीठोकपणे सांगतोय, हे आपण ध्यानी घेतलेत का? तिथेच मला त्याची इंटेन्शन्स क्लिअर दिसताहेत. लिगामेंट टियर समजायला खरेच ती तपासणी करावी लागते हो साहेबा. अन वेळीच समजली नाही तर आयुष्यभर अनस्टेबल गुडघा घेऊन, केव्हा पाय मुडपून खाली पडाल ते समजत नाही असं जगावं लागू शकतं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

लिगामेंट टियर समजायला खरेच ती तपासणी करावी लागते हो साहेबा.

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 21:29 नवीन
लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत का? आम्हाला बायोलॉजी अजिबात समजत नाही. दहावीत शास्त्र ह्या विषयात पास झालो ते प्रॅक्टीकल आणि रसायन्+भौतिक शास्त्रामुळे.पुढे कागदोपत्री डिप्लोमा इंजिनियरिंग केल्यामुळे, मुलभूत जीवशास्त्र अजिबात समजलेले नाही. (अज्ञानी बालक) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 01:00 नवीन
लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत का?
होय. फ्रॅक्चर परवडले, लिगामेंट टियर नको. अशी म्हण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फ्रॅक्चर परवडले, लिगामेंट टियर नको.

मुक्त विहारि
Wed, 02/17/2016 - 09:17 नवीन
फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे तर, लिगामेंट टियर म्हणजे नक्की काय? लिगामेंट टियर झालेले असेल तर. कुठल्या उपकरणाने शोधतात? (जसे फ्रॅक्चर साठी एक्स-रे, किंवा किडनीतील रोगासाठी साठी सोनोग्राफी.) लिगामेंट टियर कसा बरा करतात?बाह्य औषधाने की सर्जरी करून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

लिगामेंट टियर बद्दल थोडक्यात...

विनय पत्की
Wed, 02/17/2016 - 14:13 नवीन
लिगामेंट टियर: गुढग्यात वरच्या आणि खालच्या हाडाला जोडून ठेवण्यासाठी दोन फायब्रस टिश्यूज असतात. ACL - Anterior cruciate ligament PCL - Posterior cruciate ligament फोटो: http://www.drugs.com/health-guide/images/204810.jpg या फायब्रस असल्यामुळे यात कोणतेही हाड त्यामुळे क्ष-किरण यातून आरपार जातात. म्हणून एक्स-रे मधे हे दिसत नाहीत. त्या फक्त एमआरआय (MRI) मधे दिसतात. थोड्या साधारण चाचण्या करून अन्दाज बान्धता येतो, पण पुर्ण निदान एमआरआय (MRI) मुळेच होते. टियर झाल्यानन्तर गुढगा सुजतो आणि सुज काही दिवस असते. Ligament ला रक्तपुरवठा फ़ारच कमी असतो, त्यामुळे नैसर्गिकपणे ठिक होणे अशक्य असते. Allopathy मधे यासाठी औषध नाही. होमिओपॅथी मधे औषध आहे असं म्हणतात. जर खुप जास्त फाटलेला (ligament tear) असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. शक्यतो शस्त्रक्रिया लगेच करत नाही. सुज पुर्णपणे उतरल्यावरच करतात. शत्रक्रियेच्या बर्याच पद्धती असतील. प्रचलित आहे त्यात मान्डीतून एक स्नायुचा भाग काढुन तो हाडान्च्या मधे स्क्रुने लावला जातो. तुमचा गुढगा ९५% पुर्ववत होतो. Source: स्वानुभव (ACL Tear in my right knee), आणि माझे बन्धू फिजीओथेरपिस्ट आहेत. सगळं ज्ञान त्याच्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माहितीबद्दल धन्यवाद...

