प्रिटी वूमन - भाग ४

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
25 Aug 2008 - 3:17 pm

प्रिटी वूमन - भाग १ - http://www.misalpav.com/node/542

प्रिटी वूमन - भाग २ - http://www.misalpav.com/node/548

प्रिटी वूमन - भाग ३ - http://www.misalpav.com/node/555

चम चम करता है ये नशीला बदन....

हे गाणे सुरू झाले तसे मर्जिनाने आपल्या केसाची क्लीप काढली आणि जवळच उभ्या असलेल्या वेटरच्या हातात दिली. मानेला एक हलकासा झटका देऊन तिने आपले सांबसडक केस मोकळे सोडले आणि एक डौलदार गिरकी घेऊन नाचायला सुरुवात केली. अपेक्षेप्रंमाणे थोड्याच वेळात तिच्या अंगावर नोटांची पखरण होऊ लागली.

समोरील तिसर्‍या रांगेत प्रवीणशेठ बसला होता. त्याचे हे आवडते गाणे. ह्या गाण्यावर हजारभर रुपये तरी तो उधळणारच ह्याची मर्जिनाला खात्री होती. तिने हळूच स्टेजच्या दुसर्‍या टोकाला उभ्या असलेल्या स्वीटीकडे पाहिले. स्वीटीच्या नजरेतील असूया तिला अधिकच सुखावून गेली!

पन्नाशीच्या घरातील प्रवीणशेठ हा स्वीटीचा पूर्वीचा "दोस्त". पण गेल्या काही महिन्यांपासून तो मर्जिनाकडे आकृष्ट झाला होता. सोनेरी काड्यांचा चष्मा, दोन्ही हातातील दोन-दोन बोटात आंगठी आणि गळ्यात एक जाडसर चेन घालणारा प्रवीणशेठ हा दहा-बारा दिवसांतून एक चक्कर तरी टाकयचाच. आणि तो आला की किमान सात-आठ हजाराची कमाई निश्चित, हे मर्जिनाला ठाऊक होते.

पण गाणे संपता संपता मध्येच थांबले. म्युझिक बंद झाले. हॉलमधला एक विवक्षित लाईट लागला आणि सगळे वेटरही सावध झाले. हा संकेत सगळ्या मुलींना बरोबर समजत होता. सगळ्याजणी धावत धावत किचनच्या दिशेने जाऊ लागल्या.

किचनच्या बाजूलाच अजून एक खोली होती. जेमेतेम दहा बाय दहाच्या त्या खोलीत आता वीस-पंचवीस मुली कोंबून उभ्या राहिल्या. लाईट नाही की पंखा नाही. कोणी आवाजदेखिल करायचा नाही. मोबाईल बंद करायचे आणि चुपचाप उभे राहयचे. किती वेळ? सांगता येत नाही. कधी पाच-दहा मिनिटे तर कधी तासभरदेखिल. पोलीसांची रेड कितीवेळ टिकते त्यावर सगळे अवलंबून!

कधी कधी तेही नशिबात नसतं. मग पोलीस हाताला लागतील त्या चार-पाच मुलींना पकडतात आणि गाडीत कोंबून चौकीवर नेतात. तिकडे दोन-चार तास डांबून ठेवून मग नाव, गाव, पत्ता आणि वय लिहून घेतात आणि सोडतात. मग दुसर्‍या दिवशी अनाडी कोर्टात जायचं. तिकडे "गुन्हा कबूल" म्हणायचे. मग तो खुर्चीवरचा साहेब दंडाची रक्कम सांगतो. हॉटेलचा माणूस पैसे घेऊन आलेलाच असतो. तो पैसे भरतो. मग दोन-चार दिवस हॉटेल बंद आणि नंतर पुन्हा सगळे काही सुरळीत!

दहा-पंधरा मिनिटातच कडी काढल्याचा आवाज आला तशा सगळ्या मुलींना हायसे वाटले.

