Skip to main content

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

लेखक यनावाला यांनी सोमवार, 26/10/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला] विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥ बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥ अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥ विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥ विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥ वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥ प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥ अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥ आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥ वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥ समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥ अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥ असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥ कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥ प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥ अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥ तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥ वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥ आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥ वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥ आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥ "जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥ आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥ अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥ ******************************************************************************************************

वाचने 63289
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

अंतिम सत्य शोधण्या| उभारती प्रयोग्शाळा| फलीत जे मिळले| दैवी कण का वदती त्यासी? विज्ञान हि मानते| कुठे ना कुठे दैवासी|

In reply to by पीके

नाव केवळ दैवी, म्हणुन का यांस हिणवी मागे त्याच्या बघावा, असतो तर्काचा पुरावा ही नाही अध्यात्मासम उथळ मिरवणी इथे लागतो द्यावा निष्क्रर्षांचा पुरावा असतो प्रत्येक प्रयोंगामागे भरभक्कम विदा नाही अध्यात्मिकासम बोलणे अद्वातद्वा विनाविदा विज्ञाने नाव ठेवतीं परी साधने त्यांचीच वापरती अहो बाबा देखील आजकाल ध्वनिक्षेपक वापरती यांना वाटे सर्वच शोध मोठे सहजच लागले त्यामागील कष्ट न यांना कधी दिसले दिसतीलही कसे बाबा यांना नकोय प्रयोगांचा त्रागा यांना हवा फक्त एक दिलासा एक भ्रमाचा खेळ हवाहवासा

वालावलकरसाहेब, आपण परत लिहिते झाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे. बाकी इथे तरुण आणि त्यांच्यापेक्षा जास्त तरुण अशा दोन्ही कॅटेगरी जोमाने मिपा-मिपा खेळतात. ;-) तेव्हा तुम्ही जास्त तरुण असाल तर उलट जास्त जोमाने शिरा रिंगणात! असेच उत्तमोत्तम लेख आणि प्रतिसादही येऊ द्या मिपावर. उपक्रमावरील आपल्या लेखनाचा भोक्ता होतो.

In reply to by एस

+१ सर लिहीते झाले याचा आनंद आहेच. अजून लेखांच्या प्रतिक्षेत..

यनावाला जी नमस्कार आपण उपक्रम वर होतात ना ? आपले काही सुंदर लेख वाचलेले आहेत कोणी कोणी सजेस्ट केलेले आहेत. आपण इतके दिवस कुठे होता हो ? फार सुंदर आहेत या विज्ञान ओव्या म्हणु का ? म्हणजे पारंपारीक अध्यात्मावर टीका करण्यासाठी साधन भाषा शैली सर्व परंपरेतुनच घेतलेली हे विशेष वाटलं. देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें यातल्या प्लेग या शब्दाने थोडं ओरबाडलं, कारण याने अडथळा आला एकदम वर्तमानात आलो, बाकी सर्व छान आहे. आपण इथे लिहायला सुरुवात केलीयं याने फार आनंद वाटला. धन्यवाद यनावाला जी.

आपण जेश्ठ आहात असे वाटते पण अध्यात्म-विज्ञान समन्वय असे म्हणत आपण विज्ञानाचा प्रसार करत आहात. मी ही विज्ञानाचाच पुरस्कर्ता आहे पण आपल्या ओवीतून समन्वय काही दीसला नाही. असो. ओवी मस्तच. बादवे पीके चा प्रतिसाद पण आवडला.

In reply to by संजय पाटिल

आमचा पास असे स्वत: म्हणावे आम्ही पास नाही. तुम्ही पास असं क्वचित् आणि तुम्ही नापास असं नेहमीच इतर जनता म्हणेल.

श्री यनावाला आपण उपक्रम वर जे विज्ञानवादी लेखन करीत होतात मी सतत वाचत होतो. तस मला प्रथम नवल वाटले की आपल्यासारख्या कट्टर विज्ञानवादी व्यक्तीने ओवीतुन सुरुवात करावी ! तशी माझी काहीच हरकत नाही. पण मग विचार केला यातही विज्ञानच आहे की फक्त ते मानसशास्र की काय ते..

उलट हा अधिक सटल पातळीवरचा विरोध आहे. जबरदस्त कल्पकता आहे या विरोधात. अशी क्रिएटीव्हीटी विरोध करण्याची काबिल-ए-तारीफ आहे.

यनावाला, तुमच्या ओव्यांचा शेवट रोचक आहे. 'मग समन्वय कसला ऐशा भिन्न विषयांचा ?' हा प्रश्न करून एका तऱ्हेचं आव्हान दिल्यासारखं वाटतं. हे आव्हान अनेकांनी समर्थपणे पेललंय. सुरुवात म्हणून सर आयझॅक न्यूटनचं काम बघूया. इथे न्यूटनच्या धार्मिक (=रिलीजस) कामाची यादी आहे : http://www.newtonproject.sussex.ac.uk/prism.php?id=44 या यादीतल्या ०२, ०३, २२, २७, २८, २९, ४४, ५८, ५९, ६० आणि ७६ क्रमांकाच्या लेखांची फक्त नावं पहा म्हणून सुचवेन. आधुनिक विज्ञानाची सुरुवात ज्याच्यापासून झाली तो न्यूटन धार्मिक (=रिलीजस) ग्रंथांकडे अतिशय गंभीर व आदरपूर्वक दृष्टीने बघत असे. बायबल हे साक्षात भगवंतांचे शब्द आहेत यावर त्याची प्रगाढ श्रद्धा होती. त्याच्या मते विज्ञान हे एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया. अध्यात्म आणि विज्ञान या वरपांगी भिन्न दिसणाऱ्या विषयांचा समन्वय साधायचा झाला, तर तो तत्त्वज्ञानामार्गे साधावा लागेल. असा समन्वय साधणाराच खरा वैज्ञानिक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

