मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा
मोनालिसा हे जगातले सर्वाधिक प्रसिद्ध चित्र. अगदी एका दिवसासाठी पॅरिसला येणारेसुद्धा ते बघण्याचा आटापिटा करतात. मोनालिसाच्या दालनात नेहमीच प्रचंड गर्दी असल्याने खरे तर कुणालाही ते चित्र धडपणे बघताही येत नाही, आणि एवढा खर्च, आटापिटा करून त्यात बघण्यासारखे एवढे खास असे काय आहे, हेही उमजत नाही.
पूर्वी मोनालिसाला एवढे प्रसिद्धीचे वलय नव्हते, हे खालील चित्रावरून दिसते :


क्लो ल्यूसचे बाहेरून दृश्य आणि लिओनार्दोचे दा विंचीचे शयनकक्ष.
थोड्या वेळापूर्वी क्लो ल्यूसला येऊन पोहोचलो. पोहोचायला खूपच उशीर झाल्याने घाईघाईत एक फेरी मारून सर्व बघावे लागले. या प्राचीन वास्तूत त्या प्रतिभावंताचे पावलोपावली जाणवणारे अस्तित्व अनुभवून मी अगदी भारावून गेलेलो आहे. मी चित्रकार आहे, आणि इथला सर्व भाग फिरून बारकाईने बघायचा आहे, असे सांगितल्यावर जवळच्याच एका जुनाट घरात माझी रात्री राहण्याची सोय करण्यात आली आहे.


बापरे ! या घरात एकट्याने रात्र काढायची म्हणजे कठीणच आहे.....
क्लो ल्यूस दि. ४ ऑक्टोबर २०१७.
रात्री २ :३०
घरात आलो खरा, पण भीतीने अजिबात झोप लागत नाहीये. कुठून आपण इथे आलो, असे झालेय. कशीतरी रात्र पार पडली की अगदी सकाळी पॅरिस गाठायचे, आणि ते रत्न त्या बाईला परत करायचेय ....
पहाटे ४:००
पहाटे जरा डोळा लागला, तेवढ्यात कसल्यातरी आवाजामुळे जरा जाग आली. खिशातला रेकॉर्डर सुरू करून ठेवला, तेवढ्यात अचानक "लोरेंझो, बाहेर ये" असे शब्द स्पष्टपणे कानावर पडले. खडबडून जागा झालो. उठून इकडे तिकडे बघतो, तर तिथे कुणीच नाही. मात्र बाहेरून तीच हाक पुन्हा पुन्हा ऐकू येत होती.
खोलीचं अवजड, जुनाट लाकडी दार उघडून आता बाहेर आलो आणि बघतो तर .... टिपूर चांदण्यात मोठमोठ्या वृक्षांच्या भेसूर वाटणार्या सावल्यांमधे उभी, पायघोळ अंगरखा घातलेली, छातीपर्यंत पांढरीशुभ्र दाढी रुळणारी गूढ व्यक्ती .... तीच मला साद घालत आहे : "लोरेंझो, ये. मी तुझीच वाट पाहत होतो"
... आश्चर्यच आहे.... ही दिव्य व्यक्ती कोण, आणि मला 'लोरेंझो' म्हणून का बोलावत आहे? काहीच काळात नाहीये. मी भारल्यासारखा त्या व्यक्तीजवळ जाऊन पोहोचलोय.
"अरे, मी लिओनार्दो, ओळखले नाहीस? तू माझा पट्टशिष्य, लोरेंझो गेरर्दिनी ... एली गेरर्दिनीचा भाऊ. चल, आपण स्टुडियोत जाऊ या" म्हणत ते झपाझप चालू लागल्यावर मीही भारल्यासारखा मागोमाग जाऊ लागलोय.
