✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पटलं तर व्हय म्हणा ! !

स
सस्नेह यांनी
Wed, 12/24/2014 - 13:11  ·  लेख
लेख
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे, ‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’ कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली. बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे. आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ. बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही ! आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’ पण बाबा ठाम. ड्रायव्हरला उशीर झाल्याने आधीच त्यांचे डोके तापलेले. ‘तू आणि तुझी आई, दोघी आळशी आहात . यूसलेस ! काय ग, तुझं लक्ष आहे का मुलांवर ? पहिल्यापासून सांगतोय मी ...’ माझ्यासारख्या परक्याच्या पुढ्यात हा कौटुंबिक समरप्रसंग चालल्याने आई कानकोंडी. ...अखेर एकदाचे पुस्तक मिळाले ! मुलगी गेली. मग आई बाबांवर तुटून पडली. 'काय हो, तुम्ही किती लक्ष देता मुलांकडे ? मीच सगळीकडे मरायचं का ? लग्न झाल्यापासून पाहतेय , सारखा नुसत पाणउतारा ...’ इ. इ. मग मुसमुसणे. एव्हाना बाबांचा पारा खाली आलेला. ते निमूटपणे ऐकत असलेले. अखेर मी म्हटले, ‘एक गोष्ट आहे. एका माणसाने एकदा गांधीजींना खूप शिव्या दिल्या आणि निघून गेला. गांधीजींनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या, हे पाहून शेजारचा माणूस म्हणाला, काय हो, त्याने इतक्या घाण घाण शिव्या दिल्या तरी तुम्ही शांत कसे ? गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या ? ... तर तुम्ही दोघांनी आता जे काही ऐकलं, ते स्वीकारू नका म्हणजे झालं !पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !' दोघेही हसू लागले..! सांगायची गोष्ट, आपण प्रसंग इतक्या सिरिअसली का घेतो बरं ? मनुष्यस्वभाव आहे, माणूस रागाला येतो, त्या भरात मनात नसलेलंसुद्धा बोलून जातो. ऐकणाऱ्यानं थोडं ऐकून घेतलं, तर काय बिघडतं ? रागाचा भर ओसरल्यावर रागावणाऱ्याला चूक समजते. अपराधी वाटतं. पण ते तो कबूल करत नाही, क्षमा मागत नाही. ऐकणारा क्षमा करत नाही. तेढ वाढत जाते. का बरं आपण छोट्या छोट्या गोष्टीना प्रतिष्ठेचे बनवतो ? मनात नसताना दुरावा धरतो ? तेढ वाढवतो ? आज इथे मुविंचा धागा वाचला आणि वाटले, इथेही तेच आहे. जे पिंडी ते ब्रम्हांडी ! ...आपण इथे संवादासाठी येतो. रमतो. कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ? तीनेक वर्षे झाली मिपावर येऊन. प्रत्येक सदस्याप्रमाणे मलाही सुरुवातीला टवाळीला तोंड द्यावे लागले आहे. एक स्टेज तर अशी आली की मिपा सोडल्यातच जमा होते. गणपाभौने समजूत दिली. ‘टिकून राहा आणि लिहित राहा. आपोआप इथे मित्र होतील.’ मी उत्तर दिले, ‘पुन्हा इथे काही लिहीन असे वाटत नाही’ ..पण काही दिवसांनी पुन्हा वाचू लागले. वाचत राहिले. प्रतिसादातून व्यक्त होत राहिले. एक दिवशी पुन्हा लिहावेसे वाटले. लिहिले, आणि सर्वांनी भरभरून दाद दिली. ..आणि मग इथे कधी रुळून गेले समजलंच नाही ! नंतर वाद शक्यतो नाहीच झाले. इथलं वातावरण खेळीमेळीचं. पण तरीही कधी कधी ‘ओझी’ निर्माण होतात. माझ्या ध्यान-गुरूंनी एक वेगळा ध्यान-प्रकार सांगितला होता. ‘क्षमा-ध्यान’ ! दैनंदिन जीवनात वादावादी, मतभेद, आरोप-प्रत्यारोप यांच्या भरात बरेचदा मनात असताना आणि नसतानाही कटू शब्द जातात. काट्याचा नायटा होऊन वाद विकोपाला जातात. ..काही वेळाने भान आल्यावर चुका समजतात, पश्चात्तापही होतो. पण क्षमा मागावी तर ‘अहं’ आडवा येतो. , कधी संकोच आडवा येतो तर कधी भिडस्तपणा. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी हे क्षमा ध्यान करायचं. काही नाही, डोळे मिटायचे आणि दिवसभरातले असे प्रसंग स्मरायचे, की ज्यात आपण कुणालातरी दुखावलं आहे, कुणीतरी आपल्याला दुखावलं आहे. आणि ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची. आणि ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांनाही क्षमा करायची ! बघा आता किती शांत झोप लागते ! मलाही आज इथे हे क्षमा ध्यान करावसं वाटलं. इथल्या सगळ्या सुहृदानी, ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा ! आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...! आमेन...! कसं काय, मग, पटलं तर व्हय म्हणा ! !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18100 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

