खुळ्या सांजवेळा...

प्राजु जे न देखे रवी...
खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ?? कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. निळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते नवा खेळ खेळे दिशांसोबती कधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला मिती शोधते आपुल्या भोवती कधी एकटे तर कधी संगतीने गवसती कशी त्यास गत्यंतरे ?? कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .. -प्राजू
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

21 टिप्पण्या 4,477 दृश्ये

Comments

ज्ञानोबाचे पैजार नवीन

अप्रतिम, फारच आवडली पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा नवीन

केवळ अप्रतिम! इतकी अप्रतिम की वाचता वाचता एक सहज चाल मनात आली , आणी पुढे त्याच चालीत म्हणूनंही पाहिली.

स्वाती दिनेश नवीन

सुरेख कविता प्राजु. आवडली. स्वाती

पिलीयन रायडर नवीन

किती सहज शब्द आलेत! कुठेही कविता जुळवावी लागली असेल असं वाटतच नाही. झरझर शब्द स्वतःच येउन कवितेत बसलेत असं वाटतंय!!

पद्मश्री चित्रे नवीन

सुरेख , बोलकी कविता..

एक एकटा एकटाच नवीन

सुरेख कवितेच्या लांब ओळींमधे लय चांगली पकडलीय