श्री.गामा पैलवान यांनी न्यूटनच्या धार्मिकतेविषयी लिहिले आहे ते सारे खरे आहे. न्यूटनच्या लहानपणी त्याचे वडील वारले. आईने पुनर्विवाह केला. न्यूटनला आजोळी पाठविले. आजोबा (आईचे वडील) बिशप. त्यांच्याकडे बरेच धर्मग्रंथ. न्यूटनला वाचनाचा नाद. त्याने ते ग्रंथ वाचले.(दुसरी पुस्तके न्यूटनला उपल्ब्ध नव्हती.) बालमनावर झालेले संस्कार दृढमूल होतात. आपले पालक, आजुबाजूची माणसे काय बोलतात-काय करतात, ते बालक पाहाते, ऐकते. पुढे मोठे झाल्यावर वाचते. डोक्यावर चढलेले हे संस्कारांचे गाठोडे उतरवून ठेवणे अवघड असते. रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "देवा-धर्माच्या संस्कारांचे विष बाळाला त्याची आई स्वमुखे पाजते. या विषाचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो. " तसेच डार्विनपूर्व बहुतेक वैज्ञानिक पूर्णतया नास्तिक नाहीत. कारण या सृष्टीवर एवढे विस्मयकारक वैविध्य कसे निर्माण झाले याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण तेव्हा मिळत नव्हते. ते उत्क्रांतिवादामुळे मिळाले. कुंठित झालेले विज्ञान डार्विनने प्रवाही केले आणि जगातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली.

In reply to by यनावाला

यनावाला, न्यूटन प्रतिभाशाली अन्वेषक होता. बायबल असो वा निसर्गनियम त्याने सारख्याच जिज्ञासेने शोध घेतला. मग त्याला वैज्ञानिक मानावा का? की त्याच्या अलौकिक प्रतीभेकडे दुर्लक्ष करून त्याचं धार्मिक लिखाण झटकून टाकावं (डिसमिस करावं) ? आ.न., -गा.पै.

धी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥ अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥ गद्य पद्य रेषा जणूहि। तुम्हा वाटें जाये पुसूनी।वंडरफूल ओव्या बापा।अशाी राहो मिपा वरी किरपा।

श्र्योडिंजराच्या माऊस । अध्यात्माच्या अडगळीत । पाहूनी धन्य झाला तो कंजूस।। यानावाला, पीके आणि मारवा काव्यशास्त्र विनोदाने । करती सकळाचे रंजन । आत्मु आणि प्रचेतस । मान डोलवती आनंदाने ।।

की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे तरीही पूरक दृष्टिकोन आहेत. अध्यात्म म्हणजे आत्मज्ञान (अधि+आत्म) हे micro पातळीवर आहे आणि विज्ञान हे संपूर्ण विश्वाचे रहस्य उलगडू इच्छितं. कर्मकांड, देव, मोक्ष या अध्यात्मातल्या सर्वांना माहित असलेल्या संकल्पना आहेत, पण त्या म्हणजे अध्यात्म नव्हे. तत्वज्ञानात मेटाफिजिक्स हा जो भाग आहे त्याच्याशी ख-या अध्यात्माचा संबंध येत असावा. अध्यात्म हे दुर्दैवाने कर्मकांडात अडकून पडल्यामुळे तोच अर्थ प्रचलित झाला, पण अध्यात्म प्रचंड व्यापक आहे. विज्ञानाप्रमाणेच. आणि The Tao of Physics सारख्या काही पुस्तकांत विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा परस्परांशी असलेला संबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. अध्यात्म हा तसाच एक दृष्टिकोन आहे.

प्रत्येक मनुष्याचे भावना अशा अशा असाव्यात १ २ ३ . . प्रत्येक मनुष्याचे विचार असे असे असावेत १ २ ३ . . प्रत्येक मनुष्याचे आचार असे असे असावेत १ २ ३ . . असे मॉडेल अजून इम्प्लिमेंट करता येत नसल्याने अध्यात्य व विज्ञान हे द्वैत चालूच रहाणार आहे हे आमचे भाकित

को जागर पौर्णिमेचा चांगलाच इफ़ेक्ट दिसतोय आज मिपावर. छे...! आयुष्य वाया गेले सगळे. उगीचच गौतम बुद्धांपासून तुकाराम महाराजांपर्यंत महापुरुषांची चरित्रे आणि तत्वज्ञान वाचण्यात समजून घेण्यात आयुष्यातला बहुमोल वेळ घालवला कि हो. कसली मुक्ती आणि कसलं निब्बाण... आता काय करावे...!. याचे परिमार्जन काय...कोणाचे पाय धरावे. ...!!! काही कळेनासे झालेय. जगात एकमेव गोष्ट खरी. प्रदूषण प्रदूषण आणि प्रदूषण ...!

[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]
हेबघा एकतर आम्ही याला म्हातारचळ अजिबात गणत नाही तेंव्हा चुकीनही क्षमध्वम् वगैरे भावना मनात आणून नका वा टंकु नका. कसे आहे वाढते/वाढलेले वय मुळ बाल्यस्वरुप पुसुन टाकतेच असे नाही, असा बरेच लोकांबाबत अनुभव असल्याने आपण कोणी त्यापेक्षा वेगळे नाही म्हणून आपलेही बिंधास्त स्वागत. बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.