ती परत हॉलमध्ये गेली. प्रवीणशेठ अजून बसलेलाच होता. तिथून ती गेली ते थेट प्रवीणशेठच्या टेबलजवळ. त्याच्या हातातील शंभराची नोट घेण्यासाठी तिने हात पुढे केला. नोट देता देता त्याने तिचा हात किंचित दाबला आणि म्हणाला ,"अच्छा डान्स किया आज...ये ड्रेस तो एकदम चोक्कस है तेरा..".

त्याची तिसरी बियरची बाटली संपत आली होती. त्याची आता निघायची वेळ झाली हे तिच्या आणि चाणाक्ष वेटरांच्यादेखिल लक्षात आले. बिल भरून झाले की, दरवाज्याच्या बाहेर जाईपर्यंत दिसणार्‍या प्रत्येक वेटराच्या हातात टीप दिली जाणार हे त्यांना ठाऊक होते. तेही "स्ट्रॅटेजिक पोझिशन" घेऊन उभे राहिले!

प्रवीणशेठ गेला तशी ती थोडावेळ आराम करावा म्हणून मेकरूमकडे जायला निघाली. जाता-जाता छोटूला एक चहा आणायला सांगितला. कोंदट खोलीत राहिल्यामुळे चेहेर्‍यावर घाम आला होता. पुन्हा एकदा चेहरा धुवून एक हलकासा मेकअप करावा असे तिच्या मनात आले.

तेवढ्यात मेकअप रूमच्या बाहेरून वेटरने हाक मारली, "काजल, निचे बुलाया है. तेरा कष्टमर है".

"कौन कष्टंबर है?"

"हवालदार..."

"ठीक है, आती हूं पाच मिनिट मे"

हा "हवालदार" म्हणजे कुठल्याशा पोलीसठाण्यातील सब-इन्स्पेक्टर! तो हॉटेलात येताना शर्ट बदली पण वर्दीची पॅन्ट आणि बूट मात्र तसेच ठेवी.

चहा घेऊन आलेल्या छोटूच्या हातात तिने पन्नासाची नोट दिली आणि सांगितले, "मनोज भाई को देना. हवालदार आया है."

मनोज भाई म्हणजे गाणी लावणारा कॅसेटवाला. आता कॅसेटी जाऊन काँप्युटरवरच गाणी लावतात तरी त्याला म्हणतात कॅसेटवालाच! कुठल्या मुलीच्या कुठल्या दोस्ताची कुठली गाणी आवडती हे त्याला चांगले ठाऊक आहे. पण समोर नोट आल्याशिवाय तो गाणे लावणार नाही. साहजिक आहे, आवडती गाणी लागली की मुलींना भरपूर कमाई होते. त्यातला थोडासा हिस्सा त्याने घेतला तर कुठे बिघडले? शेवटी त्यालाही संसार आहे, मुले-बाळे आहेत!

मोठ्या आवडीनं झेवाला आयलो, तुझी शिपली देशील का...

हे गाणे लागले तसे हवालदाराचा हात त्याच्या खिशात गेला हे मर्जिनाने आरशात पाहिले. कस्टमरकडे थेट न पाहता त्याला आरशात बघून आजमवायचे, ह्या कलेत ती आता चांगलीच पारंगत झाली होती!

आरशात पाहता-पाहताच तिच्या लक्षात आले की, "तो"देखिल बसला आहे. एका कोपर्‍यात, तिच्या प्रत्येक हालचालीकडे पाहात. शांतपणे. तसा तो महिन्यातून एक-दोनदाच येतो. तेही बहुधा शुक्रवारीच. कचेरीतून थेट येत असावा कारण हातात बॅग असते. एक बियर घेऊन तास-दीड तास बसतो. कधी कुठल्या मुलीला जवळ बोलवत नाही की पैसे उधळत नाही. टॉयलेटमध्ये जातानादेखिल जर वाटेत एखादी मुलगी असेल तर ती हटेपर्यंत तसाच उभा राहतो इतर कष्टंबर प्रमाणे धक्का मारून जात नाही. पण नजरमात्र कायम आपल्यावरच खिळलेली असते. इतर कोणी आपल्यावर पैसे उधळले किंवा हार घातला तर त्याच्या डोळ्यात काही वेगळेच भाव उमटतात. काय असतात ते भाव? कोण जाणे? मला काय त्याचे? मला जवळ बोलवत नाही, पैसे देत नाही, काही विचारत नाही तोवर मी कशाला करू त्याचा विचार?