व्हय

एस
Wed, 12/24/2014 - 13:14 नवीन
व्हय म्हाराजा! चला म्हटलो 'व्हय'! :-) (लेख आवडला, नेहमीप्रमाणेच!)
  • Log in or register to post comments

व्हय व्हय काकु

पियुशा
Wed, 12/24/2014 - 13:23 नवीन
व्हय व्हय काकु आक्शी मनातल लिवलय बगा तुमी :)
  • Log in or register to post comments

व्हय जी !

मदनबाण
Wed, 12/24/2014 - 13:26 नवीन
व्हय जी ! :) बाकी कोल्हापुरी मुली म्हणजे साक्षात "भवानी" ! डायरेक्ट कोथळा काढण्याची क्षमता ठेवुन आहेत हे हल्लीच समजले आहे ! :P मग मिपा सोडण्याचा इचार ! छ्या मस्त तांबडा-पांढरा रस्सा ओरपायचा आणि सगळी "आग" द्यायची उगा त्रास देणार्‍याच्या मागे सोडुन ! :P { भंडग भेळ आणि चोरगे मिसळ प्रेमी} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant
  • Log in or register to post comments

पटलं पटलं !!!!

मितान
Wed, 12/24/2014 - 13:43 नवीन
पटलं पटलं !!!! पण हे सोपं नाही हे नक्की ! :)
  • Log in or register to post comments

व्हय गं व्हय!पण सगळ्यांना माफ

अजया
Wed, 12/24/2014 - 13:48 नवीन
व्हय गं व्हय!पण सगळ्यांना माफ करणं!! हम्म...
  • Log in or register to post comments

सगळ्यांना माफ करणं!!

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 13:58 नवीन
दुर्लक्ष करा... (आता हा उपाय कुणी सांगीतला, ते विचारू नका.पण ज्या मिपाकराने सांगीतला, तो मी मनापासुन ऐकला आणि निदान मला तरी फायदाच झाला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

(No subject)

अजया
Wed, 12/24/2014 - 14:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आम्हाला तर फार आधीच पटलंय....

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 13:56 नवीन
म्हणून तर तो धागा काढला... चार कुचाळकी करणार्‍या टाळक्यांकडे सरळ दुर्लक्ष करायचे. येतील ती चार माणसे, करतील थोडी उचका-उचकी आणि कुणीच सापडत नाही म्हणून जातील निघून. पालथ्या घड्यावर पाणी ओतत बसण्यापेक्षा, एखाद्या कोमेजलेल्या झाडाला चार तांबे पाणी घालू या.
  • Log in or register to post comments

मुवि, कधीकधी पालथा घडा

मितान
Wed, 12/24/2014 - 14:08 नवीन
मुवि, कधीकधी पालथा घडा वाजवण्यात पण वेगळीच मज्जा असते. ;) बाकी पाणी घालण्याबाबत +१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

व्हय गं व्हय

सविता००१
Wed, 12/24/2014 - 14:06 नवीन
पण ते तुझं क्षमा-ध्यान....... अवघड आहे गं. :(
  • Log in or register to post comments

+लाख मोलाची बात

नाखु
Wed, 12/24/2014 - 14:09 नवीन
कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ?
बघू यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे???
  • Log in or register to post comments

लैइइइइ भारी "कोल्हापुरी" लेखं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/24/2014 - 14:34 नवीन
लैइइइइ भारी "कोल्हापुरी" लेखं...आवडेश आणि पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

पटल पटल अगदी...पटल

कच्चा पापड पक्…
Wed, 12/24/2014 - 14:56 नवीन
पटल पटल अगदी...पटल
  • Log in or register to post comments

आक्शी एकदम पटलं बगा….

भावना कल्लोळ
Wed, 12/24/2014 - 15:00 नवीन
आक्शी एकदम पटलं बगा….
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय ताई.

