संपादकीय : अभिनिवेशाच्या टोप्या, सत्त्व ते निकें आणि अंकाचं इर्जिक

आदूबाळ's picture
आदूबाळ in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

a
मिपाकरहो, नमस्कार!

आपल्या मिपाचा २०१७ दिवाळी अंक घेऊन आज आपल्यासमोर येत आहोत.

सभोवताली माहितीचा आणि संपर्काचा विस्फोट होत असताना मिपासारख्या संस्थळांचं नक्की स्थान काय आहे, असा प्रश्न हल्ली वारंवार मनात येत असतो. मिपावर सकस लेखन तर वाचायला मिळतंच, आणि इच्छा असेल तर मिपाचा उपयोग समाजमाध्यमासारखाही (सोशल नेटवर्कसारखाही) करता येतो. मिपाचं समाजमाध्यम-रूप आणि फेसबुक, ट्विटरसारखी अन्य समाजमाध्यमं पाहिली, तर अलीकडे प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे जनमताचं सातत्याने होत असलेलं ध्रुवीकरण (पोलरायझेशन). प्रत्येकाला एकाच वेळी अनेक अस्मिता असतात, आणि प्रसंगी त्या परस्परविरोधीही असू शकतात. त्यातलीच एक अस्मिता सामान्य, उत्सवप्रेमी माणसाची. याच सामान्य, उत्सवप्रेमी वाचकासाठी मिपाचा हा दिवाळी अंक घेऊन आलो आहोत.

आज पदार्थविज्ञानाला / पुंजभौतिकीला मान्य सिद्धांतांप्रमाणे काळ सलग असतो. पण भावनिक पातळीवर आपल्या आयुष्याच्या प्रवाहाकडे पाहता 'सुखाचे क्षण' आणि 'दु:खाचे क्षण' अशी सरळसोट विभागणी जाणवते. सणवार, उत्सव हे संस्कृतीने दिलेले सुख साजरं करायचे क्षण आहेत. अशा प्रसंगी येत असलेल्या उत्सवी दिवाळी अंकाचा आस्वाद अभिनिवेशाच्या टोप्या आणि भूमिकांची कवचकुंडलं उतरवून घेतला, तर ते योग्य ठरेल.

***

दिवाळी अंकातून दर वर्षी काहीतरी नवं द्यायचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकात विशेष विभाग आहे - व्यक्तिचित्रांचा. मराठी साहित्यात व्यक्तिचित्रांचं दालन खूप समृद्ध आहे. मिपाकर लेखकांनीही आपल्याला प्रत्यक्ष (किंवा कल्पनेत) भेटलेल्या व्यक्तींबाबत लिहावं, या हेतूने हा विशेष विभाग दिवाळी अंकात समाविष्ट केला आहे. या विभागाला भरभरून प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे हा प्रतिसाद हा इतर लेखनाऐवजी न येता इतर लेखनाबरोबर आला आहे. यामुळे अंकाचं स्वरूप हे सर्वसमावेशक झालं आहे. भरल्या ताटात पक्वान्न उठून दिसावं, तसंच बाकी सगळेच पदार्थ निगुतीने शिजवलेले, चविष्ट असावेत असं काहीसं चित्र तुम्हाला दिसेल.

गतवर्षी 'गोष्ट तशी छोटी' या मिपाच्या दृक-श्राव्य उपक्रमानेही पदार्पणातच देदीप्यमान यश मिळवलं. यामुळेच, यंदाच्या दिवाळी अंकात 'गोष्ट तशी छोटी'ची टीम दृक-श्राव्य विभाग घेऊन आली आहे. या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे मिपावरच्या काही अक्षर वाङ्मयाचं अभिवाचन यात ऐकायला मिळेल. ('मोकलाया' त्यात नाही. कल्जी क्रू नये.) या दृक-श्राव्य विभागाला भरघोस प्रतिसाद मिळो आणि हा विभाग मिपाच्या दिवाळी (आणि अन्य) अंकांचा कायमचा भाग होवो, अशी शुभेच्छा इथे व्यक्त करतो.

व्यक्तिचित्रांची आणि अन्य लेखनाची संख्या आणि नवा गडी असलेला दृक-श्राव्य विभाग धरून दिवाळी अंक नेहमीपेक्षा आकाराने मोठा झाला आहे. मिपाचे वाचक कितीही विचक्षण असले, तरी जवळजवळ सत्तरेक धागे अचानक एके दिवशी अंगावर सोडणं योग्य वाटलं नाही. या पद्धतीमुळे चांगल्या लेखनालाही प्रसंगी कमी प्रतिसाद मिळतात, हेही निरीक्षण होतंच. त्यामुळे यंदा मिपाचा दिवाळी अंक दिवाळीच्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रकाशित होईल. संपूर्ण अंक एकदम वाचायची इच्छा असणार्‍यांसाठी पाच दिवसांनंतर पीडीएफ प्रकाशित करूच.