In reply to by द-बाहुबली

बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.
+१ सदर लेखातील अध्यात्म आणि अष्टांगयोग यांची झालेली गल्लत बरेच काही सुचवून जाते.

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांचे विज्ञान म्हटल्या जाणाऱ्या विषयांचे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टीकोन हे दोन्हीही स्पष्ट दिसेल. बाकी समन्वय किंवा विरोध म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?

In reply to by कवितानागेश

लीमाउजेट जी एक अडचण असते या ग्रह पुर्वग्रहा संदर्भात उदा. एक गाणं आहे आपण ऐकलं असेल की नाही माहीत नाहे गोली मार भेजे मे भेजा शोर करता है भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लु अरे तु करेगा दुसरा भरेगा कल्लु मामा कल्लु मामा तर वरील गीताकडे दोन अर्थांनी पाहता येते. एक लीटरली जसे आहे तसा शब्दश: सरळ अर्थ एक सिम्बॉलीकली जसे दिसते तसे नसुन फार गहन अर्थ असलेले एक प्रतिकात्मक गीत या अर्थाने. धार्मिक बाजुने जी आर्ग्युमेंट्स होतात त्यात एक कनींग ट्रीक वापरली जाते. त्यात धर्मग्रंथातील जो जो लीटरली शब्दश: च्या दिशेने येणारा अर्थ अडचणीचा असेल तर त्याकडे अहो ते तसे नाही त्या मागचा " गहन प्रतिकात्मक अर्थ " असा असा आहे असे "समजावुन" देण्यात येते. आणि ज्यात धर्मग्रंथातील प्रतिकात्मक अर्थ अडचणीचा असेल तर त्याकडे अहो काहीही काय अर्थ काढता सरळ सरळ असे असे दिलेले आहे ते बघा असे "समजावुन" देण्यात येते. विज्ञान हा वरील सर्व धार्मिक मार्ग दांभिक समर्थनाचा आपल्या सत्याच्या मांडणीसाठी वापरत नाही. प्रतिपादना मागे एक पुराव्यांची वस्तुनिष्ठतेची मालिका असते. मागील शोध कीतीही मोठ्या व्यक्तीने लावला असेल तरी त्याकडे पवित्र अपरीवर्तनीय अशा अर्थाने बघितले जात नाही. उलट त्याकडे एक बेस निर्माण केला या यथोचित आदराने बघुन त्याला पुढे तपासण्यात-सुधारण्यात-विकसीत करण्यात येते. तर वरील गाण्याचा एक अर्थ जसा दिसतो तसा च आहे दुसरा खरा गहन अर्थ माझ्या गुरुंनी परवानगी दिली आणि मुख्य म्हणजे तुमची पात्रता असेल व तुम्ही पुर्वग्रहदुषीत नसाल तरच तुम्हाला कळेल. हे मी लिहीत नाही कर्ता करविता तो आहे (शेवटचा परिच्छेद हलक्यात घ्या हे वेगळे सांगणे न लगे )

In reply to by मारवा

मी नक्की काय विचारतेय हे न कळता तुम्ही टिपिकल दळण दळताय! शिवायतुम्ही मध्येच धर्मग्रंथ घुसडताय. तसाही मी कुठलाही धर्मग्रंथ वाचलेला नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काहीच लिहिले नाहिये.

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले हे दोन्ही धर्मग्रंथ नाहीत ? मग ठीक आहे

In reply to by संजय पाटिल

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांचे विज्ञान म्हटल्या जाणाऱ्या विषयांचे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टीकोन हे दोन्हीही स्पष्ट दिसेल.
हे विधान करायचे ज्ञान त्यांना कुठुन प्राप्त झाले असावे ?

>>>>कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥ >>>>प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥ यनावाला स्वनाम म्हणजे मी हे कोsहं चं उत्तर मानतात. उद्या त्यांचं नाव Alex pothimpillaey असं केलं तर? ते नाव म्हणजे ते तेच असतील? नाव बदललं तर माणूस बदलेल? बरं यनावाला ज्येष्ठ झाले असं स्वत: म्हणतात. यनावालांनी फोटो काढले असतील. लहानपनापासून आतापर्यंत छे फोटो त्यांनी पाहून यातला खरा कोण हे देखील सांगावे. काल्याकुट्ट अमावश्येच्या रात्री कालाकाभिन्न माणूस जो स्वत:लाही दिसत नाही तो मी आहे ही जाणीव ठेवून असतो. त्यालाच एखाद्या अपघातात दोन हात गमवावे लागले तरी तो तोच असतो की निराळा? माणसाचं नाव अथवा शरीर हे त्याचं कायमचं ओळख पटवण्याचं साधन असू शकेल पण ती व्यक्ती म्हणजे नाव अथवा शरीर नव्हे. माझ्यासारखे दिसणारे अनेक लोक असतील. माझं च नाव असलेले त्याहून जास्त असतील. खरा मी कोण हां प्रश्न येतोच. आपापल्या गरजा भागवल्यानंतर का होईना प्रश्न पडायला हवा. म्हणजे विज्ञान आणि मुख्यत्वे यनावाला खुश आणि प्यारेही!

