या पुस्तकांची माहिती मिळेल का ?
लेखनप्रकार
साधारण ८ - ९ वर्षांपूर्वी , ही पुस्तकं माझ्या वाचनात आली होती . खूप आवडलीही होती . पण पुस्तकाचं किंवा लेखकाचं नाव लक्षात ठेवावं म्हणजे त्या लेखकाची बाकीची पुस्तकंही वाचता येतील किंवा तेच पुस्तक नंतर कधीतरी वाचता येईल एवढी अक्कल त्या वयात नव्हती . आता मी त्या पुस्तकांचं साधारण कथानक सांगते . मिपावरच्या वाचनप्रेमींपैकी कोणी वाचली असतील तर कृपया पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव सांगा . मी फार आभारी राहीन .
१ - हि एक पेंग्विन्स च्या आयुष्यावर आधारित कादंबरी होती . म्हणजे माणसांच्या दृष्टिकोनातून पेंग्विन्सची माहिती नाही ; तर यातली प्रमुख पात्रंच पेंग्विन होते . शेकडो पेंग्विन्स च्या एका वसाहतीतील एका पेंग्विन कपलच्या दृष्टिकोनातून हि कादंबरी आहे . त्यात पेंग्विन्सचं स्थलांतर , प्रवास , मादीची गर्भधारणा , अंडं काही आठवड्यांसाठी नराकडे सुपूर्त करून शिकारीला निघून जाणं , शेकडो नरांनी काही आठवडे काहीही न खाता पिता गोठवणाऱ्या थंडीत स्थिर उभं राहून ते अंडं उबवणं , त्यात काही दुर्दैवी अंडी फुटणं , पुढे मग पिल्लाचा जन्म , नरमादी दोघांनी मिळून त्याला वाढवणं , पोहायला - शिकार करायला शिकवणं , शार्कपासून पेंग्विन्सना असणारा धोका अशा अनेक प्रसंगांतून पेंग्विन्सच्या जीवनाबद्दल रसाळपणे माहिती दिलेली आहे .
पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव दोन्ही आठवत नाही . फक्त यातल्या मुख्य पेंग्विन कपलचं नाव लक्षात आहे - विक्रम आणि मेदिनी .
२ - हे एक पुस्तक नाही तर एका भयकथासंग्रहातील एक कथा आहे .
एक दहा - अकरा वर्षांचा मुलगा - एकुलता एक , आईवडलांचा लाडका , गुणी मुलगा . घरची परिस्थिती मध्यमवर्गीय . मुलाचा शहरात राहणारा , श्रीमंत , मुलबाळ नसलेला मामा त्याला मी दत्तक घेतो असा आग्रह करत असतो पण आईवडील मुलाला दूर पाठवायला तयार नसतात . एकेदिवशी शाळेतून घरी येताना एक मांजराचं पिल्लू घरी आणतो . अतिशय कुरूप - हडकुळं पिल्लू. मित्राच्या घरी मांजराची आईला ते प्रथमदर्शनीच आवडत नाही , भीती वाटते . ती आधी ते सोडून द्यावं म्हणून धाक घालते , मग आपण छान गोजिरवाणं पिल्लू आणूया म्हणून आमिष दाखवते . पण एरवीचा हट्ट न करणारा मुलगा याबाबतीत मात्र जाम अडून बसतो . शेवटी नाईलाजाने आईवडील पिल्लाला ठेवायला परवानगी देतात . पिल्लाला कितीही खायला घातलं तरी ते अंग धरत नाही , तसंच हडकुळं राहतं , घरातले दूध आदी पदार्थ चोरून खातं , मारायला गेल्यास हिंस्त्र पवित्रा घेतं , एकदा आईला नखांचा चांगलाच प्रसाद देतं . पिल्लू आल्यापासून मुलाचं अभ्यासातलं लक्ष उडतं , बाहेर खेळायला जाणं कमी होतं , शाळेतून आल्यावर सतत पिल्लाशी खेळणं , त्याचे लाड .
आई वडिलांनी रागावून , समजावून काही उपयोग होत नाही . एक दिवस ज्या मित्राकडून पिल्लू आणलं असं मुलाने सांगितलेलं असतं त्याच्या घरी मुलाची आई जाते . तर तिथे कळतं की त्यांच्याकडे कधी कुणी मांजर पाळलेलंच नाही . मुलगा याआधी कधी खोटं बोललेला नसतो . घरी आल्यावर आई आणि वडील दोघे खडसावून मुलाला विचारतात की पिल्लू कुठून आणलंस हे खरं खरं सांग .
तर तो रडकुंडीला येऊन शेवटी नाईलाजाने सांगतो - गावात पछाडलेली म्हणून जी विहीर कुप्रसिद्ध आहे तिथून आणलं . आई वडिलांना धक्काच बसतो . त्या विहिरीवर गावातल्या एका सासरी छळ झालेल्या बाईने आपल्या मुलांसकट जीव दिलेला असतो , तिथे गावातल्या अनेकांना काही ना काही वाईट अनुभव आलेले असतात . पिल्लाचा उपद्रव सुरूच असतो . पुढे काही दिवसातच मुलाच्या नकळत आईवडील त्या पिल्लाला दुधातून अतिशय जालिम विष घालतात . पिल्लू मरतं . त्याला लांब पुरतात . पिल्लू गायब झालं हे कळताच मुलगा आकांत करतो , खाण्यापिण्यावरचं लक्ष उडतं , तापाने फणफणतो . आईवडील अतिशय चिंतेत पडतात .
इथून पुढची कथा नीटशी आठवत नाही .
पिल्लाला जिथे पुरलेलं असतं तिथून घरापर्यंत छोटे छोटे पंजाचे ठसे मातीत उमटलेले दिसतात . आणि आईवडील मुलाला मामाकडे शहरात पाठवून देण्याचा निर्णय घेतात , असा शेवट आहे .
हि पुस्तकं कुणी वाचली आहेत का ?
वाचने
3356
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
पहिली कथा मी पाहिलेल्या मार्च ऑफ द पेंग्विन्स या डॉक्यूमेंटरीची असावी. नॅशनल जिऑग्राफिकने निर्मिलेली आणि मॉर्गन फ्रीमनच्या निवेदनातील ही चित्रफीत पाहून संग्रही ठेवावी इतकी नितांतसुंदर आहे. मराठीत पुस्तक आलं असेल तेही वाचायला आवडेल. ं
In reply to पहिली डॉक्यूमेंटरी असावी मार्च ऑफ द पेंग्विन्स by बहुगुणी
हीच चित्रफित हिंदीत अमिताभ बच्चनच्या आवाजात आहे.
In reply to पहिली डॉक्यूमेंटरी असावी मार्च ऑफ द पेंग्विन्स by बहुगुणी
धन्यवाद . चित्रपट पाहीन आता . पुस्तकाचं नाव कळलंच तर सांगेन .
एम्परर पेन्ग्विनसची चित्रफीत आहे ती अशीच आहे.पुस्तक माहित नाही.
In reply to एम्परर पेन्ग्विनसची चित्रफीत by कंजूस
धन्यवाद .
तुमच्या दुसऱ्या कथेचे लेखक नारायण धारप असावेत असा अंदाज आहे. कारण मलाही ही कथा वाचल्याचे स्मरते. पण नाव आठवत नाही
In reply to तुमच्या दुसऱ्या कथेचे लेखक by ज्योति अळवणी
मलापण धारपच लेखक असावेत असं वाटतं .
पांडूला माहित असेल .
पहिली डॉक्यूमेंटरी असावी मार्च ऑफ द पेंग्विन्स