Isle of Wight
Isle of Wight
सलगच्या तीन आठवड्याच्या पावसाच्या पिरपिरीने अगदी वैताग आला होता तेव्हा अचानक दोन दिवसांनंतर येणारा विकांत सूर्यदर्शनाने उजळून निघणार आहे असे weather app ने दाखवले, तेव्हा लागलीच बुकिंग केले आणि गेल्या शुक्रवारी संध्याकाळी Isle Of Wight या British Island कडे जायचे पक्के झाले. तसे आम्ही South Of England मध्येच असल्याने राहत्या ठिकाणापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असलेल्या इंग्लिश खाडीमध्ये दिसणाऱ्या या Island वर जाणे फार काही कष्टाचे नव्हते. याआधी एकदा तिथे जाणे झाले होते, पण यावेळी नवरा आणि दोन मुले असा लवाजमा सांभाळत दुडक्या चालीने बेटावर फिरावे लागेल अशी शक्यता होती.
तर मुलांना शाळेतून आणि नवऱ्याला ऑफिसातून उचलून शुक्रवारी संध्याकाळी आम्ही Southampton या शहराच्या वाटेला लागलो. तिथून फेरीबोटने या बेटावर जाण्याची सोय आहे. (Lemington, Portsmouth आणि Southampton या तीन ठिकाणाहून Isle Of Wight इथे जाण्यासाठी फेरी बोट उपलब्ध असते.) वाटेत खाण्यापिण्याची आणि बेटावरच्या दोन दिवसांची राहण्याची सोय एवढी तयारी करून मी निघाले होते. दिवसभराच्या कामाने थकलेल्या नवऱ्याला आणि मुलांना गाडीमध्ये जरा निवांत विसावा दिला आणि मी इंग्लंडमधल्या सुसाट रस्त्यांचा सुखाने आस्वाद घेत गाडी हाकायला सुरवात केली.
विकांताला घडणाऱ्या सूर्यदर्शनाची चाहूल लागायला जणू आत्ताच सुरवात झाली होती. कारण शुक्रवारच्या संध्याकाळच्या साडेसात वाजता सुद्धा गाडीच्या खिडकीतून तिरक्या येणाऱ्या प्रखर सूर्यकिरणांनी डोळे दीपत होते...आकाश अगदी निरभ्र होते. त्यामुळे बेटावर जायचा उत्साह अर्थातच दुणावला. घड्याळच काय ते संध्याकाळ झालीये असं सांगत होतं, बाकी इतका सूर्यप्रकाश चहूकडे पसरला होता, की ती कातरवेळ लख्ख चमकावत उगवू पाहणाऱ्या चंद्राला मागे खेचत होता.
जवळपास तासा-दीडतासाचं अंतर कापत आम्ही Southampton ला पोहोचत आलो. साथीला त्या मूडला साजेशी मस्त गाणी चालू होतीच. अचानक लागलेलं "खोया खोया चाँद, खुला असमान...." हे देवानंदचं गाणं कानांवर पडायला आणि सूर्यास्त व्हायला जणु एक वेळ आली. आता मात्र संध्याकाळचं पांघरूण पायांवर अलगद ओढत सूर्यकिरणांना आत घेणं सूर्यालाही भाग पडलं आणि शेवटी आकाशात चंद्राचं शीतल चांदणं हलक्या पांढऱ्या ढगांना मागे सारत पाझरलं एकदाचं. मी गाडी बोटीवर चढवली आणि बोटीनं इंग्लिश खाडीतलं दहा मैलाचं अंतर कापायला सुरवात केली. साधारण ५५ मिनिटात आम्ही Isle Of Wight वर असणाऱ्या Cowes या बंदरावर पोहोचलो.
जवळपास चारशे स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या छोट्याशा बेटावर Sandown नावाच्या गावात आम्ही राहणार होतो. Cowes पासून Sandown पर्यन्तचा २०-२५ मिनिटांचा बेटावरचा ड्राइव्ह देखील अतिशय सुरेख होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबवर पसरलेली खुरटी झुडुपं, गालिचा सारखे भासणारे पिवळ्या फुलांचे मोठमोठे मळे, नैसर्गिकपणे तयार झालेले चढ -उतरणीचे रस्ते, मध्येच एखाद्या वळणावर दिसणारं टुमदार Thatched roof house, हवेत असलेला हलका गारवा, बघावं तिकडे निसर्गाची अशी उधळण त्या अंधुकशा संधीप्रकाशात अनुभवणं अतिशय आल्हाददायी वाटत होतं. साथीला "धीरे धीरे चल चाँद गगन में....! " हे त्या वेळेला अजून मोहक करणारं गाणं नेमकं चालू होतच. बेटावरचं आगमन तर खूप सुरेख झालं होतं. थोड्यावेळाने शेवटी राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि उद्याचा सूर्य आता या बेटावरचे अजून काय काय नव्याने उजळवणार याच्या प्रतिक्षेत मग आजचा दिवस संपवला.