मुक्त विहारि
Wed, 02/17/2016 - 21:36 नवीन
अगदी मनापासून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनय पत्की

सगा

कपिलमुनी
Tue, 02/16/2016 - 21:51 नवीन
बॅट-बॉल घेउन ये ! एक ट्प्पा आउट ! १०० ची पार्टनरशीप पायजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

बोला था ना १००

कपिलमुनी
गुरुवार, 02/18/2016 - 02:04 नवीन
७६ झालेत अजून थोडा वेळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धन्यवाद डॉक्टर. मिपावर तज्ञ

सतिश गावडे
Tue, 02/16/2016 - 22:36 नवीन
धन्यवाद डॉक्टर. मिपावर तज्ञ डॉक्टर असल्याने याबाबत चर्चा व्हावी या हेतूनेच हा अनुभव मी लिहिला. तुमचे बरेच मुद्दे पटले. मात्र कट प्रॅक्टीस ची शंका येण्यासारखी परिस्थिती त्या डॉक्टरांनीच निर्माण केली. केवळ त्यांचा दवाखाना आणि माझे निवासस्थान एकाच विभागात असल्याने त्यांची फी दोनशे रुपयांनी कमी करणे असो वा एमआरआइ सेंटरला द्यायच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लीज गीव्ह टेन परसेंट डिस्काऊंट टू माय पेशंट" असे ढळढळीत लिहिणे असो या दोन गोष्टींनी माझ्या मनात संशय बळावला. डिस्काउंट द्यायला ते ही मागितले नसताना डॉक्टरांचा दवाखाना म्हणजे अमेझॉन डॉट ईन नव्हे. मला जी काही आवश्यक आहे ती वैद्यकीय सेवा दया आणि त्याचा रास्त मोबदला माझ्याकड़ून घ्या. तिथे सवलतीची भाषा कशाला? त्यामुळे या प्रकारात डॉक्टर आणि तपासणी केंद्र संगनमताने सवलतीची भाषा करून अनावश्यक तपासणी माझ्या गळ्यात मारत आहेत असा संशय मला असेल तर माझे काय चुकले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

साहेब,

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 00:48 नवीन
मार्केटिंग नावाचा एक प्रकार असतो. माझ्या हॉस्पिटलात, आजही, जर अमुक गावाहून कधीच पेशंट आलेला नाही, पण हा पहिला आला, असे सापडले, तर त्याला न विचारता कन्सेशन दिले जाते. अगदी ओपनली हे तोंडी सांगून, की तुम्ही या गावचे पहिले पेशंट आहात, म्हणून तुम्हाला कन्सेशन. तुम्हाला गुण आला तर तुम्ही माझी जाहिरात तुमच्या गावात करा. हे मी स्वतः हसत हसत सांगतो. त्याबद्दल मला लाज वाटण्याचा काहीच संबंध नाही. त्याचवेळी त्या पेशंटला माझ्याकडे कोणी पाठवलं? त्या नातेवाईकाचीही चवकशी होते व त्याला पुढच्यावेळी कन्सेशन डिक्लेअर होते. मी जिपड्यांना कट देत नाही. त्यांना माझ्या केबिनमधे खुर्चीवर बसूही देत नाही. उभे ठेवतो. (त्याच वेळी, जाहिरातीसाठी मला प्रिंट मेडिया वा इतरत्र जाहिरात अलाऊड नाही. एमसीआय गळा धरते लगेच. पण अशा प्रिंटेड, बॅनर वै. जाहिराती नॉनअ‍ॅलोपॅथ्सना अलाऊड आहेत. मोठ्या कॉर्पोरेट व तथाकथित 'चॅरिटेबल' हॉस्पिटल्सना देखिल अलाऊड आहेत. तेव्हा मी माउथ टू माऊथ पब्लिसिटीचा आश्रय घेणारच. मलाही हप्ते फेडायचे आहेत, अन माझ्या नोकरांना पगार देऊन मग स्वतःचे घर चालवायचे आहे.) या लेखातलीच गम्मत पहा : तुमच्या गल्लीतला डॉक्टर तुम्हाला नेटवर शोधावा लागतो. माझ्या गल्लीतल्या प्रत्येकाला मी ठाऊक आहे. तसे झाले नाही तर माझा पोटापाण्याचा व्यवसाय कसा चालेल? अन हो. शेवटी हा व्यवसाय आहे. मला शॉप अ‍ॅक्ट लायसन्स घ्यावं लागतं मुन्शीपाल्टीतून. अन तशीच इतर ढीगभर लायसनं, इन्क्लुडिंग एम्प्लॉयी युनियन, त्यांचे टीडीएस अन प्रॉविडंट फंड्स अन त्या बद्दलची सर्व प्रकरणं. तेव्हा वन्स अगेन, ज्या समाजाने मला शॉप अ‍ॅक्ट लायसन घ्यायला लावले, व माझ्या दवाखान्याचे दुकान बनवले, त्याने स्वतःला गिर्‍हाईकासारखे वागविले गेल्याबद्दल मला दोषी समजावे काय? अन सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला गंडवले गेले, याचा पुरावा काय? तुम्ही एमआरआय केला नाही. डॉ.च्या इमर्जन्सी फी मध्ये देखिल कन्सेशन मिळवले. सो बी हॅपी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

