तपकीर गल्लीतला चिंधीचोर (पुणेरी)- (मराठी भाषा दिन २०१६)

आदूबाळ's picture
आदूबाळ in लेखमाला
22 Feb 2016 - 7:38 am

.
चित्र श्रेय- अभ्या..

--एक--

रेडियोच्या खरखरीने मला जाग आली. नेहेमीप्रमाणे. डोळे न उघडता मी शेजारी चाचपून बघितलं. अंथरूण गार होतं. आजी अर्थातच उठली होती. खाली सोप्यात जाऊन तिनेच रेडियो लावला असणार.

"..तीनशेअठ्ठ्यातर अंश सात आठ मीटर्स, अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झवरून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज बुधवार. भारतीय सौर दिनांक..."

सकाळचे सहाही वाजले नसावेत. बाजूची मोठी खिडकी आजीने उठतानाच उघडली होती. बाहेरच्या महानगरपालिकेच्या दिव्याचा उजेड पडद्यातून गाळून आत येत होता. बाहेर तपकीरगल्ली शांत होती. आता थोड्याच वेळात समोरच्या वाड्याचा दरवाजा खडखडेल, आणि उमेश कालिया बाहेर येईल. पहाटे पहाटे तो सायकलिंगचा सराव करायला जातो. मग दिवसभर त्याचा तो यूपीएससीचा अभ्यास. कधीकधी रात्रीसुद्धा. पण पहाटेचं सायकलिंग चुकायचं नाही. प्रचंड उर्जा आहे त्याच्याकडे. कधीतरी तो पास होईल, गॅझेटेड ऑफिसर होईल. आणि मग...

मग काय? ते एक स्वप्न आहे. बर्याचदा पहाटेच पडतं. म्हणजे खरं होईल असं असतं म्हणे. आजी हसते असल्या अंधश्रद्धांना, पण मला आपला तेवढाच आधार वाटतो.

स्वप्न खरं होईल असं स्वप्न पाहत मी अजून तासभर तरी लोळले असते, पण तेवढ्यात प्रसारभारती केकटायला लागली.

"माल्कीणबाई ... ओ माल्कीणबाई! शार्दामामी! आहात का? माल्कीण.."

प्रसारभारती म्हणजे भुर्केकाकू. आजीच्या भाषेत "भुर्कीण". दिवसभर अखंड बडबड आणि भोचकपणा. इकडच्या काड्या तिकडे सारणं. आम्ही पोरांनी त्यांना प्रसारभारती नाव ठेवलं होतं. घरचे कसे सहन करतात या बाईला काय माहीत. राजन - भुर्केकाकूंचा मुलगा - अगदीच गरीब गाय. तिशीत गेला तरी आईला अजूनही टरकून असतो.

पण काही असो, भल्या पहाटे प्रसारभारतीची घोषणा म्हणजे काहीतरी रोमहर्षक बुलेटीन असणार. आळस झटकून मी उठल्येच. सोप्यात आजी चहा गाळत होती. भुर्केकाकू खाली अंगणात कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. बुलेटीनला अजून सुरुवात झाली नव्हती. पण मला पाहून भुर्केकाकूंनी मोहरा फिरवला,
"काय गं मानसी, कशी आहे तुझी कावीळ?"

"कावीळ बरी झाली भुर्केकाकू. आता फक्त पथ्य आणि विश्रांती..." मी तोंड वाकडं करत म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी फील्डवर्कसाठी उत्तर प्रदेशात गेले होते. येताना कावीळ घेऊन आले.

"कर गो कर पथ्य. राजाला नववीत असताना झाली होती..." राजन भुर्केच्या काविळीच्या गोष्टीत मी दात घासून घेतले.

"कशासाठी आली होतीस गं?" चहाचा कप हातात देत आजी म्हणाली.

"तुमची लाडकी भाडेकरीण, माल्कीणबाई... आज हद्द केली हबशिणीने."

"काय झालं आता?" आजी जरा वैतागून म्हणाली.
हसबनिसांचं बिर्हाड वाड्यात नुकतंच आलं होतं तीन महिन्यांखाली. दरवाजाजवळची एकटी खोली भाड्याने घेतली होती. हसबनीस बुवा लक्ष्मी रोडवर कोणत्यातरी दुकानात कामाला होते. हसबनीस बाई दिसायला जरा उग्र होती. काळी, बेढब आणि थोडीशी चकणी. बडबड करायला एवढं पुरेसं होतं, पण हसबनीस बाईंची ‘नजर बरोबर नाही’ असाही एक साक्षात्कार भुर्केकाकूंना झाला होता, आणि हसबनीस बाईंचं नामकरण "हबशीण" असं केलं होतं.

"काल अशी मी येत होत्ये संध्याकाळी, अंधारून आलं होतं..." कट्ट्यावर ऐसपैस टेकत भुर्केकाकू सांगू लागल्या, "हौदापाशी सहज पाह्यलं डावीकडेऽ, तर ही अवदसा तिथेच! म्हटलं काय गो! काय हिंडतीयेस अशी कुसमांडीगत? काळोखाची? तर बोलेना बया! पदराखाली लपवत आली काहीतरी. म्हटलं काय आहे गो? बोलली नाही, तसं बोलतेच कधी ती म्हणा... संभाषणच नाही..."

हे एक बाकी खरं होतं. हसबनीसबाई कोणाशीच बोलत नसे. कायम घाबरल्यासारखी, दडपल्यासारखी चोरट्या नजरेने इकडेतिकडे पाहत वाड्यात वावरे.

"बरं मग?" आजीने विचारलं.

"अहो मग काय शार्दामामी! मला वाटलंच हबशिणीच्या मनात काहीतरी काळंबेरं असणार. आत्ता सकाळी हौदापाशी जाऊन बघते तर काय..." भुर्केकाकूंनी नाट्यमय विराम घेतला.
आजीला काहीही रस नव्हता. रेडियोची खरखर कमी करण्याच्या प्रयत्नात ती होती.

"...अहो माईच्या पारावरच्या चिंध्या सगळ्या उपसून टाकलेल्या!"

आजी गर्र्कन वळली. माईचा पार हा तिच्यासाठी जरा संवेदनशील विषय होता. दोन ढांगांत ती अंगणात उतरली, आणि भुर्केकाकूंचा दंड धरून त्यांना उठवलं.

"चल! आत्ताच्या आत्ता मला दाखव काय झालंय!"
मी चहाचा कप खाली ठेवेपर्यंत दोघी वाड्याच्या दिंडी दरवाजातून बाहेरही पडल्या होत्या. सोप्यात मी आणि रेडियो एवढेच राहिलो. मी आवाज मोठा केला. खरखर आता गेली होती.

"... प्रादेशिक बातम्या देत आहेत ... काही दिवसांपूर्वी बालगंधर्व पुलावर सकाळच्या वेळी … मॉर्निंग वॉकला निघालेल्या … दोन अज्ञात हल्लेखोरांनी ... अजून काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत अशी माहिती ... प्रख्यात पोलिस अधिकारी ... अधिक तपास करत आहेत ..."

--xx--

--दोन—

माणूस कितीही मोठा असेल, शहाणा असेल तरी काही बाबतीत दुराग्रह घट्ट कवटाळून बसतो. सांगून ऐकत नाही. आता आजी - शारदा फाटक-सुभेदार. पुण्यातल्या समाजवादी वर्तुळातलं एक मोठं नाव, कामगार चळवळीतही सहभाग होता म्हणे. 'आत'ही जाऊन आली आहे असं म्हणतात. ती सांगत नाही त्या दिवसांबद्दल. गेली दहा-पंधरा वर्षं चळवळीत सक्रिय नाही म्हणा, आता तर सत्तरीला पोचली आहे. तरी डोकं पूर्वीइतकंच तीक्ष्ण आहे, विचार तितकेच स्पष्ट, टोकदार आहेत. पण या 'माईचा पार' प्रकरणाला मात्र वेगळे नियम आहेत.

