जनरल टोप्टिगिन

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in दिवाळी अंक
31 Oct 2015 - 10:51 am

.
aaa

जनरल टोप्टिगिन (रशियन लोककथेचा भावानुवाद क्र. 2)
मूळ लेखक निकोलाई नेकरासोव

गोष्ट परत एकदा रशियेतली बरं का मंडळी, खूप खूप जुनी. म्हणजे जेव्हा झार मालक रशियावर राज्य करत तेव्हाची. रशियात त्या वेळी प्रवासी अन मालवाहतूक करायला त्रोइका नावाची घसरगाडी वापरत असत अन ह्या त्रोइकाच्या गाडीवानाला म्हणत 'यामशिकी'. अशाच एका तरुण यामशिकी - म्हणजे फ्योदोरसोबत घडलेली ही एक मजेशीर गोष्ट.

उरल डोंगर रशियाला युरोपियन अन एशियन अशा दोन भागात विभागतात, त्या डोंगराच्या पूर्वेकडील पायथ्याला थोडे दक्षिणेकडे एक गाव होता. त्याचे नाव सेरोव असे होते. त्या काळी हा गाव म्हणजे एक टुमदार प्रकरण होते. छोटे अन सुंदर. फ़क्त हिवाळ्यात हाडे गोठावी असली थंडी तिथे असे. अर्थात थंडी लोकांना काय नवी नव्हतीच म्हणा. फ्योदोर मूळचा सेरोवचा. उरल पार करून लोक सेरोवमध्ये येत व तिथून आपापली सोय पाहून येकातरीनबर्गला जात असत दक्षिणेकडे. गावची अर्थव्यवस्था पूर्णपणे घोडे भाड्याने देणारे, हॉटेलवाले त्रोइका अन त्यांचे यामशिकी ह्यांच्यावर चाले, तसे फ्योदोरचेही बरे चालले होते. लांब अंतरावर त्रोइकाने जाणे सोइस्कर पडे लोकांना. झार मालकांनी तर दर काही मैलांनी त्रोइकाची घोडी बदलायला 'एक्स्चेंज स्टेशन्स' बनवली होतीच सबंध रशियात. अशाच एका संध्याकाळी लवकर झुंजरके पडले होते. वाढत्या अंधारासोबत थंडीसुद्धा प्रचंड वाढत होती. सेरोववरून येकातरीनबर्गला एका कुटुंबाला पोहोचवायला गेलेला फ्योदोर आपली त्रोइका परत सेरोवच्या दिशेने हाकत निघाला होता. रात्रीच्या आधी कसेही करून सेरोवला पोहोचायचे, असा त्याचा मानस होता. पण वाटेत असलेला घट्ट बर्फ अन चिखलाचा रेंदा व खड्डे त्याला त्रोइका मनसोक्त भरधाव हाकू देत नव्हते. तरीही हळूहळू फ्योदोर अन तीन घोडी जुंपलेली त्याची त्रोइका सेरोवकडे सरकत होते. आता तो सेरोवच्या आधी 35 मैल असलेल्या एका मोठ्या अन दाट जंगलाजवळ होता. हे असले जंगल होते की रस्तासुद्धा त्यातून नेणे अशक्यकोटीचे काम होते, म्हणूनच पूर्ण जंगलाला जवळपास मैलभराचा वळसा घालून असा तो रस्ता जात असे. हळूहळू चालत असलेली फ्योदोरची त्रोइका जेव्हा ह्या रस्त्याच्या ऐन वळणावर पोहोचली, तेव्हा त्याने एक विस्मयकारक दृश्य पाहिले. त्याच्यापासून जवळपास फर्लांगभर अंतरावर एक मनुष्याकृती जोरजोरात उजवा हात हलवत होती त्याच्याकडे पाहून. विस्मयकारक हे की त्या आकृतीच्या शेजारी आणखी एक आकृती उभी होती, ती जवळपास दीड पुरुष उंच होती!.

