दुर्गराज ते दुर्गदुर्गेश्वर मार्गे अग्याची नाळ. - एक थरारक प्रवास.
असो.
दिवस पहिला-
सकाळी पुणेकर मंडळी आली, गाठीभेठी झाल्या, अत्यंत वेगात पाली गावात दाखल. नानांच्या घरी नाना व उस्मानाबादकर मंडळी वाट च पाहत होते. घमेलीभर पोहे हादडले, बाटल्या भरल्या, शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला व राजमार्गाने २३ भटके मेणा दरवाज्याकडे चालते झाले. खंडोबाच्या माळावर ओळखपरेड पार पडली तसे ओंकारदादांनी नियोजित कार्यक्रम सांगितला, तो असा राजगड -अळू दरवाजा-बुधला-भट्टी - हरपुड- मोहरी-मुक्काम - सिंगापूर नाळ- पाने - मुक्काम - रायगड. या संमिश्र चमू चे नेतृत्व ओंकार दादांकडे असल्याने आम्ही निर्धास्त होतो. दादांच्या मदतीला कांचेश्वर हे एक अजब रसायन होतं. श्रावण संपलेला, राजगड चे सौदर्य आणखीनच खुलून होतं. यंदा कारव फुलाल्याने सोने पे सुहागा ! कारवीने सर्वत्र जांभळ्या रंगाची उधळण केलेलीच.सोबतीला सोनकी, रानहळद यांच्या पिवळ्या फुलांनी पिवळ दुलई पसरलेली.
२.कारवी फुललेली
बघता बघता पाली दरवाज्यातून पद्मावतीवर आलोही. पद्मावतीचे आशीर्वाद घेत संजीवनीकडे कूच केली, २.५ किमी ची संजीवनी माची दोन्ही बाजूनी चिलखती तटबंदीने बांधून घेतलेली. वास्तुशाश्त्राचा अजब नमुनाच!! तो पहावाच, शाब्दांत वर्णन कठीणच !आता उजवीकडे दूरवर तोरणा तिच्या लांबवर पसरलेल्या बुधला मचीसह आमची वाटच पाहत होता. डावीकडे दूरवर येसाजी कंक जलाशय सूर्यकिरणे परावर्तीत करत संथ पडला होता. संजीवनी उतरताना निसर्गाने कौल आमच्या बाजूने दिल्याने सर्वजण जम खुश. वातारण ढगाळ झाले, सरी बरसल्या, गारवा दाटून आला, धुक्यात परिसर गडप झाला. उन लागणार नाही यामुळे सार्वजन हरकून गेले.
३.संजीवनी उतरलो
नायगावकरांच्या नेतृत्वाखालील या चमूचा वेग पाहता ५ सदस्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत खिंडीतून पाली instead of रायगड असा बेत केला व तो तडीस नेलाही.
तर इकडे उरलेले आम्ही १७ जन धुक्यांत हरवलेल्या कारवी झाकलेली वाट व त्या वाटेवरील कराव फुलांचा सडा तुडवत कोंढाळकरवाडी गाठली.