आमचं सुभेदार घराणं या तपकीर गल्लीत दोनअडीचशे वर्षं राहतंय. जास्तच असेल. मलिक अंबराच्या काळापासून पुण्यावर परचक्रं येत असत. पुण्याची ग्रामदैवतं कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी शत्रूच्या हाती लागून त्यांचा पावित्र्यभंग होऊ नये म्हणून पेशवाईत एक मोठी यंत्रणा उभारली गेली. कसबा गणपतीचे पुजारी ठकार आणि पुण्याचे नगररचनाकार धडफळे यांनी वेळ पडल्यास ही दैवतं पाण्यात लपवता यावीत अशी व्यवस्था केली. पुण्यात जागोजागी उभारलेले हौद यासाठी वापरायचे, अशी कल्पना होती. फडके हौद, बाहुलीचा हौद, सदाशिव पेठेचा हौद असे काही हौद आजही आहेत. तसला एक हौद आमच्या वाड्याशेजारी होता. चांगला लांबरुंद. खोल.

सुभेदार घराण्यातला कोणीएक पुरुष पेशवाईत उत्तरेच्या स्वारीवर गेला, आणि परतलाच नाही. एक बोलवा अशी आहे की तो परागंदा झाला - म्हणजे संसाराबिंसाराला विटून हिमालयात गेला असेल, किंवा उत्तरेत नवा घरोबा केला असेल. काही असो, परत आला नाही एवढं खरं. मेला असं समजून त्याचे दिवसबिवस केले. त्याची बायको - माई तिचं नाव - खंगत खंगत गेली. त्वचेला भेगा पडत गेल्या. थोड्याशा कारणाने कापड विरावं तशी कातडी विरून भळाभळा रक्त वाहू लागे. थांबत नसे. वैद्यराजाने माईचं शरीर चिंध्यांनी भरून टाकलं. करण्यासारखं फारसं काही नसावं. एक दिवस तो दाह असह्य होऊन तिने शेजारच्या हौदात उडी घेतली. विषय संपला.

किंवा विषय संपला नाही. माईच्या आजाराचा आणि नवर्याच्या न परतण्याशी संबंध नसेलही. पण लोकांनी तो जोडला, आणि 'माईची कथा' जन्माला आली. हौदाकाठच्या वडाखालच्या दोन दगडांना पतिव्रता माईच्या ओबडधोबड समाधीचा मान मिळाला. कथेतल्या चिंध्या वेगळ्याच रूपात आल्या. नवर्याशी संबंधित काही नवस असला, तर चिंधी तेलात बुडवून वडाला बांधायची. तेल झिरपून चिंधी कोरडी झाल्यावर सती नवसाला पावते म्हणे.

सुभेदारांच्या घराचा यावर कितपत विश्वास होता कोण जाणे. आजीचा मात्र होता. म्हणजे नवसाला पावणे - जागृत देवस्थान वगैरे असल्या प्रकारचा नाही. तिच्या समाजवादी बुद्धिवादाला हे असलं काही पटणं शक्य नव्हतं. पण 'घराण्याला चिकटलेली एक जुनी परंपरा' म्हणून ती या प्रकारावर बारीक लक्ष ठेवून असे. कधी त्याचा धंदा होऊ दिला नाही. गांजलेल्या चार बायाबापड्यांना इतिहासात लुप्त झालेल्या त्या कोण्या माईचा लटका का होईना, पण आधार मिळतो याचंच तिला समाधान वाटत असावं.

चहा संपल्यावर मला आता भूक लागत होती. पण काविळीची पथ्यं फार. आजी नाश्त्याला गव्हाची लापशी देत असे. तिला न सांगता काही दुसरंच खाल्लं असतं तर माझी खैर नव्हती. मी सोप्यातून गल्लीत डोकावले. आमच्या वाड्याच्या पूर्व भागाने हौद झाकला गेला होता, त्यामुळे आजी दिसत नव्हती.

आमची गल्ली गावात असूनही तशी एकांडीच होती. दिवसाही रहदारी तुरळक असे. दोन गल्ल्या पलिकडून वाहणार्या शिवाजी रस्त्याचा आवाज गाळून येत असे. गल्लीच्या एका बाजूला आमचा वाडा आणि शेजारी तो हौद. समोरच्या बाजूला केळ्याचे वेफर्स बनवायचा मारवाड्याचा कारखाना आणि गोडाऊन. बास! संपली गल्ली!

नाही, संपली नाही. त्या गोडाऊनच्याच इमारतीत माडीवर तीन खोल्या होत्या. दोन खोल्यांमध्ये मारवाड्याचं ऑफिस होतं, ते संध्याकाळी बंद होई. रात्री जाग असावी म्हणून मारवाड्याने तिसरी खोली भाड्याने दिली होती. तीच ती उमेशची खोली. मी आणि आजी जिथे झोपतो तिथून स्पष्ट दिसणारी.

[नकाशा]

सवयीने मी उमेशच्या खोलीकडे पाहिलं. दिवा बंद होता, म्हणजे साहेबांचं सायकलिंग अजून चालू आहे वाटतं. सकाळच्या सायकलिंगवरून परतल्यावर, अभ्यासिकेत जायच्या आधी तो एकदा चक्कर टाकून जातो. मग दुपारी एकदा. मग संध्याकाळी एकदा, आणि रात्री झोपायच्या आधी एकदा.

राजरोस, अर्थात. आजीसमोर, अर्थातच. लपवाछपवी काही नाही. आम्ही दोघंही पंचविशीच्या आत-बाहेर आहोत. नवखे तर मुळीच नाही आहोत. धडामदिशी प्रेमात पडून ओलंचिंब व्हायचा बहर निघून गेलाय. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो, स्वभाव आवडतात. बोलायला विषयांचा तोटा नसतो. मी समाजशास्त्रात पीएचडी करते आहे, आणि उमेशने यूपीएससी परीक्षेला मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र घेतलं आहे. (त्यामुळेच आमची ओळख झाली.)

आजीसमोरच हे सगळं घडत गेलं गेल्या दोन महिन्यांत. मला काविळीमुळे सक्तीची सुट्टी मिळाल्यावर. आजीला बहुदा हे सगळं मान्य असावं. तिने कधीही मला आमच्या नात्याबद्दल, भविष्याबद्दल थेट विचारलं नाहीये. तिला माहीत आहे, आम्ही अजून काही ठरलं नाहीये. ठरलं की आपणहून सांगू.

खरं तर आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत की नाही हेच अजून आम्ही ठरवलं नाहीये. बरं - अगदी प्रेमात आहोत आणि लग्न करायचं असं जरी धरलं, तरी तसं सगळंच अधांतरी आहे. माझी पीएचडी व्हायला दोन वर्षं तरी अवकाश आहे. उमेशच्या यूपीएससीचं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यातून कोणती सर्व्हिस, कोणती केडर, सगळंच अनिश्चित. त्यामुळे सध्या काविळीच्या पथ्याचं सकस अन्न खाणे, उमेश भेटायला आला की मनसोक्त गप्पा झोडणे आणि मधल्या वेळात रेडियो ऐकणे हा एकमेव दिनक्रम आहे.