***

आमच्या गावाकडे शेतीच्या कामासाठी किंवा गावातल्या एखाद्या लग्नकार्यासाठी 'इर्जिक' घालतात. गावात सगळ्यांकडे सगळं नसतं. नांगर असेल, पण बैल एकच असेल. किंवा खुरपी पुरेशी नसतील. लग्नकार्यात तर वस्तू आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. तर गाव एकत्र येतं, आणि लोकसहभागातून कार्य पार पडतं. कार्य संपल्यावर, मांडवपरतणीच्या वेळी, यजमान सगळ्यांना जेवू घालतो. लग्नातल्या पक्वान्नांच्या तुलनेत जेवण साधंसंच असतं, पण यजमानाने आपल्या सहकार्‍यांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता असते.

असंच हे दिवाळी अंकाचं इर्जिक घालतो आहे. इतक्या लोकांचे हात या कार्याला लागले आहेत की या अंकावर संपादक म्हणून केवळ माझं नाव लागावं याने चांगलंच कानकोंडं वाटतं आहे. सगळ्यांनी आपुलकीने घेतलेल्या कष्टांची परतफेड आभारप्रदर्शनाचे निव्वळ औपचारिक, कोरडे शब्द लिहून होणार नाही. इर्जिकात असलेल्या स्निग्ध कृतज्ञतेचे भाव माझ्या मनी आहेत.

या सगळ्यांची नावं खाली (अकारविल्हे):

  • अभ्या..
  • आनंदयात्री
  • एस
  • किसन शिंदे
  • जव्हेरगंज
  • डॉ सुहास म्हात्रे
  • नीलकांत
  • नीलमोहर
  • पद्मावति
  • पिलीयन रायडर
  • पैलवान
  • पैसा
  • प्रचेतस
  • प्रशांत
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • मूनशाईन
  • यशोधरा
  • वेल्लाभट
  • श्रीरंग_जोशी
  • सुधांशुनूलकर
  • स्नेहांकिता
  • स्रुजा

लिहिणारे हात नसते, तर या सुसज्ज टीमचा काहीच उपयोग नव्हता. अंकासाठी आवर्जून लेखन पाठवणार्‍यांचे, दृक-श्राव्य विभागात योगदान देणार्‍यांचे आभार.

...आणि वाचकहो, तुम्ही नसतात, तर या खटाटोपालाच काही अर्थ उरला नसता. त्यामुळे तुमचे सर्वात जास्त आभार, आणि आम्हां सर्वांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!

Footer

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 12:19 am | पगला गजोधर

शुभ दीपावली...

पहिला फटाका फोडला.

जुइ's picture

17 Oct 2017 - 12:23 am | जुइ

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! अंकासाठी काम केलेल्या सगळ्यांचे अनेक धन्यवाद!

सुंदर दिसतो आहे दिवाळी अंक. सर्वांचे आभार.

प्रमोद देर्देकर's picture

17 Oct 2017 - 6:08 am | प्रमोद देर्देकर

प्रस्तावना आवडली.

!सर्व मिपाकरांना दिवाळीच्या फटाकेमय हार्दिक शुभेच्छा!

एमी's picture

17 Oct 2017 - 6:15 am | एमी

शुभेच्छा आणि आभार!!
अंक वाचतेय.

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 6:18 am | अभिजीत अवलिया

प्रस्तावना आवडली.

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 6:33 am | बाजीप्रभू

प्रस्तावना आवडली.

नंदन's picture

17 Oct 2017 - 7:46 am | नंदन

अंक छान दिसतो आहे, संपादकीयही नेटके. लेख वाचण्याची उत्सुकता आहे.

या दृक-श्राव्य विभागाला भरघोस प्रतिसाद मिळो आणि हा विभाग मिपाच्या दिवाळी (आणि अन्य) अंकांचा कायमचा भाग होवो, अशी शुभेच्छा इथे व्यक्त करतो.

तंतोतंत!

पिवळा डांबिस's picture

18 Oct 2017 - 2:14 am | पिवळा डांबिस

नंदनच्या वरील प्रतिसादाला तंतोतंत.
मिपाच्या लेखक, वाचक (आणि संपादकही, वो भी क्या याद करेंगे!!) सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रेवती's picture

17 Oct 2017 - 7:57 am | रेवती

प्रस्तावना आवडली आहे.
आता दिवाळी सुरु झाली असल्याने शब्दफराळ करण्यास उत्सुक आहे.

वरुण मोहिते's picture

17 Oct 2017 - 7:58 am | वरुण मोहिते

आहे. मोजक्या शब्दात .

वर वरुण म्हणतोय तसं मोजक्या शब्दात, तरीही सुंदर!!

