सृजनत्व द्या
लेखनप्रकार
सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी व्यवसायात किंवा नोकरीत आवश्यक असे कौशल्य आहे. तुम्ही मिडीया मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याची आवश्यकता जरा जास्त असेल. जिथे इंजिनीयरिंग प्रॉडक्शन चालते तिथे याची आवश्यकता कमी असेल परंतु सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी शिवाय नोकरी किंवा व्यवसाय वाढणे, किंवा त्यात प्रगती होणे अशक्य मानावे लागेल.
या संदर्भातली आजच्या जगातली काही उदाहरणे पाहु. १९७३ सालापर्यंत १ जानेवारीला नविन कॅलेंडर भितीवर लावले जायचे. हे कॅलेंडर सहसा गिफ्ट स्वरुपात असायचे. त्यावर नयन रम्य चित्रे असायची. काही नट नट्या यांची तर काही निसर्गदृष्ये किंवा देव देवता यांची. त्याच्या जोडीला गुडीपाडव्याला वेगळे पंचांग विकत घेणारा एक वर्ग होता. ज्यांना एकादशी, चतुर्थी किंवा अन्य सण, व्रत यासाठीचा सोयीचा दिवस शोधणे गरजेचे असायचे.
आजही पंचांग उघडायला नाखुष असलेले अनेक लोक आहेत. कारण पंचांगाची क्लिष्टता. यावर सुमंगल पब्लीशिंग कंपनीने कल्पकतेचा वापर करुन भितीवर लावायचे एक पंचांग काढले ज्याचे नाव कालनिर्णय आहे.
या कल्पनेला लोकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आहे. खालील कल्पना या निमीत्ताने बदलल्या आहेत.
१) कॅलेंडरचा वापर फक्त तारखा किंवा राष्ट्रीय सुट्या शोधण्यासाठी न करता इतर सण- वार यासाठी करावा.
२) कॅलेंडर पैसे खर्च करुन विकत घ्यायचे.
३) कोणाचेही चित्र नसलेले / फक्त तारखा असलेले कॅलेंडर भितीवर/ योग्य तेथे लावायचे.
ह्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या आज १ कोटी ४० लाख आहे तर याचे सर्क्युलेशन Audit Bureau of Circulation (India), यांच्या मते १८ कोटी, १८ लाख, ७ हजार, १६८ आहे. ( या संख्या त्यांच्या वेबसाईतवरुन घेतल्या आहेत )
अनेक कल्पना येतात आणि व्यवहार्य नसतील तर मागे पडतात पण एखादा नविन व्यवसाय नविन कल्पना घेऊन सुरु करायचा, तो वाढवायचा आणि नावलौकीक मिळवायचा ह्या साठी सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी हा भाग खुप महत्वाचा आहे.
इतकच कशाला, फेस बुक आणि व्हाट्सअॅप मध्ये जी नाविन्यपुर्णता आहे त्याचेच फळ आजच्या त्या कंपन्यांच्या लौकीकात आणि संपत्तीत झालेली वाढ आहे.
अनेक उदाहरणे देता येतील ज्यात फक्त व्यवसायतच नव्हे तर नाविन्य पुर्ण कल्पनांचा वापर करुन नोकरीत ज्यांनी आपली भरभराट करुन घेतली आहे.
मग प्रश्न असा पडतो की हे सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कुठे असते आणि तीला प्रकट कशी करायची ? उत्तम सृजनत्व असलेली माणसे वेगळी असतात का? काय करतात म्हणुन त्यांना सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी प्रसन्न होते ?
खर तर सर्वच माणसांमध्ये सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी असतेच. कुणी त्याचा जाणिवपुर्व विकास करतो तर कुणी त्याकडे ढुंकुनही पहात नाही. याच कारण आमच्या जडण घडणीत दडलेल आहे.
खर तर ही कल्पक अथवा सृजनत्वाच वरदान असलेली मंडळी आपल्या सारख्यांच्याच घरात जन्मली. वारसा हक्काने त्यांना ही कला मिळाली असेही नाही. ना ते कोणत्या वेगळ्या शाळेत शिकले. पण त्यांना आपल्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याच्या क्षमतेची जाणिव फार लवकर झाली असे म्हणावे लागेल.
आमची शिक्षण पध्दती पाहीली तर ज्यातुन सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी विकास होईल असा एकच तास उदाहरण अर्थ चित्रकला विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेला असतो. भाषेच्या माध्यमातुन क्रियेटीव्ह कसे लिहावे याचे मार्गदर्शन करणारे एखादेच शिक्षक असतात. बहुतेकांचा कल वाचलेला निंबध लिहीण्याकडे असतो.
शाळेतले उरलेले तास गणितीकरण आणि सर्वच वर्गाचे उत्तर एकच कसे असेल याकडे असतो. कृती वर आधारीत शिक्षण असा नाविन्यपुर्ण प्रयोग करणार्या शाळा एकतर सर्वच शहरात नसतात. असल्याच तर सी बी एस सी/ आय सी एस बी च्या आकर्षणात याकडे फारसे कुणाचे लक्ष नसते. खेड्यात अक्षर ओळख करुन देणार्या शाळा आहेत हे नशिब आहे अस म्हणाव लागेल.
शाळांमध्ये मुलांना मातीच्या गोष्टी बनवायला शिकवले जाते, झाडे लावायला शिकवले जाते, सुतार कामातुन भुमीती शिकवली जाते असे सांगीतले तर आजचे पालक त्याकडे "क्रेझी" असा रिमार्क मारुन पाठांतरावर आणि मेमरी तंत्रावर आधारीत परिक्षा पध्दतीवर भर असलेल्या शाळेची निवड करतील.
आज जे पालक आहेत ते आपल्या पाल्याच्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कडे किती लक्ष देतात ? त्याचा विकास कसा होईल याकडे किती आग्रही असतात असे विचारले तर ही आकडेवारी फारशी आकर्षक असणार नाही. फार कशाला मी सुध्दा माझ्या एकुलत्या एका मुलीच्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही. तिला बाहुल्यांचे ड्रेस शिवायचा छंद लहानपणी जडला होता. पुढे तिच्या कल चाचणीची लिमिटेशन्स म्हणा किंवा मला तिला फॅशन डिझाईन च्या शिक्षणाला पाठवावे अशी तीव्र इच्छा न झाल्यामुळे तिला पारंपरीक इंजिनीयरीग करावे लागले. आजच्या तिच्या नोकरीत सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी ला स्कोप असल्याने तिची प्रगती झाली पण व्यावसायीक समाधान म्हणाल तर फारसे लाभले नाही.
यावर पर्याय काय ? पालकांना किंवा आज नोकरी/ व्यवसाय करण्यार्या व्यक्तीला आपले सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी वाढवण्याचे काय मार्ग आहेत ? यावर प्रकाश पुढच्या लेखात टाकु.
वाचने
1761
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
चांगला विषय मांडल्याबद्दल
धन्यवाद,