"च्या मारी, इतका उंच कोण बुवा असेल बरं??" असा विचार करत फ्योदोरने त्रोइका अजूनच हळू केली. जवळ जाताच मात्र फ्योदोरची गाळण उडाली, कारण ती दीड पुरुष उंच आकृती म्हणजे एक भले थोरले कथ्या रंगाचे अस्वल होते. ततपप होऊ लागलेला आपला यामशिकी फ्योदोर आता घोड्यांची शेपूट पिरगाळून त्यांना जोरकस पळवणारच होता, इतक्यात आवाज आला,
"ओ ओ त्रोइकावाले, ओ यामशिकी, घाबरू नका हो, इगोर काहीच करणार नाही तुम्हाला."
हा आवाज आला, तेव्हा मात्र फ्योदोरचे लक्ष अस्वलासोबत असलेल्या सामान्य मनुष्याकृतीकड़े गेले. ती आकृती झटक्यात पुढे आली. तो एक लांबच लांब राखाडी दाढी असलेला बुवा होता.
"घाबरू नको यामशिकी, हा इगोर आहे. प्रशिक्षित तर आहेच तो, पण माझा मित्रही आहे, सवय आहे त्याला माणसांची. तो काहीच करणार नाही तुला."

थोडासा जिवात जीव आलेला, पण तरीही धडधड वाढलेला फ्योदोर त्याला म्हणाला, "ते सगळे ठीक आहे हो महाशय, पण तुम्ही कोण कुठले?? आँ? इतक्या संध्याकाळी अस्वल घेऊन जंगलाच्या तोंडी काय करताय? अन मुख्य म्हणजे मला का थांबवले??"

"अरे हो हो मित्रा, माझे नाव त्रिफोन आहे बरं का, मी ह्या इगोरचा मालक आहे. ह्याच्या कसरतींचा खेळ दाखवून मी चार रुबल कमवतो बघ. आम्ही पहाटेच वाटेला लागलो होतो, पण आता अंधार खूप वाढतो आहे अन आम्हाला सेरोवला पोहोचायचे आहे. तू आम्हाला त्रोइकामधून सेरोवला ने, म्हणजे उद्या सकाळी आम्ही परत आमच्या उरलपलीकडल्या प्रवासाला ताजेतावाने होऊन निघू. नेशील?"

"अहो, ते ठीक आहे हो, पण हे तुमचे अस्वल, इगोर का काय भले सणसणीत आहे हो, जरा भीती वाटते मला. शिवाय घोडी बुजतील ते वेगळेच."

"तू नको चिंता करूस मित्रा. मी सांगतो तसे करतो हो इगोर. चल न घेऊन आम्हाला, तुला दोन रूबल देईन. शिवाय वाटेत जरा मजा मजा होईल ती वेगळीच रे" असे म्हणून त्रिफोन पुढे बोलला, "इगोर, बस!" तसे ते भलेथोरले जनावर फतकल मारून बर्फातच बसले. थोडा धीर धरून जेव्हा फ्योदोरने त्याच्याकडे पाहिले, तसे त्याला हसूच आले. पायात सैनिकाचे असावे तसे बूट अन डोक्यावर खोटी मिलिट्री कॅप घातलेले ते अस्वलाचे ध्यान चेहर्‍यावर असलेल्या वेंधळ्या अन करुण भावापायी एकदमच बापुड़वाणे अन मजेशीर दोन्ही दिसत होते.

थोडा विचार करून फ्योदोर बोलला, "ठीक आहे त्रिफोन, चढव तुझे अस्वल त्रोइकावर."

ह्यावर खूश झालेला त्रिफोन मायेने अस्वलाला म्हणाला, "इगोर, गाडीत चढ पाहू बाळा,"

