न्यूरेम्बर्ग

अफगाण जलेबी's picture
अफगाण जलेबी in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 11:02 am

दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी  (Military and Civilian)  ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला. पहिल्या महायुद्धात विमानांचा बाँबफेकीसाठी पहिल्यांदा वापर झाला आणि त्याचवेळी शत्रूच्या शहरांवर बाँबफेक करुन त्याला नामोहरम करता येईल याची सर्वच देशांना जाणीव झाली. शत्रुदेशाचे नागरिक हे एक नवं लक्ष्य असू शकतं, सैनिकांप्रमाणे ते प्रतिकारही करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं मनोधैर्य खच्ची करुन शत्रूवर दबाव वाढवता येतो. असे खचलेले नागरिक आपल्या देशाच्या सैन्याला मदत करु शकत नाहीत त्यामुळे अशा सैन्याला हरवणं आणि नागरिकांवर हुकूमत गाजवणं सोपं जातं. कित्येक वेळा आपल्या सैन्याने शत्रूवर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्याआधीच तो मनाने पराभूत झालेला असतो. आणि जर असं ' मानसशास्त्रीय ' युद्ध तुम्ही यशस्वीपणे लढू शकलात, तर तुमच्या युद्धसामग्रीची, सैन्याची आणि पर्यायाने पैशाची प्रचंड प्रमाणात बचत होऊ शकते.

दुस-या महायुद्धातले सगळे सहभागी देश ह्याच विचारांनी झपाटलेले होते. आणि म्हणूनच या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या सैनिकांपेक्षा मारल्या गेलेल्या सामान्य नागरिकांची संख्या कितीतरी जास्त आहे. या वस्तुस्थितीनेच युद्धगुन्हेगारी ह्या संकल्पनेला जन्म दिला. जरी सैनिक एकमेकांविरुद्ध लढत असले तरी युद्ध राज्यकर्ते पुकारतात. याचा अर्थ युद्धाची आणि त्यातल्या सगळ्या संहाराची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. मग त्यांना गुन्हेगार म्हणावं का? जर असं असेल तर मग नक्की किती जण युद्धगुन्हेगार म्हणायला हवेत कारण असा निर्णय हा क्वचितच एखाद्या एकट्या माणसाचा असू शकतो. बहुतेक वेळा हा निर्णय मंत्रिमंडळ मिळून घेतं. तर मग सगळेच युद्धगुन्हेगार आहेत असं म्हणायचं का? याशिवाय एकदा युद्ध सुरू झालं की दोन्ही देश परस्परांवर अनेक हल्ले आणि प्रतिहल्ले करतात. कितीतरी वेळा आक्रमण आणि बचाव यातली सीमारेषा एकदम धूसर असते. मग अशा वेळी गुन्हेगार कसा ठरवायचा? आणि सर्वात महत्वाचं - दोन देशांमध्ये जेव्हा युद्धपरिस्थिती असते तेव्हा प्रत्यक्ष लढाईव्यतिरिक्त अनेक गोष्टी घडत असतात. त्यापैकी कुठल्या गोष्टी या ' गुन्हा ' या सदरात मोडतात आणि कुठल्या नाहीत?

दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा विजेत्या दोस्तराष्ट्रांसमोर हे सर्व प्रश्न उभे होते. त्याच्यामागचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे नाझी जर्मनी आणि जपान यांच्या सैनिकांनी आणि इतर निमलष्करी दलांनी आपल्या ताब्यातल्या जनतेवर केलेले भीषण अत्याचार. १९४४ च्या मध्यापासून महायुद्धाच्या शेवटाची सुरूवात झाली. १९३९ पासून इतर देशांवर आक्रमण करणा-या जर्मन सैन्याला आता आपल्या देशातच लढावं लागत होतं. पूर्वेकडून रशियन सैन्य आणि पश्चिम आणि दक्षिणेकडून अँग्लो-अमेरिकन सैन्य जर्मनीकडे झेपावत होतं. त्यांचं ध्येय एकच होतं - जर्मनीची शरणागती.
एकापाठोपाठ एक देश नाझी अंमलाखालून मुक्त करत असताना या दोन्हीही सैन्यदलांना अनेक नाझी मृत्युछावण्या आणि छळछावण्या लागल्या. तिथले कैदी, त्यांची भयानक अवस्था आणि जर्मन सरकारचा त्यामधला सहभाग या सगळ्याच गोष्टी अत्यंत अस्वस्थ करणा-या होत्या. नाझींनी केलेला ज्यूंचा वंशसंहार ही वस्तुस्थिती आहे हे समजल्यावर पुढचा प्रश्न होता - ' मग पुढे काय? ज्या राजवटीने आपल्या आणि इतर देशांच्या नागरिकांवर इतके घृणास्पद अत्याचार केले असतील, ती राजवट उलथवणे एवढ्यावरच आपण थांबायला हवं की पुढे जाऊन या अत्याचारांना जबाबदार असणा-या लोकांना शोधून त्यांना त्याची शिक्षा द्यायला हवी? आणि ती शिक्षा अशी असायला हवी की कोणत्याही राज्यकर्त्यांची भविष्यात अशा स्वरूपाचे अत्याचार करण्याची हिंमत होता कामा नये! ' या प्रश्नाचं उत्तर म्हणून युद्धगुन्हेगारीची संकल्पना पुढे आली.

तसं पाहिलं तर या संकल्पनेत काही नवीन नव्हतं. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्याविरुद्ध विषारी वायू वापरल्याच्या आरोपावरुन तत्कालीन जर्मन सरकारने काही जर्मन अधिका-यांविरुद्ध खटले भरले होते पण ते सगळे अधिकारी निर्दोष सुटले. त्यामुळे या खटल्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. चर्चिल आणि रुझवेल्ट या दोघांनीही नाझी नेत्यांवर युद्धगुन्हेगार म्हणून खटले भरण्याची आपली इच्छा १९४१ मध्येच व्यक्त केली होती. पण त्याला मूर्त स्वरूप जर्मनीचा पराभव होणार हे निश्चित झाल्यावरच आलं.

पुढे युद्ध संपलं. अनेक नाझी नेते आणि सेनानी दोस्तांचे कैदी झाले. त्यांच्याशिवाय इतरही अनेक लोक ज्यूंच्या वंशसंहारात आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होते. या सर्वांवर खटले चालवून गुन्हे सिद्ध करणं आणि त्यांना शिक्षा ठोठावणं हे जगड्व्याळ काम होतं पण ते भविष्यकाळासाठी आवश्यकही होतं.

हे खटले अगदी २० व्या शतकाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या देशांच्या सरकारांनी भरले आणि चालवले आणि आरोपींना त्यांच्या गुन्ह्यांप्रमाणे शिक्षाही दिल्या. या सगळ्या प्रक्रियेची सुरूवात झाली ती नोव्हेंबर १९४५ मध्ये आणि स्थळ होतं न्यूरेम्बर्ग.

जर्मनीच्या बव्हेरिया राज्यात असलेल्या न्यूरेम्बर्गला नाझी राजवटीत एखाद्या तीर्थक्षेत्राचा मान होता. बर्लिन ही जरी जर्मनीची राजधानी असली तरी नाझींची सांस्कृतिक राजधानी न्यूरेम्बर्गच होती. नाझी राजवट समुदायाला भारून टाकणा-या कर्मकांडांच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होती. त्यामुळे न्यूरेम्बर्गमध्ये होणारी कोणतीही नाझी पक्षाची सभा ही अत्यंत नेत्रदीपक असे. दोस्तराष्ट्रांनी म्हणूनच नाझी तत्वज्ञानाला मूठमाती देण्यासाठी न्यूरेम्बर्गचीच निवड केली.

आज न्यूरेम्बर्ग हे एक प्रतीक आहे -  जगाने युद्धाच्या नावाखाली चालवल्या जाणा-या अमानुषपणाविरुद्ध उघडलेल्या लढ्याचं. या खटल्यांमुळे युद्धगुन्हेगारी थांबली असं अजिबात नाही पण कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणीही, अगदी एखाद्या देशाचे राज्यकर्ते आणि सेनानीही कायद्याच्या वर नाहीत आणि त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार ठरवून शिक्षा देणं ही
सा-या जगाची जबाबदारी आहे हा संदेश इथे चालवण्यात आलेल्या खटल्यांमुळे जगाला मिळाला.

न्यूरेम्बर्गमध्ये युद्धगुन्हेगारांविरुद्ध अनेक खटले चालवले गेले. त्याच्याव्यतिरिक्त जवळजवळ प्रत्येक विजेत्या आणि पीडित राष्ट्राने आपल्या नागरिकांच्या हत्येला जबाबदार नाझी अधिकारी, एस्.एस्. अधिकारी - अगदी मृत्युछावणीत पहारेकरी म्हणून काम करणा-यांवरही खटले भरले, चालवले आणि शिक्षा ठोठावल्या. एखाद्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण या युद्धगुन्हेगारांमध्ये काही स्त्रियाही होत्या.

या सर्व खटल्यांमधला सर्वात महत्वाचा खटला म्हणजे सर्व उच्चपदस्थ नाझींवर भरला गेलेला सर्वात पहिला खटला. जवळजवळ १ वर्ष (२० नोव्हेंबर १९४५ ते १६ आॅक्टोबर १९४६ ) चाललेल्या या खटल्याने पुढच्या सर्व खटल्यांचा मार्ग सुकर केला. या खटल्याचं
सर्वात मोठं योगदान हे होतं की त्यामुळे ही सगळी प्रक्रिया म्हणजे एक देखावा आणि विजेत्यांचा न्याय असल्याच्या नाझींच्या आरोपाला चोख उत्तर मिळालं.
जर नाझींनी युद्ध जिंकलं असतं तर त्यांनी त्यांच्या कैद्यांना जसं वागवलं असतं त्या तुलनेत नाझी युद्धकैद्यांना दोस्तांनी पुष्कळच माणसासारखं वागवलं हे खुद्द नाझींनी मान्य केलं. नाझी युद्धगुन्हेगारांना शिक्षा देऊन त्यांनी मारलेले लोक काही परत येणार नाहीत आणि युद्ध म्हणजे लोक मरणारच - असा युक्तिवाद काही लोक करतात. पण युद्धाचीही नैतिकता असू शकते किंबहुना असायला हवी आणि युद्धात सगळं काही क्षम्य नसतं हेच न्यूरेंबर्ग खटल्यांनी दाखवून दिलं.

क्रमश:

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2016 - 2:52 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम! वाचतोय...

चांदणे संदीप's picture

17 Nov 2016 - 3:48 pm | चांदणे संदीप

पुभाप्र!

अमोल विभुते's picture

17 Nov 2016 - 3:52 pm | अमोल विभुते

मस्त लेख....अजुन लिहा,,,, खटल्या विषयी जाणण्यास उत्सूक

वा. न्यूएर्नबेरेग ट्रायल्स वर मालिका! पुभाप्र.

रुस्तम's picture

17 Nov 2016 - 6:21 pm | रुस्तम

पु भा प्र

संजय पाटिल's picture

17 Nov 2016 - 6:26 pm | संजय पाटिल

वाचतोय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2016 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान सुरुवात. पुभाप्र.

बादवे, नुसत्या इतक्याच शीर्षकावरून फारसे लोकांना कळणार नाही लेखमाला कशावर आहे ते. तेव्हा शीर्षक उदा. 'दुसऱ्या महायुद्धानंतर - न्यूएर्नबेरग चे खटले' असं काहीसं केल्यास लेखमालेला जास्त प्रतिसाद मिळेल असे मला वाटते.

निशाचर's picture

18 Nov 2016 - 3:30 am | निशाचर

+१. पुभाप्र

प्रसन्न३००१'s picture

18 Nov 2016 - 11:52 am | प्रसन्न३००१

मस्त.... याच खटल्यावर आधारित एक टीव्ही डॉक्युड्रामा आहे 'न्युरेम्बर्ग' नावाचा... २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या डॉक्युड्रामा मध्ये अलेक बाल्डविन ची मुख्य भूमिका आहे.... यु-ट्यूब वर उपलब्ध असावा.... जरूर बघा

अजया's picture

18 Nov 2016 - 4:46 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र

सस्नेह's picture

18 Nov 2016 - 5:23 pm | सस्नेह

वाचतेय..

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 6:15 pm | स्वाती दिनेश

हा भाग आवडला,
ह्या जस्टिस प्लाट्झ ला भेट देऊन झाली आहे दोनतीनदा.. सवडीने भर घालते.
स्वाती

पण युद्धाचीही नैतिकता असू शकते किंबहुना असायला हवी आणि युद्धात सगळं काही क्षम्य नसतं हेच न्यूरेंबर्ग खटल्यांनी दाखवून दिलं.

वा!!!
पुभाप्र.

यशोधरा's picture

19 Nov 2016 - 6:56 pm | यशोधरा

पुढील लेखाची वाट बघत आहे. उत्तम सुरुवात.

मिहिर's picture

20 Nov 2016 - 7:00 am | मिहिर

उत्तम! वाचतोय.

रुपी's picture

3 May 2017 - 2:51 am | रुपी

छान सुरुवात.
पुढचे भाग प्रकाशित करताना याही भागाची लिंक द्यावी ही विनंती.