‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)

आतिवास जनातलं, मनातलं
मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम. अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण (भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर? अरब देशांचे आणि अमेरिकेचे संबंध कसे आहेत? त्यांचा नेमका काय इतिहास आहे? तेल सापडायच्या आधी कसं होतं जगणं अरब देशांचं? या देशांमध्ये राजेशाही कशी काय टिकली इतकी वर्ष? ट्युनिशियामध्ये, इजिप्तमध्ये क्रांतीनंतर इतक्या लवकर का भ्रमनिरास झाला तिथल्या जनतेचा? अरब जगाबद्दल हे असे कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तर शोधायची तर भरपूर वाचायला हवं. त्यासाठी मुळात आधी ‘काय वाचायचं’ ते समजायला हवं. सगळी नुसती गुंतागुंत होती. विशाखा पाटील यांनी लिहिलेलं ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक वाचलं आणि वरच्या ब-याचशा प्रश्नांची प्राथमिक उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्नही पडले – हे त्या पुस्तकाचं यश म्हणता येईल. पुस्तक साध्या-सोप्या भाषेत आपल्याला माहिती देतं आणि पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. पुस्तकाचा प्रारंभ होतो २००८ मधल्या दमास्कस (सिरिया) इथल्या ‘अरब संघा’च्या बैठकीच्या वर्णनाने. वेगवेगळे अरब देश; त्यांचे नेते; त्यांचे घडोघडी बदलणारे परस्परसंबंध; अमेरिका-ब्रिटन-रशिया-संयुक्त राष्ट्रसंघ आणि मुख्य म्हणजे इस्रायल – अशी अनेक वळणं घेत निवेदन पुढं जातं. विचारांचा गुंता वाढत जातो. सध्याची तिथली परिस्थिती समजते आहे असं वाटायला लागतं. सतरा अरब देश आणि त्यांचे आपापसात तितकेच गुंतागुंतीचे व्यवहार. एका क्षणी गळ्यात गळे घालणारे कधी एकमेकांचं तोंड पाहायचं नाकारतील, इतकंच नाही तर एकमेकांविरूद्ध उभे ठाकतील याचा भरवसा नाही. आणि पुन्हा कधी एकत्र येतील तेही सांगता येत नाही. ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांचा इतिहास एकमेकांशी जोडलेला आहे. अब्राहम हा या तिघांचाही पुराणपुरूष. पण पुढं रस्ते बदलले. या बदलाचा फटका अरब जगाने आधी इतरांना दिला पण त्याची झळ त्यांनाही भोगावी लागली. ज्यू आणि इस्लाम धर्मांच्या इतिहासाची रंजक माहिती या पुस्तकात मला वाचायला मिळाली. त्यामुळे शिया-सुन्नी यांच्यातला संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष कळायला बरीच मदत झाली. इस्रायलच्या राष्ट्रवादाबद्दल एके काळी मला असलेला आदरयुक्त दरारा संपत आलाच होता. या पुस्तकामुळे इस्रायलची युद्धखोर बाजूही मला चांगलीच कळली (तो लेखिकेचा हेतू आहे असं मी म्हणणार नाही). ज्यू समाजाला जे भोगावं लागलं त्याबद्दल सहानुभूती नक्की आहे, पण इस्रायलच्या सर्व कृत्यांचं आंधळं समर्थन मात्र नाही. असो. हे विषयांतर झालं, त्यामुळे थांबते. अरब देशांचं भौगोलिक स्थान आणि अर्थातचं तेलामुळे आलेलं महत्त्व यांचा सविस्तर ऊहापोह पुस्तकात आहे. पुस्तकाचा पट इतका मोठा आहे की मला आणखी एकदा हे पुस्तक वाचावं लागणार हे नक्की. पुस्तकात अनेकदा भूतकाळ- वर्तमानकाळ – भविष्यकाळ यांचा सांधा जोडला गेलाय, त्यामुळे माझा गोंधळ झाला. उदाहरणार्थ पान ३०-३१ वर इसवी सन ६८० मधल्या करबला लढाईचा इतिहास चालू असताना मध्येच पान ३१ वर एका परिच्छेदात १९७९ मध्ये इराणमध्ये क्रांती घडवून आणलेल्या अयातुल्ला खोमैनींचा उल्लेख मला नीटसा समजला नाही. पुस्तकाच्या अखेरीस शब्दकोष दिला आहे तसाच नामकोष पण असता तर मदत झाली असती. पुस्तकात अनेक नावं असल्याने ‘कुणाचा कोण’, शत्रू की मित्र, ज्यू की मुस्लिम, शिया की सुन्नी हे चटकन लक्षात येत नाही. मला काही नावांसाठी मागची पानं पाहावी लागली. पुढच्या आवृत्तीत नावांचा कोष अल्प माहितीसह जरूर द्यावा. अरब देशातल्या या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतावर काय झाला, होतो आणि होईल याविषयी या पुस्तकाने उत्सुकता जागी केली आहे. ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक एकदा तरी वाचावं आणि शक्यतो संग्रही ठेवावं असं आहे इतकं नक्की. पुस्तकाच्या लेखिका विशाखा पाटील या सक्रिय मिपाकर आहेत, हेही आवर्जून सांगायला हवं. कव्हर पेज धागे अरब जगाचे: विशाखा पाटील राजहंस प्रकाशन किंमत: रूपये ४००/- मुखपृष्ठ प्रकाशचित्र ‘राजहंस प्रकाशन’च्या संकेतस्थळावरून साभार
वर्गीकरण