तसे ते प्रकरण गाडीत चढले व एखादा ढेरपोट्या दरकदार बसावा, तसे दोन्ही हात (?) मांड्यांवर ठेवून बसले अन त्रिफोन त्याच्या शेजारी बसला, तेव्हा फ्योदोर अस्वस्थ झालेल्या घोड्यांना चुचकारून मार्गी लागत होता. मध्येच त्या अस्वलाकडे पाहून हसत होता. एकंदरीत पुढले 35 मैल त्याचा प्रवास कंटाळवाणा उरला नव्हता. सात-आठ मैल पुढे जाता जाता त्रिफोनला रस्त्याच्या कडेला एक काबाचोक उर्फ 'टॅवर्न' उर्फ ढाबा दिसला. मस्त जागी होता तो. जंगलाचा वळसा पार करून आलेले प्रवासी इथे थांबत, थोडे खाऊनपिऊन मग मार्गी लागत असत. तसे त्याने फ्योदोरच्या खांद्यावर हलकेच थाप मारत म्हटले, "चल यामशिकी, जरा मजा मजा करू या." थंडीत गाडी हाकणार्‍या फ्योदोरलासुद्धा सतत आठ मैल घोडी हाकून कंटाळा आला होता, तोही म्हणाला, "चला चला, फक्त जास्त उशीर नको हो करायला." त्रिफोनने हमी दिली, तेव्हा ते त्या काबाचोकसमोर थांबलेसुद्धा होते. उडी मारून फ्योदोर उतरला अन त्रिफोनसुद्धा उतरला. तो अस्वलाला म्हणाला, "इगोर, तू बस हो इथे बाळा निवांत, त्रास नाही द्यायचा कोणाला. आम्ही जास्तीत जास्त तासाभरात येतो." असे म्हणून तो अन फ्योदोर दोघे आत गेले, घोडी त्रोइकाला जोडल्याजोडल्याच आरामात उभी राहिली अन इगोर आपल्या गळ्यातली घंटा वाजवत पंजे चाटत तसाच शाही थाटात बसून राहिला. एकाचे दोन तास झाले, दोनाचे तीन.. फ्योदोर अन त्रिफोन आत बसून वोडका रिचवत होते सफरचंदाच्या स्वादाची अन तुफ़ान हास्यविनोद सुरू होते. कारण त्रिफोनचे किस्से फ्योदोर, बाकी गिर्‍हाइके अन काबाचोकचा मालक सगळ्यांना पोट धरधरून हसवत होते. घोडी अन अस्वल मात्र बाहेर उभे होते शांतपणे.

जसाजसा वेळ आणखी जात गेला, तसे थंडीला वैतागलेली घोडी उभ्याउभ्या चुळबुळ करू लागली अन खासे सरदार अस्वलरावसुद्धा आपल्या चार पायांवर नैसर्गिक अवस्थेत येऊन त्रोइकामध्येच चुळबुळ करीत मागेपुढे फिरत होते. फिरता फिरता ते अस्वल त्रोइकाच्या पुढल्या भागात तोंड खुपसते झाले अन त्याने एक बारीक हुंकार भरला, तशी त्रोइकाची तिन्ही घोडी जागीच खिंकाळून थयथयाट करू लागली. हे सगळे पाहून बावचळलेले ते अस्वल परत गुमान मागे गेले अन आपल्या दरकदार पोझिशनमध्ये त्रोइकाच्या सीटवर बसले अन बेट्याने घात केला! कंटाळलेल्या त्या अस्वलाने जांभई देता देता एक डरकाळी फोडली.. अन झाले!!! आधीच आंबलेली, बावचळलेली ती तीन घोडी बिना यामशिकीची नुसते ते अस्वल घेऊन सुसाट सुटली. इकडे फ्योदोर अन त्रिफोन त्यांचा कल्ला अन त्रोइकाच्या घंटीचा आवाज ऐकून बाहेर दौडत आले, तोवर ती सुसाट त्रोइका अन तिचा अजब प्रवासी बरेच दूर पोहोचले होते.

जीव खाऊन ती तीन घोडी त्रोइका ओढत होती अन आत भेदरलेले अस्वल बसले होते. दर काही फुटांनंतर त्रोइका खड्डयामधून गेली की इगोर अस्वल अजून भेदरून डरकाळी फोडत असे अन घोडी अजून चेव खाऊन दौडत. एकंदरीत त्या त्रोइकाचा वेग अन त्यातून वरचेवर ऐकू येणार्‍या डरकाळ्या ऐकून रस्त्यावरले वाटसरूसुद्धा चकित होत होते. त्यातच एकाने वेगात जाणारी त्रोइका अन त्यातल्या प्रवाशाच्या बुटाची ओझरती झलक पाहून बोंब ठोकली - "अरे, हे तर विलक्षण कर्तबगार पण रागीट असे जनरल टोप्टिगिन समक्ष त्रोइका हाकत जात आहेत.." येणार्‍याजाणार्‍याला थांबवून तो तेच सांगू लागला. तितक्यात एक म्हणाला, "अरे, हे जनरल घोडी बदलायला तरी थांबतील की एक्स्चेंज स्टेशनवर. आपण जाऊ जोर करून तिथवर, बघू तरी हे जनरल कसे दिसतात."