Thatched Roof House
हवामान खात्याचा अंदाज अचूक होता, सकाळी जाग आली तेव्हा सूर्यकिरणं खिडकीच्या पडद्याशी येऊन घुटमळली होती. आपल्या देशात जेवढी चर्चा पावसाळ्यात पाऊस पाडण्यावर होते त्याहूनही जास्त चर्चा इंग्लंड मध्ये दिवस लख्ख असेल, की झाकोळलेला की ओला यावर होते बहुदा. असो सूर्याची मौल्यवान साथ लाभलेली बघून आम्हीही पटापट आवरून जवळच्या Shanklin नावाच्या कोस्टल टाउनकडे निघालो.
या बेटावरचे जवळपास सर्वच beaches अवॉर्ड विंनिंग का आहेत हे तिथे जाता क्षणीच लक्षात येते. प्रचंड स्वच्छता, प्लास्टिक आणि इतर सगळ्याच कचऱ्याची योग्य विल्हेवाट, स्फेटी अन हॅझार्ड वार्निंग्जच्या स्पष्ट खुणा आणि एकूणच नैसर्गिक सौंदर्य आहे असे जपण्याचा प्रयत्न या सर्वांमुळे पर्यटकांना तिथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटता येतो. काही sandy तर काही pebble beaches त्यामुळे मुलांच्या दोन्ही प्रकारच्या हौस पूर्ण झाल्या. पाणी मात्र अतिशय थंड होते. तरीही काही हौशी लोक त्यात खेळण्याचा आनंद लुटत होतेच.
इथला अथांग सागर किनारा मनाला वेड लावणारा वाटला.... लाटांचा वाळूमध्ये होणारा एक वेगळाच नाद तासंतास ऐकत राहावा इतका सुखकर होता...तिथल्या वाळूमध्ये चालताना माझ्याच उमटलेल्या पाऊलखुणा मला दिसल्या. मागच्या काहीशा अंधुकशा होत गेलेल्या आणि पुढच्या थोड्या अस्पष्ट वाटणाऱ्या...पण आत्ताच्या मात्र अगदी खोलवर उमटलेल्या....स्पष्ट...(माझ्या ब्लॉगच्या नावाला साजेश्या) असो!
किनाऱ्याला लागूनच बरीच सीफूड मिळणारी रेस्टोरंटस आहेत. साधारण अर्धा दिवस तिथे घालवून टीपीकल ब्रिटिश (cod) फिश न चिप्सचा आस्वाद घेतल्यावर मग आम्ही दुपारनंतर तिथून काढता पाय घेतला. पुढे Needles Park या UK मधल्या नैसर्गिकदृष्ट्या अतिशय देखण्या गणल्या जाणाऱ्या ठिकाणी निघालो. शॅन्कलीन हून नीडल्सला जाणारा जवळपास ४० मिनिटांचा costal drive हा तर अक्षरशः संपूच नये असं वाटणारा होता. एका बाजूला निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला लांबवर पसरलेले हिरवेगार गवत. बरोबर सायकली आणायला हव्या होत्या याची खंत यावेळी मात्र प्रकर्षाने झाली. असो, तर फ्रेशवॉटर गावाजवळच्या नीडल्स पार्कला पोहोचलो तेव्हा सोसाट्याचा वारा काय असतो हे खूप दिवसांनी परत अनुभवायला मिळाले. या cliff वर असलेल्या या पार्क मध्ये chairlift ने खाली समुद्रकिनाऱ्यावर उतरता येते. तिथून छोट्या बोटीने समुद्रात असलेल्या सुईसारखी टोके दिसणाऱ्या डोंगरापर्यंत (नीडल्स) जाता येते. हा संपूर्ण अनुभव परत एकदा घेतानाही तितकीच मजा आली. राहिलेला दिवस तिथल्या समुद्र किनारी घालवून सूर्यास्त बघून राहण्याच्या ठिकाणी आम्ही परत आलो. या ठिकाणच्या अधिक माहितीसाठी http://www.theneedles.co.uk
आजच्या शेवटच्या दिवशी आम्ही समुद्र किनार्याना थोडा फाटा देत 'The Garlic Farm' या ठिकाणी जायचे निश्चित केले. तशीही वेगवेगळं खाण्याची दांडगी हौस घरात सगळ्यांनाच, त्यामुळं या बेटावर लसणाची शेती बघायची इच्छा आवारता आली नाही. हे ठिकाण Sandown पासून अगदी १५ मिनिटांच्या अंतरावर, पण तेथे coach ने जाता येत नाही. जवळपास शंभर एकरात पसरलेली Boswell नावाच्या फ्रेंच माणसाची ही शेत जमीन लोकांना बघण्यासाठी खुली आहे.
