वाड्यात.....२

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
10 Apr 2014 - 3:45 pm

आधीचा भागः

वाड्यात....१

"केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला.

मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची

जाम म्हणजे जाम आठवण झाली.

"चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो.

"मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला.

खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला

आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं.

.......

कंटिन्यूड..

..........

"आलोच" म्हणून फडकेने टॉवेल तर लावला पण तो हात मागे बांधून खोलीतच पिळवटल्यागत इकडून तिकडे फिरायला लागला.

काल्या बोलला, "सगळेजण १२ वाजता थेटरखिडकीवरच मिळूया.. केळकर.. तू डायरेक्ट ये रे आरामात.."

"कुठेशी आहे रे पिक्चर लागलेला?", मी येरझार्‍या घालणार्‍या फडकेला विचारलं.

"श्रीकृष्ण टॉकीज.. एरिया मस्त आहे, तुला आवडेल बघ..", फडके पोटावर तळहात घसाघसा चोळत म्हणाला.

"मस्त एरिया म्हणजे, शहराबाहेर आहे का?"

फडके काल्याकडे बघून नुसताच हसला.

फडके हसतोय म्हणजे तो मस्त एरिया हा रेड लाईट एरिया असणार हे मला समजलंच. हे लोक मला काय बावळभोट समजतात की काय?

"दुपारी जायचं? तुम्ही लोक कामावर जात नाही का?", मला कळेना की हे लोक दिवसभर रिकामचोट असतात का?

"इधर सब लोग ओन्ली स्टुडंट.. पेहले नोकरीवाला था एक. लेकिन गया, अच्छा हुवा गया.."

"क्यूं रे?"

"बहोत बुढा अंकल जैसा बात करता नोकरीवाला लोग स्टुडंट के साथमें..ऑल्वेज जजमेंट..जजमेंट.. ओन्ली स्टुडंट स्टुडंट रेहता तो ही मजा आता.."

"अच्छा.. सगळे स्टुडंट आहात असं वाटलंच नव्हतं.. हा फडके तर एकदम ऑफिसरच वाटला होता..", मी म्हटलं.

"डिस्टर्ब करु नका रे..गपा आता.. मला उशीर होतोय..", फडके कळवळत बोलला. त्याच्या येरझार्‍यांचा स्पीड वाढला होता.

"आमच्या बोलण्याने तुला काय डिस्टर्ब होतंय?", मी विचारलंच.

"उसका प्रेशर चला जाता.. कॉन्सेण्ट्रेशन नही किया तो..", अर्नी बोलला.

"मग तासभर असाच टॉवेल लावून फेर्‍या मारत बसेल.. आणि क्लास चुकेल..", काल्या बोलला.

"आलं.. आलं", असं आनंदाने म्हणत फडके जिन्याकडे गेला.

"दुपारी बाराचा पिक्चर आहे केळकरा साहेबा.. आम्ही वाटण्या काढून करतो सगळं.. येणार तर पंचवीस रुपये दे.. चहा सामोसे धरुन.", काल्या.

मी बॅग उघडून प्लॅस्टिकच्या पिशवीतले पंचवीस रुपये काढून दिले. सुट्टे होते म्हणून बरं.

"कसं यायचं थेटरला?", मी विचारलं.

"सोपं आहे एकदम.. जवळच आहे इथून.. हे बघ.. वाड्यातून बाहेर पडलास की डावी धर. पहिल्या टर्नला उजवा.. मग चौक येईल.. तिथून सरळ खाली ये.. पुन्हा डावीकडे टर्न घेतलास की रस्त्याच्या उजव्या बाजूला पाहात रहा.. श्रीकृष्ण टॉकीज दिसेपर्यंत..", काल्या म्हणाला.

"सरळ खाली म्हणजे?"

"सरळ खाली म्हणजे तिकडून सरळ ये रे.. समजेल तुला तिथे पोचल्यावर.. मुख्य खूण म्हणजे दुपारीही रस्त्याला पोरी उभ्या असतील."