अन लोकांचा घोळका निघाला त्या दिशेने. इकडे आला खड्डा की मार डरकाळी प्रकरण जोरात सुरू. घोडी बिचारी थकली होती, पण जिवाच्या अकांताने धावतच होती. शेवटी अशी ही 'जनरल टोप्टिगिन'ची वरात एक्स्चेंज स्टेशनजवळ पोहोचली, रखवालदाराने स्टेशन मॅनेजर दिमित्रीला वर्दी दिली अन घोडी धरायला धावला, तेवढ्यात मागून येत असलेल्या मंडळींपैकी जे घोडेस्वार पुढे आले होते, त्यातला कोणीतरी जोरात ओरडला, "अहो, त्यात जनरल टोप्टिगिन बसले आहेत हो!!"

हे ऐकूनच हबकलेला दिमित्री तडक त्रोइकाजवळ पोहोचला, तर त्या वृद्ध दिमित्रीला प्रवाशाचे मिलिट्री बूट्स दिसले, फरचा कोट दिसला, तेव्हा त्याने खूणगाठ बांधली की हा लैच मोठा जनरल असावा. त्याने गायब असलेल्या यामशिकीबद्दलही विचार केला नाही की म्हातार्‍याला 'जनरल साहेबांच्या' तोंडात घातलेली कडीसुद्धा दिसली नाही लोखंडाची. त्याने फक्त आडाखा बांधला की गाडीतली आसामी म्हणजे कोणीतरी कडक मोठा जनरल आहे फक्त, अन नोकरही तेच म्हणत होता. मॅनेजरने अदबीने आपली टोपी काढली अन सुरात अजिजी आणून म्हणाला, "मेहरबान, मुजरा करतो." शिवाय त्याने जनरलला वोडका किंवा चहापैकी काय चालेल ते विचारले. कारण म्हातार्‍याला ह्या उच्चपदस्थ जनरलला खूश करायचेच होते.

ह्यावर जनरलसाहेब एकच उत्तरले, "हूँ घुर्रर्रssssss" जोरात आलेली ही डरकाळी ऐकून म्हातार्‍या दिमित्रीने सेकंदभर जनरलकडे पाहिले अन बुडाला पाय लावत पाचपन्नास फूट दूर पळाला अन गळ्यातला क्रॉस घट्ट धरून म्हणाला, "अरे देवा! गेली चाळीस वर्षे मी स्टेशन्सवर काम केले वेगवेगळ्या गावच्या. मी अतिशय कडक अन रागीट जनरल पाहिले आहेत. कोणाला दात नव्हते, तर कोणाच्या डोईवर केस नव्हते. पण तोंडात कडी असलेला जनरल कधीच पाहिला नव्हता. हे कायतर नवे प्रकरण दिसते आहे बुवा!"

आत्तापर्यंत स्टेशनवर थांबलेले बाकी यामशिकीसुद्धा कुतूहलाने फ्योदोरच्या त्रोइकाभोवती गोळा झाले होते अन त्रोइकाच्या मागून सुटलेले लोकसुद्धा आता आरडाओरडा करीत तिथे पोहोचले होते. इतकेच काय, तर विचित्र आरडाओरडा ऐकून शेजारच्या गावातले बाप्ये-बायका अन पोरेटोरेही तिथे पोहोचली अन सगळीकडे कानोकान खबर झाली की स्टेशनवर अस्वलाच्या आवाजात ओरडणारा जनरल आला आहे.