--xx--

--तीन--

चवीचवीने चहा संपवतानाच वाड्याचा दिंडी दरवाजा खडखडला. भुर्केकाकू तरातरा चालत त्यांच्या घराकडे गेल्या, आणि मागून येणारी आजी सोप्याकडे वळली.

"बर्याच चिंध्या गेल्यात गं..." ती माझ्या प्रश्नार्थक चेहर्याला म्हणाली. तिच्या चेहर्यावर बारीक आठ्या होत्या.

"सोड ना आजी. यात काय एवढं... चिंध्या तर आहेत. ज्यांनी बांधल्या ते लोक फिरकतसुद्धा नसतील परत इकडे. गेल्या तर गेल्या."

"असं कसं... हे गंभीर आहे जरा."

"आजी, आता तुझा नवसबिवस या खुळचट प्रकारांवर विश्वास आहे असं सांगू नकोस. ती माई खरी की खोटी..."

"मनू... माईचं काहीही असो, पण त्या स्थानाची जबाबदारी माझ्यावर आहे."

"कसली जबाबदारी? कोणी दिली? आपल्या सगळ्यांचा जन्म होण्याआधीच माई मेली होती."

"ते वेगळं. जबाबदारी माझ्या सासूबाईंनी दिली, तुझ्या पणजीने. नव्वद साली वारल्या तेव्हा." ती थबकली. "त्यांच्या मोठ्या स्मृती होत्या तिथे."

"म्हणजे? हे काय प्रकरण आहे?" सुभेदारांच्या घरात पूर्वजांच्या कथांचा काहीच तोटा नाही. नवी कथा ऐकायला मिळणार म्हणून मी सरसावून बसले.

"म्हणजे काही नाही... सांगेन कधीतरी." आजीने विषय टाळला.

"उमेश आला का परत? त्याच्याशीही बोलून घेते. तो पहाटे जातो ना सायकलीवर."

मी खिडकीतून पाहिलं तर उमेशच्या खोलीत प्रकाश होता.

"आत्ताच आलेला दिसतोय. चल जाऊ."

"तू कशाला?" आजी मंद हसत म्हणाली, पण मी लगेच चपला घालून तयार झाले.

रस्ता ओलांडून आम्ही उमेशच्या खोलीच्या जिन्यापर्यंत आलो. याच इमारतीत तळमजल्याला ते वेफर्सचं गोडाऊन होतं. शेजारच्या कारखान्याच्या इमारतीला जवळजवळ टेकलेलं. कारखान्याची इमारत बैठीच होती, त्यामुळे उमेशच्या खोलीच्या सज्जातून थोडी लांब उडी मारून कारखान्याच्या छतावर जाता येई. लहानपणी वाड्यातली दांडगट मुलं तशी उडी मारून जातही असत. एकदा पोरं छतावर उड्या मारत असताना छत कोसळलं, आणि पोरं धपकन कारखान्यात. मग ते सगळं बंद केलं होतं. आता कोणी त्या छतावर जात नाही.

आम्ही अरुंद अंधार्या जिन्यातून वर जाऊन खोलीचं दार वाजवलं.

"आईए.. आईए..." उमेशच्या चेहर्यावर कायम एक मंद हसू असतं. "सीढ़ीवर आवाज ऐकला तुमचा."

"तरी सदरा उलटा घातलास." आजी स्मितहास्य करत म्हणाली. उमेश खळखळून हसला आणि आम्ही खोलीत शिरलो.

मी उमेशच्या खोलीत प्रथमच येत होते. म्हणजे कोणी अटकाव केला नव्हता, पण कावीळ प्रकरणात सक्तीची विश्रांती सांगून मला वाड्याबाहेर पडायला बंदी केली होती. दहा बाय बाराची टिपिकल बॅचलरची खोली. जुनाट काळपटलेल्या भिंती. खोलीला कसलासा वासही येत होता. दारासमोरच्या भिंतीला टेकून - उमेशच्या हिंदीमिश्रित मराठीत - 'चारपाई'. डावीकडे खिडकीशी टेबल, आणि त्यावर त्याच्या त्या अभ्यासाची पुस्तकं उलटीपालटी. कोपर्यात एक कपड्यांचं शेल्फ आणि शेजारी तिपाईवर पाण्याचा माठ.

वेगळी वाटणारी अशी एकच गोष्ट होती. दरवाज्याच्या उजवीकडे जमिनीवर एक मळकट चादर, आणि त्यावर लोखंडाच्या भंगारासारख्या दिसणार्या अनेक वस्तू पडल्या होत्या.स्क्रू, हातोड्या, नटबोल्ट, लोखंडी नळ्या, वेगवेगळ्या लांबीच्या लोखंडी सळया, कांबी, तेलाचा बुधला वगैरे अनेक वस्तू विखरून पडल्या होत्या.

"साईकिलचं सामान," आजीही तिकडेच बघत होती हे पाहून,उमेशने खुलासा केला.

"हे सगळं? दुरुस्तीपण तूच करतोस का?" मी विचारलं.

"शिकलो, मॅडम. दूर कधी साईकिल खराब झाली तर मॅकेनिकपण नसतो."

तोपर्यंत आजीने खाली वाकून एक निमुळती लांबु़ळकी सळई उचलली होती. दोन्ही बाजूंना टोक. उमेशने पुढे होत गडबडीने तिच्या हातातून ती काढून घेतली.

"सँभालिए, आजी. इस्पोक आहे हा." तो हसत म्हणाला. "चहा घेणार? टीबेग्ज आहेत माझ्याकडे."

स्पोक चिकट असावा, कारण आजीने मागच्यामागे हात पदराला पुसला. "चहा राहूदे. मला एक सांग, तू सकाळी सायकल चालवायला जातोस ते हौदाच्या बाजूनेच ना?" उमेशने मान डोलावली.

"आज सकाळी कोणाला हौदाच्या इथे पाहिलंस का? किंवा काही वेगळं जाणवलं का?"

उमेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. "तसं तिकडे ध्यान नसतं माझं, अंधारही असतो. पण आज कोणीतरी होतं खरं. ते जे मंदिर टाईप आहे ना, तिकडे. ऑफव्हाईट साडी होती म्हणून मला दिसलं तरी."

"कोण होतं ते ओळखलंस का?" मी उतावीळपणे म्हणाले.

"नाही... तेवढा उजेड नव्हता." तो म्हणाला. "काय झालं? एनिथिंग सीरियस?"

"सीरियस काही नाही रे. त्या झाडावर बांधलेल्या काही चिंध्या गायब झाल्यात एवढंच." आजी म्हणाली. "निघतो आम्ही आता. येतोयस ना दुपारी?"

आजी पुढे झाली, पण मी जरा रेंगाळले.

"व्हाय इज शी गेटिंग वर्क्ड अप अबाऊट धिस?" सायकलच्या पसार्यात काहीतरी उचकापाचक करत तो हळूच म्हणाला.

"अरे सकाळी सकाळी प्रसारभारती येऊन कडकड करून गेली. सोड ना, कोणाला पडलीय चिंध्यांची." मी खांदे उडवले. "आता तू स्टडीमध्ये जाणार का?"

"हो. नहा धो के गुप्ताजी और श्रीनिवास साब के साथ कई घंटे..." खुंटीवरचा टॉवेल काढत तो म्हणाला. दीपांकर गुप्ता आणि एम एन श्रीनिवास यांची भारतीय समाजशास्त्रावरची पुस्तकं सध्या उमेश वाचत होता. "चल, आमच्या महलचा गुसलखाना पाठिमागे आहे."