५.स्वर्गातील वाट
६.बांबूच्या बेटात ग्रुप फोटो
सर्वत्र धुक्याचं साम्राज्य, बुधला माची कुठच्या कुठे अदृश्य, भट्टी गाव त्यापलीकडे. इथे एक आजोबा गुरे चारत असलेले दिसले, ओंकारदादा, रवीदादा, शैलेश दादा असे त्रिसद्स्सिय शिष्टमंडळ त्यांच्याकडे अचूक वाटेची माहिती घेण्यास गेले असता, पसली जवळ आहे असे बाबांकडूनऐकताच पूर्वनियोजित प्लान ३६० मध्ये वळवून परत आले. कारण पसलीतून अग्याच्या नाळी मार्गे रायगड जवळ पडेल व हा मार्ग दोघांनी आधी केलेलाही होता (पण डिसेंबर मध्ये)
झालं !! अग्याच्या नाळीची घोषणा झाली, उत्तरादाखल आम्ही "अपनेकू क्या बस रायगड पाहुचना है !!"असे सर्वानुमताने अनुमोदन दिले अन् प्रवास सुरु थरारक, उत्कंठावर्धक घटनाक्रमाने भरलेला. सिंगापूर नाळेने जाणारे रस्ते, भट्टी हे गाव बुधला माची पलीकडेच ठेवून आम्ही कोंढाळकर वाडीतून पसलीकडे चालते झालो. धुक्यातून वाट शोधत एक टेकडी उतरून, भातशेती तुडवत एक ओढा पार करून जोरकरवाडी रोड वर आलो. जरा आराम केला न भूकेने तोंड ऊघडला सुख खाऊ, चटपटीत, खुशखुशीत मालमसाला निघाला मजा केली ;) ;)
७.जोरकरवाडी रोड वर खाण्याचा प्रोग्राम झाला
पासलीकडे रवाना झालो बार्शीचा माळ मागे टाकून एक ओढा पार करून पसलीत आलो, ७:१५ झालेले. स्वच्छ वातावरण, सकाळच्या सोनेरी किरणांनी सृष्टी अगदी न्हाऊन निघालेली.गवतावरील दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते जणू एखद्या चित्रकाराने स्वप्नातला स्वर्ग कॅनवास वर उतरवलाय कि काय !!
९.पसलीकडे रवाना. डावीकडून- पार्टे, शिर्के, रवी शेडगे, योगेश आलेकरी`
पोरं आनंदानं उड्या मारायला लागली, हरकून गेली, बहरून गेली, बागडून गेली. लक्ष्य नजरेच्या टप्प्यात आलं होतं, जर निवांत पण झाला नुकतच प्रसिद्ध पावलेल्या एका लोक गीतावर (शांताबाई )थोडीशी मज्जा मस्ती झाली.
१२.शांताबाई या लोकगीताची चित्रफित बघताना मान्यवर
रस्त्याने सरळ सिंगापूर च्या दिशेने गेल्यावर डावीकडील उतारावर २-४ घरं दिसतात त्यामागुनच घळीला वळसा घालून पुढे येउन अग्याच्या नाळीच्या तोंडाशी येणारी कायदेशीर वाट बाजूला ठेऊन लवकर रायगड गाठण्याच्या आशेने या बेकायदेशीर मार्गावर पाय ठेवला अन् झाला एक भन्नाट प्रवास सुरु- इथली वाट म्हणजे वाट नव्हतीच मुळी. ओंकारदादाने दूरवर बोट करून एक टेकडी दाखवावी व सांगायचं तिथ जायचय. जिथून न जस सोप्पं पडेल तसं आपलं आपण जायचं.
हां हां म्हणता सर्वजण त्या उतारावरील झाडीत घुसली, झाडं-झुडपं, गवत, तण काटे -कुटे कशाची तमा नव्हती बस एक च ध्येय रायगड !! क्षणार्धात खालच्या पठारावर पोहचलो एकेकाचा मलिंगा झालेला.
१६.रायगडाकडे डोळे लाऊन बसलेले कार्यकर्ते
सर्व एकत्र जमलो व पुन्हा अशीच एक विस्कळीत घुसखोरी करत खाली भात शेतीत उतरलो, चिखलगाळ तुडवीत ओढ्यात आलो, बुट्ट धुवून काढली न लगेच पुढच्या घुसखोरीस सज्ज! पुन्हा तसाच.
१७.
आता असाच सर्वजण वरच्या दिशेने घुसलो ते थेट नाळीच्या काठावरच अवतरलो, आता पंचायत झाली समोर तुटलेला कडा, डावीकडे खोल दरी तर नाळीत उतरायची जागा म्हणजेच तोंड उजवीकडेच खूप वरती राहिलेलं . मग काय पुन्हा घुसखोरी अक्षरश: गव्यांचे कळप पिकांत घुसावे तसे. यासाठी उर्जा ? ती म्हणाल तर दुर्गराज रायगड !! एक च उत्तर !