तेवढ्यात घाबरून मागे पळालेला दिमित्री तिथूनच ओरडला, "मेहरबान, आपणास आत येऊन आराम करायला आवडेल काय?"

परत एकदा "हूँ घुर्रर्रssssss"

आता मात्र ती डरकाळी ऐकून मॅनेजर अन बाकी मंडळीसुद्धा सुसाट दूर पळाले त्रोइकापासून. पुढले अर्धा तास हे डरकाळी फोडणारे आढ्य जनरल त्रोइकामध्येच बसून होते. अर्ध्या तासानंतर दोन घोडी वेगाने आली व दोन माणसे घाईघाईत स्टेशनमध्ये शिरली. ते कोबाचोकमधून धडपडत आलेले फ्योदोर अन त्रिफोन होते. त्रिफोनने उपस्थित लोकांस अस्वलाबद्दल सांगितले, तसे सगळेच हसू लागले अन मग सगळ्यांनी मिळून काठ्या अन सोटे घेऊन ते चिडलेले अस्वल जेर करून परत त्रिफोनच्या स्वाधीन केले. दिमित्रीवर सगळेच हसायला लागले, तेव्हा तो फ्योदोरला म्हणाला, "तूच मेल्या अस्वल असावा तसा दिसतोस."

हसत हसत सगळी मंडळी घरी पांगली.

बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला. असे म्हणतात की रशियाला 'द बेयर' म्हणायची सुरुवात अशाच कथांमधून अन सांगोवांगीच्या लोकप्रवादांमधून सुरू झाली असावी.
.
.
1
.
(चित्र आंतरजालावरून साभार)

.
.
.

.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 7:03 am | विशाल कुलकर्णी

मस्त रे बापु :)

नाना स्कॉच's picture

10 Nov 2015 - 7:17 am | नाना स्कॉच

दिवाळी च्या शुभेच्छा विशाल भाऊ!

नाना स्कॉच's picture

10 Nov 2015 - 7:19 am | नाना स्कॉच

ही लोककथा पेक्षा बालसाहित्य अधिक वाटली सोन्याबापु

तुम्हाला सुद्धा दिवाळी च्या शुभेच्छा

लालगरूड's picture

10 Nov 2015 - 2:17 pm | लालगरूड

कं लिवलय o_O

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 6:22 pm | बोका-ए-आझम

मस्तच बापू!

हाहाहा! हसून हसून मेलो! 'रशियन अस्वल' असे असते तर! ;-)

इडली डोसा's picture

10 Nov 2015 - 7:56 pm | इडली डोसा

मस्त ... हलकीफुलकी कथा... आवडली हे.वे.सां.न.ल. :)

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:34 pm | पैसा

=)) =)) मस्त आहे!! एस ने शीर्षकात काढलेला तो उलटा र पण जबरदस्त आयडिया!

आतिवास's picture

11 Nov 2015 - 7:07 pm | आतिवास

+१

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 5:33 pm | प्रभाकर पेठकर

रशियन कथा आवडली.

गामा पैलवान's picture

11 Nov 2015 - 6:25 pm | गामा पैलवान

बापूसायबा,

काय धम्माल कथा निवडलीत. पण पूर्वीची माणसं खरंच धिप्पाड होती. आपले तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, बहिर्जी नाईक वगैरे मंडळी बघा ना. कसे एकेक जण कसलेले पैलवान होते. (मी मात्र काडीपैलवान आहे ते सोडा!) त्यामुळे जनरल तोप्तिगिन खराच वाटला असणार.

आ.न.,
-गा.पै.

टीप : येकातरिनबर्ग म्हणजे रशियाच्या निकोलस झार आणि कुटुंबियांना कम्युनिस्टांनी ठार मारलं तेच गाव दिसतंय. :-(

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2015 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2015 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! मस्त कथा. भाषांतरही उत्तम. घ्या मनावर हो बाप्पु.

बाबा योगिराज's picture

11 Nov 2015 - 7:29 pm | बाबा योगिराज

भेष्ट हाय वो कथा. मस्त, और भी आने दो

यशोधरा's picture

11 Nov 2015 - 7:37 pm | यशोधरा

मस्त कथा!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Nov 2015 - 7:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार अन दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा _/\_

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 10:55 pm | अभ्या..

