राणीच्या देशात - फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
29 Jun 2015 - 3:41 pm

भाग -१

राणीच्या देशातील बरीच सुप्रसिद्ध ठिकाणं आपल्याला माहित आहेतच पण अशी ही काही प्रेक्षणीय स्थळं आहेत जी फारशी कुणाला माहित नाही किंवा त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. जशी जशी स्थानिक ठिकाणं फिरण्याचा अनुभव घेऊ तसे तसे किंवा इतर अंतर्गत ठिकाणांबाबत माहिती ह्या लेखमालेच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. पहिला भाग हा धरुन पुढच्या भागाची, नव्या जागेची माहिती देण्यास सुरुवात करतेय.

कॅरावॅन हॉलिडेला गेलो असता गेल्या वर्षी आणि ह्या ही वर्षी फ्लॅमबराहला जाणे झाले. स़काळी ब्रेकफास्ट आटपून आम्ही चेक-आऊट केले आणि थेट निघालो फ्लॅमबराहला. स्कारबराह वरुन ए १६५ आणि बी १२२९ वरुन साधारण ४० मिनिटाचा ड्राईव्ह करुन आम्ही फ्लॅमबराहला पोहचलो. फ्लॅमबराह पूर्व यॉर्कशायर मधले, ब्रिडलिंग्टन सिटी सेंटर पासून चार माईल्सच्या अंतरावर वसलेले छोटेखानी पारिश गाव आहे. येथील मुख्य प्रेक्षणीय स्थळं म्हण्जे फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड. तेथे पोहोचताच गाडी पार्क करुन आम्ही सरळ लाईट-हाऊसपाशी गेलो. थोड्याच वेळात टुर सुरु होणार असे आम्हाला सांगितले गेले. लाईट-हाऊसच्या आत जाण्यासाठी गाईडेड टूर घ्यावी लागते व तिकिटाचे दर ही £ ३.८० असे आहेत.

.

फ्लॅमबराह गावात, नवं लाईट-हाऊस व फ्लॅमबराह हेड बघायला जात असताना रस्त्याच्या कडेला आपल्यला दिसते जुने फ्लॅमबराह दीपस्तंभ जे आताशी पूर्णपणे बंद आहे. ह्या लाईट-हाऊसची स्थापना १६९९ साली सर जॉन क्लेटन ह्याने केली. हे दीपस्तंभ कधीच प्रज्वलित केले नव्हते. पूर्वी असे मानले जायचे की ह्या अष्टभुजाकृती दीपस्तंभात प्रकाशासाठी कोळश्याच्या शेगडीचा वापर केला जाई पण ह्या वास्तुचा जेव्हा जीर्णोद्धार केला तेव्हा अश्या कुठ्ल्याच खुणा तिथे आढळल्या नाही आणि म्हणूनचं हे दीपस्तंभ कधीच प्रज्वलित केले नसेल असे मत ठरले. हे दीपस्तंभ किनारपट्टी पासून बरेच आत असल्यामुळे खल्याश्यांना संकेत मिळण्यासही अवघड होत असे.

.

छायाचित्र आंजावरुन साभार

नव्या लाईटहाऊसच्या आत ११९ चक्राकार पायर्‍या चढून वर जावे लागते.

.

नव्या दीपस्तंभाची रचना वास्तुकार सॅम्युएल वायेट ह्यांची आहे व ह्याचे बांधकाम, ब्रिडलिंग्ट्नच्या रहिवाशी जॉन मॅटसनने १८०६ साली केले. त्याकाळी ह्या बांधकामासाठी आलेला एकूण खर्च £ ८००० असा होता. दीपस्तंभाचे बांधकाम पूर्ण व्ह्यायला नऊ महिने लागले होते. ह्या स्तंभाची पुनर्रचना जेम्स डग्लासने केली. दीपस्तंभाच्या सर्वात वरचा कंदिलासारखा आकार आहे त्याची रचना ह्यानेच केली.

.