गॅलरीच्या टोकाला आजी उभी होती. समोर दोन हातांच्या अंतरावर वेफर्स-कारखान्याचं छत, आणि पुढे उजव्या हाताला रस्त्याच्या पलिकडे माईचा पार. सकाळच्या गार वार्यात शेंडा हलत होता. रंगीबेरंगी चिंध्या इथूनही अस्पष्ट दिसत होत्या.

आजीचा चेहरा व्यग्र दिसत होता.

आम्ही वाड्यात परतलो. अजूनही बर्यापैकी सामसूम होती, पण चौकातल्या नळकोंडाळ्यावर एक पाठमोरी बाई प्लॅस्टिकची घागर भरत होती. हबशीण. आम्हाला पाहताच दचकली, आणि अर्धी भरलेली घागर तशीच घेऊन घरात पळाली.

तिने पांढरट रंगाची साडी नेसली होती.

--xx--

--चार--

एक काळ होता जेव्हा मी अगाथा ख्रिस्तीची पारायणं करत असे. आजोबांकडे जुनी, पिवळट पडलेली सगळी अठ्ठ्यांऐंशी पुस्तकं होती. पायरो, मिस मार्पल, टॉमी-टुपेन्स हे माझ्या कुटुंबासारखे होते. त्यावेळी वाटत असे - कुठेतरी सुट्टीवर जावं, काहीतरी रहस्यमय घडावं. मग टुपेन्सची उर्जा, मार्पलसारखं निरीक्षण आणि पायरोसारखं लॉजिक वापरून ते रहस्य आपण उकलावं.

असलं काहीही घडलं नाही. खुनाबिनासारखे हेवी ड्युटी गुन्हे जाऊदे. अपहरणासारखी धावपळ मला झेपली नसती. चोरी ठीक होती, पण चोरीला काय जावं तर चिंध्या? ह्याट! 'हरवलेल्या चिंध्यांचं फालतू रहस्य'.

तरी, अगाथाबैंना स्मरून प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती. तसाही 'हॅलो मधुमालती'मध्ये वैताग गाणी लावायचा दिवस होता वाटतं आज.

तरः हेतू आणि संधी. मोटिव्ह आणि अपॉर्च्युनिटी.

संधीबद्दल बघायला गेलं तर सगळे दुवे हबशिणीपर्यंत जाऊन पोचत होते. रात्री ती हौदापाशी होती हे नक्की, कारण भुर्केकाकूंनी तिला प्रत्यक्षच पाहिलं होतं. पहाटे उमेशने हौदापाशी एका पांढर्या साडीतल्या बाईला पाहिलं, पण ती हबशीणच होती का? त्यानंतर दोन-अडीच तासांनी आम्ही हबशिणीला पांढरी साडी नेसलेलं पाहिलं. पण त्याला काही अर्थ नाही. वाड्यातल्या सगळ्या बायकांकडे प्रत्येकी दोनचार तरी पांढरी पातळं असणार. त्यातून पहाटेच्या संधिप्रकाशात उमेशने जे पांढरं पाहिलं ते मागच्या काळ्या पार्श्वभूमीवर उजळ दिसलं. म्हणजे पांढरं म्हणजे पांढरंशुभ्र हवं असं नाही - फिकट हिरवा किंवा आकाशी निळा रंगही असू शकतो. पण मग आम्हाला पाहून हबशीण का बावचळली?

हेतू. इथे मात्र माझी विकेट पडली. "हबशिणीला या चिंध्या उपसायची काय गरज असेल?" नकळत मी मोठ्याने म्हणाले. आजीने चमकून वर पाहिलं.

"तुला वाटतं हे हसबनीसबाईने केलं असेल?" तिने विचारलं. तिने साडी बदलली होती.

"का करेल? त्या चिंध्यांचा तिला काय उपयोग?"

"मनू, त्या कथेतली माई सती आहे. साध्वी. एक तांत्रिक विधी असतो - त्यात सतीची वस्तू वापरायला लागते. आणि इथे चिंध्या ही सहज मिळणारी वस्तू आहे."

"कशासाठी असतो हा विधी?" मी उत्सुकतेने विचारलं, पण माझ्या डोक्यात हळुहळू प्रकाश पडायला लागला होता.

"अपत्यप्राप्तीसाठी..."

अब समझा! म्हणजे हबशिणीकडे हेतू आणि संधी दोन्ही गोष्टी होत्या तर!

धत् तेरे की. रहस्य सुरू होण्याआधीच संपलं की!

"चल आजी, आपण जाऊ हबशिणीकडे आणि जाब विचारू तिला. आपल्या वाड्यात हे तंत्रमंत्राचं खूळ नको. कायच्या काय..."

आजी विचारात हरवली होती. तिने क्षणभराने मान हलवली.

"नको, मनू. तांत्रिक उपासना करणं हा काही गुन्हा नाही. आपल्याला मूल असावं ही इच्छा असणं हा तर नाहीच नाही."

"अगं हो, पण ती कोणा भोंदूबाबाच्या नादी लागून हे करत असेल तर? तो तिच्याकडून पैसेबियसे उकळत असेल तर? तो तर गुन्हा आहे ना? तुमचीच ती अनिसं, दाभोलकर..." मी थांबले. त्या आठवणी आजीसाठी किती वेदनादायक असू शकतात याची जाणीव अचानक झाली मला.

आजीचा चेहरा क्षणभरासाठीच आवळला, पण परत तिची मुद्रा विचारमग्न झाली.

"मनू," ती क्षणभराने म्हणाली. "चिंध्यांचा कोणाला काय उपयोग होऊ शकतो?"

"म्हणजे? हा काय प्रश्न आहे?"

"म्हणजे तुला सुचतील तेवढे चिंध्यांचे उपयोग सांग."

आजीच असले प्रश्न विचारू जाणे. "अम्म्म्म.. चिंध्यांच्या भावल्या बनवतात. चिंध्या जोडजोडून गोधड्या करतात. उशीत भरतात. पलिता किंवा काकडा पेटवतात." मी डोक्याला ताण दिला.

"भरजरी गं पीतांबर, दिला फाडुन..." आजी हसत म्हणाली.

"हो! जखम बांधतात." मला एकदम ती गोष्ट आठवली.

"आणखी एक आहे, पण तो तुला माहीत नसणार."

"कोणता?"

"सोड चल. मी बघते काय करायचं ते." ती म्हणाली. "तुझा सपक रस्सा झालाय. फुलके करते पटकन." कावीळ स्पेशल आहार. बेयॅक!

पण नंतर वाटलं, आजी बोलायच्या मूडमध्ये होती तेव्हाच तिला बोलतं करायला हवं होतं. कारण दुपारनंतर ती जे काही विचित्र वागायला लागली की मला काही कळेनाच.

जेवणंबिवणं झाल्यावर नेहेमी आम्ही दोघी सोप्यात आडवारून 'संगीत सरिता' वगैरे ऐकतो. नेमक्या दुपारच्या वेळेला बोहारणी, 'मटकी मोडाची..' 'भँगाराल्ये...' वगैरे मंडळी येतात. एरवी झोपमोड होते म्हणून आजी कुरकुरत असे. आज झोपायच्या ऐवजी ती चक्क सोप्याच्या पायर्यांवर बसून राहिली. वाट बघत.

