खारीचा वाटा

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 9:06 pm

.
.
मी अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात राहतो. दर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी सकाळी न चुकता आमच्या घराशेजारील गार्डन-कम-वॉकिंग स्ट्रीपवर चालायला जातो. पूर्वी हे एक गोल्फ कोर्स होते, जे पुढे बागेमध्ये परिवर्तित केले गेले. ह्या बागेच्या अगदी मधोमध एक तलाव आहे. त्याच्या आसपास शेड्स बांधल्या आहेत आणि त्या शेड्सच्या खाली लोकांना बसायला टेबल्स आणि बेंचेस लावली आहेत. बागेत मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे, जंबल जिम यासारखी खेळायची साधने आहेत. शनिवारी, रविवारी आसपासची कुटुंबे आपल्या मुलाबाळांना घेऊन येथे पिकनिक साजरी करायला येतात. येताना खूप खाण्याचे पदार्थ, पिण्याचे विविध प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंक्सचे कॅन्स, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन येतात. कितीतरी वेळा बागेतच मुलांचे वाढदिवसदेखील साजरे केले जातात. अशा वेळी खूप लोक येतात आणि सर्वत्र एक रंगीबेरंगी, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले दिसते.

पण ह्या सर्व आनंदाला विरजण लागते ते त्यानंतर होणार्‍या अस्वच्छतेने. कितीतरी वेळा अशा प्रसंगी होणारा कचरा नीट ट्रॅश कॅन्समध्ये टाकला जात नाही, जो नंतर वार्‍याने सर्व गार्डनभर पसरतो आणि इतक्या सुंदर, हिरव्यागार बागेची अगदी वाट लागते. एक अवकळाच पसरते बागेवर. जेथे तेथे पेपर डिशेस, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पिझ्झा-बर्गरचे रिकामे बॉक्सेस, कोक-पेस्पीचे रिकामे टिन्स, फुटलेले फुगे, तुटलेली खेळणी पडलेली दिसतात. उरलेले अन्नदेखील नीट बांधून ट्रॅश कॅन्समध्ये न टाकल्यामुळे त्याच्यावर माश्या घोंघावताना दिसतात. थोडक्यात म्हणजे पुन्हा त्या बागेत पाय ठेवण्याची इच्छा होणार नाही, इतका कचरा ह्या लोकांनी करून ठेवलेला असतो. आठवड्यातून ठरावीक दिवशीच कचरा गोळा करणारी गाडी येईपर्यंत बागेची परिस्थिती फार वाईट असते.

एकदा नेहमीप्रमाणे सकाळी बागेत चालत असताना एका ट्रॅश कॅनच्या बाजूने गेलो. ट्रॅश कॅन खूपसा रिकामा होता, पण त्याच्या बरोबर खालीच पिझ्झाचा एक मोठ्ठा बॉक्स पडला होता. बहुतेक त्यात अर्धवट खाल्लेला पिझ्झा असावा, कारण त्यावर माश्या घोंघावत होत्या. ते बघून एक क्षण वाटले, तो बॉक्स उचलून त्या ट्रॅश कॅनमध्ये टाकावा. पण दुसर्‍याच क्षणी मन बंड करून उठले. का म्हणून? का म्हणून इतरांनी केलेली घाण आपण उचलायची? ज्या कोणा व्यक्तीने तो बॉक्स इथपर्यंत आणून टाकला, त्याला तो बॉक्स त्या ट्रॅश कॅनमध्येदेखील टाकता आला असता. मग एवढी बेपर्वाई, एवढा निष्काळजीपणा, एवढी मगरुरी कशासाठी? ज्या बागेचा इतका फुकट फायदा करून घेताय, त्या बागेच्या स्वच्छतेची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही म्हणजे काय? ह्या विचारांसरशी त्या अज्ञात व्यक्तीला मनातल्या मनात लाखोली वाहत पुढे चालायला सुरुवात केली. पुढे निघून आलो तरी मनातले विचार जात नव्हते.

