मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री. श्री. संत यनावाला महाराज

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
श्री. श्री. संत यनावाला महाराज मित्रहो, धाग्याचे शीर्षक वाचून धक्का बसला नां ? पण त्याचे काय आहे, हल्ली दूरदर्शनवरील ब्रेकिन्ग न्युज प्रमाणे प्रत्येक शीर्षक धक्कादायक नसेल तर कोणी तिकडे लक्षच देत नाही. आता साधी गोष्ट, तुम्हाला माहीत आहेच महाराष्ट्रातील संत आपली ओळख कोणालाही पटू नये म्हणून नाना प्रयत्न करत असतात. श्री.(एकच श्री. बर कां !) तुकाराम महाराज घ्या. चांगला वाण्याचा वंशातला माणुस, म्हणे मीठ विकावयाला कोकणात गेला. त्यांच्या दुकानात विकावयास असलेल्या मीठाच्या गोण्या कोकणातून येतात हे त्यांना माहीत होतेच; पण लोकांना आपली खरी ओळख पटू नये म्हणून हा खटाटोप. साईबाबा घ्या, गजानन महाराज घ्या,फार काय गाडगे महाराज घ्या; त्यांच्याकडे पाहून कोणाला वाटेल तरी का कीं हा माणुस मोठा संत आहे ? तीच गत यांची.चांगले "यशवंत" नाव,आपल्या क्षेत्रात, मग ते यांत्रीकी महाविद्यालय असो वा वर्षानुवर्षे शब्दकोडी लिहावाची असोत, यशवंत झाले, पण लोकांना कळू नये म्हणून "यनावाला" हे पारशी नाव घेतले. घ्या घ्या, पण आम्ही मिपाचे चतुर, साक्षेपी सभासद. अशाने फसतो काय? अहो, कोणी डु.आय.डी, घेतला तर दोन प्रतिसादात निम्म्या सभासदांना ते कळलेले असते. आता हजारो वाचकांच्या आणि शेकडो प्रतिसादांच्या गदारोळात जर एखाद्यच्या नजरेतून खरी चलाखी लक्षात आली नसेल तर ती ध्यानात आणून देणे हे आमचे कामच आहे. आम्ही फक्त तीन सूचक गोष्टींकडे आपले लक्ष वेधतो. आपणास जास्त "क्लुं"ची गरज नाही. (१) एकविसाव्या शतकांत कोणी ओव्या-अभंग लिहतात? तुकडोजी महाराज की पाडगावकर ? पैकी स्वामी पाडगावकर महाराजांनी मुखपृष्ठावर आपला लंगोटी घातलेला. हातात कमंडलू घेत्लेला ,दाढीवाला फोटो छापून शंकेला जागाच ठेवली नाही. त्या नंतर यनावाला महाराज. एक दोन लेख गद्यात लिहले पण शेवटी "आतले" बाहेर पडतेच. लिहा लिहा. अभंग-ओव्या लिहा. एका चतुर सभासदाने त्याला extended चालिसा म्हणून संतगिरी बाहेर काढलीच कीं नाही ? (२) आता तुम्ही म्हणाल ही बाह्य लक्षणे झाली..केवळ अभंग-ओव्या लिहण्याचा "चमत्कार" केला म्हणून संतपद द्यावयाला आम्ही व्हटिकान सिटीमध्ये बसलो आहोत काय ? आंतरपुरावे द्या. मान्य. तिकडेच वळू. संतांचे प्रमुख लक्षण काय ? त्यांना सामान्य जनांबद्दल कळवळा पाहिजे. म्हणजे हे लोक मजेत, आनंदाने इहलोकातील सुखाचा उपभोग घेत जलविहार करत असतील तर हे संत म्हणणार हे सामान्य लोक भवसागरात गटांगळ्या खात आहेत, या अज्ञानी लोकांना वाचवण्याकरिता तर ईश्वराने आपणास पाठविले आहे, चला तर, धरा यांची मानगुट, काढा बाहेर. सामान्यांच्या आनंदावर विरजण घालणे हे प्रमुख ध्येय. श्री.श्री.यनावाला महाराज हेच करत आहेत. जर मला वाटत असेल की "ईश्वराच्या भक्तीने माझ्या रोजच्या कटकटीतून माझी थोडी सुटका होत आहे, पुढील जन्मात चांगले आयुष्य लाभेल, माझ्या संकटात माझ्या पाठीशे देव असेल, अगदी .गेला बाजार शिर्डीला गेल्याने नवर्‍याला प्रमोशन मिळेल" तर हे लगेच सांगणार की, " छ्या, यडा की काय, पुढचा जन्म वगैरे भानगडच नाही. आणि देव वगैरे विसर. त्याचे अस्तित्वच सिद्ध झालेले नाही. दाखव मला तुझा देव ! " अगदी "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " म्हणत नाहीत हे खरे पण ते श्राद्धावर विश्वास नाही म्हणून बाकी "कळवळा" तसाच ! (३) आता शेवटचा प्रमुख पुरावा "देव नाही" हे पटवून देण्याचा आटापिटा का करत असतात ? अहो, श्री. संत तुकाराम महाराजांनी लिहले आहे आहे ऐसा देव वदवावी वाणी ! नाही ऐसा मनी अनुभवावा !! म्हणजे देव नाही हे खरे, पण या चार लोकांना सांगतांना "ये खयाल अच्छा है". जरा यांना बरे वाटत असेल तर तसे सांगावयास काय हरकत आहे ? पण श्री.श्री.संत यनावाला महाराज जास्त रोखठोक. यांचा कळवळा जरा जास्तच. जखमेवर फुंकर घालण्याऐवजी त्यावर आयोडीन ओतणेच पसंत. तेव्हा त्यांनी चार पावले पुढे जाऊन देवावर फुलीच मारली. तेव्हा आता आपल्या लक्षात आले असेलच की तुकाराम महारजांना एकच श्री का व यनावाला महाराजांना डबल श्री का. (यनावाला महाराज आमचे सत्गुरू. आमचा हात धरून त्यांनी आम्हाला जालांवरील या स्थलांवर आणले. हल्ली सर्व बापू-बाबा यांना PRO and Event Manager लागतातच. आम्ही त्यातलेच. तेव्हा बोला श्री.श्री.संत यनावाला महाराजकी जय. पुंडलिक वरदे..अरर चुकलच की) . शरद

वाचन 6873 प्रतिक्रिया 0