भंगारवाला आल्यावर ती चक्क बाहेर धावली. परत आली तेव्हा दोन हातात दोन रिकाम्या बाटल्या होत्या - एक किसान सॉसची आणि एक हिरव्या काचेची कोणत्यातरी बियरची. बोहारीण आल्यावर तिला दोन जुन्या साड्या देऊन एक बारकीशी परात, दोन चिनीमातीच्या बशा आणि एक नाडीचा गुंडा घेतला. मटकीवाल्या बाईशी कोपर्यात जाऊन बरंच गुफ्तगू चाललं होतं. ती जोरजोरात मान हलवून नाही नाही म्हणत होती. शेवटी आपली पाटी आजीजवळ ठेवून बाहेर गेली. पाच मिनिटांत परतली, आणि परत गुफ्तगू. कधी फारसा मोबाईल न वापरणार्या आजीने आज चक्क एक फोन केला आणि पलिकडच्या माणसाशी अर्धा तास बोलली.

या दरम्यान कधीतरी माझा डोळा लागला असावा. पण आजीने हलवून जागं केलं. "तू नेलपेंट लावतेस का?"

"... अं ... हो ... कधीकधी. वर माझ्या कपाटात असेल." मी वैतागून म्हणाले. "तुला कशाला हवंय?"

"नेलपेंट नकोय. नेलपेंट रिमूव्हर हवाय."

"तिथेच असेल."

हळुहळू सोप्याच्या कोपर्यात या भलत्याच गोष्टी जमा झाल्या. दोन बाटल्या. तेल भरायचं फनेल. परात. बशा. नाडीचं बंडल. नेलपेंट रिमूव्हर. तिच्या सकाळी नेसलेली साडी. पूर्वी कॅमेर्याचे रोल असत तसली एक डबी, त्यावर 'विंचेस्टर' असं लिहिलेलं.

"भातुकलीत अजून काय राहिलंय आजी?" मी विनोदाने विचारलं. उमेश यायची वेळ झाली होती, त्यामुळे मी आळस झटकला.

"आता राजन भुर्के ऑफिसातून आला की झालंच..." आजी म्हणाली.

मला काहीच कळेनासं झालं होतं. आता यात राजन भुर्केचा काय संबंध?

मी कपाटातून 'एन ऑर एम' काढलं. टॉमी टुपेन्सचं सगळ्यात उत्तम पुस्तक. वाचत बसले. उमेश आलाच नाही. आज अभ्यासात रंगलेला दिसतोय. एरवी असं झालं असतं तर त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरून भंडावून सोडलं असतं. पण आज तीन रहस्यं समोर होती. 'हरवलेल्या चिंध्यांचं फालतू रहस्य', 'सुभेदारांची म्हातारी असं का वागते?' आणि एन ऑर एम मधलं 'जर्मन हेर कोण'?

संध्याकाळी राजन भुर्के आला त्याआधी आजीने त्याला दारातच गाठलं असावं. कारण तो माझ्याशी जुजबी गप्पा मारून त्या दोन्ही बाटल्या घेऊन गेला.

सांजधारा कार्यक्रमातही फालतू गाणी लागली. 'कधीकधी विविधभारतीच्या अंगात का येतं?' हे एक चौथं रहस्य.

--xx--

--पाच--

जेवू घालून आजीने मला वर झोपायला पाठवलं. "मनू, आज रात्री मला उशीर होईल. तू झोप. वाटलं तर तो रेडियो घेऊन जा..."

मला रेडियो नको होता. उमेश आला नाही, पण त्याचा गुडनाईटचा मेसेज आला. 'एन ऑर एम' चांगलंच रंगात आलं होतं.

रात्री साडेबारा-एकच्या सुमारास आजी वर आली. "मनू..." मला जागंच पाहून म्हणाली. "उद्या सकाळी काहीही झालं - काहीही - तरी वाडा सोडून जायचं नाही, समजलं?"

"काही होणारे का?" मी कोपरांवर उठून बसत म्हणाले.

"होऊ शकतं. नाहीही. झोपूया चल."

तिच्या हाताला नेलपेंट रिमूव्हरचा वास येत होता.

मी झोपायचं सोंग केलं खरं, पण तशी जागीच होते. आजी काहीतरी रहस्यमय करत होती. करणार होती. टुपेन्सला शोभेलसं. सुभेदारांचं लक्षणच उलटं. मार्पलच्या वयाची बाई टुपेन्ससारखं काहीतरी करणार होती. टुपेन्सच्या वयाची मुलगी हॅस्टिंग्जसारखी गोष्ट सांगत होती. पात्रांच्या या घोटाळ्यात जरा डोळा लागला.

जाग आली तेव्हा खोली गार पडली होती. त्यामुळेच जाग आली असावी. आजी शेजारी नव्हती, खिडकीपाशी उभी होती. खिडकी उघडी होती, बाहेरच्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर आजीची आकृती दिसत होती. तिच्या देहात जरा ताठरपणा होता - जणूकाही कुठल्यातरी इशार्याची वाट बघत 'होशियार' पवित्र्यात थांबली होती. उजव्या हातात एक बाटली होती, आणि दुसरी पायापाशी होती. हातातली बाटली किंचित हेलकावत होती, आणि आतला द्रवपदार्थ थोडासा हिंदकळत होता. ओळखीचा वास...

तिला हवा तो इशारा मिळाला असावा. तिने डाव्या हाताने खिडकीची चौकट पकडली, आणि तो हात ताणून त्यावर शरीराचं वजन टाकत मागे रेलली. बाटली धरलेला उजवा हात आणखी मागे गेला. सराईत भालाफेकपटूसारखा तिने उजव्या खांद्याला आणि कोपराला एकसमयाव्च्छेदेकरून झटका दिला आणि सरसरत बाटली हातातून सुटली.

डाव्या हाताने उजव्या हाताल धरून मसाज करत तिने खिडकीतून बाहेर रेलून पाहिलं. तपकीर गल्लीची रुंदी पार करून ती बाटली समोरच्या इमारतीच्या छतावर पडलेली असणार. समोर उमेशचं घर होतं, पण आजीचा निशाणा तो नव्हता. तिने बाटली थोडी तिरकी फेकली होती, कारखान्याच्या छतावर!

बाटली आपटून फुटल्याचा आवाज आला, आणि पाठोपाठ ...

पाठोपाठ एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला!

पहाटेच्या शांत पुण्याला त्या आवाजाने खडबडून उठवलं असावं. जळकट वासाचा, धुराचा लोटच उघड्या खिडकीतून आत घुसला. पाठोपाठ सायरन. आजी खिडकीची जागा सोडून जिना उतरून निघून गेली होती.

मला काहीच कळेना. आजीने कारखान्याला आग लावली? केळ्याचे वेफर्स बनवणार्या कारखान्याला? का पण? बरं तिने जे काही फेकलं त्याने इतका मोठा स्फोट व्हावा? साधी बाटली...

बाटली!

मी रांगत ती दुसरी बाटली हातात घेतली. ही किसान सॉसची पारदर्शक बाटली होती. सोनेरी रंगाच्या द्रवपदार्थाने अर्धी भरलेली. बाटलीच्या तोंडाला जुन्या वर्तमानपत्रांचं गावठी बूच लावलं होतं. त्या बुचाच्या मधोमध एक नाडी बाहेर लोंबत होती आणि थोडी आतल्या बाजूलाही लोंबत होती. द्रवपदार्थाच्या वर, स्पर्श न करता.

मी ती नाडी ओढून काढली. दमट होती. नेलपेंट रिमूव्हरचा वास नाकात शिरला. वर्तमानपत्रांचं बूच उघडून आतला वास घेतला. पेट्रोल.

आत्ता माझ्या लक्षात आलं. मी ती दमट नाडी पाण्याच्या तांब्यात टाकली, आणि बूच लावून बाटली पुन्हा बंद केली.