२००८ साली मुंबईत असताना, एकदा विले-पार्लेच्या सर्व कॉलेजेसनी स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यात विले-पार्ले रेल्वे स्टेशन कॉलेजच्या मुलांनी स्वच्छ केले होते. कॉलेजच्या मुलांनी हातात ग्लोव्हज घालून, नाकाला रुमाल बांधून अगदी मन लावून प्लॅटफॉर्म आणि इतर परिसर स्वच्छ केला होता. पण दोनच दिवसात आपल्या मुंबईच्या जनतेने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरवले. पुन्हा सगळीकडे कागदाचे बोळे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, सिगारेटची रिकामी पाकिटे, गुटख्यांचे पाउचेस, पान, गुटखा, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकार्‍या, आणखी काय काय.. ते बघून इतका राग आला की वाटले - जोपर्यंत अशी घाण करणार्‍यांना दंड ठोठावला जात नाही किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत कितीही वेळा स्टेशन, आपले शहर, परिसर साफ करा, त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. का म्हणून कॉलेजच्या मुला-मुलींनी, ही इतरांनी केलेली घाण साफ करायची? ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’सारख्या कितीही घोषणा द्या, जोपर्यंत कचरा करणार्‍याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घोषणा फक्त फलकांवरच राहतील.

ह्युस्टनमध्ये व्यक्तीगणिक एक कार आहे म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. जवळजवळ ३०-४० लाख लोकसंख्या असलेल्या ह्या अमेरिकेतील चौथ्या मोठ्या शहरात ट्राफिक त्या मानाने फारच शिस्तबद्ध आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत, पण सर्वात मोठे कारण म्हणजे कायद्याचा धाक. कोणीही जरा जरी ट्राफिकचा नियम पाळला नाही, तर जणू काही आकाशातून अवतीर्ण झाल्यासारखी पोलिसाची गाडी पिवळे-लाल-निळे दिवे दाखवत मागून येते, त्याला पकडते आणि कमीत कमी १५०-२०० डॉलर इतका दंड ठोठावते. आपल्याकडे जसे अशा वेळी ‘गांधीजी’ मदतीला येतात, तसे इथे काहीही येत नाही. दंड, मनस्ताप, कोर्टाची वारी, ड्रायव्हिंग लायसन्सवर कायम राहणारा एक धब्बा आणि त्यामुळे गाडीचा वाढलेला इन्श्युरन्स, ह्या सर्वांच्या त्रासाला घाबरून बहुतेक लोक गाड्या वाहतुकीच्या नियमाला धरूनच चालवतात. परंतु सार्वजनिक जागेत कचरा निर्माण करणार्‍याला अशी कोणतीही शिक्षा नाही. त्यामुळे अशा व्यक्तींवर कोणताही अंकुश राहिलेला नाही.

ह्युस्टनमध्ये मुंबईसारखेच अठरापगड जाती-धर्माचे, वर्णाचे लोक राहतात. ४५% आफ्रिकन-अमेरिकन (ज्यांना आपण निग्रोवंश संबोधतो, पण येथे ‘निग्रो’ हा अपमानास्पद शब्द आहे, म्हणून त्यांना ‘काळे’ म्हटले जाते), मेक्सिको देश लागूनच असल्यामुळे आणि टेक्सास हे राज्य पूर्वी मेक्सिकोचा एक भाग असल्यामुळे ४०% हिस्पॅनिक जनता आहे. बाकी १०% गोरे आणि उरलेले ५% आशियाई. ह्या सर्वांची संस्कृती, शिक्षण, संस्कार, सामाजिक जाणिवा खूप भिन्न आहेत. स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यातल्या त्यात काळे आणि हिस्पॅनिक शैक्षणिकदृष्ट्या जास्त मागासलेले आहेत म्हटले तरी चालेल. ह्या सर्व गोष्टींमुळे स्वच्छतेच्या आणि सामाजिक जबाबदार्‍यांच्या जाणिवा अगदी वेगवेगळ्या आहेत.