(दिवाळी अंकाच्या उजवीकडल्या प्रतिमेवर टिचकी मारताच अंक दिसेल असं करता येईल का? सध्या बर्‍यापैकी शोधाशोध होतेय.)

सस्नेह's picture

17 Oct 2017 - 10:32 am | सस्नेह

त्या प्रतिमेच्या वरती 'अनुक्रमणिका' असा शब्द आहे, त्यावर टिचकी मारा.

सस्नेह's picture

17 Oct 2017 - 10:31 am | सस्नेह

एक सम्यक आणि परिपक्व प्रस्तावना !
अंकाची झलक दाखवणारी.

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 10:36 am | स्वाती दिनेश

संपादकीय आवडले, आता अंक वाचायला घेतेच आहे,:)
सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!
स्वाती

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 10:40 am | जेम्स वांड

अतिशय उत्तम संपादकीय आहे आबाजी

नि३सोलपुरकर's picture

17 Oct 2017 - 10:40 am | नि३सोलपुरकर

शुभेच्छा आणि आभार!

पुंबा's picture

17 Oct 2017 - 10:54 am | पुंबा

संपादकिय अतिशय आवडले..
अगदी नितळ निर्मळ व्यक्त झाला आहात..

('मोकलाया' त्यात नाही. कल्जी क्रू नये.)

ह्यच्यबद्दल निशेद..
"मोकलाया" अक्षर वाङ्मय नाही काय?
इर्जिकीत सामिल झालेल्या सर्वांना धन्यवाद..
आता, अंकाकडे वळतो..

सुबक ठेंगणी's picture

17 Oct 2017 - 12:45 pm | सुबक ठेंगणी

आमच्या गावाकडे शेतीच्या कामासाठी किंवा गावातल्या एखाद्या लग्नकार्यासाठी 'इर्जिक' घालतात. गावात सगळ्यांकडे सगळं नसतं. नांगर असेल, पण बैल एकच असेल. किंवा खुरपी पुरेशी नसतील. लग्नकार्यात तर वस्तू आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. तर गाव एकत्र येतं, आणि लोकसहभागातून कार्य पार पडतं. कार्य संपल्यावर, मांडवपरतणीच्या वेळी, यजमान सगळ्यांना जेवू घालतो. लग्नातल्या पक्वान्नांच्या तुलनेत जेवण साधंसंच असतं, पण यजमानाने आपल्या सहकार्‍यांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता असते.

असंच हे दिवाळी अंकाचं इर्जिक घालतो आहे. इतक्या लोकांचे हात या कार्याला लागले आहेत की या अंकावर संपादक म्हणून केवळ माझं नाव लागावं याने चांगलंच कानकोंडं वाटतं आहे. सगळ्यांनी आपुलकीने घेतलेल्या कष्टांची परतफेड आभारप्रदर्शनाचे निव्वळ औपचारिक, कोरडे शब्द लिहून होणार नाही. इर्जिकात असलेल्या स्निग्ध कृतज्ञतेचे भाव माझ्या मनी आहेत.

अत्यंत प्रांजळ इर्जिक खूपच भावलंय :)

+१

खुपच मस्त वाटतोय अंक

कपिलमुनी's picture

17 Oct 2017 - 1:52 pm | कपिलमुनी

यंदा चिमणला मिस्स केले !

संग्राम's picture

17 Oct 2017 - 2:19 pm | संग्राम

येणार .... येणार .... आलाचं
सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!

आदूबाळ's picture

17 Oct 2017 - 4:59 pm | आदूबाळ

एक ताजा कलम / निरीक्षण :

दोन खूप चांगले लेख प्रकाशनाच्या एक दिवस आधी आले (म्हणजे लेखन द्यायच्या अंतिम तारखेनंतर १५ दिवसांनी). दोन्ही लेख खरोखर खूप चांगले होते, आणि त्याने अंकाची शोभा वाढलीच असती. पण इतक्या उशीरा आलेलं लेखन त्यावरच्या सगळ्या प्रक्रिया करून अंकात घेणं खरोखर शक्य झालं नाही. याबद्दल आम्हां सर्वांनाच चुटपूट लागून राहिली आहे, पण आमचाही नाईलाज होता. :(

चतुरंग's picture

18 Oct 2017 - 5:57 am | चतुरंग

लेआउट वेगळा आहे त्यामुळे एकदम उत्साही वाटले.
आता लेख वाचण्याची उत्सुकता लागली आहे.
आदूबाळासाहेबांचे इर्जिक अतिशय हृद्य.