अध्यात्म याचा संबंध देव... धर्म...संप्रदाय...कृपा. अनुग्रह...ईईईई गोष्टीच्या संदर्भात जास्त करून येतो हे आपण सार्‍यानीच वारंवार पाहिले आहे. या सार्‍याचेही अस्तित्व नाकारणार्‍या मला अध्यात्मापासून सुटका नाही कारण मी व माझ्यासारखे नसलेले याच्यात एक साम्य आहे की मला ही मन आहे व ते माझ्या सारख्या नसणार्‍यांच्या मनासारखेच बहिर्गामी आहे. सबब आत डोकावून पहाण्याची मला ही संवय नाही ही सवय लावणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म असे स्थूलमानाने मी मानतो. साहजिकच ज्याचा मनाशी संबंध नाही अशा उर्वरित सर्व गोष्टीच्या उलथापालथीचा पध्हतशीर अभ्यास म्हणजे विज्ञान असे मी मानतो. जिथे विज्ञान संपते तिथे श्रद्धा सुरू होते असे एक फेमस वाक्य नेहमी फेकले जाते. मुळात जिथे चिकित्सा संपते तिथे श्रद्द्धा सुरू होते असे ते वाक्य हवे. थोडक्यात विज्ञान शस्त्र निर्माण करते त्याचा उपयोग किती व कसा करायचा हे अध्यात्म शिकविते. प्रत्येक जीवित गोष्ट या दोन्हीच्या समन्वयानेच जीवन जगत असते त्यातून न्युटनचीही सुटका नव्हती ना माझी आहे.

हे सगळे वाचुन मला पाडगावकरांचे हे गाणे आठवले....... कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडुन वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन कधी होउनी देव भिकारी, अन्‍नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी पैजारबुवा,

ओव्या उत्तमच जमल्या आहेत. त्यात मांडलेले विचार हे शाळकरी निबंधातल्यासारखे असले, तरी विज्ञानाविषयी ओवीबद्ध लिहावेसे वाटणे आणि ते सुचत जाणे, हा लेखकाचा अध्यात्माच्या दिशेने प्रवास सुरु झाल्याचे लक्षण . त्याबद्दल अभिनंदन . पतंजलि योगसूत्रांचा गहन अभ्यास सुरू करावा असे सुचवतो. यासाठी बीकेएस अयंगार आणि ओशो यांचे ग्रंथ उपयुक्त . विज्ञानाची पार्श्वभूमि लाभलेली असणे हे फारच उत्तम .

उद्याचे विनोदी साहित्य श्री.चित्रगुप्त म्हणतात,
"ओवीबद्ध लिहावेसे वाटणे हे लेखकाचा प्रवास अध्यात्माच्या दिशेने सुरू झाल्याचे लक्षण आहे."
श्री.पी.के. या समजाला अनुमोदन देतात. ...शनीमाहात्म्य, शिवलीलामृत, व्यंकटेशस्तोत्र, सत्यनारायण कथा, दासबोध, अशी अनेक लहान मोठी ओवीबद्ध धार्मिक पुस्तके वाचली. त्यामुळे ओवीछंद चांगला परिचयाचा आहे. मात्र या वाचनामुळे माझी नास्तिकविचारसरणी अधिकाधिक दृढ झाली. खरोखर धार्मिक ग्रंथ हे नास्तिकचेच्या प्रसाराचे प्रभावी साधना आहे. सत्यनारायण कथा अर्थ जमजून (अगदी सोपा आहे.) वाचली तर ती अथ ते इति असत्य आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. असे असता अनेकजण सत्यनारायणव्रत पुन:पुन्हा करतात याचे आश्चर्य वाटते. "आजचे धार्मिक ग्रंथ हे उद्याचे विनोदी साहित्य आहे." असे म्हणतात. मला वाटते शनिमाहात्म्य, शिवलीलामृत या ग्रंथांची निर्मिती विनोदी साहित्य म्हणून झाली असावी.(वाचून तर पाहा. मात्र वाचताना श्रद्धा सोडायला हवी . कारण, "श्रद्धेने जो बरबटला । तो सत्यज्ञानासी मुकला।श्रद्धासंभार विसर्जिला । ज्ञानप्राप्तीस पात्र तो॥ )

In reply to by यनावाला

आपला सकळ जनांना शहाणे करुन सोडण्याच्या भूमिकेचं कौतुक आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

In reply to by प्यारे१

आणखी शहाणे कोण करणार. अहो प्यारे लाल, हा शिया सुन्नी पंथिकांच्या जागतिक वैरभावासमान न सुटणारा तिढा आहे. दोन्ही बाजूने हम नहीं सुधरेंगे अशी कसम खाऊन असलेल्या लोकांची मानसिकता बदलायला शक्य नाही. असो. या ओव्यांचे काव्य करतानाच्या प्रसव वेदनांची जाणीव वाला सरांना झाली असेल तर भविष्य कथन म्हणून नको निदान काव्य प्रकार म्हणून नाडीग्रंथातील काव्य रचनेचा आस्वाद घ्यावा ही आपणास नम्र विनंती. या काव्य रचनांचे वैशिष्ट्य काय. तशी अलंकारिक काव्यरचना अन्य भाषेतील काव्यात सापडते का यावर आपल्या सारख्याने भाषाप्रेमी म्हणून लक्ष घालावे अशी प्यारेंनी वालासरांना विनंती करावी . असे सुचवतो. निरर्थक कामाला मला वेळ नाही म्हणून आपण ही विनंती लाथाडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. मिपावरील या बाबत काही काळापुर्वी माझ्याकडून धागे सोडले होते... कदाचित आपल्या वाचनात आले असतील. नसतील तर पुन्हा एकदा सादर करेन.