कंदिलासारखा आकार

१८०६ च्या डिसेंबर मध्ये प्रथम हा दीप्स्तंभ प्रज्वलित केला गेला. २६.५ मीटर उंची असलेला, पांढर्‍या शुभ्र रंगाचा असा हा दीपस्तंभ. ह्याच्या प्रकाशाची उंची भरतीच्या वेळेस ६५ मीटर उंच अशी आहे, प्रकाशाचे कार्यक्षेत्र २४ नॉटिकल माईल्स असे आहे. दीपस्तंभच्या परिसरात चौकोनी पांढरे ब्लॉक्स बांधले आतहे जेथे पूर्वी स्तंभाचे राखणदार राहत असे. अलिकडे ह्या ब्लॉक्सचा हॉलिडे अकॉमडेशन म्हणून वापर केला जातो. वरुन दिसणारे दृश्य मोहक आहे पण कंदिलासारख्या आकारच्या खिडकीमधून आत्ताशी बाहेरचे दृश्य धुरकट दिसते आणि बाहेर जाण्यास परवानगी ही नाहीये.

.

लाईटहाऊस आणि पांढरे ब्लॉक्स

ह्या टॉवरमध्ये प्रथम प्रकाशाची उपकरणे बसवली जॉर्ज रॉबिनसनने. एक मोठा उभा, फिरता प्रकाशझोत बसवला ज्याला स्वतंत्र २१ पॅराबॉलिक परावर्तक, प्रत्येकी सात असे तिन्ही बाजुंनी बसवले. लाल काचा / आरसे सगळ्या बाजूंनी बसवले. फ्लॅमबराह दीपस्तंभ हे जगातले पहिले दीपस्तंभ होते / आहे ज्यात संकेतासाठी रंगीत प्रकाशाचा वापर केला गेला. संकेतासाठी दोन पांढर्‍या लाईट्स चमकवून मग एक लाल लाईट चमकवली जाते. १९४० साली ह्या दीपस्तंभात वीजपुरवठा केला गेला आणि १९९६ साली हे लाईटहाऊस पूर्णपणे स्वयंचलित झाले. ट्रिनीटी हाऊस ह्या लाईट-हाऊसची देखरेख इतर लाईट-हाऊस प्रमाणेच हार्रिच, ईसेक्समधून करते.

.

.

लाईटहाऊसच्या आतिल ऑप्टिक लेन्स

लाईट-हाऊसमधून खाली उतरतानाच्या पायर्‍या.

.

लाईट-हाऊस पासून थोडे पुढे चालत गेले की फॉग सिग्नल स्टेशन येतं. येथे पूर्वी धुसर वातावरणात संकेत देण्यासाठी दर पाच मिनिटांनी रॉकेट सोडले जायचे. त्यानंतर Diaphone हॉर्न्स इमारतीच्या पूढिल भागी बसवला होता. १९७५ साली वीजेवर चालणारा हॉर्न बसवला गेला. त्यानंतर ह्यात ही थोडे बदल करुन फॉग डिटेक्टर बसवला गेला. दर दीड मिनिटांनी दोनदा हा हॉर्न वाजतो. तिथे आत जाण्यास मनाई आहे. लाईट-हाऊस जवळचं फ्लॅमबराह हेड आहे.

.

फॉग सिग्नल स्टेशन

फ्लॅमबराह हेड फिली आणि ब्रिडलिंग्टनच्या ईशान्येला समुद्रकिनारी उभे असलेले व्हाईट चॉक आणि सेडीमेंटरी रॉक क्लिफ आहे.

.

फ्लॅमबराह हेड जवळ सेलव्हिक्स बे आहे, बेच्या उत्तरेला बेम्पटन क्लिफ्स आहेत, जवळचं आर्क आहे तर दक्षिणेला स्टॅक आहे. क्लिफ उतरून खाली जाण्यासाठी पायर्‍या व पायवाट असे दोन्ही आहेत.

.

बीचचा किनारा बराच खडकाळ आहे व ओहोटीच्या वेळी तळाला चॉक / चुनखडीचे थर लांबच्या लांब पसरलेले दिसतात. क्लिफच्या तळाशी समुद्राच्या लाटांमुळे किनार्‍यावर चिकणमातीचा व शेवाळ्याचा थर जमला आहे.

.

.

इथे वेग-वेगळ्या प्रकारे, आडवे-तिडवे चॉकचे थर आहेत.

.

.