बाहेर सायरनचे आवाज जवळ येत होते. मी ताड्कन उभी राहिले. उमेश!

काल गॅलरीत जिथे आजी उभी होती तिथेच आज उमेश उभा होता. समोरचं छत धगधगत होतं. तो बादलीने पाणी टाकून ते विझवायचा प्रयत्न करत होता, पण बरंचसं पाणी तिथवर पोचतच नव्हतं. शेवटी त्याने बादली फेकली, आणि गॅलरीच्या कठड्यावर चढून चक्क समोरच्या आगीत उडी मारली!

"उमेश!" मी जोरात किंचाळले आणि खाली धावले.

आख्खा वाडा जागा झाला होता. पण दिंडी दरवाजा बंद होता, आणि राजन भुर्के रखवालदाराच्या थाटात बंद दरवाजा अडवून उभा होता.

"राजन, बाजूला हो... बाहेर..."

"मनू, बाहेर जाऊ नकोस." तो म्हणाला. "कोणीच जाऊ नका."

"राजा, मेल्या बाहेर वणवा पेटलाय. आपल्या वाड्यापर्यंत आग..." भुर्केकाकूही मला सामील झाल्या.

"आई, आपल्या वाड्याला काहीही होणार नाहीये. मी फायर ब्रिगेडला फोन केलाय. ते येतील, विझवतील." राजन ठामपणे म्हणाला. आईसमोर एवढं बोलण्याइतका धीट कधी झाला काय माहीत!

"राजन, मला जायलाच पाहिजे बाहेर. सरक." मी त्याला रेटत म्हणाले.

"मनू, आजींनी तुला सांगितलंय ना वाडा सोडायचा नाही म्हणून? ऐक त्यांचं.."

"आजी गेली ख..." तेवढ्यात मला लक्षात आलं - आजी कुठेच दिसत नव्हती.

कोड्याचे अजून दोनतीन तुकडे जागेवर बसले. आजी आणि राजन सामील होते तर. म्हणजे मी वाड्यातच अडकले होते.

हताशपणे मी परत वर धावले. खिडकीतून सगळं दिसत तरी होतं.

हौदाच्या बाजूने अग्निशमन दलाचा बंब आला होता. जोरदार फवारे उडत होते. आग आता फारशी दिसत नव्हती, पण धुराचे मात्र बरेच लोट अजूनही येत होते.

दुसर्या बाजूने पोलिसांच्या दोन जीप्स तपकीर गल्ली अडवून उभ्या होत्या. पोलिस! फरासखाना जवळच आहे, पण घटनेनंतर पाच मिनिटांच्या आत इतकी सुसज्ज तुकडी? कशासाठी?

समोर बघितल्यावर उलगडा झाला. कारखान्याच्या डोक्यावर आग धुमसत होती, तिथे पोलिस गेलेही नव्हते. गोडाऊनच्या इमारतीला - म्हणजे उमेशची खोली जिथे होती त्या इमारतीला पोलिसांचा गराडा पडला होता. काही पोलिस उमेशच्या खोलीतही घुसले होते. छातीशी हाताची घडी घालून आजी गॅलरीत ताठ उभी होती. तिचे स्थिर डोळे विझत्या आगीवर खिळले होते. शेवटच्या काही ज्वाळांनी तिचा चेहरा उजळून टाकला होता.

--xx--

--सहा--

काय झालं ते मला आता समजलं, पण हे असं का? आणि उमेश... उमेश? तेवढ्यात आजीचं माझ्याकडे लक्ष गेलं, आणि "येते" अशी खूण केली. काय ते तिच्याकडूनच कळणारसं दिसत होतं.

आजी आली तेव्हा तिच्याबरोबर पांढर्या मशरुमसारख्या केसांचा एक माणूसही होता. आजी सरळ त्याला वर घेऊन आली. आल्याआल्या त्याची नजर किसान सॉसच्या बाटलीवर गेली.

"फ्यूज नाही लावलात शारदाबाई?"

मी तांब्यातून नाडी काढून त्यांच्यासमोर ठेवली.

"तू टाकलंस हे पाण्यात? शाब्बास! शारदाबाईंची नात शोभतेस!" ते हसत म्हणाले. "काय वापरलंय?"

"अ‍ॅसेटोन" आजी म्हणाली.

"हिचं का? काय भयंकर केमिकल्स वापरता गं तुम्ही आजकालच्या मुली..."

"मनू, हे..." आजीने जे नाव सांगितलं ते ऐकून मी उडालेच. कालच यांचं नाव रेडियोवर ऐकलं होतं. "मित्र आहेत माझे."

"असं शारदाबाई म्हणतात, पण खरं तर मी त्यांना अटक केली होती. शहात्तर साली." ते हसत म्हणाले. "सध्या आम्ही एकाच बाजूला आहोत."

"शारदाबाईंनी काल फोन केला, आणि त्यांची थियरी सांगितली. 'मॉर्निंग वॉक' खुनाच्या ट्रिगरमागचा हात त्यांच्या घरासमोर राहतो म्हणे! मी त्यांना म्हटलं, नुसत्या थियरीचा काय उपयोग? पुरावे द्या." ते सांगू लागले. "मग शारदाबाईंनी त्यांचा प्लॅन रचला, मी माझ्या पद्धतीने तपास केला."

"..आणि?" मला नव्हतं ऐकायचं हे सगळं.

"आणि असं समजलं, की 'उमेश कालिया' ही व्यक्ती तोतया आहे. यूपीएससीच्या कोणत्याही क्लासमध्ये अशा नावाची व्यक्ती शिकत नाही. कोणत्याही अभ्यासिकेत हे नाव नोंदवलेलं नाही. कोणत्याही सायकलिंग क्लबचा उमेश कालिया सदस्य नाही. तो फेसबुकवर, लिंक्डईनवर नाही. किंबहुना तपकीरगल्ली पलिकडे या व्यक्तीचं अस्तित्त्वच नाही."

"हे तुम्हाला एका दिवसात समजलं?" मी अविश्वासाने विचारलं.

"अर्ध्या दिवसात." मशरूम कट पांढरे केस गालातल्या गालात हसत म्हणाले. "अर्थात पुढचं सगळं वेळखाऊ असतं. पाळत ठेवा, सापळा रचा, वगैरे. पण या कोणासाठी थांबत नाहीत..."

"मी कालच मनूला म्हणत होते, चिंध्यांचे दोन उपयोग तिच्या लक्षात नाही आले." आजी म्हणाली. "चिंध्यांच्या चेंडूला आग लावून सापाचा बिळात टाकतात. मग साप बाहेर येतो, सळसळत."

"बास!" अति होतंय हे. मी किंचाळले. "नसेल त्याचं फेसबुक अकाऊंट, खूप लोकांचं नसतं. आणी तुम्ही..." पांढर्या केसांकडे वळत मी ओरडले, "तपास केला म्हणे - अर्ध्या दिवसात! चुकलं असेल काहीतरी तुमच्या ... तुमच्या पपलू लोकांचं..." माझे डोळे पाण्याने भरले.

आजीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. "मनू" ती हळुवारपणे म्हणाली, "तो निर्दोष असता तर पळून का गेला असता? आणि त्या छतावर काय सापडलं पाहतेस का?"

"उमेश...पळून..." आजीने होकारार्थी मान डोलावली.

तिचा आधार घेत मी हळुहळू खाली उतरले. उमेशच्या दारासमोर गॅलरीत चादरीवर प्रदर्शन मांडलं होतं. काळीबेंद्री, लांब आणि आखूड नळ्यांची...

पांढरे केस खाली वाकले आणि रुमालात धरून एक लांबुळक्या नळीची वस्तू उचलली.