"....समन्वय?" मधील "अध्यात्मीं अष्टांग योग ।" चुकीचे आहे असे श्री. चित्रगुप्त यांनी म्हटले आहे. "प्रत्येक आध्यात्मिक व्यक्ती अष्टांग योग करते." असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. " अध्यात्मात अष्टांग योगाला मान्यता आहे." असा आहे. ..अध्यात्माची नेमकी व्याख्या सापडत नाही.(मला) ."किमध्यात्मम् ?"(अ.८,श्लोक १) या अर्जुनाच्या प्रश्नावर भगवानुवाच आहे,"स्वभावोsध्यात्ममुच्यते।" त्यावर ज्ञानेश्वरीत भाष्य आहे
"आणि आकाराचां जालेपणे।जें जन्मधर्मातें कहीं नेणे ।आणि आकारलोपीं निमणे नाही जेया॥ऐसी आपुलिया सहजस्थिती। जेया ब्रह्माची नित्यता असती ।तिया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥"
(ओ.१७-१८)पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे. तरी ईश्वर ,परमात्मा, (परब्रह्म), जीवात्मा (ब्रह्म)पुनर्जन्म, परलोक, मोक्ष या सर्व संकल्पना सत्य आहेत. तसेच मोक्ष हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.योगसाधना हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे.धारणा-ध्यानामुळे समाधी लागू शकते. मग ब्रह्म आकळते. या गोष्टी सत्य आहेत असे सर्व आध्यात्मिक मानतात. म्हणजे सहा वैदिक दर्शनांतील न्याय,योग आणि वेदान्त ही तीन दर्शने आध्यात्मिक लोक मानतात. त्यांना पातंजल योगदर्शन निषिद्ध नाही. म्हणून "अध्यात्मीं अष्टांग योग " हे चूक नसावे असे मला वाटते. तरी पण प्रस्तुत ओवी नसती तर बरे होते.

In reply to by यनावाला

पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे. Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'. To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham. Richard Dawkins

In reply to by मारवा

मारवा, ignore the evidance वरून एक आठवलं. डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी संशोधन करून पुनर्जन्माच्या पन्नासाहून अधिक घटना उघडकीला आणल्या आहेत. या पुराव्याबाबत तथाकथित विज्ञानवादी गप्प का आहेत? पुराव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या असल्यांना रिलीजस फ्यान्याटिक का म्हणू नये? विज्ञानवाद हा आधुनिक युगातील एक कर्मठ रिलीजन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान जी आपला प्रतिसाद ससंदर्भ व विचारवेधी आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपले अभिनंदन. या एवजी आपण तुम्हाला कळत नाही, तुम्ही अमुक अमुक पात्रते-विचारसरणीचे-जातीचे-धर्माचे-भुमिकेचे च आहात इ.इ. तुमचा हेतु तुमच जीवन तुमच अमक नि तुमच ढमक अस अस च आहे आम्ही तुम्हाला ओळखुन आहो तुमच्याशी बोलण्यात अर्थच नाही हे नेहमीचच आहे यात नविन काय मला माहीताय पण असो, आदि अनेक तर्कहीन अर्थहीन संवाद टाळुन आपण एक मुलभुत काहीतरी नवीन कॉन्ट्रीब्युशन करुन एका प्रयोगाचा व्यक्तीचा सुस्पष्ट काहीतरी अर्थपुर्ण खणखणीत संदर्भ दिला. आणी चर्चेत एका बाजुने महत्वाची मांडणी केली. याने दोन विरोधी बाजुने होत असलेल्या चर्चेला एक चांगला आवश्यक मुद्दा समाविष्ट झाला. असे व्हॅल्यु अ‍ॅडीशन चर्चेला निव्वळ भावनिक व्यक्तीवेधी प्रतिसादांनी कधीच होत नाही व चर्चा पुढे ही जात नाही. व संबंधित कोणालाच काहीही फायदा व निष्पन्न होत नाही तर एवढ सगळ रामायण झाल्यानंतर तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्याविषयी व प्रयोगाविषयी या प्रयोगाविषयी मला काहीच माहीती नाही मी हे वाचलेलं नाही, मी हे अगोदर माहीती मिळवुन वाचुन बघतो हे कुठल्या जर्नलमध्ये प्रकाशित झाल किंवा किमान कुठल्या वैज्ञानिंकांसमोर हे सादर करण्यात आल ? त्याला न बघताच त्यावर कोणत्या वैज्ञानिकांनी टीका केली ? कोणी नकार दिला ( तुमच्या प्रतिसादावरुन तरी अस वाटत की काही वैज्ञानिकांसमोर हा प्रयोग सादर झाला व तो त्यांनी मुद्दलातच नाकारला ). त्याच्या चाचण्या सर्वांसमक्ष झाल्या होत्या का ? ही सर्व माहीती घेण आवश्यक वाटत व सध्या ती नसल्याने मी हा एक जाणून घेण्याचा विषय म्हणून मान्य करतो व तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा आहे म्हणून साहजिकच तुमच्याकडुन वरील माहीतीची अपेक्षा करतो. तो पर्यंत आपण एक सशक्त अर्थपुर्ण मुद्दा उपस्थित केला आहे हे मान्य करुन उत्तर देण्यासाठीची माहीती गोळा करतो. धन्यवाद

In reply to by मारवा

डॉ. इयान स्टिव्हन्सन यांच्या काही केसेसवर त्यांचे सहकारी डॉ. जिम टकर यांनी Life Before Life: Children's Memories of Previous Lives हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाची प्रस्तावना डॉ. इयान स्टिव्हन्सन यांचीच आहे. अर्थात पुस्तकाची मांडणी शोधनिबंध साच्यातील नसून कथानक स्वरुपातील आहे.