*******

मर्जिना घरी येईपर्यंत पहाटेचे साडे-पाच वाजले. आज दोन-दोन "दोस्त" आल्यामुळे कमाई चांगलीच झाली होती. तरिही तिला कुठेतरी अस्वस्थ वाटत होते. भूक तर नव्हतीच पण झोपही येत नव्हती. आरशातून दिसणारी "त्याची" ती नजर तिला बेचैन करीत होती. वास्तविक दहा-वीस रुपये देणार्‍या फुटकळ गिर्‍हाइकांकडेतर ती पहातसुद्धा नसे. त्यांना स्पर्शही न करता, नुसत्या बोटांनी वरचेवर नोटा उचलून एक ऐटबाज गिरकी घेऊन ती त्यांच्या टेबलापुढून निघून जात असे. आणि हा तर तेवढेही देत नाही. तरीही ही अस्वस्थता का?

अखेर तिने इयरफोन कानात अडकवले आणि मोबाईलवरील गाणे सुरू केले -

प्रेम जेगेछे आमार मोने, बोलछी आमि ताय
तोमाय आमि भालोबाशी तोमाय आमि चाय

*******

"किती झाले", रिक्षातून उतरत त्याने विचारले. अंधारात मिटर दिसत नव्हता.

"पंचवीस"

"एव्हढे कसे? मीटर ठीक आहे ना?"

"साहेब नाईट रिटर्न पकडून पंचवीस"

"नाईट रिटर्न? आता कुठे बारा वाजताहेत!"

"साहेब रागावू नका पण तुम्ही आलात तिथे तर मोजलेच ना भरपूर पैसे? थोडे आमच्यासारख्याला दिलेत तर काय होईल? बघा..."

पंचवीस रुपये रिक्षावाल्याच्या हातात ठेवून तो इमारतीत शिरला. नाईट लॅचने दरवाजा उघडून तो आत आला. घरात सगळे निजले होते. आज का कुणास ठाऊक त्याचे मन थार्‍यावर नव्हते. टेबलावर मांडून ठेवलेले जेवण त्याने तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि कॉटवर पडला. झोप येत नव्हतीच. तसाच उठून तो हॉलमध्ये आला. लाईट लावला. समोरील टीपॉयवर त्याचे आवडते सुरेश भटांचे पुस्तक होते. त्याने एक पान उघडले आणि वाचू लागला -

मनातल्या मनात मी, तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता, तुझा वसंत रोज पाहतो.

******* ******* *******

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2008 - 4:53 pm | बिपिन कार्यकर्ते

मनिष, हा भाग टाकायला खूप उशिर केला. कंटीन्युईटी साठी आधीचे भाग वाचून मग हा भाग परत वाचला. जमला आहे. खूपच इंटरेस्ट येतोय वाचायला. आता पुढचे भाग पटपट टाका.

बिपिन.

अंकुश चव्हाण's picture

25 Aug 2008 - 7:35 pm | अंकुश चव्हाण

लेखन सुन्दरच झालय. आधिचे भाग वाचले नव्हते तेहि वाचले. आणि आत प्रतिक्शा आहे पुढच्या भागाची...

धन्यवाद,

अंकुश चव्हाण.