लसणाची रोपे
एखाद्या गोष्टीचे मार्केटिंग किती सुंदर प्रकारे करता येते याचे अतिशय छान उदाहरण इथे फिरताना दिसत होते. कांदा, लसूण, मसाल्याच्या उग्र वासावरून एरवी नाकं मुरडणाऱ्या गोऱ्या ब्रिटिश लोकांना इथे वेगवेगळ्या प्रकारचे लसूण आणि त्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ विकत घेताना पाहायला जाम मजा आली. लसणाच्या उगमापासून त्याचा ब्रिटिश भूमीतील आगमनाचा इतिहास, त्याच्या जगातील वेगवेगळ्या जाती, शेतीच्या पद्धती वैगेरे बरीच माहिती तिथे मिळाली.
शेताभोवती फिरताना दिसलेली एक रम्य जागा
मी जन्मात कधी कल्पनाही करू न शकणारे असे Black Garlic n Chocolate chip Ice cream हे भन्नाट आईस्क्रीम चाखायला मिळाले. शिवाय शेताभोवतीचा long Farm Walk ही खूप छान वाटला.
मेनलॅन्डला परतण्यापूर्वीची संध्याकाळ या बेटावरच्या पुन्हा एकदा एखाद्या समुद्रकिनारी घालवावी या हेतूने मग आम्ही वाटेत लागलेल्या एका बीचवर थांबलो. हे बेट तसं खूप लहान आहे, तेथील Shanklin, Sandown, Ventnor, Ryde सगळेच समुद्र किनारे अतिशय सुरेख आहेत. कधी अगदी सपाट तर आधी चुनखडकाच्या पांढऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असे प्रत्येक किनाऱ्याचे सौंदर्य वेगळे आणि केवळ अप्रतिम. आत्ता जिथे थांबलो तिथं खाली समुद्रकिनारी जाण्यासाठी पायऱ्या होत्या. मुलांबरोबर खाली उतरण्यासाठी त्या खूप सोयीच्या वाटल्या. तिथे आम्ही पश्चिमेकडच्या क्षितिजावर झुकलेल्या सूर्याला पहात समुद्रकिनारी फेरफटका मारला आणि पुन्हा वर चढण्यासाठी मात्र छोटासा फॅमिली ट्रेक केला.
शेवटी कसाबसा जड पावलांनी या बेटाचा निरोप घेत घरी परतण्यासाठी पुन्हा एकदा Cowes या बंदरावरच्या बोटीत गाडी चढवली. समुद्रात तरंगणाऱ्या बोटीबरोबर इंग्लिश खाडीमध्ये इंग्लंडच्या अगदी जवळ असणाऱ्या या बेटावरच्या गेल्या दोन दिवसाच्या सगळ्या आठवणी मनातही तरंगू लागल्या.
टीप : - या बेटावर बघण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, advantre activities आहेत. जसे की, Robin Hill Advanture Park, Butterfly world, Dinosour Heritage, Zoo, Steam Railway, Blackgang Chine, Water sports.
आधीच्या चार दिवसाच्या भेटीत आम्ही बऱ्यापैकी सारे बघून घेतले होते. त्यामुळे या वेळच्या भेटीत त्याचा उल्लेख आलेला नाहीये. यावेळी बेटावर समुद्रकिनारी तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेत नुसते फिरणेही खूप छान वाटले.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.
http://www.visitisleofwight.co.uk/things-to-do/attractions
----अश्विनी वैद्य
वाचने
12224
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
अतिशय सुन्दर माहिती अन् भन्नाट फोटो. आत्ता भारतात बसून हे वर्णन वाचताना जसं काही तुमच्या बरोबर आहे असं वाट्लं. कधी ग्रेट ब्रिटनला परत भेट दिली अन वेळ मिळाला तर हे प्रत्यक्ष पाहणे फार च आवडेल. त्या निळ्या सागरातल्या पांढर्या शुभ्र अण्कुचीदार शिडांच्या नावांचा फोटो! क्या कहने!
In reply to खूप छान धागा. by प्रियाजी
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप मनापासून धन्यवाद...!
छान वृत्तांत व फोटू.
In reply to छान वृत्तांत व फोटू. by रेवती
+१ असेच म्हणते.
In reply to +१ असेच म्हणते. by रातराणी
Thank u so much...!