(शब्दफराळोत्सुक)रंगा

नाखु's picture

18 Oct 2017 - 7:08 am | नाखु

आणि तरीही सर्व स्पर्शी निवेदन आवडलं

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आणि अंकासाठी अभिनंदन

दिवाळी अंकिष्ट नाखु

यशोधरा's picture

18 Oct 2017 - 9:06 am | यशोधरा

प्रांजळ इर्जिक खूप आवडलं.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 9:39 am | सविता००१

अतिशय छान आणि निर्मळ इर्जिक आवडलं.
सुंदर झालाय अंक.
सगळ्याच टीमचे आभार.
आता हळूहळू सगळं वाचते.. :)

विदेश's picture

18 Oct 2017 - 11:26 am | विदेश

दिवाळी अंक काढण्यात, ज्यांचा ज्यांचा हातभार/बोटभार लागला, त्यांचे श्रम नक्कीच सार्थकी लागले आहेत.
सर्वांना धन्यवाद आणि दीपावली शुभेच्छा !

उत्तम संपादकीय. सहज सुंदर आणि नेमकं.

वकील साहेब's picture

18 Oct 2017 - 2:36 pm | वकील साहेब

संपादकीय मनाला भावल. इर्जिक संकल्पनेला तर बारा तोफांची सलामी. दिवाळी अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्व संपादक मंडळाचे विशेष आभार आणि अभिनंदन

shrivallabh Panchpor's picture

18 Oct 2017 - 5:04 pm | shrivallabh Panchpor

संपादकीय लेख उत्तम . शब्दप्रयोग चपखल

अभ्या..'s picture

18 Oct 2017 - 9:51 pm | अभ्या..

सुरेख इर्जिक घातलंय.
श्रमपरिहार झाल्यागत वाटलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2017 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रिय मिपाकर, आदूबाळ.
स.न.वि.वि.

संपादकीय छान झालं आहे. पेक्षा मला तुम्ही जो मिपादिवाळी अंकाच्या कामासाठी चिवटपणा दाखवता त्याचं सालं लै कौतुक वाटतं. इतकी मतं, इतके मिपाकर, आणि त्या सर्वांची मनं आणि मतं सांभाळून हा गाडा ओढायचा त्याची खरच कमाल वाटते. आपलं मनापासून अभिनंदन करतो.

सर्व सहभागी मिपामंडळीचं काम जवळून पाहिलं आहे, त्यामुळे एक एकाच्या कामाचं आपलं एक वेगळेपण आहे, त्या सर्वांचा अभिनंदन. मिपाकरांचे उत्तम लेखन, हे तर खास वैशिष्ट्ये, ते लेखन अतिशय दर्जेदार आलं आहे. व्यंगचित्रे, दृकश्राव्य विभाग, आणि व्यक्तीचित्रे झकास झाली आहेत. बाकी, माझ्या उल्लेखाची गरज नव्हती मी आपलं कोण कोण काय करतं, काम कसं करतं, हे बघायला यायचो माझा काही रोल नव्हता. असो, दिवाळीसणाच्या घरच्या कामाची ओढाताण असतांना मिपाचा दिवाळी अंक यासाठी सर्व मेहनत घेणार्‍या सर्वांना सलाम करतो.

मराठी आंतरजालावर चक्कर मारल्यावर मिपाचा दिवाळी अंकांचं वेगळेपण नजरेत भरतं. मिपाचा प्रवास नंबर एककडून नंबर एककडे असा अव्याहतपणे सुरु राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो, आपण सर्वांना ही दीपावली सुख समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जावो, अशा शुभेच्छा देऊन थांबतो.

-दिलीप बिरुटे

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:13 pm | माम्लेदारचा पन्खा

मिपाकरांतर्फे केलेले भगीरथ प्रयत्न फळाला आले आहेत . . . . . .

अप्रतिम संपादकीय लिखाण . . . . . !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2017 - 9:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अंकाच्या कामामधे सहभागी असणार्‍या सगळ्यांचं मनापासुन कौतुक. अतिशय मस्तं झालाय अंक. अभ्या डॉट डॉट ने नेहेमी प्रमाणे उत्कृष्टं मुपु बनवलयं. अमोल गवळींची व्यंगचित्रही छान. अभिनंदन.

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 7:06 pm | मित्रहो

संपादकीय मस्त झाले. लेख सुद्धा खूप छान आहेत. मिपाच्या दिवाळी अंकासाठी खूप मेहनत घेतली आहे हे दिवाळी अंक वाचल्यावर जाणवते.
साहीत्य संपादक आणि संपादक मंडळींना मनापासून धन्यावाद आणि मनःपूर्वक आभार.

पिशी अबोली's picture

12 Nov 2017 - 9:51 pm | पिशी अबोली

वाचायला अंमळ उशीर झालाय. पण आता एकेक करून वाचून काढते. संपादकीय मस्तच!

Ranapratap's picture

12 Nov 2017 - 10:22 pm | Ranapratap

दिवाळी अंकातील सर्व लेख आवडले, संपूर्ण लेख वाचून काढले. इर्जीक छान घातलंय, संपादक मंडळाचे आभार.