वेव्ह-कट नॉट्च

क्लिफच्या टोकावर १८.००० वर्षापूर्वी पासूनचा टिलचा थर म्हणजेच ग्लेशियल डिपॉझिटचा थर आहे. फ्लॅमबराह हेडच्या आत अनेक गुफा, कमानी तयार झाल्या आहेत. समुद्राच्या लाटा भरतीच्या वेळेस उभ्या कडांवर आदळतात, त्यामुळे हलके झालेल्या, कमकुवत असलेल्या चुनखडीची झिज होऊन गुफा तयार होते. आडव्या असलेल्या चुनखडीच्या थरावर उभ्या रेषा तयार होतात आणि तो भाग हलका, पोकळ होऊ लागतो. क्लिफवर जिथे खडू ढासळून बाहेर पडू लागतो तिथे हळू-हळू कमान तयार होते. ही कमान जर कमकुवत होऊन ढासळली तर त्या थराचा खांब तयार होतो ज्याला स्टॅक असे म्हणतात.

.

स्टॅक - बेरील नुक

.

नॉर्थ लँडिंगवरुन दिसणार्‍या गुहा

फॉग सिग्नल स्टेशनवरुन दिसणारे लाईट-हाऊस

.

ह्या फ्लॅमबराह हेड वर अनेक समुद्रपक्ष्यांची वसाहत आहे. उन्हाळ्यात हजारो प्रकारचे पक्षी जसे सीगल, पफीन्स, fulmars, kittiwakes येत असतात, त्यांना बघायला खासकरुन लोकं येथे येतात. दुरुन कॅमेर्‍यात सीगल टिपण्याचा प्रयत्न केलाय.

.

सेलव्हिक्स बेवरुन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणारे आजी-आजोबा.

.

ह्या अप्रतिम सौंदर्याने मोहून गेलो होतो, बरेच फोटो ही काढून झाले. आता हळू-हळू वर चढाई सुरु केली, थोडीशी दमछाक झाली पण मज्जा आली. लाईट-हाऊसच्या आवारातच, एक मोठे कॅफे - बार आहे जिथे खाण्या-पिण्याची उत्तम सोय आहे. भुक ही लागली होती, वर येऊन बार्बेक्यु टोस्टेड पनीनी, स्वीट चिली चिकन बगॅट व बनोफी पाय वर यथेच्छ ताव मारण्यात आला.

.

.

.

जवळचं असलेल्या सोव्हेनियर शॉपमध्ये एक फेरी मारली आणि छोटीशी स्मरणवस्तू घेऊन आम्ही प्रसन्न मनाने घरी यायला निघालो. एकंदरीत फ्लॅमबराहची ही ट्रिप पण मस्तं झाली होती.

ह्यातले काही फोटो गेल्यावर्षी इथे आलो असताना काढलेले आहेत तर काही ह्यावर्षीचे फोटो आहेत.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Jun 2015 - 4:20 pm | पद्मावति

अप्रतिम वर्णन आणि फोटो.
राणीच्या देशातील अशा वेगवेगळ्या ठिकाणांविषयी मला फार उत्सुकता होतीच आता या लेखामालीकेमुळे ती पूर्ण होणार आहे.
पु.भा.प्र. आहेच.

जगप्रवासी's picture

29 Jun 2015 - 5:20 pm | जगप्रवासी

शेवटचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं

मस्त माहिती आणि फोटो.राणीच्या देशातली अनवट ठिकाणं माहिती करुन द्यायचं छान काम होतंय तुझ्या या धाग्यामुळे.

स्वाती दिनेश's picture

29 Jun 2015 - 8:20 pm | स्वाती दिनेश

वर्णन आणि फोटो आवडले.
स्वाती

जुइ's picture

30 Jun 2015 - 8:27 am | जुइ

नवीन ठिकाणची माहिती आणि फोटो दोन्ही उत्तम.

पैसा's picture

30 Jun 2015 - 9:38 am | पैसा

मस्त माहिती आणि फोटो! आपल्याकडे अशी जुनी प्रेक्षणीय स्थळे प्रचंड प्रमाणात आहेत. पण मेंटेनन्सच्या नावाने बोंब.

उमा @ मिपा's picture

30 Jun 2015 - 11:53 am | उमा @ मिपा

वर्णन आणि फोटो सुरेख!

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 5:46 pm | कपिलमुनी

छान माहिती आणि फोटो