"तमंचा. गाझियाबाद, मुजफ्फरनगर, साहरणपूर भागात बनतो. मेक इन इंडिया. तुम्हाला याचाच संशय आला का शारदाबाई?"

आजीने नकारार्थी मान डोलावली, आणि दोन्ही बाजूंना अणकुचीदार टोकं असलेली बारीक सळई उचलली. "याच्यामुळे सुरुवात झाली. याला चिंध्या जोडून ते कट्ट्याची नळी साफ करायला वापरतात. मग एकदा संशय आल्यावर मी नीट बघायला लागले, बाकीचं दिसत गेलं आणि काल ही डबी इथे सापडल्यावर तर खात्रीच झाली." काळी डबी काढत आजी म्हणाली.

"विंचेस्टर पीडीएक्स वन. स्नब नोज्ड मश्रूम ईफेक्ट बुलेट. हीच वापरली होती..." पांढरे केस मान डोलावत म्हणाले.

"बाकी सगळंच लक्षात येत गेलं. सकाळच्या सायकलफेर्या. यूपीएससीच्या नावाखाली दिवसभर घराबाहेर असणं. सायकल चालवणारा म्हणून घरात वेगवेगळी दुरुस्तीची अवजारं. पण हुशार होता, कारण कट्टे शेजारच्या कारखान्याच्या छतावर लपवले. तिथे कोणी जातयेत नाही. वेळ पडल्यास हात वर करता आले असते."

"मग आज का नाही केलं तसं?"

"केलं असतं, पण म्हणूनच धक्कातंत्र वापरायला लागलं. तिथे थोडा दारूगोळाही असावा असा अंदाज होता. अचानक स्फोट झाल्यावर त्याला आपल्याच दारूगोळ्याचा स्फोट झाला असं वाटलं आणि काही विचार न करता तो तिकडे धावला. तेच हवं होतं.."

"पण आमच्यापेक्षा चपळ निघाला तो शारदाबाई. पळून गेला. आता आम्ही शोध घेऊ, पण आता आमच्याकडे सगळे धागेदोरे आहेत. तुमच्याकडे एखादा फोटो असेल का त्याचा?"

मी माझा मोबाईल काढून त्यांच्याकडे दिला. त्या सेल्फीकडे बघणंच वेदनादायक होतं. आजीने हळूच माझा खांदा दाबला, आणि आम्ही निघालो.

मध्येच आजी मागे वळली. "हा एकटाच असू शकत नाही ना? साथीदार, काही संघटना वगैरे..."

पांढरे केस स्थिर नजरेने आजीकडे पाहत होते. "शारदाबाई, काही गोष्टी मी तुम्हालाही सांगू शकणार नाही. कालच्या दिवसात तेही थोडे धागे जुळले आहेत." पण अचानक ते ताठ उभे राहिले. "टोपीवाला लेनचं नाव राखलंत, शारदाबाई," आणि त्यांनी एक कडकडीत सॅल्यूट ठोकला!

--xx--

--सात--

"टोपीवाला लेन?" मी विचारलं.

"आमच्या चळवळीचं केंद्र. आणिबाणीतलं. मुंबईत आहे. होतं."

"ते बाटलीचं बनवायला तिथेच शिकलीस का?"

आजी हसली. "मोलोटोव्ह कॉकटेल म्हणतात त्याला. सुरुवातीला तर आम्ही पेटवायच्या वाती खोचायचो. मग एक दिवस सूर्यवंशीने हे सुचवलं..."

बोलता बोलता आम्ही दिंडी दरवाज्यापाशी आलो. आतून वाड्यातल्या बायकांचा आवाज येत होता, त्यातही भुर्केकाकूंचा.

"बाई बाई बाई बाई बाई... काय कलयुग आलंय. किती गुणाचा वाटायचा पोरगा. मानसीचा मित्र होता म्हणे - बॉयफ्रेंड की काय म्हणतात ते. काय निघालं बघा. कुण्णावर विश्वास ठेवायची सोय म्हणून..."

आजीने मला कडेला ओढलं. "मनू... या काही आता मला सोडायच्या नाहीत. दोन कामं कर. राजनला दोनशे रुपये दे. त्याच्या गाडीतलं सगळं पेट्रोल संपवलं काल. मग हसबनीस बाईकडे जा. तिला म्हणावं चिंध्या जाळून मूल होत नसतं. नवर्याला घे आणि डॉक्टरकडे जा. कळलं?"

... आणि मला तिथेच सोडून सुभेदारीणबाई वाड्यात शिरल्या. तपकीर गल्ली आता शांत होती.

-- xx --

(टीप: या कथेतली पात्रं काल्पनिक आहेत. तपकीर गल्ली खरोखर पुण्यात आहे, पण या कथेतल्या तपकीर गल्लीहून पूर्णपणे निराळी आहे. कथेला अतिशय उच्च दर्जाचं शीर्षकचित्र आपणहून दिल्याबद्दल अभ्या.. चे आभार! आणखी एक ऋणनिर्देश जॅक डनियल्स यांचा - रसायनशास्त्रासंबंधी माझ्या बावळट प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्याबद्दल!)

प्रतिक्रिया

जेपी's picture

22 Feb 2016 - 8:28 am | जेपी

भन्नाट...

प्रीत-मोहर's picture

22 Feb 2016 - 8:35 am | प्रीत-मोहर

Jabbardast katha...

नाखु's picture

22 Feb 2016 - 8:49 am | नाखु

जबराट....

आजचा दिस सार्थकी लागला...

मटकी मोडाच्चेय "गल्लीत" राहिलेला नाखु

बेकार तरुण's picture

22 Feb 2016 - 8:54 am | बेकार तरुण

आवडली कथा

राही's picture

22 Feb 2016 - 8:56 am | राही

आवडली कथा. पण फारशी पुणेरी वाटली नाही. चिमटे, टपल्या थोड्या कमी पडल्या.

विनायक प्रभू's picture

22 Feb 2016 - 9:10 am | विनायक प्रभू

ठाणे ते दादर लोकल मधे वाचता वाचता दादर कधी आले ते कळले नाही.
फोन वर वाचता येते,प्रतिक्रिया देता येत नाही.
ज्या ऑफिस मधे जायचे होते तिथे सोशल साईट ला बंदी.
म्हटले हटा सावन की घटा.
बंदी की ऐसी की तैसी.
आ.बा. ग्रेट पोस्ट.
सलाम कुबुल करो.
एक मस्त शॉर्ट फिल्म करता अगदी योग्य बंदिस्त स्क्रिप्ट.

व्वा. मास्तर मुम्बैत आहात हे वाचोन फार्फार गारेग्गार वाटले.

बोका-ए-आझम's picture

22 Feb 2016 - 10:20 am | बोका-ए-आझम

आगाथा आत्याच्या पात्रांची फोडणी उत्कृष्ट!

आतिवास's picture

22 Feb 2016 - 10:25 am | आतिवास

कथा उत्तम आहे. नेहमीप्रमाणे.
आवडली. नेहमीप्रमाणे.
पण ...
मराठी भाषा दिनाचा संबंध मात्र ओढूनताणून जोडल्यागत वाटला.

कथा आवडली, तुम्ही जास्त लिहीत नाही ही तक्रार पुनश्च करते :-)

किसन शिंदे's picture

23 Feb 2016 - 8:04 am | किसन शिंदे

आतिवास तैंशी सहमत. आदूची लिहीण्याची स्टैल तुफ्फान भारी आहे, फक्त तो लिहीत नाही कधी.