१९.नाळेच्या काठावर पोहोचलो , समोर तुटलेला कडा
आता नाळ म्हणजे काय ? तर दोन कड्यांच्या मधून उतरता येईल अशी निमुळती जागा, बहुतांशी ती पाण्याच्या प्रवाहाची असते. आपल्याकडे बहुतांशी नाळी या घाटावरून कोकणात उतरतात. पैकी हि एक.
तर अशी हि रौद्रभीषण अग्याची नाळ उतरायला लागलो तेच एक एक आव्हानं पेलत. पावसामुळे सर्वच निसरडे झालेले, त्यात उतरायची वाट झाडाझुडुपात गडप झालेली. त्यामुळे अगदी जनावराप्रमाणे मुसंडी मारणे एकच पर्याय! ओरबाडत, सरपडत, सरकत, वाकून, रांगत जमेल तसे प्रयत्न करत एक एक जन अर्ध्या तासात ते झाडा झुडूपानी वेढलेले तोंड संपवून कारवीत आले,इथ जरासा आराम मिळाला पण पाऊस सुरु झाला आणि खरचटलेल्या जखम टोचू लगल्या पण थोड्याच वेळात त्या बधीर होणार होत्या व झाल्याही. पुढे मोठ मोठी दगड धोंडे पार करत मध्यावर पोहचलो. जरा फोटोग्राफी ला उसंत मिळाली.
२१.ब्लॉग लेखकाची एक स्वतंत्र छबी
दोन्ही बाजूला सरळसोट कातळ, खाली भयाण खोली, व त्यामध्ये वीरा नदीचे खोरे. घनदाट जंगल, रोंरावत कोसळणारे धबधबे , वरून आभाळ दाटलेलं, पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेत गती वाढवली. २ तासांच्या अविश्रांत कष्टाने नाळ उतरलो खरं तर ४ लाच शेवटच्या टप्प्यात उंचच उंच वृक्षानि वेढलेला परिसर भायाणतेची जाणीव करून देत होता. शेवटचा अवघड टप्पा पार करून थेट एका धबधब्या समोरच आलो. वर झालेल्या पावसामुळे पाणी वाढलं, धबधबा जोमाने कोसळू लागला होता. त्यामुळे तयार झालेल्या डोहात १:३० तास येथेच्छ बागडलो, अगदी मनसोक्त!!
२२.
एक चित्रफीत --->
एक चित्रफीत --->
(इथून पुढे सर्व कॅमेरे बंद करून ठेवल्याने फोटो दुष्काळ जाणवेल )
नाळ उतरल्याच सेलेब्रेशन कोणी जलपरी होऊन तर कोणी २ कवचाच कासव दाखून तर कोणी आदिमानव होऊन केले. :D कंटाळलो !!घड्याळात पाहिलं ५:३० होऊन गेलेले. २ तास बाकी आहेत असा शैलेशचा आश्वाशक आवाज आला. म्हणजेच ७:३० ला गावात जाऊन झोपायचं, किती सुंदर कल्पना. आता हि धबधब्याची नदी आमची सोबती होती. दोन्ही बाजूला उंचच डोंगर घनदाट वृक्षांनी वेढलेले तर खाली दगड धोंड्यांची शेवाळलेली, वेगवान पाण्याच्या खळखळाटाची नदी, मज्जा वाटत होती. दे दणादण करत २० च मिनिटात एका रौद्रभीषण ठिकाणावर आलो. नदीचे तोंड निमुळते झाले दोन्ही बाजूला घनदाट झाडी अन समोर प्रलयकारी वाटावं असा एक धबधबा ६०/७० फुट खोल कोसळत होता पुढे इंच भर देखील सरकायला संधी नाही. पाऊस सुरु झाला, निसर्ग विरोधात गेल्याची पहिली सूचना. वेळ जात होता ६ वाजले. मार्ग सुचेना धो धो पावसाने वाढत्या पाण्याने कड्याच्या बाजूने जाणारी निसरडी वाटही बंद झालेली, शैलेशने उजवीकडे वरती जाणारी वाट शोधली थोड समांतर चालत गेल्यावर ५०-६० फुटांवर तीही संपली. आता त्या धबधाब्याचे भयंकर रूप समोरून दिसू लागले. त्याची दाहकता आता भासू लागली कारण आता आम्ही त्याच्या बाजूच्या कड्यावर आलो होतो. आम्ही असाच पुढ पुढं सरकत होतो दिशाहीन. कंचेश्वर दादा पुढे सरकले गवत झाडे झुडुपे यातून वाट पाह्यला न एक ५/६ फुटाचा हरणटोळ साप त्यांच्या हातात. दादा धावत मागे! आता मात्र एकेकाचा संयम सुटू लागला. नीट सिंगापूर नाळेने चाललो होतो ते इकडे येउन अडकलो अशीही काही वाक्ये निघाली.