उमा @ मिपा
Wed, 12/24/2014 - 16:02 नवीन
छान लिहिलंय ताई. अगदी बरोबर सांगितलंत . . . पण कठीण आहे. क्षमा ध्यान. हमखास लागू पडणारा उपाय ठरू शकतो... निदान आपल्यापुरता.
  • Log in or register to post comments

आवडलं

दिपक.कुवेत
Wed, 12/24/2014 - 17:01 नवीन
आणि पटलं सुद्धा. क्षमा ध्यान चा उपाय मस्त....सुरवात तर करुन बघतो.
  • Log in or register to post comments

न्हाई

काळा पहाड
Wed, 12/24/2014 - 17:21 नवीन
न्हाई
  • Log in or register to post comments

न्हाईतर सोडा ! आग्रेव न्हाई

सस्नेह
Wed, 12/24/2014 - 21:42 नवीन
न्हाईतर सोडा ! आग्रेव न्हाई *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तसं नै ओ तै. उगीच आपली गंमत

काळा पहाड
Wed, 12/24/2014 - 22:22 नवीन
तसं नै ओ तै. उगीच आपली गंमत केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

"वाक द टाक" व्हतं की न्हाय

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/24/2014 - 22:49 नवीन
"वाक द टाक" व्हतं की न्हाय त्ये टराय करून बगत व्हता व्हय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ओ

इरसाल
Wed, 04/27/2016 - 13:23 नवीन
सोडा नसला म्हंजे निसतंच पिवाचं का ?...नीट का काय त्ये ????? सही.... "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्त लिहिलंस!

पैसा
Wed, 12/24/2014 - 17:25 नवीन
अगदी मनापासून पटलं. कठीण वाटेल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे!
  • Log in or register to post comments

पटलं पटलं.अक्षी शंभर

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 12/24/2014 - 17:25 नवीन
पटलं पटलं.अक्षी शंभर टक्क्यांनी पटलं.म्या तसच करतुया जी.
  • Log in or register to post comments

नाही पटलं ?तुटेल इतकं

कंजूस
Wed, 12/24/2014 - 17:50 नवीन
नाही पटलं ?तुटेल इतकं वाकवायचं कशाला ?
  • Log in or register to post comments

छान विचार मांडलेस, कालच

सखी
Wed, 12/24/2014 - 18:29 नवीन
छान विचार मांडलेस, कालच विचारणार होते नविन काय लिहतेस का आणि आज हा मौलिक विचार - सुरवातीपासुन आवडलं, पटलं.
  • Log in or register to post comments

लेख आणि विचार आवडले

बहुगुणी
Wed, 12/24/2014 - 18:45 नवीन
मुविंचं लिखाणही आवडलं होतंच. जाहिरात नाही, पण थोडासा याच विषयावरचा मी इथे लिहिलेला "वाद-संवाद" हा अनुवादात्मक लेख आठवला....
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन.

प्रचेतस
Wed, 12/24/2014 - 19:34 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन. आवडलं अर्थात.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन ! मनोगत चपखलपणे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/24/2014 - 20:04 नवीन
सुंदर लेखन ! मनोगत चपखलपणे व्यक्त केलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

(No subject)

सस्नेह
गुरुवार, 12/25/2014 - 07:18 नवीन
*smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त लेख. मि पावकरांनी

विवेकपटाईत
गुरुवार, 12/25/2014 - 18:06 नवीन
मस्त लेख. मि पावकरांनी वर्षातून एक दिवस क्षमा दिवस घोषित करावा. १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असतो (आंग्ल दिनदर्शिकानुसार). हा दिवस आपण 'क्षमा दिवस' घोषित करावा. या दिवशी आपण सर्वांनी आपल्या लेखांमुळे दुखावलेल्या वाचकांची माफी मागावी. कसा वाटतो विचार
  • Log in or register to post comments

शुध्धीत असतील तरच

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 18:30 नवीन
शुध्धीत असतील तरच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

खरं म्हणजे तर्र असतील तरच

काळा पहाड
गुरुवार, 12/25/2014 - 23:52 नवीन
खरं म्हणजे तर्र असतील तरच क्षमा मागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स्नेहे

कविता१९७८
गुरुवार, 12/25/2014 - 19:06 नवीन
लाख मोलाचा सल्ला दिलास.
  • Log in or register to post comments

खुप चांगला सल्ला आहे त्ताई.

