पहिला कृषीकट्टा - २० ऑगस्ट २०१७

मोदक's picture
मोदक in कृषी
20 Aug 2017 - 3:12 pm

"इथे कोणी गार्डनिंग करते का..? बागकामाचा छंद आहे का कोणाला..?"

आमच्या पुस्तकवाल्यांच्या ग्रुपवर सारंग नामक मित्राचा मेसेज झळकला.. "हो आवड आहे", "घरच्या घरी लहानशी बाग केली आहे" असे संदेश झळकू लागले. रोज गप्पा मारणार्‍यांची ही बाजू फार कुणाला माहिती नव्हती. मग हळूहळू एकेकाचे फोटो येऊ लागले. चिन्मय, शेफ केडी यांच्या गच्चीतले भाज्यांच्या शेतींचे भारी भारी फोटो बघून आणखी प्रेरणा मिळू लागली. ज्याक ऑफ ऑल आणि बाबा योगीराजही मैदानात उतरले आणि काय काय करता येईल हे चेकवू लागले. "मस्त.. मला प्रचंड उत्सुकता आणि इच्छा आहे, डोक्यात कल्पना खूप आहेत, बघू कसे जमतेय.. एकदा अ‍ॅक्वापोनिक्स सुद्धा करायचे आहे" शेफ केडी वदले..

सारंग प्रश्न विचारून शांत बसला होता म्हणून त्याला बोलते केले तर त्याने हळूच सांगीतले की एका वर्षामध्ये बागेतून ४० ते ५० किलो झेंडू काढतो.. आणि त्याने फोटो टाकले. ते फोटो बघून सगळे जण पुन्हा हैराण.. इतकी रिकामी जागा बघून मातीत हात घालायला सगळेजण आसूसले होतेच. अचानक केदार म्हणाला की, "आपण यांच्या बागेत जाऊन शनिवार रविवार दोन तास काम करूया.. आपल्याला बरेच शिकायला मिळेल."
लगेच सहमतीचे अंगठे आले...

"या विषयांवर लेख टाकता का कोणी..? मी मिपावर वेगळे दालन करून देतो" सरपंच प्रशांतही सपोर्टला पुढे आले...

"पुण्यात आपण एक मंडळ तयार करू आपल्यातच, दर आठवड्याला एक दिवस, शक्यतो शनी किंवा रविवार, एका सभासदकडे जाऊन बागकाम करायचं, माहिती द्यायची घ्यायची, वेगळे प्रयोग करायचे.
पुण्यात माझ्याकडे बाग नाही, मात्र मला काम करायला आणि माहिती मिळवायला आवडेल.
खासकरून कुंड्या/माती बदलणे, नवीन भरने इत्यादी अवजड काम मंडळ मजुरांकडून करून घ्यावी"

ही भन्नाट आयड्या शैलेंद्र कडून आली..

मी पहिले यजमानपद माझ्याकडे घेतले आणि तयारी सुरू केली.. "झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचा" शेतीमध्ये सध्या लहान प्रमाणावर पण यशस्वी प्रयोग करणारे अजित पाटील यांनाही आमची कल्पना सांगून अनुभव व सल्ले द्यावे यासाठी पाचारण केले.

आदल्या दिवशी बाजारातून कोकोपीट आणि बी बियाणे आणले.

सुरूवातीला १५ ऑगस्ट ठरले पण नंतर ते पुढे ढकलून २० ऑगस्ट करावे असा प्रस्ताव समोर आला. कालपासून प्रचंड आणि सतत पाऊस सुरू असल्याने किती जण जमतील याची शंका होतीच. शेफ केडी घरातून बाहेरही पडला परंतु अचानक त्याला परत जावे लागले.. आनंदराव, सेनाकर्ते, अजित पाटील, आणि प्रशांत असे मंडळ जमले.

पाऊस असल्याने खूपच कमी फोटो काढले आणि सगळे काम झाल्यानंतर फोटो काढले आहेत याची नोंद घ्यावी.

घरी जमल्यानंतर सर्वांनी बागेत एक चक्कर मारली व झाडे कुठून कुठे कशी हलवावीत व मोठ्या कुंड्या कुठे ठेवाव्यात हे ठरवले.

पावसात भिजत भिजतच सर्वांनी मिळून मोठ्या ट्रेसारख्या कुंड्या, कुंड्या ठेवलेले स्टँड वगैरे पटापट नियोजीत जागेत ठेवले.

नंतर रिकाम्या कुंड्या भरण्यासाठी मी पूर्वी जमवलेला (व सध्या पावसात भिजलेला) पालापाचोळा, कोकोपीट आणि माती असे मिश्रण तयार करून १५ ते वीस लहान मोठ्या कुंड्या भरल्या.

वांगे, टोमॅटो, कारले, मिरची आणि ढबूमिरची यांच्या बिया वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावल्या.

भरलेल्या कुंड्या आणि पूर्वी लागवड केलेल्या कुंड्या नीट रचून पुढच्या टप्प्यामध्ये आणखी काय काय करायचे आणि त्यासाठी काय काय सामान आणावे लागेल याचेही नियोजन करावयाचे ठरले.

(या कामा दरम्यानचे फोटो नसल्याने हे वाचताना खूप सहजसोपे काम वाटत असेल.. पण आंम्ही सर्वांनी मिळून ३० ते ३५ लहान मोठ्या वजनदार कुंड्या व स्टँडच्या जागा बदलल्या आणि उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला)

सगळे काम झाल्यानंतरची बाग..

.