आता आम्ही स्टुडियोत पोहोचलोय. इथे भिंतीवर तीन चित्रे लागलेली आहेत. हीच तीन चित्रे लिओनार्दोने १५१६ साली इटलीतून फ्रान्समध्ये येताना बरोबर आणली होती, मला ठाऊक आहे. यातले एक म्हणजे सुप्रसिद्ध 'मोनालिसा’.
त्या चित्रांकडे हात दाखवत लिओनार्दो म्हणाले, "आठवते ना लोरेंझो, इटलीतून आपण ही तीन चित्रे मोठ्या कसोशीने आल्प्स पर्वत ओलांडून इथे घेऊन आलो.. तुझ्या बहिणीचे, 'एली'चे हे चित्र तर आपण प्राणपणाने जपत आणलेले आहे. राजा फ्रान्सिसने आपल्याला हा प्रासाद रहाण्यासाठी दिला.... आठवले ना आता?"
.... ही 'एली' कोण? आणि मोनालिसाच्या चित्राला ते माझ्या बहिणीचे, 'एली'चे चित्र का म्हणत आहेत? मला खरे तर हा सर्व भास आहे, स्वप्न आहे की वास्तव, हेच कळत नाहीये... आणि हळूहळू माझे वर्तमानकाळाचे, देहाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे भान हरपत चाललेले आहे.
"बरं, तू जरा फिरून ये, म्हणजे आठवेल सर्व काही, आणि हो, आणि येताना 'सेरिपी' आणायला विसरू नकोस " असे म्हणत त्यांनी चौकातील एका दाराकडे हात दाखवला. मी ओढल्यासारखा त्या दाराकडे खेचला गेलो…
त्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आणखी एक लोखंडी फाटक दिसले.
फाटकातून पलीकडे गेल्यावर समोर काही पायऱ्या आणि एक इमारत दिसते आहे….
पायऱ्या चालून त्या इमारतीच्या सज्जात आल्यावर समोर दूरवर दिसणारे दृश्य थक्क करणारे आहे.. अरे, हे तर एल ग्रेकोने रंगवलेले टोलेडोचे दृश्य... हे इथे फ्रान्समध्ये कसे ?
कृष्णमेघांनी भरून आलेले, काळवंडलेले आकाश, दूरवर दिसणारे प्राचीन प्रार्थनामंदिर आणि जर्जर इमारती, डोंगरांचे चढ-उतार, पाउलवाटा आणि नदीवरील पूल... हे तर 'एल ग्रेको' च्या चित्राने अजरामर केलेले स्पेन मधील 'टोलेडो' गाव....
... माझे भान पुरतेच हरपत चालले आहे...मला भोवळ येते आहे......मी पडणार आता...
क्रमशः
संपादकीय तळटीप: चित्रगुप्त यांनी या कथामालिकेची सुरुवात मिपाच्या दिवाळी अंकात पहिले पुष्प प्रकाशित करून केली आहे.
वाचने
29849
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
अफलातून
मजकूर व चित्रे ..
उत्कंठावर्धक कथा
अवर्णनीय!!
खास चित्रगुप्त शैलीत
जबरदस्त!
लै भारी...
सुरेख! गुंगुन गेले होते अगदी!
भारी !
लुव्र आणि आपण
__/\__
वाचतोय. पुभाप्र
मोनालीसाची कहानी
वावा..
सुंदर सुरवात
छान सुरुवात
छान!!
पुढील भाग लवकरच.
चित्रगुप्तजी अप्रतिम सुंदर लेख
जबरदस्त
भन्नाट सुरूवात. लोरेंझोच्या
वा! अगदी भन्नाट सुरुवात..
..
खूप विलक्षण वाटलं होतं हा भाग
काय सुंदर गुंफलीयेत सगळी
अफलातून. उत्कंठा वर्धक
आत्ताच पहिला भाग वाचून काढला
जबरदस्त
जबरदस्त
सुंदर विषय व लेख! नुकताच
मस्त लिहिलय, उत्सुकता ताणली