38 टिप्पण्या 15,323 दृश्ये

Comments

चाणक्य नवीन

छान परीचय. पुस्तक घेऊन वाचीन नक्की. विशाखा यांचे अभिनंदन.

अमर विश्वास नवीन

उत्तम पुस्तक परिचय... याविषयी गिरीश कुबेर लिखीत तीन पुस्तके जरुर वाचा १. एका तेलियाने २. अधर्म - युद्ध ३. हा तेल नावाचा इतिहास आहे

अजया नवीन

पुस्तक परिचय आवडला.पुस्तकाचा आवाका खराच फार मोठा आहे.हे थोडे अभ्यासू वृत्तीने वाचायचे पुस्तक आहे.मी चक्क दोन तीन ठिकाणी पेन्सिलने नोट करून ठेवलं रेफरन्ससाठी! अजून वाचतेच आहे.अतिवास ताईंच्या कोषाच्या सुचनेशी अत्यंत सहमत.

आनंदयात्री नवीन

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. मिपाकराने लिहिलेले पुस्तक म्हणून वाचायलाच हवे.

बोका-ए-आझम नवीन

परीक्षण न लिहायचं कारण ते तुमच्याइतक्या छान शब्दांत मांडता आलं नसतं हेच आहे. विशाखाताईंनी घेतलेला outsider yet insider दृष्टिकोन आणि दांडगं संशोधन यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालेलं आहे.

इरसाल नवीन

पाचही पुस्तके विकत घेणार. १. धागे अरब जगाचे २. एका तेलियाने ३. अधर्म - युद्ध ४. हा तेल नावाचा इतिहास आहे ५. सोन्याच्या धुराचे ठसके सुचवणार्‍या सगळ्यांना मनापासुन धन्यवाद !!

अर्धवटराव नवीन

In reply to by इरसाल

पण कुबेरांसारखा साक्षेपी लेखक एका तेलीयाची इतकी भलावण करतो म्हटल्यावर आश्चर्य वाटलं होतं. तेलीया खरच गुणी पुतळा असावा. अन्यथा कुबेर साहेब भक्तीमार्गाला लागले म्हणावे.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by अर्धवटराव

त्यांचे फालतू अग्रलेख वाचल्यावर मात्र हा माणूस इतकं छान कसं लिहू शकतो असा प्रश्न पडतो. पण पुस्तकं आणि अग्रलेख हे सर्वस्वी वेगळे लेखनप्रकार आहेत. त्यामुळे ठीक आहे!