भटकंतीचं चांगलं वर्णन आणि सुरेख भाषा! तुम्ही माहितीही बरीच दिली आहे, धन्यवाद!
In reply to भटकंतीचं चांगलं वर्णन आणि by बहुगुणी
प्रवासवर्णन लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता... तुमच्या सार्यान्च्या प्रतिक्रियेमुळे अजून लिहिण्याचा हुरुप आला. धन्यवाद.
मस्त वृतांत. मस्त माहिती दिली आहे.
युकेमध्ये आल्यावर सगळ्यांत पहिले बघितलेले ठिकाण आहे हे. खुप शांत, सुंदर.
In reply to मस्त वृतांत. मस्त माहिती दिली by विशाखा राऊत
Thanks Vishakhaji
सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.
आता मात्र संध्याकाळचं पांघरूण पायांवर अलगद ओढत सूर्यकिरणांना आत घेणं सूर्यालाही भाग पडलं आणि शेवटी आकाशात चंद्राचं शीतल चांदणं हलक्या पांढऱ्या ढगांना मागे सारत पाझरलं एकदाचं.वा, मस्त :)
In reply to सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो. by यशोधरा
Thank you यशोधराजी...!
सुंदर.
जबरदस्त ! ! ! !
In reply to जबरदस्त ! ! ! ! by वेल्लाभट
धन्यवाद...!
छान लिहिलंय प्रवासवर्णन. फोटोही देखणे.निडल पार्क तर फारच आवडले आहे.तुम्ही युकेकर छान छान जागा दाखवुन पंचाईत करत आहात.जावे तरी कुठे कुठे!
In reply to छान लिहिलंय प्रवासवर्णन. by अजया
धन्यवाद... हाहाहा... इटुकला तर युके हो, फार काही वेळ नाही लागायचा तसा ...!
सुंदर वर्णन आणि फोटो ! फारच सुंदर दिसतेय ही जागा !
भटकंतीची यादी करणे संपले असे म्हणत असतानाचा असा तिला सुरुंग लावणारा धागा येते असतो ! काय म्हणावे याला ?! :)
In reply to सुंदर वर्णन आणि फोटो ! फारच by डॉ सुहास म्हात्रे
मनापासून धन्यवाद...!
क्या बात !! वाचनखुण साठवली आहे.
In reply to क्या बात !! वाचनखुण साठवली by स्रुजा
Thanks....!
सुंदर लिहिलंय..
In reply to सुंदर लिहिलंय.. by पिशी अबोली
Thank u...!
छान वृत्तांत..!! फक्त ते फोटू जरा थंबनेलसारखे छोटे छोटे झालेत. पुढच्या वेळेस साईझ नीट सेट कराल तर अजून छान होईल आणि मदत लागेल तर सा.सं (साहित्य संपादक) आहेतच इथे, त्यांना खुशाल त्रास द्या. ;)
In reply to छान वृत्तांत..!! फक्त ते फोटू by अस्वस्थामा
Thanks
फोटू थंबनेल सारखे दिसायलेत का तुम्हाला...आश्चर्य आहे. मला तर बरे दिसुन रायलेत. पूर्वपरिक्ष्ण करुन बघितलेले धागा टाकण्यापूर्वी खरतर...!
मस्त.
इकडे जवळ Gilroy म्हणून एक जागा आहे, तिथे दर वर्षी गार्लिक फेस्टिवल असतो आणि तेव्हा गार्लिक आइस्क्रीमही मिळते असं ऐकलं आहे. कधी जाणं झालं नाही पण.
In reply to मस्त. by रुपी
Thanks...इकडे म्हणजे नक्की कुठे आहे Gilory जागा ...?
In reply to मस्त. by रुपी
रूपी - बे एरियाकर आहात का?
माहितीपूर्ण सफर आवाडली, सर्व फोटो सुंदर आलेत.
In reply to मस्त ! by प्रसाद_१९८२
मनापासून धन्यवाद....!
Isle of Wight नितांत सुंदर आहे यात वाद च नाही. आपण केलेले वर्णन चपखल आहे. Isle of Wight हे आमच्या आवडत्या ठिकांणांमध्ये टॉप ला असते.
In reply to Isle of Wight नितांत सुंदर by सुहास बांदल
Thank u so much... प्रेमात पडावे अशीच जागा...नाही का?
सुंदर छायाचित्रे आणि वर्णन.
Thatched Roof House इथे केपटाऊनच्या आसपास पाहिलेत...पण त्यांना काय म्हणतात ते आता कळल.
अशीच सफर चालू द्या.
सगळ्याच प्रतिक्रियासाठी खूप मनापासून धन्यवाद
खूप छान धागा.