"मला काही त्रास नाही ना?"

"त्या बरोबर माणूस बघूनच बोलावतात.. खिशात पैसे नसलेले त्यांना लांबूनपण कळतात.. तुला कोणी काही करणार नाही.. ये सरळ.. बघत आलास तरी चालेल.. एकदम कॉलेजमधल्यासारख्याच असतात.. बाहेर त्यातली कोणी दिसली एरवी तर तुला वाटणारच नाही तिथली.. फक्त ड्रेसवरुन कळेल.."

दुपारी बाराला शेवटी शोधत आणि विचारतच जावं लागलं. उन्हाने कानफाट बसत होती. अशा वेळी वरुन कढत चहा मारायला मला तरी फार मजा येते. श्रद्धा नाष्टा सेंटर प्रोपा. पेंडसे, असं लिहिलेलं दुकान होतं. चहा गोडमिष्ट एकदम. इडली आणि पोहे यांचा एकेक डबा समोर ठेवलेला अन चहाचा मोठा थर्मास. थंडगार पोहे होते अन दुपार झाल्यामुळे संपलेलेच होते. त्या जाड्या काकांनी भातवाढणीने शेवटचे पोहे बशीत भरुन मला दिले. त्यांनाच टॉकीजचा पत्ता विचारला. त्यांनी पत्ता सांगण्याबदल्यात खापरपणजोबांपर्यंत चौकश्या केल्या. चारदोन हितोपदेशपण केले. पहिल्याच भेटीत त्यांनी मला खिशात टाकलं अन अधेमधे थंड पोहे सोसून यांच्याकडे यायचंच असं मी ठरवून टाकलं.

श्रीकृष्णच्या आसपासचा एरिया वेगळाच होता. मी पाहिलेली लहान गावातली असली वस्ती आणि इथे खूप फरक होता. इथे पोरी एकदम मॉडर्न कपड्यात होत्या. तापलेल्या दुपारीही बर्‍याच मुली आणि मोठाल्या बायकापण बाहेर उभ्या होत्या. तसेही तिथे आम्ही चोरुन पाहातच जायचो..इथेही तेच्यायला तसेच.. थोड्या बायका साडीत पण होत्या.. त्यांनी पदर घेतलेलाच नव्हता. एकीने मला नुसती डोळ्यांनी खूण केली तेव्हा मी दचकलोच जाम.. पण काल्या म्हणाला तसा मी फाटक्या खिशाचा दिसत नाही हे सिद्धच झालं.. काल्याला सांगायचं ठरवून तसाच खालमानेने पुढे जात गेलो.

तिकिटखिडकीला एक जाळीचा पिंजरा होता आणि बैल दाबून घालावा तसा फडके त्यात शिरला होता. काल्यासुद्धा रांगेत होताच. आर्नी आणि मोम्या आपापल्या क्लासेसबद्दल एकदम सिरियस असल्यामुळे आलेच नव्हते. रांग पण चारपाच लोकांचीच. सर्वात पुढच्या रांगेची तिकिटं काढून बेणं पिंजर्‍यातून बाहेर आलं. आता स्क्रीनला चिकटून बसायचं आणि त्यातले मोठाले हिरो हिरॉईन सारखे आपल्या अंगावर चढून येत असल्यागत पिक्चर बघायचा म्हणून तोंडात शिव्या आल्या.. पण त्या गिळल्या.. अजून मी नवीन होतो. परांजप्या डिक्या असते तर त्यांचा जीवच घेतला असता.

फाटक्या सीटचा काथ्या बुडाला बोचत असूनपण पहिल्या सीनला सगळे तरतरीत होऊन बसले होते. पण पिक्चर सुरु होऊन अर्धातास झाला तरी अक्षरशः काहीही नाही. पिक्चरची मूळ कल्पना काल्याची असल्यामुळे फडक्या पलीकडून त्याला पाच पाच मिनिटांनी बोचत होता. पोस्टरवरुन पिक्चरची गॅरंटी कधीच देता येत नाही हे मला नीट माहिती होतं. मागेपण प्रेसिडेंट्स वाईफ बघायला गेलेलो तेव्हा असेच गंडलो. पण या मालिबु मडस्लाईडमधे मी पहिल्यांदाच थेटरात गाढ झोपलो. जबरदस्त पुचाट.