मस्तय कथा बापूसाब. हस्वलं अस्वलानं. :)

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 10:56 pm | मित्रहो

बापू कथा लइच खास.

मस्त भाषांतर ओ सोन्याबापू. छान लिहिले आहे.

पद्मावति's picture

12 Nov 2015 - 2:23 am | पद्मावति

मस्तं कथा. आवडली.

चैत्रबन's picture

12 Nov 2015 - 3:18 am | चैत्रबन

मजेशीर कथा. आवडली.

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 5:35 pm | मुक्त विहारि

आवडली....

निकोलाय नेक्रासोवच्या कवितेचं हे स्वैर रूपांतर इतकं भन्नाट केलं आहे की परतपरत वाचतोय आणि खदाखदा हसत सुटतोय!

अत्रन्गि पाउस's picture

15 Nov 2015 - 9:10 am | अत्रन्गि पाउस

एवढेच म्हणतो

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 12:21 pm | DEADPOOL

मस्त

बांवरे's picture

16 Nov 2015 - 5:37 am | बांवरे

भाषांतर फक्कड जमले आहे.
टोप्तिगन पलटी .. घोडे फरार !!!

चतुरंग's picture

16 Nov 2015 - 7:45 am | चतुरंग

मस्त भाषांतर हो सोन्याबापू! :) टोप्टिगिन भलतेच्च भारी निघाले की. बालकथाच असावी ही.

समांतर - एस यांचे सुलेखन भन्नाट आले आहे. कथेचा बाज शीर्षकातूनच समजतो इतके सुंदर!

अवांतर - बेअरचा उल्लेख वाचून आमच्या एका कलीगने मध्यंतरी कॅनडात केलेल्या बेअरहंटचा फोटू आठवला ..

1

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 8:11 am | कैलासवासी सोन्याबापु

बाबौ

जीवें मारले ते अस्वल?

चतुरंग's picture

16 Nov 2015 - 8:21 am | चतुरंग

३५० पौंड वजनाचे होते. कॅनडात उन्हाळ्यात फार अस्वले होतात मग त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायला ते काही दिवस शिकारीचे पासेस विकतात आणि लोक शिकार करायला जातात. तो सीझन संपला की मग मात्र शिकारीला बंदी असते आणि बंदीच्या काळात शिकार केल्यास प्रचंड दंडही आकारला जातो.
अस्वलाचे मांस हे उत्तम समजले जाते आणि त्याचे पंजे ही तर डेलीकसी असते असे म्हणतात! :)

नाखु's picture

16 Nov 2015 - 9:38 am | नाखु

बोअर धाग्यांअध्ये एक बेअर कथा (विलक्षण ताकदीने अनुवादीत)

सोन्याबाप्पू अजून येऊ द्या

विलक्षण ताकदीने अनुवादीत
+१११

चिगो's picture

16 Nov 2015 - 2:36 pm | चिगो

आता सोन्याबाप्पुंसारख्या सोल्जरनी 'जनरल' टोप्टिगिनवर कथा लिहीलीय, हे वाचून वाटलं की शौर्यकथा असेल, पण ही जबरा विनोदी मेजवानी निघाली..
'एस'रावांच्या कल्पक शिर्षकालापण सलाम..

मधुरा देशपांडे's picture

16 Nov 2015 - 4:01 pm | मधुरा देशपांडे

उत्तम जमलंय भाषांतर. आवडली कथा.

मीता's picture

16 Nov 2015 - 4:32 pm | मीता

खूप मस्त कथा..

उगा काहितरीच's picture

16 Nov 2015 - 4:49 pm | उगा काहितरीच

बालकथा आहे का ?
आवडली हेवेसांनलगे !

सौन्दर्य's picture

27 Nov 2015 - 8:22 am | सौन्दर्य

एका अगदी वेगळ्या बाजाची कहाणी म्हणून वाचायला आवडली.

भानिम's picture

30 Nov 2015 - 12:07 pm | भानिम

उत्तम चपखल भाषांतर! रशियन बाजासकट!