हाती लागलेले मृगजळ - 'लास वेगस'
सूर्याने दिवसभर काम चोख बजावले होते.सुर्य अस्ताला टेकला आणि रस्त्यावरच्या दिव्यांनी शहराचा ताबा घेतला.'Gambling City' या नावाखाली वावरणाऱ्या रस्त्यावर मी पहिले पाऊल ठेवले.आणि या नावाला न्याय देण्यासाठी समोरचा रस्ता सज्ज होता.थंडी असूनही फार जाणवत नव्हती.आता आपल्यापेक्षा कमी कपडे घालणाऱ्या सुंदर मुली जर थंडीची फिकीर करत नसतील तर माझ्यासारख्याने थंडी थंडी म्हणून त्याचा बाऊ करणे बरोबरही दिसत नाही.रस्त्यावर असलेल्या गर्दीतील प्रत्येक चेहेरा पाहण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता.कारण सवयीच्या गोष्टी दुर्लक्षित होतात कदाचित, पण ज्या गोष्टींची सवय नसते त्या गोष्टी निरखुनच पाहणे योग्य.त्यामुळे गर्दी असली तरी त्याचा त्रास होत नव्हता.
दुतर्फा रोषणाईने न्हावून निघालेली ती हॉटेल्स,त्यांच्या तळमजल्यावर असलेले अलिशान कसिनो,कुठल्याही हॉटेलमध्ये फुकट मिळणारा प्रवेश,कुठेही आणि कितीही वेळ थांबण्याची असलेली मुभा,कंटाळा येईपर्यंत फोटो काढण्याची परवानगी आणि नजर जाईपर्यंत पसरलेले सौंदर्य घड्याळ आणि पर्यायाने वेळेशी असलेली नाळ तोडून टाकत होते.इथे 'Time is Money' हे समीकरणच नाहीये.इथे Time + Money = Vegas हे एकाच सूत्र सगळ्या गणितांसाठी वापरले जाते.
असच फिरता फिरता एका हॉटेलच्या कसिनोमध्ये 'High Stakes Poker' लिहिलेल्या दालनात आलो.दालन हा शब्द मुद्दामच वापरला कारण शंभर एक लोक शांतपणे खुर्चीवर बसून पोकर खेळत होती.किमान १०० अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे ६००० रुपये हि प्राथमिक किंमत लावून तुम्ही खेळू शकता.लोक आनंदाने खेळत होते.हातात दारूचा ग्लास,तो पुढ्यात आणून देणाऱ्या सुंदर तरुणी,पत्ते पिसून वाटणार्या देखण्या अप्सरा,जिंकलो तर आनंदच आणि हरलो तरी आनंदच होता.'वय वर्ष अठरा' एवढी एक अट सोडली तर बाकी कुठलीही अट या रस्त्याला नाही.८० वर्षाच्या म्हातारी पासून २५ वर्षाच्या तरुणीपर्यंत सगळ्या वयातील लोक जुगारी आनंद उपभोगत होते.कुठेही घाई किव्वा गोंधळ दिसत नव्हता.प्रत्येक खेळणारे,तिथे काम करणारे सगळेच कायम हसतमुख आणि आनंदी दिसत होते.आणि कदाचित हीच या शहराची किमया आहे.
जगातील विविध शहरांची प्रतीकात्मक उभारणी करून हॉटेल्स बांधलेली आहेत.पॅरिस,अमेरिका,इजिप्त,वेनिस इत्यादी प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या वास्तु त्या त्या ठिकाणी गेल्याची जाणीव करून देतात.त्या ठिकाणचे वैशिष्ट्य इतक्या कल्पकतेने रचले आहे की वेनिसची प्रतिकृती असलेल्या हॉटेल मधून फिरत असताना त्यांनी रंगवलेले आकाश,सभोवताली नदीतून फिरणार्या त्या होड्या,त्यावर वल्हवत असताना गाणी म्हणणारे नावाडी आणि त्यात बसलेली सुंदर जोडपी.अक्षरशः हजारो मैलावर असलेले इटली मधील वेनिस साक्षात डोळ्यासमोर येते.इजिप्तचे हॉटेलच मुळात पिरॅमिडमधे बांधलेले आहे त्यामुळे त्या भव्य त्रिकोणी वास्तूत असलेल्या हजारो खोल्या डोळ्याचे पारणे फेडतात.पॅरिस कसीनोच्याबाहेर असलेल्या कॅफे मधे बसलेले वाइन पिणारे लोक पाहिले की अमेरिकेतून फिरताना देखील उगीचच 'Champ De Mars' मधून फिरल्याचा भास व्हावा.