मृत्युन्जय नवीन

In reply to by बोका-ए-आझम

पुस्तके लिहिताना सर्वशक्तिमान अदृष्य शक्ती दबाव टाकुन पुस्तक मागे घेउन माफी मागायला लावु शकत नाही हे कारण असावे कदाचित.

तेजस आठवले नवीन

In reply to by मृत्युन्जय

+1 गिरीश कुबेर यांची पुस्तके खरोखरीच चांगली आहेत. "अधर्मयुध्द" हे पुस्तक लिहिताना लेखकाला किती गोष्टी बारकाईने वाचाव्या लागल्या असतील ते कळते. मात्र या शांतताप्रिय धर्माची एवढी काळी बाजू बघिल्यावरही जर लोकसत्ते मधले अग्रलेख समतोल दृष्टीने ते लिहू शकत नसतील तर हे मात्र खरेच दुर्दैव आहे. ह्या मागे त्या शांतताप्रिय अदृश्य शक्तीचा हात नक्कीच असावा ! "एका तेलियाने" हे मात्र अगदी भन्नाट पुस्तक आहे. सौदी, कट्टरता ,धार्मिकता वगैरे सगळे आपण विसरून जातो हे पुस्तक वाचताना, किंबहुना अगदी आपल्या डोक्यात सुद्धा हे विचार येत नाहीत. एखादा माणूस कसा काही जबरदस्त गोष्टी करून जातो आणि दूरदृष्टी हा शब्द जे खरोखरच जगतात अशी द्रष्टी लोक असतात तरी कशी हे नक्कीच उमजेल. जरूर वाचावे.

पगला गजोधर नवीन

In reply to by तेजस आठवले

गिरीश कुबेर यांची पुस्तके खरोखरीच चांगली आहेत. "अधर्मयुध्द" हे पुस्तक लिहिताना लेखकाला किती गोष्टी बारकाईने वाचाव्या लागल्या असतील ते कळते. मात्र या शांतताप्रिय धर्माची एवढी काळी बाजू बघिल्यावरही जर लोकसत्ते मधले अग्रलेख समतोल दृष्टीने ते लिहू शकत नसतील तर हे मात्र खरेच दुर्दैव आहे. ह्या मागे त्या शांतताप्रिय अदृश्य शक्तीचा हात नक्कीच असावा !
बरोबर आहे, शिवाय भारतामधे महात्मा गांधी हत्या, बाबरी मस्जिद तोडणे, गुजरात दंगे यां घटनांच्याही मागे कुठलीही संघटना नव्हती, तर बहुदा हीच अदृश्य शक्ती कार्यरत असावी.

