Skip to main content

मराठी दिन २०१७: हरसाल (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 24/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मंग असी गरमी वाहाडत जाते मंग असा संध्याकाडी पाऊस पडते मंग असे बत्तर बायेर पडतेत मंग असे कावरल्यावानी करतेत मंग असे सकारवरी मरून जातेत मी तई घिवाऱ्या खात रायतो मी तई आमरस पीत रायतो मंग असा धुव्वाधार पानी पडते मंग असा नाल्याइले लगीत पूर येते मंग असा जगासीन संपर्क तुटते मंग असे सबइचे बाप वसुदेव बनतेत मंग असे सब पोट्टे किसन बनतेत मी तई घरी कानोबा मांडत रायतो मी तई लोकाइले बुजली वाटत रायतो मंग असी फसल तयार होते मंग असी एकाखट्टे विकाले जाते मंग असा बाजारभाव धपकन पडते मंग असा जबरदस्ती धान विका लागते मंग असा किस्तवारी पैसा मिडत रायते मी तई माया घरी देवपूजा कराले बसतो मी तई गावागावात मंडई पावाले जातो मंग असी तपन वाहाडात जाते मंग असी हिईर आटत जाते मंग असे हंडेगुंड्या एकाच हिईरीवर दिसू लागते मंग असा इरभर पानी ओलत जावा लागते मंग असा बुडबुड गंगा आंग धुवा लागते मी तई पुरणाची पोडी बनवाले बसतो मी तई होरीचा रंग खेलाले परतो मंग असा हरसाल असाचा असाच होत रायते मंग असी मानसाची उमर वाहाडातच रायते मंग असा चयरा बदलते, मंग असा नाव बदलते, तई नावाचेयर्‍यामंगाचा मानूस तसाचा तसाच रायते -- स्वामी संकेतानंद शब्दार्थ :- बत्तर :- पंख फुटलेली वाळवी कावरल्यावानी:- अधाशासारखे घिवारी:- गव्हातांदळाच्या पिठाचे घावन( विशेषतः आमरसासोबत खातात) कानोबा:- कृष्ण, जन्माष्टमीला दिड दिवसाचा कृष्ण बसतो आमच्याकडे बुजली:- गव्हाचे कोवळे रोप. कृष्णविसर्जनानंतर एकमेकांना वाटतात. खास परडीत ही बुजली तयार केलेली असते किस्तवारी:- हप्तेवारी मंडई : जत्रा तपन: ऊन इरभर: दिवसभर पानी ओलने : पाणी शेंदणे . 1

वाचने 12977
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

खूप छान स्वाम्या!

खूपच छान कविता. आणि व्यथा देखील सुंदर मांडली आहे कवितेच्या रुपाने.

सुंदर. यानिमित्ताने त्याभागातले पदार्थ रीतभाती कळल्या, एरवी आम्हाला फक्त गणपतीच माहिती दीड दिवसाचे!! घिवाऱ्या वाचल्यावर मला साधारण काहीतरी घीवर सारखं वाटलं.

मेरा स्वामी महान! मंग मी स्वाम्याच्या चरनावर डोस्कं टेकत असतो मंग मी स्वाम्याची किरती लोकायले सांगत असतो.

काही शब्द नवीन वाटले बत्तर आम्ही हा शब्द अतिशय खराब म्हणून वापरतो. बत्तर जमीन बुजली पण ऐकला नव्हता. बुजली आणि उंबइ यात काय फरक, आम्ही गव्हाच्या कोवळ्या रुपाला (फक्त गव्हाचा दाणा नाही तर ते संपूर्ण बोंड किंवा शेंग) उंबइ म्हणतो.

सुंदर ! एका आख्ख्या वर्षाच्या जीवनप्रवाहाचे एका छोट्या कवितेत चित्रण करण्याचे भारी कसब !