सिनेमानंतर थेटराच्या बाहेरच फडकेने सामोसा सोडून तिकिटाचे पैसे काल्याकडे परत मागितले. काल्याने देत नाही म्हटले तेव्हा फडक्याने पिक्चरचा खीस काढला आणि लगदा केला. तावातावाने वाद घालत गल्ल्याबोळांमधून त्यांच्यासोबत परत आलो तो रस्ता भलताच वेगळा कुठलासा होता. गावाकडे इतका जोराजोरात झगडा करत पोरं चालली असती तर गर्दी जमा झाली असती. इथे रस्त्यातल्या लोकांना काही पर्वा नव्हती. स्वतंत्र झालो म्हणून बरं वाटलं अन केवळ खाज म्हणून मी काल्याची बाजू घेतली.. जाम मजा आली. सर्वजण आपापल्या क्लास लायब्ररीसाठी कुठेकुठे गायब झाले, मी एकटाच शेवटी रूमवर येऊन गाढ झोपलो. गारगार वाड्याची गारगार रूम.

संध्याकाळी अंधार व्हायच्यावेळी आधी फडके आणि मागून आर्नी आला. फडके खालूनच ऐकू येणार्‍या मोठाल्या आवाजात मालकांशी बोलून आला होता. आल्याआल्या तो मला म्हणाला की इथे राहायचं असेल तर लवकर ठरव. मालकांना भाडं टाकू नाहीतर ते रात्री गेस्ट मुक्काम अलाउड करत नाहीत. आजच्यापुरता रहा पण उद्या रात्रीच्या आत काय ते फायनल बोल.

काल्या आणखी बर्‍याच वेळाने आला. त्याच्या अंगात जुनंच जाकीट होतं आणि त्याचं पोट फुगलेलं. आत येऊन खडाडकन कोयंडा बंद केलान आणि जाकिटात हात घालून तो फुगवटा बाहेर काढला. दारुची मोठी चौकोनी बाटली. काल्या आणि आर्नी लगेच समाधानाने हसले. मला थरथरल्यासारखं व्हायला लागलं. हे मला माहीत नव्हतं.

"पैले पैसे काढा आणि मग पेलेपण काढा", काल्या म्हटला.

आर्नी, मोम्या आणि फडक्याने अक्षरशः मोजून तयार ठेवल्यासारखे शर्टाच्या खिशातून पैसे काढून सुरळीरुपात काल्याच्या मुठीत कोंबले. किती पैसे वगैरे प्रश्नच नव्हता, म्हणजे हे नेहमीचंच असणार. मोम्या गप बसला होता.

"केळकरला आज फ्री..", काल्या म्हणाला. "पण नेक्स्ट टाईम नाही हां.."

"अरे मी नाही ड्रिंक्स पीत.. म्हणजे बियर वगैरे ट्राय केलीय पण हे काय आहे? ", मी टेन्शनमधे म्हणालो. थंड डोकं दाखवायला हवं होतं, नायतर मी शाम्या ठरलो असतो.

"फौजी रम.. आपल्याला हीच परवडते..", काल्या बोलला.. "कँटीनमधे आपली सोय आहे.. एकाच्या नावावर मला आणता येते मधेमधे..निम्म्याहून कमीत पडते..".. काल्याच्या चेहर्‍यावर बराच अभिमान वाटला.

कँटीनमधे हे कसं मिळतं कळेना. कसलं कँटीन विचारलं तर जास्तीची शाम्यागिरी झाली असती.

"चला.. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. बसा..", फडके त्याच्या स्टाईलमधे बोलत पेपर खाली पसरुन फत्तकन बसला.

काल्याने त्याच्या जाकिटाच्या खिशातून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली, त्यात नुसता चिरलेला कांदा होता. फडकेने त्याच्या गादीच्या वळकटीत हात घालून लक्ष्मीनारायण चिवड्याचं पाकीट काढलं अन फाडकन ते उघडून पेपरवर उपडं केलं. काल्याने त्यावर कांदा ओतून चिवडला.

आर्नीने तेवढ्यात माठावरचा एक पेला आणि कपाटावर ठेवलेला एक स्टीलचा ग्लास उचलून आणला.

"केळ्या.. कॉटखाली कोपर्‍यात दोन कप असतील बघ.. तुला घे त्यातला एक अन मला पण दे.", काल्याने ऑर्डर सोडली.

"अरे मी नाय रे घेत स्ट्राँग ड्रिंक्स..", मी परत म्हणालो.

फडक्या सिनियर असल्यामुळे त्याला स्टीलचा ग्लास मिळाला होता. त्याने रमच्या बाटलीचं सील फोडून अंदाजाने त्यातली दारु ग्लासात ओतली.

"पाणी घे माठातून माठ्या..", तो बसल्या जागेवरुन काल्याला बोलला. काल्याने त्याचा ग्लास घेऊन माठावरच्या ओगराळ्याने त्यात काठोकाठ पाणी भरलं.

मोमीन शांतपणे बघत होता. त्याने आपल्या पिशवीतून स्वतःचा ग्लास काढला. गावाकडून येतानाच तयारीने आल्यासारखा. साला गावाकडे प्यायचा नाही हा कधी.. की आम्हाला गंडवत होता..!?

फडकेने ग्लासातून मोठा घोट मारला. घटाघट गिळताना त्याचं तोंड वेडंवाकडं झालं होतं. "आ हाय हाय हाय" करत त्याने ठाणकन खाली ग्लास आपटला आणि मोठ्यांदा घसा खाकरला..

काल्याने आर्नीचा पेला भरला आणि स्वतःला चहाचा कप रम भरुन घेतला. पाणीबिणी काही नाही.

फडकेचं बारीक लक्ष होतं.. "ए.. एकटाच संपवू नको हां..."

काल्याने अजिबात लक्ष न देता उरलेला एक कप अर्धाच चॉकलेटीतांबूस रंगाच्या दारुने भरला आणि त्यात पाणी घालून माझ्यासमोर ठेवला.

"हवी तर घे..", तो मला म्हणाला.. त्याने उरलेली बाटली कॉटवर बसलेल्या मोमीन आणि आर्नीकडे सरकवली.

माझ्या नाकात एकदम फर्निचर पॉलिशसारखा वास घुसला आणि सोबत थोडा व्हॅनिला आईसक्रीमसारखा पण.

"ले लो रे.. कुच टेन्शन बात नही रे..", आर्नी बाटलीचे बूच खोलत मला बोलला.

"ओढ रे केळकर .. ओढ तुझा कप आणि मार घोट.. आता लहान पोरगा आहेस काय तू?", फडके नाकातल्या आवाजात एकदम खणखणीत बोलला.. मला शब्द सावकाश ऐकू येत होते.

भुताने झपाटल्यागत मी कप उचलला आणि नाकातला श्वास रोखून धरून घाईत घोट मारला. आणखी उशीर केला असता तर आणखी उलटसुलट विचार करत बसलो असतो.

घसा जळला.. पोटापर्यंत जळती थंड रेष ओघळली. तोंड कडू झालं.

लक्ष्मीनारायण चिवड्याचा कागद फडकेने माझ्यापुढे सरकवला. मी एक तोंडभर बकाणा मारला. चिवडा इतका टेस्टी लागतो हे आधी कधीच कळलं नव्हतं.

मी घोट घेतलेला बघून काल्याने समाधानाने त्याची बिनपाण्याची रम घुटकली आणि चेहराभर हसला.

पुढे किती वेळ गेला आणि माझा कप कोणी कितीदा भरला याची मोजणी मी केली नाही, पण हळूहळू थंड खोलीत बसूनही अंगावर कोणीतरी घोंगडी घालावी तसं उबदार वाटलं.. मग हातपाय सैल होऊन त्यांची हालचाल करायला मजा यायला लागली. सगळ्यांची नाकं लालसर झालेली म्हणजे माझंही झालं असणारच.

फडके द्रौपदीविषयी तावातावाने कायतरी बोलत होता. अजिबात न कळूनही काहीतरी ऐकायला जाम इंटरेस्टिंग वाटत होतं .. महाभारतातली द्रौपदी असणार. आणि कुठली..

काय की.. पण त्यानं जे म्हटलं त्याच्याशी मी फुल्ल अ‍ॅग्री होतो इतकं नक्की होतं..

"जोरात ओरडू नका रे..मालक आले वर तर भिकार्‍यागत आज रात्रीच रस्त्यावर याल भडव्यांनो", मोम्या कॉटवरुन जोरात ओरडला.

"गपा रे सगळे", फडक्या जोरात ओरडला..

"फडक्या..साल्या.. मी राहणार इथेच..आजपासून.. सांग त्या येडझव्या मालकाला..", पाय ताणत मी हळूच मोठ्याने ओरडलो..

(टु बी कंटिन्यूड...)

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2014 - 3:47 pm | पिलीयन रायडर

आँ??? आज सोनियाचा दिनु...!!

आता वाचते निवांत...

आदूबाळ's picture

10 Apr 2014 - 3:54 pm | आदूबाळ

अगदी अगदी!

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2014 - 3:56 pm | पिलीयन रायडर

६ मे २०१३ नंतर डायरेक्ट १० एप्रिल २०१४...!! आता वाड्यात-३ २०१५ मध्ये टाकणार की काय?!! ;)
मिपा चा मोस्ट अवेटेड लेख असणार हा..!

मस्त जमलाय.. आता काय ते पटापटा लिहा साहेब.. सस्पेन्स पुरे झाला..

बाळ सप्रे's picture

14 Apr 2014 - 1:46 pm | बाळ सप्रे

'वाड्यात'ची रोशनी होउ देउ नका :-)

शिद's picture

26 Aug 2014 - 8:40 pm | शिद

आता वाड्यात-३ २०१५ मध्ये टाकणार की काय?!!

+१००

कृपया पुढील सर्व भाग लवकरात लवकर टाकणे ही नम्र विनंती.

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 4:01 pm | आत्मशून्य

वाड्यात.

अनुप ढेरे's picture

10 Apr 2014 - 4:22 pm | अनुप ढेरे

एक नंबर!

किसन शिंदे's picture

10 Apr 2014 - 4:42 pm | किसन शिंदे

फर्मास!! काही वाक्यांना जाम हसलोय. एकदम अनुभवी लेखन हो गवि. औवर आन्दो

राजो's picture

10 Apr 2014 - 4:49 pm | राजो

धन्यवाद गविशेट :)

पुढचे भाग टाका लगेच..

पैसा's picture

10 Apr 2014 - 5:10 pm | पैसा

पहिला भाग येऊन एक वर्ष होत आलं पण लिंक लागली लग्गेच! आधीचा भाग परत बघायला पण लागला नाही. आता पुढचा भाग लवकर लिहा हो गवि! २०१५ नको!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2014 - 11:57 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी हेच सांगायला आलो होतो...
येऊ दे पुढचे भाग पटापट..

पोचले साहेब एकदाचे वाड्यात हो..
नायतर म्हनले आता ही पण ( अजून एक) 'अधूरी एक कहाणी' होतेय की काय.. :)

सौंदाळा's picture

10 Apr 2014 - 6:27 pm | सौंदाळा

मस्तच हो गवि
इतक्या उशिराने भाग येऊन पण लिंक मस्त लागली.
केळ्या काय करणार आता? काँम्प्युटर कोर्स, नविन प्रेमप्रकरण? मोमीन्-केळ्याची दोस्ती कुठपर्यंत जाणार, मराठेचे काय ;)? खुप प्रश्न आहेत.
पुभाप्र

झक्कास्स्स.... गवि, आता पुढचे भाग पटापट येऊ द्या.

मराठे's picture

10 Apr 2014 - 9:06 pm | मराठे

आं? सूर्य कुठून उगवला आज?

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Apr 2014 - 10:06 pm | लॉरी टांगटूंगकर

पु.भा. लवकर लिहा

मुक्त विहारि's picture

11 Apr 2014 - 12:48 am | मुक्त विहारि

वाचत आहे.

खटपट्या's picture

11 Apr 2014 - 4:19 am | खटपट्या

गावी, पहिले दोन भाग एवढे जबरदस्त आहेत कि आता राहवत नाहीये.
लवकर येवूद्या

समीरसूर's picture

11 Apr 2014 - 11:40 am | समीरसूर

मस्त मस्त मस्त! मजा आली वाचून बर्‍याच गोष्टी रिलेट (मराठीत काय म्हणावे?) करता आल्या. ओघवती शैली!

लवकर लवकर टाका पुढचे भाग, गविशेठ!

स्पंदना's picture

11 Apr 2014 - 2:02 pm | स्पंदना

पहिल्या दोन दिवसातच पोरग सुधारलं!!
लिहा आता पुढे गवि.

नाखु's picture

11 Apr 2014 - 2:21 pm | नाखु

दिवसांनी लेखन पण एक्दम फर्मास..

मु.वि.पंखा.

अधुन मधुन लिखाणासाठीही वेळ काढत जावा नी नम्र विनंती.
नाही म्हटलं तरी जवळपास वर्षभराचा गॅप आहे. वाढत्या वयात जुन्या गोष्टी विसरायला होतात रे.
कृपया पुढला/ले भाग लवकर टाकावा/वेत.

प्यारे१'s picture

11 Apr 2014 - 4:11 pm | प्यारे१

+ असेच म्हणतो!

वाढत्या वयाबद्दल म्हातार्‍या (होऊ घातलेल्या) ;) गणपाशी थोडा असहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Apr 2014 - 3:36 pm | प्रकाश घाटपांडे

नाय नाय उलिशिक टाकाली की बराबर आठवतय सम्द

विजुभाऊ's picture

14 Apr 2014 - 1:47 am | विजुभाऊ

गवि.गवि.गवि
इतक्या उशीराने लिखाण करुन सर्वाना खिजवी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2014 - 5:29 am | निनाद मुक्काम प...

गाविंना लिंक लागली हे महत्वाaचे
तिसरा भाग लवकर येऊ दे
ह्या कथानकावर एक नाही तर चक्क तीन भाग होऊ शकतात.
शाळा , कॉलेज, नोकरी

बहिरुपी's picture

26 Aug 2014 - 7:27 pm | बहिरुपी

केळकर कधी उठणार?

मी ओंकार's picture

20 Oct 2015 - 4:17 pm | मी ओंकार

१ वर्षापासुन वाट बघतोय केळकर!

amit_m's picture

27 Mar 2019 - 2:55 am | amit_m

पुढचा भाग कधी??

प्रचेतस's picture

27 Mar 2019 - 8:51 am | प्रचेतस

हेच म्हणतोय.

लेखणीचा गंज झटकून नव्या उमेदीने त्यांनी परत लिहावं आता.

सिरुसेरि's picture

28 Mar 2019 - 1:10 pm | सिरुसेरि

मस्त .. दुनियादारीची आठवण झाली .

प्रचेतस's picture

28 Mar 2019 - 5:27 pm | प्रचेतस

लिहा ना भो पुढचा भाग

सिद्धार्थ ४'s picture

20 Jun 2019 - 7:00 pm | सिद्धार्थ ४

पुढचा भाग कधी??