पपई आणि लिंबू... (फळांची वाट बघणे सुरू आहे)

.

आज भरलेल्या कुंड्या - यात वांगे, टोमॅटो, कारले, मिरची आणि ढबूमिरची यांची लागवड केली.

.

देशी गुलाब

.

आबोली

.

पावसात चिंब भिजून कामे झाल्याने आंम्ही खादाडीकडे धाव घेतली..

खादाडीचे फोटो घेण्यास विसरलो. :(

आपले शेतीचे अनुभव सांगताना अजित..

.

श्रवणभक्ती करताना आंम्ही सगळे जण.. इथे आमचे प्रतिनिधी सेनाकर्ते आणि आनंदराव..

.

मध्ये मध्ये खायला चॉकलेट्स

.

जाताना प्रत्येकाला एक एक तुळशीचे रोप भेट दिले.

.

शैलेंद्रने मांडलेल्या कल्पनेला सगळ्यांनी चांगली दाद दिली आणि लगेचच सगळे जमून आले. हळूहळू हा उपक्रम नक्की बाळसे धरेल.

भेटू पुन्हा पुढील कट्ट्याच्या वृत्तांतासह...

तुम्हाला यात सामील व्हायचे असेल तर मोदक किंवा प्रशांतला व्यनी करावा.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2017 - 4:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट स्पृहणिय उपक्रम !

पिलीयन रायडर's picture

20 Aug 2017 - 5:41 pm | पिलीयन रायडर

एक नंबर रे!!

अता फक्त तो कॅप्चा काढा कृषी विभागाचा म्हणजे झालं!!

स्रुजा's picture

20 Aug 2017 - 5:47 pm | स्रुजा

फार च भारी उपक्रम ! मिपा सध्या बागकाम / झाडं / शेती मय झालंय - फार छान वाटतंय. प्रेरित होऊन मी पण मेथी वगैरे लावलीच... मोदक, तुझे हे दोन धागे आणि सासं ने परवा काढलेला हिरवाईचा धागा एका पुस्तक मालिकेत आणा ना. एकत्र राहिलं तर फार उपयोग होईल . काही शोधायचं म्हणलं तरी सोपं होईल.

हळूहळू हा उपक्रम नक्की बाळसे धरेल

.

अवश्य...नक्की..

थोडं अलंकारिक वाक्य वाटेल, पण अवचटांच्या एका लेखाचे शेवटचे शब्द अाठवले. "आता हिरवी स्वप्नं बघायला हरकत नव्हती"

सुंदर काम केलंय रे, मी मिस केलं पण पुढच्या ठिकाणी नक्की हात काळे करायला येणार, मला स्वतः काही पिकवून खायची मज्जा अनुभवायची आहे, त्यामुळे लोकांकडून शिकता येईल अश्या मीटिंगस मधून, पुढचा लवकरच ठरवू, कुठे नाही जमलं तर माझ्याकडे।

नवीन बागेत फणस, मोसंबी, लिंबू, जामफळ आणि हापूस लावलाय.

समहाऊ एकच संशय मला छळतोय की मोसंबं म्हणून
ऑर्डर दिली असताना नर्सरीवाल्याच्या माणसाने डिलिवरी (!)वेळी पपनसाचं झाड आणलंय की काय. पपनस लैच बोअर फळ आहे. ते नको होतं. रोप लावताना एक कर्मचारी (चुकून ?!) पपनस असं बोलून गेला. नंतर विचार करुन मोसंबी असल्याचं म्हणाला. आंजावर दोन्ही झाडांचे फोटू एकसारखेच दिसतात.

आता फळ धरेपर्यंत वाट पाहणं आलं....

७५% जाड भरताड साल आणि २५% पांचट गर असा पपनस नशिबी येणार बहुधा.

एस's picture

20 Aug 2017 - 8:41 pm | एस

काय भन्नाट उपक्रम आहे! थ्री चिअर्स!

(अवांतर: त्या कॅप्चाचं काहीतरी करा राव! :-( मान्य आहे की शेती माणसांखेरीज मुंग्या, मधमाश्या इत्यादी लोकही करतात, पण त्यांना अजून लिहिता-वाचता येत नसल्याने त्या इथे कशाला येतील प्रतिसाद टंकायला!!! )

स्रुजा's picture

20 Aug 2017 - 9:21 pm | स्रुजा

महालोल

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Aug 2017 - 10:27 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्तच ...
खूप आवडला हा उपक्रम..

शैलेन्द्र's picture

21 Aug 2017 - 9:11 am | शैलेन्द्र

काही महत्वाच्या, ना टाळता येणाऱ्या कामानिमित्त पुण्याबाहेर जावं लागलं, त्यामुळे हा अनुभव चुकला. अर्थातच पुढे तो घेतला जाईलच.

मोदकसाहेब, बाग मस्त दिसतेय..

स्थितप्रज्ञ's picture

21 Aug 2017 - 1:44 pm | स्थितप्रज्ञ

जमेल तसं अजून लिहून आमच्या ज्ञानात भर घालत रहा.

पद्मावति's picture

21 Aug 2017 - 9:02 pm | पद्मावति

वाह, खुप अनोखा उपक्रम.

नाखु's picture

20 Feb 2018 - 9:47 am | नाखु

पुढील उपक्रमाला सक्रिय सहभाग घेतला जाईल
तपशील इथेच कळव किंवा कायप्पावर कळविणे

चौकटराजा's picture

27 Feb 2018 - 9:37 pm | चौकटराजा

नाखु यांचा बंगला एकदम ब्येस जागा आहे .जून महिना योग्य !