नाताळी बाजार
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली. आणि नाताळ येऊन ठेपल्याची वर्दी मिळाली.
हे नाताळी वैभव बघायला संध्याकाळी आम्ही बाजाराचा फेरफटका मारायला गेलो. दुकाने निरनिराळ्या सजावटीच्या वस्तू, चॉकलेटे, बिस्किटे, नाताळचे केक आणि नाताळ दरम्यान येणार्या फळांनी फुलून गेली होती. नाताळसाठी खास अश्या कितीतरी 'आंगेबोट्स' म्हणजेच सवलतींच्या योजना दुकानादुकानात झळकत होत्या आणि बरेच ग्राहक मजेत खरेदीचे बेत रंगवत फिरताना दिसत होते.
म्युन्स्टर शहरातला मध्यवर्ती रस्ता तर आपल्या खानदानी दिमाखात सजला होता. अनेक शतके जुन्या अश्या इमारती ही या मध्यवर्ती भागाची प्रतिष्ठा आहे. खिडक्याखिडक्यांत पणती सारखे विजेचे दिवे लावले होते आणि त्या इमारती फारच सुंदर दिसत होत्या. दुकानांच्या पुढल्या जागांमध्ये टानेनबाऊमची चक्रे म्हणजेच सूचीपर्णी झाडाची फांदी चक्राकार करुन सजवून टांगलेली दिसत होती. दुकानांच्या आतही ख्रिसमस ट्री सजवून ठेवले होते आणि अश्यातच लक्ष वेधून घेत होते खास 'नाताळी बाजार'.
आपल्याकडे जत्रेदरम्यान जशी आकाराने लहान टपरीवजा दुकाने मांडली जातात, तशीच टुमदार दुकाने आपल्या खास नाताळी वस्तू घेऊन शहरातल्या मुख्य चौकात दाटीने मांडली जातात. केवळ चार आठवडे हा बाजार भरलेला असतो. या नाताळी बाजारांना खूप जुनी परंपरा आहे. ही संकल्पना मुळची जर्मनी आणि ऑस्ट्रीयातली. पण आता इतर देशांतही असे बाजार भरू लागले आहेत. सर्वांत पहिला नाताळी बाजार जर्मनीतल्या ड्रेस्डेन गावात १४३४ साली भरवण्यात आला होता. म्युन्स्टरच्या बाजाराला सुद्धा अशीच जुनी परंपरा आहे.
आपल्या तुळशीबागेत असते तशी गर्दी आणि लहान लहान दुकाने पाहून आम्ही एकदम खूष झालो. वातावरण उत्सवी आणि उत्साही झाले होते. लोक सांताक्लॉज सारख्या लाल टोप्या घालून हसत खेळत फिरत होते. लहान मुले, आई-वडील आणि आजी-आजोबा असे सर्वच जण एकदम खुषीत एकत्र फिरताना पाहून मजा येत होती. आजी आजोबा आपल्याला काय भेटवस्तू घेणार याची लहानांच्या चेहर्यावर उत्सुकता दिसत होती. कॉलेजवयीन मुले मुली सुद्धा हातात बिअर किंवा वाईनचे पेले घेऊन मजेत दंगा करत भटकत होती.
छोटी छोटी लाकडाच्या फळ्यांनी उभारलेली दुकाने दाटीने उभी होती. प्रत्येक दुकान आपल्या वैशिष्ट्याने काही वस्तू सजवून होते. नाताळच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या निकोलाऊस म्हणजेच नाताळबाबाच्या निरनिराळ्या मूर्ती, वाद्य वाजवणारे देवदूत असे साहित्य असलेली काही दुकाने होती. काही जण निराळ्या पद्धतीचे खास चीज विकत होते तर काही दुकानांत रत्ने-खडे यांचे अलंकार सजवून ठेवले होते. विक्रेते सुद्धा हसून स्वागत करुन दुकातल्या वस्तूंची माहिती देत होते आणि नाताळच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत होती. इथल्या पारंपारिक पद्धतीने केले जाणारे काही खाद्य पदार्थ विकणारी दुकाने जीभ चाळवत होती.
एका खाद्यपदार्थाच्या दुकानावर लिहिलेल्या 'राकलेट' या नावाने आम्ही त्या दुकानाकडे आकर्षित झालो. कारण राकलेट हा काय पदार्थ आहे याची आम्हाला स्वातीताईच्या लेखावरुन थोडी कल्पना आली होतीच. आम्ही भारतीय आहोत हे पाहून तो विक्रेता एकदम खूश झाला. २५ वर्षांपूर्वी त्याने केलेल्या भारतभेटीचे इत्थंबूत वर्णन त्याने मोठ्यामोठ्या आवाजात उत्साहाने केले. आणि आम्हाला आपणहोऊनच राकलेटची चव देऊ केली. एका छोट्या मांडणीवरती चांगला फूटभर मोठा चिजचा तुकडा ठेऊन त्याला वरील बाजूने थेट ज्वाळांनी वितळवायचे आणि वितळलेला खमंग भाग सुरीने खरवडून एका कुरकुरीत पावावर घालून खायचा, अशी या राकलेटची ओळख त्याने करून दिली. स्वित्झर्लंड मधल्या मेंढपाळांची ही पारंपारिक पाककृती आहे आणि ते वापरतात ते खास चीज त्याने स्वित्झर्लंडहून आणले आहे असेही त्याने सांगितले. प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला.
इतक्या छान राकलेट वरती खास नाताळची 'ग्लूवाईन' नाही प्यायली तर बाजाराची भेट अपूर्ण राहिल्यासारखीच होईल. दालचिनी, लवंग आणि काही वनस्पती घालून उकळून तयार केलेली ही वाईन गरम गरम वाफाळत्या कपातून प्यायला फारच मजा येते. ग्लूवाईन या इथल्या खास पेयाचा फक्त या कडाक्याच्या थंडीच्या काळातच आस्वाद घेतला जातो. लोक नाताळ बाजारात ही गरम गरम वाफाळती वाईन पीत तासनतास गप्पा मारत उभे असतात. बर्फगार थंडीमध्ये भणाणा वार्यात ही गरम गरम वाईन प्यायली की थंडी कुठच्या कुठे पळून जाते आणि बाजारची धमाल पहायला पावले पुन्हा चालू लागतात.
-- शाल्मली
माझा हा लेख नुकताच इसकाळच्या पैलतीर पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे.




वाचने
9562
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वा!
In reply to वा! by चित्रा
ऍपल सायडर
मस्तच लेख.
मस्त
In reply to मस्त by सहज
ही पहा
+१
मस्तच.
माहितीपूर
In reply to माहितीपूर by रेवती
सोप्पंय आहे!!!!
In reply to सोप्पंय आहे!!!! by पिवळा डांबिस
पाकृ द्या की!!
In reply to सोप्पंय आहे!!!! by पिवळा डांबिस
वा!!
In reply to माहितीपूर by रेवती
.
शाल्मली,
In reply to शाल्मली, by यशोधरा
हो..
वा!
In reply to वा! by मनस्वी
+१
मस्त वर्णन..
छान
मस्त
धमाल
मस्त..
शाल्मलीतै,
धन्यवाद!
जर्मन नाताळ..
In reply to जर्मन नाताळ.. by प्रभाकर पेठकर
ह्या
In reply to जर्मन नाताळ.. by प्रभाकर पेठकर
हेच म्हणतो...
In reply to हेच म्हणतो... by बिपिन कार्यकर्ते
या की,