तुषार काळभोर's picture

24 Feb 2016 - 1:51 pm | तुषार काळभोर

जबराट कथा.
पण 'मराठी दिना'शी असंबद्ध वाटली.

भीडस्त's picture

22 Feb 2016 - 10:27 am | भीडस्त

छान सांगड घातली आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Feb 2016 - 10:33 am | लॉरी टांगटूंगकर

खूप भारी कथा!

कथा आवडली. नकाशा असे लिहिले आहे, तिथे नकाशाचे चित्र यायला हवे होते का?

हो... काही कारणाने ते काढायचं राहून गेलं आहे.

उगा काहितरीच's picture

22 Feb 2016 - 10:48 am | उगा काहितरीच

जब्राट ! ते भाषा वगैरे जाऊ द्या पण एक कथा म्हणून भन्नाटच आहे.

स्पा's picture

22 Feb 2016 - 10:49 am | स्पा

बाबी, भन्नाटच

धमाल आली

पैसा's picture

22 Feb 2016 - 11:38 am | पैसा

एकदम गुंगवून टाकणारी कथा! पुणेरी बोलीचे बारकावे अचूक पकडले आहेत. खवचटपणाची फोडणी अजून चालली असती. पण हबशीण वगैरे उपकथानक आणि संवादांनी जाम मजा आणली!

पुणेरीचं माहिती नाही पण कथा जबरी. उत्कंठापूर्ण !

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2016 - 12:02 pm | पिलीयन रायडर

नेहमी प्रमाणेच मस्त!

बॅटमॅन's picture

22 Feb 2016 - 12:05 pm | बॅटमॅन

पुणेरी वगैरेपेक्षा एक कथा म्हणून अतिभन्नाट. मान गये. _/\_

रातराणी's picture

22 Feb 2016 - 12:08 pm | रातराणी

जबरा! एक कडक सल्युट तुम्हालापण साहेब!

एस's picture

22 Feb 2016 - 12:12 pm | एस

इतकं पुणेरी नाही हे वरील बर्‍याचजणांचं म्हणणं बरोबर असलं तरी एक कथा म्हणून अल्टिमेट आहे. 'मोलाटोव्ह कॉकटेल' आणि १९७६ चा उल्लेख म्हणजे तुमचा अभ्यास गाढा आहे हे दिसून येते. फक्त आजीला अटक केलेला तो पोलिस अधिकारी अजूनही पोलिसदलात सक्रिय असेल हे लॉजिक जरा बरोबर वाटले नाही. पण इतके ठीक आहे.

आणि अर्थात डॉक्टरसाहेबांच्या खुनाचा कथेतील शोध आणि प्रत्यक्षात तपासात होत असलेली जाणीवपूर्वक हयगय हा विरोधाभास अस्वस्थ करून गेला. हम्म्म.

शुभां म.'s picture

22 Feb 2016 - 12:19 pm | शुभां म.

अप्रतिम ...........................
अजून शब्दच नाहीत वर्णन करायला..........................

एकच लंबर आदूबाळा. सिम्प्ली सुपर्ब.
दिल खुश हो गया. भारा हे रसायन तू पार कोळून प्यायलेला इसम आहेस यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहेस.
तुला काय गिफ्ट देऊ या अप्रतिम कथेबद्दल?
भारा आठवले की मला प्रभाशंकर कवडी आठवतात. फास्टर फेणेला त्यांनी आपल्या चित्रांनी समृध्द केलेलं. माझ्या तोडक्या मोडक्या रेषात त्यांना आदरांजली आणि तुझ्या कथेला एक फास्ट काढलेले चित्र.
AaBa

भीडस्त's picture

22 Feb 2016 - 1:22 pm | भीडस्त

बढिया

आदूबाळ's picture

22 Feb 2016 - 1:34 pm | आदूबाळ

जबरदस्त! धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

22 Feb 2016 - 4:04 pm | चांदणे संदीप

कस्ल शौलेट चित्र अभ्यादादा!

मान गये! फ़ास्टर फेणेची आठवण आली! :)

प्रीत-मोहर's picture

22 Feb 2016 - 4:20 pm | प्रीत-मोहर

कथेला समर्पक चित्र!!!

एस's picture

22 Feb 2016 - 5:50 pm | एस

सहमत.

बॅटमॅन's picture

22 Feb 2016 - 6:16 pm | बॅटमॅन

हाण्ण तेजायला, मान गये.

किसे?

आदूबाळ की जब्राट कथा और अभ्या का सॉल्लिड चित्र, दोनोंको!!!!

स्पा's picture

22 Feb 2016 - 6:24 pm | स्पा

अभ्या मस्तच रे, येकदम समर्पक चित्र.
मोजक्याच रेषा, हायलाइट शॅडो चा मस्तच उपयोग करुन घेतलास

अभ्या..'s picture

22 Feb 2016 - 6:38 pm | अभ्या..

अरे ते डूडल स्केच वापरून मोबाइलवर काढले पटकन काढायचे म्हणून. नंतर मराठी फॉन्टसाठी पीसीवर घ्यावे लागले. :)

स्पा's picture

22 Feb 2016 - 6:41 pm | स्पा

भारीच

स्पा's picture

22 Feb 2016 - 6:41 pm | स्पा

भारीच

स्पा's picture

22 Feb 2016 - 6:43 pm | स्पा

डुडल काढतानाच असा एक्सट्रिम काँन्ट्रास्ट दाखवलास ना, त्याने परिणामकारकता वाढली असे म्हणायचे होते

अभ्या..'s picture

22 Feb 2016 - 6:49 pm | अभ्या..

:)

अनुप ढेरे's picture

22 Feb 2016 - 1:36 pm | अनुप ढेरे

मस्तं!
पेठेत मोडाची मटकी!! ओरडणारी बाई चांगलीच आठवते.

मस्त कथेला साजेसे छान चित्र. क्या बात है!

मृत्युन्जय's picture

22 Feb 2016 - 1:37 pm | मृत्युन्जय

खतरनाक कथा आहे. एकदम जबरा .

भारी निरीक्षणशक्ती आणि समांतर विचार,घटना धाववणे अप्रतीम ! अभ्या.. चित्र समर्पक!

भुमी's picture

22 Feb 2016 - 2:06 pm | भुमी

आवडली.

असंका's picture

22 Feb 2016 - 2:08 pm | असंका

काय सुरेख!!
धन्यवाद!!

टवाळ कार्टा's picture

22 Feb 2016 - 2:12 pm | टवाळ कार्टा

ज..ब..र..हा..ट

मी-सौरभ's picture

22 Feb 2016 - 2:53 pm | मी-सौरभ
कथा आवडली
राजाभाउ's picture

22 Feb 2016 - 2:48 pm | राजाभाउ

मस्त एकदम.

पियुशा's picture

22 Feb 2016 - 2:59 pm | पियुशा

जबराट , अभ्याच चित्र पन भारिये कथेत टाकता आल तर अजुन छान :)

विजुभाऊ's picture

22 Feb 2016 - 3:36 pm | विजुभाऊ

व्वा.
तपकीर गल्लीत नाही पण त्या पलीकडच्या गल्लीच्या टोकाला होता एक दगडी हौद.
आता काय परिस्थिती आहे म्हैत नाही.
पण बाकी म्हणा एक झक्कास कथा वाचल्याचे समाधान मिळाले

प्रियाजी's picture

22 Feb 2016 - 5:44 pm | प्रियाजी

कथा खूप खूप आवडली अन चित्र ही.

Maharani's picture

22 Feb 2016 - 5:50 pm | Maharani

जबरी कथा.झक्कास.