Skip to main content

पण नाही होत ना असं!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 16/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू, फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू, मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून. पण नाही होत ना असं, जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! आपण म्हणावं, देण्यासारखं आहे काय? थोडं प्रेम देऊन बघू, संवेदनाशून्य मनात शिंपडू थोडा मायेचा ओलावा आयुष्यभर मग तेवत राहू समईसारखं शांत पण नाही होत ना असं, तुमच प्रेम कुणाच्या खिजगणतीतही उरत नाही, फसवणुकीचे वार सहन करत निष्ठुर बनता तुम्ही प्रेम विश्वास सगळं उरतं ते स्वप्नात आणि पुस्तकात! तरीही पेटलीचं एखादी ज्योत चुकूनमाकून कधी तर आपणच तिला विझवून सांगतो, कठोर हो! न जाणो प्रेमळ असणं हाही असेल वीकपॉईंटच! आपण म्हणावं, धुमसत राहिलेल्या वेदनेला आतल्याआत संपवून टाकू, उद्या येईल त्याला हसत हसत सामोरं जाऊ, नसेल चंदेरी झालर तर आपणच विणायची एक पण नाही होत ना असं, वेदनेला जाळताजाळता आपणचं जातो पूर्ण जळून, एवढं करूनही "ती" पूर्णपणे नष्ट होतच नाही, किती केलं तरी शेवटी राखही उरतेच, त्याच राखेत शोधत राहतो भविष्याच्या नवीन आशा त्यांचीही तशीच राख होणार हे माहीत असूनही न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर?
लेखनविषय:

वाचने 8500
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! -- वाह! खूप सुरेख.

आपल्याला कितीही काहीही वाटलं तरी.. नाही होत तसं,

सुखाचं बी..सुंदर.

मस्त

मस्त

पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, मिपावर जरा पेटती काडी टाकून बघू, उडालेल्या धुराळ्यात टनांटन्यांचीचा शिमगा ऐकू, बाजूच्या कुंपणावर बसून राहू, डोळे मिटून. आयना का बायना

त्याच राखेत शोधत राहतो भविष्याच्या नवीन आशा त्यांचीही तशीच राख होणार हे माहीत असूनही न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर? मस्त कविता आवडली

वेदनेला जाळताजाळता आपणचं जातो पूर्ण जळून, एवढं करूनही "ती" पूर्णपणे नष्ट होतच नाही, किती केलं तरी शेवटी राखही उरतेच, त्याच राखेत शोधत राहतो भविष्याच्या नवीन आशा त्यांचीही तशीच राख होणार हे माहीत असूनही
सुरेख! हे वाचून वसंत कानेटकरांच्या ' गोष्ट जन्मांतरीची ' या नाटकातला एक संवाद आठवला - जगातल्या बुद्धिवंतांनी आणि ज्ञानवंतांनी मधमाशीप्रमाणे एक एक थेंब गोळा करुन ज्ञानाचं मोहोळ बनवावं आणि कुठल्यातरी वेड्या महमुदानं सत्तेच्या जोरावर त्याला भस्मसात करावं हा केवळ या जगाचाच नाही तर या ठार आंधळ्या, बहि-या आणि मुक्या नियतीचाही न्याय आहे!

सुरेख कवीता.