या रस्त्यावर करमणूक सोडून काहीही नाही.पण हा रस्ता ज्याप्रकारे जपला आहे ते पाहून अचंबा वाटतो.जगभरातील विविध देशाचे लोक चालताना दिसत होते.एकतर भरजरी कपडे किव्वा कपडेच नाहीत या दोनच अवस्था येथे पहायला मिळतात.विलक्षण सौंदर्य आणि पोशाखाची पद्धत यांचा मिलाप म्हणजे दुधात साखर होती.
फोटो काढावे की डोळ्यात साठवावे अशी दुहेरी मानसिकता अनुभवायला मिळत होती.अर्थात दोन्ही गोष्टी मनसोक्त करून झाल्याखेरीज तिथून निघणे शक्य नव्हते.'Ballegio' नावाच्या हॉटेल समोर असलेल्या कारन्ज्याचा तो 'शो' थक्क करणारा होता.म्हैसुरच्या वृंदावन गार्डन मधील कारंजी पहिली होती पण शेकडो स्क्वेअर फूटांच्या जागेत पसरलेला तो नयनरम्य कारन्ज्याचा जादुई देखावा तोंडात बोटे घालायला लावणारा होता.अर्थात रस्त्यावर उभे राहून हे पहाणे आणि ते ही एकही पैसा खर्च न करता हे माझ्यासारख्या पुण्यातल्या माणसाला अजुनच आनंददाई वाटत होते.रात्रभर ठराविक अंतराने होणारा तो शो पाहणारे लोक तल्लीन होऊन ते बघत होते.काही प्रेमी युगुल गळ्यात गळे घालून त्याचा आनंद घेत होते तर काही नुसतेच शेजारी उभे राहून.लग्न झालेल असाव कदाचित.काही फोटो काढण्यात मग्न.थोडक्यात काय तर रस्त्यावर फिरणारा एकही व्यक्ती समाधानाखेरीज परतत नव्हता.
खर्या अर्थाने वाइन,वेल्थ आणि वुमन या ३ 'Ws' वर संपूर्ण शहराचा उभा राहिलेला मनोरा पाहताना आश्चर्य आणि कुतुहल याची जाणीव पदोपदी होत होती.या स्ट्रिपच्या एका बाजूला सर्वात शेवटी 'Welcome To Vegas' अशी मोठी पाटी लावलेली आहे.या पाटीसमोर उभे राहून फोटो काढण्यासाठी असलेली गर्दी या शहराच्या प्रसिद्धीची प्रचीती करून देते.
या संपूर्ण स्ट्रिपवर तीन ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेले पूल आहेत.या पुलाला दोन्ही बाजून जाळी लावलेली आहे,पूल ओलांडत असताना दोन्ही बाजूला दिसणारी रोषणाई निमिशार्धासाठीसुद्धा डोळे बंद करण्याची मुंभा देत नाही.वाहनांनी वाहणारा रस्ता आणि पर्यटकांनी ओथंबणारा फुटपाथ लोकप्रियतेची पावती फाडत असतो.
या शहराच्या maintenance चा खर्च कुठून निघतो,फक्त पर्यटन हाच जर इथल्या आर्थिक व्यवस्थेचा स्त्रोत असेल तर हा पुरेसा आहे का ? जुगार खेळणार्या लोकांचा पराभव हे इथल्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे का ? या अनुत्तरीत प्रश्नांनी माझ्या विचारशक्तीला ताण दिला.
या दोन रात्री आणि तीन दिवसाच्या माझ्या मुक्कामात अनंत आठवणी आणि अनुभव गोळा करून मी या अलीबाबाच्या गुहेचा निरोप घेत होतो.सकाळी उठून पुन्हा त्याच रस्त्यावरून विमानतळावर वर येणे थोडे जड जात होते.पण उस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो...त्यामुळे या ग्लाससभर उसाच्या रसानी मी तृप्त होऊन परतत होतो.