In reply to by मारवा

मारवा, डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्यावर ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये हा (लांबलचक) लेख सापडला : http://www.bmj.com/rapid-response/2011/11/01/professor-ian-stevenson-em… ब्रिमेज हे नाणावलेले (रेप्युटेड) प्रकाशन आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या शंकांची उत्तरं या लेखात मिळवीत. डॉक्टर स्टेव्हनसन यांनी कोणतेही प्रयोग केले नाहीत. त्यांनी पुनर्जन्मावर प्रचंड प्रमाणावर माहिती गोळा केली आणि तिची वर्गवारी करून विगतवार नोंदी केल्या. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं याचं त्यांना वैषम्य वाटंत असे. एकंदरीत विज्ञानाच्या मर्यादा विस्तारतील अशा संशोधनाकडे तथाकथित विज्ञानवादीच दुर्लक्ष करतात. विज्ञानातही बुवाबाजी चालते. घरोघरी मातीच्याच चुली. आ.न., -गा.पै.

In reply to by यनावाला

पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे. Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'. To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham. Richard Dawkins

In reply to by यनावाला

यनावाला, तुम्ही अध्यात्माची व्याख्या शोधायचा प्रयत्न केलात तशी विज्ञानाची व्याख्या शोधलीत का? काय सापडलं? यापुढचा प्रश्न म्हणजे विज्ञान (=सायन्स) आणि तंत्रज्ञान (=टेक्नोलॉज=) यांतला काही फरक आहे का? असल्यास कृपया उदाहरणे देऊन स्पष्ट कराल काय? आ.न., -गा.पै.

यनावाला , तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत . आता तुमच्या प्रत्येक ओवीला उत्तर दिले असते पण सगळीच स्वमतांध दांभिक लोक कसे एकांगी मताला चिकटुन रहातात हे कैक वेळा पाहण्यात आलेले आहे म्हणुन उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही . असो . अवांतर : यनावाला म्हणजे य.ना.वालावलकर का ? य.ना.वालावलकर नावाचे कोणीतरी प्रसिध्द गणितज्ञ की शास्त्रज्ञ पुण्यात होते त्यांच्याशी आपला काही संबंध ?

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत.
कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते. त्यांची मतं मान्य नसतीलही पण त्यांच्याबद्द्ल काही माहित नसताना त्यांना विज्ञान पण माहित नाही असं कसं म्हणू शकता? यनावालाजी हे एक अभ्यासु व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचं मिपा आणि उपक्रम वर बरंच लेखन प्रसिध्द आहे. अवांतर : यनावाला म्हणजेच य.ना.वालावलकर.

In reply to by गुलाम

कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते. अत्यंत मार्मिक टीप्पणी मतभेद असण्यात काहीही गैर नाहीच नाही. मात्र केवळ भावनिकच प्रतिसाद मला हे पटत नाही मला हे पटत या प्रेरणेतुन. विचारवेधी प्रतिसाद न देता व्यक्तीवेधी प्रतिसाद देणं अशा ad hominem (of an argument or reaction) directed against a person rather than the position they are maintaining. अत्यंत अयोग्य आहे. तुमचं मत अधिकाधिक ससंदर्भ व भावनिकता टाळुन असेल शक्त तितकी ( सहज संवेदना सोडुन चा उर्वरीत भाग ) तितकी चर्चा वाद अधिकाधिक चांगल्या पातळीवर जातो. त्याने सहभागी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभच होतो. अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री चा ऑप्शन नेहमीच ओपन आहे. पण....

In reply to by मारवा

आपण सर्व भावनाशील आहोत कधी ना कधी रागावतो संयम हरवुन बसतो आपण सर्व स्खलनशील आहोत. भावनिक प्रतिसादाचा अनादर नाहीच. मात्र नेहमीच आपण आपल्या भावनांवर नियंत्रण न ठेवता प्रतिसाद देत असु तर त्यात अर्थ राहत नाही. नैसर्गिक भावभावनांच्या आहारी जाण्यात राग लोभा इ. प्रेरंणामधुन आलेल्या नैसर्गिक उत्स्फुर्त प्रतिक्रीयांचे एक आपले महत्व आहेच. मात्र अखेर विवेकी संयमी प्रतिसादाच योग्य आहे. त्यानेच एकुण संवाद प्रक्रियेला काही तरी अर्थ राहतो नाही तर त्यातुन काही अर्थपुर्ण मंथन होण्याची शक्यताच राहत नाही.

In reply to by मारवा

भावनाची व्याख्या काय? अनादराची व्याख्या काय? त्याशिवाय, अध्यात्माची व्याख्या कळत नसताना शिकके मारायला आधी कोण आले? समन्वय किंवा विरोध म्हणजे नक्की काय करायचय? तो काय लोकशाही विरुद्ध हुकुमाशाही, किंवा कल्याणकारी हुकुमशाही किंवा समाजवादी लोकशाही सारखा प्रकार आहे का? माझ्या मते ही तुलना ऍप ल्स वर्सेस ऑरेंज सुद्धा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो. तेच हे! सुप्रसिद्ध शब्दकोडीकार प्रा.य.ना.वालावालकर. अनेक श्रद्धांध व श्रद्धाळू लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे लेखन ते करतात.मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही? http://mr.upakram.org/user/78/track इथे त्यांचे लेखन वाचता येईल