विचार करता करता माझी एक राउंड संपत आली होती आणि पुन्हा त्या ट्रॅश कॅनला ओलांडायची वेळ आली होती. चालता चालता समोर लक्ष गेले. एक आजीबाई आपल्या दोन नातवंडांना घेऊन बागेत प्रवेश करत होत्या. आजीबाईंचे वय अंदाजे पंचाहत्तरच्या आसपास दिसत होते आणि दोन्ही नातवंडे ४ ते ५ वर्षांची. आजीबाईंनी डोक्यावर स्कार्फ बांधला होता, अंगात स्वेटर घातला होता, एका हातात वॉकिंग स्टिक आणि दुसर्‍या हातात एक पिशवी होती. बहुतेक नातवंडासाठी खाऊ असावा त्या पिशवीत. छोटी नातवंडे बागेत आल्यामुळे अगदी आनंदात होती आणि त्यांचा सारखा चिवचिवाट चालला होता. दोघे आजीच्या आसपासच बागडत होते. त्या ट्रॅश कॅनजवळ येताच आजीबाई थबकल्या, खाली वाकल्या, तो पडलेला पिझ्झाचा बॉक्स उचलून त्या ट्रॅश कॅनमध्ये टाकला. आजीचे बघून ती दोन्ही नातवंडेदेखील थांबली. आपल्या चिमुकल्या हातांनी आजूबाजूला पडलेले टिश्यू पेपरचे बोळे उचलले आणि टाचा उंच करून त्या ट्रॅश कॅनमध्ये फेकायचा प्रयत्न करू लागली. एकदोनदा बोळे बाहेर पडल्यामुळे, खिदळत, पुन्हा ते बाहेर पडलेले बोळे उचलून ट्रॅश कॅनमध्ये नीट टाकले. आजीबाईंनी सर्व साफसफाई झाल्यावर पिशवीतून हँड सॅनिटायझर काढले, त्यातले काही थेंब आपल्या हातांवर टाकले, काही नातवंडांच्या हातावर टाकले. हात चोळून स्वच्छ झाल्यावर पिशवीतून पेपर नॅपकिन काढून सर्वांचे हात स्वच्छ पुसले. ते कागद ट्रॅश कॅनमध्ये टाकले आणि सर्व जण पुन्हा चिवचिवाट करीत पुढे चालायला लागले.

मी एकदम थक्क झालो. आजीबाईंनी आपल्या कृतीने एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य केल्या होत्या. नवीन पिढीला स्वच्छतेचे महत्त्व जाणवून दिले, सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली, सार्वजनिक मालमत्तादेखील आपली समजून ती वापरावी, त्याची नीट काळजी घ्यावी, त्याची देखभाल करावी हा वस्तुपाठ दिला आणि हे सर्व एक शब्दही न बोलता.

आजीबाईंनी आपला खारीचा वाटा उचलला होता
आणि मी..?
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 7:56 pm | नूतन सावंत

आणि मी?हा प्रश्न जेव्हा सवत:ला विचारता येतो तेव्हाच सुधारणेला वाव असतो.सगळ्यांची मानसिकता तितक्या स्तरावर नसते.

पैसा's picture

11 Nov 2015 - 1:17 pm | पैसा

आवडलं

पद्मावति's picture

11 Nov 2015 - 2:30 pm | पद्मावति

खूप मस्तं लेख. आवडला.

एस's picture

11 Nov 2015 - 2:32 pm | एस

सुधारणा ही प्रथम स्वतःपासून सुरू करावी लागते. हा लेख वाचून बर्‍याचजणांना ती करावीशी वाटेल अशी आशा व्यक्त करतो.

प्रदीप's picture

13 Nov 2015 - 8:54 pm | प्रदीप

अतिशय आवडला.

आजींची जगण्याची, शिकवण्याची पद्धत मनाला भिडून गेली. आणि लेखातून हे मांडण्याचे कसबदेखील !

नाखु's picture

24 Nov 2015 - 4:16 pm | नाखु

कुठलंही व्याख्यान देत बसली नाही, थेट कृती आणि परिणाम अपेक्षीत..

पियुशा's picture

24 Nov 2015 - 3:55 pm | पियुशा

आवडेश :)

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 4:13 pm | संदीप डांगे

लेखन आवडलं.

मांत्रिक's picture

25 Nov 2015 - 6:30 am | मांत्रिक

आवडला लेख.

सौन्दर्य's picture

27 Nov 2015 - 7:52 am | सौन्दर्य

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप खूप आभार.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2015 - 10:18 am | मुक्त विहारि

मस्त...