मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिकार (गझल)

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ना कुठला पापी होतो ना व्यसनी टुकार होतो नियतीच्या खेळामध्ये मी दुबळी शिकार होतो दुःखात माखला जन्म त्या जखमा पदोपदीच्या अनिवार यातना ज्यांचा मी मुकाच हुंकार होतो सन्मार्ग चाललो तरीही हे दारात उभे दुर्भाग्य नजरेत जणु दैवाच्या मी अगदी भिकार होतो त्या बेफाम सागरामध्ये मी क्षुद्र जणु नावाडी प्रलयास द्यावया झुंज मी कुठे चमत्कार होतो अविरत जरीही लढलो सुखशिल्प नवे कोराया परि स्वर्ग निर्मिण्या येथे मी खुजा शिल्पकार होतो ही गुढ भासली दुनिया स्वार्थाच्या जंजाळातील पण गुढ उकलण्याजोगा मी कुठे जाणकार होतो हे अंगण फितुर झाले त्या स्वप्नांच्या पर्णकुटीचे अन् इतका असुन द्रोह मी कसा निर्विकार होतो त्या फसव्या ललाटरेषा नि फसवेच पाप-पुण्य नशिबाच्या वाटेवरचा मी भटका चुकार होतो स्वप्नांत अडकला जीव परि राख जाहली त्यांची स्वप्नांस रक्षिण्या तेव्हा मी थिटा प्रतिकार होतो -शार्दुल हातोळकर

वाचने 5600 वाचनखूण प्रतिक्रिया 16

माहितगार 28/11/2015 - 13:57
भारतीय तत्त्वज्ञानातील मिथ्यावाद, कर्मयोग तसेच बौद्ध आणि इतर तत्त्वज्ञाने या चिरंतन मानवी दु:खावर फुंकर घालण्याचा अल्पसा आणि अंशतः प्रयत्न करत असतात का असे कधी कधी वाटते, आपली गझल पोचली आणि आवडलीही.

शार्दुल_हातोळकर 28/11/2015 - 18:25
मी पहिल्यांदाच मिसळपाव वर गझल प्रकाशित केली आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.

In reply to by विशाल कुलकर्णी

शार्दुल_हातोळकर 05/12/2015 - 21:39
विशालजी, माफ करा पण मला मराठी व्याकरणाचे फारसे ज्ञान नाही आणि मी व्याकरणाच्या फंदात फारसा पडतही नाही. व्याकरणात अडकुन भाषेचे सौंदर्य आणि भाषेचा आनंद हरवतो असे माझे वैयक्तिक मत आहे. इतर जाणकार मंडळी याबद्दल नक्कीच सांगु शकतील.