त्रिवेणी
गुरुवार, 12/25/2014 - 20:52 नवीन
खुप चांगला सल्ला आहे त्ताई. पण काही जणांशी कितीही चांगले वागले तरी सगळे मुसळ केरात जाते.
  • Log in or register to post comments

हे सगळं

सस्नेह
गुरुवार, 12/25/2014 - 22:01 नवीन
करायचं ते स्वतःची ओझी हलकी करण्यासाठी गं, जगाची धुणी धुण्यासाठी नव्हे *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

लेख आवडला

अनुप ढेरे
गुरुवार, 12/25/2014 - 22:28 नवीन
लेख आवडला
ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची.
या ऐवजी त्या व्यक्तिची समोरासमोर माफी मागितली तर चांगलं असं वाटतं.
  • Log in or register to post comments

या ऐवजी त्या व्यक्तिची

सस्नेह
Fri, 12/26/2014 - 13:31 नवीन
या ऐवजी त्या व्यक्तिची समोरासमोर माफी मागितली तर चांगलं असं वाटतं.
बरोबर आहे . पण यात आणखी काही घटक आहेत. वरती म्हटल्याप्रमाणे सरळ माफी मागणे हे बरेचदा ईगो, संकोच किंवा भिडस्तपणा यामुळे जमत नाही. शिवाय माफी देणाराही तितक्याच मोठ्या मनाचा नसेल, तर तो पुन्हा काही दुखावणारे शब्द बोलेल, मग तेढ आणखी वाढत जाईल. स्वत:शी व्यक्त केली, तरी क्षमा ही आपल्या नजरेतून संबंधित व्यक्तीपर्यंत पोचतेच पोचते. शिवाय माफ करणाऱ्याच्या डोळ्याला डोळा भिडवू शकल्याने गैरसमजही रहात नाहीत. हळूहळू मने निवळत जातात. आपण फक्त वाट पहायची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

घ्यायचं नाही. बर नाय घेतं.

स्पंदना
गुरुवार, 12/25/2014 - 23:20 नवीन
घ्यायचं नाही. बर नाय घेतं. :)
  • Log in or register to post comments

आमच्या आगामी सिनेमाची तेवढ्यात जाहिरात...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 12/26/2014 - 15:30 नवीन
आमच्या आगामी "विपश्यना एक्सप्रेस" या चित्रपटातल आम्हीच लिहीलेल हे गाण आम्हाला या निमित्ताने आठवल. डोळे थोडेसे मिटून घेउन, दिवसभरातले प्रसंग स्मरुन, ज्यांना दुखावले ते समोर मानून, मनापासून त्यांची क्षमाही मागून, ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, ज्यांनी दुखावल त्यांना करुन क्षमा, शांत किती झोप लागते पहाना, रोज तुम्ही जर हे केलेत ध्यान तुमचे जालावर वाढतील फॅन, जालिय जगतात हे ज्याला समजेल, तोच मनुष्य इथे टिकून राहिल, इथले रागलोभ मानेल जो खरे, काळजास त्याच्या पडतील घरे, ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हनी माउली धन्य झालो. काळजाचे पानी पानी झाले

मारवा
Wed, 12/31/2014 - 14:53 नवीन
ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन, वा वा वा वाचुन डोला आले पानी पानी पानी पानी पानी पानी ज्ञानोबा ओ ओ ओ ओ ओ हनी माउली की जय हो अमृताते पैजार जिंकले माय मराठी धन्य झाली. लय भारी जुळवल बाबा आवडल आपल्या विपश्यना एक्सप्रेस विषयी अजुन वाचण्यास उत्सुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

न न बानातला ना?

प्यारे१
Wed, 12/31/2014 - 14:54 नवीन
न न बानातला ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

हो बानातला च हो प्यारे जी हनी सिंग अजुन पाणी पाणी असे गात नाही

मारवा
Wed, 12/31/2014 - 21:43 नवीन
हनी सिंग अजुन तरी पाणी म्हणु शकलेला नाही किती शिकवा मेल्याला अजुन काय मराठी शिकला नाही धड. तो पानी पानी असच गातो उदा. गान्यातला न किंवा नान्यातला न ( म्हणजे तुझ्या नानाची टांग मधला नाना नाण्यातला ण नाही ) हनोबा माउलींचा फॅन मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्नेहांकिता जी आपण सर्वच स्खलनशील आहोत