तेजस आठवले नवीन

In reply to by पगला गजोधर

बरोबर आहे, शिवाय भारतामधे महात्मा गांधी हत्या, बाबरी मस्जिद तोडणे, गुजरात दंगे यां घटनांच्याही मागे कुठलीही संघटना नव्हती, तर बहुदा हीच अदृश्य शक्ती कार्यरत असावी.
अगदी बरोबर. गांधीजींची हत्त्या ज्याने केली त्याला त्याची शिक्षा मिळाली.बाबरीच्या खटल्याचे नक्की पुढे काय झाले ते मला माहित नाही त्यामुळे त्यावर मी टिप्पणी करू शकत नाही,क्षमस्व. गुजरात दंग्यांमध्ये मीडिया ट्रायल नुसार जो माणूस आरोपी ठरवला जात होता त्याला कोर्टाने दोषी ठरवलेले नाही. 1992 चे मुंबई बॉम्बस्फोट, गोध्रा कारसेवकांची हत्या, भिवंडी मध्ये दोन पोलिसांना जाळून मारणे, तसेच रझा ऍकॅडमी ने काढलेला शांततामय मोर्चा ह्या मागे सुद्धा कुठलीही संघटना नव्हती बाकी लोकसत्ताच्या अग्रलेखाचा उल्लेख करण्यामागे याकूब मेनन च्या फाशी नंतर लिहिला गेलेला अग्रलेख हे मुख्य कारण आहे. इतके वर्ष न्यायालय, पोलीस, सरकारी संस्था, मिळालेले पुरावे आणि इतकी सगळी मेहनत घेऊन उभा केलेला तो खटला हा जणू काही एक कुंभांड आहे अश्या स्वरूपात त्या लेखात मांडला होता.( हे माझे वैयक्तिक मत आहे आणि इतरांना वेगळे किंवा अगदी पूर्णपणे उलट मत असण्याचा अधिकार मला मान्य आहे.) ज्यांनी इतक्या मेहेनतीने आणि चिकाटीने सर्व साक्षी, पुरावे गोळा केले, ते न्यायालयात सिध्द केले, आरोपीला बचावाची संधी देण्यात आली ; एवढे सगळे असून सुद्धा जणू काही चोर सोडून संन्याशाला फाशी दिले जात आहे असे मत त्यात व्यक्त केले गेले होते. सर्वोच्च न्यायालय जणू काही बिनडोक आहे आणि ते निरपराध माणसाला दोषी ठरवत आहेत असे प्रतीत केले गेले. मला तरी तो अग्रलेख वाचून फार विषण्ण वाटले. निदान ज्या माणसाने मध्यपूर्व देशात चाललेल्या असंख्य हत्याकांडाचा ह्या पुस्तकांच्या निमित्ताने अभ्यास केला असणार त्याने तरी समतोल मत मांडावे अशी माझी तरी प्रामाणिक अपेक्षा होती.(अधर्मयुध्द ह्या पुस्तकात मध्यपूर्वेतील हत्याकांडाचे उल्लेख आहेत, अगदी फोटो सकट) मग ह्या खटल्यात तर आरोपीला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली असताना त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले अश्या प्रकारचे जे चित्रण मांडले गेले ते मला खटकले. विषयांतराबद्दल क्षमस्व. वैयक्तिक आकस नाही आणि नसावा.धन्यवाद.

पूर्वाविवेक नवीन

मी हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर मला कळलं की विशाखा ताई मिपाकर आहेत. खूप अभिमान वाटला. मी हे पुस्तक खूपच सावकाश वाचले. काही प्रकरणे पुन्हा पुन्हा वाचली. खरंच अरब जग आणि मुस्लिम धर्म हि महाभयंकर गुंतागुंत आहे. फार आवडलं मला हे पुस्तक, खूपच अभ्यासपूर्ण आहे.

विशाखा पाटील नवीन

उत्तम पुस्तकपरिचयासाठी आतिवास यांचे आभार! लेखात म्हटल्याप्रमाणे पुढल्या आवृत्तीत नामकोश टाकण्याचा प्रयत्न करेन. बाकी ज्यांनी वाचून प्रतिक्रिया दिली आहे, जे वाचणार आहेत त्या सर्वांचे आभार! :) @अभ्या, कव्हर चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे.

अनिरुद्ध.वैद्य नवीन

हे अन वरील पुस्तके (जी केव्हापासुनची यादीत आहे, त्यांना) आता वाचावच म्हणतो!

सुधीर नवीन

वाचायच्या पुस्तकांची यादी लांबतच चालली आहे.
त्यासाठी मुळात आधी ‘काय वाचायचं’ ते समजायला हवं. सगळी नुसती गुंतागुंत होती.
सगळ्याच बाबतीत हे खरं आहे. मिडल-ईस्टच्या इतिहासावर वर वाचण्यासाठी विल्यम क्लेवलँडचं पुस्तकाची नोंद केली होती. वर उल्लेखलेल्या पुस्तकांचीही भर आहेच.

आतिवास नवीन

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. खुद्द लेखिकेने पुस्तक परिचयाच्या धाग्यावर प्रतिसाद नोंदवावा हे सुखद आहे.

प्रभाकर पेठकर नवीन

ह्या महिन्यात भारतभेट आहे. वरील पाचही पुस्तकं विकत घेण्यात येतील. अरबांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य वाचायला नक्कीच आवडेल.