शारीरिक तारुण्य जपणे एका मर्यादेनंतर शक्य नसते पण मानसिक तारुण्य खरच चिरतरुण राहू शकते.त्यामुळे या पन्नास राज्यांच्या महासत्तेला भेट देण्याची संधी मिळाली तर हे पश्चिमेचे वाळवंट नक्की बघा.कारण अमेरिका म्हणल्यावर बाकीची पर्यटनस्थळे एका बाजूला आणि 'लास वेगस' एका बाजूला.
आज पु.ल पाहिजे होते..त्यांच्या लेखणीतील वेगस अनुभवायची खूप इच्छा होती.पु.ल.नी वेगस पाहिले नाही हे कोणाचे दुर्दैव माहित नाही पण या अद्भुत शहराची सफर त्यांच्या लेखणीतून निसटली हे आपले दुर्दैव नक्की..!
विमानतळावर असलेली 'What happens here stays here' ची पाटी खूप काही सांगून जाणारी होती.या तीन दिवसांचा सारांश केबिन लगेज बरोबर बांधून मी विमानात बसलो..
विमानाने वेगस सोडले आणि अचानक 'मृगजळ' म्हणजे काय याची व्याख्या डोळ्यासमोरून तरळली.वाळवंटातील उन्हात लांबवर होणारा पाण्याचा भास म्हणजे 'मृगजळ'.ज्याचे अस्तित्व मात्र कधीच नसते.फक्त एक फसवे असे उन्हातील पाणी.आज मात्र मी या 'मृगजळाला' अनुभवले होते.अशाच एका वाळवंटात असलेले 'लास वेगस' नावाचे मृगजळ.
हृषिकेश पांडकर
In reply to सुंदर लिहिले आहे. by मृत्युन्जय
In reply to छान लिहिलंय. वेगासला जायलाच by प्रचेतस
In reply to सुरेख फोटो.लेखही आवडला. by इशा१२३
In reply to कडक आहे यार... by वेल्लाभट
In reply to छान लिहिलंय. वेगासला जायलाच by सतिश गावडे
In reply to छान लिहिलंय. वेगासला जायलाच by वपाडाव
In reply to +१ by अजया
In reply to ह्रुषिकेशजी , मस्त वर्णन. by शान्तिप्रिय
In reply to छान लिहिलंय. वेगासला जायलाच by संजय पाटिल
In reply to मस्त लिहिले आहे... by मुक्त विहारि
In reply to अरं काय चाललंय. by प्रचेतस
In reply to तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती by सतिश गावडे
In reply to तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती by अभ्या..
In reply to चलो लास वेगास राह्यलेच की. by अभ्या..
In reply to तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती by अभ्या..
In reply to तुस्सी मिपा दी तोप हो, एकुलती by अभ्या..
In reply to लिहिलंय छान. एकदा वेगासला by रमेश भिडे
In reply to छान लिहिलंय. लेखाचं शीर्षक by पद्मावति
In reply to लेख आवडला by जुइ
In reply to सुरेख लिहिलंय by पैसा
In reply to छान वर्णन आहे. फोटोही आवडले. by रेवती
In reply to आत्तापर्यंत १६/१७ वेळा गेलोय by खटपट्या
In reply to सो... व्हॉट रिअली हॅपन्ड इन व्हेगस ?? ;) by अर्धवटराव
In reply to अप्रतिम लिहिलय... by सुयोग पुणे
In reply to छान वर्णन by नेत्रेश
In reply to छान लिहिलंय! by रातराणी
In reply to छान लेख.. by गवि
In reply to छान लिहिलंय. वेगासला जायलाच by आनंदयात्री
In reply to एकदा जीवाचे व्हेगास करायची by टवाळ कार्टा
In reply to लोकांना टका वेल्फेअर फंडाच्या by अभ्या..
In reply to एकदा जीवाचे व्हेगास करायची by टवाळ कार्टा
In reply to एकदा जीवाचे व्हेगास करायची by टवाळ कार्टा
व्हेगासघोरापमान... इथेच्च तुमची **की कळत आहे. १०००० सुद्धा खुप झालेत तुम्हाला. जाताना ऑरेंजक्यांडी घेउन जा. -उच्च्भ्रु वपा
In reply to श्या... वेगस हो वेगस...!! by वपाडाव
In reply to श्या... वेगस हो वेगस...!! by वपाडाव
सुंदर लिहिले आहे.