मारवा
Fri, 12/26/2014 - 22:54 नवीन
आपण सर्वच कधी ना कधी भावनेच्या आहारी जातो. चुका करतो प्रत्येकाचा विवेक कधी ना कधी त्याला सोडुन जातो. मला वाटत हे स्वतःच्या बाबतीतील सत्य इतरांना पण लागु आहे याची जाणीव ठेवली म्हणजे पुरे अस वाटत, इट इज बिइंग ह्युमन माझा एक अनुभव सांगावासा वाटतो उदा. जी लोक दारु पितात म्हणजे अगदि निर्व्यसनी परीपुर्ण अचुक कंम्प्लीट मॅन च्या तुलनेत आय मीन कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्खलनशील असतात ती मनाने नेहमीच ऊदार मृदु असतात. त्यांच्यात एक संवेदनशीलता सहसा आढळते. पण जी कर्तव्यकठोर निर्व्यसनी अचुक कधीच कुठेच न कोसळलेली सदैव जितेंद्रीय अशी जी लोक असतात त्यांच्यात एक काठीण्य आढळुन येते. म्हणजे मोहब्बते मधला अमिताभ एक व्हिज्युअल एक्झाम्पल म्हणतोय. किंवा आपला हिटलर बघा तो टीटॉटलर होता पण किती माणस मारली त्याने अशी लोक स्टोन हार्टेड असतात. म्हणजे जितका प्युरीटन तितका तो माणुस अवघड होत जातो जितका स्खलनशील ( म्हणजे आयुष्यात कधी ना कधी चुका केलेला असा) तितका सहसा संवेदनशील असतो. म्हणजे अंडरस्टँडिंग थोडि जास्त असते अशा लोकांमध्ये. ते थोडे मोकळे असतात. अर्थात एक जनरल म्हणतोय सन्माननीय अपवाद आहेतच. आता थोड प्रॅक्टीकल करुन बघतो. मी माझ्या जालीय आयुष्यात कळत नकळत जाणता अजाणता कोणाला दुखावल असेल तर मी या सर्वांची मनापासुन माफी मागतो.
  • Log in or register to post comments

आणि तुम्हाला ज्यांनी दुखावले

सस्नेह
Sat, 12/27/2014 - 07:08 नवीन
आणि तुम्हाला ज्यांनी दुखावले त्यांनापण माफी द्या की हो ! तुमचं निरीक्षण बहुतांश बरोबर आहे. पण पुष्कळ सन्माननीय अपवाद आहेत. म. गांधी, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, बाबा आमटे हे मोठे लोक झाले, पण माझ्या आसपासही असे सहृदयतेचे क्षमाशील अर्णव पुष्कळदा दिसले आहेत. फक्त त्यांना समजण्याइतके आपण संवेदनशील असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

<कुठल्या ना कुठल्या बाबतीत

रामचंद्र
गुरुवार, 05/09/2024 - 02:59 नवीन
<कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्खलनशील असतात ती मनाने नेहमीच उदार, मृदू असतात.> याचा बऱ्यापैकी पडताळा येतो. आणि अतिव्यवस्थित, धार्मिक बाबतीत कर्मठ असे लोक कमालीचे स्वहितदक्ष, आपल्यामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल बेपर्वा असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

एकाच परिस्थितीत

सर टोबी
गुरुवार, 05/09/2024 - 11:14 नवीन
असलेली माणसं देखील त्या परिस्थितीशी निगडित असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत संवेदनशील असतात. सहसा सामान्य मुंबईकराला, कोणत्याही नवीन असणाऱ्या माणसाला मुंबईत सरावणे किती अवघड वाटत असेल याची जाणीव असते. त्याला जमेल तशी मदत करायला बरेच जण सहज तयार असतात. लहान शहरात मात्र असा अनुभव येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मुंबईत नुसता घामच घाम. कसेकाय

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 12:39 नवीन
मुंबईत नुसता घामच घाम. कसेकाय राहतात लोक?? मी तर कधीच सोडून पळालो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

जमलं पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/27/2014 - 09:15 नवीन
पटलंय महाराजा. करचरणकृतं वाककायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वाsपराधम विहितमविहितं वा सर्वमेतत क्षमस्व जय जय करुणाबधे श्री महादेव शंभो. हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन ह्यांच्याद्वारे कळत नकळत जे योग्य अयोग्य अपराध मी केले असतील त्या अपराधांची करुणसागरा महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. अशा एका त्रिकालसंधेतील श्लोकाची आठवण झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

(No subject)

सस्नेह
Sat, 12/27/2014 - 09:46 नवीन
*smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्यांना मी कळत नकळत जर कधी

मनीषा
Sat, 12/27/2014 - 16:02 नवीन
ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा ! आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...! हे जमण्यासारखे आहे. पण जे जाणुन बुजुन वागतात.. बोलतात. त्यांच्या बाबतीत जमणे कठीण.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा