user

मम आत्मा गमला..२

मम आत्मा गमला ..१ हे इथे मागे लिहिलं होतं आणि मग ह्या न त्या कारणानं पुढे लिहायचं राहून गेलं. हा लेखाचा उत्तरार्ध.
***

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.

कधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे! वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर! "बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक!" ("चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना!") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. "ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते!" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.

अण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल! ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती! वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती! आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं! आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना!

या दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.

कारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती! जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.

अगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत!

किती आठवणी लिहाव्यात? किती सांगाव्यात? लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय!

समाप्त

आटोपशीर

आटोपशीर, चांगल्या आठवणी. अजून हव्याशाही...
पहिला लेखही या निमित्ताने वाचला.
कारवार, बेळगाव, धारवाड, गोवा, सांगली, कोल्हापूर म्हणजे गाणारा मुलूख असं संजय संगवई म्हणायचेच नाही तरी. ते सार्थ होतंच.

सहमत आहे.

सहमत आहे. गोव्याने महाराष्ट्राला जेवढे प्रसिद्ध गाणीगिणी करणारे दिले तेवढे इतर कुठल्याही प्रांताने दिले नाहीत.

+१

सहमत आहे. उभा महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो - इति पुलं

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्लाऽऽसिक!

जुन्या आठवणी...
ती मखमली गाणी....
आजी आजोबांचे ते थरथरते-सुरकुतलेले हात...

मस्त तिय्या जमवुन आणलास गं Smile

धमाल मुलाशी सहमत

आगदी, आगदी, पार मागे नेलत. खुप खुप आभारी.

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुंदर...

यशोताई, एवढंच म्हणेन... एक छान वाचनानंद दिल्याबद्दल धन्यवाद. बास्स!!!

तो 'समाप्त' मात्र अन्यायकारक आहे. भाग २ एवढ्या दिवसांनी आला... जमेल तसं, वाटेल तेव्हा अजून (अगदी असंच नाही) पण छान मुक्तकं येऊ देत.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

मस्त लेखन...

मस्त लेखन... Smile

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

मदनबाण.....

आधी आयपीएल नंतर कॉमनवेल्थ आणि आता लवासा !!!
http://alturl.com/cfq7h

फार लवकर आटोपतं घेतलंत हो!

इतके भरभरून देऊ शकणारे आजी आजोबा लाभले तुम्हाला तर आठवणी इतक्या कमी लांबीच्या लेखांत कशा गुंडाळताय? जरा आणखी विस्ताराने येऊ द्यात. या निमित्ताने आम्हाला आमचेही आजी आजोबा आठवतात, तो आठवणींचा प्रवास आणखी लांबू द्या.

खूप छान लिहिलं आहेस यशोधरा.

अशा छोट्या छोट्या आठवणींच्या धाग्यांनी विणलेलं आयुष्याचं वस्त्र कोणत्यातरी क्षणी अचानक एखाद्या गर्भरेशमी साडीचा पदर उलगडून दिसावा तसं चमकून जातं आणि मग आठवणींना पारावार रहात नाही. हेच तर संस्कार आणि संचित.

अशीच अधून मधून लिहिती रहा. थोड्या आणखीन विस्तारानं लिहिलंस तरी आवडेल.

चतुरंग

एकामागोमा

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं.

अतिशय सुरेख लिहिलेस दोन्ही लेख यशो! अगदी डोळ्यांपुढे उभी राहिली सगळी दृश्यं! रात्र रात्र जागून जुन्या भल्यामोठ्या नॅशनल एकोच्या रेडिओवर बाबांसोबत ऐकलेली गाणी, त्यांचं बाबांनी केलेलं रसग्रहण सगळं सगळं आठवलं! अशाच रेशीमलडी अजून येऊ देत! Smile

क्रान्ति
अग्निसखा

क्रान्ति
अग्निसखा

खरंच

खरंच आठवणींच्या धाग्यांचं एक सुंदर तलम वस्त्र उलगडून दाखवलंस.
मनाचा एक कोपरा हा आठवणींनी नेहमीच सुगंधी झालेला असतो.. आणि तो तसाच रहावा. कारण या आठवणी सुखात दु:खात नेहमीच सोबत असतात.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

क्लास

मस्त

मस्त Smile

--अवलिया

--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती

छान आठवणी

हा लेख "समाप्त" केलात तरी अधूनमधून असेच लिहित जावा!

लिखाण

लिखाण आवडले. आणि त्याचबरोबर , भावनांची कदर करणारे प्रस्तुत संस्थळावरील प्रतिसादसुद्धा.

अवांतर : "गंधर्वयुग" अशा नावाचे गंगाधर गाडगीळांचे पुस्तक अगदी अलिकडे प्रसिद्ध झालेले आहे. बालगंधर्वकालीन मिथक-सदृष परिस्थितीचे यथातथ्य चित्रण त्यात आलेले आहे.

पहिला भाग

पहिला भाग आधी वाचला न्हवता, दोन्ही आत्ताच वाचुन काढले.
सुरेख आठवणी .
अजुन वाचायला आवडल असत.

-माझी खादाडी.

सुरेख

सुरेख आठवणी. बालगंधर्व माझ्या आबांचाही विकपॉइंट. आबा उत्तम सतार आणि बासरी वाजवायचे. दिवसभराचे पेशंट संपले की हातात बासरी. गाण्याची आवड ही खास आजोळची देणगी.

सुरेख

सुरेख लेख...आवडला..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धन्यवाद

धन्यवाद Smile

मस्तच. छान

मस्तच.
छान लिहले आहेस यशो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

के व ळ सु रे

के व ळ सु रे ख ...

सू हा स...

Scroll to Top