मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः प्रकाशची बर्फी

नूतन सावंत · · पाककृती
प्रकाशची बर्फी दादरच्या प्रकाशमध्ये पूर्वी ही पांढरी शुभ्र ,वर फक्त चारोळी घातलेली बर्फी मिळत असे .आता दूर राहायला गेल्यापासून प्रकाशमध्ये वारंवार जाणे जमत नाही, आणि गेलो, तरी आता ती बर्फी मिळत नाही, एकतर थोडीशी काळपट दिसते, शिवाय वर पिस्ता कप लावलेले असतात. म्हणून म्हटलं, करून पाहू. गुगलबाबाच्या कृपेने निशामधुलिका यांची कृती मिळाली, नेहमीसारखा पाक करून खवा घालून आटवा, अशी कृती नव्हती म्हणून खूप बरे वाटले. कारण अशाप्रकारे केलेल्या कृतीमध्ये,''आधी हाताला चटके, तेव्हा मिळते बर्फी'' असा प्रकार होतो. ती कृती पूर्ण झाल्यावर लक्षात आलं, अरे, ही तर पूर्वी प्रकाशमध्ये मिळत असलेल्या बर्फीसारखीच दिसतेय, खाऊन पाहिल्यावर तर खात्रीच पटली, यंदा बाप्पासाठी पण ही बर्फी करायची ठरवली आहे. तेवढेच त्यालापण जुन्या आठवणीतील बर्फी मिळाल्याचे समाधान. अतिशय सोपी आणि चटकन होणारी ही कृती मिपाकरांसाठी देत आहे. साहित्यः २५० ग्राम खवा १२५ ग्राम साखर चारोळ्या कृती: २५० ग्राम खवा किसून थोडासा भाजून घ्यावा. १२५ ग्राम साखरेचा पक्का पाक करून गॅस बंद करावा, आणि पाक तसाच ढवळत राहावे पुन्हा त्याची साखर होईपर्यंत. (ही क्रिया भराभर करावी लागते, कारण पाक पक्का असल्याने साखर होण्याची क्रिया लवकर होते. मध्यच खडेपण बनू शकतात, तसे झाले तर साखर मिक्सरमधून काढावी.) या साखरेला बुरा साखर म्हणतात. दोन्ही वस्तू पूर्ण थंड होऊ द्यावया. आणि मग एकत्र कराव्यात, व्यवस्थित मिक्स करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये बर्फी थापावी. वर चारोळी दाबून, थोड्या वेळाने सुरीने काप द्यावेत.. साधारण ८ ते ९ तासांनी बर्फी सेट होते 1

वाचने 17776 वाचनखूण प्रतिक्रिया 34

श्रिपाद पणशिकर 25/08/2017 - 01:00
आई ला हि रेसीपी दाखवतो. चारोळी आवडत नसल्याने ती बाद करण्यात येईल. धन्यवाद.

In reply to by एस

आदूबाळ 25/08/2017 - 09:44
नाय हो एसभाऊ, चारोळ्या म्हणजे चितळ्यांच्या श्रीखंडात सापडतो तो बारीकसा ब्राऊन नट. हिंदीमध्ये चिरौंजी. बेदाणा म्हणजे वाळवलेलं पिचपीचीत द्राक्ष. --- पाकृबद्दल अनेक आभार! प्रकाशची ही बर्फी खूप आवडीची आहे. या बुरा साखरेची काय भानगड आहे? असं का करायचं? डीक्रिस्टलायझेशन आणि रीक्रिस्टलायझेशन करून नेमका काय फरक पडतो?

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 25/08/2017 - 17:16
रिक्रिस्टलायझेशनने बहुतेक व्हाईटनेस मेन्टेन होत असावा. टेक्श्चर बदलले गेल्यानेही चवीत फरक पडत असावा. . . (हे सगळे हवेतले बाण आहेत. विकीपिडीतांनो क्षमस्व)

In reply to by आदूबाळ

नूतन सावंत 25/08/2017 - 18:16
बुरा साखरेने साखरेची शुभ्रता वाढते असे मला वाटते आणि दुसरे म्हणजे यप्रकाराने पाक आणि खवा मिश्रण करून बर्फी करताना बुडबुडे येऊन मिश्रण खदखदते तेव्हा हातावर उडून भाजणे टळते.

रुपी 25/08/2017 - 09:54
खासच.. चारोळ्या न घालता करुन बघेन. :)

सविता००१ 25/08/2017 - 13:24
सुरेख फोटो आलाय. नक्की करून पाहीन आता.

कंजूस 25/08/2017 - 13:49
छान सुरुवात! चारोळी हे चंदनासारख्याच झाडाचा बदाम- बी.

पैसा 25/08/2017 - 17:05
पतंजलीची बुरा साखर मिळते, तीच थेट वापरली तर?

अनन्न्या 26/08/2017 - 16:00
असंही बुरा साखर केव्हापासून वापरायचीय मला, घरी करता येते म्हणजे वापरून बघतेच!

स्वाती दिनेश 26/08/2017 - 17:24
बर्फी लय भारी.. निशामधुलिकाची ही रेशिपी मी गेल्या दिवाळीला केली होती,:) मस्तच होते बर्फी.. स्वाती

अजया 01/09/2017 - 10:53
क्लासच :) धन्य आहात तुम्ही सर्व सुगरणी.

मनिमौ 02/09/2017 - 23:08
पांढरीशुभ्र दिसतेय. मी अशीच करून बघेन

हसरी 06/09/2017 - 15:26
छान दिसतेय बर्फी. प्रकाशकडच्या ह्या बर्फीत भरपूर जायफळ घातलेलं असायचं. आता इतक्यात कधी खाल्ली नाहीये, पण इतरांकडच्या खव्याच्या बर्फ्या वेलचीच्या स्वादाच्या, पण ही मात्र जायफळाच्या स्वादाची असायची.