रोचक माहिती. :)

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 00:58 नवीन
रोचक माहिती. :)
अन सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला गंडवले गेले, याचा पुरावा काय?
मी गंडवले असे म्हणालोच नाही. माझा शेवटचा परिच्छेद असा आहे: या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो. मी केवळ संशय व्यक्त केला आहे.
डॉ.च्या इमर्जन्सी फी मध्ये देखिल कन्सेशन मिळवले. सो बी हॅपी ;)
देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

साहेब,

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 01:02 नवीन
"तुम्ही एकंदरितच डॉक्टर लोकांवरच्या आकसाने, दारू पिऊन हा लेख लिहिला आहे", असा संशय मी व्यक्त केला, तर तुमच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडतील, त्याला काय इलाज करता येईल हे आपण मला सांगणार काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

:)

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 01:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

हाय्ला!

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 01:18 नवीन
:स्वगतः नुसतंच स्मित? नो दंतपंक्ती? असो.
देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)
यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं. त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका? नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्‍याची सोशल मेडियावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मला कट प्रॅक्टीसचा संशय का

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 09:47 नवीन
मला कट प्रॅक्टीसचा संशय का आला याची कारणमिमांसा मी या प्रतिसादत दिली होती. कुठल्याही सारासार विचार करणार्‍या व्यक्तीला ते पेशंटची बाजू म्हणून पटेलही. मात्र तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन
"तुम्ही एकंदरितच डॉक्टर लोकांवरच्या आकसाने, दारू पिऊन हा लेख लिहिला आहे", असा संशय मी व्यक्त केला, तर तुमच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडतील, त्याला काय इलाज करता येईल हे आपण मला सांगणार काय?
असा प्रश्न विचारलात. या प्रश्नाने तुम्ही किती खोल पाण्यात आहात हे दाखवून दिले. मी किती खोल पाण्यात आहे याची मला नेमकी जाणिव असल्याने कुठलाही प्रकारचा प्रतिवाद न करता फक्त स्मायली टाकली.
यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं.
:)
त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका?
हे त्या डॉक्टरसाठी नसून तुम्ही ज्या पद्धतीने डीफेंड करत होतात त्यासाठी होतं.
नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्‍याची सोशल मेडियावर.
निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते. असो. मला या विषयावर संवाद साधायचा आहे. तुमच्या पहिल्या प्रतिसादावरून तुम्हालाही चर्चा करायची आहे असे वाटले. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला मी उप-प्रतिसाद दिला. मात्र तुमच्या पुढील प्रतिसादांवरून तुम्हाला संवाद साधायचा नसून फक्त वाद घालायचा आहे असे वाटते. वादासाठी माझ्याकडे वेळ नाही. तो वेळ मी चांगली पुस्तके वाचण्यात सत्कारणी लावतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अरे वा!

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 21:34 नवीन
निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते.
काय भाव दिलं तुमचं बोधामृत? ;) पुस्तके वाचण्यातच वेळ घालवीत चला. असले धागे पाडत जाऊ नका, असे सुचवतो. पहा त्यातून काही बोध घेता येतोय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सांगितलं होतं ना मी सतीशभौ?

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 23:43 नवीन
वाद माणसांशी घालावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा