मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कडबोळी: दिवाळी स्पेशल

अनन्न्या · · पाककृती
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!! पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी! साहित्यः भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे. कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी. कृती: तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत. धुतलेले तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य भाजून घ्यावे. खूप जास्त भाजू नये. उडीद भाजताना काळजी घ्यावी. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक दळून आणावे. kadboli कडबोळी करायला घेताना एक कि. भाजणी मोजून घ्यावी, पाऊण लि. पाणी गरम करावे. ओवा मिक्सरला जरा फिरवून घ्यावा. पिठात ओवा, तिखट चार चमचे, हळद एक चमचा, मीठ मिसळावे. तेल चांगले गरम करून पिठावर घालावे. गरम पाणी घालावे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने भाजणी चांगली मळून घ्यावी. मी फूडप्रोसेसरला फिरवून घेते. तयार पिठाचा गोळा घेऊन ताटाच्या पाठच्या बाजूला लांब वळावे. मग चकलीसारखे गुंडाळावे. kadboli कढईत तेल चांगले तापवावे. तयार कडबोळी मध्यम गॅसवर छान कुरकुरीत तळावीत. लोण्याबरोबर फस्त करावीत. चकली तर वर्षभर असतेच. या दिवाळीला बघा कडबोळी करून! kadboli मी कडबोळ्याच्या भाजणीत अख्खे हरभरे घालत नाही. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते, हा माझा अनुभव पण तुम्ही वापरून पहायला हरकत नाही.

वाचने 12323 वाचनखूण प्रतिक्रिया 25

लाडू 27/10/2016 - 10:59
तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा :) कडबोळी मस्तच दिसतायत.

सूड 27/10/2016 - 14:57
सुंदर!! थट्टेने चकली बिघडली की त्याची कडबोळी होतात असं म्हणतात. पण ही रेसिपी आणि कडबोळी बघून असं अजिबात बोलणार नाही कोणी. खमंग दिसतायेत.

अशी बरोब्बर एका सारखी दुसरी कडबोळी जमतेच कशी?? तळल्यात पण करेक्ट्ट एकाच रंगावर!! मला माहिती नव्हतं की हा इतका भारी प्रकार आहे. लोक काही वाईट झालं की एखाद्या गोष्टीचं कडबोळं झालं असं का म्हणतात मग?

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 27/10/2016 - 21:09
जे लोक्स कडबोळं झालं म्हणतात त्यांनी हरभरे घातलेली कडबोळी खाल्ली असावी, त्याने जळजळ होते असे ईशाचे म्हणणे आहे.

रेवती 27/10/2016 - 21:11
अग ए! भेट एकदा...............कडबोळी घेऊन! कडबोळीचा असा आकार पहिल्यांदाच पाहतिये. आधी एकच वेढा व चिमटीत दाबणे असा पाहिला होता, खाल्ला होता, केला होता.

अनन्न्या 27/10/2016 - 21:30
आमच्याकडे कोकणात चकली नसेच कडबोळी करंजी आणि घरच्या भाताचे पोहे भेट दिले जायचे

उल्का 27/10/2016 - 22:13
भाजणीचे माहित नव्हते. आम्ही फक्त तांदळाच्या पीठाची करतो. सुंदर फोटो.

सूड 27/10/2016 - 22:47
पोह्यांचा विषय निघालाच आहे तर मध्ये कोणीतरी दिवाळीत होणाते पोह्यांचे सतराशे साठ प्रकार असलेला धागा काढला होता. त्याची लिंक आहे का कोणाकडे?