आम्ही पुरते अडकलो होतोच मार्ग निघणे कठीण झालेले. वरून पाऊस, खाली चिखल, नदीतून जावे तर तोही आता बंद, बाजूने जंगलात घुसलो एका बाजूला कोसळणाऱ्या धबधब्याच्या कडा तर एकीकडे जंगल. घुसखोरी एकच उपाय !
आता मात्र परिस्थीति हाताबाहेर जात होत होती, बाग ठेऊन अनुभवाच्या जोरावर वाट काढावी असाही मनात आलं पण म्हंटल बघू जरा वेळ कोणी पुढाकार घेतय का. नाहीतर आहोतच आम्ही ;) असही त्राण उरलं नव्हतं अन् ब्याग चिखलात ठेवायची इच्छा नव्हती. आणि आता मागून नायगावकर पुढे आले ब्याग टाकून घुसले कुठेतरी अगदी जनावरासारखे कडा कड, धडाधड आवाज करत काटे कुटे मोडत पलीकडील एका झऱ्यात उतरले तो झरा खाली नदीत घेऊन जाणारच मग आवाज दिला एका मागमाग एक निघालो . आजूबाजूची कारवी पकडून ठेवायची पुढचा गेला कि सोडायची कि,सर सट्याक आपण त्याच्या जागी, मागचा आपल्या जागी,अगदीआपोआप . अशी त्या उतारावर लटकलेली रंग दिसू लागली. घसरगुंडीचा आनंद अगदी फ्री मध्ये मिळाला होता. बघता बघता सार्वजन लोळत, रांगत, सरपडत या नाळेतील शेवटच्या टप्प्यावर आले , रॉक प्याच पिंपळाच्या मुळीच्या सहाय्याने उतरलो.
रक्ताच व मातीचे नातं काय असतं व ते कसे जुळतं हे पुरेपूर सोदाहरण उमगले होते.
नदीत आलो, मागे तो रुद्रावतार कोसळतच होता त्याला वाकुल्या दाखवत जिंकल्याच्या अविर्भावात पुन्हा जल्लोष झाला . ७ वाजलेले अंधार दाटलेला. आता २ च तासात गावात, किती सुंदर कल्पना. फक्तअर्धा तास लेट. dosn't matter . अंधार पडला टोर्च निघाले, किती ? ६ अन् माणसे १७ . अजून एक संकट. तोडगा निघाला १:३. नदी नुसत्या दगड गोट्यांनी भरलेली, शेवाळलेली, बुळबुळीत झालेली पाय ठेवताच प्रसाद. एक एक पाऊल जिकिरीने न सांभाळून टाकाव लागत होतं. पावला-पावलावर आधाराची गरज नाहीतर ? डुबुक! :D साखळी करूनच पुढे सरकत होतो. कुठे उथळ तर कुठे खोल तर कुठ मोठ मोठ्ल्या शीळा. कोकणातील खट्याळ, वेगवान नद्यांत तग धरणे लईच मुश्कील झालेले, पण पर्याय नव्हता.