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत .
अध्यात्माबाबत यनावाला यांची काही मते चुकली आहेत. काही ठिकाणी ते ज्याला अध्यात्म म्हणत आहेत ती खरे तर "धार्मिकता" आहे. विज्ञानाच्या बाबतीत मात्र मी तुमच्याशी असहमत आहे. यनावालांनी मांडलेल्या विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल.
आता तुमच्या प्रत्येक ओवीला उत्तर दिले असते पण सगळीच स्वमतांध दांभिक लोक कसे एकांगी मताला चिकटुन रहातात हे कैक वेळा पाहण्यात आलेले आहे म्हणुन उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही .
तुमचे आवडते वाक्य आठवले, I don't hate in the plural. अध्यात्म आणि धार्मिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र काही व्यक्ती धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात आणि अध्यात्म बदनाम होते. दुर्दैवाने यात स्वतःला अध्यात्मिक समजणारे अधिक आहेत. बाबा, महाराज, बुवा, बापू यांच्या नादी लागणारे, त्यांचे बिल्ले खिशाला अडकवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात. काय करू नये, काय करावे याबद्दल दोन हजार वर्षांपूर्वीचे लोक अडाणी नसतील इतका अडाणीपणा दाखवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात.

In reply to by सतिश गावडे

धन्यवाद सर :) आपण चर्चेत सहभाग नोंदवल्याने छान वाटले :) स्वमतांध दांभिक लोकांशी चर्चा करण्याचा खरच कंटाळा आलाय , पण आता आपण चर्चा करीत आहात तर काही तरी मजा येईल :) काही मोजक्या ओव्यांची जरा चिकित्सा करुया :
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
जगातील बहुसंख्य जनता आजही धार्मिकच ( नॉट अध्यात्मिक) आहे , ख्रिश्चन मुस्लिम ज्यु लोक डार्विनचा सिधांत जाणतात ? चायनिज लोक आजही वाघ अन अन्य प्राण्यांच्या हाडांचा औशदात सर्रस वापर करतात , ते विज्ञानाची विश्वासार्हता जाणत्तात ? सामान्यजनता विज्ञानाची विश्वासार्हता जाणते हा क्लेम अपुर्‍या आणि बायसड सँम्पल वरुन काढला आहे ! सामान्यभारतीय लोअकं आणि विज्ञानाची विश्वासार्हता जाणणे ... हा तर विषयच सोडुन द्या . तसेच विज्ञान तत्वांची सत्यता वादातीत हा ही क्लेम चुकीचा आहे कारण सत्यता हे टाईम रीलेटेड वेरीयेबल आहे ज्याला आपण विज्ञानवादी आज सत्य मानतो ते उद्या सत्य असेलच असे नाही उद्या ते १००% वादग्रस्त ठरणार ! ( आपल्या चर्चेत आधी एकदा आलेला विषय : सिगंद फ्रॉईड ची मते आज सर्वत्र वादातीत आहेत का ? किंव्वा त्याच्या काळात तरी सर्वत्र वादातीत होती का ? )
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
कोण म्हणते की विज्ञानात श्रध्दा नसतात . गणिताच्या भाषेत ज्याला ज्याला अ‍ॅक्झियम्स म्हणतो ते श्रध्दा नसते तर काय ? मी नेहमी विचारतो तो प्रश्ण की जे अ‍ॅटम चे मॉडेल आज जवळपास सर्व विज्ञानजगताने मान्य केले आहे तसा अ‍ॅटम कोणी तरी पाहिला आहे का हो ? पाहणे शक्य आहे का हो ? श्रधा विज्ञान आणि अध्यात्म दोहोंत लागते ! श्रध्दा न टिके जिथे तर तर्क हा ही बर्‍याच अंशी संशयास्पद क्लेम आहे मागे ब्यॅटमॅन ने सुचवलेली ही लिन्क पहा : सार्‍याच सत्य असलेल्या गो ष्टी पुराव्याने सत्य आहेत असे सिध्द करणे शक्य नाही !!!! https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी ।
आता अध्यात्मते निरुपयोगी असे म्हणणे स्वमतांधता नाही काय ? मला एखादी गोष्ट उपयेगी वाटत नसेल तर ती सर्वांसाठी निरुपयोगी ठरते का ? अध्यात्म माझ्या साठी निरुपयोगी असे यनावाला म्हणाले असते तर ते योग्य ठरले असते ना ! शिवाय विज्ञानही कायमच समाज उपयोगी असते हा क्लेमही चुकीचा आहे , विज्ञानही काही वेळा उपयोगी आणि काही वेळा समाजघातक असते . वरील ओवी हे जे २ युनीव्हर्सॅलिस्ट क्लेम करीत आहेत ते तर्काच्या कसोटीवर टिकणारे आहेत का ?
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक ।
अध्यात्म तत्त्वे अतार्किक हे पहा परत तसाच क्लेम स्वतःला तर्क समजला नाही म्हणुन तो सार्वजनीन रित्या अतार्किक ठरतो का ?
ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
आँ ? http://belurmath.org/ http://ssy.org/ http://www.artofliving.org/in-en http://www.tm.org/enlightenment http://www.chinmayamission.com/ http://www.kriya.org/ http://www.osho.com/ http://www.divyayoga.com/ आणि अशा अनेक हजारो संस्था कार्यरत आहेत आजही ! ह्यांचे कार्यजर अजिबातच समाज उपयोगी नसते तर ह्या चालु राहिला असत्या का ?
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