स्वाती दिनेश's picture

25 Aug 2008 - 7:46 pm | स्वाती दिनेश

हा भाग बराच उशीरा आला..(त्यामुळे आधीचे भाग परत रेफरन्ससाठी वाचले.:))पण.. देर आए दुरुस्त आए! आता प्रिटी वुमनची कहाणी सुरू झाली असे वाटते.पुढच्या भागांना मात्र उशीर करू नका बुवा..
कथा आवडत आहे हे वेसांनल.
स्वाती

मनस्वी's picture

26 Aug 2008 - 4:20 pm | मनस्वी

मस्त लिहिलंएस.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

ऋषिकेश's picture

26 Aug 2008 - 4:39 pm | ऋषिकेश

हेच म्हणतो.. येउ द्या लवकर पुढील भाग
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु's picture

25 Aug 2008 - 7:47 pm | प्राजु

काही संबंध लागण्यासाठी आधीचा भाग वाचावा लागला.
पुढचे भाग लवकर टाका. नाहीतर पुन्हा विस्मृतीत जातील आधीचे भाग.
हा भाग आवडला हे सां न ल.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कोलबेर's picture

25 Aug 2008 - 10:20 pm | कोलबेर

सुनिलराव कथा पुन्हा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही केलेले एकदम 'डिट्टेल वर्णन' वाचुन थक्क झालो. एका वेगळ्याच दुनियेत घेउन जाते आहे कथा..पुढचे भाग लवकर येउ द्यात!

limbutimbu's picture

26 Aug 2008 - 1:19 pm | limbutimbu

अरे याच पुस्तक बनवुन पब्लिश करा
इथे काय? माझ्यासारखे फुकटे वाचून वाहवा करणार अन ह्या गोष्टी अर्काईव्हमधे गाडल्या जाणार!
प्रयत्न करा पुस्तक पब्लिश करण्याचा, जरुर होईल!
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

सुनील's picture

26 Aug 2008 - 3:48 pm | सुनील

अरे लिंब्याटिंब्या, इथे फुकटात आहे म्हणून चार लोकं वाचताहेत तरी. दमड्या मोजून कोण वाचणार माझं चोपडं?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

limbutimbu's picture

26 Aug 2008 - 5:23 pm | limbutimbu

अरे गैरसमज हे तुझा, चान्गल्या लायकीच लिखाण दमड्या मोजुनही वाचतात बर लोक!
अन हे वरच लिखाण त्या लायकीच झाल हे म्हणुन सान्गितल! :)
पुस्तक काढायच बघाच राव! :)
अगदी नाहीच जमल तर प्रथितयश दिवाळीअन्काला पाठवा!

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

सुनील's picture

26 Aug 2008 - 7:06 pm | सुनील

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार !!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Sep 2008 - 4:39 pm | घाशीराम कोतवाल १.२

तु काय झकास स्टोरी लिह्तो आहेस यार एकदम डिटेल आहे मानल यार येवु दे येवु दे

सुनील's picture

27 Sep 2008 - 6:55 pm | सुनील

तुमची पण कमाल आहे मुंबईकर! इतके उत्खनन करून काढलात हा लेख? शेवटचा प्रतिसाद येऊन महिना उलटून गेला होता!

असो, धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2008 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता प्रतिसाद आले म्हणून हा लेख आणि अर्थातच आधीचेही सगळे वाचले. मस्त आहेत. पुढचे भाग टाका लवकर. (सध्यातरी मला हे म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे, असं मीच म्हणते)

अदिती

सुनील's picture

28 Sep 2008 - 6:58 am | सुनील

(सध्यातरी मला हे म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे, असं मीच म्हणते)
नक्कीच आहे!! तुम्ही एवढ्या अवधीत भागांचे शतक गाठले असतेत!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा's picture

27 Sep 2008 - 10:36 pm | यशोधरा

मस्त जमलेत सगळेच भाग! पुढचा कधी??

मृदुला's picture

28 Sep 2008 - 2:56 am | मृदुला

म्हणणे यशोधरासारखेच.