८ वाजले चालतोयच. अजूनही बाजूनी डोंगर दिसत होते, पावसाच तर काही सोयारसुतकच राहिलं नव्हतं. खरचटलेल्या जखमा बधिर झालेल्या. बस आज दापोली न उद्या रायगड एवढच दिसत होतं. ९ वाजले गावाचा आता पता नाही, अजूनही नदीतच, दूर दूर वर लाईट etc चा नामोनिशाण नाही. आत्ता मात्र कहर झाला होता तब्बल २तास पाण्यातील चाल अक्षरश: काहीजण ब्यागेसह पाण्यात पडली, बुडाली, पुन्हा उठून चालू पडायचं. एक शब्द नाही तोंडातून . सांगतो कोणाला ? ऐकतो कोण ? सावंच दुखणं सारखाचं . !!!
कंचेश्वर दादा,मी व रवि दादा वाट शोधायला मोठ्या torch घेऊन पुढे होतोच. काठीने पाणीच्या खोलीचा अंदाज घ्यायचा डोह पार करायचा. कधी गुडघ्या एवढे तर कमरेएवढे तर कधी छाती एवढे पाणी रात्रीच्या अंधारात ब्याग डोक्यावर घेऊन ते पार करणे म्हणजे एक दिव्यच. ! पायाखाली निसरडे दगड गोटे, काटे कुठे, वाहून आलेली फांद्या असलं काहीही आम्हाला रोखू शकत नव्हतं. कधी नदीच्या उजवीकडून तर कधी डावीकडून मार्ग मिळे, नदी क्रॉस करणे आले की , मानवी साखळी करूनच पार करायची ट्रेकिंग हे टीम वर्क कसे असते सर्वाना एव्हाना ज्ञात झाले होते. पात्र अरुंदच पण वेगवान प्रवाह, दगड गोटे यामुळे जिकीरीचे झालेले.
आणखी एक चित्रफीत -->
आणखी एक चित्रफीत -->
१० वाजले ! अजूनही नदीतच. शारीरिक क्षमतेवर हि मर्यादा होत्या, वेग मंदावला. सार्वजन आता अर्धमेले झालेलेच, पायाची बोटे फाटलेल्या बुटातून बाहेर येउन विचारू लागली- " अरे बाबा अजुन किती ?" मागच्यांसाठी थांबावं तर झोप लागायची. इथे आम्ही जाऊन जरा बसलो व एक वीडेवो केला तो पाहिल्यावर जाणवेलच आपणास गांभीर्य.
११ वाजले अजूनही नदीतच. "२ तासात गावात जाऊन झोपायचं किती सुंदर कल्पना" आता हे आठवलं कि रडूच कोसळायच ;) :। एक दोन (यात मी धरून )सोडले तर सर्वांनीच डुबकी मारलेली कपडे अंथरून वगैरे भिजलेलं त्यामुळे पाठीवरचं ओझं वाढलेलेच. सोसतोय ते कमी होतं म्हणून हि वाढ :( :(कोणी मटकी आणली असती ना तर सकाळी नाश्त्याला मोडेच ! :p :p
१२:३० झाले. एक बैठक झाली काहीजणांनी इथेच झोपण्याचा मांडला पण पाणी कधीही वाढू शकते म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा रद्द ठरवला, नाहीतर जाग यायची अन् आपला रिवर राफ्टींग चालू असायच :D :p
कितीही खलबतं केली, कितीही चर्चा केली तरी उत्तर एकाच नीघायचं- बेमुदत चालणे. बस !!!
त्राण संपलेलेच जवळजवळ, पण रायगड व शिवरायांचा एक जयघोष झाला आणि सारेच पल्लवित झाले, नव्या जोमाने चाल झाली इतक्यात राहुल खराडेच्या BSNL वर gps मिळाले थोडंच बाकी होत आता, शेवटी बंधारा आला,त्यांनतर डावीकडे, मग सरळ आणि तो क्षण आला आम्ही गावात दाखल. . . बरोब्बर १:३३ ला मोरे काकांच्या दारावर थाप टाकली. आनंदाला पारावर उरला नाही, दर खोललं, आणि बघता बघता पोरं आडवी झाली बुटासहित- ब्यागांसाहित.
