मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किती लौकर आज उजाडलं बाई

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
किती लौकर आज उजाडलं बाई कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो. कानडाऊ योगेशूंच्या काव्यातल्या एका प्रतिसादामध्ये प्रचेतस यांनी माझी आठवण जागवली. त्या आठवणीत माझ्या जुन्या आठवणी आठवल्या आणि त्यांच्या आठवणीस जागतांना खालील काव्य लिहीता झालो. किती लौकर आज उजाडलं बाई सजणाच्या प्रितीला काळवेळ नाही काल रातीला असाच आला तो द्वाड येळी अवेळी यायची त्याला लई खोड गुलूगुलू बोलत हात हातामधी धरला हाय.... गुलूगुलू बोलत हातामधी हात धरला अंगाअंगी रोमांच थरथरला डोळ्यामधी तो रोखूनी पाही किती लौकर आज उजाडलं बाई साडी भरजरी ल्याले मी अंगा कुंकू कपाळी केले मोती भांगा कानी कुडी नथनी नाकात गळा सर ठुशी वाकी दंडात कमरी पट्टा अन पैंजण पायी दरएक दागीना (सजण) उतरत जायी किती लौकर आज उजाडलं बाई किती हसावं किती पुसावं गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं अवचिंद पावसानं मन मोर व्हावं धरती भिजावी पेर्‍यात रानं पिकावं मिठीत त्याच्या अंगा शिरशिरी येई ओठी आठवांचे ठसे राही ठाईठाई किती लौकर आज उजाडलं बाई - पाभे

वाचने 5757 वाचनखूण प्रतिक्रिया 15

नाखु Sat, 05/21/2016 - 08:41
लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन आणि त्यांना उद्युक्त केल्याबद्दल कायो आणि प्रचु @@@@ यांचे खास आभार. पाभे लेखन पंखा नाखु

चौकटराजा Sat, 05/21/2016 - 10:29
मी म्हणतो काही द्वाड मंडळी रहातात त्या भागातून जाताना हे काव्य सुचलं का..... ? भन्नाट आहे. शब्दबंध छान आहे पण काही जागी धरबंध सुटला आहे. गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं या ओळीत श्लेषबंध चान चान वापरला आहे.

चतुरंग Sat, 05/21/2016 - 11:42
पावसाळा आलाच आहे लावणीच्या दिवसात लावणी व्हायलाच हवी पाभे! :) (लावणीप्रेमी)रंगा खेबूडकर

चांदणे संदीप Sat, 05/21/2016 - 12:26
प्रतिसादाच्या प्रेमापोटी, पाभेंनी, हात धरूनी यावे बहारदार काव्य बैठकी रचूनी सादर व्हावे रसिकसख्यांच्या संगतीने मन भारूनी जावे! Sandy