बरं . नाशिकच्या कुंभमेळ्याला किमान अर्धा एक कोटी असे लोक आले होते की अध्यात्माच्या ( भले मग त्यांच्या लेखी त्याचा काहीही अर्थ असो ) आधारे सुखकर जीवन जगत आहेत , त्यांना का बरे विसरलात ? अध्यात्माच्या आधारेही अत्यंत सुखकर जीवन जगता येते. पहा thoreauvian simple living . शिवाय आपला आवडता मार्कस ऑरेलियसही काय सांगतो : Very little is needed to make a happy life; it is all within yourself, in your way of thinking. http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marcusaure386395
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
ही परत स्वमतांधता ! हे पहा समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे : माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥ http://satsangdhara.net/db/D05.htm कोणीही सच्चा अध्यात्मिक माणुस आपल्याला अहंब्रह्मास्मि ह्या मंत्राचा जप करताना सापडणार नाही ! शिवाय अज्ञात्मासि समाजकारणासी देणे घेणे नसते असे म्हणणे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील पाचही महान संतांच्या समुळ जीवनकार्याकडे दुर्लक्ष करण्या सारखे आहे ! जास्त काही नको फक्त ... भर वाळवंटात महाराच्या पोराला कडेवर उचलुन घेणारे एकनाथ महाराज आठवा फक्त !!
परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
ही परत स्वमतांधता ! संसार हा असार असे कोण म्हणाले ? उगाचच काही तरी . नुकतीच मी ईशावास्योपनिषदातील पहिले दोन श्लोक एकेठिकाणी क्वोट केले ते पहा : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! हे वाचुन तुम्हाला वाटते की अद्यात्म हे संसार असार आहे असा उपदेश करते ???
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
परत स्वमतांधता ! कंटाळा अला राव किती उदाहरणे शोधुन द्यायची ... हे घ्या अजुन : ॐ सहना भवतु, सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै । तेजस्वीनावधीतामस्तु माविद्विषावहै ॥ किंवा हे घ्या ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।। स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि::। व्यशेम देवहितं यदायु:।1। हे वैदिक शांति मंत्र आहेत अगदी दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे ! ह्यात कोठे बरे आहे मोक्षाचा उल्लेख ... हे श्लोक तर सरळ सरळ ऐहिक भौतिक सुखांकडेच निर्देश करणारे आहेत ना ! समस्त भगवद्गीतेत भगवंताने कर्मत्यागा(सन्यासापेक्षा) पेक्षा कर्मफलत्याग ( अर्थात कर्मयोग) श्रेष्ठ असल्याचे कित्येक वेळा सांगितले आहे ... पण वाचलेच नाही तर कळणार कसे ?
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
जाउं दे आता अजुन काय बोलणार ... त्यांनी एकदा मनाचा पुर्वग्रह करुनच घेतला आहे तर कितीही समजावुन सांगितले तरी त्यांना पटणार नाही . शिवाय वया बरोबर माणसांच्या धारणा दृढ होत जातात पुढे पुढे त्या बदलणे अवघड असते हेही मला कळुन चुकले आहे ! त्या मुळे आधीच्या प्रतिसादात जास्त काही वोललो नव्हतो , असो. इति शम अवांतर : पहिल्या प्रतिसादातही यनावाला ह्यांचा अपमान करण्याचा कोठेही उद्देश नव्हता , माझ्या प्रतिसादात योजलेले शब्द आणि मते ही केवळ त्यांच्या ओव्यांवरुन त्यांचया विषयी बांधलेल्या अंदाजाने व्यक्त केलेली होती . कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत टिपण्णी आणि चिखलफेक करायचा उद्देश नव्हता . कोणाला तसे वाटले असल्यास ह्या दीर्घ प्रतिसादाच्या निमित्ताने गैरसमज दुर करु इच्छितो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी प्रतिसादाबद्दल काही मत नाही, फक्त ते अ‍ॅटम दिसण्याबद्दल लिहितो. काही नॅनोमीटर साईझचे मोलेक्यूल्स दिसतात मायक्रोस्कोपमधून. लहान ऑब्जेक्ट्स पाहण्यातला प्राब्ळम म्हणजे तेवढ्या कमी वेवलेंग्थचा अर्थात जास्त पावरचा फोटॉन सोडावा लागतो आणि तितक्या पावरच्या फोटॉनमुळे अ‍ॅटम वगैरेला एनर्जी जास्त मिळते आणि तो जास्ती डिस्टर्ब होतो, सबब पोझिशन नक्की ठरवता येत नाही. अनसर्टण्टी प्रिन्सिपल अठवा. तरी किमान तिथपर्यंत तरी गेलेत. इन्शागणपती पुढेही जातील अजून.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन, अनिश्चिततेचं तत्त्व आधुनिक पुंजवादाचं मूलभूत अंग आहे. सृष्टीच्या व्यापारांत अनिश्चितता असायलाच हवी हा पुंजवादाचा आग्रह आहे. कितीही प्रयोग केले तरी संपूर्णपणे अचूक मोजमापे काढता येत नसतात. हे यनावाला यांना माहीत नाही. प्रस्तुत ओव्यांत कळकळ आहे, पण समज नाही. तशी विकसित झालेली पाहायला आवडेल. आ.न., -गा.पै.

अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?
अध्यात्मी महत्व मोक्षाला | शब्द जरी मोक्ष योजला || भ्रमीत वैज्ञानीक झाला | विज्ञान आगळेची राहिले || वैज्ञानीकाला भ्रम झाला | प्रगतीच्या मागे धावला || समाधान अंती असे फक्त चित्ताला | सुधरेचना त्याला || विज्ञानही शोधती मोक्ष | मान्य न करे परी थकीत || मोहुन भौतीक प्रगतीच्या त्या बलाला | भ्रमला यानावाला यानावाला ||