१० एक मिनिटांनी सुद्धीवर येत एकेकाने आपापला सेट अप लावला :D काकांनी भात आमटी करायला घेतले. गरमा गरम भात व बटाट्याची आमटी असा डिनर आमचा पहाटे ४:०० ला पार पडला. तडतीने झोपण्यात आले. ७ ला उठलो, अवरले ,शिवरायांच्या मूर्तीजवळ एक छायाचित्र घेतले आणि दापोली गाव सोडला.
दिवस तिसरा-
२३.दापोली गावातील शिवरायांच्या मूर्तीसोबत समुह्चित्र
२६.
. . !! आता वाघेरीतून वरांगी-छत्री-रायगड वाडी असा नियोजित प्रवासाला पुन्हा एकदा फाटा देऊन एक शोर्ट कट घेतला, रायगडाच्या दिशेने टकमकाच्या खालून जाणाऱ्या पायवाटेकडे. पुन्हा संकट छातीएवढ्या वाढलेल्या गवतात वाट हरवली. कंचेश्वरदादांनी प्रचंड शोधाशोध केली पण निष्फळ. आता मात्र गटबाजी झाली, दोन मतप्रवाह झाले पण लगेचच एक मत होऊन मागे फिरणार तोच एक धनगर दत्त म्हणून उभा. त्याला योग्य मानधन देताच तो रायगडवाडीपर्यंत यायला तयार झाला. निघालो. धनगरवाडा आला,रायगड प्रदिक्षिनेचा मार्ग लागला.
२७..धनगरवाडा . टेकला कि हि अवस्था असायची सर्वांची
एक समाधी लागली अधिकृतरित्या ती कोणाची सागता येत नाही. तिथ जर आराम झाला, बोलता बोलता त्या धनगर युवकाने एक धक्का दिला- त्याचे वय २९-३० व त्याला ११ अपत्ये पैकी पहिल्या मुलीला मुलगी झाल्याने हा युवक आता आजोबा झालेला. आजही दुर्गम भागात हे वास्तव आहे.
२९.
In reply to अर्रर्रर्रर्र ऑफिस मुले हा by महासंग्राम
In reply to निव्वळ अप्रतिम !! दंडवत by किसन शिंदे
In reply to अचाट साहस केलंत. फोटोही खूप by प्रचेतस
In reply to अचाट साहस केलंत. फोटोही खूप by प्रचेतस
In reply to +१ अचाट साहस आणि तुमचे लिखाण by प्रमोद देर्देकर
In reply to आम्हाला तर ईनो पण नको by राजा मनाचा
In reply to अफाट;;!!! by कंजूस
In reply to बेक्कार साहस...पण दोर्या आणि by टवाळ कार्टा
In reply to सहमत by जगप्रवासी
In reply to सहमत +१०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to अचाट by यशोधरा
In reply to अचाट by यशोधरा
In reply to सहमत +१०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to सहमत by अनिरुद्ध.वैद्य
In reply to सहमत +१०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to बेक्कार साहस...पण दोर्या आणि by टवाळ कार्टा
In reply to झकास ! by विखि
In reply to अचाट साहस !!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आयुष्याची उमेद राखणारा ट्रेक. आवडला! by नरेंद्र गोळे
In reply to ट्रेक भन्नाट झाला, पण आगाशी by मालोजीराव
In reply to अरे काय जीव वर आलाय काय by धनंजय माने
In reply to मस्त अप्रतिम by देवेन भोसले
In reply to शेवटचा फोटो +११११११ by देवेन भोसले
In reply to जबरदस्त धाडस!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to जबरदस्त धाडस!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to लेख आवडला. पुन्हा असे धाडस by खटपट्या
In reply to पोरांनो सलाम तुमच्या धाडसाला.... by बाबा पाटील
__/\__